गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते सुधारक होतेच. पण त्यांनी संतति-नियमनाचा पुरस्कार केला होता हे किती जणांना माहिती आहे? ‘केसरी’ च्या १८८२ च्या १५. व्या अंकात आगरकरांनी ‘स्त्रीदास्य-विमोचन’ हा लेख लिहिला होता. त्यावर त्यांचे नाव नसले तरी त्या लेखातील विचारसरणी आणि लेखनशैली यावरून तो लेख आगरकरांचाच आहे याविषयी शंका राहात नाही. त्या लेखात प्रारंभीच त्यांनी, नवे विचार आले की नवे शब्द बनवावे लागतात, असे सांगून स्त्रीदास्य-विमोचन’ हा शब्द आपण बनवीत आहो, असे सांगितले आहे. यावरून ‘स्त्रीदास्य-विमोचन ‘ हा शब्द प्रथम आगरकरांनी प्रचारात आणला हे दिसून येते.
या लेखातच त्यांनी संतति-नियमनाची कल्पना सूचित केली आहे. ते म्हणतात, “स्त्री-शिक्षणाच्या आड येणाऱ्या कित्येक लोकांचे असे म्हणणे आहे की, जोपर्यंत गर्भधारणा आणि शिशुसंगोपन ही कामे स्त्रियांकडे राहतील तोपर्यंत त्यांच्या स्थितीत बदल करता येणार नाही. कबूल. पण आम्हास वाटते की, कालांतराने फाजील संतानोत्पत्ती होऊ न देता स्त्री-पुरुषांचा संयोग होऊ देण्याची युक्ती काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन-तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयाने करून घेतली म्हणजे पुढे टाकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे, व त्या कामात त्यास लवकर यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे झाले तर आताप्रमाणे डझन-दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगात आणण्यापेक्षा आई-बापांच्या जागी खुंटास खुंट उभारण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तर बस्स आहे.”
यावरून आगरकर हे हिंदुस्थानातील संतति-नियमनाचे आद्य पुरस्कर्ते होते, हे स्पष्ट दिसून येते
(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सौजन्याने)