प्रतिसाद

1. मराठी नियतकालिकांची हतबलता
राम जगताप यांचा आजचा सुधारकात पुन:र्मुद्रीत लेख वाचला. मराठी नियतकालीकांची परवड होत असल्याचे वाचून वाईटही वाटते. पण याला जबाबदार संपादकांची वृत्तीही कारणीभूत असावी असे वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास शरद जोशींचा शेतकरी संघटक मोठ्या आवडीने वाचत असूं पण जोशींना सत्तेचे डोहाळे लागून संसदेत स्थिरावले. शिवार नावांच्या कंपनीसाठी शेअर गोळा केले. त्याचे पुढे काय झाले. कळलेच नाही.
साधना साप्ताहिकाने तहहयात वर्गणीची मागणी ग्राहकांकडून केली. यदुनाथजी गेल्यावर काहीकाळ मा. प्रधानसरांकडे त्याच संपादकत्व आलं त्यानी वर्गणी वाढवून फरकाची रक्कम भरा नाही तर अंक बंद केला जाईल असा दम दिला. बरचं मी पत्रातून त्यावेळी लिहिलं होतं ते त्यांना रूचले नसावे. अंक बंद झाला. आजचा सुधारक नि दत्तप्रसाद दाभोळकर यांचा वाद सुधारकातून प्रसिध्द झालेला सर्वश्रृत आहेच.
मराठी मासिक नियतकालिकांची वर्गणी हिंदी साप्ताहिक/मासिकाच्या तुलनेत बरीच अधिक आहे, हे मराठी नियतकालिकं चालविणाऱ्यांनी ध्यानी घ्यायला हवं. दुसरं तुमचा एक ठराविक लेखकवर्ग आहे. गांव खेड्यातल्या अल्प शिक्षिताची काही मत असतात. त्याचे लिखाणाला या नियतकालिकातून स्थान मिळत नाही. तुमचचं इतरांनी वाचावं ही देखील मुजोरीच म्हणावी लागेल. एका चांगल्या विषयाला वाचा फोडलीत, अभिनंदन!

मोरेश्वर वडलकोँडावार, मूल जि. चंद्रपूर.

mwadlakondawar1945@gmail.com

2. आजचा सुधारक, सप्टेंबर 2015चा अंक
डॉ. पाठक यांनी 1950 मध्ये secular शब्द भारतीय घटनेत आल्याचा उल्लेख केलाय (पान 9). तो बरोबर नाही. ती देणगी आहे 1976च्या घटना दुरुस्तीची. याचा उल्लेख त्यानी पुढे केलाय.
त्याच लेखात खजगी आयुष्यात धर्म न सोडता धर्म निरपेक्षता राबवता येते याचे उदाहरण म्हणून इंदिरा गान्धी आणि आंबेडकर यांचा उल्लेख आहे. ही दोन्ही उदाहरणे वेगवेगळ्या कारणांसाठी ठीक वाटत नाहीत. आंबेडकर खाजगी आयुष्यात निधर्मीच राहिले. त्यांचा बौद्ध धर्म म्हणजे निषेधाचे एक वाजवी हत्यार होते. इंदिरा गान्धींनी धर्माचा उपयोग (किंवा दुरुपयोग) राजकारणात भिन्दरवालेच्या रुपात केला आणि त्याची किंमतही मोजली.
वालावलकरांचे विचार नेहमीच प्रामाणिक वाटतात. अप्रिय सत्य सांगण्याचे धाडस ते करतात. तीच गोष्ट माधव गाडगीळांची एका वेगळ्या संदर्भात.
राम पुनियानी यानी सुफी परंपरे विषयी सांगितलय. इस्लामच्या कट्टरवाद्यांनी सुफीशी समझोता केला असे ते म्हणतात. वस्तुस्थिति याच्या उलट आहे अस दिसत. भारतात चिश्ती सोडले तर बहुतेक सुफी तरीके राज्यकर्त्यांच्या जवळ गेले. मात्र सुफ़ी आणि भक्ती संप्रदायात साम्य आहे आणि इब्न अराबी आणि गझलीचे तत्त्वज्ञान अद्वैताशी किंवा एकत्वाशी (Monism) बऱ्यापैकी मिळते जुळते हे निर्विवाद. आसू आता धर्माचे महत्व – नाईलाजान का होईना – मानू लागलाय का? पुनियानी यांचा लेख त्या दृष्टिने महत्वाचा.
आसू नक्कीच वाचण्याजोगा आणि विचार करण्याजोगा. भारतीय किंवा हिंदू परंपरात जे काही (थोडं-फारं) चांगलं आहे ते नजरेआड केलं नाही तर आसूची पत आणि प्रसार आणखी वाढेल असं मला वाटतं.

शशिकांत पाडळकर

padalkars@gmail. com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.