कुंटणकबिला

कुटुंबाची आपली कल्पनाच पतिपत्नी आणि त्याच्या आगमागच्या नातेसंबंधांशी जोडली गेलेली आहे. या नातेसंबंधांत आईवडील, सासूसासरे, भाऊबहीण, नणंदामेव्हण्या, दीरमेव्हणे, भाचेपुतण्ये, जावा, मामामावश्या, काकाआत्या, चुलत-मामे-आते-मावस भावंडे आणि अर्थातच संबंधित पतिपत्नींची मुलेबाळे, नातवंडे, सुनाजावई असा सारा गोतावळा येतो. किंवा यावा अशी अपेक्षा असते. या गोतावळ्यातले कुणी अविवाहित किंवा लग्न मोडलेले असू शकते. कुणाचा जोडीदार किंवा जोडीदारीण मयत झालेले असू शकतात. पण असे डावे माणूसही त्या कुटुंबाचाच एक हिस्सा असते. त्याला किंवा तिला स्वतःचे नाव, बापाचे किंवा नवऱ्याचे नाव आणि आडनाव असतेच असते.
बहुतांश कुटुंबातली माणसे बोलताना ‘आमच्या घरात, आमच्या घराण्यात, आमच्यात’ असे शब्दप्रयोग वारंवार आणि सहज करत असतात. या आमच्या मागे प्रमुख्याने जातपात, धर्म किंवा पंथ आणि त्यापाठोपाठ त्या विशिष्ट कुटुंबाचे कुळाचार, शिष्टाचार नि रीतिरिवाज असतात. हे सारे आचार नि रिवाज जीव तोडून पाळले जातात, कारण ती त्या कुटुंबाची आयडेंटीटी असते. उदाहरणार्थ एखादा कर्मठ ब्राह्मण, ‘आमच्या घरात अभक्ष्य शिजत नाही’ असे म्हणेल तर देशावरचा पंचकुळी मराठा, ‘आमच्या बाया बाहेर फार वेळ थांबत नाहीत’ असे म्हणेल. एखादी कष्टकरी कुणबीण, ‘आमच्यात बाळंतपणाचे चोचले परवडत नाहीत’ असे म्हणेल तर जातिव्यवस्थेने पार तळाशी गाडून टाकलेली कुटुंबे जगण्यासाठी, ‘मिळेन ते काम तं करायाच हवं ना आम्हाना’ अशा शब्दांत व्यक्त होतील. गरीब-श्रीमंत, सवर्ण-अवर्ण कसेही असोत, कोणत्याही धर्मपंथाचे असोत या माणसांना कुटुंबाची एक चौकट असते. गोतावळा असतो. नात्यांचे ठरलेले अर्थ असतात. सीमारेषा असतात. मायाममता असते. जबाबदाऱ्या असतात. शिस्त आणि नियम असतात. एकमेकांचा काच असतो, पण त्याचवेळी एकमेकांचा आधारही असतो. इतक्या गणगोतात विसंबून राहावे असे एकतरी माणूस असते. सुखदुःखांची वाटणी असते. कर्तव्यांचीही विभागणी असते. घराण्याचे आनुवांशिक बरेवाईट गुण असतात.स्वभावाचे, रूपाचे विशिष्ट कल असतात. जन्मलेल्या बाळाचे नाक कधी आत्यासारखे असते किंवा बाळीचे हसणे अगदी तिच्या पणजीची आठवण करून देणारे असते. एखादे बाळ जणू गुणसूत्रांतून घराण्यातली कला नाहीतर बुद्धिमत्ता घेऊन येते किंवा एखादी बाळी आजोळच्या रूपाचा नाहीतर चुलत्यांच्या अंगकाठीचा वारसा घेऊन येते. माणसे जगणे साजरे करतात आणि मरणेही सोसतात. नवे जीव जन्मतात. जुने मातीत मिसळतात. पिढ्या न् पिढ्या हे सारे चालू राहते…
ही आपली कुटुंबव्यवस्था. समाजाचे गाडे चालण्यासाठी लावून दिलेली. स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक ओढीला समाजनियमांनी चौकटबद्ध करणारी. माणसाचे वंशसातत्य विनासायास चालू ठेवणरी. कुटुंबव्यवस्था. शेकडो वर्षांपासून चालत आलेली व्यवस्था. तिचा पगडा इतका प्रचंड की, रस्त्यात धावतपळत भेटलेल्या मित्राला, “काय लग्न वगैरे केलेस की नाही?” असे हटकून विचारले जाते. एखाद्या समारंभातल्या उपवराला किंवा उपवधूला, “काय आता तुझे लाडू कधी?” अशी विचारणा किमान पन्नासएक माणसे तरी करतात.
लग्न झालेल्याला, “काय पेढे बर्फी कधी देणार?” असे विचारले नाही, तर आपला मनुष्यजन्म वाया गेला असे जणू बहुसंख्यांना वाटते. लग्न, मुलेबाळे, त्यांची लग्ने, त्यांची मुलेबाळे अशा चक्रात फिरणारी ही कुटुंब नावाची सर्वव्यापी संस्था सगळ्यांनाच सहजासहजी मात्र लाभत नाही. काहींच्या ती कधीच वाट्याला येत नाही, घराणे, गोतावळा, नातीगोती या शब्दांचा शिरकाव त्यांच्या आयुष्यात होत नाही. होण्याची शक्यताही नसते. हो, थोडीफार नात्याची वीण असते, पण ती कधी उसवेल सांगता येत नाही. त्या नात्यांचा ओलावा, त्यातला कोवळेपणा तापत्या वाळवंटात वाफ व्हायलाही काही शिल्लक असू नये तसा पार शोषला जातो.
अशीच शोष पडलेली एक सायंकाळ वाटेत आडवी आली. पायात घोटाळली. डोक्याचा भुगा करून गेली. तिला कुठलीच चौकट नव्हती. तरीही ती मुक्त नव्हती. तिला कुठले रीतिरिवाज नव्हते. तरीही ती तिच्या जगाच्या कायदेकानूंनी जखडली होती. तिला सभ्यतेचे संकेत नव्हते. तरीही वीतभर अब्रू राखण्यासाठी ती केविलवाणी होती. ती सन 1979 च्या उन्हाळ्यातली रात्रीकडे झुकलेली सायंकाळ होती. काळोखाचा अंमल चढत चालला होता. कामाठीपुऱ्यातल्या रस्त्यांवरचे, माडीवरचे दिवे उजळत होते. डांबरी रस्त्यांच्या कडेने जगल्यावाचलेल्या कुपोषित झाडांवर पाखरे परतत होती. आणि तेराव्या गल्लीच्या वळणावर एक वेगळाच प्रवेश सादर होत होता. पाचएक वर्षांचे एक मळलेले पोर ठो ठो रडत होते आणि त्याची माय त्याच्या हातात रुपायाचे नाणे कोंबून पिटाळू पाहत होती. पोर जाम बधत नव्हते. मायेच्या कमरेत हात घालून एक फुलटाइट बाप्या तिला खेचत होता. एक असहाय क्षणाला माय संतापली. जीव खाऊन पोराच्या अंगावर धावून गेली. त्याच्या गालावर, पाठीवर, पोटावर, पायांवर तिच्या हातापायांचा मार पडू लागला. पोरही हट्टी. धाय मोकलून तिच्या पदराला लगटले. त्याच्या मुठीतून पदराचे टोक सोडवून घेण्याचे तिने खूप प्रयत्न केले. कडोसरीचे आणखी एक नाणे त्याच्या हातात कोंबू पाह्यले. पण पदराची पक्कड आणखीच घट्ट झाली.
फुलटाइट बाप्याची खोपडी आता सटकली. त्याने तिला एक कचकचीत शिवी हासडली. ए रांडे, बसते का नाय? नायतर माजे पैशे परत दे. दुसरीबरोबर बसतो. चल नाटक बंद कर.
माय खाली वाकली. पायातली चप्पल तिने हाती घेतली, आणि तडाख्यांचा वर्षाव करत लेकराच्या झिंज्या खेचून त्याला ढकलला.
गुमान पैशे घे आन् टळ भाड्या हिथनं. माज्या मागं येऊ नकोस.
माय निघून गेली. त्या माणसाबरोबर. असा तो एकच माणूस असणार नव्हता. रात्र सरेपर्यंत असे अनेकजण येणार होते. मायच्या शरीराचा वापर करणार होते. तिच्या इच्छेचा प्रश्न होताच कुठे? गि-हाइकाबरोबर बसताना पोर बाहेर पिटाळणे हेच तिचे कर्तव्य होते.
लेकरू हुंदके देत राहिले. डोळ्यांतले ओघळ गालावर सुकून गेले. माय झिडकारू लागली तर जवळ घेणारे आज्जाआज्जी त्याच्यापाशी नव्हते.
हे पोर… त्याला कुटुंब आहे? घर आहे?
पोपटाची, कावळ्याची पोरेही सायंकाळी घरी परततात. तिन्ही-सांजेला घरंदाज, खानदानी पोरे परतली नाहीत तर घर कासावीस होते. घर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसते. जरा उशीर झाला तर देव पाण्यात घातले जातात.
हे पोर मात्र बाहेरच राहावे म्हणून माय आपला पान्हाही चोरून धरते. ते बाहेर राहायला नकार देऊ लागले, एखादी माय कमजोर दिलाची निघाली तर इथे घरवाली, दलाल कासावीस होतात. जिथे पंख मुडपून निवांत बसायलाही घरटे नाही, तिथे कशाची सांजवात नि कशाची रुजुवात?
हे पोर कुणाची गुणसूत्रे घेऊन आलेय? त्याचे घराणे कुठचे? त्याच्या धमन्यांतून कोणाचे रक्त खेळते? त्याच्या रक्तात कोणाचा वारसा आहे? त्याची चेहरेपट्टी कोणाशी जुळते? आणि सवयी नि आवडीनिवडी थेट कोणासारख्या आहेत? त्याला नातेवाईक आहेत? असलेच तर त्या नात्यांचा अर्थ कोणता आहे? कोठली चौकट आहे? काही सीमारेषा आहेत? या सीमांच्या अल्याड-पल्याड कोणते गाव आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा खटाटोप वेश्या, त्यांची पोरे करत नाहीत.
या मायलेकरांनी कुंटणखान्याची चौकट मंजूर केलेली असते. मंजूर केली तरी आणि नाही केली तरी त्या चौकटीत चिणून जाणेच वाट्याला येते. या चौकटीत आजूबाजूच्या माणसांना कुटुंबासारखीच संबोधने असतात. ‘घरा’वर हुकमत असणारी घरवाली नायतर मॅडम असते. तिच्या मुलींसाठी गि-हाइके आणणारे दलाल-भडवे असतात. नियमित गि-हाइकांना आदमी म्हटले जाते. दारूगुत्ते चालवणारे मामा असतात. वस्तीत आणखीही माणसे असतात. ती पंटर, टोचन, भाई, चमडी अशी कोणीही असू शकतात.
खानदानी पोरी वयात आल्या की आई-आजी-मावश्या नि काकवांना काळजी वाटते. परपुरुषापासून तिला कसे वाचवता येईल याचाच विचार साऱ्या घराचे डोके पोखरून टाकतो. आता काळ बदलल्याने मुलीला शिकवतात, तिच्या म्हणण्याला मान देतात, पण तिचे हात पिवळे करून दिल्यानंतरच खऱ्या अर्थाने घर मोकळा निःश्वास टाकते. आनंदी होते. पोरांबाबत थोडी अधिक वर्षे घेऊन हाच धडा गिरवला जातो. जोडप्याला हनिमूनसाठी उत्साहाने तिकिटे काढून देऊन वडीलधारी मंडळी घराण्याचा वंश सतत चालत राहील याची
ऑफिशियल काळजी घेतात.
कुंटणखानी पोरी वयात आल्या की घरवालीला तिची सुपारी फोडायची घाई लागते. अधिकाधिक पुरुषांसमोर ती कशी जाईल याचाच विचार चालू राहतो. आता काळ बदलल्याने इथल्या पोरींना पूर्वीच्या तुलनेत लिहावाचायला आणि इंग्लिश बोलायलाही येते. पण इथे पोरीच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देत नाही. तिच्या आईलाही तसेच दुर्लक्ष करावे लागते. पोरगी गुमान धंद्याला लागली तर बरेच, नायतर या चौकटीने विकसित केलेल्या थर्ड डिग्री थेरप्या असतातच. त्यांचा वापर करून पोरींना सुतासारख्या सरळ केल्या जातात. भरीला कुठून कुठून उचलून आणलेल्या दुसऱ्या पोरीही असतातच. या दुसऱ्या पोरी बहुधा गरीब आईबापांना पैसे देऊन त्या मोबदल्यात आणल्या जातात. तसे नसेल तर दमदाटीने आणल्या जातात. त्यासाठी तालुक्या गावापासून महानगरांपर्यंत गुन्हेगारांची साखळी मनापासून कामाला लागलेली असते. याशिवाय साऱ्या गावाच्या मालकीच्या असलेल्या जोगत्या, आराधिनी, मुरळ्या अशा देवाच्या दास्या असतात, आणि अशा दासीप्रथेत तथाकथित उच्चवर्णीय, वरच्या जातीतल्या पोरी कश्या असणार? तर सांगायचा मुद्दा असा की, पोरी धंद्यावर बसू लागल्या की कुंटणखाना मोकळा निःश्वास टाकतो…..
शरीर विकावे लागणाऱ्या बाया आणि त्यांची पोरे यांच्या कुटुंबाविषयी बोलता बोलता आणखी एक पॉइंट डोक्यात आलाय. तो असा की, दंगा करणाऱ्या पोरींना ठेचण्यासाठी ज्या थर्ड डिग्या दिल्या जातात या थेरप्यांचा किंचितसाही वापर खानदानी पोरी नि बायांवर झाला तर तिथे त्याला अत्याचार, बलात्कार, हिंसा असे म्हणतात आणि असल्या प्रकारांचा निषेध वगैरे केला जातो. कायदे करा, गुन्हे दाखल करा, शिक्षा करा अशी निदान चर्चा तरी होते. पण शरीर विकणाऱ्या बायांविषयी बोलताना हे सर्व मुद्दे मागे पडतात. तिथे जणू हे सगळे गैरलागू असते. चर्चा कशाची होते? तर बायांनी हा धंदा केला तर काय बिघडले? हा धंदा कसा आदिम आहे नि गुंतागुंतीचाही आहे! या बायांना धंद्याचे लायसन द्यावे की नाही? या आणि असल्या मुद्द्यांची! बुद्धिवादी अभिजनांमध्ये तर गेले दशक दोन दशक हमरातुमरी चालू आहे. शरीरविक्रयाचा व्यापार थांबावा असे काहींना वाटते. पण या व्यापाराला बरकत देणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांना देणेघेणे नसते. तर दुसरीकडे त्यात काय? कोणी बुद्धी विकते कोणी श्रम विकते, मग यांनी शरीर विकले तर काय झाले?’ असा वरवर पुरोगामी वाटणारा पण प्रत्यक्षात अत्यंत बेशरम प्रश्न उपस्थित केला जातो. उरलेल्यांना दोन्हींतही रस नसतो. पण गेली काही वर्षे या विषयावर लिहिणाऱ्यांना आणि कंडोमवाटपाचे काम करणाऱ्या एनजीओंना बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने हे उरलेले अभिजन चर्चा, परिसंवाद वगैरे भरवतात. एनजीओही चालवतात. असो; हे विषयांतर झाले.
चमडीच्या धंद्यात आणखी एक समांतर कुटुंबव्यवस्थाही अस्तित्वात असते. बायकोच्या, लेकीच्या, बहिणीच्या धंद्यावर पोसला जाणारा पुरुषांचा हा गोतावळा. यांना अस्सल मराठीत भाडखाऊ म्हणतात. ही माणसे (?) जन्मभर अशी भाड खाऊन जगू शकतात. त्यांच्या लेखी कोणतीच नाती वेगळी नसतात. खरे तर ‘नाते’ ही दोन अक्षरे आपल्या सभोवताली अजिबात फिरकणार नाहीत अशी चोख व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली असते. कधी बाप पोटच्या पोरीला विकतो. कधी भाऊ बहिणीला बाजारात बसवतो. कधी सात फेरे घातलेला नवरा बायकोला धंद्याला लावतो. वात्सल्य, माया, प्रेम या भावनांमध्ये ते स्वतःला अजिबात गुंतवून घेत नाहीत. मुंबईतले जुने रेड लाइट एरिया आता बिल्डरांपायी उजाड होऊ लागलेत. गेल्या दहा वर्षांत लॉजेस, हॉटेले, बनावट नावांनी घेतलेले फ्लॅट आणि सोयीचे होईल तिथे तिथे बाया गि-हाइकांबरोबर बसतात. धंद्याची वेळ संपली की ‘घरी’ परततात. एनजीओवाले अशा बायांना ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’ म्हणतात. बाया बारमध्ये, पबमध्ये, मसाज पार्लर्समध्ये घुसूनही बराच काळ लोटलाय. आताशा अक्षरशः कुठेही, कोणत्याही समूहात (म्हणजे पाटा, परिषदा, बैठका, ग्लॅमर शोबिझ, अगदी कॉर्पोरेट फ्लोरवरही) कोणत्याही गेटअपमध्ये आणि कोणत्याही कपॅसिटीत त्या असू शकतात. साऱ्यांसाठीच हा निव्वळ कोरडा व्यवहार असतो. नवऱ्याच्या बिजनेस रिलेशनचा भाग म्हणून, पार्टी हायकमांडची मर्जी म्हणून, नुसतेच पैसे कमावण्यासाठी म्हणून आणि स्वतःसाठी काही पदरात पाडून घ्यावे म्हणनही त्यांना या हाय प्रोफाइल लोकांबरोबर बसावे लागते. कुंटणखान्यातली बाई शंभर घेते, तर यांचा हिशेब लाखांचाही असू शकतो. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे भाडखाऊ नातेवाईकांचा. त्यांच्या तथाकथित सिव्हिलाइज्ड सोसायटीत अनेकांना हे ठावूक असते आणि उच्च पदे नि पैशांपुढे ते विसरले जाते. स्त्रियांचा असा वापर करून घेण्यात फारसे गैर मानले जात नाही. कंटणखान्यात पोरगी विकणारा बाप बहधा दरिद्री तरी असतो. इथे मात्र भरभराटीची नवी व्याख्या बोकाळलेली असते. ब्रेडबरोबर नुसते बटरच नव्हे, तर चीझ नि ऑम्लेटही मिळावे यासाठी सारी धडपड असते. या धडपडीसमोर सारे व्यर्थ आणि अर्थहीन असते. कुटुंब, स्नेहबंध, परस्पर जादर, सहजीवन, जबाबदाऱ्या नि कर्तव्य, भावनेचा ओलावा, न्याय, मर्यादा या साऱ्या बाबी झूट ठरतात. तुम्ही बुद्धी विकता, श्रम विकता, तशा या बाया शरीर विकतात ही भाषा याच बेशरमपणातून निर्माण होते. वरवर शाबूत दिसणारी कुटुंबाची चौकट आतून पार पोखरून गेलेली असते.
आणि अखेर बाया शरीर तरी का विकतात? अगदी दुर्गा भागवतांसारखी विदुषीही म्हणते की, वेश्या आहेत म्हणून गरत्या पोरी सुरक्षित राहतात. गरत्या म्हणजे कोणाच्या मुली? तर भारतासारख्या देशात केवळ अमीरउमरावांच्या किंवा पैशेवाल्यांच्याच मुली नव्हेत, तर जातउतरंडीमध्ये ‘वरच्या’ समजल्या जाणाऱ्या जातींच्या मुली. त्यांची अब्रू सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये राहावी म्हणून ‘खालच्या’ जातीच्या मुलींनी आपल्या चेस्टीटी बेल्टच्या चाब्या समाजाच्या हातात द्यायच्या हा कोणता न्याय? शूद्रातिशूद्रांच्या मुली बाजारात बसतात म्हणून सवर्णांच्या मुलीवर बलात्काराचे संकट अभावाने येते असे म्हणणे हे कोणत्या अर्थाने सयुक्तिक आहे हे ते म्हणणाऱ्यांनाच ठावूक. ते तर्कदुष्ट तर आहेच, पण दुसऱ्याचा गळा धरून स्वतःचा जीव वाचवणारेही आहे. अशाने ज्याचा गळा धरला तोही मरतो आणि तरीही आपला जीव शाबूत राहण्याची कोणतीही शक्यताच नसते हे सत्य त्यांच्या मानगुटीवर बसलेले असते हे विसरता नये.
असो. मुद्दा खानदानी, सवर्ण नि गरत्यांची कुटुंबसंस्था निर्धोकपणे चालू राहण्यासाठी शूद्रांनी बळी जाण्याचा आहे. अशा बळी जाण्याचे कोण्याही भाषेत आणि कोणत्याही तर्काने समर्थन करणे हे हृदय आणि मेंदू या दोन्ही ठिकाणी टिकणारे नाही. आणि असे जर आहे, तर मग गरत्यांनी, अभिजनांनी आपल्या पोरी पाठवाव्यात की शरीरविक्रय करायला, किंवा स्वतःच एकदा तरी अनुभव घेऊन पाहावा. नाहीतरी मघाशी म्हटल्याप्रमाणे जिथे जाऊ तिथे हे फ्लोटिंग पॉप्युलेशन असतेच हे लक्षात घेता या लोकांच्या पोरीबाळी बॉलिवूड, मॉडेलिंग, फॅशन यासारख्या दिशेने जातातच आहेत. शरीर विकण्यात काही गैर नाही ना? मग त्याच धर्तीवर शरीर कसे प्रोफेशनली विकावे याचेही कोर्सेस होऊ द्यात की सुरू! शेवर्टी इथली मूल्यव्यवस्थाच अशी आहे की, सवर्णांच्या मुलींनी शरीर दाखवले, आयटमगिरी केली तर ती कला असते आणि त्याचे लाखांत पैसे मिळतात. त्यांचा दर्जा वरचा असतो ना! असे म्हणणे कित्येक जहाल पुरोगाम्यांना पटणारे नाही हे मला ठावूक आहे. त्यांचा संताप होईल हेही ठावूक आहे. त्यांचे काय काय प्रतिवाद असतील तेही माहीत आहे. माझा मुद्दा इतकाच आहे की स्कॉचचे घुटके घेता घेता आपण शोषणाच्या मूल्यव्यवस्थेचे समर्थन करत आहोत हे त्यांनी विसरता नये.
कुटुंबसंस्था आजच्या काळाला सुसंगत आहे का? तिला दुसरा पर्याय नाही कार कुटुंबसंस्था हीही शोषणाचे साधन आहे की नाही? आगामी काळात कुटुंबसंस्था टिकेल का? या मुद्द्यावर डोकी घासत असताना कुटुंबसंस्थेच्या परिघाबाहेर जबरदस्तीने ढकलले गेलेल्या घटकांच्या सामाजिक न्यायाचे काय ह्याचा धांडोळा आपण घेणार की नाही? जन्मतःच कोणी वेश्या म्हणून जन्माला येत नाही. समाजव्यवस्थेच्या कुन्टिल डावपेचांमुळे आपल्या पोरीबाळींना हाच व्यवसाय घ्यायला लावणारी मोजकी अपवादात्मक असहाय किंवा रूढीग्रस्त माणसे सोडली तर उर्वरित सर्व थरांमधली कुटुंबे आपली मुलगी मोठेपणी वेश्या बनवायची असे नियोजन करत असतील असे मला तरी वाटत नाही. मग इतक्या मोठ्या संख्येने शरीराचा हा बाजार असा फुललेला कसा दिसतो? याचे उत्तर शोधायला गेले तर मानवी जीवनाला कळसूत्री बनविणारी भांडवली आणि विषमताधिष्ठित मूल्यव्यवस्था समोर येते.
या मूल्यव्यवस्थेने असंख्यांना बेघर, बेरोजगार आणि बेदखल केले आहे. एवढेच करून ती थांबलेली नाही, सामाजिक पातळीवरही त्यांना रसातळाला गाडलेले आहे. शरीरविक्रय ही त्यांच्यापुढे खुली राहणारी कदाचित एकमेव वाट असू शकते… तिच्या बदल्यात ते जी किंमत मोजतात तीवरच तर आपला वर्ग आणि वर्ण शाबूत राहतो!
(पूर्वप्रसिद्धी : पुरुष स्पंदनं – दिवाळी 2012)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.