आम आदमी कोणाला म्हणावे?

भल्ला
1 जुलै 2011 च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये सुरजीत एस. भल्लांचा एक लेख आहे, सुप्रीम कोर्ट व्हर्सस द स्टेट नावाचा. भल्ला सांगतात, की 2009-10 मध्ये भारतात 7.46 कोटी लोक आयकर भरत होते. या सर्वांनी मिळून रु.3,32,000 कोटी आयकर भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांनी रु. 1,48,000 कोटी आयकर भरला. उरलेले रु.1,84,000 कोटी काळे झाले. म्हणजे ए. राजामुळे जेवढे भारतीय जनतेचे आणि शासनाचे नुकसान झाले, त्यापेक्षा जास्त नुकसान भारतीय आयकरदाते दरवर्षी करतात. यामुळे भल्लांच्या लेखाला उपशीर्षक दिले गेले. आम आदमी काळा पैसा घडवण्यातला मोठा गन्हेगार आहे. पण ह्या वास्तवावर जास्त लक्ष देणे असभ्यपणाचे ठरेल. (The aam admi is the major culprit in generating black income, but it is a bit unseemly to make a federal case of this reality).
भल्ला फक्त आयकर आणि तो बुडवणे यावर बोलत आहेत. ही मर्यादा ते लेखात एका जागी ओझरती नमूद करतात. ते लिहितात, “थेट करदाते होण्यासाठी तुम्ही सक्रिय बिगरशेती अर्थव्यवस्थेच्या सर्वोच्च वीस टक्क्यांमध्ये असणे आवश्यक आहे.” पुढे लगेचच ते नोंदतात, “सुमारे चाळीस टक्के भारतीय कर भरतात” इथे ‘थेट’ कर म्हणजे आयकर, आणि पुढचा ‘कर’ म्हणजे विक्रीकर, उत्पादनशुल्क वगैरे अप्रत्यक्ष कर आहे.
जर थेट आयकरातला 55% भाग (3.32 ला.को.त 1.84 ला. को.) बुडवला जातो, तर इतर करांमध्येही तसा बुडवेपणा असणारच. आणि ते कर भरणाऱ्या व्यक्ती व कंपन्या करभाराबद्दल जास्त जागरूक असल्यामुळे बुडवेपणा जास्तच प्रमाणात असणार. त्या तुलनेत जुजबी आयकर पगारातूनच कापला गेला, असे पगारदार वृत्तीने सैल असणार. अप्रत्यक्ष करांमधल्या प्रमाणांवर आणि बुडीत काळ्या पैशांवर भल्ला भाष्य करत नाहीत. जे चाळीस टक्के भारतीय तसले कर देतात, त्यांपैकी बहुसंख्य लोकांकडून तो कर कंपन्यांच्या पातळीवरच कापून घेतला जातो. तुम्ही आणि मी विक्रीकर, उत्पादनशुल्क वगैरे भरतोच, पण तो आपण वापरणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किंमतींमध्ये समाविष्ट असतो, आपल्याला कर म्हणून जाणवतही नाही. तो कर भरणाऱ्या कंपन्या मात्र अनेक तज्ज्ञांच्या मदतीने व दांडी मारण्याच्या मानवी प्रवृत्तीतून शक्य तितका कर बुडवतातच. आणि याची जबाबदारी चाळीस टक्क्यांवर नसते, तर मूठभर कंपन्यांवर, त्यांच्या सल्लागारांवर असते
आयकर भरणारे जर सुमारे साडेसात कोटी आहेत, तर ते, त्यांचे कुटुंबीय मिळून जेमतेम पंचवीस कोटी भरणार. एकण भारतीयांमध्ये हे लोक वीस टक्के सर्वांत श्रीमंत गटात मोजावे लागणार, मग यांना आम आदमी का म्हणावे? हे तर खास आदमीच आहेत.
तीन क्षेत्रे
आयकर भरणारे बिगरशेती अर्थव्यवस्थेतीलच असतात, हेही भल्लांनी नोंदले. आजच्या लोकप्रिय पद्धतीनुसार सर्व कामकरी माणसांना शेती, उद्योग आणि सेवा, अशा तीन क्षेत्रांमध्ये विभागले जाते. पूर्वी ह्याऐवजी अर्थव्यवस्थेचा प्राथमिक भाग (primary sector), द्वितीय भाग (secondary sector), आणि तृतीय भाग (tertiary sector) असे वर्गीकरण रूढ होते. एक सहज उपलब्ध असलेल्या भारतीय आकडेवारीचा संच, स्टॅटिस्टिकल आउटलाइन ऑफ इंडिया (यापुढे SOI) हे प्राथमिक -द्वितीय-तृतीय वर्गीकरण वापरतो. (एक जरा तांत्रिक बाब स्पष्ट करतो :- SOI चे वर्गीकरण ढोबळमानाने शेती-उद्योग-सेवा असे मानण्यानेही फार चूक होत नाही. SOI वर्गीकरण खनिकर्म (mining & quarrying) प्राथमिक भागात धरते. याचे एकूण कामकऱ्यांमध्ये प्रमाण सुमारे अर्धा टक्का येते, व ते काम उद्योगांत धरणे जास्त नेमके ठरते. वीज-गॅस-पाणीपुरवठा SOI द्वितीय भागात धरते, तर एखादा अर्थशास्त्री ते सेवाक्षेत्रात हवे असे पटवून देऊ शकेल. पण या उद्योगांतही जेमतेम अर्धा टक्का माणसे येतात, व ते इकडचे तिकडे गेल्याने फार फरक पडत नाही.).
तर 1991 व 2001 या वर्षांमध्ये शेती-उद्योग-सेवा या क्षेत्रांतील माणसांची प्रमाणे नोंदायला SOI वर्गीकरण आपण वापरू शकतो, व त्याने फार चूक होत नाही. पण हे प्रमाणही थेट रूपात उपलब्ध नही. SOI मुख्य कामकरी माणसांचे वर्गीकरण देते, पण एकूण कामकऱ्यांत मुख्य कामकरी व सीमान्त कामकरी असे दोन वर्ग येतात. सीमान्त म्हणजे ‘मार्जिनल’, ज्यांच्या रोजगारात सातत्य नाही असे कामकरी. यांचे एकूण कामकांतले प्रमाण बरेच आहे. 1991 साली ते सुमारे 8.85% होते, तर 2001 साली ते वाढून 22.18% झाले आहे! सीमान्त कामकऱ्यांची क्षेत्रे SOI मध्ये उपलब्ध नाहीत; परंतु ते प्रामुख्याने शेतीत व दुय्यम प्रमाणात उद्योगांत असणार. खालील हिशोबांत 90% सीमान्त कामकरी हे शेतीत व 10% कामकरी उद्योगांत असतात असे धरले आहे. यात चूक संभवते, हे नोंदून पुढे जातो. (सर्व आकडे दशलक्षांत) (तक्ता पुढील पानावर) –
म्हणजे बिगरशेती क्षेत्र लोकसंख्येच्या प्रमाणात वाढते आहे. 1991 साली या वर्गात 30.2% माणसे असत.2001 साली ती 35.4% झाली. या 35.4% वर्गातील सर्वोच्च 20% आयकर भरतात असे जे भल्ला म्हणाले, ते खरे आहे. पण अशा लोकांना
आम आदमी म्हणणे मात्र ठार चुकीचे आहे.

शेती: मुख्य सीमान्त (एकूण) 1991 2001
193.1 177.7
24.4 80.3
(217.5) (258.0)
उद्योग : मुख्य सीमान्त (एकूण)सेवा 33.6 54.6
2.7 8.9
(एकूण) (36.3) (63.5)
एकूण कामगार 311.8 399.5
आता हाच हिशोब टक्केवारीत पाहू –
शेती 69.8 64.6
उद्योग 11.6 15.9
सेवा 18.6 19.5
एकूण 100.0 100.0
का म्हणाले? कोणी ऐकले?
भल्ला ज्येष्ठ अर्थशास्त्री असावेत. विजय केळकरांसारख्या ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ काढलेल्या ग्रंथात भल्लांचे लेख असतात. ते ‘ऑक्झस इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी म्यूच्युअल फंडांचे व्यवस्थापन करते, व नव्याने बहरणाऱ्या बाजारपेठांना सल्ले देते. ती ठामपणे बिगरशेती/सेवा क्षेत्रातील लोकांसाठीच काम करते. ज्यांना पैसे कुठे ठेवू हे सुचत नाही, अशांच्या पैशांचे ती व्यवस्थापन करते.
बरे, पैसेही भरपूर असतात. एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण कमी असले तरी सेवाक्षेत्र रुपयांनी श्रीमंत आहे. त्या तीन क्षेत्रांमधील लोकसंख्येचे प्रमाण आणि देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादामधील त्या त्या क्षेत्रांचे वाटे पाहिल्यास माझे म्हणणे स्पष्ट होईल (2001 साठी).
लोकसंख्येतली GDPतील सरासरी
टक्केवारी टक्केवारी ‘श्रीमंती’शी प्रमाण
शेती 64.6 27.3 42.2%
उद्योग 15.9 24.6 154.7%
सेवा 19.5 48.2 247.2%
म्हणजे सरासरी सेवाक्षेत्री सरासरी शेतकऱ्याच्या पावणेसहा पट, व सरासरी औद्योगिक कामगाराच्या दीडपट श्रीमंत असतो. आणि ही श्रीमंती सांभाळायला ऑक्झस -भल्लांची गरज असते.
तर या आपल्या ‘पाणलोट क्षेत्राशी भल्ला बोलत आहेत. बिगरशेती क्षेत्रातल्या श्रीमंतांना ते आम नसून खास आहेत, हे पक्के ठाऊक असते. भल्ला जेव्हा आम आदमीच काळ्या पैशाचा जनक आहे असे सांगतात, तेव्हा काय मखलाशी केली जात आहे तेही भल्लांच्या गि-हाइकांना कळते. म्हणूनच भल्ला हलक्या हाताने ह्या वास्तवाकडे लक्ष वेधणे असभ्यपणाचे असल्याचे सांगतात.
आता इंडियन एक्सप्रेस सारख्या तटस्थपणासाठी बरे नाव असलेल्या वृत्तपत्राने कौतुकाने भल्लांची ही छुपी जाहिरात का करावी? भल्लांच्या त्यांच्या गि-हाईकांशीच्या हितगुजाला स्थान का द्यावे?
कारण इंडियन एक्सप्रेसची गि-हाईकेही बहुशः याच वर्गातली आहेत! भारतात दर हजार माणसांमागे 71 दैनिके खपतात, असे SOI सांगते. सव्वा अब्ज प्रजेत एकूण दैनिकांची विक्री पावणेनऊ कोटी येते. आयकरदाते साडेसात कोटी, सेवा-उद्योग क्षेत्रांच्या सर्वांत श्रीमंत पंचमांशाची संख्या सुमारे नऊ कोटी येते. ही सारी माणसे एकाच वर्गातील आहेत. त्यांनी स्वतःला आम म्हणवून घ्यायची कितीही धडपड केली, तरी ते खासच आहेत.
आणि हे ओळखून वागण्यातच विवेक आहे. आपल्या चष्म्याचे, डोळ्यांचे काम करणारी माध्यमेही तपासून घ्यावी लागतात! ती फारदा चलाखीने आपल्याला आवडेल अशाच रूपात सत्य-असत्य माहिती देत असतात. हे विवेकाने तपासत राहायलाच हवे.
193, शिवाजीनगर, नागपूर 440010

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.