तिमिरातून तेजाकडे : समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल २०१० ला प्रकाशित झाली. त्यातील एका प्रकरणात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय डॉ. दाभोलकरांनी सविस्तर मांडला आहे. हा विषय डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढेच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकाण्डे निरर्थक आहेत, वेळ-पैसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही. स्त्रियांचे प्रबोधन हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातील मोठा हिस्सा होता.
माणसाला आपली बुद्धी गहाण ठेवायला उद्युक्त करणे हा अंधश्रद्धेचा खरा धोका आहे. त्यातून शोषण करणाऱ्यांना रान मोकळे सापडते. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर स्वतःची बुद्धी वापरणे हा जणु गुन्हाच मानला जात असल्याने त्यांचे शोषण फारच सुलभ असते. परंपरागत धार्मिक – सांस्कृतिक संस्कारातून, व्रतेवैकल्य आणि कर्मकाण्डे मोठ्या कसोशीने पाळणे म्हणजे आपली महान संस्कृती जपणे हे जसे केवळ स्त्रियांचेच कर्तव्य मानले जाते तसेच त्यामागच्या भाकडकथा खया मानून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हेही स्त्रियांचे कर्तव्यच आहे असे स्त्रियाही मानतात. कुटुंब, समाज, धर्म या सर्वच बाबतींत स्त्रीला दुय्यम स्थान असते. कुठल्याही बाबतीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला नसते. लग्न होणे आणि मुलगा जन्माला घालणे हे तर स्त्रीसाठी सर्वस्व असते. म्हणूनच स्त्री ही कुमारी असते, प्रौढ कुमारिका, सौभाग्यकांक्षिणी आणि सौभाग्यवती असते. तशी नसेल तर ती घटस्फोटिता, परित्यक्ता किंवा विधवा अशी कोणीतरी असते. म्हणजे पुरुषाच्या संदर्भाव्यतिरिक्त तिचे अस्तित्वच असू शकत नाही. लग्न करणे स्त्रीला अनिवार्य असते.
पुरुष मात्र लग्न करतो ते बऱ्याचदा त्याच्या आईवडिलांच्या आग्रहासाठी, हट्टासाठी, घराण्याला वारस हवा म्हणून किंवा खानदानाच्या इभ्रतीसाठी. स्वतःसाठी नाही असे दाखविण्याचा प्रघात काही वर्षापूर्वी मध्यमवर्गीय पांढरपेशां ध्येही होता. साहजिक आहे. मला लग्नच करायचे नव्हते तरी मी तुला पत्करले, आणि तुझ्यावर उपकार केले असे बायकोला दाखवता येते. विवाहबाह्यसंबंधाचे धोके त्याला सहन करायचे नसतात. असा उपकार म्हणून लग्न करणारा नवरा आणि दुसऱ्यांच्या मुलीला आपले मानण्याइतके मोठे मन नसलेले, सुनेवर सत्ता गाजवणारे सासू-सासरे अशा कौटुंबिक वातावरणात स्त्रीची फार घुसमट होत असते. त्यामध्ये मूल न होणे किंवा मुलीच होणे हा जर गुन्हा’ तिच्या हातून घडत असेल तर तिच्या दुर्दैवाला पारावार नसतो.
स्त्रीच्या आहाराबाबत व आरोग्याबाबत तर बोलायलालाच नको. नवरा व इतर कुटुंबीयांचे जेवण झाल्याखेरीज स्त्रीला जेवण्याचा अधिकारच नसतो आणि स्त्रियाही हा धर्म मोठ्या कसोशीने पाळतात. तिच्या आरोग्याबाबत तर अगदी लहानपणापासून स्त्रीजातीने सगळे सहन करायला शिकले पाहिजे, लहान सहान दुखण्यांसाठी कुरकुर करू नये अशी शिकवण आईच देते. सासरी तर सुनेचे आजारपण म्हणजे काम टाळणे असेच समजण्यात येते. खेड्यापाड्यांतील स्त्रियांचे जीवनही थोड्याफार फरकाने असेच असते. स्त्रियांच्या अशा अवहेलनेला सर्वच धर्म जबाबदार आहेत. ख्रिश्चन धर्मानुसार ऍडम या पुरुषाच्या बरगडीतून देवाने स्त्री जन्माला घातली. कशासाठी? ऍडमच्या करमणुकीसाठी; आणि या ईव्ह नामक स्त्रीने काय उद्योग केला तर ‘ज्ञानाचे’ फळ पुरुषाला चाखायला लावले. ह्या ‘प्रथम’ पापाचे फळ साऱ्या मानवजातीला युगानुयुगे भोगावे लागत आहे. इतर धर्मांना स्त्रीच्या जन्माची अशी अफलातून कल्पना सुचली नाही पण स्त्रीचे गौणत्व आणि पुरुषाचा तिच्यावरील अधिकार मात्र सर्व धर्मांनी ठासून प्रतिपादन केलेला आहे. ज्यू धर्माने पत्नीच्या हातून भाकरी करपली तर तिला सोडचिठ्ठी पतीने द्यावी अशी सोय करून दिलेली आहे. मुस्लिम धार्माने सामान्य पुरुषास चार बायका करण्याचा, बायकोला तोंडी तलाक देण्याचा आणि हैद्राबादच्या निझामासारख्यांना जनाना बाळगून शेकडो स्त्रियांना कोंडवाड्यात ठेवण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर दोष स्त्रीचाच समजून तिलाच शिक्षा फर्मावली जाते. उत्तरप्रदेशातील एका मुस्लिम सासऱ्याने आपल्या सुनेवर बलात्कार केला म्हणून तिने तक्रार केली तर तिथल्या मौलवीने न्याय दिला : ‘सुनेने सासऱ्याशी निका लावावा!’ (मौलवी सासऱ्याचा मित्र असावा.) दिगंबर जैनां ध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार नाही. गौतम बुद्धांना स्त्रियांना प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या चिरकाल धर्माचे आयुष्य खाडकन ५०० वर्षांवर आल्याचे जाणवले. हिंदुधर्मीय आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये गार्गी-मैत्रेयींसारख्या ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. प्रत्यक्षात स्त्रियांना धर्माने ज्ञानापासून प्रातन काळापासून वंचित ठेवले आहे. वेदाध्ययनाचा अधिकार त्यांना नाही. आणि तुलनेत अलिकडचा म्हणता येईल अशा काळात तुलसीदासांनी स्त्रियांना पशू आणि ढोल यांच्याबरोबर ‘ताडनके अधिकारी’ म्हटले आहे. आपल्या रामदासांनीसुद्धा दासबोधामध्ये स्त्रियांना नाना दूषणे लावली आहेत. आजही आपल्या पत्नीचा सल्ला घेणाऱ्या, किंवा तिची विचारपूस करणाऱ्या पुरुषाला बायकोचा गुलाम म्हटले जाते. स्त्रीला गौण मानणाऱ्या या धार्मिक वृत्तीच्या पगड्यामुळे स्त्रिया सारासार विचारही करू शकत नाहीत. एकीकडे अहेवपणी मरण यावे म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या नवऱ्याआधी आपण मरावे म्हणून मंगळागौर पूजायची व दुसरीकडे हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून वडाची पूजा करायची. नवऱ्याच्या आधी मरण पावणाऱ्या स्त्रीचा पुढचा जन्म नवऱ्याच्या आधीच होणार ; मग नंतर जन्माला आल्याने वयाने लहान असलेल्या पुरुषाशी लग्न कसे होईल हा विरोधाभाससुद्धा आमच्या स्त्रियांना जाणवत नाही. इतके त्यांना धार्मिक व्रतवैकल्यांनी निर्बुद्ध करून टाकले आहे. स्त्रियांचे आजचे सामाजिक वास्तवही यापेक्षा काही वेगळे नाही. अनेक क्षेत्रांध्ये स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत असल्या तरी आपल्या देशात ही शिक्षणाची आणि त्याद्वारे प्रगती करण्याची संधी पांढरपेशा आणि त्यातही श्रीमंत असलेल्या वर्गापुरतीच मर्यादित आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असलेल्या स्त्रीचा नवरा सरपंचाच्या खुर्चीवर बसतो आणि त्याची सरपंच असलेली बायको त्याच्या पायाजवळ बसते हे दृश्य अजूनही पहायला मिळेल. दारू पिण्यासाठी स्त्रीची कमाई तिच्याकडून हिसकून घ्यायचा तर पुरुषांना जन्मसिद्ध हक्कच मिळालेला असतो. सुशिक्षित स्त्रियाही आपला पगार नवऱ्याच्या अगर त्याच्या आईच्या हातात देतात आणि त्याचा विनियोग करण्याचा हक्क सोडून देतात. स्त्रिया म्हणजे केवळ भोगवस्तू आहे असे तर कित्येक पुरुष मानतात. मग ती स्त्री स्वतःची बायको असो वा इतर कोणाची; अल्पवयीन मुलगी, दोनतीन वर्षांच्या मुली आणि प्रौढ स्त्री ह्यांवरसुद्धा बलात्कार करणे, सामूहिक बलात्कार करणे यांत काही अपराध आहे असे वाटतच नाही कित्येकांना. यातून स्त्रियांचे समाजात वावरणेच अशक्य होऊ लागले आहे.
स्त्रीने शिकावे की नाही; किती आणि काय शिकावे; कोणते कपडे घालावेत ; कोणत्या जागी जावे हे सगळे पुरषांच्या संतीनेच व्हायला हवे का? हेच पुरुष बारमध्ये मात्र मोठ्या चवीने जात असतात. हे वास्तव असताना आपण मात्र आमच्या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षा, लोकसभेच्या स्पीकर, राष्ट्राध्यक्ष इत्यादी स्त्रियाच आहेत असा गार्गी- मैत्रेयींचा वारसा सांगत आपली पाठ थोपटून घेत असतो. काही राजकीय पक्षां ध्ये आजकाल स्त्रिया टीव्ही चॅनलवर आपल्या पक्षाच्या स्पोक्सपर्सन म्हणून पक्षाची बाजू हिरीरीने मांडताना दिसतात. पण लोकसभे ध्ये जनतेच्या प्रतिनिधी म्हणून जाण्याचे भाग्य फारच निवडक बिरादरीतील स्त्रियांना मिळते. एखादी आदिवासी, भटक्या विमुक्त जमातीची स्त्री कधी निवडणूक लढवू शकत नाही. लोकसभे ध्ये स्त्रियांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे आणि स्त्रियांना आरक्षण देण्याबाबत पुरुषप्रधान राजकीय पक्ष कसा अडथळा निर्माण करतात हे गेली कित्येक वर्षे आपण पहात आहोत.
तर असा आहे स्त्रीच्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शिक्षण-आहार-आरोग्य इत्यादी घटकांनी आणि प्रामुख्याने धर्माने घडवलेल्या आयुष्याचा भौतिक पाया. स्त्रियांच्या धार्मिकतेला आणि स्वतःचे सामाजिक आर्थिक गौण स्थान स्वीकारण्याला रोज घालण्यात येणारा मालिकांचा रतीब, जाहिरातींचा धुडगूस आणि आध्यात्मिक प्रवचनांचा वर्षाव खतपाणी घालीत आहेत. स्वतःच्या कुटुंबाच्या सर्व चालीरीती, कर्मकाण्ड त्यासाठी तारेवरची कसरत करीत व्यवस्थित पार पाडणे, इतरही प्रांतांतील राखीबंधन, करवाचौथ यांसारख्या प्रथांना नवऱ्याच्या किंवा भाऊबहिणीच्या प्रेची प्रतीके मानून तीही पार पाडणे हे आपले कर्तव्य स्त्रिया मोठ्या निष्ठेने पार पाडीत आहेत. मंगळागौरीसारख्या सामूहिक उत्सव-पूजाांचे प्रस्थ सेलिब्रिटीज वाढवत आहेत, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. दुसरीकडे सिद्धिविनायकाच्या भाकडकथा नाट्यमय पद्धतीने लोकांच्या रहणजे खास करून स्त्रियांच्या गळी उतरवल्या जात आहेत कारण त्याच श्रद्धाळू असतात. आणि त्यासोबतच आत्मा, पुनर्जन्म, भुतेखेते, परग्रहवासी यांच्याही चित्तथरारक गोष्टींच्या मालिका लोकांच्या मनामध्ये भ्रम पैदा करीत आहेत.
अशा साऱ्या वातावरणामध्ये मध्यम वर्गातील अशिक्षित वा सुशिक्षित, अर्थार्जन करणाऱ्या सुद्धा शहरातील स्त्रियांना आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपल्याला मेंदू आणि मनही आहे, आपल्यामध्ये अनेक क्षमता आहेत, कौशल्ये आहेत, त्यांची जोपासना करणे आणि समाजासाठी त्यांचा उपयोग करणे हे आपले कर्तव्य आहे याचे भानच उरत नाही असे वाटते. खेड्यांतील अशिक्षित स्त्रिया अतोनात काबाडकष्ट करून, स्वतःची सर्व प्रकारे आबाळ करून, नवरा दारुडा असला तरीही त्याला काही समज न देता त्याची सेवा करीत राहतात. बाजारू धार्मिकतेच्या, ढोंगी आध्यात्माच्या, दैव-प्राक्तन, संस्कृती जपण्याची जबाबदारी इ. अवास्तव समजुतींच्या बेड्यांनी आपण जखडल्या गेलो आहोत हे त्यांना जाणवतच नाही. आपल्या विपरीत परिस्थितीचे, आपल्या प्राक्तनाचे कारण ह्या बेड्या आहेत हे न समजल्याने, त्या हताश होतात आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. त्यांतून अंगात येणे, भूतबाधा, आणि त्यावर उपाय म्हणून गंडेदोरे, भगत-बाबा-बुवा-माताजी यांना शरण जाणे असले भ्रामक आणि अघोरी उपाय सुरू होतात. हे बाबा-बुवा तांत्रिक-मांत्रिक हेही बाजारू धर्म र्तंडांच्या जातकुळीचेच असतात. स्त्रियांच्या बेड्यांना दर होऊ देणे त्यांच्या हिताचे नसते. भाबड्या लोकांच्या जमिनी, घरे हडपणे, त्यांना कर्जबाजारी करून त्यांच्या काबाडकष्टातून पैसे गोळा करणे आणि एकंदरच शोषणव्यवस्थेला तडा जाऊ न देणे यातच त्यांचे हितसंबंध असतात. निरर्थक कर्मकाण्ड, सण-उत्सव यांचे प्रस्थ वाढवणाऱ्या सेलिब्रिटीज, गरज नसलेली उत्पादने लोकांच्या गळी उतरविणारे जाहिरातबाज आणि अध्यात्माचे रतीब घालणारे धर्म र्तिंड हे सारे बाबा-बुवा, तांत्रिक-मांत्रिक, भगत वगैरेंच्याच शोषणकर्त्या जातकुळीचे असतात. स्त्रियांना (आणि सर्वच वंचितांना) शिक्षण दिले, त्यांना जागृत केले, माणूस म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव करून दिली आणि त्यांच्यात आत्मभान निर्माण झाले तर या लोकांचे भवितव्य धोक्यात येईल. याच भीतीपोटी डॉ. दाभोलकर या शांतताप्रिय, संयमी परंतु विचार-उच्चार-आचार स्वच्छपणे मांडणाऱ्या, निर्भीडपणे लढणाऱ्या संघटकाचा खून करण्यात आला.
पण त्यांच्या सुस्पष्ट विचारांचा, त्यांनी अवलंबिलेल्या नैतिकतेचा, त्यांनी बांधलेल्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांच्या संघटनेचा आणि त्या स्वयंसेवकांना शिकविलेल्या संयमाचा, चिकाटीचा, लोकशाहीचा, वैज्ञानिक दृष्टिकोणाचा पराभव होणे केवळ अशक्य. एक प्रगत, विज्ञाननिष्ठ, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये जपणारा, धर्माची चिकित्सा करणारा, स्त्रीपुरुष समानता आणणारा असा विवेकनिष्ठ आणि मानवतावादी समाज बनवणे हे त्यांचे ध्येय होते. ते साध्य करताना अनेक पिढ्यांना राबावे लागणार आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. हे ध्येय साध्य करायला त्यांनी अनंत सहकारी मिळवले आहेत. ते त्यांचे कार्य पुढे समर्थपणे नेतील याची सर्वांनाच खात्री आहे.