हिंदु धर्मात बरीच व्यंगें आहेत म्हणून यहुदी, महं दी, क्रिस्ती किंलवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेंच, आमचे कांहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरें नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणें हें केवढे मूर्खपण आहे बरें? ज्या देशांत आपले शेकडों पूर्वज जन्मास आले, वाढले व मरण पावले; ज्या देशांतील हजारों पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचें फळ आपणांस ऐतेंच प्राप्त झालें – अशा देशांतील धर्माचा, रीतीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधींहीं शोभणार नाही. स्वभूति, स्वलोकांत, स्वधर्मांत आणि स्वाचारांत राहून अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छलास न भिता, त्यांच्याशी कधी भांडून, कधीं युक्तिवाद करून, कधीं लाडीगोडी लावून, अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यांतच खरी देशप्रीति, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरें शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे. याच्या उलट जे वर्तन करतात ते सुधारणा करीत नाहीत तर फक्त शृंखलांतर करतात. — गोपाळ गणेश आगरकर
आवाहन अंगी घेवून वारे दया देती। तया भक्ता हाती चोट आहे।। तयाचे स्वाधीन दैवते असती। तरी का मरती त्यांची पोरे।।
तुका म्हणे पाणी अंगार जयाचा। भक्त कान्होबाचा तोची नव्हे ।। — संत तुकाराम महाराज
उपरोक्त उक्तीतून कर्मकांड, जादूटोणा, भोंदूगिरी विरोधात संत ज्ञानेशर माऊली व संत तुकोबारायांनी प्रहार केल्याचे दिसत आहे. असे असतानाही काही लोक संताच्या साहित्याचे वाचन-चिंतन न करता वारकऱ्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. अशा वेळी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करत वारकऱ्यांची भूमिका संतांच्याच शब्दांतून स्पष्ट करत आहोत. तथागत गौतम बुद्ध ते संत तुकाराम महाराज हा भारतातील शोषित, दलित, बहुजन, भटक्या विमुक्त, आदिवासी व स्त्रियां यांच्या मुक्तीच्या संघर्षाचा इतिहास आहे. या सर्व महापुरुष-संतांची भूमिका ही कायम अन्याय-अत्याचार, विषमता, अंधश्रद्धा विरोधाची राहिलेली आहे. तसेच ती उच्च-नीचतेच्या प्रवृत्ती विरोधात, जातीय, वर्गीय, लैंगिक शोषमाच्या विरोधात राहिली आहे. संतांनी केवळ तत्त्वज्ञान मांड न बसता अनयायाच्या विोक्षरधात बंडाची मशाल पेटवण्याचे काम केले आहे. ‘यारे यारे लहाण-थोर। याती, भलती नारीनर’ची हाक दिली आहे. समाज उपदेशाबरोबरच स्व-आचरण करण्याचे काम केले आहे. विचारांची लढाई विचाराने व निर्भिडपणे लढणे हा संतांचा वारसा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की, आम्हा घरी धन शब्दाचीच शस्त्रे। शब्दाचीच अस्त्रे यत्न करू।।।
जगातील कोणताही धर्म पापाचे समर्थन करीत नाही. तरी पण धर्मांधी पापवृत्ती का वाढते आहे? धर्मस्थळे ही अतिरेक्याचे अड्डे का बनत आहेत ? कामासक्ती आमि धनासक्तीच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा वसा घेतलेले आज आहारी गेलेले का दिसत आहेत ? असे असताना संत मंडळी त्याकडे गंभीरपणे पाहणार आहेत की नाही?
“डोई वाढवूनी केस। भूते आणिती अंगास।। मेळवूनी नर-नारी। शकून सांगती नानापरी।।” ढोंगी बाबांचा असा परखड समाचार घेणाऱ्या आणि “नवसे कन्या-पुत्र होती। तरी का करणे लागे पती।।” असे म्हणणाऱ्या विज्ञानवादी, तत्त्वज्ञ तुकोबारायांचे आपण पाईक आहोत. त्यांची आठवण ठेवून आणि अशा ‘सज्जनांची अलिप्तता हीच दुर्जनांची पोषकता’ ठरत असते हे लक्षात घेऊन सज्जनशक्ती एकत्र आली पाहिजे. धर्माच्या नावाने दहशत निर्माण करणाऱ्या शक्तींना आवरले पाहिजे. जादूटोणा, भोंदूगिरी करणाऱ्यांना चाप दिली पाहिजे हाच खरा संतांचा वारसा आहे आणि तो जपला पाहिजे.
हे पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे कारण, समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसाढवळ्या होणारी हत्या, वाढते बलात्कार, दंगली, दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार, नैसर्गिक संसाधनाची लूट, जंगलतोड, नद्याचे प्रदूषण, शुद्ध पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि चैनीच्या वस्तूंचा सुकाळ, वाढत्या शेतकरी-विद्यार्थी आत्महत्या, बेकारी, दहशतवाद, पर्यावरण हास आदी समस्यांचा सर्व बाजूंनी वणवा पेटला असताना संत व सज्जनशक्ती एकत्र आली पाहिजे आणि दुर्जनांना रोखले पाहिजे. यासाठई ‘उजळावया आलो वाटा। खरा-खोटा निवाडा’ या तत्त्वाने काम करणाऱ्या शक्तीची मूठ बांधण्याची वेळ आली आहे. यासाठी कायद्याची मदत घेणेही अनिवार्य आहे. कारण तो राज्याचा सर्वश्रेष्ठ असा नियम असतो. कायदा व जनजागृती ह्या दोन्ही अंगानी हा लढा पुढे न्ययाचा आहे. त्यासाठी आम्ही पूर्वीच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याला पाठिंबा दिला होता. आताही आजच्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानष, अनिष्ट प्रथा व जादूटोणा ह्यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अध्यादेशास माझी पूर्णतः सहमती आहे. माझी ही भूमिका मी आतापर्यंत वारंवार स्पष्टपणे मांडत आलो आहे. अगदी अलिकडे दि.४ सप्टें.२०१३ रोजी सह्याद्री वाहिनीवरून झालेल्या चर्चेतही मी ही भूमिका ठामपणे मांडली होती. एवढे करूनही वारकऱ्यांचा जादूटोणाविरोधी अध्यादेशाला विरोध अशा अर्थाच्या बातम्या प्रसिद्ध करून अपप्रचार करण्यात येत आहे. तरी सर्व सुजाण लोकांनी ह्या अपप्रचाराला बळी न पडता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सत्कार्यासाठी आमच्यासवे यावे असे आवाहन मी याद्वारे करीत आहे.