प्रा. दि. य. देशपांडे यांचे ‘गीतेतील नीतिशास्त्र ह्या शीर्षकाखाली दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर प्रखर टीका केली आहे. गीतेवर ह्यापेक्षाही प्रखर टीका इतरांनी केलेली आहे. सत्यान्वेषणाच्या दृष्टीने केलेली कोणतीही टीका स्वागताईच ठरावी; कारण त्यातून सत्य अधिकाधिक स्पष्ट होण्याला मदत होते. तेव्हा टीका कोणत्या दृष्टीने केली हे महत्त्वाचे ठरते.
गीतेतील तत्त्वज्ञानाचे आपण ‘विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करीत आहोत असे प्रा. देशपांडे म्हणतात. ह्या क्षेत्रांतील त्यांचा अधिकार मान्य करूनही त्यांचे प्रस्तुत परीक्षण विवेकवादाला धरून नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते….
गीता हे मुख्यतः मोक्षशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे हे प्रा. देशपांडे मान्य करतात. हे शास्त्र बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे असे गीता म्हणते. असामान्य बुद्धिमत्ता असलेले इतकेच नव्हे तर आधुनिक विज्ञानपद्धतीचे परिपूर्ण ज्ञान असलेले स्वामी विवेकानंद, लो. टिळक, महर्षी अरविंद, डॉ. राधाकृष्णन इत्यादि विद्वानही तेच म्हणतात. विज्ञाननिष्ठ प्रयोगक्षमता किंवा निदर्शनक्षमता हा अध्यात्माचा निकष नसून अनुभूती, साक्षात्कार हा निकष आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत अध्यात्मशास्त्राचे दोनच मार्गानी परीक्षण होऊ शकते. (१) परीक्षकाने स्वतः अनुभूतीच्या पातळीवर जाऊन अध्यात्माचे परीक्षण करणे, किंवा (२) बुद्धिनिष्ठ विज्ञानपद्धतीचा आवाका अध्यात्माला कवेत घेऊ शकेल इतका वाढवून त्याचे परीक्षण करणे. विज्ञानाने अनेक धार्मिक कल्पनांचे परीक्षण करून त्यांची असत्यता सिद्ध केली आहे आणि मनोव्यापार, मास्तिष्कमनिया, पुनर्जन्म, सृष्टीचा उगम व स्वरूप, वस्तुजातातील मूलतत्त्वांचा शोध, इत्यादि क्षेत्रात त्याचे संशोधन चालू आहे. हे संशोधन जसजसे प्रगत होईल तसतसे अध्यात्माच्या क्षेत्रांतील सत्यासत्यही उघड होत जाईल. परंतु जोपर्यंत ह्या दोघांपैकी कोणत्याही मागनि अध्यात्माचे निर्णायक परीक्षण होत नाही तोपर्यंत त्याकडे फार तर अज्ञेयाच्या दृष्टीने पाहणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल. हा विवेकनिष्ठ अज्ञेयवाद तीन प्रकारचा असू शकेल. (१) ज्याअर्थी अध्यात्माच्या क्षेत्रातील ज्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही अशी तज्ज्ञमंडळी मोक्षशास्त्राचे प्रतिपादन करतात त्याअर्थी ते विश्वासाई असावे ही भूमिका. विज्ञानाच्या क्षेत्रांतील अनेक सिद्धान्त, उदा. सापेक्षतावाद, क्वॉन्टम सिद्धान्त, सृष्टीच्या उगमाचा महाध्वनि-सिद्धान्त इत्यादि सामान्यजनांना समजत नाहीत, त्यांतील अनेक तर प्रयोगक्षमतेच्याही पलीकडे असतात, तरीदेखील त्या क्षेत्रांतील तज्ज्ञमंडळींनी त्यांचा पुरस्कार केला आहे म्हणून आपणही त्यांना मानतो तसाच हा प्रकार आहे. आप्तवचन हा येथील आधार होय. (२) मोक्षशास्त्र विज्ञानपद्धतीने सिद्ध होत नाही म्हणून ते सत्य असण्याचा संभव कमी अशी भूमिका घेणे, आणि (३) मोक्षशास्त्र हे सत्य की असत्य याबद्दल प्रत्यक्ष काही सिद्ध होईपर्यंत उदासीन राहणे. ह्या प्रत्येक भूमिकेत संशयाला मात्र जागा राहील. त्यामुळे भूमिका कोणतीही घेतली तरी ती निर्णायक समजली जाणार नाही. विवेकवादाची हीच भूमिका संभवते. ह्याऐवजी मोक्षशास्त्र हे पूर्णतः निराधार आहे, अध्यात्म हे ‘भलेमोठे भारुड आहे अशी निर्णायक भूमिका प्रा. देशपांडे यांनी घेतली आहे. हा विवेकवाद नव्हे. शिवाय अपुऱ्या आधारावर प्रा. देशपांडे यांनी ही भूमिका घेतली आहे असे दिसते. ज्यांवर मोक्षशास्त्र आधारलेले आहे ती साक्षात्कार इत्यादि ‘तथाकथित अलौकिक साधने संशयास्पद आहेत असे ते म्हणतात. आणि त्यामुळे ‘साक्षात्कारावर आधारलेले मोक्षशास्त्र पूर्णतः निराधार आहे असा ते निष्कर्ष काढतात. आता तर्कदृष्ट्या आधार संशयास्पद असेल तर त्यावर आधारलेले मोक्षशास्त्रही फार तर संशयास्पद आहे असे म्हणता येईल. म्हणजेच ते खरे असेल किंवा नसेलही ही भूमिका घेता येईल. परंतु त्याला पूर्णतः निराधार कसे काय म्हणता येईल? यातील तर्कदोष अगदी स्पष्ट आहे.
असाच तर्कदोष गीतेला जन्मसिद्ध वर्णभेद अभिप्रेत होते हे सांगतानाही झाला आहे. अपत्याच्या गुणांवर आनुवांशिकतेचा प्रभाव पडतो हे आधुनिक विज्ञानालाही मान्य आहे. ते लक्षात घेऊन शुक्रपेढी तयार करण्याचे प्रयत्नही वैज्ञानिक करीत आहेत. तेव्हा भिन्न गुणसमुच्चयांचे स्त्रीपुरुष एकत्र आले तर त्यामुळे वर्णगुणांची सरमिसळ होईल एवढेच गीतेने म्हटले आहे. गीतेतील वर्णविचार हा मख्यतः गणकर्मानुसार असल्यामुळे ‘स्त्रीष दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ह्या वचनाचा अर्थ जन्मानुसार वर्ण असा घेणे योग्य होणार नाही. वर्णपरिवर्तनाचे विश्वामित्र हे एकलते एक उदाहरण आहे हेही बरोबर नाही. वसिष्ठ, व्यास, पाराशर, कबषएलुष, शुनःशेप, ऐतरेय इत्यादि कितीतरी उदाहरणे आहेत. तथापि त्याकाळी प्रत्यक्षात वर्ण हे मुख्यतः जन्माधिष्ठित होते हे मात्र खरे. परंतु त्याबद्दल जरा नंतर विचार करू.
अध्यात्मशास्त्रानुसार संपूर्ण विश्व हे जर एकाच शुद्ध, बुद्ध व मुक्त अशा ब्रह्माचा अविष्कार असेल तर त्यात अज्ञानी जीवात्मे, माया, भ्रम हे आले कोठून हा प्रा. देशपांडे यांनी उपस्थित केलेला प्रश्न मात्र विवेकवादाला अनुसरून आहे. अध्यात्मक्षेत्रातील तज्ज्ञांनी ह्याचे विवेकवादाला धरून उत्तर दिले तर बरे होईल. नाहीतर अध्यात्मशास्त्रावरील आत्मविसंगतीच्या दोषाचे निरसन होणार नाही. परंतु तेवढ्यावरून ते सबंध शास्त्रच ‘मोडून पडते असे मात्र म्हणता येणार नाही. आधुनिक विज्ञानशास्त्रातही क्वांटम सिद्धान्तात कार्यकारणासंबंधीच्या तत्त्वाशी विसंगती दिसते असे जाणकार म्हणतात, परंतु तेवढ्याने ते शास्त्र मोडून पडत नाही. तेथे अधिक विकासाला वाव आहे -एवढेच म्हणता येईल.
प्रा. देशपांडे यांनी आपल्या विवेचनात वापरलेले काही शब्दही खटकणारे आहेत.. अध्यात्मशास्त्राने मोक्षशास्त्राबद्दल दिलेले उत्तर ‘डोकेबाज आहे असे ते म्हणतात. कर्मसिद्धांत म्हणजे ‘पोकळ भारूड’ किंवा ‘पौराणिक थाप योग म्हणजे कर्मफलाच्या ‘तडाख्यातुन सापडण्याची एक युक्ती मोक्ष म्हणजे निव्वळ कविकल्पना’ आणि चातुर्वर्ण्य मी निर्माण केले हे म्हणणे म्हणजे भगवंताची प्रौढी” किंवा ‘घडधडीत थाप होय अशी संभावना ते करतात. तसेच मोक्षशास्त्राचे अत्यंत संक्षेपाने स्पष्टीकरण करून तेवढ्यानेही वाचक कंटाळले असणार असे म्हणून त्याबद्दल वाचकांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व शब्दप्रयोग पूर्वग्रहदूषित वाटतात. त्यात विचार किंवा विवेकापेक्षा विकाराचाच भाग अधिक दिसतो.
मोक्षशास्त्र आणि नीतिशास्त्र यांच्या अंतिमसाध्यांची प्रा. देशपांडे यांनी गल्लत केलेली दिसते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे हे मोक्षशास्त्राचे अंतिम साध्य असेल, परंतु नीतिशास्त्राचेही तेच अंतिम साध्य असलेच पाहिजे असे नाही. मोक्षाचे क्षेत्र ‘पारमार्थिक आहे तर नीतीचे मुख्यतः ऐहिक, मोक्षाचे ध्येय व्यक्तिनिष्ठ असते तर नीतीचे ध्येय व्यक्तिनिष्ठतेबरोबरच समाजनिष्ठही असते. त्यासाठीच गीतेने लोकसंग्रह, आभ्युदय, (समाज) धारणा इत्यादि नौतीची उद्दिष्टे सांगितली आहेत. तेव्हा गीतेतील नीतिशास्त्र हे पूर्णतः मोक्षशास्त्राशी निगडित आहे व म्हणून मोक्षशास्त्राचा त्याग केल्यास नीतिशास्त्र शिल्लक राहात नाही हे म्हणणे तर्कसंगत नाही. प्रा. देशपांडे यांनी आपल्या विशिष्ट विवेकपद्धतीने आधी मोक्षशास्त्र बाद ठरविले, त्यावरून मग मोक्षशास्त्राशी संबंधित असलेला कार्य काय – अकार्य काय हा विचार बाद ठरविला आणि मग नीतिशास्त्र हे मोक्षशास्त्राशी पूर्णतः निगडित आहे असे कल्पून गीतेत कार्य आणि अकार्य काय हे तुला सांगतो अशी बढाईखोर सुरुवात करून श्रीकृष्णाने तो आद्य प्रश्न अनुत्तरितच ठेवला असा अजब निष्कर्ष काढला आहे. लोकसंग्रह, धारणा, साधूंचे परित्राण, धर्मरक्षण इत्यादि शब्द पुरेसे बोलके नाहीत काय? ह्याचा अधिक तपशील दिला असता तर अधिक बरे झाले असते एवढेच फारतर म्हणता येईल.
वरील सर्व कारणांकरिता प्रा. देशपांडे यांनी केलेले विवेचन विवेकवादाला अनुसरून वाटत नसले तरी त्या मागची त्यांची प्रामाणिक सुधारणावादी पोडतिडीक मान्यच करावयास पाहिजे. परंतु सुधारकाचे दोन वर्ग करता येतील. जुन्यातील दोषांवर घणाघाती आघात करून जुन्या श्रद्धास्थानांना नष्ट करू पाहणारा एक वर्ग आणि जुन्यातील चांगल्याला अधिक विकसित करून व दोषांना तेवढे निष्प्रभ करून प्रगती घडवून आणू पाहणारा दुसरा वर्ग, पहिल्या वर्गातील सुधारकांनी जिवाचा आटापिटा करूनही त्यांना फारसे यश मिळाले नाही असेच इतिहासावरून दिसून येईल. कारण कोणताही समाज, त्याचा तेजोभंग करून व आत्मविश्वास नष्ट करून, वर आणता येत नाही. जुनौ सर्व मूल्ये-धार्मिक मूल्येसुद्धा-पद्धतशीरपणे व कणखरपणे नष्ट करू पाहणाऱ्या साम्यवादी देशांची आजची अवस्था आपल्या नजरेसमोर आहे. त्यांच्या तुलनेत दुसऱ्या वर्गातील सुधारक अधिक यशस्वी झालेले दिसून येतील. जुन्यातील टाकाऊ भाग गुपचूप टाकून द्यावयाचा व टिकाऊ भागाला आधुनिकतेचा नवा उजाळा द्यावयाचा हा उत्क्रान्तिमार्गच सुधारणेचा श्रेयस्कर मार्ग आहे. इंग्लंड हे ह्या मार्गाचे उदाहरण आहे.
भारताची प्रकृतीही ह्याच मार्गाला अनुकूल आहे. ‘T have come to fulfil and not to destroy असे ख्रिस्ताचे एक वचन आहे. ‘बुडती हे जन न देखवे डोळा म्हणणाऱ्या तुकारामांनीही आपल्या परीने हाच मार्ग अवलंबिला. हा मार्ग अवलंबिला तर स्थितप्रज्ञाच्या गीतेतील वर्णनाला उपयुक्त अर्थ लावता येईल व वर्णव्यवस्थेतील जन्मसिद्धतेचे समर्थन किंवा बागुलबुवा न करता त्यातील मूळ कल्पना आजच्या जगात व्यक्तिविकासासाठी व समाज स्वास्थ्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकेल काय व ती दोषरहित करता येईल काय असा विचार होऊ शकेल. अशी विधायक सुधारकी दृष्टी ठेवणे म्हणजे ऐतिहासिक सत्य धाब्यावर बसविणे नव्हे. इतिहासातून आजच्यासाठी काय घ्यावयाचे, किती घ्यावयाचे, कसे घ्यावयाचे व काय घ्यावयाचे नाही ह्याचा त्यात नीरक्षीर विवेक आहे.
२१३, शिवाजीनगर, नागपूर-४४००१०