विवाह आणि नीती (भाग १०)

विवाह
या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत आणि अन्यही अनेक प्राणिजातीत प्रचलित असलेल्या व्यवहाराचे विवाह ही कायदेशीर संस्था एक रूप आहे. जिथे अपत्यसंगोपनात नराचे सहकार्य आवश्यक असते तिथे प्राण्यांतही विवाहसदृश व्यवहार आढळतो. सामान्यपणे प्राण्यांमधील ‘विवाह’ एकपत्नीक-एकपतिक असे असतात, आणि काही अधिकारी अभ्यासकांच्या मते मानवसदृश वानरांमध्ये (anthropoid apes) ते विशेषत्वाने आढळतात. या तज्ज्ञांचे म्हणणे खरे असेल तर हे प्राणी मनुष्यांपेक्षा सुदैवी म्हणावे लागतील, कारण मानवसमाजात उद्भवणारे प्रश्न त्यांच्या जीवनात उद्भवत नाहीत. एकदा नराचे लग्न लागले की त्याला अन्य माद्यांचे आकर्षण वाटेनासे होते, आणि मादीचे लग्न लागले की त्यानंतर तिचे अन्य नरांना आकर्षण वाटेनासे होते. म्हणून मानवसदृश वानरांमध्ये धर्माची मदत नसली तरी पापाचा मागमूस आढळत नाही, कारण सहजप्रवृत्ती सदाचाराला प्रेरणा देण्यास पुरते. निम्नतम वन्य समाजांत काहीशी याच प्रकारची स्थिती आढळते असे दाखविणारा काही पुरावा उपलब्ध आहे. आफ्रिकेतील बुशमेन (Bushmen) हे पक्के एकपत्नीवादी असतात असे म्हणतात, आणि आता नामशेष झालेले टास्मानियाचे रहिवासी आपल्या पत्न्यांशी सदैव एकनिष्ठ असत असे मी ऐकले आहे. नागरित (civilized) मानवांमध्येही एकपत्नीवादी सहजप्रवृत्तीच्या अस्पष्ट खुणा कधी कधी दिसतात. सवयीचा आचारावरील पगडा लक्षात घेता, एकपत्नीत्वाचा प्रभाव कधी कधी तो सध्या प्रत्यक्ष दसतो त्याहून अधिक प्रबल नाही याचे आश्चर्य वाटते. पण हे मानवाच्या मानसिक वैशिष्ट्यांचे एक उदाहरण आहे. त्या वैशिष्टयांतून त्याचे अवगुण आणि त्याची बुद्धी दोन्ही र्माण झाली आहेत. हे वैशिष्ट्य म्हणजे सवयींचा भंग करण्याचे आणि नवीन आचारप्रकार सुरू करण्याचे कल्पनाशक्तीचे सामर्थ्य.
एकपत्नीत्वाचा भंग करणारे पहिले कारण बहुधा आर्थिक असावे असे दिसते. ह्या गोष्टीचा जिथे जिथे लैंगिक संबंधाशी संबंध आला, तिथे तिथे तिचा परिणाम न चुकता अनर्थावह झाला; कारण त्यात सहजप्रवृत्तीवर आधारलेल्या संबंधाची जागा गुलामी किंवा भाडोत्री संबंध घेतात. अव्वल कृषीवल आणि मेषपाल समाजात पत्न्या आणि अपत्ये दोन्ही मनुष्याच्या दृष्टीने उत्पन्नाच्या बाबी होत्या. बायका त्याची कामे करीत आणि मुलेही पाचसहा वर्षांची झाली की गुरे राखण्यास आणि शेतीची अन्य कामे करण्यास उपयोगी पडत. याचा परिणाम असा झाला की बलवान मनुष्याची प्रवृत्ती शक्य तितक्या अधिक बायका करण्याची झाली. कोणत्याही समाजात बहुपत्नीत्व हा सार्वत्रिक आचार असू शकत नाही, कारण सामान्यपणे लोकसंख्येत स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा फारशी जास्त नसते. बहुपत्नीत्व हा नायक आणि श्रीमंत लोक यांचाच विशेषाधिकार असतो. अनेक बायका आणि मुले ही मूल्यवान संपत्ती असते, आणि म्हणून अगोदरच विशेषाधिकारी असलेल्या मालकाची प्रतिष्ठा तिच्यामुळे वाढते. याप्रमाणे पत्नीची प्राथमिक भूमिका उपयुक्त मृह्य पशूची भूमिका बनते आणि तिची लैंगिक सहचरीची भूमिका गौण ठरते. नागरणाच्या (civilization) या अवस्थेत मनुष्याला आपल्या पत्नीला काडीमोड देणे सामान्यपणे सोपे असते. मात्र तसे करताना तिने माहेरून आणलेले स्त्रीधन त्याला परत करावे लगते. परंतु स्त्रीने नवऱ्याला काडीमोड देणे सामान्यपणे अशक्य असते.

अर्धनागरित (semicivilized) समाजाची व्यभिचारासंबंधीची अभिवृत्ती वरील दृष्टिकोणाशी जुळणारी असते. नागरणाच्या अतिशय निम्न स्तरावर व्यभिचार अनेकदा क्षम्य मानला जातो. सॅमोआ-निवासी पुरुष जेव्हा प्रवासास निघतात तेव्हा आपल्या बायका आपल्या गैरहजेरीत अन्य पुरुषांना जवळ करतील ही त्यांना पूर्ण कल्पना असते. याच्याहून काहीशा वरच्या स्तरावर मात्र स्त्रीच्या व्यभिचाराचे शासन मृत्युदंडच, निदान अतिशय कठोर शिक्षा हेच असते. दुसऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार केलेला मनुष्य हाही अर्थात् गुन्हेगारच असतो. परंतु अविवाहित स्त्रीशी संबंध ठेवणारा मनुष्य दोषी नसतो. मात्र त्याने त्या संबंधामुळे त्या स्त्रीची लग्नाच्या बाजारातील किंमत केली असल्यास तो दोषार्ह होतो.

ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ही दृष्टी बदलली. विवाहातील धर्माचा भाग खूपच वाढला, आणि विवाहविषयक कायद्याच्या भंगाकडे मत्तेचा भंग या दृष्टीने न पाहता, आता प्रतिषेधाचा (taboo) भंग म्हणून त्याकडे पाहण्यात आले. दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीबरोबर संबंध ठेवणे हा त्या पुरुषाविरुद्ध अपराध तर अजून होताच, परंतु विवाहबाह्य संबंध हा ईश्वराचा द्रोह असल्यामुळे तो त्याहून फारच गंभीर गुन्हा बनला. त्याच कारणास्तव पूर्वी पुरुषांना सुलभ असणारा घटस्फोट आता अमान्य करण्यात आला. विवाह संस्कार झाला, आणि म्हणून तो आजीव संबंध बनला.

हा मानवी सौख्याच्या दृष्टीने फायदा होता की नुकसान हे सांगणे फार कठीण आहे. शेतकरी कुटुंबात स्त्रीचे जीवन नेहमीच कष्टाचे राहिले आहे, आणि एकंद ने विचार करता सर्वांत कमी नागरित शेतकऱ्यांमध्ये सर्वांत अधिक कष्टप्रद राहिले आहे. बहुतेक सर्व बर्बर समाजात पंचवीस वर्षांची स्त्री म्हातारी होते आणि त्या वयात तिच्यात सौंदर्याचा मागमूसही राहत नाही. एक गृह्य पशू ही स्त्रीची भूमिका पुरुषांच्या दृष्टीने अर्थातच सुखद होती, पण स्त्रीच्या दृष्टीने मात्र तिच्यात कष्टाशिवाय आणखी काही नसे. ख्रिस्ती धर्माने स्त्रियांची स्थिती काही बाबतीत पहिल्यापेक्षा निकृष्ट केली हे खरे; पण निदान सुखवस्तू वर्गात त्याने स्त्रियांना धार्मिक समता बहाल केली, आणि त्या पुरुषाची केवळ मत्ता आहे असे मानण्यास नकार दिला. विवाहित स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाऊ शकत नव्हती; पण धार्मिक जीवनाचा स्वीकार करण्याकरिता ती नवऱ्याला सोडू शके. एकंदरीने स्त्रीच्या स्थितीतील प्रगती ख्रिस्तपूर्व दृष्टिकोणापेक्षा ख्रिस्ती दृष्टिकोणात अधिक सुलभपणे झाली असे म्हणता येते.

आजच्या घटकेला जर आपण भोवतालच्या जगाकडे पाहिले, आणि कोणती परिस्थिती एकंदरीत वैवाहिक सुखाला पोषक होते आणि कोणती विघातक होते असे विचारले, तर आपल्याला एक काहीसे चमत्कारिक उत्तर द्यावे लागते. जसजसा मनुष्य अधिकाधिक नागरित होतो, तसतसा एका सहचराबरोबर त्याचा संबंध आमरण सुखद होण्याचा संभव कमी होत जातो. आयलंडमधील शेतकरी कुटुंबात लग्ने आईबाप जुळवीत, परंतु त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि सदाचारी असे असे म्हणतात. सामान्यपणे बोलायचे तर जिथे लोकांमध्ये भेद फारसे नसतात तिथे विवाह सुलभ असतात. जेव्हा एक मनुष्य दुसऱ्याहून फारसा भिन्न नसतो तेव्हा आपण ज्याशी लग्न केले त्याहून अन्य कोणाशी केले नाही याबद्दल पश्चाताप करण्याचे कारण नसते. परंतु ज्यांना रुची, छंद, आणि उद्योग यांचे वैविध्य शक्य असते त्यांना आपला सहचर समानधर्मा असावा असे वाटणे, आणि आपल्या वाट्याला येऊ शकला असता त्याहून हिणकस सहचर मिळाला याबद्दल असमाधान वाटणे स्वाभाविक आहे. धर्म विवाहाकडे केवळ लैंगिक संबंधाच्या दृष्टिकोणातून पाहतो, आणि त्यामुळे कोणालाही कोणताही सहचर का चालू नये हे त्याला कळत नाही; आणि म्हणून विवाहबंधन अविच्छेद्य ठरविताना त्यात पुष्कळदा अपरिहार्य असणारे क्लेश त्याच्या लक्षात येत नाहीत.

विवाह सुखद होण्याची आणखी एक अट म्हणजे ज्या कोणाच्याही मालकीच्या नाहीत अशा स्त्रियांची अल्प संख्या, आणि जेव्हा विवाहित पुरुष प्रतिष्ठित स्त्रियांना भेटू शकतील अशा संधींचा अभाव. जर आपल्या पत्नीखेरीज अन्य कोणत्याही स्त्रीशी लैंगिक संबंध अशक्य असेल, तर बहुतेक पुरुष आहे त्या स्थितीत समाधान मानतील. हीच गोष्ट पत्नींच्याही बाबतीत खरी आहे. जर विवाहात फारसे सुख मिळण्याची आशा नाही असे त्या मानत असतील तर हे विशेषच खरे आहे. म्हणजे जर पतिपत्नीपैकी कोणालाही विवाहातून विशेष सुखप्राप्ती होण्याची अपेक्षा नसेल तर तो विवाह लौकिक अर्थाने सुखी आहे असे म्हणता येईल.

त्याच कारणामुळे सामाजिक रूढींच्या पक्केपणामुळे असुखी विवाहांना प्रतिबंध होतो. विवाहबंधन हे जर कायम आणि अपरिवर्तनीय मानले गेले तर कल्पनाशक्तीला भटकायला मिळते आणि आहे त्याहून अधिक तीव्र सुख शक्य होते असे मानायला कारणच राहत नाही. जेव्हा पतिपत्नींची मनोवस्था वर सांगितल्याप्रमाणे असते, तेव्हा गृहशांति शक्य होण्याकरिता पती किंवा पत्नी कोणाचेही वर्तन फार वाईट नसावे एवढेच पुरेसे असते.

आधुनिक जगातील नागरित लोकांमध्ये सुखाच्या वर सांगितलेल्या अटींपैकी कोणतीच अस्तित्वात नसते, आणि त्यामुळे लग्नानंतरची आरंभीची काही थोडी वर्षे सोडून दिली तर सुखी कुटुंबे फारशी दिसत नाहीत. वैवाहिक असुखाची काही कारणे नागरणाशी बद्ध आहेत; पण अन्य कारणे अशी आहेत की जर स्त्रीपुरुष अधिक सुसंस्कृतपणे वागले तर ती नाहीशी होतील. आपण या दुसऱ्या प्रकारच्या कारणांपासून आरंभ करू या. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीचे लैंगिक शिक्षण. हे सुखवस्तू लोकांमध्ये शेतकरी कुटुंबापेक्षा पुष्कळ मोठ्या प्रमाणात आढळते. शेतकऱ्यांच्या मुलांना जन्मविषयक गोष्टी फार लवकर कळतात, कारण या गोष्टी त्यांना केवळ मानवांमध्येच नव्हे, तर पशृंमध्येही पाहायला मिळतात. यामुळे अज्ञान आणि फाजील सोवळेपणा यांपासून त्यांचे संरक्षण होते. सुखवस्तू लोकांची मुले मात्र लैंगिक विषयाच्या व्यावहारिक ज्ञानापासून काळजीपूर्वक दूर ठेवली जातातः आणि अतिशय आधुनिक आईबापही आपल्या मुलांना या गोष्टी पुस्तकांतून शिकवीत असल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला त्यांचा जो प्रत्यक्ष परिचय होतो तो त्यांना मिळू शकत नाही. कसलाही लैंगिक अनुभव नसलेल्या स्त्रीपुरुषांचा विवाह म्हणजे ख्रिस्ती धर्माचा विजयच! असे जेव्हा होते तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुर्दैवी परिणाम होतात. लैंगिक कर्म ही मानवांमध्ये सहजप्रवृत्तिमय गोष्ट नाही. त्यामुळे अनुनभवी वधू आणि वर ही लज्जा आणि संकोच यांच्या भाराखाली दडपली जातात. जिथे एकटी स्त्रीच अननुभवी असते, आणि पुरुषाने मात्र वेश्यांकडून अनुभव मिळविलेला असतो, तिथे स्थिती याहून फारशी वेगळी असत नाही. लग्नानंतर प्रियाराधनाची आवश्यकता असते हे बहुतेक पुरुषांना माहीतच नसते, आणि कित्येक चांगल्या कुटुंबात वाढलेल्या स्त्रियांना आपण संकोची (reserved) आणि दूर दूर राहिल्याने विवाहाचे केवळ नुकसान करीत आहोत याची कल्पना नसते. हे सर्व अधिक चांगल्या लैंगिक शिक्षणाने दुरुस्त करता येईल. आणि वस्तुतः आता तरुण असणाऱ्या पिढीच्या बाबतीत परिस्थिती त्यांच्या मातापित्यांच्या आणि आजोबाआजीच्या परिस्थितीहन चांगली आहे. अशी एक समजूत प्रचलित होती की स्त्रिया पुरुषांपेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहेत, कारण त्यांना लैंगिक संबंधाची आवड कमी असते. परंतु या समजुतीमुळे पतिपत्नीमध्ये निष्कपट सख्य अशक्य होते. ही समजूत अर्थातच असमर्थनीय होती, कारण लैंगिक कर्मातून सुख न घेणे ही गोष्ट, भोजनात आसक्ती नसणे या गोष्टीप्रमाणेच, सद्गुणाची द्योतक नसून, शारीर किंवा मानस दोषाची द्योतक आहे. परंतु शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांत हे अपेक्षित असे.
वैवाहिक जीवनांतील सुखाच्या अभावाच्या आधुनिक कारणांचा निकाल मला इतक्या सहज लावता येत नाही. माझी अशी समजूत आहे की ज्यांच्या मनावर रूढी, धर्म, इ.ची दडपणे नसतात अशा स्त्रीपुरुषांच्या सहजप्रवृत्ती नैसर्गिकपणे अनेकनिष्ठ असतात. ती गाढ प्रेमात पडू शकतात, आणि अनेक वर्षे एकाच व्यक्तीत पूर्णपणे मग्न राहू शकतात; पण पुढेमागे केव्हातरी अतिपरिचयामुळे तृष्णेची धार बोथट होते, आणि मग पूर्वीचा रोमांचानुभाव प्राप्त करण्याकरिता त्यांची दृष्टी अन्यत्र वळते. नीतीच्या रक्षणार्थ ह्या ऊर्मीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. पण तिचा उद्भव रोखणे मात्र फार कठीण असते. स्त्रियांच्या स्वातंत्र्यात झालेल्या वाढीमुळे व्यभिचाराच्या संधी पूर्वीच्या काळाहून खूप वाढल्या आहेत. संधीमुळे विचार उद्भवतो, आणि विचारातन इच्छा; आणि धार्मिक निर्बंध नसतील तर इच्छेतून कर्म उद्भवते.

स्त्रीदास्यविमोचनामुळे विवाहात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. जुन्या काळी पत्नीला पतीशी जुळवून घ्यावे लागे, परंतु पतीला पत्नीशी जुळवून घेण्याची गरज नव्हती. आजकाल आपल्या व्यक्तित्वरक्षणार्थ आणि स्वतंत्र जीवनक्रमार्थ (career) एका ठराविक प्रमाणापलीकडे जुळवून घ्यायला स्त्रिया नाखुष असतात, तर स्वामित्वाची जुनी आकांक्षा सोडण्यास तयार नसलेल्या पुरुषाला आपणच सगळी तडजोड का करायची हे समजत नाही. ही अडचण विशेषतः व्यभिचाराच्या संदर्भात उद्भवते. जुन्या काळी पती मधूनमधून बेइमानी करीत असे, परंतु सामान्यपणे त्याच्या पत्नीला हे माहीत नसे. जर ते तिला कळले तर तो आपली चूक झाली असे कबूल करी आणि आपल्याला पश्चात्ताप झाला आहे अशी तिची समजूत करून देई. पत्नी मात्र सामान्यपणे एकनिष्ठ असे, जर एखादी पत्नी एकनिष्ठ नसली, आणि हे उघडकीस आले, तर विवाह भग्न होई. आज परस्पर एकनिष्ठेची अपेक्षा राहिलेली नाही, तरी मत्सराची सहजप्रवृत्ती मात्र जिवंत आहे; तिच्यामुळे जरी उघड भांडणे न झाली तरी गाढ सख्य टिकणे मात्र अशक्य होऊन बसते.

ज्यांना प्रेमाचे मूल्य उत्कटतेने जाणवते अशा लोकांमध्ये आणखी एक प्रेमविरोधी कारण उद्भवले आहे. प्रेम जोपर्यंत मुक्त आणि उत्स्फूर्त असते तोपर्यंतच ते जिवंत राहते; ते कर्तव्य आहे या भावनेने ते नष्ट होते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे तुझे कर्तव्य आहे असे कोणाला सांगणे हे त्या व्यक्तीविषयी द्वेष निर्माण करण्याचे हमखास साधन आहे. प्रेम आणि कायदेशीर बंधने या दोन गोष्टी एकत्र आणल्यामुळे त्यांच्या अंगभूत विरोधामुळे विवाह बहुधा असफल होतो.

लग्नानंतर अन्य व्यक्तींच्या प्रेमाला पूर्ण मज्जाव केल्याने ग्रहणसामर्थ्य, सहानुभूती आणि मूल्यवान मानवी संसर्गाच्या संधी या गोष्टी दुर्बल होतात. तसे करणे म्हणजे जे मूल्यांच्या दृष्टीने खरोखर इप्ट आहे अशा गोष्टीशी दांडगाई करणे होय. तसेच कोणत्याही प्रकारच्या निरोधवादी नीतीप्रमाणे त्यामुळे संबंध जीवनाकडे पोलिसी वृत्तीने पाहण्याची दृष्टी बळावते, कारण ही दृष्टी सतत कशावर तरी नियंत्रण घालण्याकरिता निमित्त शोधत असते.

या सर्व कारणांस्तव-आणि यांपैकी काही निर्विवादपणे इष्ट असणाऱ्या गोष्टींशी संबद्ध आहेत-विवाह ही गोष्ट कठीण झाली आहे. विवाह जर सौख्यविघातक होऊ नयेत असे आपल्याला वाटत असेल तर विवाहाचा नव्याने विचार करावा लागेल. एक उपाय सहज सुचतो, आणि तो म्हणजे घटस्फोट सुलभ करणे. या उपायाचा प्रयोग गरिकत मोठ्या प्रमाणावर चालला आहे. सध्या इंग्लिश कायद्यात घटस्फोटाकरिता पुरेशी मानलेल्या कारणांत भर घालावा लागेल असे सर्वच उदार लोकांप्रमाणे, माझेही अर्थात् मत आहे. परंतु सुलभ घटस्फोट हा विवाहसंस्थेतील अडचणींवर तोडगा आहे असे मला कारत नाही. जिथे विकास निरपत्य असेल, तिथे घटस्फोट पुष्कळदा योग्य उपाय असू शकेल; पण जिथे अपत्ये आहेत तिथे विवाहबंधनाचे स्थैर्य ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. (या विषयाकडे मी कुटुंबाचा विचार करताना परत येणार आहे.) माझे असे मत आहे की जिधे विवाह सफल झाला आहे, आणि त्यातील दोन्ही भागीदार समंजस आणि सुजन आहेत. तिथे हा संबंध आमरण कायम राहावा अशी अपेक्षा करणे योग्य आहे. पण याचा अर्थ त्यातून अन्य लैंगिक संबंध बाद करावेत असा नव्हे. ज्या विवाहाचा आरंभ उत्कट प्रेमाने होतो आणि ज्यात अपत्येही निर्माण होतात, आणि ती वांछित असतात आणि आई व बाप दोघांच्याही प्रेमाचा विषय असतात, त्यात स्त्रीपुरुषांत असा गाढ बंध निर्माण व्हावा की ज्यामुळे आपले सख्य ही एक अमूल्य गोष्ट आहे असे त्यांना वाटावे, आणि हे कामविकार क्षीण झाल्यावर, आणि त्यांच्यापैकी एकाला किंवा दोघांनाही अन्य व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटत असले तरी त्यांना वाटाते. ही विवाहाची परिपक्वता मत्सरामुळे पूर्ण व्हायची सहते. पण जरी मत्सर ही सहजप्रवृत्ती असली तरी तो वाईट आहे, आणि केवल समर्थनीय सात्त्विक संताप नव्हे, हे लक्षात आल्यावर त्याचे नियंत्रण करता येते. जे अनेक वर्षे टिकले आहे, आणि जे अनेक गाढ अनुभवांतून गेले आहे अशा सख्यात जो समृद्धी असते, ती प्रेमाच्या आरंभीचे दिवस कितीही सुखद असले तरी त्यात असू शकत नाही. आणि काळाने मूल्यांची जी वृद्धी होते तिची जाण असणारा कोणीही मनुष्य अशा सख्याचा त्याग करून नवीन प्रेमाचा स्वीकार करणार नाही.

याप्रमाणे नागरित स्त्री आणि पुरुष दोघांनाही विवाहात सौख्य प्राप्त होऊ शकते, मात्र त्याकरिता अनेक पथ्ये पाळावी लागतील. त्यात दोन्ही बाजूंना पूर्ण समतेची जाणीव असावी लागेल; त्यात परस्परांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करता कामा नये; त्यात शारीरिक आणि मानसिक असे विविध पूर्ण सौहार्द असावे लागेल; आणि मूल्यांच्या मापदंडाविषयी सहमती असावी लागेल. (उदा. जर त्यापैकी एकाला पैसा हे प्रमुख मूल्य वाटत असेल आणि दुसरा सत्कर्माला महत्त्व देत असेल, तर ही गोष्ट त्यांच्या वैवाहिक सौख्याला मारक होईल.) या सर्व अटी जर पूर्ण झाल्या तर वैवाहिक संबंध हा दोन मानवांमध्ये असू शकणाऱ्या सर्व संबंधांत श्रेष्ठ आणि मूल्यवान संबंध आहे असे मला वाटते. जर हे आजपर्यंत साध्य झाले नसेल, तर त्याचे प्रमुख कारण पती आणि पत्नी एकमेकांवर पाळत ठेवणारे पोलिस शिपाई आहेत अशा भूमिकेतून ते स्वतःकडे पाहात असतात हे आहे. विवाहाच्या सर्व शक्यता वास्तवात उतरायच्या असतील तर नवरे आणि बायका यांना हे लक्षात घ्यावे लागेल की कायदा काहीही म्हणो, ते दोघेही मुक्त असले पाहिजेत.

अनुुवादक : म. गं. नातू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.