विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो.
अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड होईपर्यंत शास रोखून धरला जातो. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू अटळ आहे, असे समजतात.
कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते. लीप वर्षाच्या २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या मुलीचे लग्न लवकर होते व ती आयुष्यभर निरोगी राहते.
खुर्ची : खुर्चीसारख्या निरुपद्रवी वस्तूभोवतीसुद्धा अंधश्रद्धा आहेत. खुर्ची खाली पडणे अशुभ समजले जाते. कुणीतरी उठून गेल्यानंतर खुर्ची पडल्यास ती व्यक्ती खोटारडी मानली जाते. दवाखान्यातील खुर्चीवर झाकून ठेवलेले कापड खाली जमीनीवर पडल्यास नवीन रुग्ण येतो. खुर्ची उलटी ठेवल्यास घरात भांडण होते, अशा समजुती खुर्चीबाबत आहेत.