धनंजय मुळी, बी-१, विशभारती सोसायटी, प्लॉट नं.आर.एम.-३७, संभाजीनगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९.
किशोर देशपांडे यांची एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत आसु मध्ये प्रकाशित झालेली अनवरत भंडळ ही मालिका वाचली. ती वाचल्यानंतर तिच्यात जीवशास्त्रीय उत्क्रांतीबद्दल अनेक चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने आढळून आली. तसेच त्यांच्या लेखां ध्ये विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप पुरेशा स्पष्टतेने पुढे आलेले नाही. या दोन मुद्द्यांच्या दृष्टीने देशपांडे यांच्या लिखाणाचा प्रतिवाद करणे आवश्यक वाटले. देशपांडे यांच्या लेखमालेध्ये ते अनेक विषयांना स्पर्श करतात. प्रस्तुत लेखनात मात्र विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप, जडवाद आणि अध्यात्मवाद यांतील फरक, आणि उत्क्रांती या संदर्भातील मांडणी एवढीच चर्चा केली आहे.
(१)विज्ञान हे सत्य सांगते असा एक सार्वत्रिक समज आहे. तसे असेल तर कालचे वैज्ञानिक ज्ञान आज खोटे का पडते? ती गोष्ट समजून घेण्यासाठी नवीन नवीन सिद्धान्त का लागतात ? प्रत्यक्षात विज्ञान कुठलेही अंतिम ज्ञान सांगण्याचा दावा करत नाही. वैज्ञानिक ज्ञानाचे स्वरूप आज ज्ञात असलेले, सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे स्पष्टीकरण, (closest approximation to truth) असे असते.
त्यामुळेच कालपर्यंत ग्राह्य मानली गेलेली वैज्ञानिक विधाने आज खोटी पडू शकतात. कारण वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे स्पष्टीकरण (अथवा सिद्धान्त) मिळालेले असते. वेगवेगळ्या निरीक्षणांध्ये काही संबंध आहे का आणि असल्यास तो काय आहे हा विचार वैज्ञानिक ज्ञानाचा पाया आहे. हा संबंध शोधण्यासाठी विज्ञान एका विचारसरणीचा किंवा कार्यपद्धतीचा अवलंब करते. त्या पद्धतीलाच आपण वैज्ञानिक पद्धती किंवा वैज्ञानिक विचारसरणी (scientific method or scientific temperament) असे म्हणतो. मुख्य मुद्द्यांच्या रूपात त्या पद्धतीच्या पायऱ्या खालीलप्रमाण १. निरीक्षण करणे, २. निरीक्षणांतून सार्वत्रिक गोष्टी शोधणे, ३. त्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण देऊ शकणारा सिद्धान्त (hypothesis) मांडणे, ४. या सिद्धान्ताचे खरेखोटेपण ठरवणारा प्रयोग/पुरावा निश्चित करणे आणि प्रयोग करणे (अथवा पुरावा सिद्धान्ताशी मिळताजुळता आहे की नाही हे ठरवणे) आणि ५. त्यातून निष्कर्ष काढणे असे आधुनिक विज्ञानाच्या कार्यप्रणालीचे स्वरूप आहे.
देशपांडे यांच्या विज्ञानविषयक आणि एकूणच मांडणीत आधुनिक विज्ञानाच्या सार्वत्रिकता आणि खोडणीयता या दोन प्रमुख निकषांचा उल्ललेखही आढळत नाही किंवा त्यांची पूर्ण मांडणी या दोन निकषांना दुर्लक्षित करते. सार्वत्रिकता (Generalizability) वैज्ञानिक ज्ञानाची कोणालाही कुठल्याही धर्मश्रद्धांशिवाय, अतींद्रिय (पाच ज्ञानेंद्रिये सोडून) शक्तीशिवाय, मनुष्याच्या उच्चनीचतेच्या कल्पनेशिवाय, स्थलनिरपेक्ष आणि कालनिरपेक्ष पडताळणी घेणे शक्य असायला हवे. तसे नसेल तर मांडलेला सिद्धान्त वैज्ञानिक मानला जात नाही.
मनुष्याच्या ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचे सत्य आहे की नाही माहिती नाही पण ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे असल्यामुळे ते सार्वत्रिकीकरणाच्या कसोटीस उतरत नाही त्यामुळे वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या संदर्भात आध्यात्मिक मार्गाबद्दल बोलण्याची गरज नाही. खोडणीयता (falsifiability) निरीक्षण, एकापेक्षा जास्त निरीक्षणांचा परस्परांशी संबंध जोडणे, निरीक्षण किंवा परस्परसंबंधांचे सार्वत्रिकीकरण, आणि सिद्धान्ताची मांडणी येथपर्यंत जडवाद आणि अध्यात्मवाद सोबत जातात असे ढोबळमानाने म्हणता येते. सिद्धान्ताची पडताळणी ज्ञानेंद्रियाच्या पलीकडील अनुभवातून घ्यायची, की ज्ञानेंद्रियाने अनुभवू शकू अशा स्थल/काल/धर्म/श्रद्धानिरपेक्ष प्रयोग पुराव्यां धून, हे दोन वाद वेगळे मार्ग चोखाळतात.
निरीक्षणांचे स्पष्टीकरण देणारा सिद्धान्त मांडायचा असेल तर त्या सिद्धान्तासाठी खोडणीयता हा निकष जडवाद आधारभूत मानणाऱ्या विज्ञानात अनिवार्य मानला गेलेला आहे. म्हणजे एखादा सिद्धान्त कधी खोटा पडेल हे सांगणारा प्रयोग/पुरावा देता आला पाहिजे. जर असे करता येत नसेल तर तो सिद्धान्त आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने निरुपयोगी आहे कारण त्याचे खरेखोटेपणच पडताळून पाहता येत नाही. एखादा सिद्धान्त खोडणीय नसेल तर त्याचे खरेखोटेपण ठरवणे देवाच्या इच्छेइतकेच अवघड आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल (ती घटना घडण्याच्या आधी) सार्वत्रिकपणे देवाची इच्छा काय आहे हे छातीठोकपणे सांगता येत नाही.
म्हणजे देवाच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरचे पानही हलत नाही फक्त ते पान हलल्यावरच कळते की ही देवाची इच्छा आहे. खोडणीयतेचे स्वरूप पाहिले म्हणजे एकाच प्रश्नाचे उत्तर देणारा एक सिद्धान्त खोडला जाऊन दुसरा सिद्धान्त त्याची जागा कशी घेतो हे समजून येते. नव्याने पुरावा सापडला किंवा सिद्धान्त मांडला की पुन्हा सर्व उपलब्ध पुराव्यांची नव्याने तपासणी करणे भाग पडते आणि जुने सिद्धान्त तपासून बघायला लागतात. त्यांतून वैज्ञानिकांत मते मतांतरे निर्माण होतात. हाही विज्ञानाचाच भाग. विज्ञान अंतिम सत्य सांगत नाही याला हा अजून एक पुरावा. स्वाभाविकच प्रश्न उभा राहतो की वैज्ञानिक विचारसरणीच्या आधारे मला अंतिम सत्य कळूच शकणार नाही काय? याचे उत्तर होय, कदाचित अंतिम सत्य (जे ज्ञानेन्द्रियांच्या पलीकडचे आहे) आत्ता कळूही शकणार नाही. पण जर कधी काळी समजलेच तर ते वैज्ञानिक विचारपद्धतीच्या आधारेच समजू शकेल. वैज्ञानिक ज्ञानाद्वारे काय माहिती आहे आणि काय नाही याच्या व्यवस्थित मर्यादा आखता येतात. आध्यात्मिक विचारसरणीत सर्वच सत्य एकाच वेळी अपरिवर्तनीय रूपात माहिती असते पण त्यावरील प्रश्नावर पुन्हा अनुभव, श्रद्धा यांचेच उत्तर मिळते. एका ब्लॉगवर वाचले होते त्याप्रमाणे ज्ञानप्राप्तीसाठी आधुनिक विज्ञानाची वाट सोडून अध्यात्मविचाराला अंतिम सत्य गृहीत धरणे म्हणजे एक हजाराची दहा कर्जे माफ होऊन एक लाखाचे एकच कर्ज मान्य करण्यासारखे आहे. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक मार्गातून प्राप्त झालेल्या ज्ञानाकडे अजून एका प्रकारे बघता येते. आध्यात्मिक विचारसरणी किमान काही हजार वर्षांपासून ज्ञात आहे आणि वैज्ञानिक विचारसरणी मात्र गेल्या काही शतकांध्येच (इ.स.१५००) बहरून आली. या दोन्ही मार्गातून मिळालेल्या वस्तुनिष्ठ ज्ञानाकडे नजर टाकली तरी वैज्ञानिक पद्धतीच्या मार्गाने प्राप्त झालेले वस्तुनिष्ठ ज्ञान आध्यात्मिक पद्धतीने प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. आणि आजच्या सर्व वस्तुनिष्ठ ज्ञानाची प्राप्ती ही प्राप्त ज्ञानाबद्दल शंकेखोर राहून आणि प्रश्न विचारूनच झाली आहे. ‘मी सांगतो तेच ज्ञान’ असे सांगण्यापेक्षा मला निरीक्षणातून असे दिसते आणि त्यावरून असा असा निष्कर्ष काढता येतो. यांपैकी दुसरी मांडणी हीच मानवाला ज्ञानप्राप्तीकडे नेणारी ठरली आहे. विज्ञान आजच्या घडीला सर्व घटना समजावून सांगायला कमी पडते हे तर खरेच. पण ज्या घटनेची कारणमीमांसा आज करता येत नाही ती जिच्यामुळे जेव्हा केव्हा करता येईल (किंवा करता येणार नाही हे कळेल) ती पद्धती मात्र नक्की माहिती आहे.
पण मग या आधीचे आणि सध्याचे योगी पुरुष, संत, सत्पुरुष, प्रेषित, तारणहार या लोकांच्या अनुभवाचे काय ? हे लोक खोटे बोलत होते की त्यांना आलेले/येणारे अनुभव खरे नाहीत? ह्या प्रश्नाचे उत्तर असे की या लोकांचे अनुभव खोटे होते असे मानण्याचे मुळीच कारण नाही. या अनुभवांकडे दोन प्रकारे बघता येईल. अ) असे अनुभव व्यक्तिगणिक बदलतात त्यामुळे त्याला वस्तुनिष्ठ सत्य मानण्याची गरज नाही. असे अनुभव कुठल्या व्यक्तीस कुठल्या माध्यमाद्वारे येतील याबद्दल काहीही ठोस विधान करता येत नाही. कोणास जनसेवेमध्ये आध्यात्मिक अनुभव येत असेल तर कोणास ध्यानधारणेत; तर अजून कोणास गाण्याच्या साधनेतून तर आणखी कोणाला दुष्काळात उन्मत्तपणे पाण्याची नासाडी करणारी धुळवड साजरी करून. त्यामुळे आध्यात्मिक साधनेचा अनुभव ज्याला घ्यायचा असेल त्याने जरूर घ्यावा. त्या अनुभवावर संवादही साधावा पण तो अनुभव वैयक्तिक श्रद्धा/अनुभव आहे, वस्तुनिष्ठ सत्य नाही याचे भान असू द्यावे. व्यक्ती म्हणवून प्रत्येकाला अश्या श्रद्धा किंवा वैयक्तिक अनुभव असतातच, पण ते सार्वत्रिकीकरणाच्या आणि खोडणीयतेच्या निकषांवर उतरत नाहीत. किंबहुना, वैयक्तिक अनुभवांना ज्यावेळी आपण वैशिक सत्य म्हणून पाहत नाही. त्यावेळी त्या अनुभवाचे किंवा विचाराचे सौंदर्य आणि त्यांचे एकमेवाद्वितीय स्वरूप लक्षात येऊन एकूण आस्वाद घेणे किंवा समजून घेणे अधिक सुंदर आणि आनंददायी होते. ब) आध्यात्मिक अनुभव येतात म्हणजे नेके काय होते ? तर दिव्य दृश्ये दिसतात, असीम शांततेचा आणि आनंदाचा अनुभव येतो. वैशिक चैतन्याचा साक्षात्कार होता (म्हणजे काय होते याचे अजून विश्लेषण लागेल). इ. अशा अनुभवांचेसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोणातून विश्लेषण शक्य आहे. ते करण्यासाठी मेंदूविज्ञान किंवा मानसशास्त्र ह्यांकडे जावे लागले.
वैज्ञानिक विचारसरणीचा विचार येथेच थांबवून उत्क्रांती आणि जीवनसृष्टीची उत्पत्ती याबद्दल देशपांडे यांच्या मांडणीबद्दल आक्षेप नोंदतो. केवळ योगायोगातून (random घटनांच्या आधारे) जीवसृष्टीचा पसारा आणि जीवसृष्टीतील व्यामिश्र रचना कशी उत्पन्न होऊ शकतात हे विस्मयकारक आणि आश्चर्यकारक आहेच. या आश्चर्यात अनेक प्रश्न अंतर्भूत आहेत. निर्जीव रचनेतून (structure) जैविक क्रिया (functionality) कशा उत्पन्न होऊ शकतात याबद्दल मिलिंद वाटवेंचा ‘आत्मा हवा का?’ हा लेख आसु च्याच ‘आधुनिक विज्ञानाचे स्वरूप’ या विशेषांकात प्रकाशित झालेला आहे. तोही लेख जिज्ञासूंना अधिक माहिती देईल.
जीवसृष्टीचे वैविध्य आणि नवी प्रजातीची उत्पत्ती यांबद्दल डार्विनचा सिद्धान्त उत्कृष्ट खोडणीय स्पष्टीकरण देतो. एखादा भूस्तर कधी तयार झाला असेल हे रेडिओअॅक्टिव डेटिंग या तंत्रज्ञानाच्या आधारे शोधता येते. आत्ता ज्ञात असलेले सस्तन प्राणी, पक्षी इ. कॅम्ब्रियन कालानंतर (आजपासून ५५० दशलक्ष वर्षांपूर्वी) उत्क्रान्त झाले असे प्राप्त पुराव्यांच्या आधारे म्हणता येते. त्यामुळे उत्क्रांतीच्या संदर्भात जेबीएस हाल्डेन या प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञाने असे म्हटले आहे की कॅम्ब्रियनपूर्व भूस्तरामध्ये सशाचे जीवाश्म आढळून आले तर तो पुरावा उत्क्रांतिवाद खोटा ठरवेल.
जीवशास्त्रीय उत्क्रांतीसाठी अशा अनेक खोडणीय चाचण्याच उपलब्ध आहेत. त्यातील सर्व चाचण्यांवर उत्क्रांतिवाद खरा उतरतो म्हणून त्याचा एवढा बोलबाला आहे. एक जरी चाचणी खोटी पडली तरी उत्क्रांतिवादाच्या विरोधकापेक्षा डार्विनवाद्यांना जास्त आनंद होईल. कारण आजवर अज्ञात असलेल्या वस्तुस्थितीच्या नवीन दिशा त्याक्षणी उजळलेल्या असतील.
डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाची चर्चा करताना किंवा त्याबद्दल लिहिताना/वाचताना एक काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्राणिजातीतील नर आपली territory सांभाळण्यासाठी किंवा mate मिळवण्यासाठी आक्रमक वागतात असे जेव्हा एखादा लेखक उत्क्रांतिसंदर्भात लिहितो त्यावेळी त्याचा खरा अर्थ “”territory सांभाळताना किंवा mate मिळवताना ज्या नराजवळ आक्रमकपणा हा गुण असतो त्या नरांची प्रजा वाढीस लागते आणि त्यामुळे हे आक्रमक वर्तन नैसर्गिकरीत्या निवडले जाते” असा असतो. परंतु असे दीर्घरूपात लिहिणे हे लिखाणाची लांबी वाढवणारे तसेच कंटाळवाणे होत जाते. ह्या कारणाने बहुतेक लिखाणात प्रत्यक्ष विधान आणि त्याचा खरा अर्थ यांचा उल्लेख केलेला असतो. उत्क्रांती आणि नैसर्गिक निवडीबद्दल वाचताना मात्र वाचकाने याचे भान कायम ठेवणे आवश्यक आहे.
देशपांडे यांच्या लेखातील एक प्रतीकात्मक वाक्य निलवडतो त्यातून देशपांडे यांच्या उत्क्रांतीवरील लिखाणावरील सर्वसाधारण आक्षेप लक्षात येतील. देशपांडे. ‘मुंगीसारख्या क्षुद्र सजीवां ध्येही कल्पक बुद्धी आढळून येते.’ असे म्हणतात. उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड टिकून राहण्यासंदर्भातील (survival) अनुरूप गुणसंचाविषयी बोलतात. प्रजाती-प्रजातीमध्ये कनिष्ठ किंवा वरिष्ठ, प्रगत किंवा अप्रगत असा भेद उत्क्रांती करत नाही. जेवढी बॅक्टेरियाची एखादी प्रजाती जगण्याला लायक तेवढीच मनुष्य किंवा मेंढी किंवा इतर कुठला प्रजातीही जगण्याला लायक. या प्रत्येक प्रजातीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. जी इतर जीवजातींमध्ये आढळत नाहीत. प्रत्येक प्रजातीचे राहण्याचे ठिकाण, भक्ष्य, शिकारीची/भक्षणाची वेळ, त्या प्रजातीस लागणारे तापमान इ. अनेक गोष्टी असतात. ज्याचा एकत्रित गुणसंचय प्रत्येक प्रजातीस एकमेव असतो. अशा गुणसंजयास किंलवा वैशिष्ट्यांस त्या प्रजातीचा niche असे म्हणतात. प्रत्येक प्रजातीचा पळलहश वेगळा असल्यामुळे प्रजाती-प्रजातीमधील श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणे अयोग्य आहे. वरील विधानात देशपांडे यांना क्षुद्र याचा अर्थ आकाराने लहान असे म्हणायचे असेल किंवा वरील विधान संदर्भाशिवाय आहे असे वाटत असेल तर अशी अनेक विधाने देशपांडे उत्क्रांतिसंदर्भात करताना दिसून येतात. वरील विधान फक्त उदाहरण म्हणून घेतले आहे.
याच विधानातील उत्तरार्धात ते मुंगीमध्ये कल्पक बुद्धी आढळते असे म्हणतात. हेही विधान जीवशास्त्राच्या चौकटीचा विचार करता अयोग्य आहे. कारण मुंगी विचार करून कल्पक वागते की अंगभूत रसायनांधून तिचे वागणे येते की अजून कशामुळे हा कळीचा मुद्दा आहे. प्राण्यांच्या वर्तनाबद्दलचा अभ्यास Ethology ह्या ज्ञानशाखेत मोडतो. त्यात प्राण्यांच्या वर्तनाबद्दल अनेक विस्मयकारक प्रयोग केले गेले आहेत. वर्तणूक (behaviour) खालील तीन प्रकारांत वर्गीकरण येते. १. Inate (उदा. चटका लागल्यावर हात मागे घेणे) २. Learned (उदा. कुठले अन्न खावे आणि कुठले खाऊ नये (आणि हे गोरिलाचे बाळ आईवडिलांचे वागणे बघून शिकते.) ३. Cognitive (उदा. मनुष्यासारखे ‘विचार’ करून वागणे).
मुंगीचे ‘कल्पक बुद्धीचे’ वागणे यांतील कुठल्या प्रकारचे आहे हे तपासण्यासाठी प्रयोग करून बघता येऊ शकतात आणि तसे केले गेले आहेत. इ.ओ. विल्सन यांनी अनेक संशोधनांच्या द्वारे मुंगीचे वागणे हे मोजक्याच रसायनांद्वारे नियंत्रित होते हे दाखवून दिले आहे. प्राण्यांच्या वागण्याला मानवी मूल्ये प्रदान करून त्या वागण्याचा विाचर करणे हेही अयोग्य आहे. उदा. देशपांडे यांचे विधान ‘सर्व प्राण्यांची मूळ वृत्ती आनंदस्वरूपच आहे’ असे आहे. इथे आनंदी असणे हा मानवी गुण सर्व जीवांना चिटकवला आहे. असा गुण चिटकवल्यास त्याची खोडणीय सिद्धान्त मांडून चिकित्सा अवघड होऊन बसते.