1.0. छप्पन्न तरुण-तरुणी. वये, 18 ते 25 वर्षे. शिक्षणे, बारावी ते पी.एच.डी. करत असलेले; पण डॉक्टर-एंजिनियरांची संख्या भरपूर. गावे, महाराष्ट्रभर विखुरलेली. निर्माणसाठी (हा एक युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम आहे, अभय व राणी बंग यांनी सुरू केलेला.) एकत्र आलेली ही मुले. एका अर्थी महाराष्ट्रातल्या संवेदनशील, सामाजिक जाणिवा जाग्या असलेल्या मुलीचा हा छेद किंवा सूचिपरीक्षा.
1.1. तर या मुलांना दोन याद्या घडवायला सांगितले. प्रत्येकाने आपल्याला सर्वांत आवडलेली पाच पुस्तके आणि पाच चित्रपट नोंदायचे होते. सध्या माणसे वापरत असलेली ही ज्ञान कमावण्याची व मनोरंजन करवून घेण्याची दोन महत्त्वाची माध्यमे. त्यांच्यातून दिसणारे चित्र फार वजनदार मानायला नको, पण पुढे कोणाला अशी विस्तृत आणि प्रातिनिधिक सर्वेक्षणे करायची असल्यास जरा मदत होईल.
2.0. छप्पन्न सहभागी, प्रत्येकी पाच पुस्तके, म्हणजे एकूण 280 उल्लेख होणे. पण प्रत्यक्षात 272 उल्लेखच मिळाले. काही जणांना पाचच पुस्तके निवडणे जड जाऊन त्यांनी जास्त पुस्तके नोंदली, एकाने तर नऊ! पण दुसऱ्या टोकाला एक जण एकाच पुस्तकावर थांबली!
2.1. या 272 उल्लेखांमागे 166 पुस्तके होती.
2.2. काही पुस्तकांची भाषांतरे उपलब्ध असल्याने ती पुस्तके कधी इंग्रजीतून वाचली गेली, तर कधी मराठीतून. यांत उल्लेखनीय म्हणजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी आणि किरण बेदी यांची आत्मचरित्रे. ही तीन्ही पुस्तके बहुतांशी मराठीतून वाचली गेली, व ती मराठीतच मोजली आहेत. भाषावार विचार करता 114 मराठी, 49 इंग्रजी व 3 हिंदी पुस्तके भेटतात.
2.3. पुस्तकांचे विषयवार वर्गीकरण करणे कठीण आहे. विशेषतः चरित्रे, आत्मचरित्रे व चरित्रात्मक कादंबऱ्या (ऐतिहासिक आणि पौराणिक) यांच्या सीमारेषा फार पुसट आहेत. उदा. राजा शिवछत्रपती हे लिहिले आहे स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या ब. मो. पुरंदऱ्यांनी. म्हणजे ती ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी आहे. परंतु मराठी माणूस (!) मात्र तिला खराखुरा इतिहास मानतो. बरीच पुस्तके मी वाचलेली नव्हती, किंवा त्यांच्याबद्दल ऐकलेलेही नव्हते. या मर्यादांमध्ये काही अंदाज बांधून पुस्तकांचे पाच वर्ग पाडले.
1) चरित्रे, आत्मचरित्रे, चरित्रात्मक कादंबऱ्या
2) कथा व कादंबऱ्या
3) ललितेतर वैचारिक लेखन
4) प्रेरणादायी लेखन
5) इतर
2.4. एकूण 15 पुस्तके चार किंवा जास्त लोकांनी वाचलेली आहेत, तर 127 पुस्तकांना एकेकच वाचक लाभला आहे. एकूण हिट लिस्ट अशी —
एक होता कार्व्हर 12 उल्लेख
मृत्युंजय 9 उल्लेख
अग्निपंख 9 उल्लेख
श्यामची आई 7 उल्लेख
श्रीमान योगी 6 उल्लेख
राजा शिवछत्रपती 5 उल्लेख
आमचा बाप अन् आम्ही 5 उल्लेख
शाळा 5 उल्लेख
माणसं 5 उल्लेख
You Can Win 5 उल्लेख
कोल्हाट्याचं पोर 4 उल्लेख
5 Point Someone 4 उल्लेख
तोत्तोचान 4 उल्लेख
The Alchemist 4 उल्लेख
कार्यरत 4 उल्लेख
(एकूण 15 पुस्तकांचे 88 उल्लेख — सरासरीने दहा टक्के सहभाग्यांनी वाचलेली!)
2.5. चरित्रे इत्यादी गटात 56 पुस्तकांचे 122 उल्लेख भेटतात. यांत गांधीजीही आहेत. (3 उल्लेख) आणि हिट्लरही (2 उल्लेख)! पंधरा लोकप्रिय पुस्तकांत आठ पुस्तके या प्रकारची आहेत.
2.6. याखालोखाल भेटतात कथा-कादंबऱ्या; 59 पुस्तकांचे 81 उल्लेख. लोकप्रिय यादीतली चार पुस्तके या प्रकारची आहेत, दोन इंग्रजी, एक जपानीतून मराठीत आलेले आणि एकच शुद्ध मराठी.
2.7. सत्तावीस ललितेतर पुस्तकांचे चाळीस उल्लेख भेटतात. यांपैकी दोन्ही लोकप्रिय पुस्तके अनिल अवचटांची आहेत.
2.8. प्रेरणादायी पुस्तकांबद्दल मी साधारणपणे साशंक असतो, कारण अशी पुस्तके
आपल्याला आवडायला हवीत, असा गैरसमज असतो. या प्रकारच्या नऊ पुस्तकांचे तेरा उल्लेख आहेत. शिव खेडांचे You Can Win हे पुस्तक लोकप्रिय आहे. यात गुणवत्तेइतकाच भाग उपलब्धतेचा असणे शक्य आहे.
2.9. इतर पंधरा पुस्तकांचे सोळा उल्लेख आहेत.
3.0. इतर काही निरीक्षणे अशी –
3.1. एकही विज्ञानविषयक पुस्तक येथे भेटत नाही. एका रानवेड्याची शोधयात्रा, Jim Corbett Omnibus आणि माती-पंख-आकाश ही तीनच पुस्तके निसर्गाशी नाते जोडणारी आहेत, व त्यांमध्येही विज्ञानापेक्षा वैयक्तिक अनुभवांना महत्त्व आहे. (माती-पंख-आकाश बद्दल मी अंदाजानेच लिहीत आहे.). 3.2. मानव्यशास्त्रांचेही प्रातिनिधित्व फार क्षीण आहे. राजकीय विचारांचा इतिहास आणि व्यवस्थेच्या पुनर्निर्मितीची योजना असे दोनच उल्लेख शास्त्रीय वाटतात. त्यातही दुसरे पुस्तक एका सहभाग्यानेच लिहिलेले व अजून प्रकाशित न झालेले आहे!
3.3. साहसकथा, पोलिसी व हेरांच्या चातुर्यकथा यांचे प्रमाण कमी असले तरी अनुल्लेखनीय नाही. त्या तुलनेत विनोदी पुस्तके कमी आहेत; पी.जी. वुडहाऊस (एक उल्लेख) आणि पु.ल.देशपांडे (वुडहाऊसचे प्रेमी! दोन उल्लेख).
3.4. Utopia सार्चचे एक पुस्तक (भाषांतरित, शब्द) Lord of the Flies आणि गीता ही नावे मला तरी अनपेक्षित होती.
4.0. एकूण चित्र जरा अस्वस्थ करणारे आहे. व्यक्तिमहात्म्य फार, शास्त्रांच्या अभ्यासाबाबत अनास्था, असे हे चित्र आहे. सहभाग्यांमध्ये उपयोजित विज्ञानशाखांचे विद्यार्थी भरपूर असूनही विज्ञान फक्त व्यक्तींच्या कहाण्यांमधूनच आवडते. राज्यशास्त्र जरासे (च) भाग्यवान म्हणावे, कारण अर्थशास्त्र, समाजशास्त्र मुळातच नाहीत.
4.1. तरुणपणी ज्ञानाची भूक असते, असे स्वानुभवातून आठवते. ते येथे दिसत नाही. यासाठी मराठी-इंग्रजी विज्ञानलेखन दोषी धरायचे, की यशस्वी व्हा/You Can Win चा रेटा जबाबदार धरायचा?