[भारतात पाण्याच्या समस्या बहुतकरून तुटवड्याशी संबंधित असतात. एकच क्षेत्र असे आहे, जिथे नद्यांचे पर महत्त्वाचे असतात, आणि तेही दरवर्षी. हे क्षेत्र म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून गंगा नदीपर्यंतचे.
या क्षेत्रातील नद्यांचा प्रेमाने अभ्यास करणारा महाभाग म्हणजे डॉ. दिनेश कुमार मिश्रा. सुमारे अर्धशतकाच्या काळात या टाटानगरस्थित अभियंत्याने उत्तर बिहारमधील नद्यांचा अत्यंत तपशीलवार अभ्यास करून साठेक.पुस्तके व शोधनिबंध लिहिले आहेत. यांपैकी जागतिक दर्जाचा पूर-तज्ज्ञ ही कीर्ती मिळवून देणारी प्रकाशने इंग्रजी आहेत पण मिश्रा आवर्जून सुघड, सुलभ हिंदीतून आम आदमी साठीही लिहितात.
बाया पेड बबूल का हे पूरनियंत्रणावरील पुस्तक म्हणजे मिश्रांच्या बाढमुक्ति अभियाना चा जाहीरनामा आहे. सोबतच सुट्या नद्यांवरील पुस्तके आहेत, प्रेमापोटी लिहिलेली. कोसी नदीच्या कहाणीचे नाव आहे. उम्रकैद से सजा ए मौत तक. महानंदेची कथा बंदिनी महानंदा ही. कोसीचीच व्यथा पुन्हा एकदा दुई पाटन के बीच में मध्ये येते. बागमतीचे हाल बागमती की सद्गति नावाने भेटतात.
आज मिश्रा गंडकवर काम करत आहेत. ]
बिहारमधील पूर ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. सालाबादाप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जसे गणपतीचे आगमन होते त्याप्रमाणेच दरवर्षी न चुकता बिहारमध्ये पूर येतात आणि हाहाकार माजवतात. या पुराच्या बातम्या आपण नेमाने पेपरमध्ये वाचतो आणि टीव्हीवर पाहतो. पुरामध्ये बुडलेली शेकडो गावे, कमरेइतक्या पाण्यातून चालणारी किंवा झाडावर अडकलेली माणसे, आम्ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणत आहोत असे वक्तव्य करणारे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी, यांची आता आपल्याला इतकी सवय झालेली आहे की यात नवीन ते काय?’ असे तम्ही म्हणाल. परंतु या सर्व गोष्टींची दुसरी बाजू आपल्यासमोर मांडली आहे डॉ. दिनेशकुमार मिश्र यांनी त्यांच्या बागमती की सद्गति!’ या पुस्तकात. .
गेल्या पंचवीस वर्षांपासून दिनेशकुमार हे भारतातील नद्या आणि त्यांची पूरपरिस्थिती यांचा अभ्यास करत आहेत. या पुस्तकात त्यांनी बागमती नदीचा उगम, तिचे बदलते प्रवाह, तिथला भूप्रदेश (topography), बागमती खोऱ्यातील पूर आणि सिंचनाचे प्रश्न, त्यावरील शासनाच्या उपाययोजना, आपात्कालीन सेवा-सुविधांची स्थिती, नदीच्या काठावर राहमाऱ्या लोकांवर पडणारा पुराचा प्रभाव, आणि या सर्व परिस्थितीत राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व यांची भूमिका अशा वेगवेगळ्या अंगांनी बिहारमधील पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे. अतिशय साधी सरळ भाषा, मुद्देसूद मांडणी, तरीही तांत्रिक बाबींवर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आपल्या खास शैलीत दिनेशकुमार यांनी योग्य उदाहरणे आणि संदर्भ देऊन विषय समजावून सांगितला आहे.
बागमती नेपाळमध्ये काठमांडू खोऱ्यात उगम पावते आणि बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील देंग येथे भारतात प्रवेश करते. नेपाळमध्ये या नदीची लांबी 195 कि.मी. असून एकूण जलग्रहण क्षेत्र 7884 चौ.कि.मी.चे आहे. उत्तर बिहारमधील पूरपरिस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी बागमती नदीचे स्वरूप आणि त्या प्रदेशाची रचना (topography) समजून घेणे गरजेचे आहे.
बागमतीचा उदय हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये आहे जो वयाने जगातील सर्वांत तरुण पर्वत असून मऊ अशा चुनखडीने बनलेला आहे. त्यामुळे इतर कोणत्याही हिमालयात उगम पावणाऱ्या नदीप्रमाणे बागमती हिमालयातून वाहताना खूप मोठ्या प्रमाणात गाळ वाहन आणते. यामध्ये मुख्यत्वेकरून दगड, वाळू आणि मातीचे बारीक कण यांचा समावेश असतो. याशिवाय हिमालयामध्ये नदीच्या पात्राचा उतार अतिशय तीव्र असल्याने नदीचा वेगही अधिक असतो. परिणामी नदी बऱ्याच जास्त प्रमाणात गाळ वाहून आणते. हिमालयातून सपाट तराई प्रदेशात उतरल्यानंतर नदीला चह दिशांना पसरायची संधी मिळते, नदीचा प्रवाह मंदावतो आणि नदी संथपणे वाहू लागते. त्यामुळे नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता घटते. दगड आणि वाळू यांसारख्या जड गोष्टी नदीच्या तळाशी जाऊन बसतात. तुलनेने हलके असलेले मातीचे बारीक कण नदी पात्राच्या खालच्या बाजूस दूर अंतरावर जाऊन स्थिरावतात, अशा प्रकारे उगमाजवळील प्रदेशात क्षरण (erosion), नंतर वहन आणि सपाट प्रदेशात वाहून आणलेल्या गाळाचे स्थिरीकरण (deposition) ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पात्रातील गाळाच्या निक्षेपणामुळे (deposition) नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. ही प्रक्रिया अशी सतत वर्षानुवर्षे चालू राहते. जर नदीचे काठ भकम नसतील तर नदी या अडथळ्यावर मात करण्यासाठी पात्र बदलते आणि नदीचा प्रवाह नव्या दिशेने वाहू लागतो. पात्र बदलण्याची ही प्रक्रिया दोन गोष्टींवर अवलंबून असते, नदीच्या प्रवाहातील गाळाचे प्रमाण आणि काठाची रचना. उत्तर भारतात गंगेच्या खोऱ्यातील गाळाच्या सपीक मैदानी प्रदेशात या दोन्ही गोष्टी अनकल असल्यामळे तेथे पात्र बदलणाऱ्या नद्यांचे प्रमाण जास्त आहे.
या व्यतिरिक्त हिमालय पर्वतरांगा ओलांडल्यानंतर बागमतीच्या पात्राचा उतार अचानकपणे बदलतो आणि कोसी नदीच्या संगमापर्यंत नदी सपाट प्रदेशातून मार्गक्रमण करते. डेंग येथे नदीच्या पात्राचा उतार 53 सें.मी. प्रति कि.मी. (0.053%) इतका आहे जो हायाघाट येथे 14 सें.मी. प्रति कि.मी. (0.014%) इतका कमी होतो (हायाघाट ढेंगपासून 196 कि.मी. अंतरावर आहे.). त्याही पुढे जाऊन उतार 4 सें.मी. प्रति कि.मी. (0.004%) इतका होतो. इतक्या कमी उतारावर नदीचे पाणी वाहू शकत नाही, ते फक्त हळूहळू पुढे सरकू शकते. अशा परिस्थितीत मार्गात येणारा लहानसा अडथळासुद्धा नदीचे पाणी वरच्या बाजूला कितीतरी अंतरापर्यंत मागे ढकलतो. यामुळेच पूर येऊन गेल्यानंतरसुद्धा बरेच दिवस या प्रदेशातील पाणी कितीतरी दिवस ओसरत नाही आणि लोकांना हलाखीचे. दिवस काढावे लागतात.
सपाट भूप्रदेशामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन होते. परिणामी पात्राच्या पाणी वहनक्षमतेमध्ये घट होते. अशावेळी जेव्हा नदीच्या पात्रातील पाणी अचानक वाढते त्यावेळी पुढे सरकण्यास फारसा वाव नसल्यामुळे अधिकचे पाणी नदीचे काठ ओलांडून किनाऱ्यावर वसलेल्या गावांमध्ये शिरते आणि पूरसदृश स्थिती निर्माण करते. याउपर बागमती खोऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशी भौगोलिक रचना यामध्ये आणखीनच भर घालते. सामान्यतः जशीजशी नदी उगमापासून सागराकडे वाहते तसे तसे नदीच्या प्रवाहातील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. कारण एकतर नदीचे जलग्रहण क्षेत्र वाढते आणि मधल्या मार्गात अनेक स्थानिक प्रवाह नदीला थेट येऊन मिळतात. परंतु पुराच्या वेळी बागमतीच्या ढेंग ते हायाघाट या 196 कि.मी. च्या प्रवासात नेमकी उलट परिस्थिती पाहावयास मिळते. 1975 च्या पुराच्या वेळी बागमतीचा प्रवाह हायाघाटपेक्षा ढेंगला जास्त होता, याचा अर्थ जे पाणी ढेंगहून वाहून हायाघाटला थेट पोहचणे अपेक्षित होते ते सर्व ढंग ते हायाघाटच्या मधल्या पट्ट्यात पसरले होते. ह्या सर्व मधल्या पट्ट्याचा भौगोलिक आकार पाहता तो एका पसरट बशीसारखा आहे. आणि जोपर्यंत ही बशी पूर्ण भरून ओसंडून वाहणार नाही तोपर्यंत पाणी पुढ सरकूच शकत नाही. अश्या वेळी बागमतीचे पाणी तिच्या उपनद्यांच्या पात्रांत उलट दिशेने शिरते आणि तेथेसुद्धा पूरसदृश स्थिती निर्माण करते. या । वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे ढेंग ते हायाघाटच्या दरम्यान वसलेल्या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसतो. यामधल्या पट्ट्यातील गावांना बुडविल्याशिवाय बागमती पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे दिनेशकुमार म्हणतात की जरी सिंचन आणि पूर नियंत्रण विभाग आणि राजकीयनेते कितीही बढाया मारत असले तरीही उत्तर बिहार हा कधीच, पूरमुक्त होऊ शकत नाही.
हे सर्व पाहता लक्षात येते की, या प्रदेशाला पूर हे काही नवीन नाहीत. हजारो वर्षांपासून लोक या ठिकाणी राहात आहेत आणि पूरपरिस्थितीला तोंड देत आहेत: तरीसुद्धा या प्रदेशात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. सन 2001 च्या जनगणनेनुसार सीतामंढी, शिवहर, मुज्जफरपूर आणि दरभंगा या जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता अनुक्रमे 1169, 1165, 1179 आणि 1146 प्रति चौ. कि.मी. इतकी होती, जी बिहारमधील इतर जिल्ह्यांपेक्षा कितीतरी जास्त होती. (जर आपण या आकड्यांची महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या घनतेशी तुलना केल्यास असे आढळून येते की मुंबई वगळता ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांची लोकसख्येची घनता सर्वाधिक असून ती अनुक्रमे 850 आणि 462 प्रति चौ.कि.मी. इतकी आहे.) मग प्रश्न उद्भवतो, की दरवर्षी पुरासारख्या भयावह परिस्थितीला तोड द्यावे लागत असूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी का राहतात?
कारण एकच आहे सुपीक गाळ! पुराच्या वेळी बागमतीचे पाणी संपूर्ण खोऱ्यात पसरते आणि वाहून आणलेला सुपीक गाळ सर्वत्र पसरवते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. चिमूटभर खत न टाकतासुद्धा या प्रदेशात शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन घेतो. तसेच पूरपरिस्थितीत पाणी सर्वदूर पसरते. परिणामी भूजल पातळी उंचावते. या ठिकाणी स्थानिक जनतेला कधीच दुष्काळाचा सामना करावा लागत नाही. दिनेशकुमार लिहितात की, हा भाग जेथे आपल्याला दूरवरून डोक्यावरून आणि कमरेवरून पाण्याचे हंडे भरून आणणाऱ्या स्त्रिया पाहावयास मिळत नाहीत अशा भारतातील मोजक्याच भागांपैकी आहे. पाण्याची उपलब्धता आणि गाळाच्या सुपीक शेतजमिनी, यामुळे हजारो वर्षांपासून मानवजातीने हा प्रदेश वास्तव्यासाठी निवडलेला आहे. आजही बागमतीच्या खोऱ्यात एकेकाळी आम्ही खरीप आणि रबीच्या हंगामात पेरणी केल्यानंतर फक्त कापणीसाठीच शेतात पाऊल ठेवायचो, असे सांगणारे शेतकरी सापडतात, पण दिवसेंदिवस त्यांची संख्यासुद्धा कमी होत चालली आहे. जरी पुराच्या वेळी प्रचंड नुकसान होत असले, तरी प्रत्येक पुरानंतर शेतकऱ्यांना खूप चांगले उत्पादन मिळते. जर पूर ही या प्रदेशातील मुख्य समस्या असती तर येथील लोकांनी या भागातून कधीच पलायन केले असते. पण खरी परिस्थिती तर अगदी उलटच आहे.
लेखक लिहितो की, पूरपरिस्थितीत राहणाऱ्या मानवी समुदायांनी हजारो वर्षांच्या अनुभवातून पुराला तोंड देण्यासाठी जीवनशैली आणि संस्कृती विकसित केलेली आहे. त्यांमध्ये प्रामुख्याने अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धती, इंधन, चारा, आणि पिण्याचे पाणी यांचे व्यवस्थापन, सुरक्षित स्थानाची निवड, दळणवळणाची साधने, पारंपरिक औषधे आणि शेतीच्या पद्धती यांचा समावेश होतो. परंतु या आधुनिकतेच्या जगात आपण या ज्ञानाकडे दुर्लक्ष करत आहोत.
या पूरपरिस्थितीपासून बचाव करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे प्रवाहाच्या दोन्ही काठावर तटबंदीच्या स्वरूपात मोठमोठाल्या भिंती उभ्या करणे, जेणे करून नदीचे पाणी फक्त तटबंदीदरम्यान वाहेल; आणि आजूबाजूच्या गावांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण होईल. आणि गेल्या 50 वर्षांपासून वेगवेगळ्या सिंचन आणि पूर नियंत्रण योजनांच्या माध्यमातून आपण हेच करत आलेलो आहोत. बागमती नदीची बिहारमधील एकूण लांबी आहे 394 कि.मी. आपण आतापर्यंत या नदीच्या दोन्ही काठांवर सुमारे 450 कि.मी. लांबीच्या तटबंद्या बांधल्या आहेत, किंवा लोक ती बांधण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत हजारो करोड रुपये खर्च केल्यानंतरसुद्धा तटबंदी बांधावी किंवा बांधू नये हा वादाचा विषय आहे. या विषयावर इंजीनियरांच्या विश्वातसुद्धा ठाम असे एकमत नाही.
इंजीनिअर्सच्या एका गटानुसार, तटबंदी उभारल्यामुळे नदीला तटबंद्यादरम्यानच वाहावे लागते. परिणामी नदीच्या पात्राची रुंदी कमी होते आणि प्रवाहाचा वेग वाढतो. वेग वाढल्यामुळे नदीची क्षरण क्षमता वाढते. त्यामुळे नदीचे दोन्ही काठ व तळ यांची मोठ्या प्रमाणात झीज होते. ही झीज झाल्यामुळे नदीपात्राचा अनुच्छेद (cross-section) वाढता आणि नदीची प्रवाह क्षमता वाढते. त्यामुळे पुराचे अतिरिक्त पाणी लवकर वाहून जाते आणि सभोवतालच्या प्रदेशांचे त्यापासून संरक्षण होते. परंतु वास्तवात नदीच्या प्रवाहाचा वेग वाढतच नाही. कारण नदीच्या पात्राचा उतार खूपच कमी असतो. याउलट तटबंधांच्या रचनेमुळे नदीने वाहून आणलेल्या सर्व गाळाचे संचयन नदीच्या पात्रातच होते. सततच्या या संचयनामुळे नदीचा तळ वर उचलला जातो. सोबत पूरनियंत्रण रेषेची (flood line) पातळीसुद्धा उंचावते. याचा परिणाम असा होतो की, वारंवार तटबंदी भक्कम करावी लागते आणि तिची उंची वाढवावी लागते. परंतु तटबंदीच्या या भक्कमीकरणाला आणि उंची वाढविण्याला स्वतःच्या अशा काही व्यावहारिक मर्यादा असतात. कधीतरी पुराचे पाणी इतके वाढते, की ते तटबंदीच्या वरून वाहू लागते आणि तटबंदी फुटते. कधी कधी पुरातील पाण्याच्या दबावामुळे तटबंदीला तडे जातात. तटबंदी बांधल्यानंतर उंदीर, कोल्हे यांसारखे प्राणी तटबंदीमध्ये बिळे करतात. पुरादरम्यान पाणी बिळांमध्ये शिरते आणि पाण्याच्या दबावामुळे तटबंदीला भेगा पडतात. तटबंदीची पडझड होते. अशा परिस्थितीत जर तटबंदी फुटली तर सुरक्षित क्षेत्रातील गावेच्या गावे वाहून जातात.
याशिवाय तटबंदीच्या स्वतःच्या अशा काही समस्या आहेत. तटबंदीच्या रचनेमुळे स्थानिक प्रवाहांचे पाणी नदीत मिसळण्यावर बंधने येतात. त्यामुळे हे पाणी मागच्या बाजूला उलट दिशेने वाहू लागते. किंवा तटबंदीच्या बाहेरील बाजूने नदीच्या प्रवाहाला समांतर दिशेने वाहू लागते.या दोन्ही परिस्थितीमध्ये तटबंदीच्या बाहेरील बाजूस सुरक्षित क्षेत्रात वसलेल्या गावांना याचा त्रास सहन करावा लागतो. मग याच्यावर पर्याय राहतो तो म्हणजे, जेथे स्थानिक प्रवाह मुख्य पात्रास मिळतो तेथे स्लुईस गेट बांधण्याचा. परंतु स्लुईस गेटलाही स्वतःच्या अश्या काही मर्यादा आहेत. एकतर स्लुईस गेट बांधल्यानंतर ते काम करत नाहीत. पावसाळ्यात स्लुईस गेटच्या खालच्या बाजूस दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे त्यांचे संचलन नीट होऊ शकत नाही. तसेच अतिवृष्टीच्या काळात स्लुईस गेट उघडणे धोक्याचे असते, कारण मुख्य प्रवाहाच्या पाण्याची पातळी स्थानिक प्रवाहाच्या पातळीपेक्षा जर जास्त असेल, तर मुख्य प्रवाहातील पाणी उलटे स्थानिक प्रवाहात शिरून सुरक्षित क्षेत्रात हाहाकार माजविण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण पावसाळा संपल्यानंतर जेव्हा मुख्य प्रवाहातील पाण्याची पातळी ही स्थानिक प्रवाहाच्या पाण्याच्या पातळीपेक्षा खूप कमी असते तेव्हाच स्लुईस गेटचे संचलन होऊ शकते.
जेव्हा स्लुईस गेटच्या वापरावर बंधने येतात, त्यावेळी आणखी एक पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे स्थानिक प्रवाहाच्या काठांवरसुद्धा तटबंदी बांधण्याचा. तरीही पुराच्या पाण्यापासून सुरक्षित क्षेत्राचे रक्षण होईल याची काही शाश्वती नाही. कारण दोन्ही प्रवाहांवर तटबंदी बांधल्यानंतर या दोन्ही तटबंद्यांच्या मध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी कोणती वाटच उरत नाही. एक तर या पाण्याचे बाष्पीभवन होईल किंवा हे पाणी जमिनीत मुरेल. अन्यथा पंपाद्वारे हे पाणी बाहेर काढावे लागले. याउपर दिनेशकुमार म्हणतात, जर पंप वापरूनच पाणी बाहेर काढायचे असेल तर तटबंदी आणि स्लुईस गेटचे उपद्व्याप करायचेच कशाला? .
काहीवेळा विविध स्थानिक कारणांमुळे नदी प्रवाहाच्या फक्त एकाच बाजूला तटबंदी उभारणे शक्य होते आणि त्यामुळे प्रवाहाच्या पलिकडे वसलेल्या गावांवर सतत टांगती तलवार असते.
तटबंदीचा अजून एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे शेतीउत्पादनाला बसणारा त्याचा फटका. तटबंदीमुळे नद्यांनी वाहून आणलेला गाळ शेतजमिनीपर्यंत पोहचू शकत नाही. परिणामतः शेतजमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकता घटते. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ रासायनिक खते वापरण्यावाचून गत्यंतर नसते. या पुस्तकात दिनेशकुमार यांनी अशा कितीतरी उदाहरणांचा उल्लेख केलेला आहे, जेथे तटबंदी उभारल्यानंतर शेतीच्या उत्पादकतेत घट झालेली आहे. याउपर जेव्हा ही तटबंदी काही कारणामुळे फुटते त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाळू शेतजमिनीवर पसरते आणि शेतजमिनीचे नुकसान होते.
असे असतानासुद्धा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी तटबंदीचे समर्थनच करतात आणि विविध पूरनियंत्रण योजनांच्या अंतर्गत त्यांची उभारणी करतात. कधी कधी या तटबंद्यांच्या उपयोगितेबाबत आजसुद्धा तांत्रिक जगतात द्वंद्व आहे. याबाबत दोन्ही बाजूने आपापली मते पुढे रेटणाऱ्या तंत्रकुशल लोकांची काही कमतरता नाही. बऱ्याच वेळा तटबंदी उभारण्याचा निर्णय हा सामाजिक आणि राजकीय असतो. इंजीनिअर्सना याबाबतीत कोणीच विचारात घेत नाही. बहुतांश वेळा सामाजिक आणि राजकीय दबावाचा अंदाज घेऊनच इंजीनियर्स मंडळी तटबंदीच्या बाजूने किंवा विरुद्ध मते प्रदर्शित करतात. अनेक वेळा काही चलाख मंडळी, “प्रत्येक प्रवाह आणि प्रवाहातील गाळाचे स्वरूप हे वेगवेगळे असते, त्यामुळे तटबंद्यांच्या उपयोगितेबाबत काही ठोस विधाने करणे शक्य नाही.” इ. कारणे सांगून तटबंदीच्या धर्मसंकटातून आपली सुटका करून घेतात.
प्रशासन आणि राजकीय नेते यांनी तटबंदीविषयी कोणतेही निर्णय घेतले तरीही ते स्थानिक लोकांच्या दृष्टीने धोक्याचेच असतात. तटबंदी बांधल्यानंतर सुरक्षित क्षेत्रात वास्तव्य करणारे लोक कधीच सुरक्षित नसतात. असे अनेकदा म्हटले जाते की, तटबंदीच्या आतमध्ये, नंदी-पात्रात राहणारे लोक अधिक सुरक्षित असतात. त्यांना किमान नदीच्या वाढत्या पाण्याचा अंदाज असतो. परंतु अचानक तटबंदीला तडे जाऊन मलपुरात लोटल्या जाणाऱ्या लोकांची अवस्था अत्यंत दयनीय असते. दिनेशकुमार म्हणतात, लोक नैसर्गिक पुराला तोंड देऊ शकतात परंतु तटबंदीमुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती लोकांच्या आवाक्याबाहेरची असते. अशावेळी जलमय परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गावातील लोक मिळून तटबंदी तोडून पाण्यासाठी वाट मोकळी करून देतात. याला प्रत्युत्तर म्हणून प्रशासन पोलिसांना पाचारण करते आणि गावकऱ्यांवर कोर्टात खटले दाखल करते. दिनेशकुमार यांनी अशा अनेक घटनांचे दाखले पुस्तकात दिलेले आहेत.
अशाच एका मेदिनीपूर गावाचे उदाहरण देताना लेखक म्हणतो, की मेदिनीपूर गाव (जि. कटीहार, विकासखण्ड – मनिहारी) हे महानदी, कोसी, आणि गंगा अश्या तीन नद्यांनी वेढलेले आहे. पूर्वी जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळी गावात पाण्याची पातळी वाढायची पण कोणत्याही नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर गावातील पुराचे पाणी ओसरून जात असे, आणि परिस्थिती पूर्वपदावर येत असे. पण आता तटबंदी बांधल्यानंतर पुराचे पाणी आतमध्ये अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच भयावह होते. आणि त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी सरकारी अधिकारीच स्वतःच्या देखरेखीखाली तटबंद्या फोडतात.
या अनेक समस्यांशिवाय, तटबंद्या बांधण्यासाठी शासनाला सुरुवातीला शेकडो हेक्टर जमीन संपादित करावी लागते. अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागते. आणि इतर कोणत्याही अशा प्रकारच्या प्रकल्पांसारखेच येथील पुनर्वसनाचे प्रश्नदेखील गंभीर आहेत. याची विविध सखोल उदाहरणे दिनेशकुमार यांनी दिलेली आहेत.
या पुस्तकाच्या एका स्वतंत्र प्रकरणामध्ये शासकीय यंत्रणा पूरपरिस्थितीला कशा प्रकारे सामोरी जाते याचे विवेचन केलेले आहे. पुराच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी फक्त मदतकार्य करणे येवढेच उद्दिष्ट फक्त शासकीय यंत्रणेचे आता राहिलेले आहे. स्वयंसेवी संस्थासुद्धा याला अपवाद नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निधी उभा करून त्याचे वाटप करणे एवढीच सोईस्कर भूमिका स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारलेली आहे. परंतु मूल प्रश्नाकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. याउपर मदतकार्यामुळे लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. मदतकार्याच्या वाटपाच्यावेळी होणाऱ्या दंगली आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला करावा लागणारा गोळीबार अश्या घटनांची संख्या बागमती खोऱ्यात दिवसेंदिवस वाढतच आहे.
याशिवाय बागमतीच्या पुराला एक आंततरराष्ट्रीय बाजूसुद्धा आहे. नेपाळ आणि भारत अशा दोन देशांतून मार्गक्रमण करणाऱ्या या नदीच्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही देशांतील तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.कारण आपण बागमतीच्या खालच्या बाजूस (downstream) राबविलेल्या पूरनियंत्रण उपक्रमांवर बागमतीच्या वरच्या बाजूस (upstream) नेपाळ सरकारने हाती घेतलेल्या प्रकल्पांचा परिणाम होतो. जर नेपाळ सरकारने पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी तटबंद्यांची उंची वाढवली तर आपल्याला आपला भूभागातील तटबंद्यांची उंची वाढविणे भाग पडते. याविषयी गेली पन्नास वर्षे दोनेही देशातील तज्ज्ञ मंडळींमध्ये चर्चा आणि बैठका होत आहेत परंतु अजूनही एकमत झालेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते बागमतीच्या वरच्या बाजूस नेपाळमध्ये धरणे किंवा बॅरेज बांधून या समस्येवर मात करता येईल. परंतु याविषयीसुद्धा दुमत आहे. बहुतांश वेळा राजकीय नेते, माध्यमे आणि काही प्रसंगी तज्ज्ञ मंडळीसुद्धा भारतातील पूरपरिस्थितीचे खापर नेपाळ सरकारवर फोडतात, परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नाही.
याशिवाय दिनेशकुमार यांनी बागमती नदीच्या विविध अंगांचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने बागमतीची सिंचन प्रकल्प आणि त्यातील अपयश, नदीचे प्रदूषण आणि नदीकिनारी तयार झालेल्या कायमस्वरूपी पाणथळ जमिनी, आदि विषयांचा समावेश करता येईल.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात दिनेशकुमार म्हणतात की पुराचे प्रश्न सोडविण्यासाठी या सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टिकोणातून बघण्याची गरज आहे. ते लिहितात, “उत्तर बिहार में बाढ़ कभी आपदा नहीं थी, यह एक जीवशैली है।” आपण पुराच्या पाण्याला अडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पूर आल्यानंतर पुराचे पाणी लवकरात लवकर कसे ओसरेल याविषयी विचार करण्याची गरज आहे. याचे स्पष्टीकरण देताना लेखक म्हणतात की “पूर ही या प्रदेशाची गरज आहे कारण त्यामुळे बागमती खोऱ्याची सुपीकता टिकून राहणार आहे.” याबाबतीत आपण काही गोष्टी स्थानिक लोकांकडून शिकण्याची गरज आहे. कारण वर्षानुवर्षांच्या समृद्ध अनुभवातून आणि ज्ञानातून तेथील समाजाने पूरपरिस्थितीला तोंड देणारी जीवनशैली विकसित केलेली आहे.
हे पुस्तक वाचताना लेखक दिनेश कुमार मिश्र यांनी घेतलेल्या अफाट परिश्रमाचा वारंवार प्रत्यय येतो. या पस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यांनी संदर्भसची दिलेली आहे. शासनाच्या विविध विभागांकडे असलेली माहिती आणि विविध अहवाल यांव्यतिरिक्त या पुस्तकाच्या लिखाणासाठी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्याही मलाखती घेतलेल्या आहेत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, फारसी भाषेमध्ये एक शब्द आहे ‘हर्फे – मुकर्रर’ म्हणजे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती. या पुस्तकाच्या रूपाने मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते काही नवीन नाही आहे. मी फक्त विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या गोष्टीच एका ठिकाणी क्रमबद्ध केलेल्या आहेत. कारण अशी गोष्ट जी पूर्वी कधीच सांगितली गेलेली नाही, ती माणसाला एकदम देवत्वाच्या पातळीवर जाऊन ठेवते. आणि एकदम नवीन गोष्ट सांगणे माझ्यासारख्या एका साध्या इंजीनिअरला शक्य नाही.
या पुस्तकामुळे बागमतीच्या खोऱ्यातील पूर आणि सिंचन यांच्या विविध पैलूंचा उलगडा आपल्याला होतो. एका नदीच्या खोऱ्यातील विविध घडामोडींचा आढावा घेणारे पुस्तक पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जरूर वाचावे असे आहे. त्याबद्दल आपण डॉ. दिनेशकुमार मिश्र यांचे आभार मानले पाहिजेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नद्यांवर असे अभ्यासपूर्वक लेखन करण्याची गरज आहे.
पुस्तक : बागमती की सद्गति
लेखक : डॉ. दिनेश कुमार मिश्र, प्रकाशक : लोक विज्ञान संस्थान, डेहराडून, पृष्ठ : 188, किंमत : रु.250
sachin.tisale@gmail.com