गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रामाणिक नीतिवाद्यांमध्ये सुखाला, आनंदाला तुच्छ लेखण्याची, दूर ठेवण्याची (त्यापासून दूर पळण्याची म्हणाना!) चाल आहे. ‘सहनं परमो धर्मः’ मानणाऱ्या तितिक्षावादी (स्टोईक) लोकांनी सुखाचा उपदेश करणाऱ्या एपिक्युरसवर ‘हल्लाबोल’ केला. त्याच्या उपदेशाला ‘फालतू तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले आणि त्याच्याबद्दल नाही नाही त्या वंदता पसरवून आपला ‘वरचढपणा’ सिद्ध केला. ही तर प्राचीन गोष्ट म्हणून सोडून देऊ. त्याच्या २००० वर्षांनंतर काय झाले? जर्मन प्राध्यापकांनी असे काही सिद्धान्त शोधून काढले, की ज्यामुळे जर्मनीचे तर अधःपतन झालेच, परंतु संपूर्ण जगावरच ही आजची अवकळा आली. ह्या सर्व लोकांना सुखाचा तिटकारा होता. त्याचाच ब्रिटिश बांधव म्हणजे कार्लाइल. “ईश्वराचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी आपण सुखाचा बळी दिला पाहिजे.” हेच पालुपद तो सतत घोकत राही. बरे, ह्या अनुग्रहाचा साक्षात्कार तरी त्याला कुठे झाला म्हणावा, तर जनरल क्रॉमवेलने आयरिश लोकांची केलेली कत्तल, फ्रेडरिक द ग्रेट ने केलेला रक्तरंजित विश्वासघात, गव्हर्नर क्रॉमवेलने जमैकात केलेले हत्याकांड, अशा सारख्या प्रसंगांत. ह्याचा अर्थ असा, की सुखाबद्दलचा तुच्छताभाव हा प्रामुख्याने इतरांच्या सुखाबद्दलचा तुच्छताभाव असतो. मुळात तो मानवी वंशाबद्दलचाच तिरस्कार असतो. एखाद्या माणसाने, तो ज्याला उच्च मूल्य मानत असेल त्याच्यासाठी मनापासून सुखाचा त्याग केला, तरीदेखील त्याला, एवढ्या उच्च मूल्यांच्या वाटेला न जाणारे जे लोक आहेत, त्यांचा मत्सर वाटणे क्रमप्राप्तच आहे. आणि हाच मत्सर मग स्वतःला साधुसंत म्हणवून घेणाऱ्यांच्या क्रौर्यास व हिंसेस कारणीभूत ठरतो. आजच्या काळातील ह्याचे सर्वांत उत्तम उदाहरण म्हणजे साम्यवादी लोक.
माणसाने कसे राहिले पाहिजे ह्याचे नियम घडविणारे लोक निसर्गाच्या मर्यादांकडेच दुर्लक्ष करतात असे म्हणावे लागेल. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेले एखादे उच्च ध्येय गाठण्यासाठी जर तुम्हाला सतत मन मारावे लागत असेल, तर त्यामध्ये काही राम राहणार नाही. कोणत्याही आंतरिक ऊर्मीला स्वाभाविकपणे बाहेर येऊ दिले नाही, तर ती त्यासाठी अन्य मार्ग शोधतेच, आणि तो मार्ग द्वेषभावाचाही असू शकतो. तुम्ही स्वतःला काही सुखोपभोगाची मुभा जरी दिली, तरी ते तुमच्या आयुष्याच्या मुख्य प्रवाहाशी जुळणारे नसूही शकते. जे पुढे पुढे अप्रस्तुत ठरू शकते. अशा संकुचित सुखोपभोगापासून आनंद तर नाहीच; परंतु अधिकाधिक निराशाच पदरी पडणार.
तुम्ही सुखाच्या जेवढे म्हणून मागे लागाल, तेवढे ते तुमच्यापासून दूर पळते हेही नैतिकवाद्यांचे एक लाडके मत आहे. मात्र जे लोक मूर्खपणाने त्याचा अनुनय करतात, त्यांच्यापासूनच ते सुख दूर पळते असा माझा तरी, समज आहे. माँटे कार्लोच्या जुगार अड्डयावरील लोक पैशाच्या मागे लागले आहेत. ह्या पद्धतीने बहुतांश लोक तो मिळवण्याऐवजी गमावूनच बसतात. मात्र याशिवाय पैसे मिळण्याचे अन्य काही मार्ग आहेत, ज्यातून तो हमखास मिळतो. सुखाच्या बाबतीतही तेच आहे. मद्य घेऊन मिळणाऱ्या आनंदाविषयी जर म्हणाल तर मग त्याच्या पश्चात् परिणामांचे काय? एपिक्युरियसने एका आरामदायी, उत्साहवर्धक समाजात राहून, रोज कोरडी पोळी खाऊन, फक्त सणासुदीला तीवर थोडे तूप घेऊन – सुखाचा पाठपुरावा केला. तो यशस्वी झाला नाही असे नाही, परंतु तो आजाराच्या भीतीने सतत पछाडलेला असे, हे कसे विसरता येईल? तसेच, इतरांना सुख मिळण्यासाठी अधिक जोमदार, कृतिशील असे काहीतरी हवे असते. निव्वळ सुखाचा शोध घेणे ही त्याला इतर काही गोष्टींची जोड दिल्याशिवाय – अतिशय अमूर्त व सैद्धान्तिक गोष्ट आहे आणि ती एकटी काही आयुष्याचे प्रयोजन बनू शकत नाही. मात्र याबाबतीत माझे तरी एक असे मत आहे, की आयुष्याचा जो काही मार्ग तुम्ही निवडाल, तो – आयुष्यात खूपच शौर्य आणि मर्दुमकी गाजवून दाखवण्याचा तुमचा इरादा नसेल तर – सुखाच्या विरुद्ध दिशेने जाणारा नसावा.
सुखाचा भौतिक आधार म्हणजे पुरेसे उत्पन्न व आरोग्य. हा आधार जवळ असतानाही अनेक लोक दुःखात बुडालेले मी पाहिले आहेत — विशेषतः अमेरिकेत. त्यावरून मला आपले असे वाटते, की ह्यांच्या ‘कसे जगावे’ च्या सिद्धान्तातच काहीतरी गडबड असली पाहिजे. दुसऱ्या बाजूने, ‘कसे जगावे’चा कुठलाही सिद्धान्त हा चुकीचाच असतो, असेही माझे मत आहे. सिद्धान्त चुकीचा असतो म्हणण्यापेक्षा त्याचा सिद्धान्त बनवणे, हेच चुकीचे आहे. खरे तर, मानव हा ‘प्राणी’ असूनही इतर प्राण्यांपेक्षा तो स्वतःला वेगळे समजू लागला. इथेच सगळी गोची झाली. प्राणी हे आंतरिक ऊर्मीवर जगतात, आणि बाह्य परिस्थिती सुखकर असेपर्यंत ते मजेतच असतात. तुमच्याकडे जर एखादी मांजर असेल, तर अन्न, ऊब आणि अधूनमधून फरशीवर लोळण्याची संधी एवढे मिळाले, की ती अगदी खुशाल असल्याचे तुम्हाला दिसेल.
अर्थात् तुमच्या मांजरीपेक्षा अधिक जटिल, व्यामिश्र असे आयुष्य तुम्हाला हवे असणार; परंतु तरीही त्याची पाळेमुळे आंतरिक ऊर्मीतच दडलेली आहेत, हे विसरून चालणार नाही, ह्याकडे सुसभ्य, विशेषतः इंग्रजी बोलणाऱ्या समाजांमध्ये सहजच कानाडोळा केला जाईल, म्हणून आवर्जून सांगतो. लोक एक कुठलेतरी ‘सर्वोच्च ध्येय’ म्हणून ठरवतात, आणि त्याला साहाय्यभूत नसलेल्या सर्व उर्मीचे निघृणपणे दमन करतात. एखादा धंदेवाईक माणूस श्रीमंत होण्यास इतका आतुर असेल, की त्यासाठी तो आपल्या आरोग्याचा व कौटुंबिक सौख्याचा बळी देईल. सरतेशेवटी तो जेव्हा ‘खरोखर श्रीमंत’ होतो. तेव्हा आपले थोर उदाहरण गिरवण्याचा सल्ला देण्यासाठी लोकांच्या मागे लागणे, एवढेच काम त्याच्याकडे शिल्लक राहते आणि त्यातच शेवटी त्याला ‘सुख’ शोधावे लागते. अनेक उच्चभ्रू महिला, ललितकलांचा व साहित्याचा आस्वाद घेण्याचे इंद्रिय निसर्गाने त्यांना बहाल केले नसले तरी, घोकून-घोटून ‘सुसंस्कृत’ होण्याची खटपट करतात. बाजारात आलेल्या नवीन पुस्तकांबद्दल पोपटपंची करण्यासाठी त्या कंटाळवाण्या शिकवण्यांमध्ये तासन्तास घालवतात. पुस्तके ही शिष्टमन्यता दाखविण्याची नव्हे, तर आनंद लुटण्याची संधी देणाऱ्या वस्तू आहेत, हे त्यांना कुणी सांगावे?
ज्यांना सुखी म्हणता येईल अशा आपल्या आजूबाजूच्या स्त्री-पुरुषांकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, की त्यांच्यामध्ये काही गोष्टी समान आहेत. त्यांतली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट ही की ते अशा क्रियाकलापात मग्न असतात, की जो स्वयमेव सुखद आहे, आणि जे अस्तित्वात येत असल्याचे पाहताना तुम्हाला आनंद होतो, असे काहीतरी तो घडवून आणतो. आपल्या पोराबाळांशी रममाण होण्यात ज्यांना आंतरिक सुख लाभते अश्या बायकांना (आजकालच्या अनेक – विशेषतः सुशिक्षित महिलांना ते लाभत नाही) कुटुंब उभारताना ते मिळू शकते. कलावंत, लेखक व शास्त्रज्ञ ह्यांना, त्यांच्या आवडीचे काम करण्यातून ते मिळते. पण इतके तरी कशाला? ह्याच प्रकारच्या सुखाची अधिक साधी-सोपी रूपेही पहायला मिळतातच की! शहरात चाकरी करणारे अनेक लोक आठवडी सुटीमध्ये आपल्या बागेत मनसोक्त घाम गाळतात आणि वसंतागम झाल्यावर, सौंदर्य निर्माण केल्याच्या आनंदात न्हाऊन निघतात.
क्रियाकलापाशिवाय सुख मिळवणे अशक्य तर खरेच, परंतु अती कष्टाच्या, कंटाळवाण्या किंवा शिसारी आणणाऱ्या कामांमधूनही ते मिळणे अशक्यच आहे. उघडपणे आपल्याला इच्छापूर्तीकडे नेणारे कोणतेही काम आंतरिक ऊर्मीच्या विरोधात नसेल, तरच ते सुखद असते. कुत्र्याला जर ट्रेडमिलवर उभे केले आणि अर्ध्या तासानंतर त्याला चांगले जेवण दिले तर जेवण मिळेपर्यंतच्या वेळात काही तो ‘सुखी’ असणार नाही. कलियुगातली आणखी एक गोची अशी आहे, की आपल्या फारच कमी कामांमध्ये आता शिकारीसारखी ‘स्वाभाविकता’ राहिली आहे. परिणामी आज बहुतांश लोकांना, आपल्या सुखाचा शोध घेण्यासाठी उपजीविकेहून अन्यत्र जावे लागते. उपजीविकेसाठी जर अंगमेहनतीचे काम करायचे असेल, तर करमणुकीसाठी बैठी कामेच निवडली जाणार! सर्जनशील आंतरिक उमींचे शमन न करणाऱ्या, क्रिकेटची मॅच पाहणे वा सिनेमाला जाणे ह्यांसारख्या कामांमधून कितीसे समाधान लाभणार! प्रत्यक्ष खेळणाऱ्या खेळाडूंचे समाधान अर्थात् वेगळ्या प्रकारचे असते.
शेजाऱ्यांचा आदर मिळणार नाही व ते आपल्याला नाकारतील ह्या भीतीपोटी अनेक स्त्रीपुरुष (विशेषतः महिला) विचित्रपणे वागतात, जी वागणूक कुठल्याही आंतरिक ऊर्मीचा परिपोष करणारी नसते. नेहमी ‘बरोबर’ असणारी व्यक्ती नेहमीच, किंवा बहुतेकदा कंटाळलेली असते. आया जेव्हा मुलांच्या मौजमस्तीवर गदा आणतात, तेव्हा अशा वागण्याने ती मुले आपल्याला अभिप्रेत असलेल्या समाजवर्गापर्यंत चढू शकणार नाहीत अशी भीती त्यामागे असते. ह्या भीतीमुळे मुलांच्या आंतरिक ऊर्मी दाबून टाकून त्या त्यांच्या कठपुतळ्याच बनवीत असतात. जन्मदात्या मातांना असे करताना पाहणे मला फार क्लेशकारक होते.
प्रतिष्ठा, सत्ता व दोहोंच्या रूपातील सामाजिक यशाचा अनुनय करणे, हा आजच्या स्पर्धात्मक युगात सुखाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे. कृपया माझे म्हणणे शांतपणे समजून घ्या. हे यश म्हणजे सुखातला एक घटक. काहींसाठी तर फार महत्त्वाचा घटक हे मी अमान्य करीतच नाही. तरीदेखील, बहुतांश लोकांना समाधान देण्यासाठी तो पुरा पडत नाही, हेही तेवढेच खरे. तुम्ही श्रीमंत असाल, कौतुकाचे धनी असाल, तरी तुम्हाला मित्र नसतील, छंद नसतील, आनंदाने उचंबळून आणण्याचे प्रसंग येत नसतील, तर तुमच्या वाट्याला दुःखी आयुष्यच येणार! सामाजिक यशावर बेतलेले जीवन हे सिद्धान्तावर बेतलेले जीवन आहे आणि असे कोणतेही जीवन हे नीरस व रूक्षच असणार.
खाऊन-पिऊन सुखी व सुदृढ अशा पुरुषाला आणि स्त्रीला जर सुखी व्हायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. प्रथमदर्शनी त्या परस्परविरोधी वाटू शकतात, पण त्या तश्या नाहीत. पहिली अशी, की आयुष्याच्या मुख्य प्रयोजनाची नीट बांधीव चौकट असली पाहिजे. दुसरे म्हणजे खेळ किंवा क्रीडा हाही सुखाचा आवश्यक घटक आहे हे जाणले पाहिजे. खेळ म्हणजे काय? कुठलेही गंभीर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्हे तर निव्वळ गम्मत म्हणून आपण ज्या गोष्टी करतो, त्यांना म्हणायचे खेळ. आपल्या मनात सातत्याने उठणाऱ्या (उदा. कुटुंब आणि कामधंदा ह्याच्याशी संबंधित) ऊर्मीची व्यवस्था लावण्यासाठी बांधीव चौकट आवश्यक आहे. कुटुंब जर तुम्हाला नकोसे व काम वैतागवाणे झाले असेल, तर त्या दोहोंमधूनही तुम्हाला सुखप्राप्ती होणार नाही; पण ह्या त्रासदायक भावना जर अगदी सततच्या नसतील, तर अधूनमधून त्या ‘सहन’ करण्यास काहीच हरकत नाही. ह्याचीच दुसरी बाजू अशी, की मिळेल तेव्हा खेळण्याची संधी घेतली, तर त्या सतत सतावणारही नाहीत.
सुखाचा व आनंदाचा संपूर्ण विषय खूपच गंभीरपणे घेतला जातो हीच त्यातली खरी भानगड आहे. जीवनविषयक तत्त्वज्ञान किंवा धर्म म्हणून काही असल्याशिवाय कुणीच सुखी होऊ शकत नाही, असे मानले जाते. क्वचित चुकीच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे एखादा माणूस दुःखी झाला, तर त्याला त्यातून सावरण्यासाठी अधिक चांगल्या जीवन-तत्त्वज्ञानाची गरज भासू शकते. कोणी आजारातून उठत नसेल तर त्याला शक्तिवर्धक देणे ठीक आहे. पण सामान्यतः माणसाने शक्तिवर्धकाशिवाय स्वस्थ व तत्त्वज्ञानाशिवाय सुखी राहिले पाहिजे. ह्यासाटी लागणाऱ्या गोष्टी अगदी साध्या आहेत. आपल्या पत्नीच्या व मुलांच्या सहवासात ज्याला आनंदातिरेकाचे क्षण गवसतात, शिशिर वसंताचा पाठशिवणीचा खेळ चंद्र-सूर्याचा लपंडाव ज्याचे मन उल्हासित करतात, असा माणूस आनंदात राहणारच. मग त्याचे जीवन-तत्त्वज्ञान काहीही असो. याउलट जर त्याच्या मनात पत्नीविषयी नावड असेल, मुलांचा गोंगाट त्याला असह्य वाटत असेल, कामाचे ठिकाण हे दुःस्वप्न बनून अवतरले असेल, दिवसा जो रात्रीची वाट पाहत असेल आणि रात्री कधी एकदाचे उजाडते’ ह्या विचाराने अस्वस्थ होत असेल, त्याला गरज कशाची आहे? नव्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची की सुदृढ दिनचर्येची? अधिक पोषक आहार-अंगमेहनत-व्यायाम-खेळ आणखी असेच काहीबाही. मानव हा एक प्राणी आहे आणि त्याचे सुख हे त्याच्या चिंतनापेक्षा शरीरस्वास्थ्यावर अधिक अवलंबून आहे. हा अगदी साधासा निष्कर्ष आहे. परंतु मला तरीत्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. दुःखात बुडालेले व्यावसायिक त्यांच्या तत्त्वज्ञानात (किंवा मद्याच्या मात्रेत) बदल करण्यापेक्षा दिवसाकाठी सहा मैल चालले, तर सुखाच्या अधिक जवळ पोहोचतील. ह्याच कारणासाठी थॉमस जेफरसनने घोडा नापसंत केला. त्याने जर मोटर कारची कल्पना केली असती तर त्याची बोलतीच बंद झाली असती.
३०३ स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM, मुंबई-आग्रा महामार्ग, तापी काठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे 425405.