आपल्या देशातील बुवा-बाबा-अम्मा यांच्या संख्येत गेल्या काही दशकात वेगाने वाढ झाली आहे. पुटपाथीच्या सत्यसाईबाबांचा तर विशेषच बोलबाला होता. त्या बाबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीची आतापर्यंत झालेली मोजदाद त्यांच्या नजीकच्या कोंडाळ्यातल्या लोकांनी त्यांच्या मृत्यू दरम्यान व मृत्यू पश्चात केलेल्या लुटा-लुटीनंतर देखील कित्येक लाख कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आसाराम नावाच्या बापूची संपत्ती देखील अशीच कित्येक लाख कोटी असल्याचे बोलले जाते. अलिकडच्या काळात आस्था, साधना, संस्कार इत्यादी टीव्ही चॅनल्स वरून जे नवे-नवे बाबा-अम्मा प्रकट होत आहेत त्या सगळ्यांची संपत्ती अशीच कित्येक कोटी असल्याचे बोलले जाते. फॉरच्युनर, हॅर, मर्सिडीज, ऑडी इत्यादी महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्यांशिवाय इतर गाड्या वापरताना ते दिसत नाहीत. यातले कित्येक बाबा, अम्मा, माता स्वतःच्या मालकीच्या जेट विमानानेच प्रवास करताना दिसतात. या बाबा-अम्माच्या बाबतीत एक गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यांच्यात असलेला सर्वधर्म समभाव. कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी येथे नाही. यात हिंदू म्हणवणारे जसे आहेत, तसेच ख्रिस्त अंगात येणारे, पैगंबर अंगात येणारे देखील आहेत. अलीकडच्या काळात तर काहींच्या अंगात बाबासाहेब व भगवान बुद्ध देखील यायला लागले आहेत. विषमतावादी ब्राह्मणी व्यवस्थेने पसरवलेले जात-वर्गीय श्रेष्ठत्व, स्त्री शूद्रातिशूद्र दास्यत्व आदि सारख्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विकृतींच्या विरोधात एकेश्वरवादाचे निशाण हाती घेवून उभ्या राहिलेल्या एतद्देशीय सव’धर्म- पंथांना या देशातल्या आधुनिक बाबा-बुवा-अम्मांनी झाकोळून टाकले आहे.
नामदेव-ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबापर्यंतच्या अभंगाच्या आधाराने होणारी किर्तन-प्रवचने तसेच मुक्ताई, जनाई पासून बहिणाबाईपर्यंतच्या सर्व स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल प्रत्यक्ष विठोबालाच प्रश्न विचारणारे साहित्य सर्वसामान्यांच्या आठवणीतूनच काढून टाकले जात आहे. त्याऐवजी कुणीतरी पढवलेल्या, पाठांतर केलेल्या आणि चार-चार तास मेकअप रुममध्ये घालवून आल्यासारख्या दिसणाऱ्या बाबा-अम्मांची संख्या वाढत आहे. हेच बाबा-अम्मा रिअल इस्टेट पासून ते लोकसभा-विधानसभा पर्यंतच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याचे काम करत आहेत. तत्त्वज्ञान, इतिहास इत्यादीचा कसलाही गंध नसणाऱ्या बाबा- बुवा-माता-अम्मांचे आज उदंड पीक आलेले दिसतेय. देवा-धर्माच्या नावाने अंधश्रद्धेचा व्यापार ही तशी या जगामध्ये नवीन गोष्ट नाही. अलीकडच्या काळात तिरुअनंतपुरम येथील एका प्राचीन देवळाच्या पाच खोल्यांची दारे उघडण्यात आली, उर्वरित खोल्यांची आणखी दारे उघडायची आहेत. शेकडो वर्षांपासून साठवण्यात त्या पाच खोल्यांतील संपत्तीची किंत पाच लाख कोटीच्या आसपास असल्याचे जाहीर झाले आहे. गझनीच्या महम्मदाने ‘सोरटी-सोनाथ’चे देऊळ सतरावेळा लुटले. याबद्दल प्रसिद्ध इतिहासकार डॉ. महम्मद हबीब यांनी ‘महम्मद-अब-गझनी’ या प्रसिद्ध पुस्तकात सिद्ध केले आहे की, सोरटी-सो नाथाच्या देवळाचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या सात रजपूत राजांनी दिलेल्या आमंत्रणावरून गझनीचा महम्मद सोरटी-सो नाथ लुटण्यासाठी आला होता. लुटीमधला हिस्सा आणि लुटीसाठींचे संरक्षण त्या राजांनी महम्मदांना दिले असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळात व आत्ताच्या उत्तर आधुनिक काळात देव-धर्म-अंधश्रद्धा आणि अर्थव्यवस्था याचा अतूट परस्परसंबंध राहिलेला दिसतो.
आपल्याकडील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्र हे (उदा. पंढरपूर, पैठण, काशी,तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक इ.) सनातन काळापासूनच्या व्यापारी मार्गावरच वसलेली असल्याचे डी.डी.कोसंबी म्हणतात. याचाच अर्थ, तीर्थक्षेत्र आणि व्यापारी मार्ग याचा पुरातन काळापासूनचा संबंध आहे. भारतातून युरोपात जाणाऱ्या खुश्कीच्या मार्गावरच मक्का, मदीना व जेरूसले ही शहरे वसलेली आहेत. याचा अर्थ ज्या-ज्या ठिकाणी शेतीच्या शोधानंतर समाज स्थिर झाला तेथून व्यापाराचा उदय झाला. जगातल्या त्या सर्व व्यापारी मार्गावर तीर्थक्षेत्रे उभी राहिल्याचे आपल्याला दिसते.
भारतामध्ये ब्राह्मणांचे मंत्र आणि श्रमणांचे तंत्र हा सनातन लढा आहे. या लढ्यामध्ये मंत्राच्या सहाय्याने अंधश्रद्धा जोपासण्याच्या देखील जुन्या परंपरा आहेत. या मंत्राचे अर्थ त्या मंत्र म्हणणाऱ्याला देखील कळतात की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. वर्त नि काळात देखील अनेक आधुनिक बाबांनी काही सुबोध तर काही दुर्बोध मंत्र दिल्याचे आपणास दिसते. उदा. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’ हा सुबोध मंत्र आहे तर ‘गण-गण गणात बोते’ हा दुर्बोध मंत्र आहे. भक्तांच्या दृष्टीने मंत्र जेवढा दुर्बोध, तेवढा तो देणारा बाबा पॉवरफुल, म्हणजेच त्या बाबाचे अर्थशास्त्रही पॉवरफुल. श्रमणाने पहिल्यापासूनच मंत्र नाकारताना अंधश्रद्धाही नाकारल्या. आणि तंत्र स्वीकारताना दृष्टी वैज्ञानिक राहील याचा ध्यास घेतला. पण अलिकडच्या काळात तंत्राचाच वापर करून कुणी अंगठ्या तर कुणी घड्याळ, पेढे, उदी इ. काढून देण्यास सुरुवात केली आहे. आणि याच्या जोरावरच ते लाखो कोटीचे मालकही झाले आहेत. पुढचा मुद्दा असा आहे की बाबा-अम्मा हे त्यांच्याकडे केवळ चलाखी आहे म्हणून यशस्वी होतायत का ? तर तसे नाही. आज समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक वाढती असुरक्षितता, येणारे तुटलेपण व अगतिकता त्यांच्या यशास कारणीभूत आहे. माझ्या मते विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, फुलेवादी, आंबेडकरवादी इत्यादी लोकशाहीवाद्यांना समतामूलक सामाजिक मूल्ये व त्या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यात आलेले अपयश आणि त्या अपयशाची कठोर समीक्षा व आत्मपरीक्षण करण्यासाठी त्यांनी केलेली टाळाटाळ हे या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत.
जोतिबा फुले व गांधींचा सन्माननीय अपवाद वगळला तर ज्या-ज्या पुरोगाम्यांनी साक्षरतेचा आग्रह धरला त्यांनी त्यांनी, व्यवस्था जी साक्षरता देते आहे तिच्या आशयाला प्रश्न विचारले नाहीत. जोतिबांनी झिरपण्याच्या सिद्धांताला (परकोलेशन थिअरी) विरोध केला आणि अब्राह्मणी शिक्षणव्यवस्था सुचवली. गांधीजींनी ‘नई तालीम’ मध्ये शारीरिक कष्टातून निर्मिती करणारी शिक्षणव्यवस्था सुचवली. थोड्याबहुत फरकाने तुकडोजी महाराज व गाडगेबाबांनी देखील शिक्षणव्यवस्थेच्या ब्राह्मणी आशयाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. इतर पुरोगामी फक्त “शिका’ असे म्हणाले. शिका म्हणजे काय ? तर ब्रिटिशांनी येथे आणलेल्या नव्या औद्योगिक व्यवस्थे ळे शेतीच्या केंद्रस्थानी मनुष्या ऐवजी बाजारपेठ येऊ लागली होती. या बाजारपेठेळे शेती व शेतीपूरक व्यवसाया ह्यांच्यात एक तुटलेपणा येऊ लागला होता. या तुटलेपणाला (एलिअनेशन) सामोरे जाणारा उत्पादक व बहजन जाती धल्या तरुण-तरुणी त्या काळात “देवा तुझे किती सुंदर आकाश” असे म्हणत भ-भटजीचा, ग-गणपतीचा अशी मुळाक्षरे गिरवत मोठे झाले. कालपर्यंत ज्या बहुजन समाजाची ज्ञानार्जनाची प्रक्रिया निसर्गाशी भिडत-भिडत निरीक्षण करण्याची होती, त्यांना नव्या शिक्षण व्यवस्थेने पाठांतरवादी केले. कारण त्यांना शिकवणारे पाठांतरवादी परंपरेतून आलेले होते.
शेतीपासून आलेल्या तुटलेपणाबरोबरच स्वतःच्या ज्ञाननिर्मितीच्या परंपरेपासून तुटलेल्या या बहजन तरुण-तरुणींची पहिली पिढी शहरात स्थायिक होईपर्यंत लोकमान्यांचा गणपती मंबई-पुण्याच्या बाहेर सार्वजनिक झाला नव्हता. नवरात्रीतला गरबादेखील मुंबईच्या गुजराती सोसायट्यांपुरताच मर्यादित होता. ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ असं म्हणतं भ-भटजीचा, ग-गणपतीचा पाठ केलेल्या व ज्ञानाचा न्यूनगंड घेऊन साक्षर, उच्चसाक्षर झालेल्या बहजन पिढीनेच आणीबाणीनंतरच्या काळात गणपती-गरबा आणि शिवसेना सार्वजनिक केली. याच काळामध्ये सत्यसाईबाबा, निर्मलादेवी, आसारामबापू इत्यादी बाबा-बुवा, माता अम्मा सार्वजनिक होत गेले. तेव्हा या बाबा-माता-अम्मांच्या चलाखीपेक्षाही, ज्ञानाच्या न्यूनगंडात गटांगळ्या खात साक्षर, उच्चसाक्षर झालेल्या बहजन समाजानेच त्यांना लाखोंच्या संख्येने गराडा घालत मोठे केले आहे. ज्या बहुजन समाजाने गांधींच्या खुनानंतर गावातून ब्राह्मणांना हद्दपार केले, त्याच बहुजन समाजाने १९८० नतरच्या काळात शहरात बसून गावातल्या देवळांचे जीर्णोद्धार केले. ह्याच काळात वारीला जाणाऱ्या भक्तांची संख्या एकीकडे वाढत गेली असली तरी वारकरी परंपरा मात्र हळूहळू लोप पावू लागली. त्याच्या पुढे आणखी एक परिवर्तन घडून आले. बघता-बघता वारकरी हनुानामध्ये कधी बदलला आणि अयोध्येच्या विटा कधी वाहू लागला ते कळलेही नाही. विठ्ठलाला आई, माउली, सखा, सांगाती म्हणून आळवणाऱ्या, त्याच्याशी वाद घालणाऱ्या, प्रेचे भांडण करणाऱ्या भक्ताचे आज्ञाधारी हनुानांध्ये रूपांतर झाले. वारकऱ्यांचे हनुान होणे म्हणजे भक्ताने विठ्ठलाला प्रश्न विचारायला नकार देणे. तथाकथित पुरोगाम्यांनाही याची नोंद घेता आली नाही. त्याची कारणमीमांसा करता आली नाही. कारण त्यांचा भागवत धर्माचा अभ्यास नव्हता. वारीच्या विद्रोही परंपरा ज्यांना कधी माहीत नव्हत्या त्यांनी त्या जतन करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नव्हता.
ह्या प्रकारातूनदेखील एक अर्थव्यवस्था जन्माला आली. एकही आधुनिक हनु नि असा प्रश्न विचारत नाही की, मी वाहून नेलेल्या विटांचे काय झाले. वारकरी हनु नि का व कसा झाला याचे विश्लेषण न करता त्याच्या अंधश्रद्धा कोणत्या, हा चर्चेचा विषय केला गेला. म्हणजे अंधश्रद्धांची अर्थव्यवस्था आणि अंधश्रद्धा विरोधांची अर्थव्यवस्था दोन्ही परस्परपूरक. मुळात अंधश्रद्धेचा प्रश्न हा अनेक अंगांनी येतो. जगाच्या चलण-वलनाचे नियम माहित नव्हते तेव्हा त्या अज्ञानातून ‘ईश्वर’ या संकल्पनेचा जन्म झाला. विवेकवादी अंगाला जगाच्या चलन-वलनाचे जवळपास सर्वच नियम माहीत आहेत.त्याने तर्काच्या आधारे म्हणजे विज्ञानाने ‘ईश्वर’ नावाच्या गोष्टीला स्वर्गात पाठवायला काहीच हरकत नव्हती, पण तसे झाले नाही. रशियातल्या समाजवादी क्रांतीनंतर खरे म्हणजे त्याही आधी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर म्हणजे १९ व २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य-समता-बंधुता-समाजवाद हे जेंव्हा मानवी समाजाच्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी होते, त्या काळात ईश्वराने काही काळ सिकलीव्ह टाकल्याचे आपल्याला दिसते. सोवियत युनियनच्या समाजवादी क्रांतीचे विघटन व चीनची भांडवशाहीकडे झालेली अधोगती यानंतरच्या काळात तंत्रज्ञानाचा ‘न-भूतो, न-भविष्यती’ असा विकास झाल्यानंतर देखील त्याच तंत्रज्ञानाच्या आधाराने अंधश्रद्धांचा व्यापार जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. अंधश्रद्धेची व्यापार केंद्रे ही केवळ अंधश्रद्धांची व्यापार केंद्रे नाहीत तर अमेरिकेसारख्या साम्राज्यवादाच्या मेरूमणी असलेल्या जागतिक सत्तेचा भाग आहे. या अंधश्रद्धेच्या म्यानेच भारताची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी करता आलेली आहे. अंधश्रद्धेच्या मद्यानेच इस्राईल नावाच धर्माधिष्टित राष्ट्र जन्माला घालता आले आहे. याचा विचार अंधश्रद्धेच्या विचारविश्वामध्ये होतच नाही. अंधश्रद्धा हे जागतिक भांडवलशाही टिकवण्याचे सर्वांत मोठे साधन आहे. हे केवळ भूत-भानामती आणि जादूटोण्यापुरते मर्यादित नाही. सत्यसाईबाबा मेल्यानंतर सचिन तेंडुलकरला रडताना टी.व्ही. वर लोक जेव्हा बघतात तेव्हा त्यातून काय संदेश जातो? लोकांनी काय संदेश घ्यायचा ? सत्यसाईबाबासाठी रडणारा सचिन तेंडुलकर तेवढ्याच सहजतेने कोका-कोलाची जाहिरात करत असतो. या दोन्हीमध्ये काही परस्परसंबंध आहे काय ? आणि या संदर्भात अंधश्रद्धेची भूमिका काय ? असा प्रश्न आपण विचारणार आहोत की नाही ?