काही आफ्रिकन देश दुर्मिळ धातूंची खनिजे इतर सर्व जगाला पुरवतात. आजचे प्रगत तंत्रज्ञान या धातूंशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे त्या धातूंच्या खनिजांना भरपूर मागणी असते. उदाहरणार्थ, पूर्व काँगो (पूर्वश्रमीचा झाईर) या देशात कथील, टंगस्टन आणि टैंटलम हे धात सापडतात, आणि हे तीन्ही धात मोबाईल फोन्स बनवण्याला आवश्यक असतात.
काही आफ्रिकन देशांत मध्यवर्ती सत्ता कमकुवत आहे, आणि वॉरलॉ ऊर्फ बाहुबली प्रत्यक्षात सत्ता गाजवतात. या सत्ता गाजवण्यात भाडोत्री सैनिक, आंतर जमातीय हेवेदावे, तस्करी, अशी अनेक अंगे असतात. अशा बाहुबलींचे पैशाचे स्रोत आटवण्याच्या हेतूने अमेरिकन काँग्रेसने (लोकसभेला समांतर, विधानसभा) डॉड-फ्रैंक वॉल स्ट्रीट सुधार कायदा (2010) मध्ये एक कलम घातले, की कोणत्याही अमेरिकन कंपनीने परदेशांतून माल विकत घेताना त्या खरेदीपासून स्थानिक बाहुबलीना मदत मिळू नये यासाठी काय खबरदारी घेतली ते सांगावे. हे कलम कायद्यात समाविष्ट करण्यामागे संघर्ष-खनिजांबाबत काम करणाऱ्या काही संस्थांचा दबाव होता. या संस्थांची नावे (इनफ् प्रॉजेक्ट, ग्लोबल विट्नेस) दाखवतात की त्या सत्प्रवृत्त, मितभोगी, पारदर्शक व्यवहारांच्या पुरस्कर्त्या आहेत.
पूर्व काँगोतील अनेक गरीब लोक फुटकळ खाणकाम करून, फुटकळ खनिज व्यापार करून गुजराण करत होते. या नव्या कायद्याने त्यांच्या उपजीविकेवरच घाला घातला. ते या कायद्याला लोई ओबामा म्हणतात, व हा ओबामाचा कायदा आपल्या दुरवस्थेचे मूळ आहे असे मानतात.
दुसरीकडे बाहुबलींच्या देखरेखीखालील खाणकाम, खनिज-व्यापार, खनिज तस्करी यांतून जगाचा कथील-टंगस्टन-टॅटॅलग पुरवठा अबाधित आहे. एकदा का खनिज शेजारच्या देशात गेले, की त्यामागची पूर्व काँगोतील पापे नष्ट होतात. म्हणजे लोई ओबामामुळे पूर्व काँगोतील बाहुबली व शेजारच्या खंडातील तस्कर-सम्राट यांचा फायदा होतो. अॅपल, इंटेल व तत्सम उच्चतंत्रज्ञानी अमेरिकन कंपन्यांना काहीच त्रास होत नाही, हाही एक उपपरिणाम. पण पूर्व काँगोतील सीमान्त गरीब मात्र जास्तजास्त गरिबीत लोटले जातात.
बाळंतपणे घरच्या घरी होतात, कारण सूतिकागृहात जाण्याचा वीसेक डॉलर (हजारेक रुपये) खर्च झेपत नाही. शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती वाढली आहे, कारण फी परवडत नाही. देशात रस्ते नगण्य आहेत. हलकी विमाने हे मुख्य दळणवळणाचे साधन आहे पण आडवाटेच्या खाण-खेड्यांमध्ये विमाने जाणे बंद झाले आहे.
झाईरचे पूर्व काँगो होताना अनेक बाहुबलींच्या सेना काँगोलीज सैन्याचा भाग बनल्या. आज स्वतंत्र असलेले बाहुबली अपहरणावर आणि खंडणीवर तरी जगतात किंवा अवैध खाणकाम-तस्करीवर तरी.
दुर्मिळ धातूंचे खनन आणि व्यापार जास्त पारदर्शक आणि शुद्ध असावा, याबाबत दुमत नाही. पण जमिनीवरील वास्तव पाहता लोई ओबामाने गरिबांचाच फक्त घात केला आहे, तर जुने दंडेलीशहा जैसे थे आहेत.
[हाऊ काँग्रेस डिव्हास्टेटेड काँगो या डेव्हिड अॅरन्सनच्या (मूळ न्यूयॉर्क टाईम्स, द्वारा इंडियन एक्स्प्रेस (9 ऑगस्ट 2011) या लेखाचा हा संक्षेप. पण कथील वगैरे धातूंचा वापर लोकोपयोगी तंत्रज्ञानात तरी होतो. हिरे हे खनिज मात्र प्रामुख्याने श्रीमंत अतिश्रीमंतांच्या दागिन्यांसाठी वापरले जाते, आणि त्याच्या खननात आणि व्यापारात बाहुबलींचा आणि आफ्रिकेत सातत्याने घडत असलेल्या टोळीयुद्धांचा मोठा वाटा आहे. ब्लड डायमंड हा चित्रपट या प्रकारचे उत्तम चित्रण पुरवतो.
आफ्रिकन टोळीयुद्ध प्रामुख्याने प्रगत राष्ट्रांच्या चिथावणीतून घडतात असे मानायला जागा आहे. रवांडातील टुट्सी विरुद्ध हुतु हे अत्यंत मारक युद्ध असे एक युरोपीय समाजशास्त्रज्ञाच्या चुकीच्या शास्त्रामळे कसे सुरू झाले ते होटेल रवांडा हा चित्रपट दाखवतो. दोन जमातींमधला फरक मुख्यतः नाकांच्या लांबीरुंदीच्या प्रमाणावरून केला गेला. पुढ्यातली व्यक्त हुतु आहे की टुट्सी, हे जवळजवळ कोणीही सांगू शकत नाही पण भेदावर लक्ष केंद्रित करून सत्ता टिकवणे, हा श्रीमंत देशांचा खेळ इतिहासाला नवा नाही.
आता तर वरकरणी लोकोपयोगी कायदेही प्रत्यक्षात विकृत ठरत आहेत.]