वास्तव देवकल्पना
एकटा देवधर्म घेतला आणि त्याकडे पाहू गेले तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एकदेवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतांपैकी एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूते, पिशाच्चे, एकदेव, झाडे व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकेच नव्हे तर स्वतःच देव, ईश्वर व ब्रह्मही होता. देव एक हे जितके खरे तितकेच ते कोट्यवधी आहेत हेही खरे असल्यामुळे, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवाप्रमाणे असत्य असल्यामुळे, कातकरी, यहुदी, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारेच अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठीमागे धावत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यात सौख्य मानीत होते. अशा ह्या नाना प्रकारच्या देवकल्पनांनी पछाडलेल्या गटांचा एक भरीव समरस समाज बनवावयाला एकच तोडगा होता. तो हा की, ह्या सर्वाच्या डोक्यातील निराधार व अशास्त्र अशी जी देवकल्पना तीच मुदलात उपटून काढली पाहिजे होती, निदान एकसमाजत्वाप्रीत्यर्थ ह्या देवकल्पनेला व देवधर्माला गबाळात गणून इतर राजकीय, वैयापारिक व शास्त्रीय व्यवहारात तिला नितांत गौणत्व दिले पाहिजे होते. ते जोपर्यत झाले नव्हते, तोपर्यंत हे सहाही गट एकसमाजत्वाला उपकारक होण्याची आशा नव्हती. देवकल्पनेचे असत्य युग पाच-चार हजार वर्षे चालून समाप्तीस येण्याच्या रंगात आहे हे ह्या देवभोळ्या लोकांच्या अद्याप लक्षात आले नव्हते. एकट्या अद्वैतवेदान्त्याने तेवढे देवकल्पनेला लाथाडले होते, परंतु अद्वैतवेदान्त्यांची चिमुकली संख्या देवभोळ्यांच्या प्रचंड संख्येच्या पासंगालाही पुरेशी नव्हती.