पृथ्वीवरील मानवेतिहासातील आजवरचा सर्वांत भयानक व खतरनाक असा कोरोना व्हायरस नुकताच येऊन गेला आणि तो अजूनही आपले अस्तित्व अधूनमधून दाखवतच असतो. या कोरोना व्हायरसने जगातील असंख्य मानवदेह नष्ट केले असून अजूनही त्याचा हा प्रचंड प्रकोप त्याने पूर्णरूपेण थांबवलेला नाही. अशा या कोरोना व्हायरसपेक्षासुद्धा कितीतरी पटीने भयानक व खतरनाक असा एक व्हायरस गेल्या शतकापासूनच मानवेतिहासात आपले अस्तित्व नोंदवून हळूहळू हातपाय पसरू लागला आहे. एवढेच नव्हे तर तो व्हायरस रोजच्यारोज आणखीन अपायकारक होत जात आहे. दुर्दैवाने बहुतांश मानवजातीला याची अजूनही पुरेपूर जाणीव झाल्याचे दिसून येत नाही. हीच मानवजातीच्या विनाशाकडे वाटचालीची शोकांतिका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असा हा आजवरचा सर्वांत धोकादायक असा विकृतसम व्हायरस म्हणजे मानवातील अपरिमित व निरंकुश इगो हाच होय. हा व्हायरस आजवरचा सर्वांत भयंकर व अपायकारी व्हायरस ठरू पाहत असल्याचे दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे हा व्हायरस ‘न्याय, अन्याय व नीती’ या त्रयीबद्दलच्या अपसमजातून निपजतो, हे ध्यानातच घेतले जात नसल्याने त्यावरचा सक्षम व सुफल उपाय सापडणे दुरापास्त होऊन बसते/बसले आहे.
कोरोना व्हायरसने मानवावर आक्रमण केले तर त्याचा परिणाम जास्तीत जास्त त्या मानवाचा मृत्यू होऊन तो मानवदेह नष्ट होण्यापुरताच असतो/होतो. अशाप्रकारे नष्ट झालेल्या मानवदेहाचे सगेसोयरे, सहकारी, मित्रमंडळी काही दिवसांतच हा आघात सहन करून त्याला आपल्या विस्मृतीकक्षात ढकलून मोकळे होतात व आपले उर्वरित जीवन नित्यक्रमाने जगू लागतात. परंतु वर नमूद केलेल्या इगो या व्हायरसचे आक्रमण झालेला मानव स्वतः नष्ट होत नाही. शिवाय परिसरातील कोणाही आप्ता-अनाप्तांना तो नष्ट करीत नसला तरी स्वतःचे व परिसरातील आप्ता-अनाप्तांचे जीवन मरणाहून अधिक वाईट व बाधित करून सोडते. या व्हायरसने बाधित झालेली व्यक्ती स्वतःला व त्याच्या परिसरातील आप्ता-अनाप्तांना “मरण परवडले पण असे जीवन नको” अशा मनोवस्थेत आणून सोडते. कुटुंब, परिवार, समाज, गाव, राज्य, राष्ट्र/देश या सर्वांना ह्या व्हायरसने बाधित झालेली व्यक्ती सळो की पळो करून सोडते. कोरोना व्हायरसने येणारे मरण म्हणजे एकप्रकारची जीवनातून सुटका म्हणता येईल, पण इगो व्हायरसने मात्र कोणत्याच प्रकारे जीवनातून सुटका न होता सतत त्याच्या कैदेतच जीवनाचा रुतलेला गाडा ओढत रहावे लागते. आणि अश्यावेळी केव्हा आपला कर्ण होऊन अर्जुनाचा बाण आपला वेध घेईल या मनस्तापीय विवंचनेतच जगावे लागण्याची अवस्था उद्भवते. शिवाय अशी ही वस्तुस्थिती न्याय, अन्याय व नीती या मानव प्रजातीच्या दृष्टीने शाश्वत अशा निसर्गसंमत विचारत्रयींच्या अवकाळी अपमृत्यूलाही कारणीभूत ठरते.
आजच्या या ‘उजाखा’*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय युगात पदोपदी उभ्या ठाकणाऱ्या विविध स्पर्धेमुळे व तद्जनित ईर्षेमुळे मानवीय मनात/नात्यात शिरलेल्या या न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमजातून जन्मास आलेल्या अपरिमित व निरंकुश इगोने एकूणच मानवजातीपुढे शांतिपूर्ण सहअस्तित्वभाव व विवेकपूर्ण सामंजस्यभाव यांच्या अस्तित्वरक्षणाचा तथा अस्तित्वसातत्याचा महाप्रश्नच उपस्थित केला आहे. सृष्टीच्या जतनाबरोबरच मानवीय नात्यांची व मूल्यांचीसुद्धा जपणूक करण्याच्या शाश्वत अशा नैसर्गिक मार्गात हा इगो मोठ्ठा अडथळाच ठरू पाहत आहे. अलगावभावयुक्त व्यक्तिवादाला हा इगो खतपाणीच घालत असल्याचे व निसर्गसंमत तथा निसर्गानुकूल अशा घटकत्वाच्या सिद्धांतालाच तो आव्हानित करू पाहत असल्याचे वर्तमान परिदृश्य असून या व्हायरसचे असे भयानक स्वरूप आता पदोपदी/जागोजागी/देशोदेशी आढळून येऊ लागले आहे.
अशा या चक्रव्यूहात्मक परिस्थिती व वस्तुस्थिती यांच्या माहोलात आपल्याला काही सुयोग्य व सुनियोजित मार्ग सापडतो का, याचा प्रत्येक सुजाण व सुसभ्य व्यक्तीने विचार करणे परमावश्यक तथा अनिवार्य ठरते, असे माझे अल्पबुद्धी आकलन आहे. त्यादृष्टीने विचार करता मला भारतीय संस्कृतीतील चार आश्रमांच्या मांडवाखालून अजूनही अधूनमधून प्रकटणारा अंधुकसा प्रकाश उपायकारक व उपकारक ठरू शकेल असे वाटू लागते. ते चार आश्रम म्हणजे मानवी जीवनाच्या आयुष्याचे चार भाग : ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम. ह्या चारही आश्रमांच्या अनुसरणात एक महत्त्वाचा मानसिक घटक त्या त्या आश्रमीय अनुसरणप्रसंगी अनिवार्य ठरतो, तो घटक म्हणजे संयम हा होय. हा संयमच न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमजाला नामोहरम करून ह्या तद्जनित असलेल्या अपरिमित व निरंकुश इगो-व्हायरसवर यथायोग्य तथा अक्सीर/जालिम असा रामबाण इलाज ठरू शकतो. परंतु सध्याच्या या ‘उजाखा’*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय युगातील बहुतांश आई-वडील आपल्या अपत्याला कधीच संयमाची दीक्षा देत नसतात उलट असंयमालाच उत्तेजन देत असतात. ही वस्तुस्थिती कटू असली तरी नाकारता मात्र येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम या युगातील आई-वडिलांनाच शाश्वत व परिणामकारक अशा भारतीय संस्कृतीतील ‘संयम’ या मानसिक घटकाच्या अनुपालन व अनुसरणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक ठरेल आणि असे होऊ शकले तर आणि तरच मानवजातीला इगो-व्हायरसच्या आक्रमणापासून वाचवता येऊ शकेल. पर्यायाने न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमजातून आजच्या संभ्रमित मानवाची सुटका होऊन न्याय, अन्याय व नीतीचे वास्तविक राज्य प्रस्थापित होऊ शकेल, असेही माझे अल्पबुद्धी आकलन आहे.
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
चलभाष : 8208557164
ईमेल : lskatre55@gmail.com