गेल्या काही वर्षांतील एकंदरीत नैसर्गिक परिस्थिती जर आपण अवलोकन केली तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. अनपेक्षित असा कसाही ऋतूबदल प्रकर्षाने जाणवत असतो. कुठे अपेक्षेपेक्षा कमी तर कुठे धोधो सतत कोसळणारा पाऊस, कुठे परिसर भाजून काढणारा उष्मा आणि कुठे कडाक्याची थंडी बेजार करून सोडते. आतापर्यंतचे चालत आलेले प्रमाणबद्ध निसर्गचक्रच बिघडलेले स्पष्टपणे लक्ष्यात येत आहे. उदा. ज्या वाळवंटी प्रदेशात जेमतेम चार ते पाच टक्के पाऊस पडत असायचा तिथे आता भरपूर पाऊस पडून पूर येताहेत. दुष्काळी प्रदेश संपन्न बनून संपन्न प्रदेश वैराण /उजाड होतो आहे. बर्फाळ प्रदेशातील वर्षानुवर्ष गोठलेली हिमनदी (glacier) प्रवाही बनते आहे. अशा अनेक हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राची पातळी प्रत्येक वर्षी वाढते आहे. कित्येक जीवजाती संपुष्टात येत आहेत. हवामानखात्याचे अंदाज चुकत आहेत. ही सारी उदाहरणे निसर्गाचा समतोल बिघडत चालला असल्याची द्योतक आहेत. ही सर्वांसाठी खचितच मोठी चिंतनीय व गंभीर बाब आहे. संबंधित तज्ज्ञांनी बरेचदा आपल्याला पूर्वसूचितदेखील केले आहे. परंतु दुर्दैवाने आपण त्याचे गांभीर्य लक्षात घेताना दिसत नाही.
काही वर्षांपर्यंत निसर्गनियमानुसार सारा व्यवहार व्यवस्थित चालत असल्याने सर्व काही सुरळीत होते. पण कमालीचा वाढलेला मानवी स्वार्थ व त्यानुसार घडणारी दुष्कृती हल्लीचा निसर्गाचा/पर्यावरणाचा तोल बिघडविण्यास कारणीभूत असल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते. मानवी स्वार्थ व सुखाच्या हव्यासापोटी अनिर्बंध नगरविकास, शहरीकरण, सुशोभीकरण, औद्योगिकीकरण इत्यादीसाठी विकसित तंत्रज्ञानाच्या मदतीने, अनिर्बंध वृक्षतोड, डोंगर/पर्वत फोड, औद्योगिक सांडपाण्याची व विषारी वायूची अयोग्य विल्हेवाट तसेच धूर ओकणारी वाहने सर्वत्र चालविणे इ. चा परिणाम म्हणून पर्यावरणाचा र्हास होत असल्याचे धोक्याचे सतत इशारे मिळत असूनही ह्या धोकादायक गोष्टीवर पुरेसा अंकुश न ठेवल्याने आपणच आपल्या सभोवलताचा परिसर रोगट, दुषित, अनारोग्यकारी करीत आहोत ह्याची आपणास साधी कल्पनाही येत नाही. आपल्या ग्रहाभोवती ओझोन वायूचा (O3) सुरक्षित पट्टा आहे. त्यामुळे सूर्यकिरणातील घातक घटक (अतिनील किरणे) आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मानवच्या नाना प्रकारच्या कृतींनी ह्या सुरक्षित पट्ट्यास अनेक ठिकाणी खिंडारे पडतात. त्यामधून घातक (ultra-violet rays) किरणे पृथ्वीवर उतरून नाशास कारणीभूत ठरतात. त्यामुळे वैश्विक उष्णता वाढून निसर्गाचे चक्रच बिघडते आहे त्याचे काय?
मानवी अपेक्षित उपाययोजना
निसर्गाने मानवास जन्मात:च बुद्धीची महान देणगी दिली आहे. त्या जोरावर त्याने स्वत:सोबत इतरांचाही विकास व जीवन साधणे (live and let live) हे अपेक्षित आहे. आपला सर्वांगीण विकास साधित असताना अन्य जीवांवर अन्याय न होऊ देण्यासाठी मध्यम मार्ग खचितच साधायला हवा. तो विवेक त्याने जपायलाच हवा. उदा. स्वत:चा विकास साधताना जंगल व वृक्ष तोड करीत असताना दुसऱ्या ठिकाणी नवे वृक्ष संपन्न करायलाच हवे. आपल्याकडे समारंभपूर्वक एखाद्या ठिकाणी झाडे लावली जातात परंतु तो उत्साह तेवढ्यापुरताच असतो. त्या वृक्षांची नित्य व दैनंदिन योग्य निगराणी, देखभाल मात्र फारच अभावाने होताना दिसते. त्याचप्रमाणे औद्योगिक वायू/कचरा/जल इ. गोष्टींचा निपटारा योग्यरित्या करून कोणतेही प्रदूषण होवू न देणे याकडेही लक्ष द्यायला हवे. संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा मोठा मंत्र (निसर्गाशी सख्य करणे) समाजाला दिला. तो विसरून चालणार नाही. जसे कर्म तसे फळ या न्यायानी आपले कर्म नेहमी पर्यावरणपूरकच असायला हवे. अन्यथा आम्हीच आमच्या कृतीनी सर्वनाशाचा धोंडा आमच्याच पायावर ओढवून घेणार आहोत.
२/४६ भाक्तियोग सोसायटी, परांजपे नगर, बोरीवली प., मुंबई ४०००९१, मोबा.९८१९८४४७१०
1. ओझोन मुळे जग तापत नाही. मुख्यतः कार्बन डाय ऑक्साईड आणि methane मिथेन मुळे तापलेल्या पृथ्वी पासून अंतराळात उष्णता परत पाठवणाऱ्या इफ्रा रेड लहरी अडवल्या जातात. त्यामुळे वातावरणात आणि नंतर समुद्रात तापमान वाढते.
2. भूगर्भातील इंधने जाळणे थांबवणे कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण कमी करण्यासाठी, पशुपालन आणि पाणी तुंबवून रोप लावणी करून भात पिकवणे या दोन गोष्टी बंद करून मिथेनचे उत्सर्जन थांबवणे हे दोन उपाय त्यावर आहेत.
3. तुमच्याशी लोकशाही सरकार पशुपालन आणि भात लावणी बंद करू शकणार नाही त्यामुळे आपणच सर्व जनतेने भात खाणे आणि दूध पिणे आणि गोमास आणि शेळ्या मेंढ्या यांचे मास खाणे बंद केले तरच हे दोन व्यवसाय बंद पडतील.
3. झाडे लावणे उपाय अत्यंत किरकोळ परिणाम करणारा आहे. कारण एक झाड भारतात 25 किलो कार्बन डाय-ऑक्साइड शोसून घेऊ शकते. त्यासाठी त्याला सर्व बाजूने किमान दोन दोन मीटर जागा तरी लागते. भारत प्रगतिशील राष्ट्र असल्याने आपले दर मानसी कार्बन उत्सर्जन दोन टनाच्या आसपास आहे पण इतर प्रगती राष्ट्रांचे कार्बन उत्सर्जन सहज तीस ते चाळीस टनापर्यंत असते. एवढा कार्बन शोषून घेण्यासाठी गेल्या साठी लागणारी झाडे लावण्यासाठी जवळपास कोणत्याच देशाकडे पुरेशी जागा नाही. शिवाय विविध कारणांनी जंगलांचा नाशही होत असतो, व त्यावेळी जंगले कार्बनचे उत्सर्जनच करतात.