तत्त्वज्ञानाने आजतागायत जी कार्ये इतर काळांत पार पाडलेली आहेत, त्यांच्याशी तुलना केली असता आपल्या आजच्या काळाकरिता तत्त्वज्ञान काही तऱ्हेवाईक प्रकारचे कार्य करीत आहे अथवा करू शकेल, असे मी समजत नाही. तत्त्वज्ञानाचे एक निश्चित असे शाश्वत मूल्य असते आणि बहुधा ते अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते. या गोष्टीला एखादा अपवाद असलाच, तर तो असा : सुज्ञतेच्या संदर्भात एक युग हे इतर युगांच्या तुलनेत अगदीच वेगळे ठरते आणि परिणामतः त्यामुळे त्या युगांना तत्त्वज्ञानाची अधिकच गरज भासते.
आजच्या काळाकडे दृष्टिक्षेप टाकला असता आणि त्यासंदर्भात विविध अंगांनी विचार करता हे सहज दिसून येईल की हा काळ सुज्ञतेचा (Wisdom) काळ नाही किंवा अल्प-सुज्ञता हेच या काळाचे व्यवच्छेदक लक्षण दिसत आहे आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाची जी शिकवण असते, तिचे लाभ ह्या काळाला करून घेता येण्याची संभावनीयता निर्माण झाली आहे.
तत्त्वज्ञानाचे जे मूल्य असते, ते काही प्रमाणात त्याचा विचारांशी जो संबंध असतो आणि काही प्रमाणात त्याचा भावनांशी जो संबंध असतो, त्यांच्यात सामावलेले असते आणि त्याचा दोन्ही मार्गावर होऊ घातलेला परिणाम परस्परसंबंधितही असतो.
वैचारिक-सैद्धान्तिक बाजूने पाहता, विश्वाच्या समष्टी स्वरूपाचे आकलन होण्यास – जेथवर हे आकलन मानवास होणे शक्य आहे तेथवर – तत्त्वज्ञानाची मदत लाभू शकते. आणि भावनांच्या बाजूने पाहता, मानवी जीवनातील साध्यांच्या (Ends) उचित निवडीसंदर्भात – अर्थात मानवी जीवनात चांगले काय आणि वाईट काय याचा विचार करून त्या संदर्भात – आपले नैतिक साध्य कोणते असावे हे ठरविण्याकरिता तत्त्वज्ञान आवश्यक ते मार्गदर्शन करू शकते.
येथे आम्ही सुरुवातीला विचारांच्या क्षेत्रात तत्त्वज्ञान आपल्यासाठी काय करू शकते याचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर भावनांच्या क्षेत्रात तत्त्वज्ञानाचे कार्य काय आहे किंवा काय असायला हवे, हे आपण पाहणार आहोत.
‘येथे’ आणि ‘आत्ता’
(The Here and The Now)
प्रथमतः तत्त्वज्ञानाचे जे कार्य आहे अथवा असायला हवे, ते कार्य म्हणजे आपल्या बौद्धिक कल्पनाशक्तीचा विस्तार आणि विकास करणे हे होय. सर्वच प्राणी – ज्यांत मानवप्राणीसुद्धा आलाच – या जगताकडे पाहत असताना, विशेषतः ज्या ज्या गोष्टी ‘येथे’ आणि ‘आत्ता’ यांच्याशी संबंधित असतात, त्यांना केंद्रवर्ती मानून जगताचे दर्शन घेत असतात. ‘येथे’ ह्या अवकाशनिर्देशक आणि ‘आत्ता’ ह्या कालनिर्देशक सीमांमध्येच आपल्या दृष्टिकोनाच्या संदर्भचौकटीची घडण झालेली असते. परिणामत: आपल्या मनोविश्वाची व्याप्तीही तितकीच असते. रात्रीच्या अंधारात मेणबत्तीचा प्रकाश जे कार्य करतो, तसेच सृष्टीतील विविध पदार्थांना प्रकाशमान करण्याचे कार्य आपली ज्ञानेंद्रिये करीत असतात. परंतु तरीही ज्या तथ्याचा स्वीकार करण्यावाचून आपणास गत्यंतर नाही, ते असे की मनुष्यप्राण्याचे जीवन जगत असताना आपण अपरिहार्यपणे एका विवक्षित भूमिकेतून समग्र जगताचे दर्शन घेत असतो.
या भौगोलिक आणि कालक्रमानुसारी, अवकाश आणि काल यांच्या बंदिगृहातून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न विज्ञान करीत असते. उदाहरणार्थ, भौतिकशास्त्रात अवकाश-कालाअंतर्गत येणाऱ्या निर्देशकांचा (Co-ordinate) आरंभबिंदू अथवा उगम हा पूर्णत: स्वैरपणे (arbitrary) कल्पिलेला असतो. भौतिकशास्त्रज्ञांच्या वैयक्तिक दृष्टिकोनाशी, व्यक्तिमत्वाशी ज्याचा एकूण काही संबंध नाही अशा गोष्टींचे विवरण देणे हे भौतिकशास्त्रज्ञाचे कार्य असते. भौतिकशास्त्राचा अभ्यासविषय हा स्वत: भौतिकशास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्वाशी निगडित नसतो. त्यामुळे भौतिकशास्त्रातील हा स्वैरपणा तेजस्वी व्याध ताऱ्याविषयी अथवा अनंत तारकायुक्त तेजोमेघांविषयी परिकल्पन करतानाही तितकाच खरा असतो.
विज्ञान ज्या मानसिक मुक्तीचा अनुभव आपल्याला देऊ शकेल तो हा असा आहे. पण मुक्तीच्या इतर अवस्थासुद्धा आहेत. इतिहास आणि भूरचनाशास्त्र हे आपल्याला “आत्ता” (The now) पासून दूर घेऊन जातात आणि खगोलशास्त्र आपल्याला “येथे” (The Here) पासून दूर घेऊन जाते.
ह्या विषयांच्या अध्ययनांतून ज्यांचे मन पुष्ट झाले आहे, अशा व्यक्तीला, मानवी व्यक्ती आणि त्याचा अहम् (Ego) अर्थात मी-पणा याला विराट विश्वाच्या संदर्भात, दिक्कालाच्या प्रवाहात एक काहीतरी खास, निश्चित, विवक्षित स्थान आहे, या आपल्या समजुतीविषयी एक प्रकारची यादृच्छिकता, नगण्यता आणि म्हणून असमाधान जाणवत राहते. कारण, तो हे जाणतो की हा केवळ माणसाचा अहंकार आहे. विज्ञानाच्या दृष्टीने असे कोणालाही खास स्थान नाही. सर्व वैज्ञानिक पदार्थ आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रचना आहेत. त्या कमी-अधिक गुंतागुंतीच्या आहेत. माणूस त्यातलाच एक आहे. मानवाला अशी जाणीव जेव्हा होते, तेव्हा त्याचा बौद्धिक व्यवहार लौकिक गरजांवर आधारलेल्या व्यवहारांपासून अधिकाधिक दूर जात राहतो. त्याचे मनोविश्व विस्तारते. त्याची व्याप्ती तसेच सामर्थ्यही वाढते. विश्वाच्या अनंतत्वामुळे विश्वाचे चिंतन करणारे त्याचे मनही ह्या वैश्विक अनंतत्वात सहभागी होते. परंतु जे केवळ आपल्या भौतिक गरजा ओळखतात, माणसांच्या शरीरांना अन्नाची आवश्यकता असते हे जे ओळखतात पण मनुष्याच्या मनांना अन्नांची आवश्यकता असते ह्याचा ज्यांना विसर पडलेला असतो, अशा पाशवी प्रेरणांच्या जाळ्यांत बद्ध झालेल्या व्यवहारी माणसांना ही अनुभूती येणे जवळजवळ अशक्यप्राय असते. ही अनुभूती येण्याकरिता मन पुरेसे स्वतंत्र असावे लागते आणि व्यवहारी माणसाचे मन मुळीच स्वतंत्र असत नाही.
सर्व महान संस्कृतीनिर्मात्या राष्ट्रांना या गोष्टीची जाणीव असते.
स्वत: शेती पिकवून आपल्या उदरनिर्वाहापुरत्या अन्नधान्याची गरज ज्याने पूर्ण केली आहे किंवा तग धरून राहण्याच्या समस्येनेच ज्याचा मौल्यवान वेळ व श्रम खर्च केलेला आहे असा तो, अशी एखाद्या सुविद्य माणसाविषयीची आपली धारणा असेल, तर ती गैर आहे असे म्हणता येईल. सामाजिक यंत्रणेच्या सहाय्यानेच ज्याला व्यक्तिनिरपेक्ष दृष्टिकोन म्हणता येईल, त्याची निर्मिती काही प्रमाणात होणे संभव आहे. जीवनकलहात तग धरून राहण्याची एक अनिवार्यता म्हणून आपण सर्व आपल्या मूळ पाशवी प्रेरणांची पूर्तता करण्यात व्यग्र असतो; परंतु मानवाच्या दृष्टीने हितावह ठरेल अशी एक गोष्ट करता येईल. ती अशी की, जे मानव स्वकेंद्रित लौकिक गरजांच्या कोशात बद्ध नाहीत, ज्यांच्यात सतेज निर्मितीशीलता आहे आणि विवक्षित क्षमता आणि कला आहेत अश्या व्यक्ती ह्या विविध विचारमार्गांचा आणि भावमार्गांचा विकास करण्याकरिता मुक्त असायला हव्यात. त्यांना तितके वैचारिक, मानसिक स्वातंत्र्य असलेच पाहिजे.
हे साध्य करायचे तर ते काही प्रमाणात एखाद्या ज्ञानशाखेवर प्रभुत्व मिळवून होऊ शकेल; परंतु या कार्यास पूर्णत्व लाभायचे असेल तर समग्र विश्वाच्या सामान्य स्वरूपाचा परामर्श घेण्याचे तत्त्वज्ञानाकडे जे सामर्थ्य असते, त्याच्या सहाय्यानेच होऊ शकेल.
विभिन्न विश्वरूपदर्शने
भूतकाळात होऊन गेलेल्या महान तत्त्ववेत्त्यांच्या व्यवस्थांचे, जगताच्या स्वरूपाविषयीच्या त्यांच्या भूमिकांचे अध्ययन जर आपण केले, तर आपल्याला जी एक गोष्ट आढळेल ती ही की त्यात विश्वरूपाविषयीची अनेक भिन्न भिन्न चित्रे उभी केली गेली आहेत. आणि त्यास अनुकूल कल्पक मनोभूमिका असणाऱ्या व्यक्तींच्याद्वारे त्या चित्रांचा ‘सर्वोत्तम’ म्हणून स्वीकारही करण्यात येत असतो. त्यांपैकी काही तत्त्ववेत्त्यांच्या भूमिकेनुसार, या जगात मनाशिवाय (mind) इतर कशासही अस्तित्व नाही आणि भौतिक म्हणविले जाणारे सर्व पदार्थ हे मुळात आभासमय आणि भ्रममूलक आहेत.
तर इतर अनेक तत्त्ववेत्यांच्या विचारांनुसार, या जगात जडद्रव्याशिवाय (matter) इतर कशासच अस्तित्व असू शकत नाही आणि ज्याला कशाला आपण ‘मन’ असे संबोधत असतो, तो विवक्षित प्रकारच्या जडद्रव्यांच्या अंतर्गत होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांचा परिणाममात्र असतो.
जगताकडे बघण्याची दृष्टी देणाऱ्या या दोन मार्गांपैंकी कोणता मार्ग अधिक खरा किंवा स्वीकारणीय स्वरूपाचा आहे, याचा विचार ह्याक्षणी करण्याची आवश्यकता नाही.
मला जे मुख्यतः सांगायचे आहे ते असे की : जगताच्या भिन्न स्वरूपाच्या चित्रांचा स्वीकार करण्याचा जो व्यवहार आपण करू, त्यामुळे आपल्या मनोविश्वाचा विस्तार होईल आणि ज्यामुळे नूतन, अभिनव आणि कदाचित फलदायी अशा परिकल्पनांचा (Hypothesis) सहज स्वीकार करू शकेल इतपत आपले मन अधिक ग्रहणशील व सहिष्णु होईल.
तत्त्वज्ञानाचा आणखी एक प्रकारचा बौद्धिक लाभ सांगता येईल. तत्त्वज्ञान हे मानवी स्खलनशीलतेविषयी (Human Fallibility) – मानव चुकू शकतो, त्याने सत्य म्हणून कवटाळलेल्या अनेक समजुती खोट्या ठरू शकतात – याविषयी आणि ज्या गोष्टीविषयी व्यवहारी माणसे अगदी ठाम, निश्चित असतात, ज्या गोष्टींविषयीच्या आपल्या समजुती संशयातीत आहेत अशी त्यांची धारणा असते, अशा त्या अनेक गोष्टींच्या अनिश्चिततेविषयीची जाणीव तत्त्वज्ञान आपल्या मनावर बिंबवते. तत्त्वज्ञानाचा स्पर्श ज्याला झाला नाही, तो माणूस संकुचित व्यवहारी जाणिवेच्या मर्यादित परिघात कोंडला जातो. लहान मुले अगदी सुरुवातीला हे मान्यच करत नाहीत की पृथ्वी गोल आहे. त्यावर त्यांचे अतिउत्साही उत्तर हे असते की त्यांना ती सपाट दिसत आहे. व्यवहारी माणसांची अवस्था काहीशी अशीच असते.
पण मनातील ठाम समजुतींना खिळखिळे बनविणाऱ्या तत्त्वचिंतनातून उत्पन्न होणाऱ्या ‘अनिश्चिततेचे’ अत्यंत मौलिक उपयोजन जर कुठे करायला हवे, तर ते सामाजिक व्यवस्था आणि धर्मशास्त्रे यांच्या संदर्भात केले पाहिजे, असे मला वाटते.
जेव्हा व्यक्तिनिरपेक्ष विचार करण्याची सवय आपल्या अंगवळणी पडलेली असते, तेव्हा आपल्या राष्ट्राच्या, वर्गाच्या, जातीच्या, धर्मपथांच्या श्रद्धांकडे आपण तितक्याच निर्लिप्तपणे पाहू शकू. इतरांच्या श्रद्धांकडेही तितक्याच तटस्थपणे आपण पाहू शकू. त्यातून आपल्याला जी गोष्ट उमगेल ती ही की ज्या श्रद्धांचा, समजुतींचा अत्यंत हिरीरीने पुरस्कार केला जात असतो किंवा ज्यांचा अतिउत्साही ठामपणाने स्वीकार केला जातो, त्या अशा स्वरूपाच्या असतात की ज्यांची सत्यता निर्विवाद सिद्ध झालेली नसते, ज्यांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी सबळ पुराव्याची आवश्यकता असते, तो पुरावा त्रोटक व अपूर्ण स्वरूपाचा असतो. तो अनिवार्य आणि पर्याप्त असा पुरेसा अनुकूल पुरावा नसतो.
जेव्हा माणसांच्या अशा एका मोठ्या समुदायाची ‘अ’ या गोष्टीवर श्रद्धा असते आणि दुसऱ्या तशाच मोठ्या समुदायाची ‘ब’ या गोष्टीवर श्रद्धा असते, तेव्हा दोन्ही वेगवेगळ्या श्रद्धा बाळगणाऱ्या या समुदायांची परस्परांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यापैकी प्रत्येकांस दुसऱ्यांची श्रद्धा हे एक मूर्खपणाचे कृत्य वाटत असते आणि आपण जी श्रद्धा बाळगत आहोत, ती बाळगणे हे सत्प्रवृत्तपणाचे लक्षण वाटत असते.
ह्या मानवी प्रवृत्तीवर एक चांगला उपाय सुचवता येऊ शकतो, तो थोडक्यात असा : आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्यांकरिता पुराव्याचा शोध घेणे, त्या श्रद्धांची सत्यताही पुराव्यांवर आधारणे आणि अनिवार्य व पर्याप्त पुराव्याच्या अभावी कोणतेही ठाम, निश्चित असे मत न बनविणे.
ह्या उपायांचे उपयोजन केवळ धर्मशास्त्रीय आणि राजकीय श्रद्धांच्याच संदर्भात करता येईल असे नाही; तर सामाजिक रूढींबाबतीतही या उपयाचा वापर होऊ शकतो.
मानववंशशास्त्राच्या अध्ययनातून हे निष्पन्न झाले आहे की आश्चर्यजनक अशा सामाजिक रूढी-परंपरा जगभरात विविध रूपात अस्तित्वात आहेत आणि मानवी प्रवृत्तीशी विसंगत अशा सवयींचा अंगीकार करूनही हे समाज तग धरून राहिलेले आहेत. ठाममतवादावरील निवारक उपाय म्हणून ह्या प्रकारचे ज्ञान हे अत्यंत मौल्यवान असते. विशेषत: आपल्या आजच्या काळात, ज्यात परस्परांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या ठाममतवादी छावण्या हीच मानवतेपुढील खरी भयसूचना आहे.
व्यक्तिनिरपेक्ष विचारांच्या विकासासह समांतरपणेच, ज्याला व्यक्तिनिरपेक्ष भावनांचा विकास असे म्हणता येईल, तोसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण ठरतो. हे दोन्ही ‘तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनांतून’ उगम पावतात. आपल्या संवेदनेंद्रियांप्रमाणे आपल्या इच्छासुद्धा प्रामुख्याने आत्मकेंद्रित असतात. आपल्या इच्छांचे आत्मकेंद्रित्व हेच आपल्या नीतिशास्त्रातही प्रविष्ट होत असते. एक माणूस म्हणून आपल्याला जे साध्य करायचे आहे, त्यात जीवनअस्तित्वास आवश्यक अशा पाशवी प्रेरणांचा पूर्ण अभाव आहे असे नसून, त्या नैसर्गिक प्रेरणांपेक्षा अधिक व्यापक, अधिक सामान्य स्वरूपाच्या, स्व-पेक्षा व्यापक अशा गोष्टीला जोडायचे आहे.
आपल्या दृष्टीने ते पालक आदरणीय ठरू शकणार नाहीत, ज्यांना इतरांच्या मुलांविषयी तर सोडाच; पण अगदी स्वत:च्या मुलांविषयीदेखील ममत्व नाही किंवा मग फक्त स्वत:च्याच मुलांपुरते ममत्व आहे. त्याऐवजी, आपल्या मुलांवरील ममत्वामुळे इतरांच्याही मुलांविषयी ज्यांच्या अंत:करणात मायेचा पाझर फुटतो, अशा पालकांना आपण आदरणीय मानू. एकावरील प्रेमभाव सर्वभूतांविषयी प्रेमभाव जागृत करणारा असल्यास तो उदात्त ठरतो.
आपल्या दृष्टीने तो माणूस, ज्याने तो कुपोषित होईल इतपत अन्नाविषयी तटस्थता दाखविली आहे – आणि खरोखरच असा कुणी एखादा माणूस असेल तर – तो आपल्या प्रशंसेचा विषय होऊ शकत नाही. उलट, ज्याने आपल्या मानवी प्रकृतीला समजून घेऊन तिचा स्वीकार केला आहे, ज्याला आपल्या भूक या जैविकप्रेरणेचे ज्ञान आहे आणि म्हणून ज्याला भुकेविषयी तिटकारा नसून सहानुभूती आहे, असा मनुष्य आपल्या प्रशंसेचा विषय असायला हवा.
तत्त्वज्ञानाने भावनेच्या क्षेत्रात काय करायला हवे? या प्रश्नाचे उत्तर हे बरेचसे त्याने विचारांच्या क्षेत्रात जे करायला हवे, त्याच्यासारखेच आहे. वैयक्तिक जीवनास मूलभूत अशा काही गोष्टींची वजावट करायला नको; तर नवीन काही गोष्टींची त्यात जुळवणी करायला हवी. अगदी ज्याप्रमाणे तत्त्ववेत्त्यांची बौद्धिक चिंतनिका ही जशी व्यवहारी माणसाच्या तुलनेत अधिक व्यापक असते, तसेच त्याच्या इच्छा आणि अभिरुचींचा विस्तारसुद्धा व्यापक असायला हवा. बुद्ध असे म्हणतो, “मानवप्राण्यापैकी एकजरी मानव दु:खी असेल, तोपर्यंत मला आनंदी होता येणार नाही.”
बुद्धाच्या भूमिकेत व्यापकत्व, मनाची विशालता आणि काहीशी अत्योक्ती आहे; पण ज्याविषयी मी बोलत आहे, अशा त्याच भावनांच्या वैश्विकीकरणाचे (Universalisation of emotions) विवरण बुद्धाच्या उदाहरणात दिसते.
ज्या मनुष्याने केवळ विचारांचाच नाही, तर भावनांचाही तत्त्वज्ञानात्मक मार्ग अंगीकृत केला आहे, अशी व्यक्ती आपल्या अनुभवाला येणाऱ्या घटनांचे आपल्या स्वानुभूतीच्या साहाय्याने मानवासाठी चांगले काय आणि वाईट काय यात भेद करायला शिकेल आणि त्याचवेळी इतरांच्या तसेच स्वत:च्या कल्याणाकरिता चांगल्याचा सदैव पुरस्कार आणि वाईटाचा धिक्कार करीत राहील.
सामाजिक प्रगतीची पाळेमुळे
विज्ञानाप्रमाणेच नीतिशास्त्र हे सामान्य (general) स्वरूपाचे अर्थात सार्वत्रिक असायला हवे आणि जेथवर मानवाला शक्य आहे, तेथवर त्याची नीतिशास्त्राने ‘येथे’ आणि ‘आत्ता’ ह्यांच्या जाळ्यांतून मुक्ती करायला हवी.
ज्याद्वारे नीतिशास्त्रीय आधारविधानांची चाचणी घेता येईल, असा एक साधा-सोपा नियम सांगता येईल. तो थोडक्यात असा : “नीतिशास्त्रीय आधारविधानांत विशेषनाम नसलेच पाहिजे.” (No ethical maxim must contain a proper name.)
येथे ‘विशेषनाम’ हा शब्द मी अवकाश-कालाच्या कोणत्याही एका विवक्षित अंगाचा अमुक अमुक आराखडा या अर्थी योजला आहे. केवळ मानवी व्यक्तीचीच नावें नाहीत, तर प्रदेशांची नावे, देशांची नावे आणि विविध ऐतिहासिक कालखंडांची नावें हीसुद्धा विशेषनामेंच ठरतात. आणि जेव्हा नैतिक आधारविधाने अशा स्वरूपाची असायला हवीत हे मी सुचवितो, तेव्हा माझी ही सूचना निव्वळ शुष्क बौद्धिक स्वरूपाची असत नाही, कारण अशा बौद्धिक सूचना आणि विवेकाचा उपदेश यांचा प्रत्यक्ष व्यवहारावर अत्यल्प प्रभाव पडलेला दिसून येतो. मला जे सांगायचे आहे त्याचा संबंध प्रत्यक्ष कृतिशीलतेशी, कार्यप्रवणतेशी आहे. खऱ्याखुऱ्या इच्छांच्या स्वरूपाशी आहे. सहानुभूतिरूप कल्पनाशक्तीत ज्या कृतींची मुळे आहेत, त्याच्याशी हा संबंध आहे. भावनांच्या वैश्विकीकरणातून कित्येकदा सामाजिक प्रगती प्रकट झालेली आहे आणि ती तशी प्रकट होत राहायला हवी.
जर आपल्या आशा-आकांक्षा केवळ स्वत:पुरत्या आणि आपल्या कुटुंबात व खाजगी वर्तुळात बंदिस्त झालेल्या असतील, जर आपल्या इच्छा-अपेक्षा ह्या केवळ आपले राष्ट्र, आपला वर्ग, आपला संप्रदाय यांतील निष्ठावान अनुयायांपुरत्या मर्यादित असतील, तर लगेचच आपल्याला दिसून येईल की आपल्या अंत:करणात एकीकडे स्नेहभावना व दयाळूपणा यांसारख्या उदात्त भावनांच्या समांतरच हळूहळू द्वेष आणि भीती यांसारख्या भावनांनासुद्धा जागा मिळत आहे. मानवाच्या भावनांतील या द्वैतांमधून, द्वद्वांमधून जी जी महान दुरिते मानवी जीवनाला ग्रासून टाकत आहेत, ती उगम पावतात : जसे, निर्दयता, जुलूम, अन्याय, छळ आणि युद्धे.
आपल्या जगाचे अशा भयकंपित करणाऱ्या दुरितांपासून रक्षण करायचे असेल, तर मानवाने आपल्या सहानुभूतीला स्वमर्यादित परिघांच्या बाहेर विस्तारले पाहिजे. ही गोष्ट आज कधी नव्हे इतकी आवश्यक झाली आहे.
आज मानव हा विज्ञानाच्या आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या बळावर वाईटाच्या पाठीशी वाईटाच्या हितात उभा आहे. मात्र, अजूनही चांगल्याच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहू शकलेला नाही. मानवाला जे चांगले आहे, त्याच्याकरिता एकत्र येता आलेले नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाचा आधार घेऊन विश्वव्यापी संहाराची विविध तंत्रे मानवाने शोधून काढली, पण विश्वव्यापी सहकाराची निर्मिती ज्याद्वारे करता येईल, असे तंत्र त्याने शोधले नाही. त्याला हे तंत्र का शोधता आले नाही? या प्रश्नाचे उत्तर त्याने आपल्या भावनांवर जी बंधने, ज्या मर्यादा घातल्या आहेत, त्यांच्यात शोधले पाहिजे. ही बंधने, मर्यादा कोणत्या? तर, आपल्या स्वत:च्या गटांतील लोकांविषयी सहानुभूती आणि इतर गटांविषयी द्वेष आणि भीती या भावनांची बंधने, मर्यादा आपण स्वत:वर लादलेली असते. त्यामुळे आपले मन अधिकच संकुचित आणि अहमकेंद्री होत जाते.
आजच्या वर्तमानकाळात विश्वव्यापी सहकाराद्वारे वैश्विक दारिद्र्याचे आणि युद्धांचे निर्मूलन करता येऊ शकेल आणि भूतकाळातही ज्याचा अनुभव कधी मानवजातीने घेतला नसेल, अशी आनंददायी व कल्याणाची स्थिती निर्माण करता येईल. हे संभव आहे. हे असे असले तरी वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे. माणसे आपल्या गटांपुरती सहकारवृत्ती ठेवण्यात समाधान मानतात आणि इतर गटांविषयी तीव्र शत्रुत्व भावना बाळगत राहतात. ह्या कारवायांचा अटळ परिणाम म्हणून आपले दैनंदिन जीवन भयकंपित करणाऱ्या दुरितांमुळे अधिकच अंध:कारमय होत जाते. मानवाला अशा सर्वांच्या हिताकरिता वर्तन न करता येण्याच्या दुःखात्मिकतेची कारणे मानवाच्या बाहेर सापडणार नाहीत, तर ती त्याच्या आत, त्याच्या भावनांच्या दांभिक दुटप्पीपणातच शोधता येतील. वैज्ञानिक ज्या निर्लिप्तदृष्टीने विश्वाचे दर्शन घेत असतो, अगदी तितक्याच व्यक्तिनिरपेक्षपणे मानवी भावनांचे दर्शन जर आपण घेऊ शकलो, तर आपल्याला जे अनैसर्गिक असे भावनांचे आपण विभाजन केले आहे आणि त्याला कायम राखण्यासाठी आपली जी चढाओढ, जीवघेणा संघर्ष सुरू आहे त्यातील फोलपणा जाणवेल. आपल्याला हे कळून येईल की आपल्या आणि इतरांच्या हितामध्ये सुसंगती आहे आणि ती सुसंगती इतरांच्या जीवनामध्ये दुरिते निर्माण करण्याच्या इच्छा निर्माण झाल्यास टिकणार नाही.
दुराग्रही ठाममतवाद – मग त्यात धर्मांधता, पक्षांधता आणि कोणत्याही प्रकारची मतांधता आलीच – हे आपल्या आजच्या काळचे सर्वांत मोठे दुरित आहे. या दुरिताचा उगम मुख्यत: बौद्धिक व्याधींमधून झालेला असतो आणि मी अगोदरच नमूद केल्याप्रमाणे, अशा बौद्धिक व्याधींचे निवारण करायचे असेल, तर तत्त्वज्ञान हेच त्यावरील नेमके औषध आहे.
परंतु तरीही या दुराग्रही ठाममतवादाचा उगम जेवढा बौद्धिक व्याधींतून होतो, त्यापेक्षाही एका व्यापक भावनिक स्रोतातून होत असतो: तो स्रोत म्हणजे भीती!
सामाजिक एकसंघता न राखल्यास शत्रूंकडून आपला पराभव होण्याची, त्यांना तोंड कसे द्यायचे ही भीती आणि रूढिवादी मतांपासून दूर गेल्यास युद्धात सैनिक पराभूत होतील ही भीती!
भयभीत लोक हेच असहिष्णु लोक असतात. (Frightened populations are intolerant populations.) असहिष्णुतेचा उगम भीतीत असतो. भयमुक्त मानव हाच सहिष्णु मानव असू शकतो. ज्याला इतरांच्या मतांमुळे, कृत्यांमुळे, धार्मिक आचरणामुळे व श्रद्धांमुळे भीती वा असुरक्षितता जाणवत नाही, तोच खरा सहिष्णु मनुष्य! व्यवहारी मनुष्य हा इतका सहिष्णु व सुज्ञ असत नाही. भीतीतून कधीच विवेकशील कृत्यांचा जन्म होऊ शकत नाही. विवेकशील कृत्य हे भयमुक्त कृत्य असते. भीती ज्या कृत्यांची जन्मदात्री असते, त्यांतून अशी दुरिते उत्पन्न होत जातात, जी पुन्हा नव्या भीतियुक्त कृत्यांचाच उगम ठरतात.
जगाच्या विविध भागांत जो अविवेकी ठाममतवाद मोठ्या प्रमाणात फोफावत आहे, त्याविषयी हे विवरण खरे आहे. जेथे दुरित हे अत्यंत भयानक, वास्तव आणि विक्राळ असेल, त्या ठिकाणी तत्त्वज्ञान ज्या व्यक्तिनिरपेक्ष भावनांचे सृजन करीत असते, तोच उत्तम उपाय ठरू शकेल. ज्या व्यक्तिनिरपेक्ष भावनांविषयी मी बोलत आहे, त्याचे मूर्तिमंत सर्वोत्तम प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे झाले तर ते तत्त्वज्ञ स्पिनोझा यांचे देता येईल. आपल्या संपूर्ण जीवनकाळात तो शांत आणि सहिष्णुपणे जगला. आपल्या जीवनाच्या समृद्ध काळात जशी त्याने मैत्रिभावना व ऋजुत्ववृत्ती जपली; तीच वृत्ती आपल्या अंत:समयापर्यंतही, अगदी त्याला त्रास देणाऱ्या लोकांविषयीसुद्धा त्याने कायम ठेवली. समृद्ध व्यापारी पार्श्वभूमी असलेले आपले वडील वारले, तेव्हा स्पिनोझाच्या सावत्र बहिणीने वडिलांच्या मालमत्तेवर दावा सांगितल्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रसंग त्याच्यावर आला. निर्णय स्पिनोझाच्या बाजूने झाला तथापि स्पिनोझाने तिला जवळपास सर्वच मालमत्ता देऊ केली. मनाच्या उदात्ततेचे एक उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल. तत्त्वचिंतनातून उदात्त झालेले असे ते थोर मन होते.
ज्या मानवी व्यक्तीने आपल्या आशा-आकांक्षांचा खाजगी जीवनाच्या वैयक्तिक परिघांबाहेरही व्यापक विस्तार केला आहे, अशी व्यक्ती ही सामान्यत: आपल्याच इच्छांच्या कोसल्यात गुरफटलेल्या व्यवहारी माणसांना ज्या गोष्टी भयकंपित करतात, अशा गोष्टींपासून तिळमात्रही भयभीत होत नाही. त्यांचे जीवन हे भयमुक्त जीवन असते. ते असा विश्वास दाखवू शकतात की आपल्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य, ज्यांचे मनोधर्म त्यांच्या मनोधर्मासारखे आहेत, असे त्यांचे ‘समानधर्मा’ आज न उद्या निपजतील व त्यांचे उर्वरित कार्य पुढे चालू ठेवतील. आणि ज्या दुरितांशी झगडण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्च केले, त्या दुरितांचे लवकरच निर्मूलन केले जाईल. संपूर्ण मानवजात एक आहे असे त्यांना वाटेल आणि मानवप्राण्याचे ‘निसर्गसृष्टीतून मानवीसृष्टीत पदापर्ण’ ही दृष्टी ठेवून ते मानवी इतिहासाकडे पाहतील.
असे दर्शन घेता येणे मानवाला शक्य आहे, कारण त्याच्या मदतीला तत्त्वज्ञान आहे.
दुराग्रहजन्य भीती टाळण्याकरिता आणि दुरितांना लीलया पेलण्याची सहनशक्ती स्वत:त निर्माण करण्याइतपत क्षमता त्याच्या अंगी बाणण्याकरिता मानवाला तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. तत्त्वज्ञानाच्या अभावी मानवाला हे करता येणार नाही.
मी अशी बतावणी करणार नाही की माणूस सदासर्वदा आनंदी राहू शकेल. ज्याप्रकारच्या जगात, विशेषतः ज्यात आपण आनंदी असण्याचा संबंध हा इतरांनी आनंदी असण्याशी जुळलेला असतो, आपण जगत आहोत, त्यात नेहमीच आनंदी राहणे क्वचितच शक्यप्राय आहे.
परंतु गोंधळलेल्या निराशाजनक मानसिकतेमुळे होणारा त्रास आणि संभाव्य दुरितांच्या चिंतनातून अंगावर शहारून उठणारी दहशत यांच्याशी व्यवहारी माणूस जसा सामना करतो, त्यापेक्षा तत्त्ववेत्त्याचा सामना वेगळा असेल. व्यवहारी मनुष्य दुरितांच्या तिमिरांत कुठेतरी हरपून जाईल; तर तत्त्ववेत्ता दुरितांच्या तिमिराला प्रकाशमान करत नव्या वाटा उजाळत पुढच्या प्रवासाला निघून जाईल.
तात्त्विक चिंतनातील स्वातंत्र्य व तटस्थता ह्यांची सवय ज्या मनाला जडली असेल ते कृती व भावना ह्यांच्या जगातसुद्धा ह्याच स्वातंत्र्याचा व तटस्थतेचा काही अंश टिकवून धरील. आपले हेतू व आपल्या इच्छा ह्यांच्याकडे समग्र विश्वाचा एक भाग म्हणून ते पाहतील. हे हेतू व इच्छा म्हणजे ज्या जगाचा एक अत्यंत अल्प असा भाग आहे आणि कुणाही एका माणसाच्या कृतींनी उरलेल्या जगात काही फरक पडत नाही ह्या जाणिवेने त्यांच्याविषयी हे मत आग्रहीवृत्ती धारण करणार नाही. चिंतनात सत्याविषयी निर्भेळ जिज्ञासा हे रूप धारण करणारी ही तटस्थता म्हणजे कृतींमध्ये न्याय ह्या स्वरूपात आणि भावनांत सर्व भूतांविषयी वाटणाऱ्या प्रेमाच्या स्वरूपात व्यक्त होणारा मनोधर्म होय. हे प्रेम सर्वांना अर्पिता येते, जे उपयोगी व स्त्युत्य ठरतात केवळ त्यांनाच नव्हे. तेव्हा चिंतनामुळे केवळ आपल्या विचारांच्या विषयांचा विस्तार होतो असे नव्हे, आपल्या कृतींच्या व भावनांच्या विषयांचाही विस्तार होतो. चिंतनामुळे आपण संबंध विश्वाचे नागरिक बनतो. तटांनी वेढलेल्या, भूसीमांत बंदिस्त आणि इतर जगाशी झगडत राहणाऱ्या केवळ एका देशाचे, नगराचे नागरिक उरत नाही. विश्वाचा असा नागरिक असण्यामध्येच माणसाचे खरे स्वातंत्र्य सामावलेले असते. संकुचित आशा आणि भीती ह्यांच्या दास्यातून त्याची मुक्तता होते.
तत्त्वज्ञान ज्या विश्वाचे चिंतन करते त्याच्या महत्तेमुळे आपले मनसुद्धा महान होते; विश्वाशी एकरूप होण्यात मनाचे जे परमोच्च श्रेय असते ते त्याला साधता येते.
अशाप्रकारे, ज्याची प्रेरणा प्रेमात आहे आणि ज्याचे मार्गदर्शन ज्ञानाने होते असे जीवन म्हणजे ‘चांगले जीवन’ होय असे म्हणता येईल.
आपल्या आजच्या तत्त्वशून्य होत चाललेल्या काळाकरिता तत्त्वज्ञान हे मौलिक कार्य करू शकते. यातच तत्त्वज्ञानाचे मूल्य आणि मानवतेची आशा सामावलेली आहे.
मूळ लेखक : बर्ट्रांड रसेल
अनुवाद : श्रीधर सुरोशे
[अनुवादकाची टीप : बर्ट्रांड रसेल हे विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ तत्त्वचिंतक आणि एक विवेकवादी तत्त्वज्ञ म्हणून जगाला परिचित आहेत. त्यांनी आपल्या जीवनाच्या उत्तर कालखंडात लिहिलेल्या ‘Portraits from memory and other essays’ या ग्रंथातील ‘ A philosophy for our times’ या मूळ लेखाचा अनुवाद येथे दिलेला आहे. ज्ञान, नीती आणि सामाजिक प्रगती यासंदर्भात त्यांनी जीवनभर जे मौलिक लिखाण केले आहे, त्याचे सार या लेखात आल्याप्रमाणे वाटते.
प्रस्तुत अनुवाद शक्य तितका सोपा व सुगम करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु काही ठिकाणी विवेचन अधिक सुबोध व्हावे म्हणून त्यामध्ये रसेलच्या इतर लेखांचा, विशेषत: ‘Value of philosophy’चा आधार घेत भर घातली आहे; पण त्यामुळे रसेल यांच्या मूळ वैचारिक भूमिकेला धक्का लागणार नाही याचीही दक्षता घेतली आहे.]