मथुरेच्या जवळचे वृन्दावन म्हणजे विधवांचे क्षेत्र. हतभागिनी, फुटक्या कपाळाच्या मानल्या गेलेल्या ह्या विधवा येथे समाजापासून तोंड लपवून कृष्णाची पूजाअर्चा करीत कसेबसे आयुष्य कंठतात. ह्या वर्षी त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट घडली. त्या चक्क होळी खेळल्या. सण-उत्सवात त्यांना सहभागी होऊ न देणाऱ्या प्रथा-परंपरा धाब्यावर बसवून त्यांनी जल्लोष साजरा केला. त्या गाणी गायल्या, नाचल्या. एकमेकींच्या अंगावर त्यांनी गुलाल आणि फुले उधळली. कुटुंबसंस्थार्फत महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या बळी ठरलेल्या महिलांचे हे पवित्र क्षेत्र तसे दरवर्षीच धुळवडीचा सण साजरा करते, पण अगदी हळू आवाजात. आपापल्या आश्रमांच्या आतमध्येच कृष्णाच्या रासलीलेतील दृश्ये त्या साकार करतात. एकमेकींवर फुले उधळतात, मात्र गुलालाचे एखादेच बोट लावतात. त्या दिवशी मात्र त्या सर्वजणी उन्मुक्त अवस्थेत खुल्या । वातावरणात जमा झाल्या. सुंदर सुंदर नवीन वस्त्रांध्ये त्यांनी परंपरागत होळी गीते व रासक्रीडा ह्यांची मजा लुटली. सोबत रंग अन् फुलांची मनसोक्त उधळण. सुलभ इंटरनॅशनलने आयोजित केलेला हा आनंदसोहळा पाहायला जगभरचे पत्रकार आले होते. सुलभचे प्रमुख बिंदेशर पाठक ह्यांनी सांगितले की हा आशेचा सोहळा आहे. विधवांनाही आशाआकांक्षा असतात. त्या का पूर्ण होऊ नये? त्यांनाही मुख्य प्रवाहाचा भाग बनता आले पाहिजे. वृन्दावनात गेल्या १७ वर्षांपासून राहणाऱ्या बंगालच्या विधवा पुष्पा अधिकारी ह्यांनीही आश्रमाच्या खिडक्यां धून शहराच्या स्त्री-पुरुषांना ह्या रंगोत्सवात सामील होताना पाहून आपल्यालाही तसे करण्याची तीव्र इच्छा होत होती असे नमूद केले आहे.
ह्या महिलांची दुःखे दूर करून त्यांच्या भीक मागण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुलभ इंटरनॅशनलला आदेश दिले होते. त्यानंतर ह्या महिलांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यास सुरुवात झाली होती. नंतर ते दोन हजारापर्यंत वाढविण्यात आले. ह्याशिवाय वैद्यकीय सुविधा, लिहिण्यावाचण्याचे शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी मदत हेही त्यांना देण्यात येत आहे. परंतु हे कार्य फारच मोठे आहे. सुलभ ची मदत वृन्दावनमधील पाच सरकार आश्रमांत राहणाऱ्या फक्त ७०० विधवांपर्यंत पोहोचते. वृन्दावन शहरात एकूण विधवा किती ह्याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी, बहुतेक विधवा खाजगी खोल्यांध्ये, त्या इतरांबरोबर शेअर करून दाटीवाटीने राहतात. सन २००९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार, वृन्दावनातील ८९ टक्के महिला निरक्षर आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना मुलेबाळे व नातेवाईक आहेत, जे त्यांना ठेवून घेण्यास तयार नाहीत. सत्तर टक्के महिलांना निवृत्तिवेतन मिळत नाही. साठ टक्क्यांना तर जगण्याचा कोणतेच साधन नाही आणि त्यांना भजने गाऊन भीक मागण्याशिवाय तरणोपायही नाही. महिला आश्रमात साजऱ्या झालेल्या होळीकडे पाहून मात्र हा बदल दृष्टिपथात आल्याचे जाणवत होते. कारण तो निराधार विधवांसाठीच होता. दरमहा दोन हजार रुपये मिळणाऱ्या महिला दुरून फक्त ते बघत होत्या. त्यांच्यापैकी अनेकांना आजार आहेत ज्यासाठी त्यांना उपचार मिळत नाहीत. कलकत्त्याहून आलेल्या जावित्री तोर ह्यांचा पाय जायबंदी झाला आहे, परंतु आश्रमाकडे पैसे नाहीत औषधपाणी करायला. लख्खी पात्रा ह्यादेखील बंगालच्याच. त्या सांगतात की डॉक्टरने दिलेल्या डायबेटिसच्या औषधाचा काहीच परिणाम झाला नाही. आता त्यांना कलकत्त्याहून औषध मागवावे लागेल. काहीही असो, होळीचा दिवस विशेष होता, हे मात्र सगळ्यांनी मान्य केले. लाल बहादुर शास्त्री कलकत्त्याला आले होते, तेव्हा रस्ते असे काही फुलांनी शृंगारले होते…..त्यानंतर मी इतकी फुले आजच पाहते आहे….. चाकाच्या खुर्चीवर बसलेल्या एका महिलेने सांगितले.