संकोच स्थलकालाचा: आणखी कशाकशाचा?

दूरचित्रवाणी व संगणक–महाजाल प्रणालीने माध्यम व शिक्षण यात काय प्रगती/क्रांती केली त्याची वर्णने नव्याने करण्याची गरज नाही. ती गृहीत धरून, या माध्यमांच्या दुसऱ्या बाजूविषयी व एकंदरच संज्ञापन, ज्ञान, शिक्षण यांबद्दल आपण चिकित्सक व्हावे, त्यासाठी काही मुद्दे:
शिक्षणाच्या दोन अंगांचा माध्यमांच्या दृष्टीने अधिक विचार होणे जरुरीचे आहे : मुलीचे, युवतीचे किंवा विद्यार्थिनीचे आकलन कसे घडत जाते; आपल्या स्वतःचे व बाह्य जगाचे तिचे आकलन (पर्सेप्शन) बनवायची प्रक्रिया ही शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तिच्यात कोणती मूल्ये ठसवली जातात, अंगभूत होतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे. या आकलनाच्या व मूल्यांच्या दोन बिंदूंतून ज्ञान, माहिती यांसारख्या विषयांची रेषा जाते. अनेकदा, विशेषतः माध्यमांच्या बाबतीत, आकलनपद्धती हीच आशय किंवा मूल्य बनते. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकलुहान यांच्या मांडणीत ‘माध्यम हाच संदेश’ (Medium is the Message) हे सूत्र आहे.
कोणत्याही माध्यम-व्यवस्थेचे (अ) संदेश देणारी, (ब) ग्रहण करणारी व्यक्ती अथवा समूह व (क) संदेश असे भाग असतात. हा संदेश (ड) माध्यमांद्वारे ग्रहणकापर्यंत जातो व त्या संदेशाचा (इ) प्रतिसाद (फीडबॅक) याद्वारे हे माध्यमवर्तुळ पूर्ण होते. माध्यमाचे स्वरूप हे आकलनाचे स्वरूप व संदेशाची निवडही कमी-अधिक प्रमाणात ठरवत असते. म्हणजे वृत्तपत्रे, पुस्तके, दूरचित्रवाणी, सिनेमा, ईमेल-इंटरनेट यांतून आपल्या आकलनाचे स्वरूप ठरत जाते. अगदी आपण हाताने लिहितो, त्यातूनही आपले आकलन आणि अभिव्यक्ती यांचा आकार ठरत जातो. मॅकलुहानने
तर छापण्याच्या/टाइपच्या तंत्राची आधुनिक (मॉडर्न) युगातील विवेकनिष्ठ (रॅशनल) व एकरेषीय विचारपद्धतीशी (लीनियर रॅशनालिटी) सांगड घातली होती. शिक्षण व माध्यम असा विचार करताना माध्यमांच्या अंगभूत घटकांचे महत्त्व लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला कोणता आशय व मूल्ये घ्यायची आहेत त्यानुसार त्यात्या माध्यमांची, त्यांच्या अंगभूत वैशिष्ट्यांची निवड करावी लागेल.
या लेखात त्या दृष्टीतून दूरचित्रवाणी व संगणक महाजाल या दोन माध्यमांचा व शिक्षणाचा (आकलन व मूल्ये यांचा) काही विचार आहे.
टेलिव्हिजनला सामान्यतः
उथळ माध्यम म्हटले जाते. ते दृक्-श्राव्य असले तरी तो सिनेमा नव्हे. सिनेमातील प्रतिमा, प्रवाहित्व, काल व टेलिव्हिजन प्रतिमा यांत फरक आहे. तो स्वतंत्र विषय आहे. टेलिव्हिजन ही वेगवान, म्हणजे क्षणिकांची साखळी होय. यात अवकाश (Space — जागा) व काल (Time — वेळ). म्हणजे एकंदरच अनुभूतीचा–अभिव्यक्तीचा संकोच आहे. जे काही सांगायचे, ऐकायचे व पाहायचे आहे त्यासाठी जागा व काळ कमी आहे. तुम्ही जिंगल्स, घोषवाक्ये, दहा सेकंदांच्या जाहिरातवजा ‘स्किट’मध्ये जे सांगू शकाल तेवढेच देता व पाहता. अगदी राजकीय ‘चॅट शो’ हा चटपटीत ‘चाट’ प्रमाणे थोडक्यात पण चमचमीत हवा; पुढारी–विचारवंतांच्या घोषणा– आरोप-प्रत्यारोप–खडाजंगीतच कॅमेरा दुसरीकडे जातो. सर्वच गोष्टी ‘आत्ता’, ‘पटकन’, ‘चमकदार’ व ‘आकर्षक पद्धतीत दोन मिनिटांत हव्यात अवकाश-काळ संकोचत चालल्यामुळे तो महाग होत चालला आहे. म्हणून तुम्ही अर्ध्या तासाची मालिका पहा किंवा पाच-सात मिनिटांचा कार्यक्रम—-त्यात तीन जाहिराती येणारच. प्रत्येक भाग हा फार तर पाच-सात मिनिटे सलग पाहता येतो. त्या पाच-सात मिनिटांची किंमत फार जास्त होते. म्हणून त्या वेळात/जागेत सेकंद न् सेकंद कशाची तरी जाहिरात असते. मालिकेतले (गरिबाचेही) घर नावाचा राजवाडा, त्यातले फर्निचर, कपडे, त्यातल्या साबणासारख्या सपाट गुळगुळीत बायका-पुरुष, यांतून कशाची ना कशाची जाहिरातच केली जाते–कपडे, वस्तू, फर्निचर, घराचे इंटीरिअर व स्त्रीपुरुषांची मॉडेल्स यांचे मार्केटिंग सुरू असते. त्याच्या मागे मालिका तयार करणाऱ्यांच्या हितसंबंधां-बरोबरच त्या माध्यमाचे वैशिष्ट्यही असते. एवढ्या कमी काळ-अवकाशात ‘परिणाम’कारक काही द्यायचे/दाखवायचे तर ते ‘तीव्र’ स्वरूपाचेच असेल. ठोकळ-ढोबळ किंवा बटबटीत संवेदना संक्रमित करण्याचा मोह (किंवा बंधन) त्या क्षणिकतेतून व वेगातून होतो. म्हणूनच प्रत्येक बाब रंजक, चमचमीत, गोड, झणझणीत हवी असते, जेणेकरून त्यांची त्वरित किक मिळावी, यांतून ग्रहणकाचा ध्यानकाल (attention span) हा पाच-दहा सेकंदाचा झाला आहे.
या सर्वांचे आपल्या सर्वांच्या विशेषतः मुलींच्या (व मुलांच्या) आकलनावर काय परिणाम होत आहेत हे स्पष्ट आहे. या क्षणिकवादा(!) मुळे आपल्याला काही अनुभव घ्यायचे असतात, त्यांच्यावर प्रक्रिया होण्याची गरज आहे, याचे भान जात चालले आहे. कणाकणाने, एकेका प्रसंगाने, अनेक संकेतांनी (nuances) आणि हळूहळू (होय हळूहळूच) एखाद्या घटनेला/वस्तूला/स्थितीला अर्थ प्राप्त होतो, ही जाणीव नाहीशी होत आहे. जे काय आहे ते झटपट, ‘रिझल्ट ओरिएंटेड’ हवे, असे मानस होत आहे. शिक्षणाच्या मूळ गृहीततत्त्वांशीच हे विसंगत आहे; पेक्षा, समजून येणे–घेणे, त्यातला एक करडा प्रदेश—-ग्रे एरिया, संदिग्धतेतील किंवा प्रतीक्षा करण्यातील बारीकसारीक संवेदनांचे विश्व, याला मुले वंचित होत आहेत. आपल्याला फुरसत नाही—-ती फुरसतही नको. जेरी मँडर या माध्यमतज्ज्ञाने म्हटले आहे की ‘स्मॉल इज ब्यूटिफुल’ (छोटे ते सुरेख) याप्रमाणेच ‘स्लो इज आल्सो ब्यूटिफुल’ (मंदगति देखील छान असते). गति, वेग हा कुठे हवा; नको याचा विवेक करण्याची क्षमता आवश्यक आहे. प्रक्रियेतही आनंद असतो; आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टीत, माणसांतही आनंद असतो, याचेही भान हवे. ते सुटत चालले का हे पाहावे लागेल.
नव्या माध्यमात संगणकप्रणालीच्या आकड्यांप्रमाणे शून्य व एक—-होय व नाही या दोनच शक्यता अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे हार किंवा जीत या दोनच शक्यतांचे आज भान राहिले आहे. (आठवा—-“अपनी जीत हो—- उनकी हार हो’ चित्रपट—-ऑस्कर ‘लगान’). होय व नाही, हार व जीत यामध्ये एक फार मोठा व्यामिश्र प्रदेश असतो; गोड-तिखटामध्ये चवींचा, गंधांचा विशाल प्रदेश असतो, हे मुलगी विसरत जाते. “या द्विनाम जोड्यांच्या युगात फ्लॉप किंवा सुपरहिट, ही दोनच टोके आम्हाला दिसू लागली. आमच्या बेनाम भाषेला मध्यम मार्ग समजेनासा झाला. एक व शून्य या टोकांदरम्यानदेखील अनेक सुंदर शक्यता असतात. हळवेपणा, सहानुभूती, निरपेक्ष मदत, मनमोकळी दाद, एकमेकांच्या आनंदातील उत्स्फूर्त सहभाग, सदसद्विवेक, तारतम्य, निर्व्याज कृतज्ञता, माणुसकीवरचा हवाला, बेहिशेबी दोस्ती, कला नावाचा ‘वि-कला’ न जाणारा आदर, गप्पांच्या मैफली, शांत चांदणे, आकाशदर्शन ही सगळी न खरीदता येणारी श्रीमंती आम्ही गमावली. जाहिरातींचा कर्वश ‘कोला’हल पचवता-पचवता आमच्या संवेदना पुरत्या गारठून गेल्या” (डॉ. मंदार परांजपे, सत्याग्रही, सप्टें. २०००).
या स्थितीचा परिणाम म्हणजे मोठा आवाज, चमकदार नसलेले व जे दिसत नाही ते सूक्ष्म आवाजात ऐकण्याची शक्तीच मुलगी —-विद्यार्थिनी—- गमावून बसते.
देहभान?
याचीच पुढची पायरी म्हणजे, प्रत्येक बाब ही दर्शनीय व पुढे प्रदर्शनीय झाली पाहिजे. दुसरे, जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही; ‘असण्या’साठी ‘दिसलो’ पाहिजे व हे दिसणेही समोरच्या कॅमेऱ्याला/निवेदकाला व चालक मालकांना जसे हवे तसे, हे उघड आहे. हा ‘दिसण्या’चा सोस एवढा सर्वव्यापी व प्रभावी झाला की, विद्यार्थिनी सोडाच राजकीय-सामाजिक कार्यकर्ता-नेता, गायक, विद्वान, पत्रकार वगैरे सर्वच ‘फिट’ दिसायचा प्रयत्न करीत असतात. अगदी शास्त्रीय गाणे देखील दर्शनीय पाहिजे म्हणून गायक-गायिका देखणे हवे, किमान चेहरा ‘ठीकठाक’ असावा, थोडक्यात आटपावे, तिने फार हातवारे-हातभाव न करता गुलुगुलूच गावे, तानबाजी वगैरे करून जबडा– जीभ ‘दाखवू’ नये. . . अशा अनेक गोष्टींनी शास्त्रीय संगीतासारखी केवळ स्वरांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रतिसृष्टीची ‘अवस्था’ होते, तेव्हा इतर बाबतीत विचारूच नका. तुम्ही ‘सुंदर’च दिसले पाहिजे. सुंदर म्हणजे काय, तर तिथे या वर्चस्ववादी कंपन्या-भांडवलशहांची निवड असते. थोडक्यात आजच्या पा चात्त्य व भारतीय स्त्री मॉडेल्स, अभिनेत्रीप्रमाणे सर्वांनी दिसावे. स्त्री देहाचे प्रदर्शन ही काही आताच आलेली गोष्ट नाही. मात्र आजचे सौंदर्य ‘गुणात्मक’ दृष्ट्या वेगळेच आहे. (तपशील तर प्रत्येकजण भरू शकेल). नायक-नायिका सोडाच एक्स्ट्राज, कॉलेजातील तरुण पोरे-पोरी, अगदी आया-आज्या देखील त्या एकाच झुळझुळीत पांढऱ्या संगमरवरी (मिल्की व्हाइट), आ mनात्मक स्त्री-देहाच्या प्रतिमानामागे लागल्या आहेत. पुरुषही मागे नाहीत. अरबी घोड्याचे दात मोजून घ्यावेत त्याप्रमाणे त्यांच्या पिळदार शरीराच्या भागांचेही वस्तूकरण होत आहे.
स्त्री-पुरुष, मुले, शिक्षक, म्हातारे-आजी-आजोबा वगैरे सर्वांबद्दल दृश्य व शारीर दृष्टी आता पसरत आहे. म्हणजे शिक्षक-शिक्षिका शिकवतात-बोलतात कसे, आजी-आजोबा लाड कसे करतात वगैरे याचे महत्त्व नाही; आजोबा स्मार्ट आहेत की नाही ते पाहा. या प्रकारचे आकलन व आशय यांच्याद्वारे माणसाचे अवमूल्यन आपल्या जाणिवेत-नेणिवेत भिनत-झिरपत जाते. नात्यांची व एकंदरच जगण्याची सार्थकता (अर्थपूर्णता), ही त्या व्यक्तीने आपल्या कणा-कणाच्या, क्षणोक्षणीच्या अनुभवांतून, गुणांतून शोधायची नसते, तर ती सतत आढळणाऱ्या प्रतिमानांप्रमाणे दुसऱ्यांत पाहायची, असा प्रकार झाला आहे. माणसाच्या अस्तित्वाचे अनेक पोट-गुण, स्वभाव, लकबी, संबंध-झिरझिरीत होतात व एका विशिष्ट प्रकारचे शारीरिक आकलन हाच एकमेव मानदंड होतो. दूरचित्रवाणी माध्यमाच्या या वैशिष्ट्याचा भांडवली–प्रस्थापित शक्तींनी पुरेपूर लाभ उठविल्यास नवल नाही. मग नाचगाणी, चटपटीतपणा, गुळगुळीतपणा असलेले कार्यक्रम हे या माध्यमातून अधिक येऊ शकतात.
दूरचित्रवाणीत येणाऱ्या चॅनल्समधून दिसतात त्या जाहिराती, गाणी, धारावाहिक मालिका वगैरेंचा राजकीय सामाजिक आशय तर अनेकदा—-अनेकांनी स्पष्ट केला आहे. ज्या प्रकारे बनियावादी आर्थिक शक्ती भाषा, माणसे, प्रसंग, आयुष्यातील अनेक बाबींचे बटबटीकरण करतात ते केवळ विलक्षण आहे. मुलींचे, युवती, प्रौढ बाया, मुला बाप्यांचे तरल व अंतर्मनातील भावविश्वच आपल्याला हवे तसे बदलण्याचा (मॅनिप्युलेट) करण्याचा त्यांचा प्रचंड, बलदंड व वेगवान प्रयत्न आहे. आजूबाजूला पाहिले असता तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत असलेला दिसतो.
अशा माध्यम-प्रतिमांना आत्मसात करून युवतींचे वर्तन, आवडी-निवडी, भाषा (‘यश’ एमटीवी, मिरची रेडिओ भाषा!), त्यांचे विभ्रम व दृष्टी मॅनिप्युलेट होत आहे. एखाद्या मुसोलिनी/हिटलरला दोष आपण त्याच्या कत्तलीबद्दल, युद्धाबद्दल देतो. मात्र त्याने रूढ केलेल्या नाझीवाद-फॅसिझमचा अधिक भयानक प्रकार होता, तो माणसाचे अंतर्मन बदलण्याचा. तशाच धर्तीचा हा नवा फॅसिझम तरुणी-तरुणांमधील अंतर्मन व त्यातील तरल भावविश्व मॅनिप्युलेट करण्याचा आहे. वर्चस्ववादी अर्थराजकारणातला प्रक्रियांचा संबंध मनातल्या गाभ्याला बदलण्याचा असतो. भीषणतेची सवय अशावेळी तथाकथित गंभीर कार्यक्रमांचेही–राजकीय, शैक्षणिक, पर्यावरणीय–पोतेरे झालेले आपण पाहतो—- राजकीय कार्यक्रमात अत्यंत अपवादात्मक रूपात ‘राजकीय’ चर्चा असते—-‘चाट-शो’मधून खमंग, मनोरंजन कसे होईल, दोन भिडूंची कशी जुंपेल, घोषणाबाज ‘एकवाक्यता (one-liners) कशी मिळेल याचा प्रयत्न अँकर नावाची महाप्रज्ञ व्यक्ती किंवा भांडणारे विद्वान करतच असतात. कोणत्याही गंभीर राजकीय विषयाचे दृश्य-रंजक सवंगीकरण होतच असते. मग ते अफगाणिस्तान-पॅलेस्टीन मधील असो वा भारतातल्या गुजरात नरसंहाराचे असो.
इराण-इराक युद्धाच्या वेळी सर्वप्रथम सीएनएनने ब्रेकफास्ट-युद्ध दिवाणखान्यात आणले. त्याच प्रकारे भारतीय माध्यमांतून गुजरात प्रकरण सतत दाखवल्याने त्याची भीषणता व गांभीर्य कमी झाले. नरेंद्र मोदी या माध्यमांना हिंसाचार-रक्तपाताची दृश्ये दाखवतात म्हणून दोष देत होते. मात्र माध्यमांचे प्रकरणच एवढे अजब असते की, एखादी बाब वारंवार दृश्य स्वरूपात समोर आणल्याने ती बाब ‘सवयीची’ होते; त्याची भीषणता, परिणामकारकता अर्थशास्त्रातल्या घटत्या समाधानाच्या सिद्धान्ताप्रमाणे क्रमशः कमी होते. याची आणखी भयानक बाजू म्हणजे या क्षणिकतेतून नवी पिढी अस्थिर, भिरभिरती झाली आहे. त्यांना जरा काही शांतता, स्थिरता नको वाटते. असहिष्णुता व हिंसेसाठी ही ‘योग्य’ चौकट आहे. कोणत्याही महत्त्वाच्या बाबीचे मामुलीकरण करणे ही या माध्यमाची खासियत आहे. हिंसाचार, कामुकता सतत दाखविल्याने मुलांना ‘तसेच करावेसे वाटते’ हा एक भाग असतो; तसेच त्या प्रकारातील आ चर्य-भय-वेगळेपण कमी होणे, त्या ‘अनासक्त भावाने पाहणे हा देखील भाग असतो. काय सवयीचे व्हावे, काय वेगळे वाटावे याचा निर्णय आपण कुटुंबीय, शिक्षक घेत नाहीत, तर दुसरेच घेतात.
या सहजतेच्या-सवयीच्या प्रकरणाबरोबरच दूरचित्रवाणीसारख्या माध्यमात कोणत्याही विषयांचे सपाटीकरण व मामुलीकरण (trivialization) होत जाते. बरेच समाजशास्त्रज्ञ, पत्रकार चॅनल्स इत्यादींचे जोरदार समर्थन करताना त्यामुळे शिक्षण, ज्ञान, माहितीच्या शक्यता वाढतात हे सांगतात. काही प्रमाणात हे खरे वाटू शकते. मात्र त्याची दुसरी बाजू आपण लक्षात घेत नाही. अगदी पर्यावरणावरील, विज्ञान-तंत्रज्ञान वा अन्य ज्ञानावरील कार्यक्रम देखील या क्षणिकतेच्या अर्थराजकारणात गुंतल्याने पुन्हा त्यांना अ-साधारणतेच्या मागे जावे लागते. विज्ञान पर्यावरणाचे कार्यक्रम रोजच्या जीवनातले विज्ञान-पर्यावरण सांगणारे नसतात; तर बहुतकरून प्रेक्षणीय, अचंबित करणारे, ‘काहीतरी अद्भुत’ या सदरातील होतात. विज्ञान-ज्ञान हे नेहमीच्या जगण्याचा, रोजच्या व्यवहारातील एक सहज भाग राहत नाही. वस्तु/प्राणी संग्रहालय किंवा अभयारण्यातील वाघ-दर्शनाची एक प्रकारची मानसिकता तयार त्यामुळे तयार होत जाते. एखादी गोष्ट खूपदा दाखविल्याने सवयीची, रूढ वाटते तर दुसरी गोष्ट चटावर उरकल्यामुळे मामुली होते असा विरोधाचा आभास प्रत्ययाला येतो.
पर्यावरण, विज्ञान, शिक्षण या कार्यक्रमांचे व्यापारी मूल्य फार थोडे असल्याने एकंदर नाचगाणे, सवंग कार्यक्रमाच्या ९० टक्के भागात २-३ टक्के हे विषय, उरकून टाकल्यानुसार (also ran) समोर येतात. त्यामुळे या विषयांचे परिघावरचे व मामुली स्थानही अधोरेखित होते व त्याची गंभीरताही जाते. त्यामुळे हे कार्यक्रम अधिक आकर्षक वगैरे करण्याच्या नादात विषयाचा गाभा हरवला जातो. फार फरक नाही
औपचारिक शैक्षणिक व ज्ञानप्रधान बाबी या दृक्-श्राव्य माध्यमाची हत्यारे व संकल्पना वापरून प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचतात का, संज्ञापित (कम्युनिकेट) होतात का हा प्रश्न अनेक माध्यम शिक्षणतज्ज्ञांना पडला आहे. गणित, भाषा, विज्ञान हे विषय खडू-फळा, व्याख्यान (लेक्चर) या पद्धतीने अधिक व्यवस्थित संज्ञापित होतात की दृक-श्राव्य क्लृप्त्या वापरून होतात? लाँगशॉट, झूम, ग्राफिक्स, जोड-तोड, लहान-मोठे, एकात-एक इत्यादी दृक-श्राव्य माध्यमांच्या क्लृप्त्या प्रभावी संज्ञापनात अडथळा तर निर्माण करीत नाहीत? थॉमस रसेल नावाचे अमेरिकेतील एक शैक्षणिक व्हिडिओपटांची निर्मिती करणारे नामवंत तज्ज्ञ एकदा म्हणाले, “अशा प्रकारे एखादा विषय दाखवणारा व्हिडिओ व त्याचबरोबर एका प्रोफेसराचे खडू-फळ्यासह अर्ध्या तासाचे चित्रित केलेले व्याख्यान, यांपैकी काय अधिक परिणामकारक असे विचारता, विद्यार्थ्यांनी त्या प्रोफेसराचे साधे व्याख्यानच विषय कळण्यासाठी अधिक परिणामकारक ठरल्याचे सांगितले.”
पारंपरिक (म्हणजे शिक्षक, व्याख्यान, प्रश्नोत्तरे, फळा-खडू इ.) पद्धतींपेक्षा हे व्हिडिओ माध्यम शिक्षणाच्या दृष्टीने किती अधिक फरक करू शकते, याबद्दल अमेरिकेतील अनुभव सांगताना रसेल म्हणाले, “आम्ही या व्हिडिओंची छाननी केली, पुन्हा गाळणी लावली; त्यांना ‘उकळून’, ‘गाळून’ पुन्हा वस्त्रगाळ केले—-तेव्हा त्या खदखदत्या अनुभवातून तीन शब्द वर आले—- No significent difference’–(विशेष फरक नाही)!’
औपचारिक शिक्षणाच्या बाबत दृक्-श्राव्य माध्यमांचा कितपत उपयोग आहे; त्याबद्दल पूर्वाग्रह न ठेवता चर्चा व्हावी. व्यापक संदर्भ
वस्तुतः माध्यमाच्या या विचारांच्या ज्या अर्थ-राजकीय व व्यापारी संदर्भात हे सर्व येत आहे, ज्या कारणांसाठी आपले भावविश्व आकलनपद्धती घडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांचा संदर्भ अपरिहार्य आहे. जागतिकीकरण व नवभांडवलशाहीच्या संदर्भात टीव्ही चॅनेल्स, त्यातील कार्यक्रम, जाहिराती, व्यक्ति व समाजचित्रण यांचा विचार करावा लागेल. १९९० च्या दशकांपासून आजवर सुरू झालेल्या भारतीय चॅनल्समध्ये, त्यांच्या मालिकांमध्ये समाज, त्यातील शोषण, गरिबी कुठे दिसते का? झी टीव्हीने तर मालिका-निर्मात्यांना सांगितले की झोपड्या, दरिद्री माणसे दाखवायची नाहीत; अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसरीकडे भाषा, अभिव्यक्ती यांच्यातील वैविध्य, विभेदन, बहुतता लोप पावून एक सर्वनामी भाषा रूढ होत आहे. अनुभवांच्या वस्तूंच्या विविध छटा, त्यांना वेगवेगळ्या संज्ञा, शब्द यांचा लोप होण्याबरोबरच देशी भाषा, बोलीभाषा, देशी पोषाख, स्वयंपाक इथपासून वर्तनपद्धती, विचारपद्धती यांचे अवमूल्यन सुरू आहे. सपाट, गुळगुळीत, भडक संवेदनांत सर्व काही संकोचले जात आहे. व्यापारीकरण, जागतिकीकरणामुळे लोकशाही वगैरे येते म्हणणाऱ्यांना हे ध्यानात आणून द्यावे लागले. या सर्व संदर्भात दूरचित्रवाणीचे आकलन व मूल्ये यांची द्वंद्वात्मक घडण होते व तिसरे आपण! धीमे चलो . . .
संगणक व महाजालप्रणालीचा विचारही आपणाला याच संदर्भात करावा लागेल. टीव्ही प्रमाणे, संगणकानेही अनेकांचे जीवन व कार्य व्यापले आहे. सत्ताधारी, निर्णयकर्ते, तज्ज्ञ, व्यापारी ते कार्यकर्ते, क्रांतिकारक इथपर्यंत सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने व दृष्टिकोनातून त्यांचा वापर करतात. एखादी बाब समकालीन व (फक्त तीच) उपलब्ध आहे म्हणून तिचा वापर करणे वेगळे, अन् त्यालाच एकमेव व सर्वश्रेष्ठ–प्रमाण मानून त्याच्या आधारावर इतर गोष्टींचे माप घेणे वेगळे. मात्र आज ज्या पद्धतीने काही जण भोवंडून गेल्याप्रमाणे या संगणक इंद्रजालप्रणालीचे स्तोम माजवत आहेत, ते पाहता आपण आपली माणूस म्हणून असलेली विवेक बुद्धी वापरत आहोत का याविषयी शंका येते. अनेक समकालीन माध्यम व शिक्षणतज्ज्ञांनी याबाबत सखोल चिंतन केले आहे. त्यात या संगणक इंद्रजाल(इंटरनेट)प्रणालीच्या दोन वैशिष्ट्याची खास नोंद आहे : वेग (velocity) व आकार (volume). डेव्हिड ऑरने ‘स्लो नॉलेज’ (धीमे ज्ञान) या निबंधात म्हटले की, “वेग व संदेशांच्या प्रमाणाच्या वाढीच्या व्यस्त प्रमाणात आपल्या संज्ञापनातील नेमकेपणही (salience) कमी कमी होत आहे, त्याची सभ्यता (ऋजुता) घटत आहे. प्रचंड प्रमाणातील संदेशांच्या कचऱ्यातून दाणे वेगळे काढणे मुश्किल झाले. दोनशे वर्षांपूर्वी थॉमस जेफेरसन व जेम्स मॅडिसनने बोरूने कुरूकुरू लिहिलेली, घोड्याच्या बगीतून पाठविलेली पत्रे आजही जादुई असर करतात. तो असर आजच्या टॉम व जेम्सच्या ई-मेल संदेशात असेल काय याची मला शंका आहे.” (कंझर्वेशन बायोलॉजी, खंड १०, ३ जून १९९६).
त्यांच्या मते, मानवी मनाला जे जे शोधणे, सृजन करणे शक्य आहे त्या सर्वांचा आवाका व व्यवस्थापनाची क्षमता आजच्या संगणकीय ‘फास्ट नॉलेज’मध्ये नाही. माणसाचे मन ज्या गतीने एखादे ज्ञान आकलन करून, त्याचा सातत्याने बरा उपयोग करू शकेल, तेवढ्याच गतीने स्लो-नॉलेज वाढते. बाह्य जगातील व्यामिश्रता व मानवी मन बुद्धीच्या कमतरता/मर्यादा (frailties) लक्षात घेता खरे ज्ञान हे वेळ घेत असते व वेळ घेणारच आहे.
“या वेगामुळे जी भासमान वास्तवता (virtual reality) तयार होते, त्यामुळे आपल्या अंतर्मनात निसर्गाविषयीच्या संवेदनाच सपाट होतात.” असे सॅन-फ्रान्सिस्कोतील पब्लिक मीडिया सेंटरचे जेरी मँडर म्हणतात. “आपला विकास, माणसे, यांची गती संथ झाली पाहिजे. नैसर्गिक जगाच्या सूक्ष्म व जरा संथ लाटांशी आपण जुळवून घेतले पाहिजे.”
नव्या तंत्राच्या वेगामुळे व सर्वत्र उपलब्धतेमुळे अधिक लोकशाहीकरण, माहितीचे खुलेपण येत आहे असे सांगणाऱ्यांना ते म्हणतात —-
“टोकियो, ब्रुसेल्स, जिनीव्हा इत्यादी ठिकाणच्या महाकंपन्यांच्या आर्थिक व राजकीय सत्तेचे केंद्रीकरण कधी नव्हे एवढ्या गतीने होत आहे. त्यात संगणकीय प्रणालींची निर्णायक भूमिका आहे. या महाबलाढ्य भांडवली कंपन्या संगणकप्रणालीशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत . . . नव्या तंत्रज्ञानामुळे जगभरातील कंपन्या आपल्या व्यवसायाच्या उलाढालीचे विकेंद्रीकरण करीत आहेत, मात्र त्याचवेळी केंद्रीय नियंत्रणही बळकट करत आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे लोकशाही व्यापक होण्यास मदत मिळेल वगैरे अवडंबर बाजूला ठेवून पाहिले तर, या तंत्रज्ञानामुळे व्यक्तीचे सशक्तीकरण होण्याऐवजी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व बँकांचे सशक्तीकरण होत आहे.” तपशिलात हरवले ज्ञान या माध्यमाचा स्वभाव व त्यावर असलेल्या नियंत्रणाच्या स्वरूपामुळे ते खुले असण्याची शक्यता वाढली आहे, असे अनेकांना वाटते. मात्र त्यासाठी लागणाऱ्या छुप्या सबसिडीजकडे आपलेही फारसे लक्ष नसते. आजच्या आपल्यातील सामाजिक-सांस्कृतिक विषमतेला या संगणकीय महाजालप्रणालीने अधिक खोल व तीव्र केले आहेत. या प्रणालीसाठी महागडी संगणक यंत्रे (कितीही स्वस्त झाली तरी भारतातील १०-१५% लोकांपलीकडे ती असणार नाहीत), सतत वीज पुरवठा व इतर संरचनागत सुविधा (फोन इ.), यांच्याशिवाय ही प्रणाली चालू शकत नाही. महाजाल व त्याच्याशी संबंधित व्यवहाराशी जोडलेल्या, त्यात सहभागी होणारा समाजातील अल्पसंख्य वर्ग व त्यापासून वंचित असणारा स्तर यांच्यात केवळ आर्थिक कुवतीचाच फरक नाही तर मानसिकता व परस्परांबद्दलच्या भावनांचा आहे, याचे संदीप पेंडसे यांनी अत्यंत मूलगामी वि लेषण केले आहे (अभिव्यक्ती, त्रैमासिक, ८ जुलै-सप्टें. २०००).
संगणकप्रणालीमुळे सामूहिक उत्पादन कालबाह्य ठरवले व सामुदायिकतेचे विलोपन सुरू झाले. व्यक्ती व समूहांचे विलगपण ही प्रगती ठरवायची का, यावर प्रत्येकाने निर्णय घ्यावा.
ज्ञानाच्या संदर्भात डॉ. पेंडसे म्हणतात की, “महाजालाचे समाजकारण हे मूलतः नव्या भांडवलशाहीचे समाजकारण आहे. काही विवक्षित परिमाणे व उपांगे महाजालामुळे साकार होतात हे खरे आहे. महाजालांवर अवलंबून असलेला समाज तपशिलांत हरवून गेला आहे. तपशिलांचे, उपलब्ध माहितीच्या व्याप्तीचे, किचकट बारकाव्याचे तो स्तोम माजवतो. . . . माहितीच्या माऱ्याची महाजालाने सुरुवात केली नाही. परंतु या माऱ्याचे रूपांतर भडिमारात मात्र महाजालाने केले. . . . आजच्या समाजाला माहितीची, अपरिष्कृत वास्तवाच्या वर्णनाची झिंग चढली आहे. . . . आजच्या नागरिकाला ‘माहिती’ असते, तिचा अर्थ मात्र ‘माहिती’ नसतो. कारण या माहितीचे वि लेषण करण्याची त्याची फारशी कुवत नसते. माहितीची झिंग चढलेला समाज ज्ञानापासून वंचित आहे तो यामुळे.”
या सर्वांचा संदर्भ आजची वर्चस्ववादी-सामाजिक-अर्थराजकीय व्यवस्था ही गृहीत धरली आहे. त्याचे परिणाम सर्वच डोळसांसमोर असल्याने त्याचे वर्णन करून वेळ घेण्याचे कारण नाही. तयार करणे की तयार देणे?
अशा या महाजाल-संगणक प्रणालीतून आकलनाची व मूल्यांची कोणती धाटणी तयार होते याचाही तपास करावा लागेल. औपचारिक शिक्षणासाठी काही प्रमाणात या माध्यमाचा उपयोग आहे. म्हणजे केवळ माहितीच्या स्तरावर काही प्रमाणातच ती उपयोगी आहे. कारण कोणती माहिती घ्यावी, कशी घ्यावी हे निर्णय आपणालाच घ्यावे लागतात व बदाबदा माहिती कोसळताना ते घेण्याची क्षमता सुन्न होऊन बसते. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानासाठी निवड लागते. ती निवड कशी करावी वाचा अनुभव व तज्ज्ञता असणारा गुरु/शिक्षक लागतो. त्यांचे महत्त्व, प्रत्यक्ष संबंध, संज्ञापनाच्या शक्यता महाजाल-संगणक प्रणालीत फिकट होतात.
वस्तुतः माणसाला एवढ्या माहितीची किंवा तयार ज्ञानाची गरज असते का, आकलन-क्षमतेत व ज्ञानात ते भर घालते का, हे प्रश्नच आहेत. जमिनीला ज्याप्रमाणे नेमकेच पाणी लागते. तसे ज्ञान-माहितीचे आहे. पाणी जादा झाले की जमीन चिबड, उदास होते; तसे मेंदूचे आहे.
आपल्याला काही संकेत, काही माहिती हवी असते. त्याच्या आधारावर पुढची प्रक्रिया आपण स्वतः, आपल्या प्रयत्नाने, निर्मितिक्षमतेने करू शकतो; करण्याची क्षमता यावी. तेच आपले शिक्षण व ज्ञान असते. शिक्षणाच्या सर्वच व्याख्यांमध्ये घास भरविणारे, लादलेले ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर स्वतः शोध घेण्याची, विचार, वि लेषणाची क्षमता वाढवणे हे शिक्षण होय. सर्व गोष्टी झटपट तयार करून समोर मिळणे हे योग्य व ‘आपले’ शिक्षण आहे; की स्वतः प्रयत्न करून, आपण स्वतः मिळवलेले, शोधलेले ज्ञान अधिक भरीव असते? त्यासाठी स्वतःचे प्रयत्न–प्रसंगी कष्ट, वेळ देणे, यांना महत्त्व नाही? अनुभव हा आपले आकलन, अभिव्यक्ती व मूल्ये अधिक समृद्ध करत जातो. त्या अनुभवाला वेळ द्यावा लागतो; साध्या वाटणाऱ्या गोष्टीतून तो कणाकणाने, अनेक बारीक-सारीक संकेतातून अंगभूत होत जातो. या सर्वांना काळाच्या व तंत्राच्या दृष्टीने नव्या माध्यमात स्थान आहे का?
माणसाच्या अंगभूत शारीर, मानसिक, बौद्धिक क्षमता वाढणे, विकसित होणे, तीव्र व लखलखीत होणे हे शिक्षण असेल तर सुंदर अक्षर लिहिण्याची, डोक्यातल्या डोक्यात आकडेमोड करून तत्क्षणी उत्तर ‘दिसण्याची’ क्षमता यांचा -हास होणे म्हणजे शिक्षण, प्रगती आहे का? आइन्स्टाइनची गोष्ट सर्वांना माहीत आहे. एक महा गुंतागुंतीची, मोठी दुर्बीण आइन्स्टाइन दांपत्याला दाखविल्यावर त्यांच्या पत्नी म्हणाल्या—- “अस्से! म्हणजे माझा नवरा वापरलेल्या लिफाफ्यामागे लिहून काही आकडेमोड करतो त्यासाठी ही दुर्बीण आहे तर!”
आइन्स्टाइन फार मोठे उदाहरण झाले. मला माझा एक ज्येष्ठ सहकारी आठवतो. एका वृत्तपत्रात कामाला असताना, आमचे नेहमीचे वृत्तसंपादक असंख्य फायलींचे ढिगारे, यंत्रे, कॅल्क्युलेटर्स, भरीला कंप्युटर वगैरे घेऊन नुसते थैमान घालत असायचे. तरीही अंक वेळेवर–ठीक निघत नसे. त्यांच्या बदली आलेला एक मित्र होता. त्याने सर्व कचरा टेबलवरून हटवला; सगळी यंत्रे बाजूला सारून, फक्त एक रजिस्टर व स्केल घेऊन शांतपणे तो बसून असायचा. सहकाऱ्यांना एखाद-दुसरी सूचना, काही काम द्यायचा. अंकाचे काय करायचे, कुठे काय टाकायचे हे त्याच्या डोक्यात स्वच्छ असायचे. म्हणून तो गोंधळ घालायचा नाही; ना त्याला सर्व यंत्रांची गरज होती. अनुभवातून त्याचे गणित ‘परफेक्ट’ होते. अंक चोख, वेळेवर; सहकाऱ्यांना कचकच नाही; त्याला ताण नाही—-असा मामला होता. कसलेच अवडंबर नव्हते, तरी सर्व चोख, कार्यक्षम. तो माणूस आतूनच तयार होता.
अशी उदाहरणे आपण पाहत असतो. हे आपले आतून तयार होत जाणे, लख्ख आकलन व अभिव्यक्ती असणे—-ती क्षमता वाढणे, आणि हे सर्व कशासाठी याचे भान असणे, ही प्रगती, हे ज्ञान, हे शिक्षण आहे. तसे असेल तर ‘जे जे नवे ती प्रगती व ज्ञान-तंत्रज्ञान’ हा हटवाद सोडून, त्याला त्याची योग्य ती पायरी दाखवावी लागेल. स्वतः मेहनत घेऊन, प्रयत्न करून सतारीच्या तारेतून एखादी मींड वा थेट स्वर लावणे ही प्रगती आहे की सिंथेसायझरवर सर्व वाद्याची बटणे दाबणे हे विकासाचे शिक्षणाचे गमक आहे, ते ठरवावे लागले. त्यानुसार आपली उत्तरे ठरतील.
[हा लेख मागील विशेष जोडअंकासाठी आलेला, पण जागेच्या अभावी पुढे ढकललेला आहे.
–संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.