ज्ञानाची आस विज्ञानाच्या प्रत्येक शास्त्रशाखेची विचार करायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, स्वतंत्र असते. त्या त्या ज्ञानशाखेशी सुसंगत असते.
डीएनएचा शोध लावणारा फ्रान्सिस क्रिक हा मुळातला भौतिकीतज्ज्ञ. त्याने जेव्हा जैवविज्ञानात संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्याला भौतिकविज्ञानाची विचारपद्धती सोडून देऊन जैवविज्ञानाची विचारपद्धती अंगीकारावी लागली होती. माझ्यासाठी हा जणू पुनर्जन्मच होता, असे त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहूनच ठेवले आहे!
विज्ञानाच्याच दोन शाखांमध्ये विचार करायच्या पद्धतीत जर एवढे वेगळेपण तर ललितसाहित्याची विचारपद्धती किती निराळी असेल ते सांगायलाच नको. तत्त्वज्ञानाची विचारसरणी तर आणखीच वेगळी असणार.
जेव्हा एखाद्या ज्ञानशाखेचा प्रभाव दुसऱ्या ज्ञानशाखेवर पडतो तेव्हा प्रभाव पडलेल्या ज्ञानशाखेत काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या गृहीतकांवर त्या ज्ञानशाखेचा डोलारा उभा असतो, त्याच्या पायालाच धक्का देणाऱ्या काही संकल्पना समोर येऊ शकतात.
पण या संघर्षातून नवीन ज्ञानाचे नवनीत निर्माण होण्याची शक्यताही असते. आज मेंदू-विज्ञान तत्त्वज्ञानावर प्रभाव पाडत आहे. याचे तरंग तत्त्वज्ञानात उठत आहेत. त्यांचे स्वरूप अजूनही अस्पष्ट, धूसर आहे. नवीन ज्ञानाची आस मेंदू-विज्ञानाला आहे तशीच तत्त्वज्ञानालाही आहे.
या स्थितीचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.