मनोगत – आपले नंदाकाका

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे उर्फ नंदाकाका ह्यांचे, दि. 22 जुलै 2022 ला, दीर्घ आजारानंतर, पुण्यात निधन झाले.

मुळात स्थापत्यअभियंता असलेले नंदाकाका, सुरुवातीला ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात, आणि नंतर अनेक वर्षे ‘सुधारक’चे संपादक होते. 

ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता. इतिहासापासून जीवशास्त्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून भूगर्भशास्त्रापर्यंत सर्वच विषयांत त्यांना रस आणि गती होती. त्यांनी जशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली तशीच अनेक महत्त्वाची पुस्तके भाषांतरित करून मराठीत आणली. अनेकजणांना त्यांनी लिहिते केले. आणि स्वतः त्यांचेही लिखाण आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत अव्याहत सुरू होते.

नंदाकाकांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अगदी ‘सुधारक’चे संपादक असतानादेखील ते एक ठेकेदार माणूसच होते. वर्गणी देणाऱ्या आपल्या वाचकांस, वर्गणीच्या मोबदल्यात आपण वर्षभरात एकूण मजकुराची किती पाने, ओळी, शब्द देतो इथपर्यंतचा त्यांचा हिशेब अगदी चोख असायचा, आणि तो सगळा मजकूर त्यांच्या गुणवत्तेच्या निकषांवर खरा उतरल्यावरच दिला जायचा.

एकदा एका प्रसिद्ध लेखकाचा लेख त्यांनी ह्याच कारणाखातर नाकारल्यावर लेखक महाशयांनी त्यांना “लेख छापल्यास ‘सुधारक’च्या पूर्ण अंकाच्या छपाईचा खर्च उचलण्याची” ‘लाच’ देण्याची कशी तयारी दाखवली होती ह्याचा किस्सा त्यांच्याच तोंडून ऐकायला हवा.

त्यांचा विविध क्षेत्रांतला, आणि त्यातल्यात्यातही बांधकामक्षेत्रातला अनुभव इतका दांडगा होता की अशा अनेक किश्शांचा खजिनाच त्यांच्याजवळ होता. आणि प्रत्येक भेटीत असे किस्से ऐकण्याची पर्वणीच असे.

लेखकांकडून मजकूर मिळवून, जुळणी आणि मुद्रितशोधन करून, छपाई आणि बांधणी करून, पत्ते चिकटवून, अंक पोस्टात पडेपर्यंत बरेचदा उशीर होत असे आणि पोस्टिंगची ठरलेली तारीख पुढे ढकलण्याची परवानगी मागावी लागत असे. परंतु नंदाकाकांचा, म्हणजे, ह्या ‘ठेकेदार माणसाचा’, सगळ्याच बाबतीतील पाठपुरावा इतका तगडा होता की त्यांच्या कार्यकाळात अशी परवानगी घेण्याचा प्रसंग कधीच आला नाही.

अनेक युवकांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते. या तरुणांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या पाठीशी नंदाकाका उभे राहिले. धडपडण्याच्या दिवसात अशा खंबीर हातांचा किती आधार असतो हे ते असंख्य युवक-युवतीच सांगू शकतील.    

त्यांच्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय वाचकांना व्हावा म्हणून त्यांच्याविषयी वृत्तपत्रांत आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या काही लेखांच्या लिंक्स सोबत देत आहोत. याव्यतिरिक्त अनेक लेखांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नसू. समाजमाध्यमांवर बरेच काही आले, तेदेखील आम्ही येथे घेतलेले नाही. पण या माध्यमातून त्या सगळ्यांच्या भावनादेखील वाचकांपर्यंत पोहोचतील हा विश्वास.

https://www.loksatta.com/sampadkiya/author-nanda-khare-death-special-article-written-by-pramod-munghate-prd-96-3035512/

  • प्रमोद मुनघाटे

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/veteran-marathi-writer-and-novelist-anant-aka-nanda-khare-passes-away-in-pune/articleshow/93059164.cms

  • सुनील तांबे

https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/nanda-khare-continued-to-read-write-and-communicate-despite-having-an-oxygen-tube-attached-to-his-nose/articleshow/93083070.cms

  • महाराष्ट्र टाईम्स

https://kolaj.in/published_article.php?v=Interview-with-Marathi-author-Nanda-KhareIC7678412

  • राहुल बनसोडे यांनी घेतलेली मुलाखत

https://www.aksharnama.com/client/article_detail/6207

  • हर्षवर्धन निमखेडकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/6199

  • निमिष साने

https://www.aksharnama.com/client/article_detail/6196

  • प्रसाद कुमठेकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/6195

  • प्र.ब. कुळकर्णी

https://www.aksharnama.com/client/article_detail/6194

  • सुबोध जावडेकर

https://www.loksatta.com/vishesh/nanda-khare-sad-encyclopedia-marathi-author-illness-ysh-95-3036778/

  • रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

https://www.esakal.com/saptarang/literary-nanda-khare-master-vk11

  • अतुल देऊळगावकर

https://scroll.in/article/1029368/the-subversive-genius-of-marathi-writer-and-rationalist-nanda-khare-1946-2022

  • प्राची देशपाण्डे

https://kartavyasadhana.in/view-article/makarand-dixit-on-nanda-khare

  • मकरंद दीक्षित

https://mmkmedia.in/परि-किरण-जो-तुजमध्ये-सत्य/

  • हेमन्त कर्णिक

https://anisvarta.co.in/2022/08/3134

  • प्रभाकर नानावटी

या अंकाविषयी:
या अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या बघता, हा अंक दोन भागात काढावा असे आम्ही योजले आहे. १५ ऑक्टोबरला उर्वरित लेख प्रकाशित करू. या अंकासाठी ज्यांनी लिहून पाठवले, त्या सर्वांचे मनापासून आभार. ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसाठी ही पर्वणीच ठरेल याची आम्हाला खात्री वाटते.

प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.