विजय सिंह याने जपानमधील दहा अनुकरणीय गोष्टींची यादी दिली आहे. (तहलका, 26 मार्च 2011). ही यादी नुकत्याच झालेल्या भूकंप-त्सुनामी प्रकारानंतर व त्यामुळे उद्भवलेल्या अणुऊर्जाकेंद्रांतील स्थितीनंतर जपानी जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आहे.
1) सारे काही शांत होते. उरबडवे दुःखप्रदर्शन कोठेही झाले नाही. दुःख आपोआपच उदात्त झाले.
2) पाणी व वाणसामानासाठी शिस्तशीर रांगा लावून लोक उभे राहत होते. कोठेही शिवीगाळ, हातवारे वगैरे झाले नाही.
3) इमारती हलल्या, डुगडुगल्या, पण पडल्या नाहीत. याचे श्रेय डिझायनर आर्किटेक्ट बिल्डरांना द्यायला हवे.
4) लोकांनी गरजेपुरतीच खरेदी केली, ज्यामुळे सर्वांना पुरेशा वस्तू मिळू शकल्या.
5) दुकाने लुटली गेली नाहीत. गावे सोडणाऱ्या मोटरगाड्यांनी हॉर्न वाजवत वाहतूक ठप्प केली नाही.
6) पन्नास कामगार अणुभट्ट्या थंड करायला समुद्राचे पाणी पंप करत राहिले. पळून गेले नाहीत.
7) रेस्टॉरंटांनी किंमती कमी केल्या. असुरक्षित ATM केंद्रे टाळली गेली. सबळांनी दुबळ्यांची काळजी घेतली.
8) शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपात्कालीन स्थितीत कसे वागायचे ते माहीत होते, व ते तसेच वागले.
9) माध्यमांनी कौतुकास्पद संयम दाखवला. फक्त वार्तांकन केले गेले, आगाजा नाही.
10) दुकानांत वीज जाताच लोकांनी घेतलेले सामान पुन्हा जेथल्या तेथे ठेवले व शांतपणे दुकाने सोडली.
विजय सिंह नोंदतो की हा देश दहा मुद्द्यांबाबत काळजी वाटण्याच्या स्थितीत आहे.
1) वीज बहुशः अणुभट्ट्यांमधून येते.
2) सरासरी वय जास्त आहे. वृद्धांचे प्रमाण फार आहे.
3) विकास बढेशी कर्जावर बेतलेला आहे.
4) निसर्गाची ताकद ओळखून नियोजन झालेले नाही.
5) स्थानिक बोलींवर अतोनात आग्रह आहे. कित्येक बाहेरून आलेल्या मदतनिसांना बोली समजत नसे.
6) वस्तीचा फार मोठा भाग सागरतीरांवर आहे.
7) किनाऱ्याजवळच्या बहुसंख्य इमारती बुडल्या, एकदोन मजल्यांच्या आहेत.
8) धोक्याकडे दुर्लक्ष झाले. रिश्टर 9.0 च्या भूकंपाआधी रिश्टर 7.2 चे पूर्वकंप (fore shocks) येऊन गेले होते.
9) मदतकार्य दीर्घकाळ आणि सातत्याने सुरू ठेवावे लागणार आहे.
10) देशात राजकीय स्थैर्य नाही.
आता या अधिक-उणे घटकांपासून आपण काय धडे घ्यावेत? तशी आपल्याकडे अनुभवांतून शाहणे होण्याची उज्ज्वल परंपरा नाही. पण तरीही…..?