कोवळे, शेंदरी कवडसे आधी आले. त्या लोभस उन्हात कवडेही ‘जगायला’ उतरले. त्यांना दाणे हवे होते आणि पाणी तर लागणारच होते. आम्ही त्यांच्या दाण्यापाण्याची सोय करू, करतोच, पण आम्हाला महागाई कणाकणाने फस्त करते आहे. त्याचे काय? येस्-फेस् करत, फेसबुकवर खिदळत, गुण उधळत जवान लोक सोन्यासारखा दिवस वाया घालवतानाही दिसतात. त्यांचे कुठे वनराईकडे लक्ष आहे? राईत देव नसेल, तर तिचे रक्षण कोण करेल? देव आहे असे मानावे तर अनाचाराचे अनार थुई थुई करतानाच दिसतात. आसपास त्या चटकचांदण्याच चमकते तुषार उडवत असतात. सणाचा धूरही विषारीच आहे.
‘डार्क एनर्जी’ चे विश्वरहस्य म्हणजे तुमचा-आमचा देव नव्हे. अगदी मुळात शिरून कण-कण शोधून काढणे असा तो शोध-बोध आहे.
तात्पर्य, भ्रष्ट व्यवस्थेत देव कुठेच नाही! ईश्वर अस्तित्वात नाही ही जाणीव शरद बेडेकरांसारख्या किंवा डॉ.शरद अभ्यंकरांसारख्या मराठी विचारवंतांना, जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञांना, नरेन्द्र दाभोलकरांसारख्या समाजकार्यकर्त्यांना, कुमार केतकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांना, श्रीराम लागूसारख्या अस्सल नटांना, श्याम मानवांसारख्या प्राध्यापकांना, आशुतोष मुळ्येसारख्या डॉक्टरांना, महर्षि कर्त्यांसारख्या शिक्षणश्रेष्ठींना, आगरकरांसारख्या सुधारकांना…. विचार करून मग आचार ठरवणाऱ्या अनेक सज्जनांना झाली. त्यांनी ती वेळोवेळी जाहीरपणे प्रकट केली. किर्लोस्करांसारखे उद्योजकही त्यात होते. विद्या बाळांसारख्या संपादिकाही तसे थेट सांगतात. मृणाल गोऱ्यांसारख्या नेत्याही काही मानत नसत. शहीद भगतसिंग या क्रन्तिप्रवण देशभक्ताची तर ‘मी नास्तिक का आहे’ ही पुस्तिकाच प्रसिद्ध आहे.
या व अशा इतर अनेक तेजस्वी सत्यवाद्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझ्यावर संस्कार केले. त्यांना न भेटताच माध्यमांमधील त्यांची अभिव्यक्ती, भाषणे, लेख अशा गोष्टींतून मी घडत गेलो. अर्थात् वसुधा पाटील किंवा कमल देसाईंसारख्या मुंबईतील आमच्या शिक्षिका, दिगंबर पाध्यांसारखे कॉलेजातील प्राध्यापक बुद्धिवादीच होते व आहेत! मृणालताई गोरे तर अगदी शेजारीच गोरेगावात राहायच्या. त्यामुळे कर्मकांड, पूजा प्रार्थना काहीही न करता शुद्ध, स्वच्छ, साधे जीवन जगणारी भली माणसे विविध क्षेत्रांत मला बघायला मिळाली. ही ‘जिवंत पुस्तके’ मला जगण्याचे मानवतावादी बळ आणि माणसासाठी येणारी सहानुभूतीची कळ देऊन गेली. पुस्तकांइतकाच या माणसांचाही मी ऋणी आहे. नाहीतर मी स्वप्नरंजनातच रमलो असतो व देव नसतानाही जगणे, आसपासचा परिसर चागला कसा राखायचा, समाजभान कसे ठेवायचे उपद्रवमूल्य टाळून सुसस्कृतपणे कसे जगायचे ते मला कळलेच नसते.
माझ्या रोजच्या अनुभवांत संघर्षातसद्धा मला कोणतीही ‘सुपरपॉवर’ भ्रष्टाचार न करणाऱ्या माझ्यासारख्या गरीब, साध्या माणसाच्या पाठीशी उभी आहे असा प्रत्यय कधी आला नाही. ज्यांना देव मानायचा आहे, त्यांनी तो जरूर मानावा आणि धीर मिळवावा, पण मी चांगल्या माणसांचे जे आजार, छळ, यातना, वंचना, शोषण अनुभवले, त्यामुळे मी सावध झालो आणि निरीश्वरवादी बनलो. उत्सवांचे मार्केटिंग, इव्हेंटमागची राजकीय चढाओढ हा आजच्या व्यवस्थेचा भाग झाला. मला वाटते की, प्रस्थापित वर्चस्व नाकारण्यासाठी एक उपजत धाडस असावे लागते. जसे ते र.धों.कर्वे यांच्याकडे होते. त्या साहसाचा काही अंश आम्हाला मिळाला याचे खरोखर समाधान वाटते!
राधा, भास्कर आळी, वसई (पश्चिम) 401201