लढाई ही जशी माणसा-माणसातील असते तशीच ती माणूस आणि प्राणी अशीही असते. तरबेज लेखक अशी गोष्ट सांगता सांगता ‘माणूस’ समजावून सांगतो. ‘मला ईशमाइल म्हणा’ या तीन शब्दांनी सुरू होणारी मॉबी डिक ही अशीच एक गाजलेली आणि गाजणारी जुनी (१८५१) इंग्लिश कादंबरी. लेखक: हरमन मेलव्हिल.
एका व्हेल-मारी जहाजावर, ‘पेक्वोड’वर, घडणारी ही गोष्ट. अहाब हा तिचा कप्तान. एका पायाने लंगडा. त्याचा तो पाय मॉबी डिक नावाच्या व्हेलनेच तोडला आहे. हा मॉबी डिक खुनशी, पिसळलेला आणि डूख धरणारा म्हणून साऱ्या दर्यावर्दींना माहीत आहे. या असल्या मॉबी डिकचा सूड घेण्याच्या इराद्याने अहाब उभा पेटला आहे. अथांग महासागरात असा प्रयत्न मूर्खपणाचा आहे असं त्याचा बोटीवरचा सेकंड मेट, ‘स्टारबक्स’ त्याला सांगू पहातो. पण बदला घेण्यासाठी अहाब आता विवेक गमावून बसला आहे. वाट्टेल ते झालं तरी मॉबी डिकला ठार मारण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. व्हेलची शिकार, व्हेलचे तेल काढून बक्कळ पैसा मिळवणे अशी स्वप्ने उराशी घेऊन, कुटुंबियांची तीन वर्षासाठी रजा घेऊन, इतर खलाशी निघाले होते; पण सारेच अहाबच्या महत्त्वाकांक्षेपुढे झाकोळून गेले आहेत. अनेक संकटांचा सामना करत त्यांचा हा प्रवास सुरू आहे.
समुद्रातला प्रवास, साऱ्या जगापासून तुटलेलं ते चिमुकलं विश्वच जणू. व्हेल-मारी जहाजे, त्यांच्यावरील वातावरण, व्यवहार, निरनिराळ्या देशातून जमलेले खलाशी, त्यांची भिन्न भिन्न विश्वे आणि विचारविश्वे यांचं सविस्तर वर्णन इथे येतं. ईशमाइलचा मित्र, आदिवासी जमातीतील क्वीक्वेग इथे आहे. आपण मरणार असं त्याला वाटतं म्हणून तो त्यांच्या प्रथेनुसार चक्क स्वतःसाठी कॉफिन (शवपेटी) बनवतो.
व्हेल हेरण्याचे, मारण्याचे, बोटीवर चढवण्याचे, सोलण्याचे, पिळण्याचे आणि तेल गाळण्याचे सविस्तर वर्णन पुस्तकात येतं. इतकंच नाही तर व्हेलचे प्रकार, त्यांची शरीररचना, त्यांच्या सवयी, स्वभाव हेही सविस्तर येतं. निव्वळ व्हेलच्या रंगावर, समुद्राच्या ढंगावर लेखक पानेच्यापाने लिहितो. वाचकाला निःशब्द, स्तब्ध आणि अंतर्मुख करणारं असं बरंच काही पुढ्यात येतं. तब्बल १३५ प्रकरणांची, चांगली ऐसपैस कादंबरी आहे ही. पण हे सारं जग आपल्याला पूर्णतः अपरिचित असल्यामुळे आपण वाचनात वहावत जातो.
शेवटी मॉबी डिक सापडतो. तो महाकाय मासा आणि लंगडा अहाब यांची झुंज सुरू होते. व्हेलरूपी निसर्गशक्ती आणि क्षुद्र मानवी सूडभावना यांची ती झुंज! स्वयंभू सामर्थ्य आणि मर्त्य अहाब यांची ती झुंज! सर्वशक्तिमान नियती आणि आंधळ्या महत्त्वाकांक्षेने बहकलेला मानव यांची ती झुंज! तीन दिवस अथकपणे हे युद्ध चालतं. अखेरीस मॉबी डिकच्या हल्ल्यात ‘पेक्वोड’ बुडते, साऱ्या खलाशांना जलसमाधी मिळते, पण त्या शवपेटीत तरंगत तरंगत, ही कहाणी सांगायला, लेखक तेवढा वाचतो!
अनेकार्थता हे या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य. हिचा कथनकार ईशमाइल. ज्यू पुराणानुसार ईशमाइल हा अब्राहमचा अनौरस पुत्र. दासीपुत्र. औरस पुत्र आयसॅकचा जन्म होताच ईशमाईल घरादाराला पारखा होतो. ह्या कथेमुळे अनाथ, बहिष्कृत आणि देशोधडीला लागलेल्यांचे प्रतीक झालेलं ईशमाइल हे नाव निवेदकाने घेतले आहे. कादंबरीतला ईशमाइलही असाच जमिनीपासून, सामान्य जीवनापासून पारखा झालेला. ह्या प्रचंड कादंबरीत त्याच्या मूळ घरदाराचा एकही उल्लेख नाही. निव्वळ हौसेपोटी आणि उत्सुकतेपोटी बोटीवर आलेला आणि अहाबच्या निर्णयाला बांधील झालेला. पुराणातला अहाब हा साऱ्यांना नको त्या गोष्टीच्या भजनी लावणारा, एककल्ली, क्रूर राजा. इथल्या अहाबनेही केवळ मॉबी डिकचा सर्वनाशी अट्टाहास धरलेला. ईशमाइल शवपेटीत तरंगत असलेला सापडतो तो ‘रेचल’ नावाच्या बोटीला. रेचल ही देवता ज्यूंचे पातक पदरात घेणारी, त्यांना माफ करून त्यांच्यावरचा बहिष्कार देवाला परत घ्यायला लावणारी. त्यांची तारक, संजीवक. हे असले संदर्भ लक्षात घेत ही कादंबरी वाचली की अर्थाच्या आणखी किती तरी छटा सामोऱ्या येतात.
गोष्ट म्हणून ही कादंबरी छानच आहे, माहिती म्हणूनही छान आहे; अर्थवाही आहे, बोधप्रद आहे. जन्मतः उपेक्षिली गेलेली ही कादंबरी आज एक श्रेष्ठ अमेरिकन साहित्यकृती मानली जाते. पेक्वोडचा प्रवास सुरू होतो तो बेडफोर्ड, मॅसेच्युसेट्स जवळच्या नानटुकेट बेटावरून. आजही बेडफोर्डच्या व्हेलींग म्युझीयममध्ये ‘मॉबी डिक’चे वार्षिक अखंड पारायण झडते. लोकं हौसेहौसेनं येतात, आळीपाळीनं कादंबरीचं अहोरात्र, जाहीर वाचन करतात, वाचनानंदात बुडून जातात आणि एका साहित्यिकाला अनोखी आदरांजली वहातात.
संतसाहित्य वगळता असला सन्मान आजवर एकाही मराठी साहित्यकृतीला मिळालेला नाही. उत्साही, रसिक वाचक आपापल्या गावात असा उपक्रम सुरू करू शकतात, नाही का? जरा विचार करा, तुम्ही कोणतं पुस्तक निवडाल?
पूस्तकाचा परिचय छान आहे. त्यातून पुस्तक वाचण्याची ईच्छा तयार होते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध असल्यास कळविणे.
थोडक्यात पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.