मराठी (भारतीय भाषा) ज्ञानभाषा होईल ज्यावेळी पूर्वप्राथमिकपासून विद्यापीठ शिक्षण मराठी माध्यमातून होईल. तसेच ग्रामपंचायत ते राज्यसरकारपर्यंतचा पत्रव्यवहार व राज्यकारभार मराठीतून होईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सर्व होईल असे वाटले होते. परंतु स्वातंत्र्याला आता चौसष्ट वर्षे होताहेत आणि साऱ्या देशात पूर्वप्राथमिकपासून इंग्रजी माध्यम स्वीकारण्याबाबत चढाओढ आहे.
याबाबतीत अनेक विचारवंतांनी 1947 पासून लिहिले आहे. परंतु लोककल्याणकारी – आम आदमीचे सरकार आणि महत्त्वाकांक्षी पालक यांनी इंग्रजी ज्ञानभाषा स्वीकारून प्रसिद्ध इंग्रज लेखक व समीक्षक माल्कम मॅगरिजचे उद्गार, पृथ्वीच्या पाठीवर शेवटचा इंग्रज भारतीय असेल हे सिद्ध केले आहे.
मूल शिकते कसे? यासंबंधी मेंदू संशोधन व बहविध बुद्धिमत्तेचा सिद्धान्त काय मांडते आहे याचा विचार पालक करत नाहीत. मेंदूविरोधी शिक्षण, स्पर्धा हे विष आहे असे म्हणणाऱ्या ताराबाई मोडक, यांचा विचार न मानता एकेका गुणासाठी स्पर्धा, पाठ्यपुस्तके, लेखी परीक्षा यांवरच भर देणारी शिक्षणपद्धती स्वातंत्र्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी सांगूनही सरकारने बदलली नाही. त्यामुळेच भारतीय भाषा ज्ञानभाषा होऊ शकत नाही. मक्सिन बर्नसन सारखी अमेरिकन विदुषी मराठी माध्यमाच्या शाळांतून इंग्रजी सुधारा, इंग्रजी माध्यम नको असे म्हणते, ते आपण लक्षात घेत नाही.
इयत्ता दहावीपर्यंत भारतीय भाषांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सरकारी खाजगी क्षेत्रात नोकरी मिळेल, स्पर्धापरीक्षांना बसण्याची परवानगी मिळेल असा कायदा सरकारने करावा असे मी श्रीमती बन्सनच्या लेखावर 1978 साली सुचविले होते, जे आजही मांडतो.
आमच्या गोमंतकात सध्या शासनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याविरुद्ध सारे मराठी आणि कोंकणी मातृभाषा मानणारे लोक एकत्र आले आहेत.
परंतु मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी व्यवहारात तिचा उपयोग केला पाहिजे.
अजूनही आपण आपल्या भाषेतून स्वाक्षरी करत नाही. स्वाक्षरीचा पुरावा गोळा केला तर साऱ्या देशाची भाषा इंग्रजी ठरते.
त्यामळे देशातील सर्व नागरिक आपापल्या मातभाषेतन स्वाक्षरी करतील अगदी इंग्रजी पत्रावर सुद्धा स्वाक्षरी आपल्या भाषेतून करतील.
पूर्वप्राथमिकपासून आपल्या पालकांना मराठी माध्यमातून शिक्षण देतील, कारण स्वभाषेवर प्रभुत्व मिळविल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळविता येत नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे स्वभाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी जे उपाय श्रीमती वर्षा सहस्रबुद्धे, श्री राजीव तांबे, प्रा. रमेश पानसे सारख्या तज्ज्ञांनी सुचविले आहेत त्यांचाही विचार करावा लागेल.
शेवटी प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक मराठी व्यक्तीने पुढे सांगितल्याप्रमाणे केल्यास मराठी ज्ञानभाषा होईल असे मला वाटते.
1. स्वतःच्या भाषेत स्वाक्षरी सर्व ठिकाणी करून.
2. पत्रलेखन, अर्ज, बँकातील-संस्थातील व्यवहार स्वभाषेत करून.
3. भेटपत्र – कागदपत्र मराठीत छापून.
4. घराच्या नावाची, व्यवसायाची, आपल्या नावाची पाटी स्वभाषेत असतील.
5. दुसऱ्याशी संभाषण करताना स्वभाषेचा वापर.
6. आपल्या भाषेतील वृत्तपत्र-मासिक-पुस्तक विकत घेऊन.
7. ग्रामपंचायत/सहकारी संस्था/शासनाकडे स्वभाषेत पत्रव्यवहार करून व त्याच भाषेत उत्तर मिळण्याचा आग्रह धरून.
8. आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देऊन. इंग्रजीच कशाला जपानी, चिनी, रशियन भाषा पण उत्तम येतील याचा आग्रह धरून.
9. घरातील कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिका स्वभाषेत छापून
10. आकाशवाणी-दूरचित्रवाणीवरील स्वभाषेतील कार्यक्रम ऐकण्याचे-बघण्याचे ठरवून.
11. इतर भाषांतील चांगले साहित्य स्वभाषेत अनुवाद करून व स्वभाषेतील चांगले साहित्य इतर आपल्याला येत असलेल्या भाषेत अनुवादित करून.
12. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता पहिलीपासून मराठी उत्तम त-हेने शिकवली जावी याचा आग्रह धरून,
13. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण-शिक्षण, शारीरिक शिक्षण योगशिक्षण, कला, संगीत, व्यावसायिक शिक्षण हे मराठी भाषेतून द्यावे याचा आग्रह धरून.
थोडक्यात न्यूनगंड सोडून मराठीची कास सर्व व्यवहारांत सर्वत्र धरली तर एकाच वर्षांत मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.
श्री-210, ढवळी, पो कवळे, ता. फोंडा, गोवा 403 401 स्थिरभाष : 0832/2313805, चलभाष : 9423882290