स्वतःचे विचार, भावना, येणारे अनुभव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबतच्या प्रतिक्रिया, अशा अनेक गोष्टी माणसं नोंदत असतात. मित्रांना, सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांमधून विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अनेक पाश्चात्त्य लेखकांच्या, विचारवंतांच्या अश्या डायऱ्या, जर्नल्स, पत्रसंग्रह नंतर प्रकाशित झाले आहेत. अमेरिकन कादंबरीकार जॉन स्टाइनबेक तर त्याची ग्रेप्स ऑफ राथ ही कादंबरी लिहीत असताना बरोबरच एक डायरीदेखील लिहीत असे. गाणारा गायक जसा बैठकीच्या आधी गळा मोकळा करतो तसा स्टाइनबेक आधी डायरी लिहून हात मोकळा करत असे.
व्हर्जिनिया वूल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड ह्या लेखिकांच्या डायऱ्या, पत्रे वाचताना फार मजा वाटली होती. समकालीनांबद्दलचे हेवे-दावे, राग-लोभ, त्यांच्या लिखाणावर केलेली मुक्त टीका ह्या सगळ्या गोष्टी डायऱ्यांमध्ये विनासंकोच, मोकळेपणाने व्यक्त झालेल्या दिसतात, कारण त्या प्रकाशित होण्याची शक्यता नव्हती. सतराव्या शतकातील सॅम्यएल पीप्ज (Samuel Pepvs) ह्या इंग्रज सिव्हिल सर्व्हटची डायरी तर त्याने घडवलेल्या खाजगी शॉर्टहॅन्डमध्ये लिहिलेली होती. एकोणिसाव्या शतकात ही गप्त लिपी उलगडून मग ती डायरी वाचली गेली.
पण भारतीय लेखक, विचारवंत किंवा सामान्य माणसांच्याही अश्या डायऱ्या वाचनात आल्या नाहीत. आत्मचरित्रे खप आहेत पण ती बऱ्याच वेळा स्वसमर्थनार्थ लिहिलेली असतात. डायरीत असलेली ‘विश्रब्ध शारदा’ मात्र कधी कुठे सापडली नाही. म्हणून प्रसिद्ध हिंदी लेखक निर्मल वर्मा ह्यांचे धुंध से उठती धुन (धुक्यातून उमटणारे सूर) हे डायरी, नोट्स आणि जनेल्सचे संकलन जेव्हा मिळाले तेव्हा अतिशय उत्सुकतेने ते वाचायला घेतले आणि एक खजिनाच मिळाल्याचा आनंद झाला.
मराठी वाचकाला हिंदी वाङ्यविश्व पूर्णपणे अपरिचित आहे. प्रेमचंद, मैथिलीशरण गुप्त, राहुल सांकृत्यायन, निराला, कमलेश्वर, अज्ञेय वगैरे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नावांची फक्त तोंडओळख असते. त्यांचे भाषांतरित साहित्यही वाचले जात नाही. 1999 साली साहित्यासाठी असलेला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आणि 2001 मध्ये राष्ट्रपतींचा पद्मभूषण सन्मान प्राप्त झालेले निर्मल वर्मा, बऱ्याच जागरूक मराठी वाचकांनाही परिचित नाहीत. कथा आणि कादंबरी ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये निर्मल वर्मांनी स्वतःचा अमीट ठसा उमटवला आहे. त्यांच्या संवेदनशीलतेला असलेली वैचारिकतेची डूब त्यांच्या साहित्याला एका असाधारण पातळीवर नेते, ज्यामुळे त्यांच्या वाचकाचे अनुभवविश्व समृद्ध होते. कला, साहित्य, राजनीती, धर्म ह्या सगळ्या क्षेत्रांबाबत त्यांनी केलेले मूलभूत विचार अप्रत्यक्षपणे, व्यक्ती आणि घटनांच्या अनुषंगाने, त्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये प्रगट होतात. त्यांच्या निबंधांमधून ते थेटपणे आपल्यापर्यंत पोचतात. निर्मल वर्मांची डायरी वाचताना एका प्रतिभावान लेखकाच्या सृजनप्रक्रियेचे, त्याच्या मनोव्यापारांचे, त्याच्या भावनिक आणि वैचारिक जडण-घडणीचे दर्शन वाचकाला होते.
निर्मल वर्मांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू ह्या डायरीत पहायला मिळतात. लेखक म्हणून, वाचक म्हणून आणि जीवनाची मिरवणूक spectacle कुतूहलाने पाहणारा एक प्रेक्षक म्हणून ते आपल्याला भेटतात. पण कोणत्याही रूपात भेटले तरी प्रामुख्याने जाणवते ती त्यांची चिंतनशील वृत्ती. ह्या वृत्तीमुळेही असेल कदाचित् पण सतत ते एकटे असतात. समूहात असले तरी एकटे असतात. माणसांपेक्षा पुस्तके आणि त्यांचे लेखक त्यांना जवळचे असावेत अशी भावना होते. टॉलस्टॉय, पुस्त, रिल्के, व्हर्जिनिया वूल्फ, काफ्का, चेकॉव्ह, विटगेन्स्टाईन, सिमॉन वेल आणि असंख्य इतर, काही आपल्य ओळखीचे पण खूपसे अनोळखी. ह्या सगळ्यांचा उल्लेख एखाद्या जिवलग स्नेह्यासारखा ते करतात. त्यांच्या लिखाणातल्या अवतरणाने आणि त्यावरच्या निर्मल वर्मांच्या टिप्पणीने एक अद्भुत वैचारिक प्रवास केल्याचा आनंद मिळतो जो वाचकाला अंतर्मुख करतो. भारतीय संस्कृती, इतिहास, वाङ्मय ह्याची त्यांना असणारी जाण सखोल आहेच पण पाश्चात्त्य संस्कृती आणि वाङ्मयाच्या अभ्यासामुळे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला आहे. इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे वर्तमानातील सर्व घटना आणि उपलब्धी ते इतिहासातून मिळालेल्या ज्ञानाशी ताडून बघताना दिसतात. वेगवेगळ्या घटनांमधली साम्यस्थळे, वेगळेपण, त्यातले ‘पॅटस्’ इतिहासामुळे त्यांना जाणवतात ज्यामुळे त्यांची निरीक्षणे मौलिक ठरतात. कीव्हमध्ये गेले असताना ‘अंदाधुंद औद्योगिकीकरणामुळे विस्थापित झालेल्या युक्रेनियन शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा उफाळून आली. त्याबद्दल ते लिहितात:
रशियात सामूहिकीकरणाच्या शापामुळे शेतकऱ्यांची एक पूर्ण पिढी निघृणपणे उखडली गेली ह्याची जाणीव क्वचितच कुणाला असेल. स्टालिनच्या लेबर-कॅम्पमध्ये झाला नसेल इतक्या व्यापक प्रमाणात रशियातील शेतकरी-समाजाचा विनाश त्यामुळे झाला. त्यांची जखमी झालेली मानसिकता ही तर अजूनच वेगळी दुःखद घटना आहे. जॉन बर्जरनी आपल्या पिग-अर्थ ह्या पुस्तकात युरोपमधील इतर देशांत कृषि-संस्कृतीच्या विनाशामुळे झालेल्या भयावह परिणामांचे इतके मार्मिक विवेचन केले आहे – पण आश्चर्याची गोष्ट ही की त्यात रशियात झालेल्या ‘वंशविच्छेद’ (जेनोसाइड) चा कोणताही उल्लेख नाही. त्यांचे ‘डावे दुराग्रह’ हे तर त्यामागचे कारण नसेल?
निर्मल वर्मांचे हे विधान सिद्ध करणारे जॉन बर्जरच्या पुस्तकातले एक अवतरण आपल्याला पुढच्याच परिच्छेदात वाचायला मिळते :
भांडवलवादाची ही ऐतिहासिक भूमिका आहे, ज्याची ॲडम स्मिथ आणि मार्क्सने कधी कल्पनाही केली नव्हती – भांडवलवाद इतिहासच नष्ट करतो. शेतकऱ्यांना नष्ट करण्याच्या त्याच्या कृतीमधून ही भूमिका स्पष्ट होते, कारण शेतकऱ्यांचाच वर्ग असा आहे जो परंपरा टिकवून ठेवतो. भूतकाळाला जोडणारी प्रत्येक साखळी भांडवलवाद तोडून टाकतो. स्वतःला सतत पुनरुत्पादित करत राहण्यानेच भांडवल टिकू शकते. त्याचे आजचे वास्तव त्याच्या उद्याच्या पूर्तीवर अवलंबून असते. सतत स्वतःला उपभोक्तावादात परिणत करणे हेच भांडवलाचे ‘मेटॅफिजिक’ आहे. हीच विचारधारा शेतकऱ्यांची गणना मागासवर्गात करते. त्यांच्या कृषि-जीवनाची मुळे उखडून टाकून त्यांना शहराकडे ढकलते, गलिच्छ झोपडपट्टीत राहायला भाग पाडते. त्यांचा स्वतःचा भूतकाळ ते गमावून बसतात आणि ज्या चालीरीतींनी आणि कर्मकांडांनी कधीकाळी त्यांच्या जगण्याला सातत्य पुरवले होते त्या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात ते विसरून जातात. अशा त-हेने आपल्याला दिसते की इतिहासात ज्याला आपण ‘प्रगती’ म्हणतो ती प्रगतीच इतिहास नष्ट करत असते.
बर्जरचे हे अवतरण उद्धृत केल्यानंतर निर्मल वर्मा म्हणतात, “ ‘इतिहास बकवास आहे हे हेरि फोर्डचे म्हणणे चूक नाही. इतिहासाबाबत स्टालिन आणि फोर्डच्या दृष्टिकोनात काही फरक नाही.” बर्जरचे वरचे अवतरण भांडवलशाही देशांना जेवढे लागू पडते तेवढेच समाजवादी व्यवस्थांनाही लागू पडते, हे निर्मल वर्मांचे निरीक्षण त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. कुठल्याही विचारधारेचे ते गुलाम झाले नाहीत. तरुणपणी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ता असूनही तटस्थपणे त्यांनी त्या विचारधारेचे चढउतार अभ्यासले. समाजवादामुळे संपत्तीचे फक्त हस्तांतरण झाले, व्यक्तीकडून तिची मालकी राज्याकडे गेली. ह्यामुळे स्वामित्वाची भावना हिरावली गेलीच पण उत्तरदायित्वाची-जबाबदारीची -भावनाही नाहीशी झाली, ह्याचे निर्मल वर्माना दुःख आहे. “एखाद्या गोष्टीचे जेव्हा तुम्ही मालक असता तेव्हा तुम्ही तिचे काही देणे लागता – When you own something, you owe something to it.” ह्या विचाराचे गांधींच्या ‘ट्रस्टीशिप’च्या कल्पनेशी असलेले साम्य त्यांना जाणवते.
डायरीमध्ये ठिकठिकाणी विचारसरणींमधली साम्यस्थळे, विरोधाभास आपल्याला भेटत राहतात. लेखक म्हणून आपल्या जबाबदारीचा गंभीरपणे विचार करणारे निर्मल वर्मा हे एक अपवादात्मक लेखक आहेत. साहित्याचा विचार अनेक अंगाने केलेला इथे पहायला मिळतो. इतर लेखकांच्या लिखाणाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्या लेखकांच्या पत्रातील, डायरीतील उतारे, साहित्याचा एक कला म्हणून केलेला विचार ह्यामुळे ही डायरी एक महत्त्वाचा दस्तावेज बनली आहे. “जीवनाच्या कच्च्या मालाचे कलाकृतीत रूपांतर करताना लेखक ‘सच्चा’ आणि ‘कलात्मक’ दोन्ही एकाच वेळी असू शकतो का?” हा प्रश्न विचारून ते पुढे म्हणतात, “कला जीवनातील खोटेपण आपल्यात सामावू शकेल? शंकराच्या नीलकंठासारखे, हे काळे जहर आपली खूण लिखाणांवर उमटवू शकेल?” खोटेपणा हा जीवनाचा एक भाग आहे आणि तो वाङ्मयात प्रगट व्हायला हवा ही निर्मल वर्मांची अपेक्षा लेखक म्हणून असलेली त्यांची प्रगल्भता सिद्ध करते.
कथा, कादंबरीमधल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी लेखकाला स्वतःचे ‘मी’पण पूर्णपणे नाहीसे करावे लागते. त्यांना पुनर्जीवन देण्यासाठी स्वतः मरावे लागते हा निर्मल वर्मांचा विचार कीट्स् ह्या इंग्रजी कवीच्या negative capability ह्या संकल्पनेशी मिळताजुळता आहे. तिथेही कवीने, लेखकाने स्वतःचे व्यक्तिमत्त्व पाण्यासारखे पारदर्शी केल्याशिवाय त्याला अनुभवाचे जिवंतपण त्याच्या लिखाणात प्रतिबिंबित करता येणार नाही असा विचार मांडला आहे.
प्रत्येक लेखक त्याला आवडलेल्या मोठ्या लेखकांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतो असे सांगून ते म्हणतात, ‘पण प्रत्यक्ष लिहिण्याच्या वेळी हे महान लेखक शालीन, विनयशील मित्रांसारखे त्याचा निरोप घेऊन त्याला त्याच्या खोलीत एकटे सोडतात.’ निर्मितीच्या यातना भोगताना त्याला ती खोली नरकासारखी भासते पण तिथेच कदाचित् मौलिक कलाकृतीचा जन्मही होऊ शकतो.
निरोप घेऊन गेलेले हे महान लेखक प्रत्येक लेखकाच्या कलाकृतीमध्ये अप्रत्यक्षपणे उपस्थित असतातच. एका सुंदर रूपकातून ही कल्पना निर्मल वर्मा आपल्यासमोर मांडतात :
प्रत्येक लेखकावर पूर्वीच्या लेखकांचा प्रभाव पडतो – एखादा शब्द, कुठल्यातरी कवितेतील ओळ, कधीतरी वाचलेली जनी कथा- वेगवेगळ्या दिशांतन येणारे हे प्रतिध्वनी एका अनोख्या अनुभवाच्या रचनेमध्ये नवा जन्म घेतात… एखाद्या लहान मुलासारखा, ज्याच्या चालण्यात वडिलांचा भास होतो, हसण्यात म्हाताऱ्या आजीचा, ज्याचा राग पूर्वीच मरून गेलेल्या आत्यासारखा आहे आणि गर्विष्ठपणा पणजोबांसारखा. कधी कधी एक चमत्कारिक उदासपणा त्याच्या चेहेऱ्यावर दिसतो, जो एका विधवा मावशीच्या चेहेऱ्यावरही असायचा. मुलाने ह्या सगळ्यांना पाहिलेले नाही- पण ते सगळे त्याच्यात उपस्थित आहेत. आश्चर्याची गोष्ट ही की त्याचे स्वतःचे जीवन हे केवळ त्याचे आहे, त्याच्या एकट्याच – एखाद्या कलाकृतीसारखे!
निर्मल वर्मांच्या मनात साहित्याबद्दलचा विचार सतत केंद्रस्थानी होता. अनुभव व्यक्त करताना होणारे कष्ट, त्यामुळे वाटणारी हताशा आणि अपराधी भावना ते वरचेवर व्यक्त करतात. आपले जगणे आणि आपले लिहिणे ह्यांत प्रचंड अंतर आहे हा सल त्यांच्या मनात कायम होता. एक मागणी ते सतत मागताना दिसतात – त्यांच्या अंतर्मनाच्या में गाभ्यातून ती प्रार्थनेसारखी व्यक्त होत राहते.
जर माझी एकच इच्छा पूर्ण करण्याचे वरदान कोणी मला दिले तर मी पुन्हा पुन्हा एकच वर मागेन – ज्यामुळे माझे जीवन आणि माझे लेखन ह्यांच्यामधली दरी मिटून जाईल. माझ्याकरता ह्याच्याइतके मोठे सुख नाही, ह्याच्याइतकी तीव्र इच्छा नाही.
निर्मल वर्मांच्या ह्या डायरीची ओळख वाचकांना करून देताना कितीतरी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश ह्यात करता आला नाही ह्याची रुखरुख वाटते आहे. डायरीत त्यांची काही छायाचित्रे आहेत. सर्व छायाचित्रांत ते एकटे आहेत, विचारमग्न, चिंतनात बुडलेले. एकाकीपणाची लेखक म्हणून असलेली गरज आणि व्यक्ती म्हणून असलेले दुःख ह्याच्या कितीतरी नोंदींची इथे दखल घेता आली नाही. कीव्ह, बुडापेस्ट, हार्वर्डपासून मनाली, भोपाळ, कान्हाकिसली, नागालॅण्डपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातले जे त्यांचे अनुभव, त्याचे वेगळेपण, ह्याबद्दलही काही लिहिले नाही, औद्योगिक परिवर्तनामुळे विकृत झालेल्या सिंगरौलीच्या जीवन-प्रणालीबद्दल त्यांनी तळमळीने मांडलेले विचार तर पूर्णपणे भाषांतरित करायला हवे होते पण हे सगळे अंतर्भूत करणे शक्य नव्हते. डायरीची ही फक्त ओळख आहे. धुक्यातून उमटणारे हे सूर त्यांचा मागोवा घ्यायला वाचकांना भाग पाडतील अशी आशा आहे.
पुस्तकाच्या सुरवातीला किंवा शेवटी लेखकाची माहिती छापलेली असते. निर्मल वर्मांच्या पुस्तकांमध्ये त्यांची ओळख सांगणारी पहिली ओळ असते : जन्म – 3 एप्रिल, 1929, जन्मस्थान – शिमला. ही अपेक्षित माहिती वाचल्यावर नंतरची ओळ सतत माझे कुतूहल जागवत आली आहे : बचपन पहाडोंपर बीता. लहानपणच्या संवेदनशील काळात पहाडांशी असलेली ही जवळीक – निर्मल वर्मांच्या व्यक्तिमत्त्वावर तिचा काय परिणाम झाला असेल हे जाणून घ्यायची फार इच्छा होती. ह्या पुस्तकाच्या कव्हरच्या आतल्या पानावर त्याचे एक अंधुक स्पष्टीकरण मिळाले. निर्मल वर्मांवरच्या ह्या त्रोटक टिपणवजा लेखात हा अनामिक लेखक म्हणतो, “निर्मल वर्मांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वावर पडलेली ह्या पहाडी शहराची छाया दूरपर्यंत पसरलेली दिसते. त्यांच्या लिखाणात नेहमी दिसणारी ध्यानमग्नता ह्या लहानपणच्या एकाकी क्षणांच्या अनुभवातून निर्माण झाली असावी. माणसांना एकमेकापासून, एवढेच नव्हे तर स्वतःपासूनही अलग करणाऱ्या प्रक्रियेची त्यांना असलेली खोल जाणीव ह्या अनुभवांनीच त्यांना दिली असावी.”
‘बचपन पहाडोंपर बीता’ ह्या ओळीचा प्रत्येक पुस्तकातील ओळखीत केलेला अंतर्भाव हा निर्मल वर्मांना त्या पहाडांबद्दल वाटणाऱ्या कतज्ञतेचे प्रतीक असावे.
193, मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर-440010.