साक्षात्कार, विज्ञान आणि विवेकवाद
प्रा. श्याम कुळकर्णी यांच्या पत्राला उत्तर दिल्यानंतर त्यांची पुन्हा अनेक पत्रे आली आहेत. त्यांपैकी एक याच अंकात अन्यत्र छापले आहे. या पत्रात त्यांनी विवेकवादासंबंधाने मी जे वेळोवेळी लिहिले आहे त्यासंबंधी अनेक आक्षेप घेतले आहेत, आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक या प्रश्नांपैकी बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत ठिकठिकाणी आली आहेत. ( विशेषतः ‘विवेकवाद – ४: जुलै १९९०, पृ. ११-१६ पहावा.) परंतु त्यांचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे ते प्रश्न अनुत्तरित आहेत अशी त्यांची समजूत झाली आहे. अर्थात् हा सर्वस्वी त्यांचा दोष आहे असे मी म्हणत नाही. माझे लिहिणे पुरेसे स्पष्ट नसले पाहिजे. ते कदाचित् संक्षिप्त असल्यामुळे त्याचा अभिप्राय सविस्तर लक्षात येण्यास अडथळाही आला असेल, हे मी कबूल करतो. आणि म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो.
या प्रश्नांना एक वैयक्तिक पत्र लिहून मी उत्तर देऊ शकलो असतो. परंतु जे प्रश्न प्रा. कुळकांना पडले आहेत तेच प्रश्न अन्यही लोकांना विचारताना मी पाहिले आहे. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे ‘आजचा सुधारक’ मध्ये दिल्यास अनेक लोकांना त्यांचा उपयोग होऊ शकेल असे मला वाटले. म्हणून हे उत्तर ‘आजच्या सुधारक’ मध्ये मी देत आहे. ते शक्य तितके पूर्ण स्पष्ट आणि सलभ करण्याचा प्रयत्न केला आहे…
प्रथम एक गैरसमज दूर करतो. प्रा. कुळकर्णी म्हणतात की ‘ विवेकवादानुसार कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळविण्याची एकमेव पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत’ असे मी म्हणतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मी असे कुठेही म्हटलेले नाही. मी कुठे तसे म्हणालो आहे ते प्रा. कुळकण्यांनी दाखवून द्यावे, उलट सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही असे मी अतिशय स्पष्टपणे ‘ विवेकवाद -१२ मध्ये म्हटले आहे. उदा. नीतीचे प्रश्न किंवा आभिरोचिकीचे (aesthetics) प्रश्न विज्ञान सोडवू शकत नाही असेच माझे म्हणणे आहे.
मग विज्ञानाच्या वतीने माझा दावा काय आहे? तो दावा असा आहे की वस्तुस्थितीच्या ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाचा अधिकार सार्वभौम आहे. ‘वस्तुस्थितीचे ज्ञान या शब्दबंधाने मला अभिप्रेत असलेले ज्ञान कोणते आहे? वस्तुस्थितीचे किंवा वास्तवाचे ज्ञान म्हणजे विश्वात काय आहे आणि त्याचे स्वरूप काय आहे याविषयीचे ज्ञान, या क्षेत्रात सर्वाधिकार विज्ञानाचा आहे असे मी म्हणतो. पण त्याचा अर्थ विज्ञानाला ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्व प्रश्न सोडविता येतात असा नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञानाला जे अज्ञेय असेल ते अन्य कोणालाही ज्ञेय असू शकत नाही. ज्ञानक्षेत्रातील प्रश्न जर कोणाला सोडविता येण्यासारखे असतील तर ते विज्ञानालाच येतील, आणि या क्षेत्रातील जे प्रश्न विज्ञानाला सोडविता येत नाहीत ते अन्य कोणालाही सोडविता येणे शक्य नाही. आता साक्षात्कारवाद्यांचा दावा असा असतो की विश्वाच्या विज्ञानाला अगम्य अशा अंगांविषयी साक्षात्काराने ज्ञान मिळते. म्हणजे साक्षात्काराचे क्षेत्र ज्ञानाचे क्षेत्र आहे; आणि साक्षात्काराने विश्वाविषयी किंवा त्याच्या एखाद्या गूढ अंगाविषयी कसलेही ज्ञान (म्हणजे अर्थात् यथार्थ ज्ञान) मिळत नाही असे मला म्हणायचे आहे.
आता प्रथम साक्षात्काराविषयी माझे मत सविस्तर मांडतो.
‘साक्षात्कार’ या शब्दाचा मूळ अर्थ साक्षात्करण, म्हणजे एखाद्या गोष्टीचे प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घेणे.’ साक्षात्’ आणि प्रत्यक्ष’ हे दोन्ही शब्द अक्षि’ म्हणजे डोळा या शब्दापासून बनलेले आहेत. दृश्य गोष्टी जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो, तेव्हा त्यांचा आपल्याला साक्षात्कार होतो. साक्षात् ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञानही म्हणतात. जे ज्ञान साक्षात् किंवा प्रत्यक्ष नसते ते अप्रत्यक्ष किंवा परोक्ष आहे असे म्हणतात. उदा. एखाद्या वस्तूची माहिती आपल्याला जर तिच्या प्रत्यक्ष दर्शनाने झालेली नसून तिच्या फोटोवरून किंवा तिच्या चित्रावरून झालेली असते तर तिला अप्रत्यक्ष किंवा परोक्ष ज्ञान म्हणतात. जे ज्ञान परोक्ष नसते त्याला अपरोक्ष ज्ञानही म्हणतात. अपरोक्ष म्हणजे साक्षात् किंवा प्रत्यक्ष परंतु ‘साक्षात्कार हा शब्द जरी मुळात दृश्य वस्तूंच्या ज्ञानासंबंधाने वापरला जात असला तरी तो लाक्षणिक अनि दृश्य नसलेल्या वस्तूंच्या ज्ञानाविषयीही वापरतात. हे ज्ञान अव्यवहित किंवा व्यवधानरहित असते असा त्यात भाव असतो. ज्याप्रमाणे आपला डोळा आणि त्याचा विषय यांमध्ये कसलेही व्यवधान किंवा आडपडदा नसताना होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष किंवा साक्षात् ज्ञान म्हणतात. त्याचप्रमाणे एखाद्या आवाजाचे सरळ कानांनी होणारे ज्ञानही साक्षात्कारच होय. तेव्हा आपल्या कोणत्याही ज्ञानेंद्रियाने त्याच्या उचित विषयाचे (म्हणजे डोळ्याने रूपाचे, कानाने आवाजाचे इ.) जे व्यवधानरहित ज्ञान होते ते साक्षात्काराच्या स्वरूपाचे असते.
इंग्रजी भाषेतील ‘ intuition’ हा शब्द नेमका याच अर्थाचा आहे. Intuition म्हणजे ज्या ज्ञानप्रकारात ज्ञाता ज्ञानविषयाच्या साक्षात् किंवा प्रत्यक्ष संबंधात येतो तो ज्ञानप्रकार. उदा. पाहणे, ऐकणे, इ. intuition चेच प्रकार आहेत. ‘ Intuition’चा हा अर्थ आणखी स्पष्ट करण्याकरिता त्याच्यामागे” sensible’ हे विशेषण लावतात. ‘Sensible intuition ‘ म्हणजे दृश्य, श्राव्य, इ. विषयांचे सरळ ज्ञान, ज्यात ज्ञानेंद्रिय आणि त्याचा विषय यांत कसलाही आडपडदा किंवा व्यवधान नसते. ‘Sensible intuition’ला मराठीत ‘ऐंद्रिय प्रत्यक्ष म्हणतात.
परंतु साक्षात्कार’ आणि ‘ intuition’ हे दोन्ही शब्द जरी त्यांच्या प्राथमिक अर्थी वापरले जात असले, तरी त्या शब्दांचा सामान्यपणे होणारा उपयोग मात्र या प्राथमिक अर्थाहून (वाच्यार्थाहन) वेगळा आहे. खरे म्हणजे या शब्दांचा सामान्यपणे होणारा उपयोग लाक्षणिक आहे. ‘ज्ञेय वस्तूचे साक्षात ज्ञान ‘ एवढा अर्थ त्या विस्तारित अर्थात आहेच, पण त्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचा विषय इंद्रियगोचर नसतो. अनैद्रिय किंवा अतींद्रिय अशा वस्तूचे साक्षात ज्ञान असे त्याचे स्वरूप असते. म्हणजे या साक्षात्काराचा -विषय अनेंद्रिय असतो. त्याला साक्षात्कार म्हणण्याचे कारण असे आहे की ते ज्ञान ऐंद्रियविषयाच्या प्रत्यक्षाप्रमाणे प्रत्यक्ष किंवा व्यवधानरहित असते. ते ज्ञाता आणि विषय यांच्यामध्ये तिसऱ्या एखाद्या गोष्टीच्या मध्यस्थीने होणारे ज्ञान नसते, तर ते निर्मध्यस्थ ज्ञान असते.
अशा प्रकारचे ज्ञान आपल्याला होण्याकरिता अर्थात् आपल्या मनाजवळ एखादी वेगळी शक्ती असावी लागते. अशी शक्ती आपल्याजवळ असते असे सामान्यपणे मानले जाते. उदा. आस्वादकाला निसर्गात किंवा कलावस्तूत सौंदर्याचा अनुभव येतो, हा अनुभव येण्याकरिता त्याला डोळे आणि कान इ. इंद्रिये असणे अर्थातच अवश्य असते. चित्राचे सौंदर्य जाणवण्याकरिता ते प्रत्यक्ष पहावे लागते, आणि गाण्याचे सौंदर्य जाणवण्याकरिता ते प्रत्यक्ष ऐकावे लागते. पण म्हणून सौंदर्य हा केवळ दृश्य किंवा श्राव्य गुण आहे असे म्हणता येणार नाही, कारण चित्रांचे सौंदर्य जाणण्याकरिता एक दृष्टी लागते आणि ती प्रयत्नपूर्वक प्राप्त करावी लागते, आणि तीच गोष्ट गाण्यातील सौंदर्याचीही आहे. एकच गायक दर्दी श्रोता आणि अरसिक अडाणी श्रोता त्यांच्यापुढे गात असतो. जे स्वर एकाच्या कानावर पडतात तेच दुसऱ्याच्याही कानावर पडत असतात, पण एकाला त्यांत सौंदर्याचा साक्षात्कार होतो, तर दुसऱ्याला फक्त स्वर ऐकू येतात. तेव्हा सौंदर्यानुभूतीकरिता मनाच्या ठिकाणी उपजत किंवा साधनेने प्राप्त केलेली एक शक्ती असावी लागते असे आपण म्हणू शकतो. जिला वर अनेंद्रिय प्रत्यक्ष’ किंवा ‘ nonsensuous intuition “अशी नावे आपण दिली तीच ही शक्ती होय असे म्हणता येईल.
अनैद्रिय प्रत्यक्षाचे आणखी एक उदाहरण घेऊ. स्वतोमूल्याचे ज्ञान हे या प्रकारचे प्रत्यक्ष ज्ञान आहे असे मानले जाते. स्वतोमूल्य ही गोष्ट इंद्रियगोचर गोष्ट नाही हे मान्य व्हायला हरकत नाही. डोळा, कान, इत्यादि कोणत्याही इंद्रियाने आपल्याला वस्तूंचे मूल्य कळत नाही. म्हणून असे म्हणतात की आपल्या मनाच्या ठिकाणी अनेंद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाची एक शक्ती आहे आणि तिला वस्तूंचे स्वतोमूल्य ग्रहण करता येते.
वरील उदाहरणांसंबंधाने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे या अनेंद्रिय प्रत्यक्षाने ऐंद्रिय वस्तूंच्या ठिकाणी असणाऱ्या अनैद्रिय गुणांचे ज्ञान होते. उदा. सुख ही गोष्ट स्वतोमूल्यवान आहे असे प्रतिभान (intuition) आपल्याला होते असे आपण म्हणतो. सुख ही गोष्ट इंद्रियगोचर आहे. या सखनामक इंद्रियगोचर वस्तच्या ठिकाणी स्वतोमूल्य किंवा intrinsicvalue नावाचा एक अनैद्रिय गुण आहे असे आपले प्रतिभान
एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण प्रा. कुळकण्यांच्या पत्राकडे वळू.
‘कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळविण्याची एकमेव पद्धत म्हणजे वैज्ञानिक पद्धत असे मी म्हणतो या प्रा. कुळकर्त्यांच्या आक्षेपांचा उल्लेख वर आलाच आहे, आणि तसे मी कोठेही म्हटलेले नाही हे माझे उत्तरही वर देऊन झाले आहे. यावर प्रा. कुळकपयांचा आक्षेप असा आहे की विश्वाविषयी ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे वैज्ञानिक उपाय असे म्हणणे ही एक प्रकारची श्रद्धाच झाली, आणि माझ्या मतानुसार श्रद्धा ही अविवेकी गोष्ट असल्यामुळे वरील विधानाचा निःशंक स्वीकार करणे ही विवेकवाद्यांनी केलेली अविवेकी गोष्ट असे म्हणावे लागेल.
पण विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे एकमेव साधन म्हणजे वैज्ञानिक पद्धत असे म्हणणे, किंवा हे मत स्वीकारणे यात श्रद्धा आहे असे म्हणणे बरोबर नाही, श्रद्धा म्हणजे अशा विधानावरील अचिकित्सक, अविचल विश्वास की ज्याच्या सत्यतेचा कसलाही पुरावा (निदान पुरेसा पुरावा) नसतो. उदा. परलोकाचे अस्तित्व. परंतु विज्ञानाचे विश्वसनीयत्व आज पुरेसे प्रस्थापित झाले असून त्याच्याहून समर्थ असे अन्य साधन उपलब्ध नाही. असे साधन असेल तर प्रा. कुळकण्यांनी सांगावे. गेल्या तीन-साडेतीनशे वर्षांत विज्ञानाची जी वाढ झाली आहे, आणि त्याने जो प्रचंड ज्ञानसंसार उभा केला आहे, त्यामुळे ते ज्ञानाचे सर्वांत समर्थ साधन आहे असे म्हणतात. असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नव्हे, तो पूर्ण समर्थनीय असा विश्वास आहे. वैज्ञानिक पद्धतीची एकूण योजनाच अशी आहे की ती ज्ञान मिळविण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. हे मान्य करावे लागते. या पद्धतीत पुराव्यावाचून एक पानही हलत नाही, आणि शिवाय त्यात प्रस्थापित होणारे ज्ञान केवळ आजतागायत सत्य आहे यापलीकडे दावा केला जात नाही. उद्या आणखी काही वास्तवे दृष्टोत्पत्तीस येतील आणि त्यामुळे आता सत्य म्हणून प्रस्थापित झालेले ज्ञान सत्य नव्हे, निदान ते शंकास्पद आहे असे मानावे लागेल याची पूर्ण कल्पना वैज्ञानिकाला असते.
विज्ञान हा सबंध मानवजातीच्या सहकार्याने चालणारा प्रचंड उद्योग आहे. त्यात जे सर्व वैज्ञानिकांना संमत असेल तेच विज्ञान म्हणून स्वीकारले जाते. कोणीही नवीन सिद्धांत मांडल्यानंतर त्याला सबंध वैज्ञानिक जगताची मान्यता असावी लागते. कोणीही त्याची परीक्षा करू शकतो. एवढेच नव्हे, तर अशा प्रत्येक नवीन सिद्धांताची असंख्य लोक प्रत्यक्ष परीक्षा करतात, त्यामुळे जर एखाद्या सिद्धांतात काही न्यून असेल तर ते लक्षात येते. विज्ञानात आप्तवचन नावाची गोष्ट नाही. त्यामुळे अधिकारी व्यक्तीच्या म्हणण्याला वेगळे महत्त्व नसते. श्रद्धेला येथे मुळीच थारा नसतो, त्यामुळे विज्ञान हा ज्ञान मिळविण्याचा सर्वोकृष्ट उपाय आहे, त्याहून चांगला उपाय अजून उपलब्ध झालेला नाही असे म्हणावे लागते. म्हणून विवेकवाद्याचा विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती यांवरील विश्वास श्रद्धेचा प्रकार आहे हा प्रा. कुळकण्यांचा आक्षेप बरोबर नाही असे म्हणावे लागते.
प्रा. कुळकर्त्यांचा आणखी एक युक्तिवाद असा आहे की अनेक (किंबहुना बरेच) वैज्ञानिक धार्मिक असतात, आणि त्यांपैकी अनेकांनी धर्म आणि विज्ञान यांत विरोध नाही असे प्रतिपादले आहे. यासंबंधात विवेकवाद्याचे उत्तर असे आहे की वैज्ञानिकाचे आपल्या विषयासंबंधीचे मत तज्ज्ञाचे मत म्हणून विश्वासार्ह असले तरी त्याचे विज्ञानेतर विषयासंबंधीचे मत तज्ज्ञ मत असते असे म्हणणे चूक होईल.
विज्ञानाबाहेरील विषयासंबंधीची त्याची मते सामान्य मनुष्याची किंवा अतज्ञाची मते म्हणूनच मानली पाहिजेत, आणि त्यांना सामान्य मनुष्याच्या मताहून जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही, एवढेच नव्हे तर त्यांना तसे महत्त्व देणे चूक आहे. अनेक वैज्ञानिकांनी तत्त्वज्ञानातील विषयांसंबंधी मते व्यक्त केली आहेत. आणि तसेच धर्माविषयीही अनेक मतांचा पुरस्कार केला आहे. पण ही मते बहुधा चुकीची असतात हे अनेकवार दाखवून झाले आहे. चालू शतकातील एक उदाहरण द्यायचे झाल्यास सर जेम्स जीन्स आणि सर ऑर्थर एडिग्टन या दोन ज्योतिःशास्त्रज्ञांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी आणि त्याच्या उत्पत्तिकत्याविषयी तात्त्वज्ञानिक मते व्यक्त केली होती, आणि सामान्य वाचक ही मते वैज्ञानिकांची मते म्हणून स्वीकारार्ह समजून सत्य मानत होते. पण त्या मतांना त्यांच्या प्रणेत्यांच्या वैज्ञानिक अधिकाराचा कसलाच आधार नव्हता, ती त्यांची तात्त्वज्ञानिक मते होती, आणि तात्त्वज्ञानिक मते म्हणून त्यांत प्राथमिक स्वरूपाच्या चुका होत्या हे अनेक तत्त्वज्ञानी दाखवून दिले होते. तेव्हा न्यूटन श्रद्धाळू होता, आणि बायबलवर त्याची श्रद्धा होती म्हणून बायबल किंवा श्रद्धा या गोष्टींना प्रतिष्ठा मिळू शकली नाही. तसेच आइन्स्टाइनने धर्म आणि ईश्वर यांविषयी अनुकूल मते व्यक्त केली असतील, तर त्याच्या वैज्ञानिक अधिकारामुळे त्या मतांना वजन आहे असे मानण्याचे कारण नाही.
प्रा. कुळकर्णी यांनी बरदँड रसेलचीही साक्ष काढली आहे. पण तिच्यात त्यांचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतो. कारण रसेल हा जन्मभर कट्टर नास्तिक म्हणून जगला आणि त्याने श्रद्धा आणि धर्म यांना सतत विरोध केला. प्रा. कुळकर्णी यांनी ज्या Religion and Science ह्या रसेलच्या पुस्तकाची साक्ष काढली आहे त्यात तर ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक पानावर व्यक्त होते. प्रा. कुळकर्णी यांनी मूळ ग्रंथ वाचलेला नाही; त्याचा मराठी अनुवाद वाचला आहे, आणि त्यातून त्यानी काही वाक्ये उद्धृत केली आहेत. ती जर जशीच्या तशी उद्धृत केली असतील तर अनुवादकाचा अनुवाद चुकला असला पाहिजे असे म्हणावे लागते. उदा. साक्षात्कारी लोकांच्या साक्षात्कारांत एकवाक्यता नसते या माझ्या मतासंबंधी आक्षेप घेताना प्रा. कुळकर्णी लिहितातः ‘ बरड रसेलचे मात्र यावर मत वेगळे आहे, ‘ आणि याच्या पुष्ट्यर्थ ते रसेलचे पुढील वाक्य उद्धृत करतात : ‘ गूढवाद्यांत परस्परांशी एकमत होऊ शकते हाच त्यांच्या बाजूने एक महत्त्वाचा पुरावा आहे’. पण हे वाक्य ज्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर आहे ते असे आहे : The chief argument in favour of the mystics is their agreement with each other . आता या वाक्याचा अनुवाद प्रा. कुळकर्त्यांनी वर उद्धृत केलेले वाक्य असू शकेल काय ? अनुवादात असा अभिप्राय आहे की गढवाद्यांत एकमत असते ही गोष्ट रसेलला मान्य आहे. पण इंग्रजी वाक्यात या अर्थाची पुसट सूचनाही नाही. त्याचे बरोबर भाषांतर असे हवे होतेः ‘गूढवाद्यांत एकमत आहे हा त्यांच्या बाजूने करण्यात येणारा प्रमुख युक्तिवाद आहे. ‘पुढे या युक्तिवादाचे एक उदाहरण म्हणून रसेल डीन इंजचे मत उद्धृत करतात आणि ते रसेल यांना मान्य आहे असे गृहीत धरून प्रा. कुळकर्णी निष्कर्ष काढतात की ‘ एकूण या बाबतीत विवेकवाद्यांचेही एकमत नाही.’ परंतु डीन इंजचे मत उद्धृत करून नंतर रसेलने त्याचे खंडनही केले आहे.
साक्षात्कारांच्या समर्थनार्थ प्रा. कुळकर्णी म्हणतात की सापेक्षतावादाचे तत्त्व हेही साक्षात्कारानेच आइन्स्टाइनला गवसले, आणि या मताच्या पुष्ट्यर्थ ते आईन्स्टाईनचे पुढील वचन उद्धत करतात : १९०७ मध्ये एका शोधपत्रिकेसाठी मला विशिष्ट सापेक्षतावादाविषयी एक सर्वकष लेख लिहायचा होता. आणि मग मला माझ्या जीवनातील सर्वात सुखद कल्पना पुढीलप्रमाणे सुचली’. यावर प्रा. कुळकर्णी म्हणतात की सापेक्षतावाद ही गोष्ट आइन्स्टानला प्रयोग वगैरे करताना सापडली नाही, तर ती त्यांना सचली’, म्हणजे तिचा त्यांना साक्षात्कार झाला.
प्रा. कुळकर्णीनी येथे नमूद केलेली घटना खरोखरच घडली यात शंका नाही. पण ही गोष्ट वैज्ञानिक पद्धतीच्या प्रत्येक अभ्यासाकाला सुपरिचित अशीच आहे. निसर्गाचे नियम शोधून काढण्याकरिता वैज्ञानिक आरंभी निसर्गाचे काळजीपूर्वक निरीक्षण करतो. परंतु नियम ही गोष्ट काही दृश्य किंवा इंद्रियगोचर नाही. ज्या वास्तवांचा तो अभ्यास करीत असेल त्यांतील घटनांचा नियम काय असावा यासंबंधी अंदाज बांधणे आणि मग त्याची परीक्षा करणे याशिवाय अन्य उपाय नसतो. या संभाव्य अंदाजाला’ hypothesis म्हणतात. आपण त्याला ‘ उपन्यास’ हा शब्द वापरू. आता एखादा उपन्यास सुचल्यावर त्याची परीक्षा करण्याची रीत ठरलेली आहे. सुचलेला अंदाज जर खरा असेल तर निसर्गात अमुक अमुक वास्तवे प्रत्यक्ष आढळतील अशी अनुमाने करून ती वास्तवे प्रत्यक्षात आढळतात काय ते पाहणे ही ती रीत. परंतु उपन्यासाचे परीक्षण ही गोष्ट जरी नियमबद्ध असली, तरी उपन्यास बनविणे ही गोष्ट मात्र नियमांनी बांधलेली नाही.
उपन्यास सुचणे ही गोष्ट व्यक्तीच्या मानसशास्त्रावर अवलंबित अशी गोष्ट आहे, आणि तिचा कसलाही नियम सांगणे अशक्य आहे. ह्या गोष्टीचे वर्णन कोणी ‘स्फूर्ती’ असे करतील, आणि या वर्णनातून ही एक अनियमित गोष्ट आहे हे सूचित होते. प्रा. कुळकर्णी तिचे वर्णन ‘साक्षात्कार’असे करतात. माझी हरकत नाही. परंतु उपन्यास सुचला म्हणजे तो बरोबरच असला पाहिजे असे नाही. प्रत्येक बरोबर उपन्यासागणिक निदान डझनभर चुकीचे उपन्यास सुचतात. विज्ञानाच्या दृष्टीने उपन्यास परीक्षणात पास होणे हेही अत्यावश्यक असते. तेव्हा आइन्स्टाइनला सापेक्षतावादाच्या नियमाचा साक्षात्कार झाला हे खरे मानले तरी तो साक्षात्कार होता एवढ्यावरून तो बरोबर होता हे सिद्ध होत नाही, उपन्यास सुचण्याच्या प्रक्रियेला साक्षात्कार म्हणण्यात साक्षात्कार पुष्कळदा चुकीचे असतात हीच कबुली दिल्यासारखे होते. उपन्यास परीक्षेत उतरेपर्यंत त्याचा निसर्गनियम म्हणून स्वीकार केला जात नाही, हे सांगणे नकोच.
शेवटी साक्षात्कार हा प्रत्यक्ष येणारा अनुभव आहे, आणि तो नाकारणे म्हणजे साक्षात्कारी पुरुषांवर खोटेपणाचा आरोप करणे होय या आक्षेपाबद्दल. खरे म्हणजे याही आक्षेपाला मी मागेच उत्तर दिले आहे. पण ते कदाचित् पुरेसे स्पष्ट झाले नसेल. म्हणून ते आता पुन्हा काहीशा विस्ताराने देतो.
मला अमुक साक्षात्कारी अनुभव आला असे म्हणणाऱ्या कोणालाही तसा अनुभव आला आहे हे आपण गृहीत धरू या. वास्तविक या क्षेत्रात खोटेपणा आणि फसवेगिरी भरपूर आढळते. पण क्षणभर आपण असे गृहीत धरू या की हे तथाकथित अनुभव ते आपल्याला आले आहेत असे म्हणणाऱ्या लोकांना प्रत्यक्ष आले आहेत. म्हणजे हे सर्व लोक सत्यवचनी, प्रामाणिक आहेत असे आपण मानू या. परंतु याने काय सिद्ध होते ? ज्ञानात्मक अनुभवात अनुभव आणि त्याचा विषय (म्हणजे जाणलेली वस्तू) असे द्वैत सदैव असते. उदा, जेव्हा आपण एखादी वस्तू पाहतो, किंवा अन्य इंद्रियांनी जाणतो, तेव्हा ते ज्ञान आपल्या मनात असते आणि त्याचा विषय ज्ञात्याबाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो. आणि जेव्हा आपल्याला झालले ज्ञान त्याचा विषय जसा आहे तसे असते तेव्हा ते सत्य किंवा यथार्थ असते, आणि ते जेव्हा विषय आहे त्याहून भिन्न असते तेव्हा ते असत्य किंवा अयथार्थ असते. दोन्ही प्रकरणी अनुभव प्रत्यक्ष आलेला असतो, परंतु एका प्रकरणी तो सत्य असतो, तर दुसऱ्या प्रकरणी तो असत्य असतो. समजा कोणाला भूत दिसले, तर भूत पाहिल्याचा अनुभव त्याला खरोखरच आलेला असतो; म्हणजे आपल्याला भूत दिसले असे म्हणताना तो खोटे बोलत नसतो. परंतु तरीही त्याचा अनुभव सत्य, म्हणजे यथार्थ, आहे असे आपण म्हणत नाही. तेव्हा जगात भुते नाहीत हे मान्य करूनही मला भूत दिसले हे म्हणणे प्रामाणिक असू शकेल.
आत्ता साक्षात्कार हा एक प्रत्यक्ष येणारा अनुभव आहे. ही गोष्ट नाकारण्याचे कारण नाही. परंतु प्रश्न आहे, साक्षात्कार यथार्थ आहे काय? म्हणजे (१) तो ज्ञानात्मक अनुभव आहे काय? आणि (२) तो ज्ञानात्मक असल्यास, साक्षात्कार ज्या वस्तूचा होतो ती वस्तू आणि तिचे स्वरूप त्यात यथार्थपणे प्रगट झाले आहे काय ? अनुभव प्रत्यक्ष आला आहे एवढ्यावरूनच तो यथार्थ आहे असे निष्पन्न होत नाही.
प्रा. कुळकणी साक्षात्कार’ हा शब्द इतक्या व्यापक अर्थाने वापरतात की ह्या शब्दाला स्पष्ट अर्थ राहत नाही. उदा. आइन्स्टाइनला सापेक्षतावादाचा उपन्यास सुचला हा साक्षात्काराच होता असे ते म्हणतात. एवढेच नव्हे तर बाबा आमटे आणि मदर टेरेसा यांना महारोग्यांची सेवा करण्यात किंवा दु:खितांचे अश्रू पुसण्यात जो आनंद होतो हाही साक्षात्करच आहे असेही ते म्हणतात. तसेच पं. भीमसेन जोशींचे गाणे ऐकताना दर्दी श्रोत्याला होणारा आनंद हाही साक्षात्कारच, पण हे सारे साक्षात्कार आहेत यावरून भक्तांचे साक्षात्कार यथार्थ असतात हे कसे सिद्ध होते ते कळत नाही.
भीमसेन जोशींचे गाणे ऐकताना होणारा विलक्षण आनंद म्हणजे साक्षात्कारच आहे असे म्हणायला माझी हरकत नाही. पण हा साक्षात्कार कशाचा, कोणत्या वस्तूचा असतो? साक्षात्कार ज्ञानप्रकार आहे असा साक्षात्कारवाद्यांचा आग्रह आहे. अतींद्रिय सत्तेचे ज्ञान त्याने होत असते म्हणून तर त्याची मातब्बरी, हा साक्षात्कार तुकारामाला होणारा विठोबाचा असेल, किंवा रामदासाला होणारा कोदंडधारी रामाचा असेल, किंवा रामकृष्णांना होणारा कालीमातेचा असेल. परंतु भीमसेनांचे गाणे ऐकल्यावर येणारा अनुभव हा साक्षात्कार म्हणायचा असेल तर त्यात कोणती वस्तू प्रगट होते असा प्रश्न उपस्थित होतो. आनंद ही काही मनोबाह्य वस्तू नव्हे; ती एक मनाची वृत्ती आहे. भक्ताला जेव्हा आराध्य दैवताचा साक्षात्कार होतो तेव्हा हा अनुभव गाण्याच्या अनुभवासारखा केवळ आनंदमय नसतो. त्यात भक्ताचे दैवत प्रगट होते आणि त्याच्या दर्शनाने अर्थातच आनंद होतो. म्हणजे हा अनुभव गाण्याच्या अनुभवासारखा केवळ आनंदमय नसतो. त्यात विषयाचे ज्ञान असते आणि त्याच्या अनुभवामुळे होणारा उत्कट आनंदही असतो.
आता धार्मिकांना होणारा साक्षात्कार हा आनंददायी अनुभव असतों याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. पण तो वास्तवाचा यथार्थ अनुभव असतो काय हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते याची कारणे मुख्यतः दोन आहेत. एक म्हणजे साक्षात्कारातून प्रतीत होणारे वास्तव साक्षात्कारागणिक भिन्न असते; आणि दुसरे म्हणजे साक्षात्कार होण्याकरिता दीर्घ साधना करावी लागते. या दोन्ही कारणांचे विवेचन मागे येऊन गेले आहे. परंतु या दोन्ही मुद्यांसंबंधाने प्रा. कुळकर्णी यांनी आक्षेप घेतले आहेत. म्हणून त्यासंबंधी दोन शब्द लिहितो. अनेक धार्मिक तत्वज्ञांनी असा दावा केला आहे की सर्व साक्षात्कारवाद्यांचे त्यांना येणाऱ्या अनुभवाच्या बाबतीत एकमत असते. पण हे म्हणणे केवळ अंशतःच खरे आहे. प्रा. कुळकर्णी म्हणतात की राम, कृष्ण, काली हे सर्व शेवटी एकच आहेत असे सर्व संतांनी म्हटले आहे. पण असे कोणी कोठे म्हटले आहे ते प्रा. कुळकर्णी यांनी सांगितलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुकाराम विठोबाशिवाय अन्य कोणाहीविषयी बोलत नाही आणि रामदास रामाशिवाय अन्य कोणाविषयी, मीरेला गोवर्धन गिरिधारीखेरीज अन्य कोणाशी कर्तव्य नाही. शैव आणि वैष्णव भक्तांचे तर इतके वैर असते की वैष्णव शिवाचे आणि शैव विष्णूचे नावही घेत नाहीत. खुद तत्त्वज्ञांविषयी बोलायचे तर विशिष्टाद्वैती तत्त्वज्ञाला (उदा. रामानुजाला) मुक्तीचा जो परमोच्च अनुभव येतो त्यातही भक्त आणि परब्रह्म यांतील द्वैत कायम राहते; परंतु अद्वैती वेदांत्याला होणाऱ्या साक्षात्कारात आत्म्याचा परमात्म्यात पूर्ण लोप होतो असे वर्णन केले जाते. यावरून असे निष्पन्न होते की आपल्याला कोणता साक्षात्कार घडणार आहे ते आपण ज्या स्वरूपाचे ध्यान करतो त्याच्यावर अवलंबून असते. रामाचे ध्यान करणाऱ्याला रामाचा आणि विठोबाचे ध्यान करणाऱ्याला विठोबाचा साक्षात्कार होतो. एखाद्या ख्रिस्ती भक्ताला कोदंडधारी रामाचा साक्षात्कार होत नाही आणि हिंदू धर्मिकाला आकाशस्थ पित्याचा किंवा कुमारी मेरीचा होत नाही, भक्ताने ईश्वरासंबंधाने जे ऐकले असते, वाचले असते, त्या स्वरूपात तो त्याचे ध्यान करतो. म्हणून त्याच स्वरूपात त्याला साक्षात्कार होतो यात आश्चर्य काही नाही. द्वैती तत्त्वज्ञानात असा युक्तिवाद केला जातो, आणि तो भक्ताच्या मनावर बिंबवला जातो, की ईश्वर आणि भक्त ह्यांचे द्वैत आहे. आणि भक्त ईश्वराच्या कितीही जवळ गेला तरी त्याचे वेगळेपण नष्ट होत नाही; आणि म्हणून त्याला तसाच अनुभव येतो. उलट अद्वैती तत्त्वज्ञानात साधकाला हे पूर्ण पटलेले असते की आपण आणि ब्रह्म दोन नाहीत, एकच आहोत, आणि म्हणून त्याला होणाऱ्या साक्षात्कारात त्याचे द्वैत नाहीसे झालेले त्याच्या अनुभवास येते.
असो. विस्तार फार झाला. अन्य काही आक्षेपांना उत्तर पुढे केव्हा तरी.