आजचा सुधारक च्या एप्रिल १९९१ (वर्ष २ अंक १) ह्या अंकात ‘धर्मनिरपेक्षताः काही प्रश्न ह्या शीर्षकाखाली डॉ. भा. ल. भोळे आणि श्री. वसंत पळशीकर ह्यांनी परिसंवादासाठी तयार केलेली एक प्रश्नावली प्रसिद्ध झाली. प्रश्नावलीतील एका प्रश्नावर आक्षेप घेणारे माझे पत्र जून १९९१ (वर्ष ३, अंक ३) ह्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याला उत्तर देणारे पळशीकर ह्यांचे पत्र जुलै १९९१ (वर्ष २, अंक ४) ह्या अंकात आले आहे.
हा छोटा लेख म्हणजे पळशीकरांच्या उत्तरावरची प्रतिक्रिया आहे. त्याला पत्राचे रूप न देता लेखाचे देत आहे ह्याचे कारण ह्या निमित्ताने मी सुधारकने योजिलेल्या परिसंवादातच भाग घेतल्यासारखे होत आहे.
प्रश्नावलीतील भोळे-पळशीकरांचे वाक्य पुढीलप्रमाणे होते : “विचाराने निधर्मी असलेल्या सावरकरांनी धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्रवादाचा आग्रह धरला.” “विशिष्ट धर्ममतावर आधारलेले राष्ट्र किंवा राज्य”, म्हणजेच ‘थिओटिक स्टेट (किंवा नेशन) हा अर्थ प्रश्नावलीकींच्या मनात असेल तर तो चूक आहे असा माझा आक्षेप होता. तसा अर्थ आपल्या मनात नाही असे आता पळशीकरांनी सांगितले आहे. तरीही “राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना (सावरकरांना) अभिप्रेत होती ते सात्र (आम्ही) स्पष्ट केले आहे”, असे ते म्हणतात. म्हणजे त्यांच्या मनात नेमके काय आहे हे कळत नाही. तेव्हा सावरकर ‘थिओटिक स्टेट’चा पुरस्कार करीत नाहीत हा मुद्दा आता पुराव्यासह मांडणे अवश्य झाले.
धर्मनिरपेक्ष राज्याची लक्षणे कोणती? एक, शासनाने कायदे, धोरणे, कार्यक्रम इत्यादींसाठी धर्माचा आधार घेता कामा नये; सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवहारांचे नियमन मनुष्यबुद्धीला गवसलेल्या ज्ञानाच्या आणि तर्काच्या साह्याने आणि ऐहिक उद्दिष्टांसाठी केले पाहिजे. उदा. विवाहाचे वय काय असावे, हा प्रश्न मनुस्मृती, कुराण, बायबल इत्यादींची वचने काय सागंतात हे पाहून सोडविला जाणार नाही, तर आरोग्य, लोकसंख्या इत्यादींवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून सोडविला जाईल. दोन, धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, तीन, कोणत्याही धर्माला शासन उत्तेजन देणार नाही किंवा त्याला खाली दडपणार नाही.
ह्यातील पहिले सूत्र म्हणजे सामाजिक व्यवहारासाठी धर्मनिरपेक्षता हे सर्वांत महत्त्वाचे आहे आणि धर्मनिरपेक्षतेतला तो कळीचा मुद्दा आहे. कारण तसे जर नसेल तर दोन घातक परिणाम होतात. एक, मानवी बुद्धीला धर्मग्रंथाचे दास्य पत्करावे लागते. मानवतावादाचा व्यक्तिस्वातंत्र्याचा गाभाच त्यामुळे नष्ट होतो. ज्यांचा धर्म आधाराला घेतला असेल त्यांच्याही दृष्टीने असे होणे इष्ट नाही. दोन, एकच धर्म विविध-धर्मीयांवर लादणे असा त्याचा अर्थ होतो. परिणामी धर्मस्वातंत्र्य राहत नाही.
ह्या मुख्य अर्थाने सावरकरांनी कल्पिलेले हिंदुराष्ट्र पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. “१९३७ ते १९४३ या कालखंडातील हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून मी जी भाषणे केलेली आहेत, त्यात स्पष्टच सांगितले आहे की, राज्याची घटना ही मनुस्मृती, बायबल अथवा कुराणावर आधारलेली नसावी, तर ती अद्ययावत् बुद्धिप्रामाण्य मानणारी असावी” असे सावरकर म्हणतात. धार्मिक राज्याच्या कल्पनेतून मुसलमान बाहेर आलेले नाहीत याबद्दल त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “आत्यंतिक धर्मनिष्ठा आणि धार्मिक राज्याची कल्पना ह्या ऐतिहासिक अवस्थेतून सर्वसाधारणपणे सर्वच मुसलमान, पण विशेष करून हिंदी मुसलमान, अजून बाहेर आलेले नाहीत.”
दुसऱ्या सूत्राबाबत सावरकरांच्या व्याख्यानातील पुढील उतारा पाहावा. “हिंदी राज्य हे शुद्ध हिंदी राज्य असू द्या. त्यात मतदानाचा हक्क, शासकीय सेवा पदाधिकार, करव्यवस्था, ह्या बाबतीत धर्म किंवा वंश यांच्या आधारावर मत्सरबुद्धीने कसलाही भेदभाव केला जाणार नाही. एखादा माणूस हिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू आहे ह्याचा मुळीच विचार केला जाणार नाही. त्या हिंदी राज्याच्या सर्व नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक गुणांवरून वागणूक मिळेल…. जाति आणि पंथ, वंश आणि धर्म यांना हिशेबात न घेता दरडोई एक मत’ हा सर्वसामान्य नियम असेल”. ह्या राज्यात हिंदूंना विशेष अधिकार नाहीत. नवी राज्यघटना स्वीकारून धर्म, वंश यांच्या आधारावरील भेदभाव नष्ट केल्याबद्दल तार करून सावरकरांनी सरकारचे अभिनंदन केले. “आमच्या भारतीय राज्याचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. राज्यशासनामध्ये हे कलम तत्त्वशः नि शब्दशः अमलात आणले जाईल अशी मला आशा आहे”. आयुष्याच्या जवळ जवळ अखेरीस म्हणजे १९६५ साली श्रीधर तेलकर ह्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत सावरकरांनी हेच पुन्हा सांगितले. “विविध धर्माच्या. पंथांच्या आणि वंशांच्या लोकांना पूर्ण समानतेने वागविले जाईल. कुणालाही दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची मुभा असणार नाही.”
याहीपुढे जाऊन सावरकर धार्मिक अल्पसंख्यांना विशेष हक्क देण्यास तयार होते । १९३९ च्या कलकत्त्याच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले, “दरडोई एक मत असावे, शासकीय पदे गुणवत्तेवर दिली जावीत, आणि वंश किंवा धर्म यांच्या निरपेक्ष सर्व नागरिकांना समान मूलभूत हक्क व कर्तव्ये असावीत एवढे हिंदमहासभेने म्हटल्यावर ‘अल्पसंख्यांचे हक्क’ अशी शब्दसंहती वापरणे तत्त्वतःच अनावश्यक, एवढेच नव्हे तर विसंगतही आहे….” पण ही विसंगती पत्करूनही अल्पसंख्यांना धर्म, संस्कृती, भाषा ह्यांबद्दलच्या ‘न्याय्य हक्कांच्या संरक्षणांची हमी ते देतात, त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांना शासकीय मदत देऊ करतात. आणखी पुढे जाऊन अवश्य तर स्वतंत्र मतदार संघ व राखीव जागा ह्यांचेही वचन देतात- मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात.
दुसऱ्या सूत्राच्या बाबतीत सावरकरांनी एकच अपवाद केला आहे, आणि तो मुसलमानांच्या बाबतीत आणि संरक्षणसेवांच्या संदर्भात. त्यांची लष्करात नेमणूक करताना सावध असले पाहिजे असा त्यांचा मथितार्थ आहे..
तिसऱ्या सूत्राबाबत असे म्हटले पाहिजे की हिंदुधर्माला, किंवा खरे म्हणजे हिंदू ‘धर्माना, विशेष उत्तेजन द्यावे असे सावरकरांनी म्हटलेले माझ्या पाहण्यात नाही. हिंदू अस्मितेत ते धर्माचा समावेश करतात. पण गौणत्वाने.
असे सावरकरांचे हिंदू राष्ट्राचे व हिंदी राज्याचे चित्र आहे. समान वागणुकीला त्यांनी मुसलमानांच्या बाबतीत आणि संरक्षणसेवांपुरता अपवाद केला आहे. ख्रिश्चन, ज्यू, यहुदी यांच्याबाबत तर कसला भेदभाव नाही. आणि वर सांगितल्याप्रमाणे मुख्य अर्थाने सावरकरांचे हिंदुराष्ट्र पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकसत्ताक आहे.
हे एकदा स्पष्ट झाल्यावर सावरकरांच्या हिंदुत्वाचा दुसऱ्या अर्थाने धर्माशी, खरे म्हणजे धर्माशी संबंध येतो हे मान्य केले पाहिजे. सावरकरांच्या मते हिंदुस्थानात हिंदू हाच ‘राष्ट्रीय समाज आहे आणि हा समाज ते इतर समाजापासून ‘धर्माच्या निकषावर वेगळा काढतात. ह्या अर्थान, आणि केवळ ह्याच अर्थान, सावरकरांनी धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा पुरस्कार केला असे पळशीकर म्हणत असतील तर ते बरोबर आहे. पण मग पळशीकरांनी आपली शब्दयोजना अधिक काळजीपूर्वक केली पाहिजे, “सावरकर राष्ट्रीय समाज कोणता हे ठरविताना विशिष्ट धर्माचा (अनेक वचन) निकष वापरतात, पण त्यांचा राष्ट्रवाद, म्हणजे राष्ट्रसंबंधित तत्त्वज्ञान, धर्मावर म्हणजे धर्ममतावर आधारलेले नाही” असा सर्व आशय पळशीकरांच्या प्रतिपादनात स्पष्टपणे येणे उचित होईल.
धर्माचा निकष ‘राष्ट्रीय समाज वेगळा काढण्यासाठी सावरकर कसा वापरतात ते आता पाहू.
सावरकरांच्या व्याख्येत ‘पुण्यभू’ हा शब्द आहे. पळशीकरही त्यावरच जोर देतात.. ‘पुण्यभूचा अर्थ ‘धर्मभू’ असाआहे हे सावरकर स्वतः सांगतात. ज्यांचे धर्मग्रंथ, प्रेषित इत्यादी ह्या ‘आसिंधु-सिंधुपयंता भूमीत निर्माण झाले ते सर्व हिंदू म्हणजे ‘राष्ट्रीय’, उरलेले सर्व अहिंदू किंवा राष्ट्रीयेतर’ ही विभागणी काही विशिष्ट धर्माचे अनुयायी राष्ट्रीय आणि इतर धर्माचे अनुयायी राष्ट्रीयेतर अशा पद्धतीने केलेली असल्यामुळे सावरकरांनी राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येसाठी धर्म हा निकष वापरला आहे हे स्पष्ट आहे. आता पळशीकरांची भीती अशी दिसते की धर्माशी असा अप्रत्यक्ष संबंध आला तरी त्याचा परिणाम धार्मिक राज्य’ असा होईल. “भारतातही त्या दिशेने दबाव निर्माण होतो आहे”, असे त्यांना वाटते. ही भीती अनाठायी चाहे असे मला वाटते.
सावरकर ‘हिंदू’ या शब्दाला फार व्यापक अर्थ देतात, आणि तसा देताना त्यातून धार्मिकता वजा करतात. खरे म्हणजे ती आपोआपच वजा होते. ‘पुण्यभू शब्दाने व्यक्त होते ते हे की ज्यांच्या-ज्यांच्या धर्माचा इतिहास ह्या भूमीत घडला ते सर्व हिंदू. त्यात ज्यांना संकुचित अर्थाने हिंदू ही उपाधी दिली जाते ते सनातन धर्मी, वैदिक धर्मी किंवा श्रुतिस्मृतिपुराणोक्तधर्मी येतात आणि आपल्या अंतर्गत शैव, वैष्णव, गाणपत्य, दत्तोपासक इत्यादी सर्वांना बरोबर घेऊन येतात. बौद्ध (महायान, हीनयान, इ.), जैन (श्वेतांबर, दिगंबर इ.) शीख (अकाली, निरंकारी, इ.), महानुभाव, लिंगायत, चैतन्य पंथी, आर्यसमाजी, ब्राह्मसमाजी हे सर्व हिंदुत्वात येतात. भारताच्या सर्व आदिवासी जमाती, त्यांचे-त्यांचे धर्मही येथेच जन्म पावल्यामुळे हिंदुत्वात समाविष्ट होतात.
असा धर्मसमूह हिंदुत्वात एकत्र आल्यामुळे त्या सर्वांना समान असणारा धर्म शिल्लक राहात नाही, कारण वर उदाहरणादाखल दिलेल्या यादीत काही वैदिक, काही अवैदिक, काही आत्मवादी, काही अनात्मवादी, काही आस्तिक, काही नास्तिक, काही ब्रह्मवादी तर काही मूर्तिपूजक, काही पशु-वृक्ष-पाषाणपूजक तर काही वेगळ्या दैवतांची उपासना करणारे,असे सर्व प्रकारचे जनसमूह आहेत. म्हणजे या सर्वांना लागू पडणारे एकच समान धर्मतत्त्व नाही. मग त्यांना समान काय आहे ? एक तर विशिष्ट संस्कृती. (ह्या मुदयाचे विस्तृत विवेचन सावरकरांच्या हिंदुत्व ह्या ग्रंथात आहे.) त्या संस्कृतीचा एक भाग म्हणजे धर्म, आपले सर्वांचे धर्म या भूमीत जन्माला आले ह्या गोष्टीची एक जाणीव किंवा स्मृती हा सर्वांना जोडणारा समान धागा. ह्या जाणिवेपुरताच हिंदुत्वाचा धर्माशी संबंध आहे, म्हणजे या हिंदुत्वातून धार्मिक राज्य अस्तित्वात येण्याची भीती नाही.
हे लक्षात घेतले तर सावरकर आणि जिना यांना एकाच मापाने मोजण्याचा प्रश्नावलीकर्त्यांचा प्रयत्न चुकीचा आहे हे ध्यानात येईल. जिनांच्या पाकिस्तानामागे कोणताही धर्मसमह नव्हता. फक्त एक इस्लाम होता. त्यामळे त्यातन धर्मविचार किंवा धर्मतत्त्वे बाजूला होणे फारसे शक्य नव्हते. (तत्त्वतः मात्र एका धर्माचे लोक एकत्र येऊनही राज्य धर्मनिरपेक्ष असू शकते – जसे जिनांना हवे होते असे दिसते, पण झाले नाही.) सावरकरांच्या हिंदुत्वाच्या बाबतीत ती अडचण नाही.
सावरकर आणि जिना ह्यांच्यामधील आणखी एक फरकही त्यांच्या राष्ट्रवादी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जिना फार तर वैयक्तिक जीवनात आधुनिक आणि पुरोगामी होते. सावरकर तसे तर होतेच; शिवाय धर्मसुधारक, एवढेच नव्हे तर धर्मनिःपातक होते. धर्मग्रंथ कपाटात ठेवा, विज्ञान हाच धर्म माना, वेद पाच हजार वर्षांचे जुने म्हणजेच पाच हजार वर्षांनी मागासलेले-असे म्हणणारे होते. जिनांनी जाहीरपणे असे काही म्हटल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांचा समाजविचार त्यांच्या हिंदुत्व-विचाराला पूरक आहे, विसंगत नाही, हे लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या हिंदुत्वाचा धर्माशी म्हणजे धर्मतत्त्वांशी कितपत संबंध आहे हे ठळकपणे लक्षात येते.
सावरकर सोडता इतर हिंदुत्ववादी घेतले तरी त्यांनी हिंदुत्वाची सावरकरी व्याख्याच व्यवहारात कालपर्यंत प्रमाण मानली होती. असे जोपर्यंत आहे तोपर्यंत ‘भारतातही त्या दिशेने (म्हणजे धर्माधिष्ठित राज्याच्या दिशेने) दबाव निर्माण होत असल्याची पळशीकरांना वाटणारी भीती वृथा आहे. अगदी विश्व हिंदू परिषदेतले महंत घेतले तरी ते सर्व हिंदूंवर आणि इतरांवर कोणता धर्मविचार किंवा उपासनापंथ लादणार? कारण वर जी यादी दिली त्यातले अनेक जण त्या परिषदेच्या व्यासपीठावर आहेत. हिंदुराष्ट्र धर्मनिरपेक्ष असणे अपरिहार्य आहे, हिंदू सेक्युलरच असतात, असे जेव्हा हिंदुत्ववादी नेते म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्याला खराखुरा अर्थ असतो.
पण ह्या बाबतीत आणखीही काही घडले आहे, त्याकडे भोळे-पळशीकरांचे लक्ष मी वेधू इच्छितो. रा. स्व. संघ आणि भाजप यांनी हिंदुत्वाची व्याख्या आणखी विकसित करून जास्त उदार केली आहे. हा धागा गोळवलकर गुरुजींच्या विचारांत काही प्रमाणात अस्तित्वात होताच; बाळासाहेब देवरसांच्या कारकीर्दीत तो अधिक दृढ झाला आहे. तो म्हणजे उपासना-पंथ-निरपेक्ष हिंदुत्व. ह्या हिंदुत्वात मुसलमान, ख्रिस्ती, पारशी इत्यादी सर्व येतात. संघाशी संबंधित संस्थांनी (उदा. भा.ज.प., अ.भा.वि.प., भारतीय मजदूर संघ इ.) ही भूमिका मागेच व्यवहारात आणली आहे. आता संघाने अधिकृतपणे ती स्वीकारली आहे. हे नवे हिंदुत्व सावरकरांच्या हिंदुत्वापेक्षा अधिक समावेशक आणि उदार आहे, आणि अधिक यथार्थतेने ‘सांस्कृतिक’ आहे. ह्या नव्या व्याख्येप्रमाणे येथल्या संस्कृतीवर राष्ट्रपुरुषांवर जे जे प्रेम करतात ते सर्व हिंदू. ह्या दृष्टिकोणाचेही काही तात्त्विक आणि व्यावहारिक प्रश्न उरतीलच. पण तो वेगळा मुद्दा आहे. हिंदुत्ववाद्यांची धार्मिक राज्याकडे वाटचाल होण्याची जी भीती पळशीकरांना वाटते ती अस्थानी आहे हे दाखविण्यासाठी ह्या घटनेचा उल्लेख केला.
पुन्हा सावरकरांच्या सापेक्षपणे संकुचित व्याख्येकडे परत येऊ, एका विशिष्ट धर्मसमूहाशी बांधिलकी हा निकष वापरून इतर धर्माच्या समूहाला हिंदुत्वातून म्हणजे राष्ट्रीयत्वातून वगळणे हा दोष सावरकरांच्या व्याख्येत आहे हे पळशीकरांचे म्हणणे उरतेच. त्यांची खरी व्यथा तीच आहे. “धर्मनिष्ठ मुसलमान व ईसाई यांची भारत ही पितृभू असली तरी पुण्यभू होऊ शकत नाही…. म्हणजे ही व्याख्या करताना विशिष्ट समूहांना वगळून” राष्ट्रीय कोण हे ठरविले जाते असा त्यांचा आक्षेप आहे.
ह्या प्रश्नाचा सविस्तर विचार मी माझ्या ‘सावरकरप्रणीत हिंदुत्वविचाराचा पारमार्थिकांनी केलेला पराभव (मौज, दिकी १९८९) ह्या लेखात केला आहे. तो पळशीकरांनी वाचावा अशी काहीशी औचित्यहीन भासणारी शिफारस मी त्यांना करतो. शिवाय प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या सावरकरांचा बुद्धिवादः एक चिकित्सक अभ्यास (निर्मल प्रकाशन, नांदेड, १९८८) या ग्रंथातील हिंदुत्व’ या शीर्षकाखालचा पृ. ३६८ ते ५२२ हा भागही त्यांनी अभ्यासावा.
माझी या विषयाबद्दलची भूमिका मी अत्यंत संक्षिप्तपणे पुढे देत आहे.
१. सावरकरांच्या सुप्रसिद्ध संस्कृत अनुष्टुभातील ३२ अक्षरांमध्ये त्यांचे सर्व तत्त्वज्ञान ग्रथित झालेले आहे असे समजणे हास्यास्पद आहे. अनुयायी आणि टीकाकार ह्या दोघांनीही ते तसे झाले आहे अशी समजूत करून घेतली आहे आणि त्यामुळे सावरकरांचे खरे हगत प्रकाशात आलेले नाही.
२. व्याख्येतून अभारतीय धर्माना वगळूनही सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात त्या धर्माच्या अनुयायांना कसलेही कनिष्ठ स्थान नाही हे वर सांगितलेच आहे. म्हणजेच सावरकर ज्यांना राष्ट्रीयेतर ठरवतात त्यांना कसलीही शिक्षा नाही! पूर्ण धर्मनिरपेक्षत्व आणि परिपूर्ण लोकशाही त्यांना अभिप्रेत आहे. अपवाद एकच. मुसलमानांचा आणि तोही प्रशासकीय पातळीवर-लष्करात त्यांना नोकऱ्या देताना सावध असले पाहिजे. (सावरकरांना ह्या संदर्भात वाटणारी भीती डॉ. आंबेडकरांनाही वाटत होती.)
३. पारशी आणि यहुदी यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल म्हणजे देशाभिमानाबद्दल सावरकरांच्या मनात कसलीही शंका नाही. (मॅडम कामांना सावरकर कसे विसरू शकतील?) ख्रिश्चनांच्या धर्मातरविषयक हालचाली सोडता त्यांच्याविषयी सावरकरांची तक्रार नाही. शिया मुसलमानांविषयीही त्यांची तक्रार दिसत नाही.
४. ह्याचा अर्थ राष्ट्रीयत्वात सावरकरांना फक्त (कदाचित् केवळ सुन्नी) मुसलमानांना स्थान द्यावयाचे नव्हते. त्यांनी ‘मुसलमानेतर भारतीय हे राष्ट्रीय ठरविले असते तर ते त्यांच्या मूळ धारणेशी अधिक सुसंगत झाले असते. पण छोटी व्याख्या, तीही अनुष्टुभ् छंदात तयार करण्याचा मोह त्यांना आवरला नाही असे दिसते. (ह्याचे कारण अशी व्याख्या करण्याची एक अलिखित सक्ती त्या काळात निर्माण झाली होती असे असावे. सावरकरांपर्यंत ‘हिंदू’च्या शे-सव्वाशे व्याख्या तयार झाल्या होत्या असे म्हणतात. अलीकडच्या काळातही हा उद्योग चालू राहिलेला दिसतो.) टिळकांची व्याख्या धर्मग्रस्त नव्हे, तर वेदप्रामाण्यवादी असल्यामुळे तिचा प्रतिवाद करणेही सावरकरांना अवश्य वाटत असावे. मुसलमानांना व्याख्येतून हद्दपार करायचे तर तसे स्पष्ट न म्हणता एका सर्वसामान्य तत्त्वाच्या आधारे त्यांनी त्यांना बाजूला काढले. ते तत्त्व म्हणजे ‘पुण्यभू’. पण त्याची किंमत द्यावी लागली. पारशी, यहुदी, ख्रिश्चन सावरकरांना जवळचे असूनही गळाले.
५.’भारतीय’ किंवा ‘हिंदी राष्ट्रवाद हे सावरकरांना, जरासे दीर्घकालीन का होईना, ध्येय म्हणून मान्य होते, एवढेच नव्हे, तर प्रिय होते.
६. सावरकरांची हिंदुत्वाची कल्पना अधार्मिक हिंदूंनाही पोटात घेते. चार्वाकपंथी, देवसमाजी इत्यादी नास्तिकांना सावरकरांच्या हिंदुत्वात निश्चयाने स्थान आहे. तसे नसले तर त्यांना स्वतःलाही हिंदू म्हणवून घेता आले नसते ! कारण नास्तिकांना पुण्यभू नसते. ह्याचा अर्थ असा की ‘पुण्यभू ह्या शब्दाचा उपयोग काहींना बाहेर ठेवण्यासाठी फक्त केला आहे. ते वगळून जे उरतात त्यांना भारत ही पुण्यभू असण्याची गरज नाही ! तुमची पुण्यभू भारताबाहेर आहे ना? मग तुम्हाला राष्ट्रीयत्वाच्या सरहद्दीच्या आत प्रवेश नाही इतकेच. पण हेही लक्षात घ्यावे की ह्यामधून सावरकरांच्या हिंदुत्वाची निधार्मिकता जास्त अधोरेखित होते.
सावरकरांवरील माझे हे भाष्य विवाद्य असू शकेल. पण त्यावर चर्चा व्हावी असे मला वाटते. प्रा. मोरे ह्यांच्या पुढील विधानाशी मी पूर्ण सहमत नाही, पण ते विचार करण्यासारखे आहे : “सारा आशय भारतीयत्वाचा, पण तो मांडण्याची भाषा हिंदुत्वाची व आवाहन फक्त हिंदू लोकांना”. भोळे-पळशीकरांनी एक प्रयोग म्हणून ही दिशा पकडून सावरकरांकडे पुन्हा एकदा पाहावे अशी मी त्यांना विनंती करीन.
आपल्या पत्राच्या शेवटी पळशीकरांनी माझ्यापुढे जसे प्रश्न ठेवले आहेत, तसे मी आता त्यांच्यापुढे ठेवण्याची परवानगी घेतो.
१. कोणत्याही देशाला सुस्थिर आणि सुरक्षित जीवनासाठी देशावर प्रेम करणारे कोण आणि न करणारे कोण ह्याचा विवेक करावा लागतो. देशावर सर्वोच्च प्रेम असणे हीच राष्ट्रीयत्वाची निशाणी असते. (सावरकरही तसे म्हणतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.) पण ह्या आंतरिक प्रेमाचे बाह्य, दृश्यमान (व्हिजिबल), बोट ठेवता येण्यासारखे (आयडेंटिफायेवल) लक्षण उपलब्ध नसते. पुण्यभू ही ‘प्रेमभू’कडे जाण्याची वाट आहे. कारण सर्वसाधारणपणे धार्मिक मनोवृत्ती असलेल्या समाजात धर्मभूमी ही प्रेमभूमीही असते. म्हणून तिचा ओळखीसाठी उपयोग होतो. अर्थात् ह्या निकषावर राष्ट्रीय-अराष्ट्रीय विभागणी केली तर तिच्यात एक घाउकपणा येतो-जसा सावरकरांच्या छंदोबद्ध व्याख्येत आला. पारशी, ख्रिश्चन, यहुदी, छागला, हमीद दलवाई ह्यांच्यावर किंवा ह्यांच्यासारख्यांवर अन्याय झाला, हे मान्य.
मग ह्याला पर्यायी मार्ग कोणता? राष्ट्रवादाची गरज वाटत असेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावाचून गत्यंतर नाही. (पळशीकरांना राष्ट्रवादी गरज कितपत वाटते अशी शंका यावी अशी थोडीफार परिस्थिती आहे. त्यांचे इतर लिखाण वाचून माझा असा ग्रह झाला आहे. तो चुकीचा असल्यास तसे त्यांनी सांगावे. बरोबर असल्यास हिंदू राष्ट्रवाद की हिंदी राष्ट्रवाद ही चर्चाही पळशीकरांच्या दृष्टीने महत्त्वाची असण्याचे कारण नाही.) संघाचे आजचे धोरण म्हणून वर ज्याचा निर्देश केला ते स्वागतार्ह असले तरी त्यातूनही हा प्रश्न सुटत नाही. येथल्या संस्कृतीवर एखाद्याचे प्रेम आहे की नाही हे कसे ओळखणार?
ह्या देशात जवळजवळ प्रथम राष्ट्रवादाच्या वंश, धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास इत्यादी मूलतत्त्वांची गंभीरपणे चिकित्सा करण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला एवढे तरी श्रेय त्यांना दिले पाहिजे. पण सावरकरांच्या टीकाकारांनी अशी चिकित्सा करून वैचारिक प्रतिपक्ष नीटपणे उभा केला आहे काय? की ह्या देशात राहणारे, मग ते घुसखोरही असोत, सर्वच राष्ट्रीय हे भोपळसुती विधान पुन्हा पुन्हा करीत राहणे हीच त्यांच्या एतद्विषयक मीमांसेची अंतिम श्रेणी समजायची?
२. भोळे, पळशीकर आणि तत्सम विद्वानांनी आजच्या मुसलमान प्रश्नाविषयीची आपली भूमिका एकदा स्वच्छपणे आणि विस्ताराने सांगावी. असे करणे अगत्याचे आहे ह्याचे कारण मुसलमान प्रश्नाच्या संदर्भात आपल्या येथील राष्ट्रवादाच्या प्रश्नाला महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंदुत्ववाद ही ह्या प्रश्नाला प्रतिक्रिया आहे हेही मान्य करायला मला प्रत्यवाय दिसत नाही. पण या प्रश्नांशी भिडले पाहिजे आणि हिंदुत्व-विरोधकांनी किंवा सावरकरविरोधकांनी ही जबाबदारी टाळता उपयोगाची नाही.
असे झाले म्हणजे ह्या देशाला मुसलमानांचा धोका अधिक की हिंदुत्ववाद्यांचा अधिक ह्याची काही शहानिशा करता येईल. हिंदुत्ववाद्यांची अनेक पापे आहेत असे समजू या; निदान ते देशाच्या अखंडत्वाचे निष्ठावान पुरस्कर्ते आहेत आणि आपला धर्म (जो काय असेल-नसेल तो) इतरांवर लादू इच्छीत नाहीत, एवढे तरी पुण्य त्यांच्या पदरात टाकता येईल काय ? मुसलमानांविषयी असे म्हणता येईल काय? असे प्रश्न मनात येण्याचे कारण आपल्याकडच्या ‘सेक्युलर विचारवंतांची सगळी चिकित्सा आणि सगळी आग केवळ हिंदुत्ववाद्यांवर रोखलेली दिसते. त्याच्या शतांशानेही ती मुस्लिम मानस व वर्तन ह्यांकडे वळत नाही. हा प्रकार मला केवळ आत्मघातकी वाटतो. भोळे-पळशीकरांनी ही त्रुटी भरून काढावी अशी माझी विनंती आहे, असे त्यांनी केल्यास आणखी एक फायदा होण्याचा संभव आहे. नैष्ठिक सेक्युलरिझमचे आचरण करण्यासाठी मुसलमानांचा प्रश्नच अस्तित्वात नाही किंवा तो नगण्य आहे असे धरून चालण्याची गरज असते अशी भारतातल्या काँग्रेसवादी, समाजवादी, पुरोगामी विचारवंतांमध्ये चाल पडलेली आहे. तो एक अंधश्रद्धेचा प्रकार आहे असे मग कदाचित् लक्षात येईल.
३. विचारवंतांनी समाजापुढे वैचारिक आदर्श ठेवलेच पाहिजेत. आदर्श धर्मनिरपेक्षता, आदर्श समता,आदर्श लोकशाही इत्यादींचे प्रतिपादन केलेच पाहिजे, पण वास्तवात काय शक्य असते याचेही भान जरासे राखावे असे मला वाटते. मसलमान धर्मनिष्ठ, कुराणावर श्रद्धा ठेवणारे आहेत. हिंदू त्या मानाने खूपच कमी, पण तरीही सर्वसामान्यपणे धार्मिक मनोवृत्तीचेच आहेत. त्यांच्यात ज्या क्रिया-प्रतिक्रिया होतात त्या धमनि अवलिप्त होणे अस्वाभाविक नाही. म्हणून राजकारणातून, आजच्या अवस्थेत तरी, धर्म संपूर्णपणे बाहेर निघणे अशक्य आहे. अशा अवस्थेत ज्या क्रिया आदर्शाच्या चाचणीला पूर्णपणे उतरत नसल्या तरी, सापेक्षपणे देशाला पुढे नेणाऱ्या आहेत, त्यांबद्दल विचारवंतांनी स्वागतशील असले पाहिजे असे मला वाटते. आपले अंतर्गत सांप्रदायिक, भाषिक, प्रांतीय, जातीय भेद विसरून हिंदू एक होण्याच्या मार्गावर असतील, तर देशातल्या ऐंशी टक्क्यांची ही वाटचाल एकणात स्वागतार्ह आहे असे म्हणावे की नाही? हिंदू समाजातले अंतर्गत परिवर्तन हेही हिंदुत्ववादाचे एक अंग आहे. प्रचलित परिस्थितीचा एकूण ताळेबंद मांडताना पळशीकर ही बाजू जमेस धरणार की नाही? दुसरे, हिंदू संघटित झाल्याने मुसलमानांची मुजोरी काही अंशांनी कमी झाली तर तो पळशीकरांच्या मते अगदीच दैवदुर्विलास ठरेल काय? अर्थशास्त्राचे अभ्यासक नेहमी ‘ट्रेड्-ऑफ सूचा, काय गेले, काय आले याचा, विचार करतात. एकुणातली वजावाट धन [पॉझिटिव, प्लस] आहे की ऋण [निगेटिव, मायनस] आहे हे पाहतात, आणि ती धन असेल तर संतोष मानतात. नर्मदा धरणाच्या संदर्भात ‘बेनिफिट-कॉस्ट’ असा काही हिशेब करावा लागतो हे पळशीकरांना माहीत असणारच. अशी गुणोत्तरे विचारवंतांनी सामाजिक प्रवाह-प्रतिप्रवाहांनाही लावावीत आणि धन वर्ताळा निघाला तर उरले ते गंगाजळ (सॉरी! हिंदुत्ववादी सिंबॉल!) म्हणून त्याचा आदर करावा, ही मला शहाणपणाची रीत वाटते. हे पळशीकरांना आणि त्यांच्यासारख्या इतर विचारवंतांना पटते काय?
‘राधाकृष्ण ११५२, शुक्रवार, सुभाषनगर पुणे-४११००२