मराठी साहित्य सम्मेलनाचा अखिल भारतीय तमाशा

आपले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलन परंपरेप्रमाणे आपला घरंदाज घाटीपणा सिद्ध करून गेले. माय मराठी, माझा मऱ्हाटीची बोलू कवतुके, लाभले भाग्य आम्हा, मराठी माणूस, अणूरेणू या तोकडा, मराठी वर्ष, मराठी अस्मिता….. अशा नानाविध अस्मितादर्शी पताका आम्ही रोवल्या आहेत. हे आम्ही पांघरलेलं वाघाचं कातडं, साहित्यसम्मेलनात आपोआप गळून पडतं. साहित्यसम्मेलन आलं की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला कुणी चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांच्या रूपाने वाघ बाहेरून आणावा लागतो. आणि आम्ही सारे बनगरवाडीतील मेंढरं म्हणून आपले घरंदाज घाटीपण खालच्या मानेनं सिद्ध करतो.

सम्मेलन जाहीर झाले की बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा आधीच बेतलेला/pre-cooked वाद सुरू करून आम्ही माय मराठीच्या अस्मितेवर थुंकायला सुरुवात करून आमच्या घरंदाज घाटी ॲटिट्यूडची दिवाळी साजरी करायला सुरुवात करतो. आणि आमच्या न्यूनगंडाच्या मूळ व्याधीची होळी आणि रंगपंचमी सुरू होते. जात दाखव नाहीतर श्राद्ध कर, ही बेतलेली नाटिका सादर होते. विविध विषाणू आणि विविध लक्षण. आजाराचे नेमके निदान कुणालाच करायचे नसते. त्यांचा उदीम…. लसीकरण, निर्जंतुक द्रव्य विपणन, मास्कचा मासेबजार, इत्यादी असतो.

आपल्या आजाराचे मूळ शोधा आधी. मराठीचा ब्रँड अँबेसिडर म्हणावे तरी कुणाला? पु.ल. होते तोपर्यंत ते सांभाळून घ्यायचे. Shock absorber म्हणून अदृश्य भूमिका करायचे. तुलना करा मराठीच्या ब्रँड व्हॅल्यूची! गुजरातमधला मुसलमान गुजरातीत बोलतो तेव्हा गुजराती ॲक्सेन्टमधे बोलतो. बंगाल, तामिळनाडू, आंध्र इत्यादी अ-हिंदी प्रांतातील मुसलमान तिथल्या भाषा ॲक्सेन्टबरहुकूम बोलतात. पण आमच्या ‘अमृताशी पैजा’ जिंकणाऱ्या मराठीची काय अवस्था आहे? जावेदभाऊ अख्तर त्यांच्या भाषणात तीनच शब्दांचे एकच वाक्य मराठीत बोलले. ते वाक्य त्यांच्या उच्चारप्रणालीत, “छानतता, कोर्ट च्यालू आहे.” जावेदभाऊ एकटे नाहीत, मुंबईत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले बॉलिवूडवाले किंवा इतर अमराठी एलिट, मराठी उच्चार, “तुमच्या ज्येवन झ्याल का?”, असेच करतात. याला कारण काय?

याला कारण आमचा ॲटिट्यूड. छत्रपती शिवाजी राजांनी साध्या दही-दूध विकणाऱ्या हिरकणीत इतका ॲटिट्यूड भरला होता की ती स्वतःच बुरुज उभं करून गेली. दुर्दैवाने एकविसाव्या शतकाच्या पाळण्याचा घुगऱ्या खाल्लेल्या आमच्यासमोर दादा कोंडके, निळूभाऊ फुले, विनायकराव दादा पाटील असे काही सन्मान्य अपवाद वगळले तर, उरते एकजात विदूषक प्रकारात मोडणाऱ्या खुज्यांची माळ, जी मराठीचे ब्रँड अँबेसिडर म्हणून उंडारत ठेवली जाते. हे आत्मविश्वासशून्य खुजे माय मराठीला मान खाली घालण्यास भाग पाडतात. आणि सम्मेलन आलं की चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांना डोक्यावर घेऊन नाचतात.

मराठीचा वचक, रुबाब, आत्मविश्वास आणि पोत कुठेतरी कच खाते आहे. विनायकराव दादा पाटलांच्या उंचीची माणसं या तथाकथित अखिल भारतीय तमाशाच्या वेशीला शिवू शकली नाहीत. माधवराव मोरे अत्यन्त विलक्षण वक्ते होते. ते अखिल भारतीय मांडवात येण्यास कधीच पात्र ठरले नाहीत. मोठी मोठी माणसं आयुष्यभर मांडवाबाहेरच राहिली. यामागे एक अदृश्य असे राजकीय पाताळयंत्र दडलेले आहे. यातून चिंटू भगत आणि जावेदभाऊ अख्तर यांचेसारखे पाहुणे आणून साप मारून घेण्याचे नवे तंत्र निपजले आहे.

एक भाषा विरुद्ध दुसरी भाषा, ही निकोप गोष्ट नाही. कट्टर म्हणवल्या जाणाऱ्या पाकिस्तानात पंजाबी भाषेचा कुणीच द्वेष करत नाही. उर्दू विरुद्ध पंजाबी, ही लढाई तिथे नाही. अनेक पट्टीचे सुफी गायक बुल्लेशहा यांच्या रचना गातात. पंजाबी भाषा बोलणारा मोठा मुस्लिम वर्ग तिथे आहे. या पार्श्वभूमीवर मराठी ही अमराठी लोकांनी मिरवून घेण्यासाठी बोलावी अशी भाषा असायला हवी होती. पण तिला तो दर्जा देण्याइतकी उंची आम्ही गाठली नाही. याला आमचा ॲटिट्यूड हे एक मोठे कारण आहे. दुसरे, मराठी साहित्य संमेलन. अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलनावर एक अदृश्य राजकीय सावट आहे. त्यातून हे सम्मेलन पद्धतशीरपणे एका वर्तुळात एका आसाभोवती फिरते. मराठी भाषेचा शिक्का निर्माण व्हावा, अशी या सम्मेलनाची संरचना नाही. ते वर्षातून एकदा सरकारी अनुदानाने भरवली जाणारी एक पाच सहा आठवड्यांची तमासखोर जत्रा झाले आहे. काही धेंडं त्यात यथेच्छ प्रसिद्धी लाटून घेतात. खरं तर ती मराठी प्रतिभांचा शोध घेणारी आणि वर्षभर झटत राहणारी एक नीटनेटकी व्यवस्थापनप्रणाली असलेली जबाबदार संस्था असायला हवी. मात्र ती एक हौश्या, नवश्या, गवश्यांची एक तमासखोर चांडाळचौकडी आहे, जी वार्षिक साहित्यसम्मेलनाच्या निमित्ताने बाहेरून कुणी trouble shooter आणून त्याचेकडून आपल्या तमाशाचे, “जलसा” असे गंगाजलस्नान करून घेते. ओघानेच या सर्वांचे घोडे गंगेत न्हाऊन निघतात.

असो, अमराठी एलिट क्लास “तुमच्या जेवन झ्याल”, असंच मराठी बोलणार. त्यांना धड मराठी येत नसल्याचं आम्ही कौतुक करणार. कारण आम्हाला आमचा ॲटिट्यूड धारण करायचा नाही. मुंबईत बिहारातून आलेला भूमिहीन बेरोजगार, आमच्या आमदार, खासदार, प्राध्यापक, मंत्री यांच्यापेक्षा अधिक आत्मविश्वासाने वावरतो. आमचे कितीही यशाच्या पायऱ्या चढले तरी, कचखाऊपणा सोडणार नाहीत. गुलामांचे गुलाम निर्माण करण्याची एक दृश्य आणि अदृश्य परंपरा यामागे आहे. आत्मविश्वासाच्या जागी गुंडगिरी, उर्मटपणा, सुमारपण हे आमचे अलंकार.

यावर उपाय एकाच आहे, मराठीची आत्मबळ, आत्मविश्वास, विनय, विवेक, अभिरुचीसंपन्न मॉडेल्स तयार होणे, करणे गरजेचे आहे.

मला एका कार्यक्रमात एक भगिनी भेटल्या. त्यांचेशी चर्चा केल्यानंतर त्यांचं भारदस्त मराठी ऐकून प्रभावित झालो. शिक्षण काय तर कॉमर्स ग्रॅज्युएट. व्यवसाय गृहिणी. अशा लोकांना मराठी साहित्यसम्मेलनात काहीही स्थान नाही.

मराठी ही युजीसी वेतन श्रेणीतल्या प्राध्यापक, डॉक्टर, शुक्राचार्य वर्गाची वसाहत झाली आहे. नाटकवाले, सोशल मीडियावाले, प्रिंट मीडियावाले छापील रंगरूट, असे बरेच सिंडिकेट्स – छोट्या मोठ्या टोळ्या. मात्र आपसूक आदर वाटेल असं कुणीही भारदस्त व्यक्तिमत्व नाही. त्यामुळे बाहेरून चिंटू भगत, जावेदभाऊ अख्तर यांच्यासारखे आयकॉन आयात करून आम्ही आमची झाकतो. मराठी ही आमची अस्मिता असेल तर पदरमोड करून आम्ही तिला माय मराठीचा दर्जा दिला पाहिजे. अनुदान आलं की ज्यांचं सरकार असतं ते हात धुऊन घेणार. शिवाय मुळात आकृतिबंधच कुजकट आहे. वाङ्मय आणि भाषा या दोन्ही बाबींच्या सबलीकरणसाठी, सुदृढीकरणासाठी कल्पकतेचा मागमूस त्यात नाही.

तसेच अनुदान लाटण्यापलीकडे या सम्मेलनाचे काही प्रयोजन उरले आहे का, हा चिंतनाचा विषय आहे. आज social media मुळे विविध पर्याय रसिकांसमोर आहेत. खाद्यपदार्थ रेसिपीवले आमच्या तथाकथित “अखिल भारतीयांच्या” श्रीमुखात मारणारे मराठी बोलतात. हातातील कंकणाला याहून सज्जड आरसा कोणता दाखवावा?

थोडक्यात, मराठी साहित्यसम्मेलनाला एक नवा आकृतिबंध हवा आहे. त्याचा दरवर्षी सादर होणारा पाच सहा आठवड्यांचा तमाशा झाला आहे. आमची विद्यापीठं ही जशी महाकाय परीक्षाकेंद्रे बनली आहेत, तसे अखिल भारतीय सम्मेलन हे एक अनुदान लाटणारे syndicate झाले आहे. हे डबके फोडण्याची गरज आहे.

ट्विटर @pradeepfarmer wp-
9766948668

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.