आज हिंदुधर्म अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. नुकतेच भारताच्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने इसिस (दाएश) आणि बोकोहराम या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केली आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेत हिंदुत्वाच्या उच्चाटनावर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषदही आयोजित केली होती. त्यामध्ये हिंदुधर्म आणि हिंदुत्व वेगळे करता येणार नाहीत या मुद्द्यावर आम-सहमती झाली होती. उलटपक्षी सर्वसामान्य सुशिक्षित हिंदूला त्याच्या धर्मासंबंधी अथवा संस्कृतीसंबंधी जुजबी माहितीही नसते असा वरचेवर अनुभव येतो. आय.आय.टी. कानपूरमध्ये असताना एका एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा मला रावणाचा भाऊ भीमसेन होता असे छातीठोकपणे सांगितले होते. Bibhishan आणि Bhimsen यात अनेक अक्षरे समान असल्याने कॉन्व्हेंट-स्कूलमध्ये शिकणाऱ्याचा असा घोटाळा होणे स्वाभाविक होते. बरे उच्चशिक्षित आपले अज्ञान सहजासहजी कबूल करत नसतात. आय.आय.टी.च्या लायब्ररीमध्ये रामायणाची प्रत नसल्याने एका प्राध्यापकाच्या वृद्ध वडिलांकडून रामचरितमानस मिळवून मला त्याची चूक त्याच्या पदरात टाकावी लागली. त्यामुळे हिंदू कोणाला म्हणावे आणि हिंदुत्वात कोणत्या गुणांचा समावेश होतो किंवा होत नाही हे हिंदूंनाच,विशेषतः सुशिक्षित हिंदूंना, स्पष्टपणे सांगणे गरजेचे झाले आहे.
हिंदू कुणाला म्हणावे याबद्दल अनेक व्याख्या दिल्या जातात. “प्रमाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानां अनेकता उपास्यानां अनियमः एतद्धर्मस्य लक्षणम्।” अशी व्याख्या लोकमान्य टिळकांनी दिली होती. ही व्याख्या असमाधानकारक आहे. कारण आज अनेक हिंदू वेदांना प्रमाण मानत नाहीत. दुसरी व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची. ती अशी आहे: “सिंधू नदीपासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी समजतो तो हिंदू”.हीही व्याख्या अपुरी आहे. अनेक पिढ्या भारताबाहेर राहिल्यामुळे भारत ज्यांची पितृभूमी नाही, पण स्वतःला हिंदुधर्मीय म्हणवून घेणाऱ्या मॉरिशसमधील पूर्वभारतीयांच्या वंशजांचा किंवा हिंदू धर्म आदर्श वाटला म्हणून स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भगिनी निवेदितासारख्यांच्या धर्म कोणता? स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या अभारतीयांना परधर्मात लोटणे बहुदा सावरकरांनाही मान्य झाले नसते. तिसरी व्याख्या भारतीय राज्यघटनेची. भारतीय घटनेनुसार हिंदू कायदा मुसलमान, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू वगळता सर्वांना लागू होतो. म्हणजे भारतीय राज्य-घटनेच्या दृष्टीने या चार धर्माच्या लोकांना सोडून इतर सर्व भारतीय कायद्याच्या दृष्टीने हिंदू होतात. पण सावरकरी व्याख्येचेच दोष याही व्याख्येत आहेत. शिवाय ही नकारात्मक आहे. ती भारताच्या संविधानासाठी पर्याप्त आहे एवढाच तिचा फायदा.
वरील सर्व व्याख्या अपुऱ्या ठरतात याचे एक महत्त्वाचे कारण आमच्या धर्माला हिंदू हे नाव देणाऱ्यांच्या धर्म-कल्पना आमच्या धर्म-विचारापेक्षा भिन्न होत्या. हिंदू हा शब्द आपले भौगोलिक वर्णन करतो, हिंदू-धर्मविचाराचे नाही. यासाठी अन्य धर्मीय येथे येण्यापूर्वी आपण आपल्या धर्माची व्याख्या कशी करत होतो ते पाहावे लागेल. अशी व्याख्या, सुदैवाने महाभारतात सापडते. ती महाभारतातील वनपर्वातील अध्याय ३१२-१३ मध्ये येते.
श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना:।
नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् ।।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महाजनो येन गत: स पंथ:।।
(वेद अनेक आहेत. स्मृती अनेक आहेत. ज्याचे वचन प्रमाण मानावे असा कोणी एकच एक मुनी नाही. धर्माचे तत्त्व गुहेत लपलेले आहे. गुहेत ध्यान-धारणा किंवा चिंतन करून ते तत्त्व स्वतः जाणून घ्यायचे असते. सर्व मोठ्या लोकांनी ते याच मार्गांनी जाणून घेतले आहे.)
ध्यान करण्यासाठी गुहेत जाण्याचीही आवश्यकता नाही. यासंदर्भात गौतम बुद्धाची एक हृद्य आख्यायिका आहे. पतीच्या गृहत्यागानंतर गौतमाची पत्नी यशोधरा, कदाचित्, साधुसंतांची सेवा करण्यात काळ व्यतीत करत असावी. सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त झाल्यावर परिव्राजक होऊन हिंडत असता अचानक ती त्यांच्या समोर येते आणि विचारते: “मला सांगा, तुम्ही जे मिळवले ते राजप्रासादात राहूनही मिळवता आले नसते काय?” असे म्हणतात की,बुद्ध स्तब्ध होऊन आपल्या पायाकडे पाहू लागले.
तुकारामही “ठायीच बैसोनि करा एकचित्त” असा उपदेश देतात.
त्यामुळे हिंदुधर्माची पुढील व्याख्या मान्य होण्यास हरकत नसावी:
हिंदुधर्माची व्याख्या : जो कोणत्याही विविक्षित ग्रंथाला अथवा ग्रंथसमुहाला एकमेव आणि सार्वकालिक प्रमाण मानत नाही, जो कोणत्याही व्यक्तीला शेवटचा प्रेषित मानत नाही, जो स्वतःच्या चिंतनातून योग्य वाटलेल्या विचारानुसारच आचरण करतो तो हिंदू.
माझ्या माहितीप्रमाणे मी केलेली ही हिंदुधर्माची व्याख्या कोणीही इतक्या स्पष्टपणे दिलेली नाही. किंबहुना “महाजनो येन गत: स पंथ:” याचा मी दिलेला अर्थ नवीन असल्याचे काहींनी मला कळवले होते. परंतु माझाच अर्थ व्यासांना अभिप्रेत आहे असा माझा दावा आहे. असो. हिंदू शब्दाची वरील व्याख्या (जिला मी व्यासप्रणीत मानतो) स्वीकारली तर बऱ्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात. वरील सर्व व्याख्यांत अभिप्रेत असलेले हिंदू या व्याख्येप्रमाणेही हिंदूच राहतात. ही व्याख्या पूर्णपणे इहवादी आहे. ती स्थलकालनिरपेक्ष आहे. ती कोणत्याही परतत्त्वाचा हवाला देत नाही. त्यामुळे “ऋणं कृत्वा घृतं पिबेत्।” असा सल्ला देणारा आणि ‘तत्त्वमसि।’ अशी ग्वाही देणारा दोघेही हिंदू असू शकतात. हे अगदी शक्य आहे की, मी जो माझा मार्ग शोधला आहे तो आधी कोणीतरी सांगितला असेल. माझा मार्ग शोधण्यात महाजनांच्या अनुभवांची, कदाचित्, मला मदतही होऊ शकते. पण, तो मार्ग सांगणारा माणूस मोठा आहे म्हणून मी त्याच्या मागून जाणार नाही. तो विचार माझ्या मननातून, चिंतनातून आला आहे, मला तो मार्ग पटला म्हणून मी तो निवडला आहे. तो माझा मार्ग आहे. तोच मार्ग दुसऱ्यानेही निवडला आहे हा केवळ अपघात आहे. चिंतन ही प्रक्रिया असते, घटना नसते. चिंतनात कोणताही विचार अंतिम असत नाही. अधिक चिंतन केले, इतरांशी चर्चा केली, दुसरे ग्रंथ वाचले तर विचार बदलू शकतात. त्यामुळे हिंदुधर्मात सतत सुधारणा झालेल्या दिसतात. पाखंड (blasphemy) ही कल्पना हिंदू धर्मात नाही. येशू मसीहाला परमेश्वराचा पुत्र मानण्यास हिंदूंची हरकत नसते. फक्त त्यालाच एकमेव पुत्र मानण्यास हरकत असते. हजरत पैगंबरांना ईश्वराचा प्रेषित मानण्यास हिंदूंची हरकत नसते. फक्त त्यांना तो शेवटचा प्रेषित मानणार नाही. केरळच्या हिंदू राजाला अरबस्तानातून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी मशीद बांधून देण्यात आपण धर्म-कृत्य करतो असेच वाटते, कारण “नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्” यावर त्याचा विश्वास असतो. वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता हे हिंदूंचे धर्म-ग्रंथ समजले जातात. पण ज्या अर्थाने बायबल अथवा कुराण हे धर्मग्रंथ आहेत त्या अर्थाने हे धर्मग्रंथ नाहीत. ते ईश्वराचे आदेश नाहीत. धर्मनिष्ठ हिंदू वेदांना अपौरुषेय मानतो. ते मानवनिर्मित नाहीत.पण ते ईश्वराचे शब्दही नाहीत. (या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिलेली विश्वकोशातील टिप्पणी पाहावी.) वेद हा शब्द विद् शब्दापासून येतो. विद् म्हणजे जाणणे. तुकाराम महाराज “वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची जाहला” असे ठणकावून सांगतात आणि तरीही ते हिंदूंना वंद्यच राहतात. कारण ज्यांना जो अर्थ ‘दिसला’ तो त्यांच्यासाठी खरा असतो. यासाठी हिंदूंच्या धर्मग्रंथांना दर्शने म्हटले आहे, ईश्वराच्या आज्ञा नाही. वेदप्रामाण्य इतपतच आहे. सर्व गीता सांगून झाल्यावर कृष्ण अर्जुनाला विचारतो “तुझे सर्व संशय फिटले?” अर्जुनाने होय म्हटल्यावर कृष्ण म्हणतो, “यथेच्छसि तथा कुरु।”- आता तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घे. कृष्णाने कोणतीही ‘कमांडमेंट’ दिलेली नाही. हिंदू परंपरा गीतेला सर्व उपनिषदांचे सार समजते. भगवान बुद्धांचा निर्वाणकाळ जवळ आला तेव्हा त्यांचा शिष्योत्तम आनंद बुद्धांच्या निर्वाणानंतर आपण मार्गदर्शनासाठी कुणाकडे पाहायचे या विचाराने व्याकूळ होतो. त्या वेळी बुद्ध म्हणतात, “अप्प दीपो भव।” आपला मार्ग स्वतःच शोध. मी सांगितलेल्या मार्गाने जा असे बुद्ध सांगत नाहीत. जैनांचा अनेकांतवाद सत्याला अनेक पैलू असतात असेच सांगतो. दुर्दैवाने काही विचारवंतांना शंकराचार्य या शब्दाची ‘ॲलर्जी’ असते. पण आदि-शंकराचार्य परापूजा स्तोत्रात म्हणतात, “आपले नेहमीचे काम ईश्वराचे काम आहे असे स्मरून वागणे म्हणजे ईश्वराची पूजा.” (यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम् । यासंबंधी सविस्तर विवेचनासाठी ‘अद्वैताची पूजा आणि शंकराचार्य’, ‘लोकप्रभा’, मे १४, २०२१ चा माझा लेख पाहावा.) हा विचार सर्वसामान्य हिंदूंपर्यंत आचार्यांनी पोहोचवलेला आहे. “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी।” असे संत सावता माळी म्हणतो. पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत असतो. या त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन “पुंडलिकाचे भेटी परब्रह्म” येते. भक्ताच्या दर्शनासाठी देव येण्याची अद्भूत कहाणी केवळ हिंदू धर्मातच शक्य दिसते. संत कबिराचे पुढील दोहे आदिशंकराचार्यांच्या परापूजेच्या शेवटच्या श्लोकाचे अर्थानुवादच आहेत.
जहं जहं डोलौं सो परिकरमा जो कुछु करौं सो सेवा ।
जब सोवौं तब करौं दंडवत, पूजौं और न देवा ॥
कहौं सो नाम सुनौं सो सुमिरन खावं पियौं सो पूजा ।
(जिथे, जिथे मी जाईन (डोलू) ती माझी परिक्रमा, जे काही कर्म मी करेन ती तुझी सेवा; जेव्हा मी झोपी जाईन तेव्हा तुला दंडवत; आणखी कोणतीही पूजा मी करत नाही. जे बोलतो तो तुझा जप; जे ऐकतो ते तुझे स्मरण; मी खातो, पितो त्यावेळी मी तुझीच पूजा करत असतो.)
इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. गोष्ट गंमतीदार आहे; पण ती बरेच काही सांगून जाते. साठच्या दशकाच्या मध्यावर इंडोनेशियात साम्यवाद्यांविरुद्ध प्रतिक्रांती झाली. नव्या लष्करशहाने प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म कोणता आहे हे शासनाला सांगणे गरजेचे केले. त्यावेळी कित्येक साम्यवाद्यांनी आपला धर्म हिंदू असल्याचे जाहीर केले होते. कारण कोणतेही औपचारिक धार्मिक कृत्य न करता माणूस हिंदू-धर्मात राहू शकत होता.
तात्त्विक पातळीवर हिंदुधर्मात सत्याच्या शोधाला प्राधान्य दिलेले दिसते तर अब्राहमिक धर्मात संघटना प्रधान मानली गेल्याचे आढळून येते. वर सांगितल्याप्रमाणे वेद हा शब्द “जाणण्या”शी संबंधित आहे, तर संघटना-प्रधान धर्मग्रंथाची नावे देवाच्या आज्ञेशी संबंधित आहेत. (तोरा (कायद्याचे पुस्तक), बायबल (पुस्तक), कुराण (वाच) (ह्या देवाच्या आज्ञा)). देवाची आज्ञा शब्दश: पाळायची असते.
अब्राहमिक धर्मांची सुरुवात ज्यूंच्या धर्मापासून होते. हे ज्यू इजिप्तमध्ये फारोहाच्या साम्राज्यात गुलामीचे जिणे जगत होते. मोझेसने (इस्लाममध्ये मुसा) त्यांची मुक्तता केली. आणि त्यांना घेऊन तो सिनाईच्या वाळवंटात आला. तेथील एका पहाडावर जाऊन त्याने चाळीस दिवस आणि चाळीस रात्री परमेश्वराची प्रार्थना केली. त्यावेळी देवाने मोझेसला दहा आज्ञा दिल्या. त्या त्यांच्या धर्माचा पाया आहेत. पहिली आज्ञा होती:
“मी, परमेश्वर तुझा एकमेव मालक आहे. माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस. तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको; त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करू नको;कारण मी परमेश्वर तुझा एकमेव देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करेन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो…”.
‘टेन कमांडमेंट” मधील परमेश्वराच्या अन्य आज्ञाही संघटना कशी बळकट करता येईल हे लक्ष्य ठेऊनच दिल्या आहेत. मोझेसने आपल्या अनुयायांना शत्रूपासून वाचवून आणले होते. शत्रू पाठीवर होता. अश्यावेळी संघटना महत्त्वाची असते. ‘यथेच्छसि तथा कुरु’ – तुला हवे तसे कर असे म्हणण्याची चैन परवडण्यासारखी नसते. पण गोष्ट इथेच थांबत नाही. चाळीस दिवस मोझेस अनुपस्थित असताना डोंगराखाली लोक अस्वस्थ झाले. त्यांनी सोन्याचे वासरू करून त्याची पूजा सुरू केली. ज्या इजिप्तमधून त्यांना परांगदा व्हावे लागले होते तिथला हा देव होता. या पापाचे प्रायश्चित्त म्हणून वासराची पूजा करणाऱ्या सर्वांची हत्या केली गेली. तीन हजार लोक मारले गेले असे उल्लेख आहेत. देवाचा राग एवढ्यानेही शांत झाला नाही म्हणून त्याने प्लेगही पाठवला, अशी समजूत आहे.
देवावर आणि धर्मावर अव्यभिचारी निष्ठा ही संघटना-प्रधान धर्माचे व्यवच्छेदक लक्षण असते. त्यासाठी अश्या कथा जनमानसात रुजवणे अपरिहार्य असते. ज्यूंच्या धर्माचा प्रसार झाला नाही याचे कारण तो जन्माधिष्ठित होता. ज्यू धर्मातील या कथा अन्य अब्राहमिक धर्मातही येतात. मोझेसनंतर सहाशे वर्षांनी येशू ख्रिस्ताचा अवतार झाला. येशूच्या जन्माचे भाकित ज्यूंच्या धर्मग्रंथातच केले होते. तो ज्यू परंपरेतच लहानाचा मोठा झाला. त्यावेळी जेरुसलेमवर रोमन राज्य करत होते. रोमन अनेक देवता मानायचे. असे म्हणतात की, जेव्हा जीझसने “मी सांगतो तोच सत्य-धर्म आहे” असा दावा केला,तेव्हा जेरुसलेमचा रोमन गव्हर्नर पिलात याने त्याला विचारले, “सत्य कशाला म्हणतात?” आणि तो उत्तरासाठी थांबलाही नाही. तो दिवस रोमन सम्राटाचा वाढदिवस होता. त्या दिवशी जीझस आणि बाराब्बास या नावाचा एक दरोडेखोर या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. पण सम्राटाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ एका गुन्हेगाराची शिक्षा माफ होणार होती. रोमन अनेक देव मानत होते. गव्हर्नरने जीझसपुढे प्रस्ताव ठेवला. जीझसचा देव खरा मानण्यात येईल. पण जीझसच्या देवाइतकाच सम्राटाचा देवही खरा आहे हे त्याने मान्य करावे. त्याला सोडण्यात येईल. जीझसने धर्मद्रोह करणे अमान्य केले. गव्हर्नरने बाराब्बासला सोडले आणि जीझसला सुळावर चढवले. कारण जे कृत्य जीझसच्या दृष्टीने धर्मनिष्ठा होती तेच कृत्य पिलातच्या दृष्टिकोनातून राजद्रोह होता.
इस्लामही तीच परंपरा सांगतो.
माझाच धर्म खरा आणि तो तुम्ही मानलाच पाहिजे ही भूमिका जेव्हा कोणताही धर्म घेतो तेव्हा झगडे टाळता येत नाहीत. आणि ही आग्रही भूमिका जर एखादा धर्म सोडण्यास तयार असेल तर तो आपोआपच हिंदुधर्माचा भाग बनून जातो. किंबहुना थोडे शाब्दिक स्वातंत्र्य घेऊन असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही की, जीझस हा परमेश्वराचा एकमेव पुत्र आहे असे जो मानतो तो ख्रिश्चन. तो(ही) परमेश्वराचा (एक) पुत्र आहे असे म्हणेल तो हिंदू. हजरत मुहम्मद परमेश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत असे मानणारा तो मुस्लिम; ते(ही एक) प्रेषित आहेत असे म्हणणारा तो हिंदू. नरहर कुरुंदकर यांनी नांदेडच्या मशिदीत जाऊन केलेल्या एका गाजलेल्या भाषणात इस्लामच्या संदर्भात अधिक सडेतोड भाषेत विचार मांडले होते. परंतु त्यांचे विचार शांतपणे ऐकून घेण्याचा संयम कोणाजवळ आहे काय, किंबहुना आजच्या डाव्या उदारमतवाद्यांना तरी ते परवडतील काय याबद्दल मी साशंक आहे. म्हणून मी ही चर्चा येथेच आटोपती घेतो. येथे कुठल्या धर्माचा अधिक्षेप करणे हा माझा हेतू नाही. तशी कुणाची भावना होत असेल तर मी अगोदरच माफी मागतो.
आता लोकशाही आणि हिंदू-धर्म यांच्या संबंधांकडे वळू. वस्तुतः तो स्वतंत्र विषय होईल. तरीही सूत्ररुपाने काही विचार मांडतो. लोकशाही हा वैज्ञानिक दृष्टीचा समाजिक क्षेत्रात वापर आहे. कोणत्याही क्षेत्रातील कसलेही ज्ञान मिळवायचे असेल, तर कळत अथवा नकळत आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवत असतो; काही गोष्टी सत्य आहेत असे गृहीत धरत असतो. असे करणे तर्कशास्त्रीयदृष्ट्या अटळ असते. (यासंदर्भात जिज्ञासूंनी माझा ‘धर्म आणि विज्ञान’, ‘साधना‘, मे ९, २०१५ हा लेख वाचावा.) या सत्य मानलेल्या गोष्टींना वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञ गृहितक किंवा हायपोथेसिस म्हणतात. धार्मिक माणूस त्याला श्रद्धा, विश्वास, आतला आवाज, आप्तवाक्य, दृष्टांत म्हणतो. प्रत्यक्षात त्याला कोणताही पुरावा असत नाही. वैज्ञानिक वरचेवर प्रयोग करून, निरीक्षणे नोंदवून, आपले गृहितक बरोबर आहे ना हे तपासत असतो. नवी माहिती गृहितकाशी सुसंगत असेल तर तो ते गृहितक अधिक उत्साहाने वापरतो. विसंगत असेल तर तो आपल्या गृहितकात योग्य त्या सुधारणा करतो. सुधारणा शक्य नसतील तर तो त्या गृहितकाचाच पूर्ण त्याग करतो आणि सर्वच गोष्टींचा नव्याने विचार करतो. पण कोणत्याही परिस्थितीत वैज्ञानिकांची त्या गृहितकाशी भावनिक, किंबहुना अन्य कसलीही बांधिलकी नसते. त्याची बांधिलकी वस्तुस्थितीशी म्हणजेच त्याला प्रतीत झालेल्या सत्याशी असते, गृहितकाशी नाही. बांधिलकी मानली की ती श्रद्धा बनते. श्रद्धा आंधळीच असते. डोळस श्रद्धा सशाच्या शिंगासारखी कल्पनेतच असते. धार्मिक मनुष्याची बांधिलकी त्याच्या श्रद्धेशी असते. वस्तुस्थितीशी नाही. त्याचे अनुभव श्रद्धेशी विसंगत असतील तर त्या श्रद्धेचा तो त्याग करत नाही; आपली श्रद्धाच कमी पडली असे समजून तो अधिकच श्रद्धाळू होतो. त्यामुळे,वैज्ञानिक दिवसेंदिवस सत्याच्या अधिकाधिक जवळ जात राहतो आणि धार्मिक अधिकाधिक श्रद्धाळू होत जातो. श्रद्धा देवावरच असण्याची आवश्यकता नाही. ती एखाद्या जीवित अथवा मृत व्यक्तीच्या विचारांवर, त्याने लिहिलेल्या पुस्तकांवर, किंवा एखाद्या सिद्धांतावरही असू शकते. म्हणजे निरीश्वरवादी आपल्या ‘इझम’ला आंधळेपणाने चिकटून राहत असेल तर त्यालाही धार्मिकच म्हटले पाहिजे. वैज्ञानिकाची कशावरही श्रद्धा नसते. तो नेहमीच साशंक बनून आपली गृहितके वरचेवर तपासत असतो. त्याच्या दृष्टीने कोणताही सिद्धांत अंतिम नसतो. कोणतेही पुस्तक पवित्र नसते. कोणतीही व्यक्ती श्रद्धेय नसते.
पण वैज्ञानिक दृष्टी सामाजिक क्षेत्रात वापरताना अनेक बदल अपरिहार्य होतात. वैज्ञानिक क्षेत्रात जी प्रस्थापित गृहितके असतात ती शास्त्रज्ञांच्या बहुमताने ठरतात. ही गृहितके त्या विषयातील बहुतेक तज्ज्ञांना मान्य असतात. आपण त्याला वस्तुनिष्ठ सत्य मानतो. पण प्रत्यक्षात ते वस्तुनिष्ठ नसते,ते बहुमताचे व्यक्तिनिष्ठ सत्य असते. त्यामुळे आजचे बहुमत उद्याचे अल्पमत बनू शकते. त्यामुळेच ज्याला आपण वैज्ञानिक सत्य मानतो ते वैज्ञानिकाच्या दृष्टीने working hypothesis असतो. विश्वाची उत्पत्ती ‘बिग बँग’ने झाली. का? तर बहुसंख्य खगोलशास्त्रज्ञांचे त्यावर एकमत आहे. ही थिअरी चुकीची आहे असे मानणारे किंवा त्यात सुधारणा सुचवणारे शास्त्रज्ञ आहेत. पण ते आज घटकेला तरी अल्पमतात आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण विस्तारभयास्तव ते टाळतो. नवे तत्त्व सापडले तर ते मान्यताप्राप्त संशोधन-पत्रिकेत प्रसिद्ध व्हावे लागते. ते बहुसंख्य तज्ज्ञांनी स्वीकारावे लागते. ही विज्ञानाची पद्धत आहे. म्हणजे विज्ञानातले प्रश्नही तत्त्वतः लोकशाही मार्गांनीच सोडवले जातात. फक्त येथे मतदार त्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक असतात. हे मतदार विज्ञानात ‘स्टेक होल्डर’ असतात. तेव्हा सिद्धांत बरोबर की चूक हे ‘स्टेक होल्डर’च्या बहुमताने ठरते. अगदी पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती हेसुद्धा!
सामाजिक प्रश्नात स्टेक होल्डर सामान्य जनता असते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील प्रश्न वैज्ञानिक पद्धतीने सोडवणे म्हणजे सामान्य जनतेच्या बहुमताने सोडवणे. जनतेची विचार करण्याची पद्धत तर्कशुद्ध असतेच असे नाही. जनता आपले मत कसे बनवते याची चर्चा वर उल्लेख केलेल्या लेखात केली आहे. तरीही नाइलाजास्तव तीच पद्धत आपल्याला स्वीकारावी लागते. या पद्धतीतील त्रुटी कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे यावर बराच विचार झाला आहे आणि लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय केले पाहिजे यावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. पण त्याची चर्चा येथे अपेक्षित नाही. सामाजिक क्षेत्रातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा कमीत कमी धोक्याचा मार्ग कोणत्या-ना-कोणत्या स्वरुपात लोकशाही अस्तित्वात असणे हाच होऊ शकतो. तो मार्ग परिपूर्ण आहे म्हणून नव्हे, तर यापेक्षा चांगला मार्ग उपलब्ध नाही म्हणून! यासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे हाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकमेव वैज्ञानिक मार्ग आहे.
आता हिंदू धर्माकडे वळू. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी केवळ भारतातच लोकशाही टिकली हा अपघात नाही. याचे एक महत्त्वाचे कारण लोकशाही आणि हिंदू धर्म या दोन्हींमागची वैचारिक बैठक एकच आहे, हे आहे. लोकशाही हा राजकीय हिंदुधर्म आहे आणि हिंदुधर्म ही धार्मिक लोकशाही आहे. लोकशाहीत आणि हिंदुधर्मात blasphemy नाही. येथे हिंदुधर्माची व्याख्या मी अगोदर दिली आहे. अब्राहमिक धर्म उघड उघड लोकशाहीविरोधी आहेत. मध्ययुगानंतरच्या पुनरुज्जीवनाच्या काळात आपल्या प्राणाची बाजी लावूनच ख्रिश्चन युरोपात लोकांनी विज्ञाननिष्ठा आणि लोकशाही जोपासली. आणि जेथे लोकशाही आली तेथे धर्माचे प्राबल्य संपले. जो समाज आपल्या धर्मग्रंथांना ईश्वराची आज्ञा मानतो त्या समाजाला लोकशाही राबवण्यात केवळ भावनिकच नाही तर तात्त्विक अडचणी आहेत. हिंदूंचे धर्मग्रंथ ईश्वराची आज्ञा नाहीत. त्यामुळे येथे बहुसंख्य लोक धार्मिक असूनही लोकशाही राबवता येणे शक्य झाले आहे. भारताची राज्यघटना तयार करणाऱ्यांत सत्त्याऐशी टक्के सभासद कर्मठ हिंदू होते. तरीही ते धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राज्यघटना एकमताने देऊ शकले. हिंदूंच्या या वैचारिक औदार्याची पुरेशी बूज इतरांनी राखली नाही अशी बऱ्याच मोठ्या हिंदू समाजाची खंत आहे. हे हिंदू धर्मवेडे नाहीत. आज दिसणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्नांची मूळे तेथे आहेत हे नाकारणे आत्मवंचना ठरेल.
आज आपल्या देशात खरोखरी धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे का, ती आणण्यासाठी काय केले पाहिजे यावर मतभेद असू शकतात. त्यावर चर्चा होऊ शकते. पण जोपर्यंत भारतीय संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला संविधानाच्या चौकटीतच आणि लोकशाही मार्गानेच मिळवावी लागतील. या देशात लोकशाही नाही अशी, कोणत्याही कारणास्तव, काही समाजघटकांची भावना झाली असेल आणि त्यासाठी रस्त्यावर प्रश्न सोडवण्याचे आवाहन ते लोकांना करत असतील तर ते सरकारी दमनचक्राला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.रस्त्यावर प्रश्न सोडवण्याची भाषा एक तर अराजकाकडे घेऊन जाते किंवा हुकूमशाहीकडे. मग ही हुकूमशाही प्रस्थापित राजसत्तेची असेल नाहीतर त्या सत्तेला उलथून टाकून येणाऱ्या नव्या सत्तेची असेल. आपल्याला हे अभिप्रेत आहे काय? हे परवडणार आहे काय? आणि त्यातून न्यायाधिष्ठित समाज निर्माण होईल असे वाटते काय?.
पण परिस्थिती इतकी वाईट आहे असे मला वाटत नाही. या काळ्या ढगांना एक रुपेरी किनार मला दिसते आहे. सर्वसामान्य माणूस आपले रोजचे व्यवहार धर्मग्रंथ वाचून ठरवत नसतो. त्याचे व्यवहार आजूबाजूचे चार लोक कसे वागतात हे पाहून ठरत असतात. भारतीय मुसलमानांचा एक मोठा भाग,विशेषतः दक्षिण भारतातील मुसलमान, इथल्या हिंदू समाजात बराच मिसळून गेला आहे. तो स्थानिक भाषा बोलतो. संगीत इस्लामला मान्य नाही. पण भारतातील इस्लामधर्मियांनी भारतीय संगीताला हिमालयाची उंची प्राप्त करून दिली आहे. इस्लाम स्त्रियांना गोषात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण एकेकाळी मुस्लिम नायिकांची चित्रपटक्षेत्रात जवळ जवळ मक्तेदारीच होती. या समाजाच्या चालीरीती हिंदूंच्यांशी मिळत्याजुळत्या आहेत. त्यांचे दर्गे,तुरबती, पीर, उरूस, बाबा, फकीर, इत्यादी गोष्टी पोथीनिष्ठ इस्लाम धर्मात बसत नाहीत. त्या शेजारच्या हिंदूंशी जवळीक दाखवतात. खेडेगावातील मुस्लिम स्त्रिया आजही गळ्यात काळे मणी बांधतात. गोवा राज्यात समान नागरी कायदा गेली चारशे वर्षे बिनबोभाट सुरू आहे. गेल्या शतकातील प्रसिद्ध समाजसुधारक हमीद दलवाई यांनी सांगितलेला किस्सा तर डाव्यांची आणि पोथीनिष्ठांची झोप उडवणारा आणि हिंदुत्ववाद्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. गोष्ट काहीशी अशी आहे: त्यांच्या गावात मुस्लिग लीगची शाखा सुरू करायचे ठरले. पण तिचे उद्घाटन करायचे म्हणजे काय करायचे असा प्रश्न पडला. शेवटी ग्रामदेवतेपुढे नारळ फोडून मुस्लिम लीगचे उदघाटन करण्यात आले. याचा अर्थ आपला धर्म इस्लाम असला तरी संस्कृती भारतीय आहे हे एका मोठ्या मुस्लिम घटकाला मान्य आहे, असा होतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. या सर्वांचा अर्थ इतकाच होतो की, प्रामाणिक प्रयत्न केले तर दोन समाजातील दरी मिटवणे शक्य आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील एका मुस्लिम धर्माच्या वकिलाने कुराणातील काही परधर्मियांना खुपणाऱ्या आयती काढून टाकण्याचा प्रस्ताव सुचवला होता. हिंदू जर मनुस्मृती जाळू शकतात तर काही आयती काढून टाकायची दिलदारी दुसरी बाजू दाखवू शकते. इस्लामच्या सत्तरहून अधिक शाखा आहेत. भारत हा एकच देश असा आहे की, जेथे सर्व शाखा फारसे झगडे न होता एकत्र राहतात. तीच परिस्थिती ख्रिस्ती धर्माची आहे. शेवटी धर्माच्या नावावर आपण पुढील पिढीला काय वारसा ठेवणार आहोत याचा विचार सर्वाना आज ना उद्या करावाच लागेल.
सामान्य माणसाला धर्माची आवश्यकता असेल आणि भिन्नधर्मियांनी येथे एकत्र राहायचे ठरवले असेल तर वर स्पष्ट केलेल्या माझ्या व्याख्येच्या हिंदुधर्माला पर्याय मला तरी दिसत नाही. कारण हा एकच धर्म असा आहे की जो धर्माच्या म्हणजेच परलोकाच्या पलीकडचे पाहतो, जो माणसाची प्रतिष्ठा जपतो, जो लोकशाही टिकवू शकतो. संघटना-प्रधान धर्म हा केवळ आध्यात्मिक विचार नसतो. तो राजकीय विचारही असतो. असा धर्म जर आपल्या तत्त्वांना मुरड घालण्यास तयार नसेल आणि संवैधानिक, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीच्या विरोधात संघटित होत असेल तर हिंदूंना संघटित होण्याला पर्याय उरत नाही. धर्मरक्षणासाठी नव्हे तर धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी!
हिंदूंना अशाप्रकारे संघटित होऊ द्यायचे की नाही हे आता अन्य संघटना-प्रधान धर्मांनी ठरवायचे आहे. “आम्ही हिंदुधर्म मानतो, हिंदुत्व नाही” असल्या शाब्दिक कसरती करून सभा गाजवता येतील. पण प्रश्न सुटणार नाही.
कोल्हापूर, ४१६००८, दूरध्वनी (०२३१) २५२५००६, चलध्वनी ९८३४३३६५४७
e-mail: hvk_maths@yahoo.co.in
भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगून झाल्यावर निर्णय अर्जूनावर सोडला त्यामध्ये गीतेचा अभ्यास अथवा श्रावण केल्यावर साधकाची बुद्धी अग्र होऊन तो योग्य असाच निर्णय घेईल हा विश्वास आहे. त्यामुळे भगवंताला कमांडमेंट द्यायची आवश्यकता वाटत नाही.
श्रद्धावान लभ्याते ज्ञानं हे भगवंत सांगतात ते याच अर्थाने.
सहिष्णुता हा हिंदू धर्माचा पाया आहे. त्यामुळे त्याबद्दल भाष्य करायचा सर्वांना अधिकार आहे पण त्यामुळे धर्माची मूळ शिकवण विसरता येत नाही.
जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करून प्राचीन हिंदू धर्माची त्यासोबत तुलना आणि कुठे काय चांगले हा चर्चा आणि वादाचा विषय होऊ शकतो तथापि हिंदू धर्माचे परिशीलन आणि अनुशीलन मानवी मनाच्या कक्षेला इतके विस्तीर्ण आणि विशाल बनवते की सर्वत्र तोच परमात्मा असल्याचे आकलन त्याला आपसूकच होऊ शकते.
कुठेही बसून ज्ञानप्राप्ती कर हे खरे असले तरी ज्ञानप्राप्ती साठी काही नियम सुद्धा भगवंतांनी सांगितले आहेतच.
किंबहुना दैवी गुणांचा व्यवहारात अंगीकार हे ज्ञानप्राप्ती च्या मार्गावर अग्रेसर असल्याचेच द्योतक आहे.
आपल्या अद्वैत ग्रंथांचा नेटाने अभ्यास आणि त्यानुसार वर्तन हे भगवंतांनी सांगितलेले आदेश म्हणूनच घ्यायला हवेत. सहिष्णुता म्हणजे मोकळीक नव्हे आणि धर्माचरण हे तर कर्तव्यच आहे.
याबाबत सर्वांची अनेक मते मतांतरे असली तरी सत्य हे शाश्वत असते हे समजणे गरजेचे आहे आणि हेच मानव कल्याणाचे आहे.
वसुधैव कुटुंबकम ची संकल्पना जोपासणारा एकमेव हिंदू धर्म आहे.
लेखकाची व्याख्या: “जो कोणत्याही विविक्षित ग्रंथाला अथवा ग्रंथसमुहाला एकमेव आणि सार्वकालिक प्रमाण मानत नाही, जो कोणत्याही व्यक्तीला शेवटचा प्रेषित मानत नाही, जो स्वतःच्या चिंतनातून योग्य वाटलेल्या विचारानुसारच आचरण करतो तो हिंदू.”
नकारात्मक भाग: इसाई, ज्यू, आणि इस्लाम ला वेगळे काढतो (पण त्यांच्यातल्या चिंतनशील व्यक्तींना हिंदूच समजतो) आणि उरलेल्या चिंतनशील व्यक्तींना पण हिंदूच समजतो. हे ठीक आहे. पण काही लोक, यात स्वतःला हिंदू म्हणवणारे किंवा मानले जाणारे अनेक लोक, चिंतनशील नसतील आणि कोणत्याही ग्रंथाला वगैरे मानणारे नसतील, ते अर्थात या व्याख्येबाहेर. ही व्याख्या वसुधैव कुटुंबकम् या महोपनिषदी मंत्रासारखी किंवा पसायदानासारखी उदारचरित, सर्वसमावेशक नसेल पण आदर्शवादी नक्कीच आहे.
“महाजनो येन गतः स पंथाः” याचा अर्थ “जो स्वतःच्या चिंतनातून योग्य वाटलेल्या विचारानुसारच आचरण करतो तो” हा जरा ओढून-ताणून वाटतो. या उलट महाजनो येन गतः स पंथाः म्हणजे “शिष्ठसंमत – काही प्रतिष्ठित लोकांच्या परंपरांनी आणि संस्कृतीनं मान्य केलेला मार्ग – हा अर्थ जास्त सरळ वाटतो. यात शिष्ठ, प्रतिष्ठित, ज्ञानी, विवेकवादी वगैरे कोण हा एक वेगळा विषय.
लेखकाची व्याख्या ही विवेकवादी आहे आणि त्या अर्थाने लेखक विवेकवादी आहे असे म्हणता येईल पण यात विवेकवादी, चिंतनशील नसलेले पण परंपरेनं हिंदू मानले जाणारे लोक सामावले जाणार नाहीत असे वाटते. शिवाय यात हिंदू या शब्दातला भौगोलिक, सांस्कृतिक, आगमिक भाग लुप्त होतो असे वाटते. या भौगोलिक, सांस्कृतिक, आगमिक भागाला प्राधान्य देणारी आणि भारतातल्या सर्व-सामा हिंदूंना सामावून घेणारी व्याख्या अशी करता येईल:
भारतीय उपखंडात जन्म पावलेल्या (आणि नंतर बाहेर पसरलेल्या), निसर्गोपासक परंपरांचा आधार असलेल्या, अनेकेश्वर किंवा निरिश्वरवादी असून एकमेकांशी वाद-संवाद करणाऱ्या आणि षड्लिंगांनी ओळखल्या जाणाऱ्या पंथांचा, पण या पंथांनी मर्यादित नसलेल्या लोकांचा समूह. ही षड्लिंगे कोणती?: १) कर्मसिद्धांत, २) पुनर्जन्म, ३) मोक्ष, ४) ज्ञान, ५) प्रमाण-चर्चा, ६) चक्रीय-विश्व. या षड्लिंगांना भारतीय आस्तिक आणि नास्तिक दर्शनांचा आणि पुराणांचा संदर्भ आहे
ही व्याख्या सनातन (वैदिक) धर्म, जैन, बौद्ध, आजीवक, सिख, भारतातील निसर्गोपासक परंपरा वगैरेंना सामावून घेते पण त्याचबरोबर भारताबाहेरील निसर्गोपासक, बहुदेवतावादी, एकेश्वरवादी, आणि निरिश्वरवादी परंपरांशी नाते सांगते. ती अमर्यादित (open ended या अर्थाने) असल्यामुळे त्यात चिंतनशील विवेकवादी लोकांना स्थान आहेच. याची साक्ष म्हणजे भारतीय दर्शने आणि त्यात ज्ञान-मीमांसेला असलेले महत्त्व.
उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख. हिंदू धर्माची व्यापकता विषद करून दुष्ट विचारांची जळमटं दूर करणारा हा लेख, वाचून आनंद तर झालाच पण त्याचबरोबर विचार करण्याची एक नवी दिशा उमगली
आपल्या आणखी काही लेखांच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद
छान आहे. पण आत्ता चर्चा करण्यासारखे इतर अनेक मुद्दे आहेत,तेआपण घ्यायला हवे.कारण धर्माची चर्चा सामान्य माणसाला उत्तराऐवजी सातत्याने गोंधळाकडे घेउन गेल्याचा अनुभव आहे.ना शोषक बदलले नाही शोषित.
सत्याशी प्रतारणा न करता लिहिलेला अतिशय परिपक्व लेख. या मंचावर प्रकाशित झाला हे मोठं आश्चर्य. काही minor क्षम्य त्रुटी आहेत. पण एकूण अभिप्राय अचूक
लेखकाने हिंदू धर्माबद्दल सांगोपांग विचार मांडले असले; तरी त्याला थोडीराजकारणणाची झळ लागली असल्याचे जाणवते. होय हिंदू धर्म सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्यामुळेच आपल्या देशात अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पण आपल्याराज्यघटनेततील सर्व धर्म समभाव या त्वाला मुरुड घालून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर निर्विवाद बहूमतांनी सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने मतांच्याराजकारणासाठी मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करून त्या धर्माला विशेष सवलती दिल्या. इतकेच नाही तर राज्यघटनेत धर्मावर आधारित कायद्याला अनुमती नसूनही मुस्लिम पर्सनल लाँ केला. आज काँग्रेसच्या या नीतीमुळेच ओवेसी सारखे मुस्लिम नेते उघड उघड भारताला इस्लामिक राष्बनवण्यासाठीची भाषा करताना दिसतात. या विरुद्ध हिंदू संघटित होऊ लागले तर लोकशाही धोक्यात अशी ओरड केली जाते. पण २०१४ पासून जनतेने बहूमतांनी सत्तेवर आणलेले सरकार हिदुत्वाला महत्त्व देत आहे. पूर्वी इस्लामी राज्यकर्त्यांनी विध्वंसलेल्या मंदिरांची पुर्बांधणी करत आहे. पण यामुळे काँग्रेस आणि वामपंथीय लोक ओरड करताना दिसत आहेत. अंधश्रद्धा सर्व जगात आणि धर्मात आहे. पण अनिस सारख्या संघटनआंना फक्त हिंदू धर्मातच अंधश्रद्धा दिसते. पण हेही विसरून चालणार नाही,की हिंदू धर्मामुळेच लोकशाही अस्तित्वात आहे आणि हिंदू धर्मामुळेच ती फोफावत आहे.