बंजारा समाजातील ढावलो गीते

बंजारा समाजातील बहुसंख्य गीते स्त्रियांनी गायिलेली आहेत. त्यामुळे स्त्रीमनाच्या सामूहिक नेणिवेतील स्त्रीनिष्ठ अनुभवांचे पोत तपासून पाहण्याची संधी येथे घेतली आहे. जॅस मारितेनया मते, काव्याचा उगमच माणसाच्या समग्र व्यक्तिमत्त्वात आहे. तो म्हणतो, “It proceeds from the totality of the man, sense, imagination, intellect, love, desire, instinct, blood and spirit together” मानवाच्या आत्मकेंद्रात संवेदनशक्ती, कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रेम, इच्छा आणि सहजप्रवृत्ती इ.साऱ्या गोष्टी एकत्र नांदत असतात. काव्यनिर्मितीच्या वेळी या आत्मकेंद्राशी संवाद साधला जातो आणि व्यक्तीच्या सामूहिक निश्चेतनातील निगूढ भावाशय काव्यात रूपबद्ध होऊ लागतो. लोकगीतात मात्र ‘मी’ कटाक्षाने टाळलेला आढळतो. कारण त्याची निर्मिती व वस्तू यातून सूचित होणाऱ्या पवित्र आशयाशी संवाद साधीत ही अभिव्यक्ती प्रकट होत असते. त्यामुळे लोकगीते व्यक्तिगत जाणिवांपेक्षा समूहनिष्ठ भावविश्वाचे प्रतिनिधित्व करतात.
या अर्थानेच बंजारा समाजातील ढावलो गीतांतून अभिव्यक्त होणारे भावविश्व व कल्पनाबंध यांचे लोकसाहित्यदृष्ट्या विश्लेषण उपयुक्त ठरावे हा या लेखनामागचा प्रामाणिक हेतू. शिवाय येथे फक्त बंजारा स्त्रियांच्या ढावलो गीतांचाच विचार अपेक्षित आहे.
बंजारा जमात तशी हिंदू धर्माचे अनुकरण करणारी जमात आहे. असे असले तरी पण स्वतःच्या काही पृथगात्म परंपरा या समाजामध्ये दिसून येतात. असेच एक आगळे वेगळे वैशिष्ट्य बंजारा समाजातील विवाहप्रसंगी दिसते.
बंजारा स्त्रिया स्वतःच्या विवाहप्रसंगी ढावलो गीते गातात. ‘ढावलो’ म्हणजे नाट्य! खोटे खोटे रडणे किंवा कृत्रिम भाव व्यक्त करून खोटे खोटे रडणे.
जगाच्या पाठीवर एकमेव बंजारा समाज असा आहे की, मुलगी सासरी जायला निघेल तेव्हा ती कशी रडते यावरून तिच्या माहेरच्या माणसांविषयीच्या भावनांचे मूल्यमापन केले जाते. तांड्याचा नायक, जन्म देणारे माता-पिता, भावंडे, सखी-सोबती या सगळ्यांना सोडून जाताना मुलीला काय वाटते हे सांगणे म्हणजे ढावलो होय. हे सांगणे किंवा रडणे तांड्यातील अनुभवी स्त्रिया मुलीला तिच्या विवाहापूर्वी साधारणतः महिनाभर आधीपासून शिकवितात. ही रडणे शिकविण्याची त्यांची प्रथा आगळी वेगळी आहे.
वास्तविक रड येणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. ते जन्मत्या मलालादेखील शिकवावे लागत नाही पण या समाजात रडणेपण कौशल्यपूर्ण असले पाहिजे त्यासाठी दिले
गेलेले प्रशिक्षण! त्यामुळेच त्यांची ढावलो गीते अत्यंत हृदयस्पर्शी आहेत..
बंजारा ही भटकी जमात असल्यामुळे मुलीचे लग्न झाल्यावर तिची आपल्या आई वडिलांची, भाऊ-बहिणींची, सख्या-शेजारणींची कधी भेट होईल याची निश्चिती नसल्यामुळे या समाजात मुलीचे लग्न म्हणजे जणू तिचा मृत्यूच झाला असे समजतात. त्यामुळे लग्नाची घटना तिच्या लेखी स्वर्गीय आनंदाच्या स्वप्नासारखी नसून माहेरचे मायेचे भावविश्व संपत आल्याचे दुःख अनावर करणारी असते. तिचा हट्ट पुरविणारे माता-पिता, जिवापाड प्रेम करणारे बंधू-भगिनी हे माहेरचे विश्व सोडून जाताना तिला मरणप्राय यातना होतात. या सुखद अनुभवविश्वाचा पुनर्लाभ मिळतो किंवा नाही याची शाश्वती नसल्याने बंजारा स्त्रियांची ढावलो गीते मन हेलावून टाकणारी आहेत.
ढावलो गीतांचे काही नमुने –
आईकरिता ढावलो:
“येऽऽ याडी हंऽऽ हिय्या
ये मार याडी येऽऽऽऽऽ
ये चांदा सुरयारी जोडी ज्यु आपणी हं हिय्या
ये याडी येऽऽऽ
किडा मुंगी सपाती, ज्यु तमार बेटी कोणी सपाती
लिंबू नारळ वक ज्यु तमार बेटी वक चाली
ये याडीऽऽऽ ये तमार बेटी वक चाली
आंग-आंग देखु छु तो डर लागे ये
लार-लार देखु तो मन लागे लागे छ ।’ 1
आईच्या गळ्यात पडून ती जोरजोरात रडते, आणि आईला एक जाब विचारते, ‘आई, चंद्र-सूर्याप्रमाणे आपल्या दोघांची जोडी होती. तुझ्या घरात किडा-मुंगीसारख्या कीटकांनासुद्धा राहता येते पण मीच राहू शकत नाही. मी तुम्हाला एवढी जड झाले का? की तुम्ही माझा लिंबू- नारळासारख्या वस्तूप्रमाणे सौदा केला. आई मला तुम्ही खाऊ पिऊ घालून मोठे केले आणि मी आता मोठी होऊन तुला कामात मदत करण्यास योग्य झाली तर तू मला दूर का पाठवते. माझे पालनपोषण तुम्ही करायचे आणि सुख दुसऱ्याने उपभोगायचे हा कोणता न्याय आहे?’ तिच्या या प्रश्नांना कोण उत्तर देणार? सगळीकडे तीच परिस्थितीत आहे.
मुलीचे दुःखभरित बोल ऐकल्यावर पित्याचे डोळे भरून येतात. ती अत्यंत धीराने व समजूतदारपणाने बापाचे अश्रू पुसत म्हणते –
बापूकरिता ढावलो:
रांगो जु नव जु नवीन रुपो जु तप जु तपीव
सुईर नाके माईती निकळीवरे
ता-भा तमन ओळाम कोणी ओ दू
माझ्या प्रिय बापू! तुम्ही रडू नका. मी माझ्या पुढील जीवनात रांगो धातूप्रमाणे तप्त चांदीप्रमाणे संसाराच्या दुःखात तावून सुलाखून निघेन, आणि वेळ आलीच तर संसाररूपी सुईच्या छिद्रातून मी दोरा बनून निघून दाखवेन. पण आपल्या कुळाला, तुमच्या नावाला काळिमा लागू देणार नाही.
भावासाठी ढावलो:
हळदीरो टिको मत लगा वो रे वीरा
चंदनेर होतो झेलू ये या हूऽऽ
आणे उभे बापरे जिकाये भरमाये वीरेणा
हळदीरो टिको मत लगा वो रे वीराऽऽ
हे माझ्या लाडक्या भावा, पित्याच्या सांगण्यावरून तू मला हळदीचा टिका लावू नकोस. तू हळदीचा टिका लावशील तुझी लाडकी बहीण परक्याची होईल. म्हणून तूच मला चंदनाचा टिका लावून परक्याचे धन होण्यापासून वाचवू शकतो. हे माझ्या लाडक्या भावा नाहीतर असे कर, तू मला तुझ्या पगडीच्या पदरात (पेचात) लपवून ठेव. म्हणजे माझा विवाह होणार नाही.
करंजणी ढावलो:
करंजणी तु ही कवारी, म ही कवारी
तु बेठी आंबीयारे डाल
म बेठी मार बापूर हवेली
तु करल तितर जेवी, मार बेनडी रे”
ती कोकिळेला विनंती करते, कोकिळे तू आंब्याच्या डहाळीवर बसून छान गातेस. पण तू जर खरी गायिका असशील तर माझ्यासाठी तू ‘तितर’ पक्ष्याचा आवाज काढ. थोरा मोठ्यांना वाटेल अपशकुन झाला. मग ते माझे लग्न करणार नाहीत.

देजूसाठी ढावलो: (हुंड्यात दिला जाणारा बैल)
बंजारा समाजात मुलीच्या विवाहप्रसंगी जो हुंडा दिला जातो ते एका बैलावर ठेवतात. तो बैल मुलीच्या हुंड्याच्या संपदेसोबत पाठविला जातो. त्याला देजू असे म्हणतात. हा देजू विवाहापूर्वी हरवला. पळून गेला तर अपशकुन मानला जातो. आणि मुलीला बैल सापडेपर्यंत सासरी नेत नाही. म्हणून देजूचे काळजीपूर्वक जतन केले जाते. त्या देजूला उद्देशून ती म्हणते,
रासडी तो तोडण करिया या घाट जोर लोल
तो यु तो छुटो करिया नवलक बालदार लोल
तोन पावे पेनादू केसरिया पावटीरो लोल
शिंगे मडादू रे केसरिया सिंगडीरे लोल
देजू माझ्या लाडक्या भावा तू हा दोर तोडून पळून गेलास तर मी तुझ्या चारही पायांत चांदीचे पैंजण घालीन आणि तुझ्या शिंगांना सोन्याच्या शिंगड्या घालीन. पण तू पळून जा. म्हणजे अपशकुन घडेल आणि मला माता-पित्याच्या घरी राहावयास मिळेल.

सप्तपदीच्या वेळी म्हटले जाणारे ढावलो:
“ए भुरेरे बामणेरा लडका
य चालू तमारी गोवी गडरे बामणे रे लडका
धुपे पडे रे, पगला जळरे, मार बापू रे
मारिया वीरेणा, केसरिया वीरणा” ..
ए, गोऱ्या गोऱ्या ब्राह्मणाच्या मुला तू विवाहमंत्र हळू हळू म्हण, म्हणजे ही रखरखत्या उन्हाची दुपार टळेल. रात्र होईल म्हणजे माझा एक दिवसाचा येथील मुक्काम वाढेल. आणि तू घाईने मंत्र संपविले तर या रखरखत्या उन्हात माझ्या पायांना फोड येतील. तेव्हा तू मंत्र एकदम सावकाश म्हण!

तांड्यासाठी ढावलो:
ज्या तांड्यात ती लहानाची मोठी झाली त्या तांड्याला, घराला सोडून जाताना किती तरी आठवणी मागे टाकाव्या लागणार आहेत. पुन्हा हा तांडा, तांड्यातील गोतावळा, नायक बापू दैव योग असेल तरच भेटतील. नाही तर उरतील फक्त आठवणी! या वियोगाने ती आपली हवेली सोडून जाताना ढावलो करते.
ये मार बापुरी हवेलीऽऽऽऽ छुट चाली येऽऽ याऽऽ हू
ये बापू तार राजम आछ खादी रे
ये आछ पिरदी येऽऽऽ बीपूरे
मारे वीरारे हात उंचे राख
आंग आंग देखू तो काटे , दगड हेऽऽऽ
लार लार देखू तो भर-भर लागे ये
ये मार बापूरी हवेली छुट चाली येऽऽऽ2
माझ्या माता-पित्याच्या हवेलीचे वर्णन काय करू? वर आठ ताल आहेत आणि खाली आठ मजले आहेत. हवेलीला सोळा दरवाजे आहेत. त्यातील एक खिडकी जरी उघडली तरी लवंग, वेलदोड्याचा सुंदर सुगंध येतो. अशी हवेली सोडून जाताना मला अपार दुःख होत आहे.
बापू तुमच्या राज्यात मी चांगले खाल्ले-प्याले पण आता भविष्यात मला काटे कुटे, दुःखरूपी अंधार समोर दिसत आहे. हे परमेश्वरा! माझ्या भावाला भरभरून धन दे! म्हणजे तो सदोदित दुसऱ्याला मदत करेल.

मैत्रिणीसाठी ढावलो:
“ये मारी साथेले येऽऽ हियाँ
पाणीनं जातीथीं दोई येऽऽऽ
एके पाने में दोई खाती येऽऽऽ साथेली ये”
सखे, आता तुझी आणि माझी जोडी फुटणार, आपण दोघी बरोबर पाणी भरण्यास जात होतो. दोघी एकाच ताटात जेवत होतो. पण आता मी दूर देशाला चालले. सखे आपली जोडी तुटली.

सासरी गेल्यानंतरची ढावलो:
माथो छोडेर ढावलो (वेणी घालतानाचे ढावलो) माना
“ये मार याडी रो हातेरो सात झालेरियारो माथो
मत छोडो ये मार याडी येऽऽ
मार भावजेरो दुधो धोयो माथो
मतज छोडो ये मार भावजय रे”
विवाह झाल्यानंतर स्त्री सासरी जाते, तेव्हा स्नानाच्या वेळी तिच्या वेण्या सोडतात. तेव्हा ती वेण्या सोडू देत नाही. जोरजोरात रडते. माझ्या आईने घालून दिलेल्या वेण्या आहेत. माझ्या वहिणीने दुधासारखे स्वच्छ माझे डोके धुतले होते. त्यांची आठवण म्हणून माझ्या वेण्या सोडू नका.

सौभाग्यालंकार परिधान करतानाचे ढावलो:
स्नानानंतर स्त्री सौभाग्यालंकार चढवितात तेव्हा ती मोठ्याने गळा काढून रडते.
‘मत ज घालो ये मारुण भावज
मार नाक गडचये । फुली गडचये बाई येऽऽ’
बायांनो मला ती घुगरी घालू नका. तिची नाके माझ्या कपाळाला काट्यासारखे टोचतात. त्या चुंडोचा भार माझ्या मानेला पेलवत नाही हो आणि ह्या हातभर बल्या त्यांचे वजन हातांना सहन होत नाही. पायातील पट्टा, पोडा, पागडी, बिचवे, पैंजण, अंगुटली यामुळे पायाला जखमा होत आहेत. बायांनो माझ्यावर दया करा. इतक्या दागिन्यांचा भार मी सहन करू शकत नाही.
बंजारा समाजातील स्त्रियांची ढावलो गीते अभ्यासल्यावर असा निष्कर्ष काढता येतो की, ‘पुरुससत्ताक समाजरचनेतील स्त्रीमनाच्या दुःखाची विलापिका’ हे या गीतांचे मध्यवर्ती आशयविश्व आहे. म्हणूनच सौंदर्य वाढविणारे दागिनेही तिला बंधनकारी वाटतात. त्यांचा तिला भार वाटतो. आपल्या एका गीतात त्या म्हणतात,
बाईये कडू कसालेरी मंथीर भाजी
घरेम खाजो केणी मत केजो
बाईये आंठरी बोजा,
बाईये चुंडोरो शोभा
बाईये असो कसो मार पतीरो शोभा
मेथीचा हा कडू घास त्या गोड मानून घेतात. अर्थात कोणाला सांगून काय उपयोग?
ढावलो म्हणजे खोटे रडणे असा अर्थ आपण बघितला असला तरी हे फक्त प्रशिक्षणापुरते! प्रत्यक्षात जेव्हा मुलगी सासरी जायला निघते तेव्हा संपूर्ण तांडा शोकाकुल झालेला असतो. त्यावेळी तिचे रडणे, तिचा शोक, तिची पीडा, तिच्या भावना, तिचा अनुभव खोटा आहे असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोणीही करू शकणार नाही. कारणही गीते करुणरसाचा परमोच्च बिंदू गाठणारी आहेत.
गोर बंजारा नववधूचे आणखी एक विशेष सांगायला हवे. बैलाच्या पाठीवर सुंदर भरतकाम केलेले गोणपाट टाकतात. बैलाला खूप सजवतात आणि त्यावर उभी राहून बंजारा वधू आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने ठेवून, मान खाली घालून रडत रडत ही गीते म्हणते. थोडक्यात सांगायचे झाले तर वधूची बैलाच्या पाठीवरून वरात काढण्याची प्रथा जगाच्या पाठीवर बंजारा समाजव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही दिसत नाही. असे बैलावर उभे राहून आपल्या तांड्याला, तांड्यातील घराला, घरातील व्यक्तींना शेवटचा सलाम” करून ढावलो करते तेव्हा संपूर्ण तांडा रडतो. त्यावेळचे ढावले असे –
तारे पगला पैंजण, मार पग बेडी.
तोर मारो हातेरो, छेटो वेयेर आवगी
मडगी नेठा वतो देखल, मुक व तो बोलले
हात वेतो सेन करल, मडगी गाऽऽऽऽऽऽऽ
मडगी म्हणजे पित्याचे घर – ती आपल्या पित्याच्या घराचे शेवटचे दर्शन घेत म्हणते. हे घरा माझा विवाह झाला या खशीत तुझ्या पायात पैंजण असतील पण तला खरेच डोळे असतील तर बघ माझ्या पायात बेडी पडली आहे. तुझ्या माझ्यातील अंतर आता हातभर आहे. थोड्या वेळात हे अंतर वाढत जाईल आणि मी कायमची तुझ्यापासून खूप दूरवर जाईन. तेव्हा तुला हात असतील तर मला आशीर्वाद दे. तुला डोळे असतील तर मला शेवटचे डोळा भरून बघून घे. तुला मुख असेल तर पोटभर माझ्याशी बोलून घे. पुन्हा आपली भेट केव्हा होते हे परमेश्वरालाच माहीत.
अशी अनेक ढावलो व हवेली गीते आहेत. या गीतांचे आणखी एक विशेष म्हणजे या गाण्यांना कोणत्याच वाद्यांची साथ नसते. नववधूच्या रडण्याच्या सुराबरोबर इतरांचे । रडण्याचे सूर हेच वाद्याचे कार्य करतात. कोणती नववधू तांड्यातील लोकांना रडविते हेच तिच्या रडण्याचे कौशल्य असते. त्यासाठीच तिला प्रशिक्षण दिले जाते. पण हे प्रशिक्षण लग्न ठरल्यावरच असते. त्यापूर्वी रडे शिकविले तर अपशकुन मानला जातो.
आता प्रश्न हा उद्भवतो की, आज ही बंजारा समाजात ‘ढावलो’ केले जाते का? रडण्याचे प्रशिक्षण दिले जाते का याचे उत्तर हेच की, आता तांडा पद्धत राहिली नाही. त्यांच्या लदेणी अवस्थेबरोबरच ढावलो ही परंपरा संपली. जुन्या पिढीबरोबर त्यांची ही अनिष्ट परंपरा संपली. उरला फक्त विवाह समारंभातील विधी. कारण बंजारांची जीवनपद्धती बदलली म्हणून लोकगीतेही बदलली. दुःख मात्र संपले नाही. आजही बंजारा स्त्रियांना कष्ट, उपासमार, अज्ञान, अंधश्रद्धा, कुटुंबातील दुय्यम स्थान, शिक्षण यासाठी लढा द्यावाच लागत आहे. व्यसनाधीनतेला कंटाळल्या आहेत. दारूबाज, बाहेरख्याली, जुगारी नवऱ्याला विटल्या आहेत. म्हणून आक्रोश करून ती एक जात्यावरचे गीत गाते –
“काचन की लोचनी चाय बनायी
तम पिओ मत पिओ तमार मरजी
मेरे दिलसे उरणे कहाँ भी चले जाव
मेरे मनसे उतरगे कहाँ भी चले जाव
पिले पडगे पान तमाकू नयी रतमा
मारो ढोला रंडीबाज वो नही बसमा”
यासारखी गीते ढावलो गीतांना जवळ जाणारीच गीते आहेत. आणि मग असा निष्कर्ष काढणे भाग पडते. ज्या समाजात आजही ‘स्त्री’जन्माचा कोणताच विधी, उत्सव नाही, तिच्या जन्माचा आनंदसोहळा नाही तिचा आक्रोश, दुःख, वेदना, स्त्री-जन्माचा पश्चाताप, स्त्री-जन्म म्हणजे पाप ह्या भावना लोकगीतातून आविष्कत होताना दिसतात. पुरुषसत्ताक समाजरचनेत विवाहापूर्वीचे स्त्रियांचे अनुभवविश्व हे पौगंडावस्थेतील असेलही नंदनवनाप्रमाणे असेलही पण विवाहानंतरच्या बहुसंख्या स्त्रियांच्या जीवनाला फक्त मरणाचा गडद रंग असतो. त्यामुळेच बंजारा लोकगीतातील बहुसंख्य स्त्रीगीतांना विलापिकेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचे मुख्यकारणही पुरषसत्ताक समाजरचना, अनिष्ट रूढी, परंपरा हेच सांगता येईल, ही समाजरचना जेव्हा बदलेल तेव्हा खऱ्या अर्थाने ढावलो गीतांचा अंत होईल. आज तरी असेच म्हणावे लागेल ही विवाहसंस्था स्त्रीचे मनोविश्व फुलवायला कशी असमर्थ आहे हे मी नव्हे तर हे ह्या गीतांवरून अधोरेखित होते.
संदर्भ:
1) राठोड मोतीराज – तांडा संस्कृती – अस्मिता प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठ-22.
2) चिखली – कानडी येथील बंजारा तांडा.
3) करगाव तांडा, चाळीसगांव.
मराठी विभागप्रमुख, पु.सा.गु.वि.प्र.मं., शहादा, ता. शहादा, जि. नंदूरबार

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.