मेंदू-विज्ञान – तत्त्वज्ञान सामाईक सीमारेषा

शास्त्रज्ञ हो असती ज्ञाते बहुत / परि नाहीं चित्त हातां आलें – तुकाराम
हे शतक मेंदू-विज्ञानाचे आहे असे मानले जाते. मेंदू-विज्ञानाने इतर ज्ञानशाखांमध्येही प्रवेश केला आहे. न्यूरोइकॉनॉमिक्स,सोशल न्यूरोसायन्स, न्यूरोसायकॅट्री, न्यूरो एथिक्स अश्या उपशाखा सुरू होत आहेत. समाजावरही मेंदू-विज्ञानाचा प्रभाव वाढता आहे. लोकविज्ञानात मेंदूवरची पुस्तके, लेख तसेच वृत्तपत्रातील मेंदूसंशोधनाच्या बातम्या वाढत्या आहेत; हे त्याचेच द्योतक आहे. मेंदू-विज्ञानातील शोध, नव्या संकल्पना आपल्याला उत्तेजित करतात, प्रभावित करतात. आपण हरखून जातो. मानवी स्वभावाबाबत, समजाबाबत काही तरी वेगळे किंवा जास्त शिकवण्याचे अधिकार आपण मेंदू-विज्ञानाला बहाल करतो. कारण मेंदूचा शोध हा मानवाचा शोध असतो. हा शोध कपोलकल्पित नसून तो मेंदूतील क्रिया-प्रक्रिया आपल्याला प्रत्यक्ष दाखवतो. माणूस बदलण्यासाठी माणसाच्या शारीरिक व मेंदूच्या आरोग्यासाठी याचा उपयोग होईल याची आपल्याला खात्री असते. अर्थात हा मेंदू-विज्ञानाचा (फिजिकॅलिस्ट अप्रोच) भौतिकवादी दृष्टिकोण आहे असे कोणी म्हणेल तर ते खरेच आहे. मेंदूच्या कार्याबद्दलचा ‘नॉन फिजिकॅलिस्ट अप्रोच’ सुद्धा बघावयाचा आहे. विज्ञान कवाडे बंद करून रहात नाही. तेव्हा मेंदू-विज्ञान व तत्त्वज्ञान या ज्ञानशाखांचा एकमेकांवर परस्पर प्रभाव पडणे अपेक्षित आहे, त्याचा शोध आणि बोध एका लेखात घेण्याचा हा प्रयत्न. मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानाशी संबंध जोडला जातो तसा संबंध हृदयाच्या किंवा यकृताच्या विज्ञानाशी जोडला जात नाही, याला कारण मेंदूचे कार्य. शरीराच्या सर्व क्रिया मेंदू नियंत्रित करतो. पण त्यातील ‘हायर फंक्शन्स’ व ‘एक्झिक्युटिव फंक्शन्स’ ही मेंदूची कार्ये तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत. म्हणून तत्त्वज्ञान व मेंदू-विज्ञान यांच्या सीमारेषा समाईक आहेत. कॉन्शसनेस, भाषा-वाणी-स्पीच, हॅन्डेडनेस-उजवा-डावखुरा, हॅल्युसिनेशन्स, डिल्युजन्स ही मेंदूची (हायर फंक्शन्स) उच्चकार्ये आहेत असे मेंदू-विज्ञानात मानले जाते.
मानवी मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्स हा मेंदूतील सर्वांत उत्क्रांत भाग. माणसाच्या उच्च कार्यामध्ये कॉर्टेक्सचा सहभाग महत्त्वाचा. या सेरेब्रल कॉर्टेक्सचा एक-तृतीयांश फ्राँटल लोबमध्ये सामावलेला असतो. नर-वानर गणातील नरामध्ये, म्हणजे मानवामध्ये, हा फ्राँटल लोब जातिविकसित-आनुवंशिकतेने वाढलेला असतो, विस्तारलेला असतो. यातील काही भागाला प्रीफ्राँटल कॉर्टेक्स म्हणतात. हा भाग मेंदूच्या थैलेमस, कॉर्डेट न्युक्लियस या भावनेच्या, स्मृतीच्या केंद्राशी जोडलेला असतो. ही केंद्रे व प्रीफाँटल कॉर्टेक्स एकमेकांकडे सतत संदेश पाठवत असतात. हे संदेशवहन दुहेरी असते. मानवी बोधन (कॉग्निशन) व वर्तन (बिहेवियर) या अत्यंत गुंतागुंतीच्या क्रिया ही दोन्ही केंद्रे सुसंबद्ध करतात. त्यांच्यात एकसूत्रता आणतात. माणूस एकाचवेळी अनेक गोष्टी करत असतो. त्याच वेळी विचार आणि भावना यांचे मिश्रण त्याच्या मेंदूत होत असते. तर्कबुद्धीने विचार करणे, अवधान असणे (अटेंशन), कोणत्याही गोष्टीबद्दलची स्वतःची थिअरी तयार करणे, अमूर्त विचार करणे, येणाऱ्या घटनांचे भान असणे, त्याबाबत काही निर्णय घेणे, माहिती साठवणे, अनुचित व अयोग्य प्रतिक्रिया होण्यावर नियंत्रण ठेवणे, अशा किती तरी कार्यांना एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणतात. हे कार्य प्रिफाँटल कॉर्टेक्स करतो. प्रीफ्राँटल कॉर्टेक्स हा कार्यकारी अधिकारी असतो.
मानवी जीवनव्यवहाराचे हे पैलू आहेत, अगदी आदिम काळापासून चालत आलेले. विज्ञानाच्या आधीपासून यावर विचार चालू आहे. तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, ईश्वरशास्त्र संतसाहित्य, या सगळ्या ज्ञानशाखांनी गेली अनेक शतके त्याबद्दल विचार मांडले आहेत. पुढे मेंदू-विज्ञानाचा उदय व विकास होत गेला मेंदूच्या कार्यावर प्रकाश पडू लागला. येथेच तत्त्वज्ञान व मेंदू-विज्ञान यांच्या सीमा सामाईक होऊ लागल्या. स्कॅनिंगच्या बहुविध तंत्रांमुळे मानवी वर्तनाच्या प्रत्येक क्षणी (रीअल टाइम मध्ये) मेंदूत बघता येऊ लागले. अमुक करताना मेंदूची तमुक जागा उजळते, हे दिसू लागले. मानवी वर्तनाचे न्यूरल संदेशवहनातील रासायनिक रेणूंचा शोध लागल्यावर मेंदूतील कार्य कसे चालते व कार्यनाश(!) कसा होतो हे थोड्याफार प्रमाणात कळू लागले. तत्त्वज्ञान तसेच मनोविज्ञान यांतील विचार अमूर्त असतात. मनोविज्ञान व मनोविकृतिविज्ञान यांनी मेंदू-विज्ञानाचे बोट धरले. आधुनिक स्कॅनिंग तंत्राचा वापर करून मनोव्यापारांचे मेंदूतील स्थान शोधण्यास सुरुवात केली. मेंदू विज्ञानाने मनोव्यापारावर प्रकाश पडेल असे फ्रॉइड म्हणाला होता; त्याचा प्रत्यय येऊ लागला. अमूर्त विचारांना (फिजिकल बेसिस) भौतिक पाया मिळू लागला. मेंदूतील चेताप्रेषके व पेशीमंडले मनोविकृतींची कोडी हळूहळू सोडवतील हे फ्रॉइडचे विचार प्रत्यक्षात येऊ लागले. एकंदरीत शब्दांना वजन प्राप्त होऊ लागले. वजन प्राप्त होणे विज्ञानात महत्त्वाचे असते. म्हणजे थिअरी प्रयोगाने सिद्ध करावी लागते. आज मेंदू-विज्ञान हाच प्रयत्न करत आहे.
विज्ञान व तत्त्वज्ञान या दोन्हीबद्दल कुतूहल असणारा, काही प्रमाणात विज्ञानाच्या विचारपद्धती वापरणारा मी एक सामान्य माणूस. सामान्य माणसांचे काही समज असतात तसे माझे तत्त्वज्ञानासंबंधी काही समज आहेत. विज्ञानाच्या तुलनेत तत्त्वज्ञानाच्या विचारपद्धती ‘रिजिड असतात. कोणताही फेनॉमिना तत्त्वज्ञान रिजिड चौकटीत बसवू पाहते. विज्ञानाची विचारपद्धती त्या फेनॉमिनाचा शोध घेते त्याबद्दल थिअरी मांडते व ती प्रयोगाने बरोबर किंवा चूक ठरवते. त्यामुळे विज्ञानात विचारपद्धतींची घराणी निर्माण होत नाहीत. तरीसुद्धा तत्त्वज्ञानातील विचारांची शिस्त महत्त्वाची असते हे ओळखून ही शिस्त विज्ञानाने घेतली आहे. इतिहासात डोकावले तर सायन्स हा शब्द येण्यापूर्वी सायन्स ज्या विषयांबद्दल विचार करते त्या विचारांना ‘नॅचरल फिलॉसॉफी’ म्हणत असत. सायन्स हा फिलॉसॉफीचाच भाग होता. डेविड ह्यूम, अॅडम स्मिथ या तत्त्वज्ञांनी माणसाचा सर्वांगाने शोध याला ‘सायन्स ऑफ मॅन’ असे म्हटले आहे. अॅडम स्मिथला फिलॉसॉफर्स सायन्टिस्ट संबोधले आहे. तेव्हा मेंदू विज्ञान व तत्त्वज्ञान यांच्या समाईक सीमारेषेवरची (व्हिजन) पाहणे यासंबंधीची काही उदाहरणे पाहू.
पाहणे (व्हिजन)
एक गृहस्थ वयाच्या बावन्नाव्या वर्षांपर्यंत अंध होता. बावन्नाव्या वर्षी त्याच्यावर ‘कॉर्नियल ट्रान्सप्लांटची’ शस्त्रक्रिया झाली. आता त्याला दृष्टी मिळाली. दिसायला लागूनसुद्धा तो सगळ्या वस्तू ओळखू शकत नसे. पण अंध असताना ज्या गोष्टी तो स्पर्शाने समजायला शिकला होता त्या गोष्टींचा अर्थ त्याला दृष्टीने चटकन लावता येत असे. त्या गोष्टी चटकन ओळखता येत. याचा अर्थ पाहणे ही क्रिया नुसत्या दिसण्यावर अवलंबून नसते. सक्रिय धांडोळ्याने (अॅक्टिव एक्सप्लोरेशनने) मिळालेल्या ज्ञानामुळे दृष्टिपटलावर पडलेल्या प्रतिमेला अर्थ प्राप्त होतो त्यावर पाहणे अवलंबून असते. नेचर 1 जुलै 2010 च्या अंकात ही घटना दिली आहे. ‘व्हॉट माइंड डज नॉट नो द आइज कान्ट सी’ अशी वैद्यकीय विज्ञानात एक म्हण आहे, ती किती सार्थ आहे हे वरील विधानावरून कळेल. व्हिजन म्हणजे दृष्टिसंवेदन, या दृष्टिसंवेदनाचे ‘प्री-कन्सेप्च्युअल’ व ‘कन्सेप्चुअल’ असे दोन भाग आहेत; आकलनपूर्व व आकलन असे हे दोन भाग. येथे विषयाची धारणा होण्यापूर्वी व धारणा होत असताना असेही म्हणता येईल. दृष्टिसंवेदनात दृष्टिपटलावर प्रतिमा उमटते. प्रकाशामुळे रॉड्स व कोन्स या पेशी उद्दीपित होतात. जैवरासायनिक बदल होऊन नर्व्ह इम्पल्स तयार होतो. विद्युत रासायनिक पद्धतीने चेतातंतूमार्फत हा नर्व्ह इम्पल्स दृष्टिसंवेदनाच्या मेंदूतील सुमारे तीस जागांमध्ये जाऊन पोचतो. या प्रवासात होणाऱ्या बदलांत आकलनाचा, धारणेचा संबंध नसतो. या तीस जागांत पोचल्यानंतर पर्सेप्शन सुरू होते. तेथे स्मृती, बोधन, एक्झिक्यूटिव फंक्शन्स, या सगळ्याचा संबंध असतो. येथे पर्सेप्शन पूर्ण होते. सुलभतेने सांगायचे तर तीस जागांत पोहचेपर्यंत, म्हणजे पहिल्या अर्ध्या भागात जे घडते ते सर्वांमध्ये सारखे असते. पण जेव्हा स्मृती, बोधन, एक्झिक्यूटिव्ह फंक्शन वगैरे गुणविशेष मिसळतात तेव्हा त्याच वस्तूचे प्रत्येक व्यक्तीला होणारे पर्सेप्शन वेगळे असते. त्याच वस्तूबद्दलचा अनुभव, आकलन, धारणा वेगळी असते.
आता अगदी सोप्या पण मूलभूत प्रश्नाकडे वळूया. आपण बघतो कशासाठी? आपल्याला निसर्गाने दृष्टी कशासाठी दिली? जगाबद्दलचे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला दृष्टी मिळालेली आहे. भोवतालचे ज्ञान मिळवण्याचे स्पर्श, गंध, श्रवण, रसना असे इतरही मार्ग आहेत. पण दृष्टिसंवेदन सर्वाधिक सक्षम मार्ग आहे. रंग, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव अशा काही गोष्टी दृष्टिसंवेदनांमार्फत समजतात. दृष्टीतून मेंदूकडे सतत बदलणाऱ्या माहितीचा ओघ निरंतर चालू असतो. इतकी सगळी माहिती साठवणे मेंदूला गरजेचे नसते, कारण मेंदू संगणकापेक्षा सक्षम असतो. संगणकाप्रमाणे तो जे सर्व घालाल ते साठवत नाही. दृश्य जगताबद्दल ज्ञान होईल एवढीच माहिती मेंदू शोषून घेतो. मेंदूने पूर्वी जे काही साठवले असेल त्याच्याशी येणारी ही नवीन माहिती तो ताडन पाहतो. त्यांचे वर्गीकरण करतो. रंग, आकार. गती अशी माहिती साठवणारी उपकेंद्रे आहेत. दृष्टिपटलाकडून माहिती प्रथम प्राथमिक केंद्रांकडे येते. तेथून ती निरनिराळ्या उपकेंद्रांकडे पाठविली जाते. आकाराचे ज्ञान होण्याआधी रंग समजतो, गतीच्या आधी आकार समजतो. यातील फरक, मिलिसेकंदांचा असतो. दृष्टिकेंद्रामध्ये असे समांतर संस्करण ‘प्रोसेसिंग’ चालू असते व त्याला कालानुक्रमही असतो. दृष्टिसंवेदन हे अत्यंत गंतागुंतीचे असते.
दृष्टिसंवेदनानेच महत्त्वाचे कार्य म्हणजे सतत बदलत्या जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी भोवतालातील ‘कॉन्स्टंसीज’ (सातत्या)चा शोध घेणे. सामिर झेकी या मेंदूच्या जैववैज्ञानिकाने याचा संबंध चित्रकलेशी जोडला आहे. वस्तू, रंग, वस्तूंचे पृष्ठभाग, चेहरे, तसेच घटना अशा नाना गोष्टींमधील जे नित्य, चिरस्थायी, आवश्यक असते, त्याचा शोध चित्रकार त्याच्या माध्यमातून घेत असतो. मेंदू हेच करतो. हा शोध घेणे, त्यायोगे विशिष्ट वस्तूचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग सामान्यीकरणासाठी करणे, हे कलेचे एक कार्य आहे. त्यामुळे कला हे मेंदूच्या कार्याचे विस्तारित ‘एक्स्टेन्शन’ अंग असते असे सामिर झेकी यांचे गृहीतक आहे.
‘क्युबिझम’ ही चित्रकलेतील एक चळवळ होती. त्याची समीक्षा करताना फ्रेंच कलासमीक्षकांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो असा : बद्धीची. म्हणजे मेंदची. कोणतीही प्रक्रिया न करता जे काही दृष्टिपटलावर पडले ते आम्ही जसेच्या तसे कॅनव्हासवर काढतो; असे क्युबिस्टांना वाटते व तसे ते सांगतात. पण वास्तवाच्या संबंधांचे सत्यचित्रण करण्यासाठी हजारो भासमान सत्यांचा त्याग करावा लागतो. मेंदूतील प्रक्रियेशिवाय दिसणारे जग (दृष्टिपटलावर पडणारे जगाचे प्रतिबिंब) हे वास्तव जग होऊ शकत नाही. अशी शंकासुद्धा क्युबिस्टांना आली नव्हती. कला समीक्षक हे काही मेंदूतज्ज्ञ नाहीत पण त्यांनी मांडलेला मुद्दा दृष्टिसंवेदनेबद्दल मेंदूतज्ज्ञांनी मांडलेल्या मुद्द्याला किती समांतर आहे हे सांगण्यासठी वरील उदाहरण दिले. आपण फक्त डोळ्यांनी बघतो हा गैरसमज असतो; आपण मेंदूने म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्सने बघतो, हे वरील विवेचनाचे सार आहे.
चित्रकार हे मेंदूतज्ज्ञ असतात. चित्रकारांजवळ असलेल्या अनन्य तंत्रांनी ते मेंदूच्या संघटनक्षमतेबद्दल रसपूर्ण पण अविनिर्दिष्ट निष्कर्ष काढतात,असा वेगळा दृष्टिकोण समीर झेकी यांनी मांडला आहे. वस्तूच्या तसेच सजीवांच्या वरवरच्या अस्तित्वामागे एकामागोमाग येणारे क्षण असतात. या प्रत्येक क्षणाने वस्तूचे तसेच सजीवाचे अस्तित्व कणाकणाने सतत बदलत असते. यातून एक सारभूत सत्य चित्रकाराला पकडायचे असते आणि त्याचा एक शाश्वत असा अन्वयार्थ लावायचा असतो, असे हेन्री मॅतिस हा सुप्रसिद्ध फ्रेंच चित्रकार म्हणाला होता. तत्त्वतः मेंदूतील दृष्टिसंवेदनाची केंद्रे हेच करत असतात. झेकी यांनी वानगीदाखल हे उदाहरण दिले आहे.
क्रांतिक काल
दृष्टिसंवेदनाचा शोध डेविड ह्युबेल व टॉर्सटन विझेल यांनी घेतला आहे. निरोगी बालकाच्या मेंदूत आनुवंशिकतेने येणारी दृष्टिसंवेदनेची यंत्रणा जन्मतःच तयार असते असे ह्युबेल व विझेल यांनी सिद्ध केले. जन्मानंतर काही काळातच विविध प्रकारांनी दृष्टिसंवेदनाच्या केंद्रांचे उद्दीपन झाले पाहिजे, तरच ही यंत्रणा समृद्ध व सुदृढ होते. दृष्टिसंवेदन परिपक्व होण्याच्या दृष्टीने बालपणातला काळ महत्त्वाचा असतो. त्याला क्रांतिक काल म्हणतात. या काळातील दृष्टिशिक्षण महत्त्वाचे असते. त्यानंतरच्या काळातील दृष्टिशिक्षण या यंत्रणेत आणखी फार भर घालत नाही. बाळाच्या पाळण्यावर छोट्या कुंकण्या, मणी, कापडी चिमण्या यांचे रंगीबेरंगी फिरते चिमणाळे टांगलेले असते त्याचा उपयोग दृष्टिसंवेदन समृद्ध करण्यासाठी होत असावा, असे आता म्हणता येईल. हा क्रांतिक काल साधारणपणे जन्मापासून दोन वर्षे वयापर्यंत चालतो. दृष्टिसंवेदनाची शिकाऊ उमेदवारी येथे पूर्ण होते. पिकासो,मोने, मॅतिस, बाल्थस अशा जगप्रसिद्ध चित्रकारांना आपल्याला लहान मुलासारखे चित्र काढता यावे असे वाटे. मुलांचे मेंदू प्रौढांसारखे ‘वठलेले नसतात. मुलांच्या मेंदूंची निरागसता आपल्याजवळ हवी म्हणजे आपल्याला मुलांसारखी चित्रे काढता येतील असे त्यांना वाटे. पण चार वर्षांच्या मुलांच्या मेंदूतील दृष्टिसंवेदनाची यंत्रणा परिपक्क झालेली असते. मुलांचे हस्तकौशल्य विकसित व्हावयाचे असते. म्हणून बालकांची चित्रे वेगळी वाटतात. दृष्टिसंवेदनाची निरागसता हे एक ‘मिथ’ आहे, असे मेंदूच्या काही जैववैज्ञानिकांचे मत आहे. विज्ञानात कोणतेही गृहीतक सहज सर्वमान्य होत नाही. दृष्टिसंवेदनातील (सुरुवातीला सांगितलेला) ‘प्री-कन्सेप्चुअल’ भाग क्रांतिक कालात परिपक्व होत असावा. पुढे मेंदू जसजसा विकसित होत जातो, तसतसा दृष्टिसंवेदनातील ‘कन्सेप्युअल’ भाग विकसित होतो. येणाऱ्या प्रत्येक क्षणाने मेंदू कणाकणाने बदलत असतो. तेव्हा दृष्टिसंवेदनाची निरागसता हे ‘मिथ’ नाही असे काहींचे मत आहे. या विवेचनातून एक महत्त्वाचा मुद्दा मांडावयाचा आहे. मेंदूचे जैवविज्ञान सौंदर्यशास्त्राच्या विचारसरणीवर प्रभाव पाडू शकेल. सौंदर्यशास्त्र ‘एस्थेटिक्स’ हा तत्त्वज्ञानाचा प्रांत असल्यामुळे हे उदाहरण येथे दिले आहे. सौंदर्यशास्त्र व मेंदूचे जैवविज्ञान यांचा सीमा प्रदेश एकमेकांत मिसळण्याची ही लक्षणे आहेत.
दगड आणि घाट
मेंदूशिवाय आकाराला, घाटाला अस्तित्व नाही’ असा मेंदूच्या जैवविज्ञनात सिद्धान्त आहे. आता हा सिद्धान्त शिल्पकलेला लावू. मायकेलेंजेलो हा शिल्पकलेतील दादा माणूस. त्याने कला व सौंदर्य याबद्दल सुनीते लिहिली आहेत.
‘दृश्यरूपात आणण्यासारखा असा कोणताही विचार वा कल्पना महान कलावंताच्या मनात नाही, जो संगमरवराच्या रिकाम्या कवचात सामावलेला नसतो. अशा या संगमरवरावर टाकलेली मोहिनी उतरवतात मेंदूच्या आदेशानुसार कलावंताचे हात’, असा त्या सॉनेटचा अन्वयार्थ आहे. प्लोटिनस हा एक महत्त्वाचा ग्रीक तत्त्वज्ञ. प्लेटोच्या परंपरेतील. त्याचे विचार मायकेलेंजेलोने वाचले होते त्या विचाराने तो प्रभावित झाला होता. ‘दगडामध्ये उतरण्याच्या कितीतरी आधी तो आकार शिल्पकाराच्या मनात असतो’. प्लोटिनसच्या या विचाराचे प्रतिबिंब मायकेलेंजेलोच्या सनीतामध्ये दिसते. इतकेच काय पण हा विचार मेंदूच्या जैवविज्ञानाच्या सिद्धान्ताजवळ जाणारा आहे. मानवाच्या विचाराची शृंखला अशी पूर्वापार चालत आलेली मेंदूचे जैवविज्ञान आता विकसित होत त्यावर प्रकाश टाकत आहे.
प्राचीन काळातील सायक्लॅडिक कलेत काही शिल्पे फक्त ओठ, नाक अशा अवयवांची आहेत. मायकेलेंजेलोनेसुद्धा त्याची कितीतरी शिल्पे अपूर्ण ठेवलेली आहेत. सगळे गर्भित आकार पाहणाऱ्याच्या मेंदूत असतात, काय त्यांना हे माहीत होते? आकारांची, घाटाची, रंगाची जन्मभूमी मेंदू असते. पाहणारा त्याच्या मेंदूनुसार ती अपूर्ण शिल्पे पूर्ण करतो. सुंदरता ही पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते या सौंदर्यशास्त्रातील विधानाला मेंदूच्या जैवविज्ञानाचा आधार आहे असे म्हणायला हरकत नाही.
चित्रकला, शिल्पकला आणि इतरही कलांमधील आणखी उदाहरणे देता येतील. सौंदर्यशास्त्राला मेंदूच्या जैवविज्ञानाचा पाया शोधायला अशी सुरुवात झाली आहे. उद्या ‘न्यूरोएस्थेटिक्स’ या शाखेचा उदय झाल्यास नवल वाटायला नको. सगळ्याच मानवी कृतींचा उगम मेंदूत आहे. मेंदूचे नियम त्या सर्वांना लागू आहेत. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या बहविध प्रश्नांवर मेंद-विज्ञानाचा परिणाम होणे साहजिकच आहे.
चेतातत्त्वज्ञान
मानवी वर्तनासंबंधीच्या पूर्वापार चालत आलेल्या ऐतिहासिक व अमूर्त संकल्पना आणि मेंदूबद्दलचे मिळणारे नित्यनूतन जैविक ज्ञान यांचा मेळ घालत मानवीपणाबद्दलच्या कल्पनांची मांडणी करण्याचा प्रयत्न म्हणजे न्यूरोफिलॉसॉफी, चेतातत्त्वज्ञान; अशी चेतातत्त्वज्ञान या शाखेची व्याख्या करता येईल.
इ. ओ. विल्सन या विज्ञानवंताने ‘माइंड अॅज द ब्रेन अॅट वर्क’; मन म्हणजे काम करत असलेला मेंदू असे म्हटले आहे. मेंदू सततच काम करत असतो. स्कॅनिंगच्या तंत्राने मेंदू काम करताना पाहता येतो. मेंदूच्या प्रक्रियेतून मनाच्या प्रक्रिया तयार होतात. पण मेंदूतील जैवरासायनिक प्रक्रियांचे वैयक्तिक अनुभवांत, म्हणजे मनाच्या प्रक्रियेत रूपांतर कसे होते याचे सखोल आकलन मेंदू-विज्ञानाला अजून झालेले नाही. त्यामुळे आकलन आणि त्याचे स्पष्टीकरण यात मोठी फट राहते, असे काही ज्येष्ठ मेंदूतज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा, तसेच अनुभवाचा इतिहास असतो. या इतिहासाच्या प्रभावाच्या अनन्य खुणा प्रत्येक मेंदूवर उठलेल्या असतात. म्हणून प्रत्येक मेंदू अनन्य (युनिक) असतो, असे नोबेल विजेते मेंदूतज्ज्ञ गेराल्ड एडलमन यांनी म्हटले आहे. सध्या जगभर चालू असलेल्या मेंदू-विज्ञानातील संशोधनाचा उद्देश मेंदू कसा काम करतो हे शोधणे एवढाच नाही. आपण रोजच्या व्यवहारात ‘मन’ हा शब्द वापरतो त्या मनाशी त्याचा संबंध कसा आहे हे दाखवून देणे, हासुद्धा आहे. प्रत्येक मेंदू आगळावेगळा म्हणून प्रत्येक मन आगळेवेगळे. मन आणि मेंदू विलग करणे अशक्य आहे. ‘मानवी वर्तन’ यावर नवीन प्रकाश पाडणे हा मेंदू-विज्ञानातील संशोधनाचा अंतिम हेतू आहे. मानवी वर्तन ही विस्तीर्ण छत्री आहे. या छत्रीखाली नैतिकतेपासून निर्मितीक्षमतेपर्यंत कला, साहित्य, विज्ञान, गुन्हेगारी अशा अनंत गोष्टी येतात. यात अत्यंत महत्त्वाची म्हणजे ‘कॉन्शसनेस’. मानवाची कॉन्शसनेस व प्राण्याची कॉन्शसनेस सारखी असते का? अवधान (अटेंशन) हा कॉन्शसनेसचा महत्वाचा भाग. अटेंशन म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आहेत जे तत्त्वज्ञानातही पूर्वापार चालत आले आहेत. पण आज या दोन शाखांच्या सीमा सामाईक होत आहेत. तत्त्वज्ञानात थिअरी असते व ‘थॉट एक्सपिरिमेंट’ असतात. चेतातत्त्वज्ञानात थिअरी असते आणि प्रयोगशाळेतील प्रयोगही असतात. थिअरी खोडून काढण्याचे किंवा सिद्ध करण्याचे काम प्रयोग करतात. प्रश्नाचे उत्तर सापडले म्हणजे तो प्रश्न तत्त्वज्ञानात राहत नाही, अशा आशयाचे विधान बाड रसेल याने केले होते. विज्ञानात मात्र एका प्रश्नाचे उत्तर सापडले तर आणखी दहा प्रश्न निर्माण होतात.
मेंदूचे जैवविज्ञान उत्क्रान्तीतील सिद्धान्तावर आधारित आहे. उत्क्रान्तीशिवाय जैवविज्ञानातील कोणत्याही गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही असे डोबोझान्स्की या जनुकतज्ज्ञाने म्हटले आहे. मानवी वर्तनाचे सर्व पैलू उत्क्रान्तीच्या प्रकाशात तपासले जातात. त्याला उत्क्रान्तीचे स्पष्टीकरण देण्यात येते. डार्विनने मांडलेल्या उत्क्रान्तीच्या सिद्धान्ताला आज दीडशे वर्षे होऊन गेली, पण त्याला मागे सारणारा कोणताही प्रभावी सिद्धान्त जैवविज्ञानात पुढे आलेला नाही. आइनस्टाइनच्या काही विचारांना मागे टाकणारे विचार भौतिकीविज्ञानात निर्माण झाले. फ्रॉइडचे काही विचार मोडीत निघाले. पण डार्विनचा सिद्धान्त आजही अबाधित आहे. जैवविज्ञानाला पडणारी ही मर्यादा ठरू शकते? उत्क्रान्तीच्या चौकटीपलिकडे जैवविज्ञान विचार करू शकत नाही? व्यवसायाने डॉक्टर असलेले रेमंड टॅलिस हे ब्रिटनमधील महत्त्वाचे तत्त्वज्ञ, कवी, कादंबरीकार आहेत. मँचेस्टर विद्यापीठात ते ‘जेरिअॅट्रीक मेडिसिन’ या विषयाचे प्राध्यापक होते. न्यूरॉलॉजी या विषयाचे त्यांचे ज्ञान उत्तम आहे. इकॉनॉमिस्टच्या 2009 च्या इंटलिजन्ट लाइफ मॅगॅझिनमध्ये उच्च स्तरातील अनेकविद्याज्ञानी असा रेमंड टॅलिस यांचा गौरव करण्यात आला होता. रेमंड टॅलिस यांच्या ‘एपिंक मनकाइंड, न्यूरोमॅनिया, डार्विनायटीस, अँड मिसरिप्रेझेंटेशन ऑफ ह्युमॅनिटी’ या पुस्तकाची गार्डियन व इव्हिनिंग स्टैंडर्ड या ब्रिटनमधील दोन वृत्तपत्रांनी 2001 सालच्या महत्त्वाच्या पुस्तकातील एक अशी निवड केली आहे. मानवी कॉन्शसनेस, वर्तन, संस्कृती व समाज या सर्व बाबतीत मेंदू विज्ञान व उत्क्रान्तीचा सिद्धान्त याचा वापर करून स्पष्टीकरण देण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी टीका केली आहे. जैवविज्ञानाला मेंदू-विज्ञानाला डार्विनायटीस झाला आहे का, असा प्रश्न रेमंड टॅलिस यांनी उभा केला आहे. टीकाकाराचे घर असावे शेजारी या न्यायाने त्यांचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. तुकारामांच्या म्हणण्यानुसार शास्त्रज्ञांच्या हाती अजून चित्त आलेले नाही, तसेच ते तत्त्वज्ञांच्याही हाती आलेले नाही. पण मेंदू-विज्ञानाला मिळालेल्या स्कॅनिंगच्या तंत्रज्ञानामुळे मेंदूच्या आकलनाचे प्रभावी मार्ग आज उपलब्ध झाले आहेत. मानवी प्रज्ञेच्या, प्रतिभेच्या मार्गावरील हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे आज ना उद्या चित्त हाती येऊ शकेल. विज्ञानाच्या अंगभूत स्वभावाप्रमाणे जुन्या चौकटी मोडल्या जातात व नव्या चौकटी तयार होतात. ज्ञानार्जनाच्या ज्या काही महत्वाच्या शाखा आहेत त्यांचा समन्वय होणे महत्त्वाचे आहे, असे इ. ओ. विल्सन यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने तत्त्वज्ञान व मेंदु-विज्ञान यांच्या सीमा सामाईक होणे हा चांगला योग आहे.

भारतीय तत्त्वज्ञान व संतवाङ्मयातील मेंदू
(भारतीय तत्त्वज्ञान व संतवाङ्मय यांमध्ये मेंदूसंबंधी काय काय आले आहे? आजच्या मेंदू-विज्ञानाच्या संदर्भात ते किती सुसंगत आहे?)
डॉ. आशुतोष मुळ्ये
आपण आज मेंदू हा शब्द ज्या अर्थाने वापरतो, त्या अर्थी प्राचीन भारतीय ग्रंथांत मस्तिष्क हा शब्द वापरला गेल्याचे आढळते. डोके (शीर्ष) आणि मेंदू (मस्तिष्क) यातला फरक अथर्ववेदाच्या काळापासून (इ.स.पूर्व 1000?) माहीत होता. अथर्ववेदाच्या दहाव्या काण्डात शीर्ष हा शब्द डोके या अर्थाने (2.6), तर मस्तिष्क हा शब्द मेंदू या अर्थाने (2.8, 2.26) येतो. प्राचीन भारतीय वैद्यकाचे महत्त्वाचे विशेषज्ञ म्हणजे सुश्रुत (इ.स.पूर्व पाचवे शतक), चरक, नागार्जुन, भेल (इ.स.पहिले-दुसरे शतक), वाग्भट (इ.स. पाचवे-सहावे शतक), आणि माधव (इ.स. आठवे शतक). या आयुर्वेदाचार्यांनी लिहिलेल्या संहितांमध्ये मस्तिष्क आणि मस्तुलुङ्ग हे शब्द मेंदू या अर्थाने येतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या आयुर्वेदात कल्पिलेल्या सात धातूंपैकी (घटकद्रव्ये) मज्जा हा मस्तिष्काचा मुख्य धातू सांगितला आहे.
मेंदू हा मराठीत ब्रेन या इंग्रजी शब्दाला समानार्थी वापरला जाणारा शब्द खूपच अलिकडचा असला पाहिजे. कारण कोणत्याही प्राचीन ग्रंथात किंवा संतवाङ्यात तो आढळत नाही. मग मेंदू हा शब्द आला कुठून? मराठी व्युत्पत्तिकोशात (लेखक : कृ. पां. कुलकर्णी, प्रकाशक : ग. ल. ठोकळ, द्वितीयावृत्ती 1964, पृष्ठ क्र. 646) मेंदू या शब्दापुढे मेद (?), मज्जन (? मन्तु (?) अशा तीन संभाव्य व्युत्पती दिल्या आहेत. मज्जाधातूला आयुर्वेदात अतिस्निग्ध म्हटले आहे. स्निग्ध म्हणजे चरबट, जेलीसारखा चिकट, मेदवत् असा तो मेंदू. आधुनिक विज्ञानाप्रमाणे ऑक्झॉन्सवर असणारे मायलिनचे
आवरण आणि न्यूरोग्लिअल पेशी यांचा सत्तर टक्क्यांहून जास्त भाग लिपिङ्सचा म्हणजेच मेदाम्लांचा बनलेला असतो. मात्र रासायनिक घटकांचे विश्लेषण होण्याची शक्यता नसलेल्या त्या काळात केवळ निरीक्षणाच्या आधारावर काढलेले अनुमान आजच्या विज्ञानाशी जुळणे ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे; कारण बोन मॅरो या अर्थीसुद्धा मज्जन् (मज्जा) हाच शब्द वापरला आहे. तेव्हा कवटी या हाडामधले मज्जन् म्हणजे मेंदू असा अन्वय लावावा लागतो. ‘सप्त खानि वि ततर्द शीर्षणि’ सात छेद असणारी कवटी (अथर्ववेद : 10.2.6), ‘षट् शिरसि डोक्याची सहा हाडे (सुश्रुत संहिता : शारीरस्थान 5.19), असे, कवटी एकसंध हाड नाही, असे सांगणारे उल्लेख सापडतात. तरीही जसा चपट्या हाडांमधला तांबडा मगज, आणि लांब हाडांमधला पिवळा मगज तसा हा कवटीमधला गुलबट पिवळा मगज अशी कल्पना प्रचलित असावी. या अर्थाने मज्जासंस्था हे चुकीचे नामकरण आहे. (मन्तु या संस्कृत शब्दाचे अर्थ अनेक आहेत: माणूस, मनुष्यजात, श्रेष्ठ, राजा, अधिकारी, मंत्र (सल्ला), मंत्र देणारा, विचार, उपदेश, उपदेशक, अपराध, इत्यादी. पण जिथे विचार चालतो, ज्यामुळे मानव जात श्रेष्ठ झाली, तो इंद्रियांचा राजा मेंदू अशी उपपत्ती लावायची तर ती फार ओढून ताणून केल्यासारखे होईल.)
सश्रत संहितेत सत्रस्थान आणि चिकित्सास्थान यांत विशेषतः डोक्याच्या जखमांसंदर्भात ब्रेन-मॅटर अशा अर्थाने मस्तलकाचे उल्लेख येतात. डोक्यातील ठराविक नर्व्हज (शिरा) ठराविक जाणिवांशी संबंधित आहेत. हे मात्र निश्चितपणे माहीत असल्याचे दिसते. शारीरस्थानातील (6.27) उल्लेख या दृष्टीने बघण्यासारखे आहेत. कानाच्या आत असणाऱ्या विधूर नावाच्या शिरा कापल्या गेल्या तर बहिरेपण येते. नाकाच्या मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या आत फण नावाच्या शिरा कापल्या गेल्या तर नाकाला वास येत नाही. डोळ्यांच्या मागे असलेल्या अपांग नावाच्या शिरा कापल्या गेल्या तर अंधत्व येते. इत्यादी. नाक, कान, डोळे आणि जीभ यांचे पोषण करणाऱ्या शिरा जाताना डोक्याच्या मध्यभागात एकत्र येतात, ते शंगाटक मर्म. डोक्याच्या आत वरच्या भागात शिरांचा एकत्र समुदाय आहे, त्या जागी अधिपती हे मर्म आहे. या भागाला दुखापत झाली तर एक दिवसाच्या आत मृत्यू ओढवतो असे निरीक्षणही नोंदवलेले आहे. जाणिवेचे (consciousness) स्थान मात्र हृदय असल्याचे सुश्रुताचे मत आहे. ‘गर्भहृदयप्रव्यक्तिभावात् चेतनाधातुरभिव्यक्तो’ (शारीर. 3.18) म्हणजे गर्भाचे हृदय (चवथ्या महिन्यात) व्यक्त होत असल्यामुळे चैतन्य तेव्हा अकस्मात प्रकट होते, असे तो म्हणतो.
चरकसंहितेच्या सिद्धिस्थानात (9.4) मांची चर्चा करताना सर्व संवेदनांचे सर्व प्रवाह आणि प्राण हे डोक्यावर अवलंबून आहेत असा उल्लेख आहे. यावर चरकसंहितेवरील आयुर्वेद दीपिका या टीकेत चक्रपाणि म्हणतो की प्राण आणि संवेदनांचे प्रवाह जरी शरीरभर खेळत असले तरी ते डोक्याशी विशेषत्वाने जोडलेले असतात (‘शिरसि विशेषेण प्रबद्धानि’). म्हणनच डोक्याला दखापत झाली तर शरीरालाही होते. पण मन. चित्त. ज्ञान यांचे स्थान हृदयच आहे ‘हृदयं चेतनाधिस्थानं एकं’ (4.7.8) यावर चरक ठाम आहे.
भेल हा चरकाचा समकालीन. त्याच्या संहितेतील चिकित्सास्थानात (8.2) डोके आणि टाळू यांच्यामध्ये मन असते (‘शिरस्ताल्वन्तरगतम् सर्वेन्द्रियपरं मनः’) असे म्हटले आहे. ते तिथे असल्यामुळे त्याला सर्व प्रकारच्या जाणिवा कळतात. मात्र मनाचे मूळ कारण, सर्व जाणिवांचे बळ आणि सर्व बुद्धीचे स्थान जे चित्त ते हृदयात असते. चित्त हे सर्व कृतींचे कारण असते. मनाला जाणीव झाली की बुद्धी त्यानुसार कार्याकार्यतेचा निर्णय करते अणि चित्त कृती घडवते; या पद्धतीने भेलाने त्यांच्यात फरक दाखवला आहे. आयुर्वेदाच्या बृहद्वयीत (सुश्रुत, चरक, वाग्भट) स्थान नसले तरी या बाबतीत केवळ भेल हाच वास्तवाच्या जवळ जातो.
चेतासंस्थेशी संबंधित अपस्मार (एपिलेप्सी), पक्षाघात (हेमीप्लेजिया), अर्दित (फेशियल पाल्सी) इत्यादी आजारांची लक्षणे तपशीलवार दिलेली असली तरी त्यांचा संबंध मेंदूशी वा डोक्याशी किंवा मज्जाधातूशीही लावला गेलेला नाही तर ‘वात’ (वायू) या दोषाशी लावला आहे. अर्थात वातदोषांतर्गत इतरही शरीरसंस्थांचे आजार येत असल्यामुळे या आजारांमागचा कार्यकारणभाव तेव्हा कळलेला नव्हता हे स्पष्ट होते. शिरोरोग या नावाखाली सर्वच संहितांमध्ये डोकेदुखी, तिची कारणे आणि उपाय दिले आहेत, मात्र मेंदूविषयी काहीही आढळत नाही.
उन्माद या नावाने वेगवेगळ्या मानसिक आजारांची लक्षणेही बहतेक ग्रंथांत तपशीलवार दिलेली आहेत. सुश्रुत त्या मागच्या कारणांचे वर्गीकरण कफ, पित्त, वात या तीन दोषांमुळे होणारे तीन प्रकार, तिन्हीच्या एकत्रित परिणामामुळे होणारा सन्निपातिक, मानसिक दुःखामुळे होणारे आणि विषबाधेमुळे होणारे असे सहा प्रकारात करतो. चरक मात्र पहिल्या चार कारणानंतर आगन्तु (पूर्वजन्मीची पापे आणि बाहेरची बाधा) असा पाचवा प्रकार सांगतो.
विनयपिटकातील महावग्गात कुमारभृत्य जीवकाने जुनाट डोकेदुखीची तक्रार असणाऱ्या एका व्यापाऱ्याची कवटी उघडून दोन पाणिका (शब्दशः किडे, प्रत्यक्षात?) काढले, असा उल्लेख आहे. पण जीवकाचे लेखन उपलब्ध नसल्यामुळे त्याचे मेंदूविषयक मत कळत नाही.
शरीररचनेचा अभ्यास (अॅनाटमी) हा वैद्यकशास्त्राचा महत्त्वाचा भाग. त्यातही शल्यचिकित्सेबद्दल प्रसिद्ध असलेल्या सुश्रुताच्या संहितेत त्याविषयी माहिती असायलाच हवी. कारण ‘निदाने माधवः श्रेष्ठः सूत्रस्थाने तु वाग्भटः। शारीरे सुश्रुतः प्रोक्तं चरकः तु चिकित्सिते’ असे एक वचन आहे. म्हणजे लक्षणांच्या बाबतीत माधव, तत्त्वांच्या बाबतीत वाग्भट, उपचाराच्या बाबतीत चरक तर शरीररचनेच्या बाबतीत सुश्रुत हे श्रेष्ठ, आयुर्वेदीय प्रथेनुसार शरीराची रचना व क्रिया यांची माहिती शारीरस्थान या विभागात येते. सुश्रुत संहितेत या विभागात सजीवावस्था, वीर्य आणि शोणिताची शुद्धी, गर्भावस्था, गर्भावस्थेतील भ्रूणविकास, शरीररचना, शरीरातील मर्मस्थाने, शिरांचे वर्गीकरण आणि वर्णन, शीरच्छेदन (व्हेनेसेक्शन), रक्तवाहिन्या, नलिका आणि शिरा यांचे वर्णन, गर्भवती स्त्रियांची शुश्रूषा या क्रमाने प्रकरणे येतात. यांतला पाचवा अध्याय शरीरसंख्या व्याकरण हा शरीररचनेचा. पण आधुनिक अर्थाने या विभागाला वर्णनात्मक शरीररचनाशास्त्र किंवा शरीरक्रियाशास्त्र म्हणता येणार नाही. मानवी शरीराचा अभ्यास शवविच्छेदनाने (शारीर. 5.46-49) करण्याचा आग्रह धरणाऱ्या सुश्रुताच्या ग्रंथातल्या शारीरस्थानात, मेंदू आणि मज्जारज्जू यांविषयी कोणताही उल्लेख अजिबात नसणे याचा अर्थ लागत नाही. चरकाच्या शारीरस्थानात (7.15) मस्तिष्कस्यार्धांजली (मेंदूचे आकारमान अर्ध्या ओंजळीएवढे ) आणि भेलाच्या शारीरस्थानात (4.6) मस्तिष्कस्यांजलिः (मेंदूचे आकारमान एका ओंजळीएवढं) एवढेच (आणि विसंगत) उल्लेख आहेत. वाग्भटाच्या अष्टांगहृदयात दिलेल्या मापनप्रणालीनुसार एक ओंजळ म्हणजे आजचे 384 ग्रॅम. (www.ayurbhishak. wordpress.com) अर्थातच मेंदूचे प्रत्यक्ष आकारमान (सरासरी 1200 घनसेमी) किंवा वजन (सुमारे दीड किलो) हे खूपच जास्त आहे.
भारतीय योगमार्गात तंत्रमार्ग प्रसिद्ध आहे. नर्व्हस सिस्टमला तंत्रिका तंत्र असाही प्रतिशब्द असल्यामुळे (विश्वकोशातही तो आहे) आणि तंत्रमार्गात मेरूदंडातून जाणाऱ्या सुषुम्ना नाडीचा उल्लेख असल्यामुळे तंत्रमार्गी लोकांना अॅनाटमीचे ज्ञान होते, असा दावा काही लोक करत असतात. कंडलिनी जागृत झाल्यानंतर मेरूदंडातून मस्तकाकडे जाते त्या मार्गावरची सहा चक्रे हे प्रत्यक्षातले नर्व्ह प्लेक्सस आहेत, भ्रमध्यामागील आज्ञा चक्र म्हणजे पिनियल बॉडी आणि मस्तकातील सहस्रार चक्र म्हणजे पिट्युटरी ग्रंथी आहे, असाही त्यांचा दावा असतो. प्रत्यक्ष शरीररचनेशी तंत्रमार्गातील बहुतेक तपशील जुळत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे तत्कालीन वैद्यकशास्त्रात यासंबंधी काहीच उल्लेख आढळत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर प्राचीन भारतातील विद्वानांना मेंदूबद्दल फारशी माहिती नव्हती, असेच म्हणावे लागेल. जाणिवांचे आणि मनाचे स्थान हृदयात आहे याबद्दल त्यांची पक्की खात्री होती. नागार्जुनाने (इ.स. दुसरे शतक) सुरू केलेली रसचिकित्सा ही आयुर्वेदात पडलेली शेवटची भर. त्यानंतर केवळ संग्रह, शास्त्रार्थ, आणि (सुलभीकरण या अर्थाने) टीका झाल्या. नवव्या शतकानंतर निवृत्तिमार्गाचा पुरस्कार झाल्यामुळे संशोधनच खुंटले; त्यामुळे असलेल्या ज्ञानात काहीही बदल होऊ शकला नाही. बहुतेक संत हे भक्तिमार्गी आणि विरक्त वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी डोक्याच्या आत काय आणि कशासाठी आहे याकडे फारसे लक्ष दिले नसावे, म्हणून त्यांच्या वाङ्मयातही मन, चित्त, बुद्धी हे सगळे आले असले तरी मेंदू आल्याचे आढळत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.