नुकतंच ‘स्टोन्स इन्टू स्कूल्स’ (लेखक ग्रेग मॉर्टेन्सन, अनुवाद – सुनीति काणे) हे पुस्तक वाचून झालं.
ग्रेग हा अमेरिकन गिर्यारोहक. तो काराकोरम पर्वतराजीतल्या K2 या जगातील दुसऱ्या सर्वोच्च (एव्हरेस्ट नंतर) शिखराच्या मोहिमेवर एकटाच गेलेला असतो. वातावरण खूप खराब झाल्यामुळे परतताना White-out झाल्याने तो वाट हरवून बसतो व काही दिवसांनी कोर्फे या पाकिस्तानातील एका भलत्याच गावात पोहोचतो. येथील गावकरी त्याला आसरा देतात. मदत करतात.
काही दिवसांनी तो परत जायला निघतो तेव्हा, त्याला त्या छोट्या गावातील लोक निरोप द्यायला जमतात. त्यातील एका चिमुरडीला ग्रेग विचारतो की मी तुला काय देऊ? तेव्हा ती चिमुरडी म्हणते, “मला शाळा हवी आहे.” या एका वाक्यानं ग्रेगचं आयुष्यच बदलतं.
तो अमेरिकेत जातो आणि तिथल्या मित्रांकडून व परिचितांकडून पैसे गोळा करू लागतो. दोन वर्षांनी तो परत कोर्फे या पाकिस्तानमधल्या गावी येतो आणि एक चार खोल्यांची मुलींची शाळा बांधून देतो व तिथे शिक्षिकेची कायमची सोयही करतो. त्याच्या या कार्याची सगळीकडे चर्चा होऊ लागते व पाकिस्तानातील अनेक भागांतून, पर्वतीय प्रांतांतून अशाच शाळांची मागणी त्याच्याकडे होऊ लागते. मग ग्रेग झपाटल्यागत अमेरिकेत, “पाकिस्तान व तेथील शिक्षणाची गरज” यावर शेकडो व्याख्यानं देतो. लोकांच्या मदतीचा व डॉलर्सचा पाऊस पडू लागतो. ग्रेग एक ट्रस्ट स्थापन करतो. या ट्रस्टमार्फत तो एकामागोमाग एक शाळा बांधत सुटतो. पाकिस्तानातील सर्फराज हा हरहुन्नरी व प्रामाणिक गृहस्थ त्याला मिळतो. हजारो मुस्लिममुली शिक्षण घेऊ लागतात. मग पार तालिबान्यांचा जोर असलेल्या प्रांतांतूनही ते काम चालू करतात. तालिबान्यांचा त्यांना त्रास होतो पण त्यातूनही ते मार्ग काढत राहतात. काही महिने पाकिस्तानात कामं करणं व काही दिवस त्या अनुभवावर व तिथल्या मुलींच्या शैक्षणिक व्यवस्थेवर अमेरिकेत शेकडो व्याख्यानं देणं असंच ग्रेगच जीवन बनतं. अगदी UNO व इंग्लंड येथूनही त्याला भाषणासाठी आमंत्रणं येतात. हे कार्य पुढे इतकं वाढतं की युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानातूनही त्याला शाळेसाठीचे अर्ज मिळतात, तेथील अनेक टोळीवालेही शाळेसाठी येऊन भेटतात.
मग हिंदुकुश पर्वतरांग पार करून तो अफगाणिस्तानात त्याचं शिक्षणाचं, शाळांचं काम वाढवतो. अगदी अफगाणिस्तान व किरगिस्तान यांच्या सीमेवरील पामिर पर्वतरांगांच्या अतिदुर्गम भागांतून शाळा बांधण्याचं अत्यन्त अवघड काम पार पाडतो. तिथल्या डोंगरातील दगड, पाथरवटांकडून आकार देऊन शाळेच्या भिंतींसाठी वापरतात. असं झपाटून काम करता करता १६ वर्षे निघून जातात आणि १३० पेक्षाही अधिक शाळा बांधून होतात.
जिथे कधीच शिक्षणाची पणतीही पेटलेली नसते तिथे शिक्षणाचा दिवा अव्याहत पेटू लागतो.
१९९६ च्या आसपास ग्रेग हे काम सुरू करतो ते अगदी २००९ पर्यंत अव्याहत चालू राहते. याच कालखंडातील अनुभव, अडचणी व कार्य यांवर हे पुस्तक ग्रेगने स्वतः लिहिलं आहे आणि ते संपूर्ण सत्य आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेवर ९/११ चा हल्ला होतो तरी ग्रेग त्याचं काम थांबवीत नाही कारण शिक्षणाचा उजेड पसरवायचा, हाच एक ध्यास त्याला लागलेला असतो.
एक गिर्यारोहक अनेकांना सोबत घेऊन काय करू शकतो त्याची ही सत्यकथा. अनुवादित पुस्तक मेहता पब्लिशिंगचे आहे.