आवाहन

स्नेह.

कोरोनाच्या नव्या लाटेत शाळा-कॉलेजेस बंद होऊ नयेत यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न झाले आणि त्यांना अपेक्षित यशही मिळाले.खरेतर, असे प्रयत्न करणाऱ्यांचेदेखील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेविषयी फार अनुकूल मत असेलच असे नाही. पण पर्यायी व्यवस्थेच्या अभावी’आहे ते किमान सुरू तरी असावे’ एवढा विचार त्यामागे नक्कीच असणार.

शिक्षणव्यवस्थेतील बदलांविषयी बोलताना अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रम, मूल्यांकन यांवरच बोलले जाते. यासाठीच शाळेसारख्या रचना तयार झाल्या. शिक्षणविभाग आला. अभ्यासक्रम समिती तयार झाली. अभ्यासक्रमानुसार पुस्तकं आली. शाळेत मूल्यांकन आले. त्यासाठी परीक्षेसारखे माध्यम आले. शिकण्यासाठी आर्थिक मदत हवी तर वित्तीय संस्थांकडे जाणे आले. त्यासाठी कागदपत्रांची गरज भासू लागली. ही घट्ट भिनलेली/मुरत चाललेली रचना आपण तोडू शकत नाही कारण आपण काही मूलगामी विचार करायलाच घाबरतो आहोत.

Photo by Hans-Peter Gauster on Unsplash

मूलगामी बदल कोणते? तर शिक्षक-विद्यार्थी प्रमाण. शाळेमध्ये हे प्रमाण एका शिक्षकामागे ३० पासून ६०-७० पर्यंत जाते तर आत्ताच्या शिकवणी वर्गांमध्ये ते १००च्याही वर गेलेलं दिसतं. हे प्रमाण बदलायला हवे हा विचार का होऊ नये? औपचारिक शाळेची रचनाच नको असा विचार का होऊ नये? शालेय तासांची बांधिलकी आणि विषयांचे वर्गीकरण आपण का तोडू शकत नाही? पूर्वीची रचना मोडून टाकून नवे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न व्यापक प्रमाणावर का होऊ नयेत? इतके सगळे प्रश्न आहेत.

अनेक ठिकाणी, अनेक लोकांनी याविषयीचे अनेक नवे प्रयोग हाती घेतले आहेत. त्यांनी आपल्या प्रयोगाचे स्वरूप सामायिक केले,शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या डोक्यातील नव्या कल्पना समोर आल्या तर अनेकांना त्यातून प्रेरणा मिळू शकते. त्यासाठी ‘आजचा सुधारक’चे व्यासपीठ खुले आहे.

आगामी एप्रिल अंकासाठी हा एक मोठा विषय आहे. याशिवाय अनेक विषय आहेत. घराच्या चार भिंतींबाहेर पडलो तर संवेदनशील मनांना प्रत्येक स्तरावर सामाजिक समस्या जाणवतातच. त्यांचे निराकरण हे एकेकट्याचे काम नाहीच मुळी. आजच्या सामाजिकतेमधील नकोश्या गोष्टी बदलायच्या तर नवे पर्याय समोर यायलाच हवेत. ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल अंकात अशा कुठल्याही विषयाचे स्वागत असेल जो काही नवे विचार घेऊन पुढे येईल, नवे विवाद समोर आणेल. चांगले लिहिणाऱ्याला चांगल्या टीकाकारची गरज असते, तसेच विरोध चांगल्या विचारांना अधिक धारदार करतो.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २० मार्चपर्यंत aajacha.sudharak@gmail.comयावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

– प्राजक्ता अतुल
समन्वयक, आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.