राजकीय संदर्भात ‘सेक्युलॅरिझम’चा इहवाद हा सरळ अर्थ घेऊन, कायदे बनविताना कोणत्याच संप्रदायाचा आधार न घेणे आणि नागरिकाचा संप्रदाय कोणता या आधारावर कोणताही भेदभाव न करणे, अशा स्वरूपात हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. त्याऐवजी सर्वधर्मसमभाव हा संभ्रम वाढवणारा शब्द रुळला आहे. कोणताही जमातवाद हा ‘बाहेरच्यां’चे अधिकार नाकारणारा समूहवाद असतो व म्हणून त्याज्य असतो असे न मानले जाता अल्पसंख्य/बहुसंख्य यांच्यात समूहवादी ‘समता’ आणण्याच्या भरात जमातवाद चालूच ठेवले गेले. यावरून जे राजकीय वाद आहेत ते ह्या लेखाच्या विषयात घेतलेले नाहीत.
व्यक्तीने स्वतः न निवडलेला संप्रदाय कुटुंबात शिकविला जातोच. यातून थोपल्या गेलेल्या विविध ‘आस्तिकता’ व्यक्तीलाच स्वतःच्या जीवनसरणीत सामावून घ्याव्या वा बदलाव्या वा नाकाराव्याही लागतात. परंतु कडकडीत इहवादी बनणे हे सर्वांना जमतेच असेही नाही आणि कडकडीत इहवादी जीवन हेच सर्वोत्तम मानवी जीवन असते असे खात्रीने म्हणता येते असेही नाही. सर्वच आस्तिकता या माणसाला सारख्याच प्रमाणात चांगले बनविणाऱ्या किंवा वाईट बनविणाऱ्या असत नाहीत. त्यामुळे विविध आस्तिकांना वस्तुनिष्ठ आधार कितपत आहे यापेक्षा त्यांचा मूल्यात्मक अर्थ काय होतो हा प्रश्न जास्त निकडीचा ठरतो. नैतिक इहवाद म्हणजे काय? जडवाद हा नैतिक-इहवादी बनण्याचा एकमेव मार्ग आहे काय? वस्तु-स्वरूप-मीमांसा (मेटॅफिजिक्स) जडवादी नसतानाही नैतिक-इहवादी भूमिका असू शकते काय? हे प्रश्न आपण विचारार्थ घेत आहोत.
नैतिक-इहवाद ही दृष्टी स्पष्ट होण्यात इहवादाला चिकटून येणाऱ्या इतर वादांमुळे बऱ्याच अडचणी येतात. हे चिकटून येणारे वाद महणजे जडवाद, एकायामीकरणवाद (रिडक्शननिझम), सुखवाद (हेडोनिझम), उपयुक्ततावाद (युटिलिटेरियनिझम), बाह्य प्रत्यक्षवाद (पॉझिटीव्हिझम), साधनमात्रवाद (इन्स्ट्रमेंटालिझम), विज्ञान-सर्वंकषता (सायन्स रॉल रिप्लेस ऑल फिलोसॉफी), अहंकेद्री-नीतिशास्त्र (इगोइस्टिक एथिक्स) इत्यादी. यांपैकी अनेक ‘वाद’ इहवादाला अनावश्यकपणे व (व इहवाद्यांच्या काही चकांमुळेही) चिकटलेले आहेत. त्यामुळे इहवादी भूमिका घेतली तर मोठेच काहीतरी अंगलट येईल अश्याही अनेक चिंता आहेत. “मानवकेंद्रिततेतून उन्मत्तताच येते. पवित्र अधिष्ठानाशिवाय नैतिकता टिकत नाही. सुख मिळेल, यश मिळेल पण शांती कशी मिळेल? मानवी तर्क बुद्धीच्या मर्यादांचे नेमके काय करायचे?” या व अशा चिंतांमुळे ‘इहवाद’ स्वीकारायला कित्येकजण धजावत नाहीत.
दुसरीकडे माणसाला ‘आत्मिक स्वरूपाचे काही प्रश्न असतात हे मान्य केले रे केले की इहवाद बाटलाच (!) म्हणून समजा, असाही एक धसका आहे. आत्मिक-साधना ही संस्थात्मक-धर्म-सम्प्रदायांकडेच नेईल ही भीती; ती साधकांना कोणते ना कोणते ‘पारलौकिक’ मानायला भाग पाडेल ही भीती; मानव-कृत न्यायाचे महत्त्व वाटण्यासाठी व टिकण्यासाठी जडवादीच असावे लागते हा अपसमज, वैराग्य, कर्तृत्वशून्यता, बुळचट अहिंसा हे आत्मिक-दृष्टीचे अपरिहार्य परिपाक असतात अशी एक उगाचच/किंवा काहीशी साधार खात्री, इत्यादी गोष्टींमुळे ‘आत्मिक’ हा शब्द वापरायलासुद्धा कित्येकजण बिचकतात.
खरे तर इहवाद ही प्रामुख्याने एक व्यापक नैतिक भूमिका आहे. तिच्यात स्वातंत्र्यवादी, समतावादी, इहवादी-समूहवादी, उपयुक्ततावादी अशा अनेक नीती समाविष्ट होऊ शकतात. या नैतिक भूमिकेसाठी एक विशिष्ट (विशेषतः जडवादी) सद्वस्तुमीमांसा मान्य करणे अनिवार्य असते अशी कित्येक इहवाद्यांची ठाम समजूत असते. त्यामुळे सद्वस्तुमीमांसेच्या अंगाने जडवादी नसणाऱ्याना, अगोदर जडवादी बनविल्याखेरीज ते त्यांची ‘अन्-इह’वादी नैतिक भूमिका बदलायला तयार होणार नाहीत, असे गृहीत धरून वादविवाद झडतात व ते सद्वस्तुमीमांसेच्या प्रांगणात शिरतात, पण कित्येकदा ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म वगैरे मानणारे हे नैतिकदृष्ट्या इहवादी असू/बनू शकतात. (कसे ते पुढे मांडणार आहे.) हे संभाव्य नैतिक-इहवादी जडवादाला बिचकून विनाकारण नैतिक इहवादापासून दूर ढकलले जातात. अशा त-हेने नैतिक इहवादी लोक विनाकारण आपले मित्र गमावतात व एकटे पडत जातात यामुळे नैतिक-इहवाद पसरावा हे त्यांचे उद्दिष्ट अधिकच असफल होते व अवघड होऊन बसते.
इहवाद नावाचे एक संपूर्ण दर्शन आहे वा मांडले गेलेले आहे अशातला काही भाग नाही. इहवाद ही मुख्यतः एक नैतिक भूमिका आहे व तदनुषंगिक राजकीय भूमिकाही आहे. त्यांपैकी नैतिक भूमिका या लेखात प्राधान्याने लक्षात घेतलेली आहे. ही नैतिक भूमिका विविध दर्शने वा दर्शन-शास्त्रे आधाराला घेऊ शकते. पण असा आधार घेताना कोणते तरी दर्शन संपूर्णपणे मान्य करावे लागते असे काही नाही. इहवादाला प्रस्तुत ठरेल असा अंशच घेता येतो.
जे अगोदरच इहवादी आहेत त्यांना एकमेकांशी बोलताना समाईक-संज्ञाव्यूह (डिसकोर्स) सापडणे सोपे जाते. परंतु स्पष्टपणे इहवादी म्हणून घेणारे लोक फारच थोडे आहेत. त्यांनी एकमेकांशी बोलताना कसे बोलावे यापेक्षा त्यांनी ‘अन्-इहवाद्यांशी’ कसा संवाद साधल्यास नुसतीच तणातणी न होता हा संवाद विधायक होईल व इहवाद्यांचे खरेतर कोणालाही पटण्यासारखे असे नैतिक आवाहन अन्-इहवाद्यांपर्यंत कसे पोहोचेल व अन् इहवाद्यांच्या मनाला कसे भिडेल हा खरा प्रश्न आहे. तसेच ‘अन्-इहवाद’ हेदेखील, एकच एक शुद्ध आणि संपूर्ण दर्शन म्हणून कोणाकडेच उपलब्ध नसते. किंबहुना सामान्य माणसाला दर्शन-शास्त्रीय शिस्त पाळण्याशी फारसे देणे-घेणे नसते. त्याला मिळालेले ‘संस्कार’ व तुरळक सुटे सुटे विचार एवढ्याच सामग्रीनिशी आणि त्याच्या संदर्भवर्तुळात तो विशोभित न ठरण्याची त्याची मानसिक गरज घट्ट पकडून तो त्याच्या जीवनप्रसंगांचा अर्थ लावत वा जीवनप्रसंगांना अर्थ देत जगत असतो. त्याला बिचकवून दूर लोटण्याने कट्टर इहवाद्याला आपण कसे कट्टर राहिलो याचे समाधान मिळते पण इहवादाचा ‘प्रकल्प’ अजिबात पुढे सरकत नाही; कदाचित मागेच सरकतो. याकरिता इहवाद्यांना आपल्या आस्थेमधील गाभ्याचे मुद्दे कोणते आणि चिकटून आलेले अवांतर मुद्दे कोणते हे स्पष्ट असायला हवे. तसेच शब्द कोणता वापरला ह्यापेक्षा भाव कोणता व्यक्त झाला यावर त्याने भर द्यायला हवा. आपले नैतिक मत, जर ‘अनिहवाद्याला’ (खरे तर अन्-इह-अ-वाद्याला, कारण बहुतेक वेळी हा तसा वादीबिदी नसतोच) पटणार असेल, तर नैतिक इहवाद्यांना सहसा न आवडणाऱ्या परिभाषेत जरी ते पटले तरी निदान सुरुवात तरी चांगली होईल. म्हणूनच प्रथम इहवादाचे नैतिक आस्था-विषय कोणते हे नोंदवून घेऊया.
इहवाद्यांचे नैतिक आस्था-विषय
1) जबाबदारी टाळणारा पलायनवाद नको.
2) जीवन-विरोधी व आपले ‘मानव असणे’ हेच कलंकित ठरवणारे वैराग्यवाद नकोत.
3) सफल ठरणारे उपाय बाजूला पडून भ्रामक उपायात अडकायला नको.
4) कुलाधष्ठित असे विशेषाधिकार (प्रीव्हीलेजेस) व विशेष-कर्तव्ये (बर्डन्स) कोणालाही मिळता कामा नयेत.
5) कोणाचाही ज्ञान-दावा हा कोणालाही पडताळणीय असायला हवा. म्हणजे दरवेळी पडताळणी केली पाहिजे असे नाही पण पडताळणी केली जाऊ शकते याचा धाक दावेदारावर असायला हवा.
6) जे ज्ञान फक्त विशेष व्यक्तींना होऊ शकते त्याचा उपयोग समाईक ज्ञानासारखा सर्वांसाठी म्हणून करता येऊ नये.
7) कोणतेही मत किंवा उपदेश हा (विनम्रपणे का होईना पण) आह्वाननीय असला पाहिजे.
8) कोणत्याही व्यक्तीला तिचे मत वेगळे आहे एवढ्यावरून बहिष्कृत वा प्रताडित करण्याचा अधिकार समूहाला वा समूहाच्या प्रतिनिधींना असता कामा नये.
9) प्रथा व आह्निके यांचा व्यावहारिक वा प्रतीकात्मक अर्थ स्पष्ट असायला हवा. या अर्थांमध्ये नीतिदृष्ट्या आक्षेपार्ह नेमके काय आहे हे कळून त्यात बदल करण्याचा अधिकार लोकांना असायला हवा.
10) कोणत्याही व्यक्तीचा ‘आध्यात्मिक’ अधिकार हा तिला सर्वच विषयांत अधिकारवाणीने बोलण्यास मोकळीक देणारा ठरता कामा नये व आदेश देण्याचा अधिकार तर त्यामुळे नक्कीच मिळता कामा नये.
11) श्रद्धा वाटणे/बसणे आणि श्रद्धा ठेवण्याची सक्ती असणे यांतला फरक स्पष्ट व्हावा व विरोध हा सक्तीचा असायला हवा. जी श्रद्धा आपल्याला इतरांवर सक्ती करण्याचा अधिकार किंबहुना कर्तव्य देते ती श्रद्धा लादणूकवादी आणि म्हणूनच त्याज्य मानली जायला हवी. एकूणच श्रद्धांचे मूल्यमापन हे त्या नीतिदृष्ट्या कोणत्या प्रकारची कृत्ये करायला प्रवृत्त करतात यावरून व्हावे, श्रद्धा-विधानांच्या तथ्यात्मक सम्भवशीलतेवरून (फॅक्ट-क्लेम-प्रॉबेबिलिटी) नव्हे.
12) सत्कृत्ये ही दुष्कृत्यांना कॅन्सल-आउट करतात असे मानणे हे युटिलिटेरियन (एकूण बेरीज धन आली की झाले) असले पाहिजे.
13. मानवकृत न्यायात सत्कृत्ये वा दुष्कृत्ये ही ह्या (म्हणजे स्मरणात असलेल्या) जन्मीचीच जमेस धरता येतात. काव्यगत न्याय हे काव्यगत म्हणूनच सांत्वनपर ठरू शकतात त्यावर दावा सांगता येत नाही हे स्पष्ट असले पाहिजे.
14) माणसांचे (वा जमल्यास इतर जीवांचेसुद्धा) हित साधणारी कृत्ये ही पुण्य-प्रद वा ईश्वरनिष्ठा व्यक्त करणारी असतात असे मानले तर चालेल पण याउलट धर्मगुरूंनी सांगितल्यानुसार औपचारिक आविर्भाव (जेस्चर्स) केले की सत्कृत्य झाले मग माणसांशी (वा जमल्यास…….) कसेही वागा ही वृत्ती ‘धार्मिक’ म्हणून मान्यताप्राप्त होऊ नये.
15) कोणालाही परके म्हणून अपवित्र म्हणून सैतानी म्हणून हन्य ठरविणे असा अधिकार कोणालाच असता कामा नये.
16) आपल्या ‘पारलौकिक उपलब्धी’च्या/शुभतेच्या खुणा या ‘या’ जगात दिसल्या पाहिजेत. म्हणजे एकुणात ‘निश्रेयस-स्कीम’ ही ‘अभ्युदय-लिंक्ड’ असली पाहिजे.
वरील सूची ही नैतिक इहवादाच्या कोणा एका अधिकृत पीठाने जाहीर केलेली आहे असे अजिबात नाही. किंबहुना असे एकमात्र ‘पीठ’ असणे हेच नैतिक इहवादात न बसणारे आहे. मी स्वानुभवावरून व इतर नैतिक-इहवाद्यांची खरी तळमळ काय आहे हे समजावून घेत ही सूची बनविली आहे. तिच्यात फेरफार होऊ शकतात पण नैतिक इहवादी आस्थेची एकूण दिशा साधारणपणे तिच्यातून व्यक्त होत असेल अशी
आशा वाटते.
‘पारलौकिक’ मानण्याच्या गरजा: सोयीस्कर आणि प्रामाणिक
काहीवेळा चुकीच्या गोष्टींना समर्थन मिळावे म्हणून, जबाबदारी झटकता यावी म्हणून, भौतिक जगातल्या घटनांवर बिगर-भौतिक नियंत्रण मिळावे (निदान तसे वाटावे) म्हणून, दैवी शक्तींकडे वशिला लागावा म्हणून आणि आपण ‘विशेष अधिकारी व्यक्ती आहोत’ असे दाखवून चक्क सत्ता गाजविण्यासाठी व अशा अनेक ‘चतुर’ गोष्टींसाठी ‘पारलौकिक’ मानले जाते. अशा सोयीस्कर ‘पारलौकिका’वर फसवणूक करू नये ह्या साध्या तत्त्वानिशी हल्ला करता येतो व तसा केलाही पाहिजे. उदाहरणार्थ अतींद्रिय शक्ती किंवा सिद्धी यांविषयी असे म्हणता येईल की त्यांचा दावा हा ऐहिक फायदा करून देण्याचाच असतो. तंत्र-विशेषज्ञ जसे आपापल्या ग्राहकाला सेवा पुरवतात तेवढीच या दावेदारांची मजल असते. फसवणूक असेल तर ग्राहक म्हणूनही कारवाई करता येईल. दुसरे असे की होडी बनविणे इतके सोपे असताना पाण्यावरून चालण्यासाठी उग्र तप हवेच कशाला? चमत्कार दाखवून ग्राहक मिळतात, शिष्य नव्हेत. प्रभावित करून जर कोणी वैचारिक मांडणी पण खपवत असेल तर त्याला वैचारिकच खंडन हवे.पण स्वतःला फसवून घेण्याचा कोणी निर्धारच केला असेल तर वादविवादाने फारसे काही साधत नाही. खरीच श्रद्धा आहे ना? मग इतर उपाय थांबवत का नाही? असे पकडता येते पण त्यातून काठावरच्या केसेसच ‘सुटू’ शकतात. असो.
पण पारलौकिक मानण्याच्या सगळ्याच गरजा अशा चावट आणि थिल्लर असतात असे गृहीत धरणे म्हणजे मानवाचे काही महत्त्वाचे व खरे प्रश्न नाकारण्यासारखे ठरते. जे नैतिक इहवादी अनिहवादाला केवळ कारस्थान समजतात ते आपण सारीच ‘माणसे’ असण्यातल्या काही अस्सल (जेन्युईन) पेचांकडे (प्रेडिकॅमेंट्स) काणाडोळा करत असतात. एकुणातच कारस्थानमत (कॉन्सपीरसी थेअरी) हा, श्रेय/दुरितांचे मूळ सर्वच माणसांत असते हे नाकारून, दुष्टांचा संहार केला की झाले असे मानणारा, पोरकट प्रकार असतो. गंभीरपणे नैतिक इहवादाचा प्रसार करायचा झाल्यास पारलौकिक मानायला लावणारी प्रामाणिक कारणे कोणती हे समजावून घेऊन तशा पारलौकिकाने नैतिकदृष्ट्या कसा फरक पडत नाही हे सिद्ध करण्यावर भर दिला पाहिजे.
प्रयत्नवाद अजिबात न सोडतादेखील माणसाला अनेक यादृच्छिक घटितांची शुभाशुभ फले भाग्य म्हणून उमदेपणाने (एलिगंटली) स्वीकारावी लागतात. त्यात न्याय-बुद्धीचे समाधान होण्याचा प्रश्नच नसतो. भाग्यालाही काव्यगत न्यायात बसवून घेण्यासाठी तो लक्षार्थाने जे बोलतो ते तो वाच्यार्थानेही घेऊ लागतो. अर्थातच काव्यगत न्यायाची गरज म्हणून लौकिकाच्या बाहेरचे काही मानावे लागते. अशी कोणतीही गडबड न करता स्वच्छ मनाने भाग्यस्वीकृती थोड्यांनाच जमते. ज्या जगात आपण येऊन पडलो’ आहोत त्याचा ज्ञानात्मक उलगडा नेहमीच अपरा राहणारा असल्याने, ज्ञात असे समग्र चित्र उभे राहू शकत नसते. कसेही करून काहीतरी समग्र चित्र पूर्ण करावेसे वाटते व अपुऱ्या ज्ञानामुळे मोकळ्या राहिलेल्या जागा कल्पितांनी भरून काढल्या जातात. काहींना तार्किक-सुसंगतीची गरज तीव्रतेने भासते. मग जरी चित्र पूर्ण नसले व जरी पुढील कथा खुली असली तरी त्यांना असुरक्षित वाटत नाही. असे लोक सहजगत्या इहवादी बनू शकतात. याउलट सुसंगती नसली तरी चालेल पण समग्रता हवी असा आग्रह असणाऱ्यांना चित्र पूर्ण करणारी कल्पिते, ‘सत्ये’ म्हणून मानावी लागतात.
आपले स्वतःशीच असलेले संबंध सुधारणे याला ‘आत्मिक’ प्रकल्प म्हणता येईल.’ ‘मानसिक’ या शब्दाने तिन्हाईत कोणी तरी आपल्या ‘विषयीत्वाचे’ (सब्जेक्टहूड) विषय (ऑब्जेक्ट) बनवून खुलासे करत आहे असा भाव आहे. म्हणूनच, आतून जगणाऱ्या विषयीने ‘विषयी’ राहूनच, स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलणे व वृत्ती बदलणे या साधनेला ‘आत्मिक’च म्हटले पाहिजे. स्वतःचा स्वतःशीच असलेला झगडा वा ताण वा दुरावा पूर्ण
लोप पावला आहे अश्या अवस्था क्वचित लाभू शकतात. अवस्था टिकली नाही तरी वृत्तीत चांगले बदल होतात. इथपर्यंत आत्मावस्था ही कल्पना कोणीही प्रयोग करून पाहून पडताळण्यासारखी आहे व “नाही बोवा माझ्या बाबतीत असे काहीही घडले नाही” असाही निर्वाळा देण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु या अवस्थेला एकदाची आणि कायमची प्राप्त होणारी सद्वस्तू मानले तर हे प्रकरण इहवादाच्या कक्षेबाहेर जाते. वस्तु-सिद्धीसाठीचे युक्तिवादच या प्रकरणाला पारलौकिकात नेतात; ‘आत्मिक’चे ‘आध्यात्मिक’ होते. हे प्रकरण या आनंदी आणि जीवनदृष्टी सुधारणाऱ्या अवस्थेपर्यंत न थांबता, विश्वोत्पत्ती, विश्वनियंत्रण वगैरे करणाऱ्या महासत्तेकडे गेले तर त्यात संस्थात्मक धर्म-संप्रदाय व त्याचे सामूहिक अहंकार या नको त्या गोष्टी शिरतात व माणूस त्यांत अडकला जातो. परंतु हे कसे तरी करून टाळावे याखातर, माणसाची आत्मावस्थेची ओढच गैर ठरविणे हा मार्ग असू शकत नाही.
थोडक्यात पारलौकिकाच्या सोयीस्कर’ गरजांवर थेट हल्ला चढविणे मात्र प्रामाणिक’ गरजांना (नैतिक-इहवादाला ढळ न पोहोचू देता) मान्यता देणे असे धोरण नैतिक-इहवाद्यांनी घेतले पाहिजे व दार्शनिक वाद हे या धोरणाने पुढे नेले पाहिजेत. विविध प्रकारच्या आस्तिकांनी ज्या गोष्टींना स्वयंभू अस्तित्व वा प्रामाण्य मानलेले असते त्याच्या सत् तेपेक्षाही त्यातून नैतिक-अन्तर्किते (मॉरल-इम्प्लिकेशनस) काय उद्भवतात यावरून कशाचे आस्तिक्य जास्त किंवा कमी आक्षेपार्ह मानायचे याचा विचार करणे नैतिक-इहवाद्यांना आवश्यक असते. विशेष म्हणजे अनिहवाद्यांचा आस्तिक्यभाव उद्ध्वस्त न करता त्याचे इहानुकूल आस्तिक्यभावात भाषांतर (पॅराफ्रेजिंग) करता येते. अनिहवादांच्या नैतिक दुष्परिणामांशी रचनात्मक संघर्ष करण्याचे मार्ग शोधले गेले पाहिजेत.
विभिन्न आस्तिकता/नास्तिकता : विभिन्न गोष्टींचे स्वयंभू-अस्तित्व वा स्वयंभू प्रामाण्य मानणे/नाकारणे.
या ठिकाणी ‘आस्तिकता’ (वा ‘नास्तिकता’) या गोष्टीचा अनेकवचनी उल्लेख कदाचित चमत्कारिक वाटेल. कारण इंग्लिशमध्ये अ-थेइझम या शब्दाने फक्त ‘ईश्वर नास्तिकता’च व्यक्त होते. सुभाग्याने भारतीय भाषांत अस्ति/नास्ति हे पर्याय व्यापक अर्थाचे आहेत. त्यामुळे नास्तिकतेला पूर्वपद (जसेकी ईश्वर) लावून आपण, एखादी नास्तिकता कशाचे (स्वयंभू) अस्तित्व/प्रामाण्य नाकारते (किंवा निदान अप्रस्तुत मानते) हे व्यक्त करू शकतो व अशा जोडशब्दांनी आपण त्या त्या नास्तिकतेचे नामकरण करू शकतो. जसे की वेद-नास्तिकता, यज्ञ-नास्तिकता, ईश्वर-नास्तिकता, आत्मा-नास्तिकता, पुनर्जन्म नास्तिकता इत्यादी… यामुळे विविध ‘आस्तिक’ कशाचे अस्तित्व/प्रामाण्य मानतात (वा विविध नास्तिक मानत नाहीत) हे जाणून घेण्यासाठी एक विस्तृत पटच विचारासाठी खुला होतो. जसे की संवेदनाच खऱ्या अर्थाने ‘असतात’, त्यांवरून अनुमित केलेल्या जड वस्तूंना, स्वतःचे असे अस्तित्व नसते असे मानणारी भूमिका जे कोणी घेतात (उदा. ह्यूम) त्यांचे वर्णन आपण संवेदना – आस्तिक पण जडवस्तू – नास्तिक असे करू शकतो. ह्यूम काही जडवस्तु नसतातच असे म्हणत नाही तर संवेदना या सद्वस्तू आहेत व जड-वस्तू या त्यांची प्रत्ययरूपे आहेत असे म्हणत असतो. अगदी ईश्वर-नास्तिकालासुद्धा मनुष्यनिर्मित ईश्वराचे अस्तित्व नाकारता येत नाही, तो ‘स्वयं-मात्र’ ईश्वराचे अस्तित्व नाकारत असतो किंवा निदान ते अज्ञेय मानत असतो. जडवादी माणूस जाणिवेचे अस्तित्व तर नाकारूच शकत नाही पण तो जाणिवेचे अस्तित्व स्वयंभू मानत नाही. जड-जग हे त्याच्यासाठी स्वयंभू असते व जाणीव हा जडाच्या जटिल संघाताचा (मेंदू इत्यादी) उद्भूत-गुण असतो. या अर्थाने जडवादी हा चित्-नास्तिक असतो.
पुनर्जन्म – आस्तिकांना आत्म्याचा पुनर्जन्म अधिकृतपणे मान्य असतो पण अहंकाराचा पुनर्जन्म होतो का? या प्रश्नावर ते गोंधळतात. नैतिक-इहवादाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो तो अहंकाराचा पुनर्जन्म. अहंकाराचा पुनर्जन्म होत झाल्याचे नुसते दावेसुद्धा अगदीच अपवादात्मक व संशयास्पद असतात. असे असताना आत्म्याच्या पुनर्जन्मावरचे वाद हे नैतिकदृष्ट्या निरुपयोगी असतात. म्हणूनच पुनर्जन्म-आस्तिकता म्हटल्यावर ती आत्मा या पदार्थाची आहे की अहंकार या पदार्थाची? हा प्रश्न प्रथम उपस्थित केला पाहिजे. कडवे इहवादी हे आस्तिकता या शब्दालाच बिचकल्याने नेमकी कसली आस्तिकता हे पाहण्याच्या संधीच सोडून देतात. स्पष्टता नसणे ही गोष्ट नैतिक-अन्-इहवाद्याला सोयीचीच असते. नैतिक इहवादी मात्र अशा गोष्टी स्पष्ट न केल्यास आपला वाद मांडण्यात कमी पडतो. म्हणूनच आस्तिकात या शब्दाला अमुक-आस्तिकता असे पूर्वपद लावण्याचे धोरण मी पुरस्कृत करत आहे.
प्रामाण्याचेही असेच आहे. शब्दप्रामाण्य न मानणारे, व्यवहारात शब्दांवर विश्वास ठेवूनच जगत असतात. परंतु कोणाचे शब्द विश्वसनीय मानायचे याचा निर्णय प्रत्यक्ष, अनुमान वगैरे इतर साधनांनिशी करत असतात. वेद-प्रामाण्य मानणारांच्या दृष्टीने वेद-वाक्ये ही स्वयंभूपणे प्रमाण असतात. त्यांना क्रॉस-चेक करून पाहणे हा प्रश्नच वर्ण्य असतो. (अर्थात त्यांचे अर्थ लावण्यात भरपूर वैविध्यही दिसते.) विविध ‘प्रमाणे’ म्हणजे खरे तर निरनिराळ्या ज्ञानरीती किंवा ज्ञानसाधने असतात. तसे पाहिले तर कोणतेच प्रमाण एकट्याने यथार्थतेची पूर्ण हमी देऊ शकत नसते. एखाद्या ज्ञान-प्रस्तावावर (नॉलेज-क्लेम) अनेक प्रमाणांचा संपात होणे हे ‘प्रमाण’ असते. पण हा एक मोठा आणि स्वतंत्र विषय आहे.
भारतीय दर्शनांविषयीची काही निवडक निरीक्षणे
नगर एखाद्या (प्रस्तावित) सद्वस्तूचे अस्तित्व नाकारण्यापेक्षाही अस्तित्व-नास्तित्व हे अप्रस्तुत ठरविणे हे तर अधिकच ‘इहवादी’ ठरते. कारण मानवी व्यक्तींची भावविश्वे आणि त्यांतील समाईक व एकमेकांना आकलनीय ठरणारा प्रांत या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून वस्तु-विषयक दावे गौण मानणे हे इहवादाचे खास धोरण आहे. भगवान बुद्धांनी ‘अव्याकृते’, म्हणजे जे प्रश्न विचारणेच चुकीचे आहे, सांगितलेली आहेत. जगाला आदी/अंत आहेत की ते अनादी-अनंत आहे? जीव व शरीर हे दोन्ही एकच आहेत की भिन्न आहेत? मृत्यूनंतर किंवा जन्मापूर्वी (तथागत म्हणजे खुद्द बुद्ध पण येथे कोणीही असा अर्थ अभिप्रेत आहे.) ‘आपण’ असतो की नसतो? हे प्रश्न त्यांनी न विचारण्याचे म्हणून घोषित केले. ही गोष्ट अगदी सणसणीतपणे इहवादी आहे! त्याच वेळी बौद्ध तत्त्वज्ञान हे तृष्णा-मुक्ती किंवा ‘निर्वाण’ हेच एकमेव अंतिम साध्य मानते व त्यामुळे सर्व पुरुषार्थांच्या संदर्भात ते इहवादी नाही असेही म्हणता येते. अर्थात ‘मध्यममार्गी’ असण्यावर जोर दिलेला असल्याने आत्यन्तिकता टाळलेली आहे. परंपरेने बौद्ध दर्शनाला ‘नास्तिक’ दर्शन हे जे नाव दिलेले आहे. त्यात मात्र वेद-प्रामाण्य-नास्तिकता अभिप्रेत आहे. बौद्धदर्शनात निरीश्वरवादही आहेच. पण परंपरेत एकदा वेद-प्रामाण्य मानले की निरीश्वरवादी दर्शनालासुद्धा ‘आस्तिक’ मानले जाते जसे की सांख्य-दर्शन. इतकेच नव्हे तर जी निरीश्वरवादीही आहे आणि पुरुषार्थाच्या अंगाने जी चक्क सुखवादी आहे अशा याज्ञिक जीवनदृष्टी (जिचे दर्शन पूर्वमीमांसा म्हणून प्रसिद्ध आहे) लाही परंपरेने, केवळ वेद-प्रामाण्य या आधारावर आस्तिक मानलेले आहे. यज्ञ, मंत्रशक्ती या गोष्टी ज्ञानमीमांसेच्या अंगाने इहवादी नाहीत कारण पडताळणीयता व ज्ञान-दाव्यात मक्तेदारी नसणे या इहवादी अटी त्यात मोडल्या जातात. तरीही जीवनोद्देश म्हणून, ज्यांना आपण आज नैसर्गिक म्हणतो अशा शक्तींना वश करून घेणे व सुखप्राप्ती के करणे, अशी युटीलिटेरियन धारणाच त्यात आहे. यात स्वर्गप्राप्तीही आहे. स्वर्ग ही गोष्ट जरी ‘पारलौकिक’ वाटली तरी तोही एक लोकच आहे व देव हेही जीवच आहेत. म्हणजेच परमतत्त्व शोधण्याची बात नाही. एकूणच भारतीय दर्शनांत ईश्वराला, धक्कादायक वाटेल इतके, कमी स्थान आहे. बौद्ध, जैन, चार्वाक ही दर्शने उघडच निरीश्वरवादी आहेत.सांख्यांत ईश्वर नाहीच. योग या दर्शनातला ईश्वर हा जगन्नियंता वगैरे नाही तो केवळ अनेकांपैकी एक पण ‘आदर्श आत्मा’ आहे. न्याय-वैशेषिक या जोडीतला ईश्वर हा अनवस्था टाळण्यासाठी आदिकारण मानावे लागते या थाटाचा म्हणजे न्यूटन व देकार्तच्या ईश्वरासारखा बुद्धिगम्य जग निर्माण व सुरू करून देऊन बाजूला राहणारा (ज्याला थेइझम न म्हणता डेईझम म्हणतात अशा भूमिकेतल्यासारखा) आहे. शांकरमतानुसारच्या अद्वैत वेदान्तात पारमार्थिक सत्तेत ईश्वर नाहीच. तोही मायेनेच भासतो. जे द्वैती आचार्य आहेत त्यांच्या मतांत मात्र ईश्वर हा सत् आहे. वैदिक-श्रमण-भक्ती या त्रिकूटातील भक्तीचा भाग द्वैती-आचार्यांच्या संप्रदायांत प्रधान ठरेल हे उघड आहे. या त्रिकूटाच्या मिश्रणांच्या विविध परंपरांना आणि स्थानिक लोक-परंपरांना मिळून हिंदू असे अरबी नाव आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. वेदांमधला याज्ञिक कर्मकांडाचा भाग आणि काव्यात्मक-तत्त्वचिंतनाचा भाग हे वेगळे आहेत. दुसरा भाग हा उपनिषदांमध्ये येतो. उपनिषदांची संगती लावून सारार्थ काढण्याचे प्रयत्न निरनिराळे आचार्य करत आलेले आहेत. शांकरमत हे त्यांपैकी केवळ एक आहे. ते म्हणजेच अधिकृत हिंदूधर्म असे मानणे हे अजिबात अनिवार्य नाही. किंबहुना शांकरमतासकट इतरही वेदान्ती दर्शनांचे खंडन करून उपनिषदांच्याच आधारे पूर्णवादाचार्य डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांनी आपल्या पूर्णवाद या ग्रंथात (विमल प्रकाशन-5,मालती कॉम्प्लेक्स, पौड रोड, पुणे 29) जग हे सत् तर आहेच पण ईश्वराचेच एक स्वरूप-अंग आहे व जगाला ‘कार्य’ समजणे ही ‘मूल में भूल’ कशी आहे हे विशद केलेले आहे. नैतिक-इहवादाला उपनिषदांतही कसा भक्कम आधार आहे हे ज्यांना पहायचे असेल त्यांनी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. तसेच पूर्वतयारी म्हणून किंवा एरवीही, उपनिषदांवर श्रद्धा असो वा नसो, डॉ. श्रीनिवास दीक्षित यांचा भारतीय तत्त्वज्ञान (फडके प्रकाशन-कोल्हापूर व मुंजाबाचा बोळ, नारायणपेठ, पुणे) हा ग्रंथ तरी किमान वाचला पाहिजे.
त्याचे असे आहे की सामान्य माणूस जरी स्वतः शास्त्र-चर्चा करू शकत नसला तरी ती करण्याचा दम इहवाद्यांच्यात नाही ही बातमी मात्र बऱ्यापैकी ‘फुटलेली’ आहे.
विविध ईश्वर-स्वरूपांच्या (आपापल्या) उपासकांकडून अपेक्षा व त्यांनुसार घडणाऱ्या उपासकांच्या वृत्ती
सर्वच ईश्वर-आस्तिक हे ईश्वराचे अस्तित्व स्वयंभू मानतात. हे ‘ईश्वर-आस्तिक’च्या व्याख्येनेच सिद्ध आहे. नैतिक इहवादाच्या दृष्टीने ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा नसून त्याच्या स्वरूपाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अपरिपक्व इहवादी हे अस्तित्वाच्या प्रश्नात अडकून ‘इलेक्ट्रॉन तरी डोळ्याला कुठे दिसतो’ अशा छापाच्या बाष्कळ विवादात वेळ वाया घालवतात. मुद्दा ईश्वर असण्यातून नैतिक-अनुतर्किते (मॉरल-अम्प्लिकेशनस्) कोणती निष्पन्न होतात हा आहे आणि हा मुद्दा अस्तित्वावर अवलंबून नसून मानलेल्या स्वरूपावर’ अवलंबून आहे. मानलेले स्वरूप अस्तित्वात आहे की नाही हे सिद्ध/असिद्ध करण्यापेक्षा (जे मानवी बद्धीला एवीतेवी अशक्यही आहे.) ईश्वर खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ ठरण्यासाठी तो स्वरूपाने कसा असणे स्वाभाविक आहे यावर वाद घालण्यात हंशील आहे, कारण तो काय मागण्या करतो/आदेश देतो यावर उपासकांचे आचरण (अंशतः तरी) अवलंबून असणार आहे.
उदाहरणार्थ कॅलव्हिनिस्ट प्रॉटेस्टंट पंथात ईश्वराशी चर्चद्वारा संपर्क साधण्यात अर्थ नाही आपण तारित (साल्व्हड) आहोत किंवा कसे याच्या खुणा आपल्याला या जगात दिसल्या पाहिजेत त्यासाठी काटकसरीने राहून श्रम-उद्योग जास्त केले पाहिजेत अशी धारणा होती व या धारणेचा औद्योगिक क्रांतीत मोठा वाटा होता असे मत समाज-शास्त्री मॅक्स वेबरने नोंदवलेले आहे.
तसेच पारशी (झरत्रुष्ट) संप्रदायाच्या विचारातला ईश्वर हा मंगल-कारक (बेनेव्होलंट) आहे. पण सर्वशक्तिमान (ऑम्निपोटंट) नाही, त्याला मानवांच्या मदतीची गरज आहे. (केशवसुतांचे ‘देवांच्या मदतीस चला तर’ आठवते.) पारशी लोकांची कर्तृत्वशीलता आणि उदारता कोठून येते याचे हे एक उत्तर असू शकते. एकूणच ईश्वराच्या स्वरूपाबाबत जास्त वादग्रस्त मुद्दा सर्व-शक्तिमानता हा आहे. जर तो कल्याण-कारक आणि सर्व शक्तिमान असा दोन्ही आहे तर जीवांना एवढे दुःखभोग का? हा प्रश्न ईश्वर-आस्तिकांना सर्वांत जास्त अडचणीचा प्रश्न असतो. जीवांचे ‘पापमय पूर्वकर्म’ त्यांच्या पदरी दुःखभोग टाकते असे जरी मानले तरी पापांचा आरंभ कशामुळे झाला हा प्रश्न राहतोच. ‘माया’ ‘अविद्या’ या अनादी असल्याने म्हणा किंवा अनय कोणत्याही पारलौकिक कारणांनी (जसे की आदिम पतन) म्हणा जीवांना पाप-बुद्धी होणे व त्यातून निर्माण होणारी पुढील अनर्थ परंपरा ही ईश्वरही टाळ शकत नाही हे मान्य करावे लागते. या दृष्टीने पहाता त्याच्या सर्वशक्तिमानतेला ढळ पोहोचतो. बरे पाप-बुद्धी ही ईश्वरानेच दिली असे मानले तर ईश्वराच्या मंगल-कारकतेलाच ढळ पोहोचतो. मंगल-कारकता नाकारणे म्हणजे त्याचे उपास्य वा आराध्य स्वरूपच नाकारणे ठरते. त्यामुळे सर्व-शक्तिमानता नाकारणेच परवडण्यासारखे आहे. सर्व-शक्तिमानता नाकारल्यास इहवादी नीतीला व मानव-निर्मित न्यायाला वाव व महत्त्व असल्याचे सकारात्मकपणे मान्य करावे लागते.
याखेरीज ईश्वर मानण्याने येणारे कूटप्रश्न सोडविण्यासाठी सर्वेश्वर-वाद (पॅन-थीईझम) हाही एक मार्ग आहे. त्यानुसार सर्व काही ईश्वराच्या आतच चालू आहे असे होते व हे इहवादाला पूरकच आहे. इतकेच नव्हे तर अनीश्वर, अपवित्र वा सैतानी असे काहीच उरत नाही व त्यामुळे ईश्वराच्या नावाने कोणीतरी उठून कोणाचे तरी निर्दालन करणाऱ्या हिंसक निष्ठेला वावच उरत नाही. ईश्वरच त्याच्या लीलेची दःखे आतन भोगतो. रोखतो व निवारतो हे तो स्वतःच्या जीव या स्वरूप-अंगाने करत असतो अशी दुःखाची व्यवस्था लागते. दुःखांचा गुणाकार न होऊ देण्याची विवेकशक्ती हे त्याचेच वरदान ठरते. जगात निरीश्वरवादी लोकही असणे याबाबतही हे तो श्रींची इच्छा असेच होते. आंतर-संप्रदायिक द्वेष व हिंसा पृथ्वीतलावरून नष्ट व्हायची असेल तर ईश्वर-नास्तिकतेपेक्षाही सैतान-नास्तिकता किंवा अपवित्र-नास्तिकता (निहिलिटी ऑफ द प्रोफेन) जास्त महत्त्वाची आहे.
भगवान ओशो म्हणत असत, “तुम जैसे हो वैसेही उसको प्रिय हो! तुम ‘अच्छे मत बनो! तुम ‘तुम’ बनो. तुम वो बनो कि जिसके लिए यहां आये हो। वही ढूंढो कि तुम्हारा अपनापन क्या है,” आता यापेक्षा इहवादी काय असणार?
ईश्वराच्या आपल्या उपासकांकडून काय अपेक्षा असतात यावर त्यांच्या वृत्ती अवलंबून असतात. हे लक्षात घेतल्यावर विविध ईश्वर-स्वभावांत एक महत्त्वाचा भेद करता येतो. तो असा की ईश्वरनिष्ठा व्यक्त होते? (व सत्कृत्य कोणते हे स्वतंत्र प्रमाणावर ठरते). महात्मा गांधीजींनी ही दिशा उलटविणारी, “सत्य ही ईश्वर है” ही भूमिका नेमकेपणाने घेतली होती. उपासना हे कर्तव्य नसून कर्तव्य ही उपासना आहे. फर्जसे इबादत होती है इबादतसे फर्ज नही. अमक-ईश्वर हा त्याच्या निष्ठावानांसाठी एक न्याय व बिगर-निष्ठावानांसाठी दुसरा न्याय असे करतो की माणसे एकमेकांशी कशी वागतात यावरून त्यांचे मूल्यांकन करतो? अशा प्रकारे निष्ठा/सत्कृत्य क्रम उलटविणे ही ‘धर्मप्रांता’तली नैतिक-इहवादी क्रान्ती होय.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ईश्वरवादाने नैतिक प्रांतात निर्माण केलेला एक मोठा दोष असा की माणूस स्वतःची कामे ईश्वराकडून करून घ्यायची व जणू त्या बदल्यात ईश्वराची कामे स्वतःकडे घ्यायची असा अव्यापारेषु व्यापार करू लागतो. जे माणसाला शक्य आहे व विहित आहे ते ‘त्याच्या’वर सोडायचे आणि जे अशक्य आहे वा निषिद्ध (इहवादी नैतिकतेनुसार) आहे ते ‘त्याच्या नावे’ करायला जायचे. आपले काम आपण करू त्याचे काम त्याला करू द्या. एवढी भूमिका घेतली की आस्तिक्यभाव न गमावता इहवादी नैतिकता जोपासता येते. तो आपली परीक्षा घेत असतो असे मानले तरी चांगला गुरु हा जो विषय शिकवायचा त्याच्यात परीक्षा घेईल शिष्य ‘गुरुसेवा/गुरुस्तुती’ किती करतो यावरून त्याचा रिझल्ट लावणार नाही! नैतिक परीक्षेत उतरले की ते पुरेसे आहे. आस्तिकता उद्भवणे हे त्याच्या कृपेवर आहे. नास्तिकांना मारून मुटकून आस्तिक करा हे आस्तिकांचे
काम नाही.
माणूस सर्वत्र सौदेबाजी करायला शिकला की तो त्यापासून ईश्वरालाही सोडत नाही. पाप रद्द करून घेण्याच्या बदल्यात पूजा हे पूजेचे भ्रष्ट रूप आहे. ईश्वर असो वा नसो, आपण त्याला भ्रष्ट सरकारी अधिकारी समजणे हे करून त्याचा अधिक्षेपच करत नाही काय? ईश्वराच्या चांगलेपणाला बाधा येईल असे त्याला कल्पिणे हे नेहमीच चूक आहे. नसला तर नसेलही पण असला तर चांगलाच असेल ही श्रद्धा दृढ असायला हवी. ईश्वराचे चित्रण स्तुतिपाठकांची धन करणारा व आक्षेपकांची कत्तल करणारा झोटिंगशहा असे करणे हे ईश्वर-आस्तिकाला तर मुळीच शोभत नाही व ईश्वर-नास्तिकाला कसेच चित्रण करण्याचा हक्कही नसतो व प्रश्नही नसतो. म्हणूनच ईश्वर-आस्तिकता ही शुभस्वरूप/प्रेमस्वरूप आस्तिकता असली पाहिजे आणि मग अशी शुभस्वरूप/प्रेमस्वरूप-आस्तिकता आणि नैतिक इहवाद यांच्यात संघर्ष निर्माण होण्याचे काहीच कारण नाही.
2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेस समोरील रस्ता, पुणे 411 004