हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारांतच बिनचूक सापडतो… शंकराचार्यांचा अवतार झाल्यानंतर ठिकठिकाणच्या बौद्धमूर्तीचा उच्छेद करवून तेथे शंकराच्या पिंडी स्थापिल्या गेल्या. कित्येकदा तर मूळच्या बौद्धमूर्तीनाच थोडाबहुत फरक करून त्यांनी शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला.
जोपर्यंत चिलीमच नव्हती, तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यानंतर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरल कल्पनेला कसला आयास? शंकराची देवळे निघतात न निघतात, तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बन्सीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर झाले. समाजबहिष्कृत झाल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जिवाच्या समाधानार्थ म्हसोबा, खैसोबा, वेंडोबा असे अनेक ओबा देव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरारू लागली, तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदास डुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदू देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे.
प्रबोधनकार ठाकरे
(‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ ह्यामधून)