१९४७ च्या सत्तान्तरानन्तर आमचे राज्य secular आहे असे म्हणण्यास पं. नेहरूंनी सुरवात केली. वस्तुतः आमच्या संविधानात, हा प्रचार सुरू झाला तेव्हा secular हा शब्द नव्हता. तो पुढे इन्दिरा गांधीनी घातला. आज बहुधा सर्व पक्षांची secular म्हणवून घेण्यात अहमहमिका लागली आहे.
असे असले तरी या शब्दाच्या अर्थाबद्दल मात्र विलक्षण गोंधळ आहे. काँग्रेसजन साधारणतः secular च्या विरुद्ध communal असा शब्द वापरतात, व रामजन्मभूमीच्या विमोचनाच्या चळवळीला communal म्हणतात. उलट रामजन्मभूमीचे विमोचन ही secular चळवळ आहे असा दावा या चळवळीचे नेते मांडतात.
चेम्बर्सच्या कोशात ‘Secular’ या शब्दाचा अर्थ “Pertaining to the present world or things not spiritual’ असा दिला आहे. ऑक्स्फ र्डच्या कोशातही अक्षरशः हाच अर्थ दिला आहे. या शब्दाची व्युत्पत्ति ‘saeculum’ म्हणजे जीवनकाळ वा पिढी या शब्दापासून आहे. म्हणजे या जीवनाशी ज्याचा संबंध आहे त्यालाच फक्त मानणारा, या जीवनापलीकडे एक पारलौकिक जीवन आहे व त्या जीवनाचे निःश्रेयस लाभण्यासाठी या जीवनात काही केले पाहिजे हे नाकारणारा जो विचार तो secular. अर्थात या शब्दाला योग्य असा प्रतिशब्द ‘इहवाद’ हा आहे. इहवाद ईश्वर, पुनर्जन्म वगैरे ऐहिक प्रमाणांनी सिद्ध न होणाऱ्या गोष्टींचे अस्तित्व व त्यांच्या आधारावरच मांडण्यात येणाऱ्या विचारांचे प्रामाण्य मानीत नाही.
स्वदेशी इंग्रजी
इंग्रजीचे कोश काहीही म्हणत असले तरी secular शब्दाचा हा अर्थ आम्हाला मान्य नाही, आमच्या मते ‘secularism’ म्हणजे सर्वधर्मसमत्व असे राजीव गांधींनी सांगितले होते. भाजपच्या काही नेत्यांनाही हाच अर्थ मान्य आहे.
वस्तुतः असे म्हणणाऱ्या लोकांनी ‘Secular’ या शब्दाचा वापर करून लोकांची दिशाभूल करणे सोडून दिले पाहिजे. इहवादाच्या दृष्टीने सर्व धर्म सारखे आहेत म्हणजे सर्व धर्म सारखेच खोटे आहेत. पण सर्वधर्मसमत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मते सर्व धर्म सारखेच खरे व मूल्यवान आहेत. तेव्हा त्यांनी स्वतःला secular न म्हणवता सर्वधर्मीय म्हणवावे.
दुसरे असे की सर्व धर्मांना प्रमाण मानून राज्य करताच येणार नाही. कारण धर्म, जीवनाची सर्व अंगे व्यापतो. जीवनाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांबद्दल धर्मग्रंथात आज्ञा आहेत. धर्मग्रन्थ प्रमाण मानले तर सरकारला कायदे करण्याचा अधिकार उरत नाही. कायदेमंडळे अनावश्यक ठरतात, धर्मग्रंथाचा अर्थ लावणाऱ्या शास्त्री पांडितांची न्यायालये फक्त आवश्यक ठरतात. सर्व धर्मांना प्रमाण मानून राज्य करावयाचे असेल तर आपली संसद व विधिमंडळे बरखास्त करावी लागतील, व हिन्दू, ख्रिस्ती व इस्लामी या तीन प्रमुख धर्माच्या तज्ज्ञांच्या तीन समिती नेमून त्यांच्या आज्ञांवर राज्य चालवावे लागेल. म्हणजे या तीन धर्माच्या अनुयायासाठी तीन वेगळे कायदे अमलात आणावे लागतील.
सर्वधर्मसमत्व पूर्णपणे अव्यावहारिक
हे वेगळे कायदे फक्त दिवाणी व्यवहारात आहेत ही समजूत चुकीची आहे. फौजदारी व्यवहारासाठी देखील या तीन धर्माचे तीन वेगळे कायदे आहेत. मुस्लिम कायद्याप्रमाणे एका पुरुषाची साक्ष तीन स्त्रियांच्या साक्षीबरोबर आहे. एखाद्या स्त्रीने बलात्काराबद्दल तक्रार केली व बलात्कारी पुरुषाने ती खोटी आहे असे सांगितले तर ती स्त्री खोटे बोलते असे गृहीत धरले पाहिजे. शिवाय पुरुषावर खोटा आरोप करणारी स्त्री स्वतःच व्यभिचारिणी आहे असे गृहीत धरून तिला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देता येईल. ख्रिस्ती कायद्याप्रमाणे चेटकिणींना मारणे हे धार्मिक कर्तव्य आहे. कारण ‘Thou shall not suffer a witch to live’ अशी बायबलची आज्ञा आहे. तेव्हा एखाद्या स्त्रीचा चेटकीण म्हणून कोणी खून केला तर तो खून आहे हे ठरविण्यासाठी ती स्त्री चेटकीण होती की नाही हे ठरवावे लागेल व त्यासाठी ख्रिस्ती धर्मतज्ज्ञांच्या एका समितीची मदत घ्यावी लागेल.
सर्वधर्मसमत्व मानणाऱ्या सरकारला ख्रिस्ती व मुस्लिम कायद्याप्रमाणेच हिंदू धर्मशास्त्रही प्रमाण मानावे लागेल. हिंदू धर्मशास्त्रात अस्पृश्यता वैध मानलेली असल्यामुळे सर्वधर्मी सरकारलाही ती वैध मानावी लागेल. एखाद्या अवर्णाने एखाद्या सवर्णाचा अपमान केला तर त्याला फटके मारणे वा त्याच्या कानात शिशाचा रस ओतणे अशा शिक्षा द्याव्या लागतील. याचप्रमाणे सतीबंदी, एकपतित्व वगैरे सारे कायदे धर्मविरोधी म्हणून रद्द करावे लागतील.
एका देशाचे तीन राजे
मुस्लिम देशात मुस्लिम fundamentalism म्हणजे धर्ममूल राज्य चालते, तर आपल्या देशात वरच्यासारखे तीन धर्माचा fundamentalism म्हणजे तीन वेगळ्या धर्मासाठी तीन वेगळ्या प्रकारे धर्ममूल राज्य चालू देण्यास हरकत नाही असे काही लोक म्हणतील. तीन धर्माचे तीन कायदे परस्परविरोधी नसते तर हे म्हणणे चालू शकले असते. पण अशी स्थिति नाही. ख्रिस्ती, इस्लामी व हिंदू कायदे केवळ वेगळे नव्हेत, तर परस्परविरोधी आहेत. समजा एखाद्या मुसलमानाने खून केला व तो मी पाहिला असे एक स्त्री साक्षीदार न्यायालयात म्हणाली; तर तो मुसलमान म्हणणार की एक स्त्री हा एक तृतीयांश साक्षीदार आहे, माझ्याविरुद्ध एक साक्ष पुरी होण्यास तीन स्त्रियांना एक पुरुष साक्षीदार उभा राहिला पाहिजे, एकतृतीयांश साक्षीने गुन्हा सिद्ध होत नाही. उलट ती मुस्लिम स्त्री म्हणणार हा मुस्लिम कायदा हिंदू स्त्रीला लागू नाही. हाच बांधा हिंदू स्त्रीवर मुसलमानाने बलात्कार केला तर येणार.
त्याचप्रमाणे चेटकीण म्हणून मारली गेलेली स्त्री हिन्दू असली तर ‘Thou shall not suffer a witch to live’ ही ख्रिस्ती धर्माज्ञा तिला लागू नाही, म्हणून खून करणाऱ्याला सरळ फाशी द्यावे असे हिंदू म्हणणार.
सारांश सर्व धर्माचे समान नामाण्य मानून कोणतेच राज्य चालू शकणार नाही. जगात जी धर्माधिष्ठित राज्ये झाली ती कोणत्या तरी एका धर्माचे प्रामाण्य मानतात. मुस्लिम देशात व मुगल काळात हिंदूंनादेखील मुस्लिम कायदाच लागू होता हे सेतुमाधव पगडी यांनी दाखवून दिले आहे.
‘खरा’ व ‘खोटा’ धर्म
तुम्ही दिलेली उदाहरणे ही ख्रिस्ती, इस्लाम व हिन्दू धर्माच्या विकृत स्वरूपाची उदाहरणे आहेत, खरा हिन्दू, ख्रिस्ती व इस्लाम धर्म अत्यंत उज्ज्वल आहे व त्यांची तत्त्वे एकरूपच आहेत असे यावर नेहमी म्हणण्यात येते. श्रुति, स्मृति, पुराणांत सापडणारा तो खरा हिन्दू धर्म नव्हे, शरियतमध्ये सापडणारा तो खरा इस्लाम नव्हे व बायबल आणि ख्रिस्ती धर्मगुरु यांच्या विचारांत आढळणारा तो खरा ख्रिस्तीधर्म नव्हे, तर मग खरा हिन्दू, इस्लाम व ख्रिस्ती धर्म आणायचा तरी कोठून ? शिवाय सर्व धर्माची मूलतत्त्वे समान आहेत हीही एक निराधार कल्पना आहे. मरणोत्तर जीवन आहे व या जगातील जीवन मरणोत्तर कल्याण व्हावे म्हणून जगायचे आहे या कल्पनेव्यतिरिक्त सर्व धर्मात समान असे कोणतेही तत्त्व सापडणे कठिण आहे. मरणोत्तर जीवन आहे या समान श्रद्धेचा देखील व्यवहारात परस्पर सलोखा साधण्यासाठी काही उपयोग नाही; कारण मरणोत्तर कल्याण साधण्यासाठी निरनिराळ्या धर्मांनी उपदेशिलेली जीवनपद्धति परस्परविरोधी आहे. बहुदेवतावाद व मूर्तिपूजा ही पापे आहेत व ती आचरणारे नरकात जातात अशी ख्रिस्ती व इस्लाम धर्माची शिकवण आहे. या धर्मांनी उपदेशिलेल्या विश्वबन्धत्वाच्या विश्वात ‘हीदन’ व ‘काफिर’ यांचा समावेश होत नाही. मुसलमान ख्रिस्ताला मानतात, पण ख्रिस्ती लोक पैगंबराला मानीत नाहीत; कारण ख्रिस्ताच्या नंतर केव्हाही व कठेही ईश्वराभिव्यक्ति झाली नाही अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळेच हिंदूंप्रमाणेच मुसलमानांचेही आत्मे नरकापासून वाचवण्यासाठी मिशनऱ्यांचा धर्मपरिवर्तनाचा उद्योग सुरू असतो.
हिन्दु धर्माशिवाय हिन्दू राष्ट्र
तात्पर्य ‘secular’ शब्दाचा अर्थ सर्वधर्मसमभाव असा होऊ शकत नाही. Secularism सर्व धर्म खोटे आहेत या एकाच अर्थी सर्व धर्म समता मानतो. सर्व धर्म खरे आहेत असे मानून कोणतेच राज्य चालू शकत नाही.
मग इहवादी लोकांना हिंदुराष्ट्र या संकल्पनेचे समर्थन करता येईल काय? असे समर्थन सावरकर, बलराज मधोक व हमीद दलवाई यांनी केले आहे. त्यांत सावरकरांच्या प्रतिपादनातील दोष असा की त्यांच्या राष्ट्रकल्पनेत मुसलमान व ख्रिस्ती यांचा समावेश होत नाही. भारतातील जवळ जवळ तृतीयांश जनतेचा ज्या संकल्पनेत समावेश होऊ शकत नाही ती भारतीय राष्ट्रीय संकल्पना आहे असे म्हणता येत नाही. बलराज मधोक व सर्वात जास्त म्हणजे हमीद दलवाई यांची संकल्पना ही इहवादी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे, व याव्यतिरिक्त दुसऱ्या संकल्पना इहवादीही नाहीत वा राष्ट्रीयही नाहीत. इहवादी हिंदू राष्ट्राची संकल्पना थोडक्यात अशी मांडता येईल.
हिंदू हा शब्द विशिष्ट धर्माचा वाचक म्हणून ब्रिटिश काळात वापरण्यात येऊ लागला. त्यापूर्वी ‘हिंदू’ व ‘हिंदी’ हे शब्द समानार्थक होते. हिंदू धर्म या शब्दाचा अर्थ भारतात प्रादुर्भूत झालेले धर्म एवढाच होता.
‘हिंदी व ‘हिंदू’ हे शब्द मूलतः समानार्थक असले तरी ‘हिंदू’ या शब्दाला एक सांस्कृतिक अर्थदेखील आहे. असा अर्थ ‘हिंदी वा भारतीय या शब्दांना नाही, व ‘इंडियन’ या पारतंत्र्यपूजक शब्दाला तर नाहीच नाही. भारत अनेक संस्कृतींचा व वंशांचा बनलेला आहे. ही तथाकथित ‘सेक्युलर लोकांची बुद्धिपुरःसर मारलेली एक थाप आहे. भारतात ‘आर्य’,’द्रविड वगैरे अनेक लोक व संस्कृति निरनिराळ्या काळी आल्या, त्यातच पुढे शक, हूण, तुर्क अफगाण, मुगल व इंग्रज आले, या सर्वांच्या संस्कृतीचे कडबोळे म्हणजे भारत ही भारताची संकल्पना मिशनरी, कम्युनिस्ट, कॉन्व्हेंटवाले वगैरे राष्ट्राच्या जिवावर उठलेल्या गटांनी प्रसृत केली आहे.
अगा जे झालेचि नाही.
उपर्युक्त जनसमूह व संस्कृति यांपैकी आर्य व द्रविड हे सर्वथैव काल्पनिक आहेत. शक व हूण हे काल्पनिक नाहीत, पण भारतात हिंदू संस्कृतीहून वेगळी म्हणून ओळखू येणारी शक व हूण संस्कृति कधीही नांदली नाही. हे लोक हिंदू संस्कृतीत बेमालूम मिसळून गेले. तुर्क, अफगाण व मुगल बाहेरून आले, पण आज येथे त्यांचे वंशज कुणी उरले नाहीत. भारतीय मुसलमान हे तुर्की, अफगाण व मुगल यांचे वंशज आहेत असा प्रचार ‘सेक्युलरिझम् ‘च्या नावाखाली केला जात आहे. तो देशद्रोहाने प्रेरित व सर्वथैव खोटा आहे. भारतीय मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत. त्यांचे धर्मातर बरेचसे जबरदस्तीने व काहीसे प्रलोभनाने घडवून आणण्यात आले आहे. त्यांना आपल्या धर्मातराचा इतिहास व मूळच्या हिंदू जाती आठवतात. ब्रिटिश अमलाच्या सुरवातीपर्यंत ते परत हिंदू होण्यास तयार होते. काश्मीरच्या मुसलमानांनी “आम्हाला जबरदस्तीने बाटवण्यात आले आहे, आम्हाला परत हिंद करून द्या” असा महाराजांकडे अर्ज केला होता, पण महाराजांच्या ‘सेक्युलर’ पुरोहिताने असे काही तरी ‘कम्यूनलं कृत्य कराल तर मी जीभ हसडून प्राण देईन अशी धमकी दिली व बाटलेले हिंदू परत स्वधर्मात येऊ शकले नाहीत. ३७० या ‘सेक्युलर’ कलमापेक्षाही जास्त विघटनकारी असे हे कलम व त्यामुळे काश्मीरच्या विभक्ततेचे मूळ कायम राहिले.
महम्मदी हिंदू
धर्माप्रमाणे भाषा रीतिरिवाज वगैरे अनेक बाबतीत बवंश भारतीय मुसलमान हिंदूच होते. ब्रिटिश अमलाच्या आधी उर्दू भाषाच निर्माण झाली नव्हती व भारतीय मुसलमानांची भाषा हिंदूंच्या भाषांहून वेगळी आहे हा खास ‘सेक्युलर’ विचार कुणाच्या स्वप्नातही आला नव्हता, भारतीय मुसलमानांना आपल्या हिंदू मातृभाषांचा अभिमान आहे हे बांगला देशमधील १९७१ च्या बंगाली समर्थक उत्थानाने चांगले नजरेस आणून दिले होते.
भाषेप्रमाणेच रीतिरिवाजांच्या बाबतीत देखील परवा परवापर्यंत भारतीय मुसलमान हिंदूच होते. कच्छी, मेमन, व सीमाप्रांतातील काही मुस्लिम गट यांना ब्रिटिश कालात हिंदू कायदा लागू होता. धर्माने मुसलमान असला की त्याला शरियत लागू झाली पाहिजे हे तत्त्व ब्रिटिशांनी मान्य केले नव्हते. जाति मुस्लिम असो की हिंदू असो, शेकडो वर्षापासून तिला जो कायदा लागू होत होता तोच लागू राहील असा ब्रिटिशांचा दंडक होता.
भारतीय मुसलमानांची वेषभूषाही हिंदूंसारखीच होती. मुसलमानाने तुर्की टोपी घातली पाहिजे व दाढी वाढवली पाहिजे ही प्रवृत्ति बहंश मुसलमानांत नव्हती. तात्पर्य एक मशिदीत जाऊन नमाज पढत होता व दुसरा मंदिरात जाऊन भजन करीत होता यापलीकडे भारतीय हिंदू-मुसलमानांच्या संस्कृतीत फारसा भेद नव्हता.
भारतीय ख्रिश्चनांना वरील सर्व विधाने लागू आहेत याचे वेगळे विवेचन करण्याची जरूरी नाही.
तात्पर्य साऱ्या भारताची संस्कृति आपल्या ‘सेक्युलर’ राज्याच्या स्थापनेपूर्वी हिंदू होती. तिच्यातील विविधता ही प्रांतीय विविधता होती. हिंदू/मुसलमान/ख्रिस्ती अशी विविधता नव्हती.
हमीद दलवाईंचे हिंदू राष्ट्र
तेव्हा धर्माधिष्ठित राज्य या दृष्टीने भारत हे हिंदू राष्ट्र बनविणे इष्ट नसले तरी सास्कृतिक दृष्टीने ते नेहमी हिंदू राष्ट्र होते, व यापुढेही ते राष्ट्र म्हणून टिकावयाचे असेल तर त्याच्या हिंदत्वाची जोपासना करण्याशिवाय गत्यंतर नाही. ‘हिंट धर्माशिवाय हिंटत्त्व’ हा शब्दप्रयोग काही लोकांना विचित्र वाटेल; पण ही नित्याच्या परिचयाची गोष्ट आहे. WryI am not a Christian या ग्रंथात ख्रिश्चन धर्मावर कोरडे ओढणारा व स्वतःला संपूर्णपणे नास्तिक म्हणविणारा बरदँड रसेल ‘मी धमनेि ख्रिस्ती नसलो तरी भावनिक व सांस्कृतिक दृष्टीने ख्रिस्ती समाजाचा घटक आहे याचा मला प्रत्यय येऊ लागला’ असे म्हण लागला होता. आगरकर व सावरकर हे विचाराने हिंदधर्मीय होते असे कणीही म्हणायला धजणार नाही, पण ते भावनिक दृष्ट्या पूर्ण हिंदू होते. गझनीने सोमनाथाची विटंबना केली व बाबराने रामजन्मभूमि उद्ध्वस्त केली या राष्ट्रीय अपमानाची त्यांना कोणत्याही भाविक हिंदूपेक्षा अधिक चीड होती. हिंदूंच्या भावभावना या आपल्या भावभावना आहेत, यापैकी काही भावभावना हानिकारक असतील तर त्या बदलल्या पाहिजेत; पण त्या बदलताना स्वतःच्या देहावर शस्त्रक्रिया करून घेताना आपली जी वृत्ति असते ती कायम ठेवली पाहिजे असे त्यांच्या विवेचनातून स्पष्ट आहे. आगरकर व सावरकर हे जन्माने हिंदू तरी होते. पण जन्माने हिंदू नसलेल्या हमीद दलवाई यांच्या विचारातही या इहवादी हिंदुत्वाचे दर्शन होते. “गझनी व बाबर यांचा द्वेष करण्याचा हिंदूंपेक्षा मला जास्त अधिकार आहे, कारण या आक्रमकांनी माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून मी आज मुसलमान आहे. हिंदूंच्या पूर्वजांवर तेवढे अत्याचार झाले नाहीत म्हणून ते आज हिंदू उरले आहेत” असे त्यांनी उद्गार काढले आहेत. हमीद दलवाई यांच्या विचारांचा प्रसार करणे हाच इहवादी राष्ट्रीयत्व स्थापन करण्याचा एकमात्र मार्ग आहे.
वरील विवेचचनाचे सार म्हणून हिंदू राष्ट्रीयत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल.
हिमाद्रेर्दक्षिणाब्धेश्च मध्यगा यस्य मेदिनी ।
पितृभूः संस्कृतेर्भूश्च स हिन्दुरिति कथ्यताम् ।।
दक्षिण सागर व हिमालय याच्यामधली भूमि ही ज्याची पितृभू व सांस्कृतिक भू आहे तो हिंदू.
३८, हिन्दुस्थान कॉलनी अमरावती रोड, नागपूर