कुटुंबनियोजन, बालसंगोपन ह्यांविषयीच्या धारणा, त्याच्याशी निगडित तंत्रविज्ञान व सामाजिक संस्था ह्यांच्यामुळे स्त्रियाही सड्या राहू शकतात. म्हणून आता सत्ता, मत्ता व प्रतिष्ठा ह्यांच्यासाठी पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असण्या-स्वीकारण्याची अपरिहार्यता फारशी उरली नाही. ही तशी चांगलीच घडामोड असली तरी एक प्रकारची दिशाभूल ह्या कारणाने झाली आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था व संस्कृती एवढी दृढमूल झालेली आहे की, त्या चौकटीत समानता, स्वतंत्रता व मुक्तता साधण्यामध्ये स्त्रिया समाधान मानीत आहेत, पण ह्याची एक अलिखित शर्त अशी आहे की ज्यांना समान, स्वतंत्र व मुक्त व्हावयाचे असेल त्या स्त्रियांनी जवळपास पुरुषाचाच अवतार धारण केला पाहिजे. सत्ता, मत्ता, प्रतिष्ठा ह्यांच्याभोवती साऱ्या व्यवहारांचे संघटन तसेच कायम राहते. प्रत्यक्ष व्यवहारात ह्याचा परिणाम काय होतो, तर स्त्रियांमध्ये एक लहान वर्ग, जो पुरुषासारखा बनू पाहतो व बनतो, तो पुरुषसत्ताक पद्धतीचे लाभ पदरात पाडून घेतो. तसे करताना स्त्रिया म्हणून मिळणारे खास लाभही त्यांना मिळत राहतात. पण बहुसंख्य स्त्रियांची स्थिती विशेष बदलत नाही. पन्नास वर्षांच्या तुलनेने कुटुंबनियोजन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे पुष्कळ मोठ्या संख्येने स्त्रिया चूल आणि मूल ह्या घाण्याला जुंपलेल्या राहिल्या नाहीत. हा बदल अत्यंत स्वागतार्ह आहे. पण ह्या आधुनिक, सुधारकी, मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांचे स्थान गौणच राहिले. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारांनी त्यांची पिळवणूक होतच राहिली.
वसंत पळशीकर
लिंगभेद एक चिंतन मधून