“इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.”
‘आजचा सुधारक’च्या अंकाची ही थीम हातात पडली त्यावेळी नुकतेच २०२१ चे अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे सूप वाजले होते नि त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचा हॅंगओव्हर होता. म्हटलं, त्यावर लिहू का? आणि संपादकांनी “हो, तोही महत्त्वाचा विषय आहेच” असा प्रतिसाद दिला. मात्र लिहायला घेतल्यावर अंकाची थीम डोक्यात घोळायला लागली नि मनातल्या त्या विचाराची हीच बाजू जास्त प्रकर्षाने दिसायला लागली. अर्थात हा आयाम माझ्या जास्त जवळचा. त्यामुळे रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी आपला तोच आयाम घेऊन दाखवायला आल्या नि मग म्हटलं, “लिहावं त्यांच्याचकडे पाहात…”
तर मुळात प्रश्न आहे, किंबहुना प्रश्न आहेत की हा केवळ इंडिया विरुद्ध भारत हा झगडा आहे का? कित्येक वर्षांपासून म्हणता येईल इतकाच तो जुना /नवा आहे का? आणि मुळात तो झगडा तरी आहे का?
हे प्रश्न भरल्यापोटी पडू शकतात असा आरोप होण्याची शक्यता आहे आणि आम्ही ती शंका टाळू इच्छितही नाही. मान्यच आहे की विचार करता येण्यासाठी किमान सुबत्ता असावी लागते. एरवी अस्तित्वाची लढाई हाच एक विचार असतो.
तर, विषमता ही जगभर आहे. तिचा जन्म जवळपास या विश्वाच्या जन्मासोबतच झालेला आहे इतकी ती सनातन आहे आणि त्यामुळे ती एक गरज म्हणून निर्माण झालेली आहे. होय, ही अर्थातच संघर्षाचे कारण आहे पण तो संघर्ष प्राकृतिक आहे, विश्वाच्या जीवनक्रमाची गती त्या इंधनातूनच प्राप्त होते आहे. त्यामुळे या फिनॉमिनन् ला समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.
अर्थात जाती म्हणजे सामान्यत: आपल्याला स्वत:ची माहिती भरताना जन्मासोबत चिकटलेली असते ती जात लिहा असे सांगितले जाते, जिच्या आधारे आपल्याला मिळणारे लाभ-अपलाभ शासकीय स्तरावरही ठरत असतात, तितकाच मर्यादित अर्थ घेत नाही आहोत. संस्कृतमध्ये, विशेषत: न्यायशास्त्रात,जिथे परिभाषा दिली जाते, तिथे जाती या शब्दाच्या निर्मितीबद्दल जी व्यक्ती या फिनॉमिनन् पेक्षा वेगळी असे म्हटले आहे. इथे विरूद्ध असे जाणीवपूर्वक म्हटलेले नाही. अनेक व्यक्ती एकत्र येऊन दर्शविला जाणारा फिनॉमिनन् जाती म्हणून संबोधला गेला आहे. फिनॉमिनन् ला प्राकृतिक गूढ असे काहीतरी मराठीत म्हणून त्यामध्ये ती भावना ओतण्यापेक्षा आतून आलेला फिनॉमिनन् हा इंग्रजी शब्दच जाणीवपूर्वक स्वीकारला आहे, त्याचे समावेशनाचे प्रयोजन वाचकांपर्यंत हळूहळू पोहोचेल अशी अपेक्षा.
नमनाला इतके तेल ओतले तरी आणखीही थोडे ओतावे लागणार आहे. आपण जर जग द्विमान आहे असेच मानणार असू तर आहे-रे नि नाही-रे या दोन जाती हे मान्य. पण मग पुन्हा एकदा लॉजिकनुसार या दोन्हींमध्ये कोणी कमी कोणी जास्त असे होत नाही. कशाला आहे-रे म्हणायचे हे ठरले की राहिलेले नाही-रे हे ठरते. ती लेबल्स इंटरचेंजेबल असतात. एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्व नाही (न-आहे) असे ते होते. त्यामुळेच मघाशी म्हटल्याप्रमाणे तिथे झगडा हा शब्द वापरावा का याबद्दल साशंकता आहे. संधी एकाला आहे नि दुसऱ्याला नाही असे तिथे मूलत: अशक्य आहे.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण आता साहित्यसंमेलनाचे अध्यक्षीय भाषण हे उदाहरण घेऊ. इथे आपल्याला सुशिक्षितांची म्हणजे ज्यांनी दहा एक वर्षे तरी औपचारिक शिक्षणपद्धतीतून स्वत:ला घडवले आहे किंवा ज्यांना त्या समकक्ष अभ्यासाचा अंदाज आहे अशांची जाती लागेल. साहित्य या फिनॉमिनन् चा प्राथमिक अंदाज येण्यासाठी सामान्यत: तितकी किमान आवश्यकता असे इथे सामान्य गृहितक.
आपल्याला माहितीच आहे की साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष शास्त्रज्ञ असावा का? विज्ञानसाहित्य साहित्य म्हणून गणले जावे का? इथपासून प्रश्न होते,राहिले… दुसऱ्या बाजूने निवडसमितीसारखे, ज्यांना साहित्यातील काही वेगळे पल्ले दिसले, ही या आपल्या पहिल्या जातीतील पोटजात, त्यांनी या प्रश्नांची त्यांची उत्तरे “हो” अशी होती म्हणून तर ती निवड केली. शास्त्रज्ञविश्व ही आणखी एक पोटजात, त्यांना आपल्यापैकी कोणाला दुसऱ्या पोटजातीच्या लोकांनी मान्यता दिल्याचा आनंद झाला. भाषणात जे सांगितले गेले ते शास्त्रज्ञ पोटजातीतील लोकांना रुचेल असे होते. पण त्या पोटजातीपासून दूर असलेल्यांना ते पचवता आले का?
केवळ लालित्य हा साहित्याचा निकष नको असे स्पष्ट करण्याची ताकद कुणाची असणार? ज्यांच्या लेखनाला लालित्यापेक्षा वेगळा आयाम असेल त्यांनाच ना? मग आता असे वेगवेगळॆ आयाम घेऊन साहित्यिकांच्या पोटजाती बनणारच ना… आणि शेवटी लालित्य तरी काय आहे? अगदी गुडीगुडी वाटणे आहे असे जरी म्हटले तरी जे आपल्या जीवनाच्या जवळचे त्याचीच संवेदना आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे तेच आपल्याला भावते हेही नाकारता येणार नाही. ज्याचा गंधच नाही ते कसे गुडीगुडी वाटेल? त्यामुळे जितके जीवनानुभव, तितक्या या संवेदनाधारित जाती-पोटजाती…
मग कुणी मागच्या अध्यक्षांनी सामाजिक प्रश्नांना हात घातला, यांनी त्यांचा उल्लेखही केला नाही म्हणाले. पूर्ण खरे मानायचे का हे? मागच्या अध्यक्षांनी शास्त्रीय कसोट्यांचा उल्लेख केला नाही, उलट शास्त्राला मान्य नाही अशा गोष्टींचा उल्लेख केला असेही कोणी म्हणू शकतेच की… शिवाय, विज्ञान जनहिताय, राष्ट्रहिताय आहे म्हणून तर आपण ते अंगिकारत आहोत तर शास्त्रज्ञांनी कधी कधी त्यांच्याही प्राणांचीच बाजी लावून जे जन्माला घातले त्याबद्दल मांडणी केली किंवा पुढे काय अपेक्षित आहे हे सांगितले तर ते सामाजिक प्रश्नांना अव्हेरून असे होईल का?
या व्यतिरिक्त, भारतीय शास्त्रे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ती विमानविद्येसारखी शाखा भारतात शास्त्र म्हणून माहिती नसणार. कारण त्यासंदर्भातील बांधणीसाठी लागणारे गणित आपल्याला त्या काळातील ग्रंथांमध्ये आढळत नाहीये असा मुद्दा प्राध्यापक नारळीकर खूप पूर्वीपासून मांडत आलेत आणि सामान्यत: एखाद्या शास्त्रप्रेमीस ते पटावेही. आज थोडे आजूबाजूला पाहिले तर काय दिसते? अगदी कोरोनाकाळाचेच उदाहरण घेतले तरी एकीकडे आयुष मंत्रालयाने भारतीय वैद्यकाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही संधी आहे म्हटले, महामारीतून देशाला वाचवण्यासाठी त्यांचे स्वागत आहे म्हटले पण प्रत्यक्षात मात्र वैद्यांना ॲलोपॅथीची सेवा करण्याचे काम दिले. रुग्णांना ॲलोपॅथी सोडून भिन्न उपचार घेण्यास संधीच ठेवली नाही. इतकेच नव्हे तर तसे फतवे असल्याने ज्या कोणत्या ठिकाणी कर्मधर्मसंयोगाने आयुष चिकित्सापद्धती राबवल्या गेल्या त्यांची निरिक्षणे व निष्कर्ष कोणत्या बळावर स्वीकारायचे असा प्रश्न पडल्याने त्यांना प्रकाशात आणायला कोण प्रकाशक तयार होईल असा प्रश्न आहे. अर्थात भारतीय शास्त्रांना आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध होण्यासाठी लागणारे प्रयत्न म्हणावे तितके होत नाहीत असे दिसते. या प्रयत्नांचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे शास्त्रग्रंथांचा शोध हा असायला हवा आहे. आपल्याकडे नॅशनल मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी मिशन आहे पण दुर्दैवाने बहुशाखीय संशोधनाला गती देणारी व्यवस्था नाही. या पार्श्वभूमीवर आपल्याला आज उपलब्ध असलेल्यांपैकी ज्या ग्रंथांशांचा अर्थ लावला गेलाय त्यामध्ये गणित दिसत नाही म्हणजे ते एकंदर वाङ्मयात नव्हतेच असे म्हणणे धाडसाचे होणार नाही का? पण पुन्हा एकदा हाही पोटजातीच्या संवेदनांचाच प्रश्न..
संस्कृतवाल्यांना वाटते, त्यांना तिथे आजच्या विज्ञानाशी जुळणाऱ्या कल्पना दिसताहेत म्हणजे विज्ञान होतेच. गणितवाल्यांना वाटते त्या कल्पना हे साहित्य असू शकते. ते अभियांत्रिकीच्या उपलब्धीचे प्रमाण होऊ शकत नाही, पुरातत्त्ववाल्यांना काहीतरी मिळाले आणि कुठवर तरी अर्थ कुणीतरी लावला यात धन्यता! अनेक जाती तर अशा की त्यांचे हे सगळे हवेच कशाला असे मत…
या सगळ्यांतून निर्माण होतो तो पोटजातींनी एकमेकांवर केलेला प्रश्नांचा फक्त भडीमार! मग घर्षण, ठिणगी, संघर्ष…. तो हवाच आहे, पण त्याचे ध्येय काय असावे? पेटून उठलेल्यांनी काय करावे या प्रश्नांची उत्तरे निश्चित करायला हवीत. देव आहे म्हणणारे एकप्रकारच्या आहे-रे गटातले नि नाही म्हणणारे एकप्रकारच्या नाही-रे गटातले. त्यांना त्यांच्या त्यांच्या भूमिकांनुसार काही ना काही लाभ-अपलाभ होत आलेले आहेतच. म्हणून तर त्या जाती टिकून आहेत, कोणी एक संपलेली नाही. कोणा एकाचे खरे मानता येईल अशी सिद्धता प्रकृती आपल्या हाती लागू देईल असे वाटते का? खरे तर देव आहे म्हणणाऱ्यांनाही तो घडी घडी लागत नाही, नाही म्हणणाऱ्यांनाही त्याचे नसणे घडी घडी लागत नाही. रोजच्या जीवनव्यवहारात दोन्हीही पार्टीज् च्या गरजा सामान्यत: सारख्याच असतात नि आपापल्या श्रद्धांच्या आधाराने दोघेही मार्ग काढत असतात. खरे तर एकाची श्रद्धा उपयोगी पडेनाशी होते तेव्हा दुसऱ्याच्या श्रद्धेचा आधार असे झाले तर कधीच कोणी थकणार नाही आणि मोठमोठे आव्हानांचे डोंगर सहज पार होतील. भारतीय शास्त्रांमध्ये देव आहे आणि नाही किंवा त्याची गरजेनुसार रूपे असे अनेक विचार शास्त्रशुद्धपणे मांडलेले दिसतात. डोळसपणे शास्त्रांचा, पारंपरिक वा आधुनिक वा,कोणत्याही असले तरी शास्त्रांचा समग्र अभ्यास होणे गरजेचे आहे. ऐकीव माहितीचे स्वत:च्या अवकाशात अर्थ लावतांना दुसऱ्याच्या अवकाशावर आक्रमण होत असेल तर ते होऊच द्या अशी भूमिका लोकांना एकमेकांपासून दूर नेणारी वा संपवणारी आहे. आत्मबचावाचा प्रयत्न हे तिचे मूळ असल्याने तिला टाळता येणार नाही. पेक्षा, प्रत्येकाने आपल्या अवकाशाचा विस्तार समजूतदारपणे करायचे योजले, तर आपल्याला एकमेकांच्या अवकाशाचा परिचय करून घेत एकमेकांच्या हद्दीत सहज वावरता येईल, लोक जवळ येतील. आयाम एकमेकांना मिळतील. मोठे आव्हान मोठे राहणार नाही. हे नियतीचे संकेत आहेत असे वाटत नाही का?
आहे-रे नि नाही-रे या मांडणीने जगाचे प्रारूप तयार होत नाही हे आज विज्ञानाला कळाले आहे. मी वर जे सांगितले त्याला फझी क्लस्टरिंग अशी संज्ञा आहे. प्रत्येकजण एका गटाचा असतो. त्याचवेळी तो इतर अनेक गटांचा कमी-अधिक प्रमाणात सदस्य असतोच. रिजिड पार्टिशनिंगने समस्यांची उकल होत नाही ती फझी बाऊंडरीज् ने होते याचा शोध गणितज्ज्ञांना लागला तेव्हापासून पूर्वीचे अनेक थीसिस या नव्या चष्म्यातून पाहिले गेलेत, बाऊंडरीज् आणखी कोणत्या दृष्टीकोनातून पाहता येतील याचा विचार करता रफ थिअरीचा शोध लागला, व्यक्तिचा आकार केवढा यावरून ग्रॅन्युलर थिअरीचा शोध लागला… अजून शोध लागतच आहेत. आम्ही तुमच्यापैकी नव्हेत म्हटल्याने किंवा स्वार्थापुरते एखाद्याचे योगदान स्वीकारून समाजात मात्र त्यातून आव्हानेच कशी उभी राहणार आहेत याचे चित्र उभारण्याचा दुटप्पीपणा करण्याने काय होईल? विविधता ही जटील समस्यांना विविधांगांनी भिडण्यासाठीची शक्ती आहे. भिन्नतेचा चुकीचा अर्थ लावला गेल्याने दरी निर्माण होते आहे हा शोध महत्त्वाचा, ती कमी करायची आहे हा शोध त्याहून महत्त्वाचा. नव्या मार्गांचा, नवप्रारुपांचा अवलंब, संशोधन आणि आविष्कार हा त्यासाठी मंत्र ठरावा.
नववर्षारंभाच्या अंकासाठी या हार्मोनिअस विचारांची साद मनात उमटली हेही नियतीचेच संकेत! येत्या वर्षात या विचारानुगामी असे काही काही उत्तम घडत राहो ही मनोकामना.
-अंबुजा साळगांवकर, संगणकशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ आणि वैद्य परीक्षित शेवडे, डोम्बिवली