मिखाएल गोर्बाचेव्ह यांची सत्ता सोवियत संघाच्या जनतेने त्यांना पुनः बहाल केली. हजारो लोकांनी रणगाड्यांना तोंड देत, आपले प्राण पणाला लावून नवजात स्वातंत्र्याचे रक्षण केले. बंड करणाऱ्या पुराणपंथी लोकांचा पराभव झाला आणि जी क्रांती गोर्बाचेव्ह यांनी १९८५ साली सुरू केली होती. त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या सामाजिक शाक्तींनी गोर्बाचेव्ह यांना पुनः परत सत्तेवर आणले. १० मे १९८९ पासून रुमानिया, पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया या देशातील जनतेने “जनतेच्या लोकशाह्या” उद्ध्वस्त केल्या. फक्त मे १९८९ मधील चीनच्या जनतेचे बंड अयशस्वी ठरले. कारण चीनच्या ‘जनमुक्तिसैन्याने कट्टरपंथी लोकांना साथ देऊन हजारो तरुण विद्यार्थ्यांचे शिरकाण केले. पण डेंग झियाओ पेंग आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास क्षमा करणार नाही. हू याओ बांग आणि झियाव झियांग यांनी निर्माण केलेल्या सामाजिक शक्ती विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
मिखाएल गोर्बाचेव्ह यांचे जगाच्या इतिहासात मोठे महत्त्वाचे स्थान आहे. ते जर त्यांच्या योजनेत यशस्वी झाले तर १९५० पूर्वीच्या ५० वर्षांच्या इतिहासाचा नायक ज्याप्रमाणे लेनिन ठरला त्याप्रमाणे १९५० नंतरच्या इतिहासाचे गोर्बाचेव्ह हे नायक ठरतील, कारण त्यांनी असंख्य लोकांस मुक्तीचा मार्ग दाखवला. अनेक प्रतिभावंतांना त्यांना प्रिय असणारे स्वातंत्र्य दिले आणि जगातील सर्व जनतेची अणुयुद्धाच्या भीतीपासून मुक्तता केली. युद्धखोर राष्ट्रांचा युद्धोन्माद कमी केला आणि मानवी मूल्ये आणि मानवी अधिकार यांना महत्त्व देणाऱ्या विश्वसमाजाच्या स्थापनेची कल्पना पुढे मांडली.
गोबचिन्ह ज्यावेळी सत्तेवर आले त्यावेळी सोवियत संघामध्ये सामाजिक व आर्थिक विकास कुंठित अवस्थेत होता. ब्रेझनेव्ह यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या राजवटीत सर्जनशीलतेचे, विकासाचे आणि नव्या विचारांचे प्रवाह जबरदस्तीने गोठवले होते, आणि समाजवादाच्या नावाखाली नोकरशाहीच्या हातात पूर्ण सत्ता होती. समाजवादाचा व मार्क्सवादाचा जप ते मंत्र म्हणून करीत असले तरी त्यांचा खरा उद्देश सत्तेचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करणे हाच होता. त्यामुळे सोविएत रशिया जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत मागे पडत होता. गोर्बाचेव्ह यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले आणि त्यांनी खुलेपणाची व पुनर्रचनेची चळवळ सुरू केली. १९८७ साली सोवियत क्रांतीच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जे भाषण केले त्यामध्ये आपल्या समाजवादाचे स्वरूप विशद करीत असताना त्यांनी मानवी मूल्यांवर भर दिला, व्यक्तिगत स्वाथएिवजी सर्व समाजाचे कल्याण, शोषण व दमन याऐवजी स्वातंत्र्य व समता, काही जणांच्या हुकूमशाही राजवटीऐवजी जनतेच्या हातात खऱ्या अनि सत्ता देणे, सामाजिक शक्तींच्या क्रूर आणि अनिबंध व्यवहाराऐवजी विवेक आणि मानवतावाद यांना जास्त महत्त्व देणे आणि भांडणे, झगडे आणि युद्ध याऐवजी संपूर्ण मानव जातीचे ऐक्य आणि विश्वशांतता या तत्त्वांचा त्यांनी पुरस्कार केला. गोर्बाचेव्ह यांच्या विचाराची व्यापकता, त्यामधील अस्सल मानवतावाद आणि भांडवलशाही आणि नोकरशाहीने खराब केलेला समाजवादी समाज यातून वेगळा मार्ग काढण्याची त्यांची धडपड यामुळे लेनिननंतरचा हा मोठा पुढारी होणार हे काही विचक्षण टीकाकारांनी लक्षात घेतले होते.
सत्तेवर आल्यानंतर समाजवादाच्या व जनतेच्या नावावर जनतेलाच बंधनात ठेवणारे जे नियम व कायदे होते ते गोर्बाचेव्ह यांनी रद्द केले आणि मोठ्या प्रमाणात लोकांना नागरी हक्क प्रदान केले. १९८७ नंतर राजकीय व सामाजिक बदलाची प्रक्रिया जास्त वेगाने सुरू झाली, गोर्बाचेव्ह यांच्यासमोर खालील पाच प्रश्न उभे होते.
(१) सोवियत संघात लोकशाहीकरणाची प्रक्रिया सुरू होताच १५ वेगवेगळ्या गणराज्यांत स्वातंत्र्य व स्वायतत्ता यांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी चळवळी पुढे आल्या. ही चळवळ सर्वात मोठ्या रशियन गणराज्यातही जोरात वाढू लागली. प्रश्न होता केंद्र-राज्य संबंधांची पुनर्रचना करण्याचा.
(२) सोवियत कम्युनिस्ट पक्षाची सत्तेवर गेली ७० वर्षे मक्तेदारी होती. या मक्तेदारीमुळे हा पक्ष नव्या सुधारणांचा विरोधक बनला. मार्क्सवाद-लेनिनवादाची रचनात्मक मांडणी न करता हडेलहप्पी करून नोकरशाहीच्या मदतीने सत्ता राबविण्याची या पक्षास सवय लागली. त्यामुळे गोर्बाचेव्ह याच्या सुधारणांना पाठिंबा देत असतानाच पक्षातील परंपरावादी नेते त्यांना मागे खेचीत राहिले.
(३) सोवियत राज्यसंस्था व सोवियत कम्युनिस्ट पक्ष यांच्यात एकात्मता कल्पिण्यात आली. राज्यसंस्था ही सर्वांना स्प णारी सर्वसमावेशक संस्था असते आणि पक्ष एका विशिष्ट विचाराने प्रेरित झालेल्या कार्यकत्यांची संघटना असते. या दोन्हीतील वेगळेपणा अमान्य केल्यामुळे त्या सोवियत संघातील राजकीय उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता संपुष्टात येत आहे हे गोर्बाचेव्ह यांच्या लक्षात आले, व कम्युनिस्ट पक्षाला राज्यसंस्थेपासून वेगळे करावयास त्यांनी सुरुवात केली.
(४) सोवियत संघातील आर्थिक दुरवस्थेतून हे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. समाजवादी अर्थरचनेत नोकरशाहीद्वारा नियंत्रित अर्थव्यवस्था पुरेशी उत्पादक राहिली नाही. सर्वच क्षेत्रातून खासगी मालमत्ता रद्द केल्यामुळे समाजातील उपक्रमशीलता कमी झाली व राज्यावर हवाला ठेवला गेला. नवे प्रयोग व संशोधन झाले नाही. विज्ञान व तंत्रज्ञानात सोवियत संघ मागे पडला. त्यामुळे अर्थकारणाच्या सर्वच क्षेत्रांत कुंठितावस्था निर्माण झाली. सोवियत व्यवस्थेत सुधारणा करावयाची असेल तर तिच्या अर्थरचनेची पुनर्रचना बाजारपेठेच्या आधारावर करावी लागेल व त्यासाठी समाजवादाच्या काही तत्त्वांना तिलांजली द्यावी लागेल.
(५) सोवियत संघाने अमेरिकेशी महाशक्ती म्हणून स्पर्धा करीत लष्करावर खूप खर्च केला. तिसऱ्या जगातील देशांना मदत केली. अफगाणिस्तानात खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे पूर्व युरोप, अंगोला, कंबोडिया, अफगाणिस्थान व इथिओपिया या देशांतील सरकारांना मदत करता करता सोवियत सरकार हातघाईला आले. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांनी शांततेची आक्रमक मोहीम सुरू केली. त्यामुळे शांतता स्थापन झाली. अणयुद्धाची भीती कमी झाली, पण सोवियत सामर्थ्य कमी झाल्यामुळे अमेरिकेची दादागिरी वाढली. गोर्बाचेव्ह यांच्याकडून तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांच्या अनेक अपेक्षा होत्या, पण ते त्या पुऱ्या करू शकले नाहीत.
गोर्बाचेव्ह यांच्या सुधारणांना लोकांचा पाठिंबा मिळाला. पण त्यांच्या काळात रशियाचे आर्थिक प्रश्न सुटले नाहीत. ते जास्त गंभीर बनले, कारण सोवियेत रचनेमध्ये मूलगामी सुधारणा करणे, लोकांना त्यासाठी काम करावयास उद्युक्त करणे, गोर्बाचेव्ह यांना जमले नाही. या कार्यात गोर्बाचेव्ह यांच्या हाती कम्युनिस्ट पक्षाची संघटना होती. पण अनिबंध सत्ता भोगलेले त्या पक्षातील पुढारी पूर्ण बदलास तयार नव्हते. त्यांची गोर्बाचेव्ह यांना मनापासून साथ नव्हती. लोकांना संघटित करून समाजवादाच्या नव्या मार्गावर त्यांना नेण्याची जबाबदारी या पक्षाने पार पाडली नाही. उलट जन्या व्यवस्थेकडे नेण्याचा किंवा बदल रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
या काळात राजकीय जीवनात जी पोकळी निर्माण झाली होती ती पृथकतावादी, राष्ट्रवादी चळवळींनी आणि बोरिस येल्त्सिन यांच्यासारख्या जहाल सुधारणावाद्यांनी भरून काढली. सोवियत संघातील बाल्टिक गणराज्यांत, आशियाई व मागास गणराज्यांत वांशिक राष्ट्रवादी गट प्रबळ झाले, तर रशियामध्ये भांडवलशाहीकडे जाण्याची इच्छा असणारे गट प्रभावी ठरले. गोर्बाचेव्ह परंपरावादी व सुधारणावादी यांच्या कात्रीत सापडले आणि कम्युनिझम व भांडवलशाही या दोन्हीमधून तिसरा जास्त मानवतावादी मार्ग त्यांना सापडला नाही. त्यामुळे नवा मार्ग शोधण्याची संधी श्री बोरिस येल्त्सिन यांना मिळाली व त्यांना रशियन जनतेचा पाठिंबा मिळाला. गेल्या जून महिन्यातील निवडणुकीत रशिया प्रांताच्या अध्यक्षपदी ते जवळ-जवळ शेकडा ५६ टक्के मते मिळवून निवडून आले. कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारास फक्त शेकडा १६ टक्के मते मिळाली. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांच्या लक्षात आले की आपल्या पायाखालील वाळू घसरत आहे.
त्यासाठी त्यांनी पश्चिमेकडील श्रीमंत देशांकडून मदतीची मागणी केली व यासाठी त्यांनी त्यांची मनधरणी केली. कम्युनिस्ट पक्षाने लोकशाही समाजवादाचा मार्ग स्वीकारावा अशी त्यांनी मागणी केली. कारण सर्व बदल कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून व्हावेत असे त्यांना वाटत होते. पण पक्षाने त्यास मान्यता दिली नाही. सोवियत संघातील संघ-घटक राज्य-संबंध सुधारण्यासाठी नऊ महत्त्वाच्या घटक राज्यांशी करार केला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सत्ता प्रदान करण्यात आली. संरक्षण, परराष्ट्र -व्यवहार, नियोजन इत्यादी काही क्षेत्रांतच केंद्राला अधिकार देण्यात आले. या नऊ राज्यांत जवळ जवळ शेकडा ९० टक्के जनता राहते. या तीन उपायांच्या द्वारा सोवियत युनियनमध्ये परिवर्तन करता येईल. बाजारपेठेवर आधारलेली अर्थव्यवस्था उभारता येईल असे त्यांना वाटले. कारण बाजारपेठेवर आधारलेली अर्थव्यवस्था उभारली की आपल्या सर्व आर्थिक समस्या चुटकीसरशी दूर होतील असे येल्त्सिन यांच्यासारख्यांचे मत आहे.
रामपण गोर्बाचेव्ह यात यशस्वी झाले नाहीत आणि १९ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या विरोधात लष्कर, गुप्तहेरखाते आणि नोकरशाहीतील प्रस्थापितांनी उठाव केला व त्यांना पदच्युत केले. सोवियत सरकारचे अनेक मंत्री सेनापती आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी यांचा त्या बंडास पाठिंबा होता. सोवियत कम्युनिस्ट पक्ष व सरकारातील अनेक नेते कुंपणावर बसले होते, कारण लष्कर व गुप्तहेरसंघटना यांच्या जोरावर बंड यशस्वी होईल असे त्यांना वाटले; पण मॉस्को व लेनिनग्राड येथील जनता रस्त्यावर आली, येल्त्सिन यांनी इतर गणराज्यांनाही बंडास विरोध करण्याची विनंती केली. सैन्यात आणि गुप्तहेरसंघटनेत फूट पडली. बंड यशस्वी करायचे तर हजारो लोकांना ठार मारावे लागेल, सगळ्या सोवियत संघास अराजकाच्या खाईत लोटावे लागेल हे बंडखोरांच्या लक्षात आले. परिवर्तन आणि स्थित्यंतर गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाखालीच शांततामय मागनि होईल अशी लोकांना खात्री वाटली. गोर्बाचेव्ह यांना सत्तेवर आणणे म्हणजे आपली मोलाची लोकशाही स्वातंत्र्ये जपणे, मोकळेपणा चालू ठेवणे आहे. हे लोकांच्या लक्षात आले.
आता सत्तेवरचे गोर्बाचेव्ह हे येल्त्सिन यांच्याकडे जास्त झुकणार आहेत. त्यामुळे प. युरोप व अमेरिकेच्या मदतीने परकीय मदत, भांडवलशाही व उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेची स्थापना, बाजारपेठेस महत्त्व, बाल्टिक गणराज्यांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता वा स्वातंत्र्य, इतर गणराज्यांनाही मोठ्या प्रमाणात अधिकार इत्यादि गोष्टी गोर्बाचेव्ह यांना येल्त्सिन यांचे ऐकून कराव्या लागणार आहेत. स्वतःला कम्युनिस्ट पक्षापासून दूर करून आणि कम्युनिस्ट पक्षाची सत्ता रद्द करून गोर्बाचेव्ह यांनी परंपरेपासून आपली नाळ तोडली. आता त्यांचे ध्येय समाजवादापेक्षा लोकशाही आणि नागरी अधिकारांवर उभा असणारा समाज हे असणार आहे. बंडाला ‘मौनं संमतिलक्षणम्’ या न्यायाने कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे असे झाले. आता कदाचित् ते स्वतःचा असा लोकशाही समाजवादी पक्ष निर्माण करतील. पण कम्युनिस्ट पक्षास सत्ताच्युत करून गोर्बाचेव्ह यांनी आपल्या हातातील एक महत्त्वाचे हत्यार गमावले आहे. त्यांना लोकशाही राजकारणात येल्त्सिन यांचा पाठिंबा न घेता टिकून राहायचे असेल तर स्वतःचा पक्ष उभा करावा लागेल.
सोवियत संघातील घडामोडींनी मार्क्सवाद, लेनिनवादाच्या तत्त्वज्ञानाच्या आचारासच आव्हान दिले आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्था विजयी ठरली का ? लोकांच्या धार्मिक भावना ७४ वर्षांच्या धर्मनिरपेक्ष राजवटीतही जिवंत असतात का? सोवियत प्रयोग सर्वच टाकाऊ होता का? तिसऱ्या जगातील देशांचे शोषण करणाऱ्यात आता सोवियत संघही सामील होणार का ? आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाच महासभेचे वर्चस्व राहणार का? जगभरच्या कम्युनिस्ट चळवळीचे काय होणार ? १९८७ साली गोर्बाचेव्ह यांनी मानवीमूल्यांवर समाजवादी समाजरचना करण्याचा जो संकल्प केला होता तो त्यांनी सोडून दिला का? हे व इतर अनेक प्रश्न आता उपस्थित होणार आहेत. परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्यांनी पोथीनिष्ठा व आवडते पूर्वग्रह बाजूस सारून याकडे पाहिले पाहिजे.
गोर्बाचेव्ह यांच्या राजकीय जीवनाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. त्यांचे पुनरागमन जसे रोमहर्षक ठरले तसा त्यांच्या राजकीय जीवातील दुसरा टप्पाही महत्त्वाचा ठरणार आहे. या टप्प्यात ते जर सोवियत संघाची एकता राखू शकले, आर्थिक विकासाचा वेगळा मार्गअनुसरू शकले व तीन चार वर्षात पुनः त्या देशास जगातील एक प्रमुख महासत्ता म्हणून प्रस्थापित करू शकले, तर त्यांना पुनः त्यांच्या मूळ संकल्पाकडे वळता येईल. पण त्यांनी आपला अधिकार व राजकीय नैपुण्य दाखविले नाही तर त्यांच्या जागी वर्षभरात बोरिस येल्त्सिन वा इतर कोणी पुढारी राष्ट्रपती म्हणून निवडला जाण्याची शक्यता आहे.
राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर