कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाणीव
वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धिमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास जाणीव असलेले मशीन तयार करा असे विधान एका तज्ज्ञाने केले आहे. हे विधान गंमतीचे वाटत असले तरी ७०च्या दशकात मशीन्सना भाषा शिकवण्याची शिकस्त केली गेली हे आपण विसरू शकत नाही. ध्वनीचे चढउतार, त्यातील वेगवेगळे प्रकार, या ध्वनीवरून अक्षरं, अक्षरावरून शब्द, शब्दावरून वाक्यरचना, वाक्यामधून निघणारा अपेक्षित अर्थ असे काहीतरी करण्याची कल्पना त्याकाळी पुढे आली होती.
परंतु या प्रक्रियेतील प्रत्येक पाऊल शंकास्पद वाटत होते. आई हा शब्द शेकडो प्रकारात उच्चारता येतो आणि प्रत्येकवेळी त्या ध्वनीत बदल होत असतो. बदलत्या ध्वनिला अनुसरून विदा गोळा करावी लागेल व संगणकांचा वापर करून तिचे विश्लेषण करावे लागेल. एक मध्यवर्ती data bank यासाठी लागेल. कदाचित विश्लेषणासाठी शेकडो संगणक लागतील.
तरीसुद्धा या संकल्पनेचा वापर करून तयार केलेला HearSay II हा संगणक ९०% अचूक होता. फक्त त्यातील शब्दसंग्रह एकहजार शब्दांपेक्षा जास्त नसावा ही मर्यादा त्यासाठी होती. नंतर त्याच्या software मध्ये काही बदल करण्यात आले. याच सुमारास जाणीवविषयक तज्ज्ञांचे या संकल्पनेकडे लक्ष गेले. त्यांनी ही कल्पना उचलून धरली. जाणिवांच्या बाबतीत असेच काही तरी घडत असावे असा त्यांचा कयास होता. जाणीव ही एखाद्या फळ्यावरील लेखनासारखी असते. प्राथमिक स्वरुपातील माहिती ही नेहमीच अनकॉन्शिअस माइंडमध्ये साठवली जाते व नंतर त्याचे काही प्रमाणात विश्लेषण झाल्यानंतर फळ्यावर लिहिल्यासारखे त्याला एक मूर्त स्वरूप येते आणि त्याची जाहीर वाच्यता होते. याच्या पुष्ट्यर्थ भूल दिलेल्या रुग्णांचे पुरावे सादर केले होते.
यानंतर संगणकतज्ज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मेंदूतील प्रक्रियांची नक्कल करू लागले. LIDA नावाच्या संगणकप्रणालीत अनकॉन्शिअस आणि कॉन्शिअस routines समांतररित्या काम करतात. परंतु याला बुद्धिमत्ता या सदरात टाकू शकत नाही. फक्त यात विश्लेषणानंतरचे परिणाम सादर करणारे routines आहेत.
याच संदर्भात स्वित्झर्लंड येथे विकसित होत असलेल्या Human Brain Project ला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या प्रकल्पात मानवी मेंदू व त्यातील प्रत्येक चेतापेशी जसे कार्य करतात त्याचप्रमाणे संगणकप्रणाली असलेले एक संगणक तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना होती. आतापर्यंत उंदिराच्या मेंदूतील १० cubic millimeter एवढ्याच पृष्ठभागाचे simulation करण्यात प्रकल्पतज्ज्ञ यशस्वी झाले आहेत. अजून फार मोठा टप्पा त्यांना गाठायचा आहे. अजून काही निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्प तडीस नेता येईल असा त्यांचा विश्वास आहे.
या प्रकल्पाबद्दल टिप्पणी करताना एका तज्ज्ञाने मेंदू कसा काम करतो हे महत्त्वाचे नसून आपल्यात जाणीव कशी निर्माण होते हे महत्त्वाचे आहे असे म्हटले होते. उदाहरणार्थ, न्युरॉन्समधून विद्युतप्रवाह गेल्यास आपल्याला वेदनेची जाणीव कशी काय होते व ही वेदना सापेक्ष कशी काय असू शकते? तांबड्या रंगाबाबतही ही सापेक्षता का आढळते? यावरून येथे फक्त वेदनेची जाणीव नसते तर वेदनेचे परिणामही शरीरावर होताना दिसतात.
अशा प्रकारच्या वेदनेची जाणीव करू शकणारी किंवा तांबड्या रंगाचे तंतोतंत simulation करू शकणारी मशीन्स तयार करण्यासाठी अगदीच वेगळ्या प्रकारे विचार करण्याची गरज आहे. वेदनेची जाणीव simulate करणारे मशीन अशक्यातली गोष्ट ठरू शकेल. मशीनमध्ये वापरात येणारी संगणकप्रणाली ही एक भाषा आहे, हे आपण विसरू शकत नाही व वेदनेचे वर्णन किंवा अभिप्रेत असलेल्या तांबड्या रंगाचे वर्णन भाषेच्या माध्यमातूनच करावे लागेल. तुम्हाला ‘वेदना’ किंवा ‘तांबडा’ हे शब्दच कळत नसल्यास ते शब्द निरर्थक ठरतील. त्यामुळे तुमची स्वतःची भाषा या सर्वांपुढे गौण ठरण्याची शक्यता आहे. संगणकाचे वा रोबोचे कार्य काही विशिष्ट अशा संगणकीय भाषेच्या आधारावर चालते. यांना मायक्रोफोनला जोडलेले असले तरी तेथून आलेले inputs 0 किंवा 1 च्या साखळीत बदलल्याशिवाय अर्थ ध्वनित होत नाही. परंतु रंग, वेदना, भावना, दुःख, समाधान यांसारख्या गोष्टींना संख्येत पकडता येत नाही. त्यामुळे संगणकीय भाषेत या गोष्टी निरर्थक ठरतात.
या संबंधात काही नवीन रोबोंचीसुद्धा भर पडत आहे. XCR हा रोबो प्रायोगिकरित्या जाणिवांवर आधारित आहे, असा त्याच्या संशोधकांचा दावा आहे. या रोबोत संवेदनांचे manipulation होते. संवेदनांच्या signalsची प्रक्रिया सॉफ्टवेरमधून न होता त्याच्यातील विशिष्ट ‘मेंदू’ प्राथमिक धडे घेतो. या रोबोला समोरून कुणी धक्का दिल्यास एका विशिष्ट प्रकारचे photodiodes स्विच ऑन होतात. हे सिग्नल्स मेमरीत साठवले जातात. पुढच्या वेळी अशाच प्रकारच्या धक्क्यातून तो सावध होऊ शकतो. धक्का जोरात असल्यास रोबो माघारी फिरतो. अशाप्रकारे हा रोबो प्राथमिक धडे घेत घेत शिकण्याचा प्रयत्न करतो. या रोबोला काठीने मारल्यास हा विव्हळतो; विनवणी करतो. हे बघताना आपल्यालाही कसेतरी वाटू लागते. रोबोला मारण्यात आपल्यात अपराधीपणा जाणवेल का? इतर जिवंत प्राण्याइतके नसले तरी आपल्याला वाईट वाटेल हे मात्र नक्की.
रोबोची ही प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. त्याच्यातील जाणिवा मर्यादित प्रमाणात असल्या तरी त्या दिशेने वाटचाल होत आहे हेही नसे थोडके!मुख्य म्हणजे जाणिवांसाठी फक्त मेंदू हवा, शरीराची गरज नाही, हे आता लक्षात येऊ लागले आहे. मग हा मेंदू कितीही मोठा वा गुंतागुंतीचा, क्लिष्ट असला तरी चालेल.
सॉफ्टवेअवर चालणारे असोत किंवा XCR टाईप रोबो असोत, हे रोबो नजीकच्या भविष्यात पूर्ण क्षमतेने काम करू शकतील, अशी कल्पना केली तरी त्यांच्यात मानवी जाणिवा – स्वभान या गोष्टी असतील याची खात्री देता येत नाही. फार फार तर रोबो-जाणीव असण्याची शक्यता आहे. स्वभान ही फारच सापेक्ष अशी एक संकल्पना आहे. समजा, रोबोतसुद्धा स्वभान आहे व त्याप्रमाणे ते वागू लागल्यास, नाइलाजाने का होईना, त्यांचेही अस्तित्व आपणाला मान्य करावेच लागेल.
हे जरा अतीच वाटत असल्यास आपण आपल्याभोवती वावरणाऱ्यांकडे एक नजर टाकली तर हे लक्षात येईल. आपल्या समाजातील कमी बुद्धिमत्तेच्या वा शारीरिक – मानसिक कमतरता असलेल्यांच्या, झोंबी टाईप वागणाऱ्यांच्या वा असंवेदनशील असलेल्यांच्या अस्तित्वाला आपण सहन करतच आलेलो आहोत, हे विसरता येत नाही. एखाद्या एलियनशी बोलताना तो माठ (मठ्ठ या अर्थी) आहे हे लक्षात आले तरी आपल्यातील इतर माठ लोकांना सहन केल्याप्रमाणे त्या एलियनच्या अस्तित्वाला सहन करावेच लागेल; मग हा एलियन परग्रहावरचा असो की मानवनिर्मित रोबो असो, काही फरक पडत नाही!
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे…
आज तुम्ही हेच कपडे का घातले? कधी नव्हे ते आजच तुमच्या शेजाऱ्याशी तुम्ही का बोललात? आजच तुम्ही दिवसभराच्या कामाची यादी का केली?तुम्हाला यांसारख्या प्रश्नांची सयुक्तिक कारणं माहीत आहेत असे वाटत असले तरी ते काही खरे नाही. या गोष्टींचा अभ्यास करत असताना संशोधकांना काही आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या. मुळात हा अभ्यास मेंदूवरील शस्त्रक्रिया झालेल्यांच्या संदर्भात करण्यात आला होता. मेंदूच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या स्नायूंच्या गठ्ठ्यात बिघाड झाल्यास एपिलप्सी हा मेंदूचा आजार होतो. अशा काही रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरच्या चाचणीत या रुग्णांना समोर धरलेली वस्तू प्रत्येक डोळ्याला वेगवेगळी जाणवत होती. वरवरून पाहता हे रुग्ण चारचौघांसारखे दिसत होते. परंतु वस्तू ओळखण्यात ते कमी पडत होते. एका रुग्णाला खड्डा खणत असलेल्या कामगाराचे चित्र दाखविले. चित्रातील कामगाराच्या उजव्या हातात फावडा होता. तरी त्याला तो डाव्या हातात आहे असे वाटत होते. याबद्दलचे स्पष्टीकरण विचारल्यानंतर तो आणखीन जास्त गोंधळला. मुळात सामान्यपणे डाव्या डोळ्याचे व डाव्या हाताचे नियंत्रण उजव्या मेंदूकडे असते आणि स्पष्टीकरणाच्या भाषेचे नियंत्रण डाव्या मेंदूकडे असते. परंतु या रुग्णाच्या डाव्या मेंदूला उजव्या मेंदूतील गोष्टींचे आकलन होत नव्हते. त्यामुळे हा रुग्ण खड्ड्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी बोलत होता. फावडा सूप पिण्यासाठी असतो असे काहीतरी असंबद्ध तो बोलत होता.
हा अभ्यास interpretive brain या सिद्धांताला पुष्टी देणारा ठरला. या सिद्धांतात आपण करत असलेल्या कृतीचे समर्थन करत भोवतालच्या जगात काय घडत आहे याचा नेमका अर्थ लावण्याचे काम आपला मेंदू करत असतो, अशी मांडणी आहे. कदाचित ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असण्याची शक्यता असू शकते. मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्यांना एखाद्या चित्राची निवड करण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात गोंधळ उठतो. काही क्षणापूर्वी निवडलेले चित्र त्यांना आठवत नाही. मात्र यासाठी त्यांना दिलेले स्पष्टीकरण खात्रीशीर असते. परंतु हे सगळे काल्पनिक आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. आपली जाणीवसुद्धा काही प्रमाणात चलाखी तर करत नसेल ना?
अगदी मादकद्रव्यांचे सेवन न करतासुद्धा बदललेल्या जाणिवांचा आपल्याला अनुभव येत असतो. तो एक संधिकाल असतो. त्या संधिकालात आपण जागे आहोत की झोपेत की बेशुद्धावस्थेत हेच आपल्याला कळेनासे होते. अर्धनिद्रावस्थेत असलेल्यांचे नीटपणे निरीक्षण केल्यास याबद्दलच्या काही गोष्टी समजतील. त्या काळात ती व्यक्ती जवळजवळ संवेदनसंभ्रमावस्थेत (hallucinoid) शिरली आहे असे म्हणता येईल. याचे नेमके कारण कळत नसले तरी मेंदूचा काही भाग इतर भागापेक्षा लवकर निद्रितावस्थेत पोचत असावा. यावरून मेंदूचे भाग वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या अवस्थेत असू शकतात असे म्हणता येईल.
परंतु हीच संवेदनसंभ्रमावस्था काहींच्यातील सर्जनशीलतेला उद्युक्त करू शकते. फ्रेड्रिक ऑगस्ट केकुलीला बेंझीनची रचना अर्धनिद्रितावस्थेत असतानाच सुचली. प्रसिद्ध चित्रकार सॅल्व्हाडोर डॉली झोपेतून उठण्यासाठी ग्लासच्या कडेला चमचा अधांतरी ठेवल्यासारखे ठेवत होता. चमचा खाली पडला रे पडला की तो जागा होत असे. त्या छोट्याशा अवधीत पडलेल्या स्वप्नातील दृश्याचे तो चित्र काढत होता.
ही संवेदनसंभ्रमावस्था मौजमजेची गोष्ट नाही. यामुळे sleep paralysis होण्याची शक्यता असते. झोप यायच्या अगोदरच माणूस स्वप्नावस्थेत पोचतो. या स्थितीला hypnogogia म्हटले जाते. हा आजकाल संशोधनाचा एक नवीन विषय असून संशोधकांना अजून फार मोठा टप्पा गाठावयाचा आहे.
हाच धागा पकडून डुलकी घेत असलेल्यांच्या मेंदूतील विद्युतप्रवाहाची EEG द्वारे नोंद करण्यात आली. या व्यक्तींना स्वप्नाची सुरुवात झाल्यानंतर बटन दाबण्यास सांगितले होते. परंतु त्यांना हे शक्य झाले नाही. कारण संभ्रमावस्था, स्वप्न आणि झोप यातील सीमारेषा अगदीच पुसट होत्या.
अगदीच अपवाद असला तरी काहींच्या बाबतीत उजव्या बाजूचे नियंत्रण उजव्या मेंदूकडे असू शकते. त्यांना नको असतानासुद्धा ते काही वस्तू हातात पकडतात. दुसऱ्या हाताने ते थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी जातानासुद्धा हात बांधून घेऊन त्यांना जावे लागते. कदाचित मेंदूतील Supplementary Motor Area (SMA) ला इजा झाल्यामुळे बाहेरच्या दृश्यानुसार कृती होत असावी. मेंदूतील दोन्ही भागातील SMA निकामी झाले असल्यास त्यांच्या दोन्ही हातांवरील नियंत्रण सुटलेले असते त्यामुळे ते काहीही करत सुटतात. भोवतालच्या दृश्याचे ते बळी ठरलेले असतात.
ही अवस्था माणसातील free will ला छेद देणारी ठरेल. आपण करत असलेल्या कुठल्याही छोट्या – मोठ्या कृतीला आपण जवाबदार असतो. आपल्यातील जाणीव कृतीचे नियंत्रण करत असते. परंतु SMAला इजा झालेले चेतनाशून्य, अबोध या अवस्थेत कृतीप्रवण झालेले असतात. ही अवस्थाच कृतीचे नियंत्रण करत असते. जाणिवेला तेथे स्थान नाही.
हे जरा विचित्र वाटत असल्यास तुम्ही तुमचे अनुभव तपासून बघू शकता. सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुमची कार आपोआपच ऑफिसच्या दिशेने जात आहे, हे तुमच्या आयुष्यात अनेकवेळा जाणवलेले असेल. अशा प्रकारचे नियंत्रण तुमच्या मेंदूतील premotor cortex करते व त्याला भोवतालचे दृश्य तसे करण्यास भाग पाडते.
बधिरावस्थेचे गूढ
आपल्यापैकी काहींना तरी ऑपरेशन थिएटरमधील शस्त्रक्रियेचा (कटू) अनुभव नक्कीच असेल. स्ट्रेचरवरून तुम्हाला थिएटरच्या आत ढकलल्यानंतर गाऊन घातलेले डॉक्टर्स तुमचे हसतमुखाने स्वागत करत तुम्हाला (उसने) धैर्य देण्याच्या पावित्र्यात असतात. थोडीशी विचारपूस करतात. चहा/कॉफी पाहिजे का विचारतात. तुम्ही हो किंवा नाही असे काही म्हटले तरी चहा कॉफी येत नाही ही गोष्ट अलहिदा. डॉक्टरांपैकी एकजण हळूवारपणे तुमचा डाव्या हातात सुई टोचतो. तुमचे लक्ष घड्याळाकडे असते. हळूहळू सेकंदाचा काटा पुढे सरकत असतो. काय होत आहे हे लक्षात यायच्या आत तुम्ही बधिरावस्थेत जाता. तुम्हाला भुलीचे इंजेक्शन दिलेले असते. तुमच्या डोळ्यांसमोर कोरा पडदा, इतर काहीही नाही.
पुन्हा डोळे उघडल्यानंतर थोडीशी सुस्ती. तुम्ही भलत्याच खोलीत आलेले असता. यापूर्वीच तुम्हाला सुस्ती येईल, झोप लागेल असे सांगितलेले असते. थोडीशी जाग आल्यानंतर सगळे काही संपल्यासारखे वाटते. रिक्तपणा जाणवतो. गंमत म्हणजे डॉक्टर्स भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर नेमके काय होते हे कधीच सांगत नाहीत. कारण….. त्यांनाही ते माहीत नसते.
भूल दिल्यामुळे शस्त्रक्रिया बिनधोक झाली, हे आपण नाकारू शकत नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा भूल देण्याची सुविधा उपलब्ध नव्हती त्याकाळी शस्त्रक्रिया म्हणजे – सर्जन व रुग्ण या दोघांनाही – एक भयंकर अनुभव असेच वाटत असे. परंतु आता जगभरात बिनदिक्कतपणे वापरात असलेली ही एक सुरक्षित वैद्यकीय प्रक्रिया आहे. तरीसुद्धा हे औषध कसे काम करते याबद्दल सर्व संबंधित अजूनही अनभिज्ञ आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मुळात आपल्याला जाणीव असणे याबद्दलच माहीत नसल्यामुळे जाणीव नसणे हेसुद्धा कदाचित कळणार नाही.
परंतु आता MRI स्कॅनिंगमुळे काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. मेंदूतील हालचालींचे दृश्य टिपण्याच्या नवीन नवीन कौशल्यांमुळे भूल दिल्यानंतर नेमके काय घडते हे कळू लागले आहे. चेतापेशीतून विद्युतप्रवाह कसा जातो याची कल्पना येत आहे. अभ्यासकांना जाणिवेचे गूढ उकलू शकतो याबद्दल आत्मविश्वास वाटत आहे. भुलीचे औषध/इंजेक्शन दिल्यानंतर जाणिवा कशा बधिर होतात याची (अंधुकशी का होईना) कल्पना येत आहे.
संपूर्ण जीवन, आपले विश्व व इतर सर्वकाही आपल्या जाणिवेशी निगडीत आहेत. आपल्यातील प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात का होईना याचा अनुभव येत असतो. परंतु अजूनही आपण त्याची नीटपणे व्याख्या करू शकत नाही, हेही खरे आहे. जेलीसारखा असलेला हा मेंदूचा गोळा संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे जिवंतपणाची संवेदना कसा काय देत असेल? आताचे प्रगत तंत्रज्ञानसुद्धा मेंदूच्या आत नेमके काय आहे, त्याची रचना कशी आहे आणि ही रचना जाणिवेला कशी काय पोषक ठरू शकते याची उकल करू शकलेले नाही.
केवळ भूल दिल्यामुळे जाणिवेत बदल होतो असे नाही. आपण झोपेतून उठल्यानंतर किंवा डोक्याला इजा झाल्यासही हा बदल होऊ शकतो. फक्त भूलतज्ज्ञ आपल्यातील जाणिवेला नियंत्रित करतो व त्याला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता पूर्वस्थितीत आणून सोडतो.
गंधकाच्या ईथरला रुग्णाच्या नाकासमोर धरल्यास माणूस बधिरावस्थेत जातो याची कल्पना १९व्या शतकाच्या प्रारंभी आली होती व ही अवस्था शस्त्रक्रियेस अनुकूल आहे याची हळूहळू खात्री होऊ लागली. तेव्हापासून संशोधक वेगवेगळी रसायने वापरून ती शरीरावर व मेंदूवर कशाप्रकारे परिणाम करतात याबद्दल संशोधन करू लागले. नाकाद्वारे वा इंजेक्शनद्वारे शरीरात गेलेले रसायन काही क्षणातच रुग्णाला बधिरावस्थेत नेत होते. काही वेळानंतर या रसायनाचा ओसर संपल्यानंतर रुग्ण पुन्हा पूर्वीच्या अवस्थेत येत होता. या मधल्या काळात सर्जन आपला कार्यभाग उरकून घेत होते. वरवरून जरी ही क्रिया सुलभ, सोपी व बिनधोक वाटत असली तरी रुग्णाच्या जीवनमरणाची दोरी भूलतज्ज्ञाच्या हाती असते, यावर सांगूनही विश्वास बसत नाही. रुग्णाच्या स्थितीवरून रसायनाची निवड, शस्त्रक्रिया होत असलेला शरीराचा भाग, बधिरावस्थेचा अपेक्षित कालावधी, शस्त्रक्रियेच्या वेळी काही चुकल्यास त्यावरील तातडीचे उपाय व त्यासाठी जय्यत तयारी, इत्यादी गोष्टींची जवाबदारी भूलतज्ज्ञाची असते. आणि त्याची एखादी क्षुल्लक चूकसुद्धा रुग्णाचा जीव घेऊ शकते.
बधिरावस्थेत जाणे म्हणजे स्विच ऑन – ऑफ केल्यासारखे नाही. तुम्ही जाणिवावस्थेत तरी आहात किंवा बधिरावस्थेत तरी आहात असे होत नाही. ही काही डिजिटल प्रक्रिया नाही. डिमर स्विचसारखी ही एक ॲनालॉग प्रक्रिया आहे. रुग्णाला भुलीचे इंजेक्शन (वा औषध) दिल्यानंतर रुग्णाची अवस्था अट्टल दारुड्यासारखी होते. कारण बधिरावस्थेच्या अगोदर काय घडले, नंतर काय घडले याची त्याला कल्पना नसते. आणि ते तो योग्य शब्दात सांगू शकत नाही. या संधिकाळात प्रवेश केल्यानंतर रुग्णाला सर्जन काय करत होते, श्वासोच्छ्वासासाठी असलेली सुविधा, थिएटरमधील हालचाली इत्यादींविषयी काहीही माहीत नसते. आजकाल भूल देण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ व वेदनारहित झाल्यामुळे भुलीचे इंजेक्शन/औषध घेतल्या घेतल्या शस्त्रक्रिया पूर्ण झालेली असते व भूलतज्ज्ञ प्रत्येक क्षण मॉनिटर करत असतो.
यामुळे भूल देण्यासाठी वापरात असलेल्या रसायनांबद्दल उत्सुकता वाढते. ही रसायनं कशी काम करतात हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या शंभर – दोनशे वर्षांत इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रसायनं वापरली गेली आहेत की त्यामुळे मेंदूत/शरीरात कुठे कुठे बदल होतात, रुग्ण बधिरावस्थेत कसा जातो, त्याची जाणीव कशी नाहिशी होते, ती पुन्हा पूर्वस्थितीत कशी येते, असे अनेक प्रश्न यासंबंधात विचारावेसे वाटतात. इतर प्रकारची औषधं वा रसायनं रेणूच्या आवरणाला चिकटून – विशेषकरून प्रथिनांना चिकटून – एखाद्या किल्ली–कुलुपाप्रमाणे कार्य करत शरीरावर झालेल्या दुष्परिणामाला थांबवण्याचे प्रयत्न करतात. परंतु भुलीसाठी वापरात असलेले स्टरॉइड्स वा बार्बिच्युरेट्स किंवा xenon सारखा वायू रेणूऐवजी अणूच्या स्थितीत असल्यामुळे किल्ली-कुलुपासारखे ते कसे काय काम करू शकतात याचा अजूनही उलगडा झाला नाही.
काही तज्ज्ञांच्या मते भूल देण्यासाठी दिलेल्या औषधांची परिणामकारकता त्याचे घटक किती वेळ ऑलिव्ह ऑइलमध्ये विरघळत होते यावर अवलंबून आहे. लिपिड सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांना मात्र प्रथिनांच्या रेणूंना रसायन चिकटण्याऐवजी चेतापेशीतील मेंब्रेनच्या कामात ही रसायनं अडथळा आणून पुढील कार्य करू शकतात, असे वाटते. इतर काही संशोधकांच्या मते पेशीत मेंब्रेन नसल्यास ते प्रथिनांच्यावरही चिकटू शकतात. हे सर्व संशोधन अजूनही प्राथमिक अवस्थेत असून निश्चित असे निष्कर्ष निघाले नाहीत. मेंदूत कुठेतरी ‘अबोधना’चे स्विच असू शकेल का, हाही प्रश्न विचारला जातो. काही तज्ज्ञांच्या मते मात्र ही शक्यता नसावी. कदाचित मेंदूतील पेशीच्या मेंब्रेनवर रसायनाचा परिणाम होऊन पूर्ण नेटवर्क निकामी केल्यामुळे माणसाची शुद्ध हरपत असावी. कॉर्टेक्सच्या आणि मेंदूच्या आवरणातील EEG वरून हा अनुमान काढला असावा. काही अभ्यासकांच्या मते भुलीवरील हे संशोधन माणूस कोमात का जातो यालाही उत्तर देऊ शकेल.
ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर तेथील नर्स हसतमुखाने जेव्हा स्वागत करते तेव्हा आपल्या डोळ्यासमोरील अंधार गायब झालेला असतो. ‘मी जेव्हा थिएटरमध्ये निद्रितावस्थेत होतो तेव्हा काही जणांनी scalpel वापरून माझ्या शरीरावर अनेक गोष्टी केल्या, कापाकापी केली व नंतरची जोडणी झाली. परंतु त्या कालखंडात माझ्यातला ‘मी’ कुठेतरी गुप्त झालो होतो. माझा अनुभव भूलतज्ज्ञांच्या कौशल्याला सलाम करतो. त्यांच्या मते हे नेहमीचे असले तरी माझ्या मेंदूत बदल करून पुन्हा पहिल्या अवस्थेत आणून सोडणे हे येरा-गबाळ्याचे काम नव्हे.’
‘मेंदू’ नावाचे मशीन
काही वैज्ञानिकांच्या मते या मेंदू नावाच्या मशीनमधील नस, चेतापेशी व मज्जातंतू यांच्या कार्याचे निरीक्षण करताना मेंदूतील हे घटक एखाद्या सुनियोजित मशीनमधील पार्टस्/असेंब्ली/सबअसेंब्लीपेक्षा रँडम्ली झोका खात असलेल्या दारुड्यांसारखे किंवा बॉक्सिंगच्या रिंगणातील मुष्ठियोद्ध्यांसारखे एकमेकांवर कुरघोडी करतात वा नॉक-आऊट करण्याच्या प्रयत्नात असतात की काय असे वाटते. खरे पाहता बॉक्सिंग खेळप्रकारातील नॉक-आऊटसारखे शब्दप्रयोग मेंदूला समजून घेण्याकरता वापरावे लागतात ही कुणालाही आश्चर्यजनक वाटणारी गोष्ट ठरेल. मेंदू म्हणजे जैवरासायनिक व/वा विद्युतप्रवाहित अवयव अशी समजूत असताना बधिर होणे किंवा बेशुद्ध होणे इत्यादी घटना यांत्रिकीशी (mechanical) संबंधित आहेत असे म्हटल्यास ते विधान बुचकळ्यात टाकणारे ठरू शकेल. चेहऱ्यावर मार बसल्यामुळे शुद्ध हरपणे ही सर्वश्रुत गोष्ट आहे. मुष्ठियोद्धा जेव्हा प्रतिस्पर्धीच्या तोंडावर बुक्का मारतो तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या ग्लोव्हज् मधून कुठल्याही प्रकारचे विद्युतप्रवाह नाहीत, हे आपल्याला पक्के ठाऊक असते. परंतु आपला मेंदू अशा प्रकारच्या मेकॅनिकल अदलाबदलाविषशी संवेदनशील आहे.
मेंदूतील चेतापेशींचे एकमेकांशी होत असलेले ‘संवाद’ जैवरासायनिक व विद्युत संकेताद्वारे होतात याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु काही तज्ज्ञांच्या मते ती फक्त एक बाजू आहे. एखादी घटना घडत असताना न्युरॉन्सची जोडणी घड्याळातील चाकांचे दात अडकल्याप्रमाणे होत असेल. त्यावेळी लागणाऱ्या बळाची माहिती मेंदूच्या स्मृतीत नोंदली जात असेल व अशाच प्रकारची घटना पुन्हा घडल्यास स्मृतीपटलातील माहितीच्या आधारे न्युरॉन्सवर त्वरेने प्रक्रिया होऊन प्रतिसाद मिळत असेल. एखाद्या मशीनसारखे हे कार्य होत असल्यामुळे मेंदू हे मशीनच आहे याबद्दल खात्री वाटत असेल.
आपले विचार कशा प्रकारे घुटमळत राहतात यावरही हे मशीनसदृश मेंदूचे प्रारूप प्रकाश टाकू शकेल. यांत्रिकी क्रियेत अडथळा आल्यास मेंदूला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर मेंदूची मशिनरी ध्वनिलहरींच्या बाबतीत संवेदनशील असल्यास आपस्मारासारख्या disorder ला सामोरे जावे लागेल.
दुसऱ्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत मेंदू हा मेकॅनिकल मशीनसारखाच कार्य करतो असे अभ्यासकांना वाटत होते. या मशीनसदृश प्रारूपात ventricles मधून द्रव pump करत असल्यामुळे स्नायू आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतात अशी मांडणी केली जात होती. १७व्या शतकातील रेने दे कार्तेलासुद्धा हे मत मान्य होते. परंतु १८व्या व १९व्या शतकात मेंदूच्या मेकॅनिकल प्रारुपाला धक्का बसला. द्रव, दाब असे काही नसून विद्युतप्रवाहातून नियंत्रण होत असते हे लक्षात आले. Nerve fibre मधून विद्युतसंकेत प्रवाहित होतात, हे प्रत्यक्षपणे काही वैज्ञानिक १९५०च्या सुमारास दाखवू शकले. या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळाले. तरीसुद्धा मेंदूच्या या मेकॅनिकल प्रारुपाचा जोर ओसरला नाही. या प्रारुपाच्या अभ्यासातूनच Nerve fibre मध्ये ऊर्जेची अदलाबदल कशी होते हे स्पष्ट झाले. याच्याच आधारे काही वैज्ञानिकांनी नसाच्या विद्युतमंडलाच्या प्रारुपाची मांडणी केली. ऊर्जेची हालचाल होत असल्यास अशा प्रकारच्या मंडलातून उष्णता बाहेर पडायला हवी. परंतु प्रायोगिकरित्या तेथे उष्णता नव्हती, हे सिद्ध झाले. Nerve impulse च्या वेळी उष्णता बाहेर पडत नव्हती. परंतु Nerve impulse ही मेकॅनिकल क्रिया आहे असे गृहित धरल्यास तेथे उष्णता बाहेरही पडते व शोषूनही घेतली जाते. त्यामुळे तेथे ऊर्जेतील घट असणार नाही. net loss दिसणार नाही.
या सर्व गोष्टी नॅनो स्केलमध्ये होत असल्या तरी मज्जासंस्थेत सातत्याने होत असलेल्या चलनवलनातून मेकॅनिकल मेंदूला या समजून घेणे शक्य होत आहे. Neurons आणि Synapsis मध्ये होत असलेल्या बळांची अदलाबदल मेंदूच्या अभ्यासकांना आव्हान देत आहे. संकेतांची अदलाबदल कशी होते, संदेश कसे पोचवल्या जातात आणि त्यातून अर्थपूर्ण कार्यवाही कशी काय होते हे एक न सुटणारे कोडे ठरत आहे.
प्राण्यांवरील प्रयोगात बाहेरून केलेल्या यांत्रिकी मारामुळे मेंदूच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात आले आहे. मुष्ठियुद्धातील नॉक-आऊटसदृश प्रक्रिया का घडत असावी याची कल्पना येत आहे. आपल्या चेतापेशीतील Synapsis व इतर घटक योग्य प्रकारे मेकॅनिकली कार्य करत असताना डोक्यावर मारलेल्या किंचित चापटीमुळेसुद्धा त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. हे बाहेरचे बळ पोटॅशियम किंवा सोडियम चॅनेलला जागे करते व त्यामुळे कदाचित माणूस बेशुद्धावस्थेत जाऊ शकतो. आणखी काही अभ्यासातून ultrasound तरंगामुळेसुद्धा मेंदूच्या क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते, हे लक्षात येत आहे. कदाचित तरंगामुळे तेथे उष्णता निर्माण होत असावी. म्हणूनच ही मेकॅनिकल प्रक्रिया असावी असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
नसविज्ञानासाठी हा एक वेगळ्याच अभ्यासाचा विषय होत आहे. Ultrasound लहरींचा वापर करून मेंदूवर शस्त्रक्रिया करता येईल का हा विचार घोळत आहे. पार्किन्सनच्या रुग्णांना यानंतर कुठल्याही शस्त्रक्रियेला सामोरे न जाता Ultrasound लहरींद्वारे मेंदूच्या आतील भागापर्यंत पोचणे शक्य होणार आहे. आतापर्यंत वापरात असलेले इलेक्ट्रोड्स मेंदूच्या अंतर्गत भागात पोचत नसल्यामुळे शस्त्रक्रिया निष्फळ ठरत होती. हे सर्व आता बदलणार आहे. कदाचित हा उपचार आपस्मारालासुद्धा (epilepsy) लागू होऊ शकेल. मात्र या Ultrasound लहरींच्या उपचारपद्धतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण मेंदूच्या इतर ठिकाणी कुठेतरी या लहरी पोचल्यास त्यापासून होणारा धोका कायमस्वरुपाचा असणार व त्या चुकीच्या दुरुस्तीला अजिबात वाव नसणार. निधीच्या कमतरतेमुळे या विषयीचा अभ्यास मंदगतीने चालू आहे. मुंगीच्या पावलानी पुढे सरकत असलेल्या या संशोधनाच्या दृश्य परिणामासाठी कदाचित १०० वर्षे लागतील. परंतु निधी उपलब्ध केल्यास हे संशोधन १०-१५ वर्षांत संपेल, असा संशोधकांचा दावा आहे.
समाप्त..