परीसस्पर्श वाचनाचा

बेथ जॉन्सन यांच्या ‘Reading changed my life’ या पुस्तकाचा मधुवंती भागवत यांनी केलेला अनुवाद
– ‘परीसस्पर्श वाचनाचा’

वाचनशिक्षण हा शिक्षकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. साक्षरताप्रसार ही जगभरात आणि भारतात देशांच्या प्रगतीशी संबंधित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातही आपण असे म्हणतो की स्त्री साक्षर झाली की कुटुंब साक्षर होते. अनंत अडचणींना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साक्षर होणाऱ्या मुली आणि स्त्रिया सर्व देशांत आढळतात आणि आपल्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी प्रेरक ठरतात. याचा प्रत्यय देणारे बेथ जॉन्सन यांचे आणि मधुवंती भागवत यांनी अनुवादित केलेले ‘Reading changed my life’ अर्थात ‘परीसस्पर्श वाचनाचा’ हे पुस्तक अत्यंत गुंगवून टाकणारे आणि स्तिमित करणारे आहे. न्यू जर्सीच्या टाऊनसेंड प्रेस या प्रकाशकाकडे बेथ जॉन्सन तीस वर्षे संपादक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी या प्रकाशकासाठी Everyday Heroes, Facing Addiction, Surviving Abuse आणि Reading changed my life ही पुस्तके लिहिली. आपल्या लिखाणात त्यांनी स्त्रियांची साक्षरता, व्यसनाधीनता, अत्याचार असे संवेदनशील विषय हाताळले आहेत. अनुवादक मधुवंती भागवत या विशेष ग्रंथालयात ग्रंथपाल आहेत. स्वतः ग्रंथपाल असल्याने वाचनामुळे व्यक्तिमत्वात आणि आयुष्यात घडणारे आमूलाग्र परिवर्तन जाणवून त्यांनी अनुवादासाठी केलेली या पुस्तकाची निवड सार्थ ठरली आहे. 

‘वाचायला शिकणे ही अत्यंत आनंददायक गोष्ट आहे.’ असे म्हणणाऱ्या, जाणवणाऱ्या आणि संघर्षातून वाचनाकडे वळणाऱ्या मारिया कार्डेनस, डेझी रसेल, ज्यूलिया बर्नी या अमेरिकेतील फ्लोरिडा, मिसूरी, आणि विस्कॉन्सिन या राज्यांमधील गरीब घरातल्या मुलींच्या थरारक गोष्टी या पुस्तकात आढळतात. या तिघींचेही वडील दारूडे. तिघींच्याही घरात लहानपणी धाकदपटशाचे वातावरण होते. मारिया आणि डेझी या दोघींचे वडील भटके, कामाच्या शोधात स्थलांतरित होणारे. वाचनाला पोषक अशी कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, वाचनवेडाने झपाटून गेलेल्या या तीन महिला कठीण परिस्थितीतून मार्ग काढत निरक्षरतेपासून साक्षरतेपर्यंतचा प्रवास करत आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडवून आणतात, याचा प्रवास चितारणाऱ्या या तीन प्रेरक कथा आहेत.

पहिल्या कथेतली मारिया, स्थलांतरित मजुराची मुलगी. वडिलांच्या रोजच्या मारहाणीला कंटाळलेली, आठ भावंडांमधली दुसरी. शेतीचे काम करत शाळेत कधीतरी हजेरी लावू शकणारी, आपल्यावर बलात्कार केलेल्या तरुणाशी लग्न करून त्याच्या मारझोडीला तोंड देत त्याच्यापासून झालेल्या मुलांना वाढवणारी आणि नंतर भावाकडे परतलेली. अचानक तेराव्या वर्षी आयुष्याला वेगळे वळण लागून शाळेतल्या सल्लागारातर्फे तिने वडिलांचा बंदोबस्त करवला. शिक्षिका मर्सर यांच्या मदतीने तिला दुकानात नोकरी मिळाली. नियमीत शाळेत जाऊन शालेय शिक्षण घेत असता आपल्या मुलीची पुस्तके वाचू लागली. वाचनाने झपाटलेल्या स्थितीत शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ असा पल्ला गाठत असतानाच प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवू लागली.

डेझीचा वाचनप्रवास अठराव्या वर्षी ‘मॉडर्न रोमान्स’ या मासिकापासून सुरू झाला. शाळेत नोकरी मिळाल्यानंतर रात्री प्राथमिक शाळेची पुस्तके वाचत तिने आपला शब्दसंग्रह वाढवला. आताच्या हनिवेल कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर तिला कामगारांसाठी असलेल्या ‘लौबाक साक्षरता’ पद्धतीवर आधारित प्रौढशिक्षणाच्या उपक्रमाविषयी माहिती मिळाली. या उपक्रमात सामील होऊन तिने आपले वाचन सुधारले. वाचनाबरोबरच तिचा आत्मविश्वासही वाढला. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी माध्यमिक शाळा पदवीधर होऊन प्रौढशिक्षणाच्या उपक्रमाची प्रवक्ता झाली. यात तिचे यजमान डॉन यांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. निवृत्तीच्या टप्प्यावर असतानाही डेझी नातवंडांच्या गोतावळ्यात रमली आहे. सर्जनशील लेखनाच्या वर्गात नाव घालण्याच्या विचारात आहे. आपल्या कंपनीतील ‘लौबाक उपक्रमा’च्या समन्वयक पेगी ऑटन आणि डॉन यांच्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञ आणि आपल्या वेदनादायक बालपणातून वाचनमार्ग शोधल्याबद्दल कृतार्थ आहे.

ज्यूलियाची कथाही अशीच प्रेरणादायक आहे. तिला लहानपणापासूनच वाचनाची कमालीची आवड. घरात पुस्तके होती, पण ती ठेवली होती फ्रीजवर! मुलांच्या हातात पडू नयेत अशी! ज्यूलियाची वाचनाची आवड रुबीआत्याकडे जोपासली गेली. रुबीआत्याकडे तिला वाचायला पुस्तके नि मासिके मिळाली. निरक्षर आणि अल्पवयीन पालकांची मुलगी असण्याचे तोटे तिला जाणवले होतेच. अठराव्या वर्षी ज्यूलियाने आईवडिलांचे घर सोडले. रात्रशाळेतून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. रेसिन पोलिसखात्यात कारकून म्हणून काम सुरू करून पाच वर्षांनंतर तिने पोलीस अधिकारी होण्याचे आपले स्वप्नही पूर्ण केले. पुढे घरफोडीचा गुन्हा तपासायला गेली असता ज्यूलियाच्या हाती घबाड लागले. गोदामात मुलांच्या गोष्टींची पुस्तके भरलेली खोकी होती. गोदामाच्या मालकाच्या परवानगीने ती पुस्तके घेऊन तिने आपल्या सहकाऱ्यांबरोबर ठिकठिकाणी नेऊन गरजू मुलांना वाटली. याच्याही पुढे जाऊन तिने ‘कॉप्स न् किडस्’ नावाचे वाचनकेन्द्र स्थापन केले.

या तीनही महिलांचे काम आपापल्या परीने वाचनप्रेरणेतून आलेले आणि अत्यंत स्फूर्तिदायक ठरावे. विपरीत परिस्थितीत केवळ स्वतः साक्षर झालेल्या या स्त्रिया नसून वाचनप्रसाराचे मोलाचे आणि प्रभावी काम करणाऱ्या वाचनदूत ठरतील अश्या महिला होत्या. आपल्या कठोर परिश्रमाने वाचनक्रांती घडवून आणणाऱ्या स्त्रियांच्या कथा अत्यंत रसाळपणे सांगणारे हे पुस्तक वाचनोपचाराचा प्रयोग म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल. कोविडसारख्या कठीण आपत्तीशी मुकाबला करीत असता सकारात्मक रहायला हे पुस्तक मदतीचा हात देईल.

मधुवंती भागवत यांनी या पुस्तकाचा केलेला ओघवता अनुवाद मूळ पुस्तकाइतकाच वाचनीय आणि रोचक झाला आहे. त्यात पूरक वाचनसाहित्य सुचवल्याने पुस्तकाचे मोल वाढले आहे. त्यामुळे मराठी वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच ठरावी. ही वाचनसाहित्याची सूची अधिक समावेशक करता आली असती. हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध आहे. इच्छूकांनी खालील ईमेलवर संपर्क साधावा.

लेखिकेचे नावः- बेथ जॉन्सन
शीर्षक – ‘Reading changed my life’

परीसस्पर्श वाचनाचा
अनुवाद मधुवन्ती भागवत
ई-मेल:- madhu.bhagwat@gmail.com
मुद्रक:- प्रत्युष इंटरप्रायझेस, नवी मुंबई

अभिप्राय 2

  • “परिसस्पर्श वाचनाचा” हा “Reading Changed My Life” या पुस्तकाच्या अनुवादित पुस्तकाबद्दल लिहिलेल परिक्षण वाचल्याने एक चांगल्या पुस्तकाचा परिचय झाला. वाचन वेड्यांना वाचते ठेवण्यासाठी हा लेख उपयोगी ठरेल. धन्यवाद.

  • Wonderful indeed! Many many thanks.
    Great to know about the availability of the book too!
    Namaskar

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.