भारतासाठी जसे ‘मॅक्डोनाल्ड’ तसे उत्तर अमेरिकेसाठी ‘योगा’. दोन्हीही मूळ स्थानापासून दूर परदेशात पक्के रुजलेले. अमेरिकेतील शहरी आणि ग्रामीण परिसरातील व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, चर्चेस अगदी सिनेगॉग्समध्येही योगाचे शिकवणी वर्ग चालू असतात. अमेरिकेतील जवळपास सोळा लाख लोकांच्या दररोजच्या व्यायाम प्रकारात योगाच्या कोणत्या ना कोणता प्रकाराचा समावेश असतोच. त्यामुळे दररोजच अमेरिकेतील लोक योगाबद्दल काही ना काही बोलत असतात, अर्थात व्यायामाच्या अंगाने. त्यांच्या व्यायामात शरीराला ताण देणारे, श्वासोच्छ्वासाचे किंवा आसनाचे हठयोगी व्यायाम प्रकार मुख्यत: असतात. ही आसने शिकविण्यासाठी बी.के.एस. अय्यंगार अथवा शिवानंद यांच्या पद्धतीने शिकविणारे, पट्टाभी जोईस यांचा ‘अष्टांग विन्यासा’ किंवा ‘पॉवर योगा’ शिकविणारे किंवा नुकताच ‘हॉट योगा’चा कॉपीराईट मिळविणारे बिक्रम चौधरी यांच्या पद्धतीने शिकविणारे भारतीय मूळ असलेले शिक्षक असतात. विवेकानंद, शिवानंद यांच्या अनुयायांनी लोकप्रिय केलेला “ध्यानयोग” मात्र फारसा लोकप्रिय नाही. अमेरिकेतील लोकांचा ओढा आसनांकडेच आहे यात काहीच आश्चर्य नाही कारण भारतातही टीव्हीस्टार योगी बाबा रामदेवचे लाखो भक्त आसनाभीमुख योगच शिकतात.
अमेरिकेतील योग उद्योगाने आपल्या योग शिकवणीचा उगम कोठे आहे हे लपवून ठेवलेले नाही. उलट अमेरिकेसारखा जो देश तुलनेने तरुण आहे आणि सतत बदलत जाणारा आहे त्या देशात योगाची मानण्यात आलेली प्राचीनता (5000 वर्षापूर्वीची व्यायाम पद्धती वगैरे), पौर्वात्य अध्यात्मिक परंपराशी असलेला योगाचा संबंध अशा सर्व गोष्टी योगविक्री प्रक्रीयेतील एक भाग बनून गेल्या आहेत. नमस्ते करणे, ओमचे सूरयोजन, संस्कृत मंत्रांचे उच्चार ह्याही गोष्टी अमेरिकेतील योगाच्या भाग होऊन गेल्या आहेत. अमेरिकेतील योगाच्या अनेक स्टुडीओतून भारतीय शास्त्रीय संगीत किंवा कीर्तन संगीताची धून वाजविणे, सुगंधी वास, ओमची चिन्हे अशाप्रकारच्या उपखंडातील छोट्या-मोठ्या वस्तू लावून अध्यात्मिक वातावरण निर्मिती केले जाते. अय्यंगार योगशाळेत त्यांची सत्रांची सुरवात दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या योगसूत्रांचा निर्माता ‘पतंजली’ याच्या प्रार्थनेने केली जाते. काही शाळेत पतंजलीची मूर्तीही बसविलेल्या आहेत. हे हिंदूकरण काही तंतोतंत सजवलेले नसते. योग शिकविण्याचा परवाना मिळविण्यासाठी योगशिक्षकांना हिंदू तत्वज्ञानाची आणि धर्मग्रंथांची जुजबी ओळख असणे गरजेचे असते.
अमेरिकेतील हिंदूंना या सगळ्याचा सार्थ अभिमान वाटत असेल, असे एखाद्याला वाटेल. पण अमेरिकेतील हिंदूंची वकिली करणारी संस्था, “हिंदू अमेरिकन फौंडेशन” (Hindu American Foundation, एचएएफ)ला मात्र अभिमान वगैरे काही वाटत नाही. उलट अलीकडेच त्यांनी आरोप केला कि अमेरिकेतील योग उद्योग हिंदुत्वाकडून योगाची चोरी करीत आहे. आपले प्रत्येक ‘आसन’ बौद्धिक मालमत्तेची चोरी आहे हे ऐकून अमेरिकेतील लाखो लोकांना धक्काच बसला. कारण त्यांनी योगाच्या मातृ परंपरेला मान्यता दिलेली नाही. एचएएफचे सहसंस्थापक आणि मुख्य प्रवक्ता असीम शुक्ला हे आता त्यांच्या हिंदू साथीदारांना सांगत आहेत की “योग आपला आहे तो आपल्याकडे ‘वापस’ घ्या आणि अध्यात्मिक परंपरेच्या बौद्धिक मालमत्तेचा दावा ठोका.”
ही ‘योगवापसी’ मोहीम राबवणाऱ्या बहाद्दरांना अमेरिकेतील योग संस्था आणि इतर सांस्कृतिक संस्था, योगातील हिंदू चिन्हे आणि हिंदू कर्मकांडे यांची वाढती दृश्यात्मकता फारशी प्रभावित करू शकलेली नाही. त्यांची जेथे नजर जाते तेथे त्यांना हिंदूबाबतची न्यून भावना दडलेली वाटते. त्यांना वाटते की अमेरिकतील लोकांनी आता योगाचा विचार ‘पातंजलीच्या योगसूत्रा’ संदर्भात आणि हिंदुत्वाचा विचार ‘महान वेदांच्या’ संदर्भात केला पाहिजे. त्यांनी आता हिंदूंच्या संदर्भातील तो जुना पठडीबद्ध जात, गाय आणि आमटी (Indian curry) चा विचार सोडला पाहिजे. शुक्ला यांच्या भाषेत बोलायचे तर “हिंदुत्वाचा संबंध आता पवित्र गायीपेक्षा गोमुखासनाशी (एक कठीण आसन) जास्त तर रंगीबेरंगी आणि भटक्या साधूंपेक्षा अध्यात्मिक प्रेरणा देणाऱ्या पातंजलीशी जास्त आहे.” त्यामुळे ही ‘योग वापसी’ मोहीम ‘योगा’ वगैरेपेक्षा भारतीय मानसिकतेतील बचावात्मकता आणि हिंदू विद्व्तेबद्दलची अतिरंजित भावना यांचे विचित्र मिश्रण, संस्कृताळलेपण – हे जे हिंदू धर्माचे आणि संस्कृतीचे कंगोरे – आहेत त्याबद्दलच असल्याचे दिसून येत आहे.
न्युयॉर्क टाइम्सने आपल्या पहिल्या पानावर “योगावर मालकी कोणाची?” हा मुद्दा घेऊन चर्चा छेडली. त्यामुळे साऱ्या जगाचेच लक्ष याकडे वेधले गेले. पण त्याच्याही वर्षभर आधी या वादाची सुरुवात झाली होती. वाशिंग्टन पोस्टने प्रायोजित केलेल्या ऑनलाईन ब्लॉग वरून एचएएफचे शुक्ला आणि आधुनिक गुरु दीपक चोप्रा यांच्यात हे युद्ध खेळले गेले. शुक्लांची तक्रार होती की हिंदू पद्धती आणि कल्पना यांच्या आधाराने धंदा करत असताना चोप्रा ‘हिंदू’ हा शब्द टाळत आहेत. कारण चोप्रा स्वत:ला हिंदू ऐवजी ‘अद्वैत वेदांती’ असे संबोधतात. चोप्रांनी जाहीर केले की हिंदुत्वाकडे काही योगाचे पेटंट नाही. योगाचा जन्म ‘जाणीवेत आणि फक्त जाणीवेत’ हिंदुत्वाच्या कितीतरी आधी झालेला आहे, ब्रेड आणि वाईन एशु ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’च्याही आधीपासून अस्तित्वात होते. त्यामुळे ‘ब्रेड आणि वाईन’वर ख्रिश्चनांचा जितका दावा आहे तेवढाच हिंदूंचा ‘योगा’वर आहे. शुक्लानी त्यांना हिंदू वारश्याचा आदर न करणारा ‘नफेखोर तत्वज्ञानी’ म्हणून हिणवले तर चोप्रांनी त्यांच्यावर ‘हिंदू मूलतत्ववादी’ असल्याचा आरोप केला.
ना अनादी ना वैदिक
हा संपूर्ण वाद हिंदू इतिहासाच्या दोन सारख्याच मूलतत्ववादी दृष्टीकोनांचे दर्शन घडवितो. 21व्या शतकातील योग पद्धतीला जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या ‘योग-सूत्रां’शी जोडायचे आणि त्या दोन्हीची सांगड 5000 वर्षापूर्वीच्या ‘वेदां’शी घालायची हे या मांडणीचे अधोरेखित उद्दिष्ट आहे. दोन्हीतील फरक फक्त एवढाच आहे की दीपक चोप्रा योग हिंदुत्वाच्याही अगोदर अस्तित्वात होता असे म्हणत आहेत तर शुक्ला आणि एचएएफ संपूर्ण पाच हजार वर्षांचा वापर हिंदुत्वाच्या गौरवासाठी करत आहेत. चोप्रांच्या मते योग हा ‘पूर्वेकडील अमर्याद विद्वत्तेचा’ भाग आहे. तर ‘योग आणि वेद यात भेदच नाही ते अनादी काळापासून एकरूप आहेत’ असे एचएएफचे मत आहे.
पण वस्तुस्थिती ही आहे की, आज ज्याला ‘योगा’ म्हटले जाते ते अनादी काळापासून चालत आलेले नाही किंवा ‘वेदा’च्या अथवा ‘योगसूत्रां’च्या समानार्थीही नाही. उलट, आधुनिक योगाचा जन्मच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी झाला. हे हिंदू प्रबोधन काळाचे आणि भारतीय राष्ट्रवादाचे अपत्य आहे. ज्यात विज्ञान, उत्क्रांती, सुप्रजननशास्त्र, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती या बद्दलच्या पाश्चिमात्य कल्पनांनी ‘मातृ परंपरा’ म्हणून कळीची भूमिका पार पाडली. या काळात वेगवेगळ्या स्तरांवर प्रचंड सरमिसळ झाली, योग आणि तंत्राचे सुलभीकरण झाले. मूळच्या अमेरिकेतील पण भारतात प्रस्थापित झालेल्या थियासॉफिकल सोसायटीने ‘अध्यात्मिक विज्ञाना’च्या कल्पना भारतात प्रस्तावित केल्या आणि त्या सर्व कल्पना योगात अंतर्भूत करण्याचे काम योग प्रबोधनाचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी विवेकानंदानी केले.
परिणामी योगाचा जो शारीरिक कंगोरा होता त्याची सरमिसळ कवायत, जिम्नॅस्टिक्स आणि शरीर सौष्ठवाची तंत्रे यात होऊन त्याचा प्रचार स्वीडन, डेन्मार्क, ब्रिटन आणि इतर अनेक पाश्चिमात्य देशात झाला. हीच योगपद्धती ५००० वर्षापासून चालत आलेली आहे हे ठसविण्यासाठी या नवीन बदलांवर सर्जनशीलपणे योगसूत्रांचे आरोपण करण्यात आले, ज्या योगसूत्रांचे नेमके वर्णन ऑस्ट्रीयात जन्मलेल्या अघेहानंद भारती या हिंदू तांत्रिकाने, “ज्या लोकांनी ब्राम्हणी तत्वे स्वीकारली आहेत त्यांच्यासाठी बनविलेली सूत्रे” असे केले आहे. एचएएफचा आजचा आग्रह म्हणजे २० व्या शतकात जोरकसपणे चालविल्या गेलेल्या चुकीच्या जाहिरातबाजीच्या मोहिमेचा एक भाग आहे.
जरी ही समजूत सर्वदूर पसरवली गेली असली तरी आज हे आधुनिक गुरु जी आसने शिकवितात त्यापैकी बहुसंख्य आसने प्राचीन शिकवणीत कोठेच आढळत नाहीत. प्रचंड कर्मकांडी स्वरूपाच्या यज्ञाभिमुख असणाऱ्या वेदांना पातजंलीच्या शुद्ध जाणिवानुभवाच्या शोधाशी काहीच घेणे-देणे नव्हते. आणि खरोखरच, ज्या १९५ सूत्रांनी योगसूत्र बनले आहे त्यापैकी फक्त तीन छोटी सूत्रे पतंजलीनी आसनांसाठी घेतलेली आहेत. महाभारतात योगाचा उल्लेख ९०० वेळा आहे. पण आसनांचा मात्र फक्त दोन वेळा आहे आणि भगवद्गीतेत तर अजिबातच नाही.
योगाच्या आसनकेंद्रित, हठयोग अशा पद्धती अर्थातच आहेत. पण त्याचे प्रणेते आहेत ते जटाधारी, राख फासलेले साधू. ज्यांना एचएएफ पाश्चिमात्यांच्या कल्पनेच्या बाहेर ठेऊ इच्छिते. खरेतर हिंदू परंपरेत या शारीरिक योगाच्या पेटंटवर जर कोणाचा हक्क असेल तर तो या जात धुडकावणाऱ्या, गांजेकस, लैंगिक मुक्ताचारी असणाऱ्या, शिव आणि शक्तीला जादूटोण्यासाठी पुजणाऱ्या, रसायनांची किमया साधणाऱ्या आणि लोहार, कुंभार यांच्यासारखे कौशल्य असलेले जटाधारी व राख फासणाऱ्यांचा! त्यांना काही या भौतिक जगाचा कायापालट करायचा नव्हता. त्यांना आपल्या शरीरावर आणि या भौतिक जगावर ताबा मिळविण्यासाठी जादूई शक्ति “सिद्धी” प्राप्त करून घ्यायच्या होत्या. म्हणूनच त्यांनी इतके सगळे कष्ट, त्रास सोसले, खडतर जीवन स्वीकारले.
मैसूरच्या राजवाड्यातील रहस्य
काही ऐतिहासिक दस्तऐवज आणि तोंडी इतिहासाच्या सहाय्याने केलेल्या नवीन संशोधनाच्या प्रकाशात पट्टाभी जोईस आणि अय्यंगार योगाच्या ‘अष्टांग विन्यासाचा’ सांधा प्राचीनतेशी कितपत आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. जोईस (1915-2009) आणि बी.के.एस. अय्यंगार (1918-2014) या दोघांनीही योगाचे शिक्षण मैसूरचे महाराजा कृष्णराज वडेयर चौथा (1984-1940) यांच्या कारकिर्दीत टी. कृष्णम्माचार्य यांच्याकडून घेतले.
हा महाराजा मैसूरच्या गादीवर 1902 पासून त्याच्या मृत्यूपर्यंत होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बऱ्यापैकी राबविले आणि त्याचबरोबर पश्चिमेकडील काही सकारात्मक कल्पनाही आपल्या सामाजिक कार्यक्रमात समाविष्ट केल्या. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत तो खूपच आग्रही होता. त्याच्या कारकिर्दीत शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात मैसूर हे देशातील एक प्रमुख केंद्र बनले. आपल्या तरूण राजकुमारीला ‘योगा’चे शिक्षण देण्यासाठी त्यांनी कृष्णम्माचार्य यांना बोलावले तसेच त्यांनी कृष्णम्माचार्य व त्यांच्या सहकाऱ्याना देशभरात फिरून योग प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी आणि त्या आधारे योग पुनर्जीवित करून लोकप्रिय करण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला.
मैसूरच्या राजघराण्याला पूर्वीपासूनच ह्ठ्योगात रुची होती. वडेयर चौथे यांचे पूर्वज मुम्माडी कृष्णराजा वडेयर तिसरे, (1799-1868) यांनी श्रीतत्त्वनिधी नावाचे अतिशय सुंदर चित्रमय पुस्तक लिहिले. त्याचा शोध 1980सालच्या मध्यास नॉर्मन जोमान नावाच्या एका स्वीडिश योग विद्यार्थ्याला मैसूर राजवाड्याच्या ग्रंथालयात लागला. या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे होते की, यात हठयोगाच्या आसनांचा मेळ भारतीय मल्ल जे व्यायामप्रकार व्यायामशाळेत करीत त्याच्याशी घातला होता. हे नाविन्यपूर्ण होते.
अमेरिकास्थित अभ्यासक जोमान आणि मार्क सिंगल्टन या दोघांनीही 1930 च्या सुमारास म्हणजे मैसूर राजवाड्याच्या भरभराटीच्या काळात, जे राजवाड्याशी व राजघराण्याशी संबंधित होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या मते आधुनिक योगाचे बीज या श्रीतत्त्वनिधी सारख्या नाविन्यपूर्ण पुस्तकात आहे. कृष्णम्माचार्य हेही या पुस्तकाशी परिचित होते. त्यांनीही आपल्या पुस्तकात श्रीतत्त्वनिधी कडून प्रेरणा घेत पूर्वीच झालेल्या पारंपारिक भारतीय कुस्ती, कवायती आणि हठयोगी आसनाच्या सरमिसळीत विविध पाश्चिमात्य जिम्नॅस्टिक्स आणि कवायती यांचा मेळ घालत श्रीतत्त्वनिधी चा हा नाविन्यपूर्ण वारसा पुढे चालविला.
कृष्णम्माचार्य ह्यांना मैसूर राजवाड्यातील पाश्चिमात्य पद्धतीच्या व्यायामविद्येच्या (gymnastics) हॉलमध्ये मुक्त प्रवेश होता. त्यांनी आपल्या दैनंदिन योगामध्ये तेथील वालरोप्स आणि इतर व्यायामासठीची साधनं वापरायला सुरुवात केली. कृष्णम्माचार्यांना पाश्चिमात्य व्यायामविद्येवरील पुस्तके उपलब्ध होती. या पुस्तकातूनच त्यांनी व्यायामविद्येची अनेक तंत्रे अवगत करून घेतली व ती त्यांच्या शिकवणीत उतरली, जी पुढे जोईस आणि बी.के.एस. अय्यंगार यांनी पुढे नेली, असे जोमानचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, मांडी घालून केलेले जंपबॅक (jumpback), कमान करणे वगैरे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षात नेल्स बख (Niels Bukh 1880-1950) या डेन्मार्कच्या जिम्न्यास्टने कोणत्याही साधनांशिवाय करण्यात येणारी स्वीडिश कवायत आणि दैनंदिन जिम्नॅस्टिक्स विकसित केले. ब्रिटीशानी भारतात ती पद्धत प्रस्तावित केली आणि वायएमसीएने ती लोकप्रिय केली. सिंगल्टनचा असा दावा आहे कि, “बखच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील जवळ जवळ 28 प्रकारांची पद्धत आणि पट्टाभी जोईस यांच्या अष्टांगयोगातील किंवा बी.के.एस. अय्यंगार यांच्या लाईट ऑन योगातील प्रकारांची पद्धत जवळ जवळ सारखीच आहे.” ही सांधेजोड सांगताना सिंगल्टन म्हणतो, “जिम्नॅस्टिक्स पद्धतीची आसने आणि पारंपारिक पातंजली पद्धत यांच्या आधुनिक सांधेजोडी मागील प्रमुख सूत्रधार कृष्णम्माचार्यच!”
मग आता योगाची मालकी कोणाकडे?
आज आपल्याला माहित असलेला ‘योगा’ म्हणजे प्रचंड प्रमाणावर झालेली सरमिसळ आहे. त्यामुळे “पाश्चिमात्यांनी योगाची चोरी केली” ह्या एचएएफच्या कर्कश आरडाओरड्याला काहीच अर्थ उरत नाही. आजच्या काळातला योग हे एक असे जागतिक पातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे की ज्यात पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या पद्धती संपूर्ण जगभरासाठी एक मूल्यवान आणि जपून ठेवावी अशी निर्मिती करण्यासाठी एकत्र आल्या आहेत.
हिंदुत्ववाद भले प्राचीन, मध्ययुगीन अथवा आधुनिक असो पण त्याला योगावर दावा सांगता येणार नाही. तशी बढाई मारणे हे केवळ उद्धटपणाचे नाही तर निखालस खोटेही आहे.
अनुवाद: राजीव देशपांडे