विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
“राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं सिद्ध केल्यानं फलज्योतिषाची लोकप्रियता कमी होईल असं तुला खरोखरंच वाटतं का? “
“खरं सांगू का? फलज्योतिष हे केवळ भ्रामक कल्पनामात्र आहे, हे सिद्ध केल्याने त्याची लोकप्रियता कमी होण्याची सूतरामही शक्यता नाही!”
“काय म्हणतोस? मग काय केल्याने लोकांचे ह्या भ्रमाविषयीचे आकर्षण कमी होईल? की ते कमी होणे संभवतच नाही; असे म्हणून सोडून द्यायचे?”
“हे बघ, आपल्याला जर लोकांनी अश्या भ्रामक कल्पनांना त्यांच्या आयुष्यात थारा देऊ नये असे वाटत असेल तर आधी बहुतांश लोकांना फलज्योतिषाविषयी आकर्षण का वाटते ह्याची कारणमीमांसा करायला हवी. ती कारणमीमांसा जर योग्य असेल तरच आपण त्यावर उपाययोजना करू शकू.”
“पण मग सांग ना राजन्, का वाटतं बहुतांश लोकांना फलज्योतिषाविषयी इतकं आकर्षण?”
“हा विषय इतका व्यामिश्र आहे की कोणाही एकाने ह्याचे उत्तर देणे धार्ष्ट्याचेच ठरेल. त्यामुळे इथे परत एकदा मी disclaimer टाकून देतो.
मी जे काही माझ्या लहानपणी गुरुकुलात शिकलो आणि माझ्याठायी असलेल्या थोडया तर्कबुद्धीने मला जे काही समजते त्याच्या साहाय्याने तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करतो. ती बरोबरच असतील असा माझा दावा नाही, पण मी करत असलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
तर, आपण थोडे आपल्या मागच्या गोष्टीत जाऊ. त्यात आपण प्रागनुभविक/अनुभवनिरपेक्ष (a priori) आणि अनुभवपश्चात/अनुभवसिद्ध (a posteriori) असे ज्ञानाचे दोन प्रकार बघितले. त्यातील पहिल्या प्रकारचे ज्ञान निव्वळ बुद्धीच्या साहाय्याने प्राप्त करण्याची क्षमता आपल्यात असते.
आपण आपल्या पंचेंद्रियांविषयीदेखील बघितले. ह्या पंचेंद्रियांना आणि त्यांमार्फत मिळणाऱ्या संवेदनांना केवळ वर्तमानातच वावरता येते.
त्या संवेदनांचा अर्थ लावणाऱ्या बुद्धीला मात्र ‘स्मृति’द्वारे भूतकाळात आणि ‘अनुमाना’द्वारे भविष्यात डोकावण्याची क्षमता आहे.
आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपण भूतकाळातील स्मृतींचा पुनःप्रत्यय घेऊ शकतो. तसंच आपल्या स्मृतीत जोडतोड करून तिच्याच आधारावर भविष्यातील स्वप्नेही रंगवू शकतो. परंतु आपली कल्पनाशक्ती ही आपल्या स्मृतीप्रमाणेच निव्वळ आपली एकट्याची (subjective) असते. तिला वास्तवाचे भान नसते. त्यामुळे आपले स्वप्नरंजन भविष्यात प्रत्यक्षात उतरेलच ह्याची अजिबात शाश्वती नसते.
ते वास्तवाचे भान आपल्याला आपल्या तर्कबुद्धीने मिळते.
आपल्या बुद्धीच्या तर्क आणि कल्पना ह्या दोन क्षमतांमधील फरक नीट जाणून घेण्यासाठी आता आपण एक उदाहरण बघू.
उदा. ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ हे आपल्याला तर्काने कळते. ‘दोन अधिक दोन’ पूर्वीदेखील ‘चार’ होत असत, आणि भविष्यातही होत राहतील.तसेच ‘दोन अधिक दोन’ पृथ्वीवर जसे ‘चार’ होतात तसेच ते चंद्रावरही ‘चार’च होतील. त्यासाठी प्रत्येक उदाहरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची गरज नाही. त्यामुळे हे ज्ञान अनुभवनिरपेक्ष आहे. ते वास्तवाशी सुसंगत आहे म्हणून यथार्थज्ञान आहे. ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ अशी माझी ‘कल्पना’ आहे असे आपण म्हणत नाही. ती जर केवळ माझी कल्पना असती तर मी ‘दोन अधिक दोन’ बरोबर वेगवेगळ्या आकड्यांची कल्पना करू शकलो असतो, तसेच प्रत्येक व्यक्तीची त्याबद्दलची ‘कल्पना’ वेगवेगळी असू शकली असती. परंतु प्रत्यक्षात मात्र ‘दोन अधिक दोन चार’च होतात. त्यामुळे गणिताचे नियम काल्पनिक नाहीत. ते अनुभवानेच प्राप्त होतात असे नाही. ते स्थल, काल आणि व्यक्तिनिरपेक्ष, सार्विक (Universal) आहेत. आणि ते आपल्याला आपल्या तर्कबुद्धीने समजतात.
ही तर्कबुद्धी जरी आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात असली, म्हणजे व्यक्तिनिष्ठ असली तरीही तिची समज सार्विक आहे. म्हणजे ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ हे जसे मला ‘पटते’ तसेच इतर सर्वांनाही (निरपवादपणे) पटते. आणि वस्तुस्थितीही तीच आहे ह्याबाबतीत सर्वांचे एकमत होते.
गणिताच्या नियमांप्रमाणेच वस्तूंचे गुणधर्म, त्यांचे तत्त्व (तत्+त्व), सिद्धांत, निसर्गनियम, कार्यकारणसंबंध, कारणमीमांसा हे ही आपल्याला आपल्या तर्कबुद्धीनेच समजतात.
किंबहुना आपण असं म्हणूया की पंचेंद्रियांमार्फत प्राप्त केलेल्या विशिष्ट (particular) अनुभवांचे संश्लेषण/विश्लेषण करून, कार्यकारणसंबंध जोडून, ‘तर्क’संगती लावून, त्यांमागे दडलेला सार्विक, सर्वसाधारण (universal) नियम आपण शोधून काढतो. आणि एकदा आपल्याला सर्वसाधारण नियम लक्षात आला तर आपण त्याच्या साहाय्याने अचूक भविष्य वर्तवू शकतो.
त्यामुळे भविष्यातील अननुभूत गोष्टींचं यथार्थज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर तर्कबुद्धीला पर्याय नाही.”
“पण राजन्, अजून तू फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची कारणमीमांसा केली नाहीस.”
“अरे, तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे.
‘तर्क’ हा आपला वास्तवाशी असलेला दुवा आहे. तो आपल्याला सतत वास्तवाचे भान आणत असतो. परंतु वास्तव हे भावनाशून्य, निरर्थक आणि निर्हेतुक आहे. त्यामुळे वास्तवाची यथार्थ जाणीव करून देणारी, तर्काची ही आपली बौद्धिक क्षमताही अशीच, शुष्क, अरसिक, भावनाशून्य आहे. ती व्यक्तिनिष्ठ कमी आणि वस्तुनिष्ठ जास्त आहे.
ह्याउलट, कल्पनाशक्तीचं क्षेत्र मनोरंजक, भावनाप्रधान, सोयीस्कर आहे. आपण आपलं व्यक्तिगत कल्पनाविश्व आपल्याला हवं तसं निर्माण करू शकतो आणि त्या कोशातच सुखेनैव गुरफटून राहू शकतो.
आपल्या सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण जास्त. परंतु आपल्या ह्या कल्पनाविश्वाचा फुगा फोडण्याचं काम आपली तर्कबुद्धी करते. आणि त्यामुळे ह्या तर्कबुद्धीची बोच बहुसंख्य लोकांना असह्य होते. तर्कामुळे आपल्या भावना दुखावतात. त्यामुळे तर्काची, वास्तविकतेचं भान देणारी ही आपलीच क्षमता आपल्याला नकोशी वाटू लागते. वास्तवाला सामोरं जाण्यापेक्षा मनोरंजनाकडे/ comfort zone मधेच राहण्याकडे कल वाढतो.
फलज्योतिषाकडेदेखील बहुसंख्य लोक असेच मनोरंजनाच्या दृष्टीने बघतात. त्यांचा फलज्योतिषावर विश्वास असतो ह्याचा अर्थ ते, जे घडायचे ते घडणार, असे समजून हातावर हात ठेवून बसतात असा अजिबात नाही. पण त्यांना हवे तसे भविष्य त्यांना सांगून हवे असते. ज्योतिष्याने वर्तवलेलं भाकीत जर आपल्याला हवं तसं नसेल, किंवा आपल्याला नको ते बदलण्यासाठी त्याने सोयीस्कर उपाय सांगितला नाही, तर मग त्या ज्योतिष्याला काही समजत नाही असे मानून ज्योतिषी बदलला जातो. जोपर्यंत आपल्याला सोयीस्कर, मनपसंद भविष्य सांगणारा, आपले कल्पनाविश्वच पुढे वास्तवात येणार आहे असे भविष्य वर्तवणारा ज्योतिषी मिळत नाही तोपर्यंत असा ज्योतिष्याचा शोध सुरू राहतो.
आता ह्यानिमित्ताने सहजच एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो . . .”
“वाह्, राजन्, आता तर तू मी विनंती नं करतासुद्धा गोष्ट सांगतो म्हणतोयस, मला काय आनंदच आहे, सांग सांग!”
“ऐक तर मग!
आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. एका रात्री राजाला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसलं की त्याचे सगळे दात पडले आहेत आणि तोंडाचं बोळकं झालं आहे. राजा काळजीत पडला. सकाळ झाल्याबरोबर त्यानी स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी राजज्योतिष्याला तातडीचं बोलावणं धाडलं. राजाचं निमंत्रण घेऊन सैनिक राजज्योतिष्याकडे गेले पण राजज्योतिषी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते आणि आठवडाभरानी परतणार होते. त्यांचा मुलगा मात्र घरीच होता आणि तोदेखील आता ज्योतिषविद्येत पारंगत झालेला होता. सैनिकांनी परत येऊन राजास ही माहिती दिली, पण राजाला आठवडाभर थांबण्याचा धीर नव्हता. त्यानं राजज्योतिष्याच्या मुलाला त्याच्यासमोर हजर करण्याचं फर्मान काढलं. त्याप्रमाणे सैनिक मुलाला घेऊन आले. राजाने त्याला पडलेलं स्वप्न मुलाला सांगितलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ विचारला. राजज्योतिष्याच्या मुलानं त्यावर विचार करून राजाला सांगितलं की हा अत्यंत वाईट अपशकुन आहे. स्वप्नाचा अर्थ भयंकर आहे. तुमचे दात म्हणजेच तुमचे समकालीन सगेसोयरे. ते सगळे पडले ह्याचा अर्थ तुमचे हे सगळे सगेसोयरे तुमच्या डोळ्यादेखत मरणार. राजज्योतिष्याच्या मुलाचं हे भाकीत ऐकून राजा अतिशय संतापला आणि त्यानं मुलाचा शिरच्छेद करण्याची प्रधानांना आज्ञा केली. राजाचा प्रधान विचारी माणूस होता. त्यानं राजास विनंती केली की थोडा धीर धरावा, राजज्योतिष्यास येऊ द्यावं आणि त्यास स्वप्नाचा अर्थ विचारून नंतरच काय तो निर्णय घ्यावा, तोपर्यंत मुलास कारागृहात ठेवावं. राजाला प्रधानांचं हे म्हणणं पटलं.
आठवडाभरानी राजज्योतिषी परतल्यावर त्याला राजाच्या दरबारात आणलं गेलं. राजानी परत आपल्याला पडलेलं स्वप्न सांगून त्याचा अर्थ विचारला. थोडा विचार करून राजज्योतिषी उद्गारला, महाराजांचा विजय असो, हे स्वप्न म्हणजे एक अत्यंत चांगला शुभशकुन आहे. महाराज, आपणांला दीर्घायु प्राप्त होईल असा ह्या स्वप्नाचा अर्थ आहे.
राजज्योतिष्याचं हे भाकीत ऐकून राजा आनंदला आणि त्यानं आपल्या गळ्यातील मोत्यांचा कंठा काढून राजज्योतिषाच्या हातात दिला. राजा अशाप्रकारे खूश झालेला बघून राजज्योतिषी राजाचा कंठा परत देत अत्यंत नम्रपणे राजास म्हणाला, महाराज आपण मला ह्या कामासाठीच पदरी बाळगलं आहे, मला ह्या कामासाठी वेगळी बिदागी नको. फक्त माझी एक विनंती आहे तेवढी कृपया मान्य करावी. माझा मुलगा अननुभवी आहे. त्यानी केलेल्या चुकीबद्दल त्यास मोठ्या मनाने क्षमा करून मुक्त करावं.
राजज्योतिष्याची नम्रता बघून राजा प्रसन्न झाला आणि त्यानं मुलाची मुक्तता करण्याचा आदेश दिला.
घरी परतल्यावर मुलगा वडिलांना म्हणाला, “तात, राजाला त्याच्या स्वप्नाचा असा कोणता अर्थ सांगून माझी सुटका करवलीत?” त्यावर राजज्योतिषी म्हणाला, “बाळ, तू जो अर्थ सांगितलास तोच मी ही सांगितला, फक्त शब्द बदलून. महाराजांना दीर्घायु प्राप्त होईल ह्याचाच अर्थ त्यांच्या समकालीन सग्यासोयऱ्यांहून ते जास्त जगतील किंवा त्यांचे सगेसोयरे त्यांच्या डोळ्यादेखतच मरतील. तू हे कटू शब्दांत सांगितलंस आणि तुला देहदंड मिळाला. मी स्वप्नाचा तोच अर्थ वेगळ्या पद्धतीनं सांगितला, त्यांना आवडेल, रुचेल असा, त्याला माधुर्याचा मुलामा देऊन, आणि त्यामुळे तुला जीवदान मिळालं! आणि ह्यानिमित्ताने तुला फलज्योतिष सांगण्यातील दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्याची संधी मला मिळाली.
त्यातील पहिली गोष्ट अशी की आपल्या ग्राहकाला आवडेल अश्याप्रकारे भविष्य सांगितलं तरंच आपला व्यवसाय वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की, शब्दयोजना अशी करायची की आपण सांगितलेल्या भविष्याचा पडताळा ग्राहकाला शक्यतोवर घेता यायला नको.”
मला सांग की राजा खरोखरच सगळ्यांत दीर्घायुषी होईल अथवा नाही ह्याचा पडताळा तो स्वत:च कसा घेणार?”
“छान गोष्ट सांगितलीस राजन्, तुलाही आता चांगलीच प्रॅक्टिस होते आहे गोष्ट सांगण्याची. पण असो, माझं अजून समाधान जरी झालं नसलं तरीही तुझ्या मौनव्रताचा मात्र भंग झाला आहे, तेव्हा तुझ्या उत्तराचा पुढचा भाग आता पुढच्या खेपेस सांग.”
असे म्हणून वेताळ निघाला आणि झाडावर जाऊन लोम्बकळू लागला.
व्वा. छान मनोरंजक वैचारिक लेख.
मार्मिक भाष्य आहे या लेखात. असेच लेख सतत वाचायला आवडतील.
“भविष्यातील अननुभूत गोष्टींचं यथार्थज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर तर्कबुद्धीला पर्याय नाही.”ह्या विक्रमादित्याच्या भूमिकेविषयी वेताळाला काही प्रश्न उपस्थित करता आले असते.ते असे की,
ज्याच्या सत्यतेविषयी कोणताही समंजस मनुष्य शंका घेऊ शकणार नाही,असे निःसंशयपणे सत्य असलेले काही ज्ञान जगात खरचं आहे काय? ते असेल,तर ते ज्ञान मिळविण्याची रित काय?आपला जगाचा अनुभव हा आंशिक व मर्यादित असतो, म्हणून’काही’ वरून ‘सर्वांविषयी’ विधान करणे कितपत खात्रीशीर ठरते?हे जर,अनुभवपूर्व ज्ञान असेल,तर ते ज्ञान तर्कबुध्दीस कसे लाभते?आणि ज्ञान हे जर विभागश:च शक्य असेल तर एकाच वेळी संपूर्ण ज्ञान( आणि तेही अनुभवपूर्व ) कसे होऊ शकेल?
कोणी जर तत्त्वज्ञानातील अडचणीचे प्रश्न विचारू लागले तर आपले धोरण काय ठेवायचे ह्याविषयी विक्रमादित्याने आपला हट्ट सुरू ठेवण्यापूर्वीच मनाशी पक्क्या खूणगाठी बांधून ठेवल्या होत्या.
त्यात पहिली होती, संपूर्ण दुर्लक्ष! जणू प्रतिक्रिया आली हे आपल्या गावीच नाही असा आविर्भाव ठेवायचा.
दुसरी होती, disclaimer टाकण्याची.
म्हणजे; माझ्या लहानपणी मी जे काही गुरुकुलात शिकलो आणि माझ्याठायी असलेल्या थोड्या तर्कबुद्धीने मला जे काही समजते त्याच्या साहाय्याने तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करतो.
ती बरोबरच असतील असा माझा दावा नाही, पण मी करत असलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
तिसरी खूणगाठ होती ती अशी की, आम्ही हा तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला ‘शिकवणीवर्ग’ नाही. त्यामुळे वेताळाने काय प्रश्न विचारायचे ते आमचे आम्ही, आम्हांला सोयीस्कर असतील तेवढेच प्रश्न आधी ठरवून घेणार. काहींना वेगळे प्रश्न पडत असतील तर मात्र, ‘या शेख, अपनाअपना देख’!
आणि चौथी अशी की, वाह्, खूपच छान प्रश्न विचारलात, इतकेच म्हणून चूप बसून जायचे.
परन्तु, इतःपरही एक संभावना उरतेच, ती म्हणजे तत्त्वज्ञानातील जे प्रश्न वाचकाला पडत आहेत, नेमके तेच प्रश्न विक्रमादित्याने त्याला उत्तर देण्यास सोयीस्कर म्हणून निवडले असण्याची. तसे असल्यास ते पुढील भागांत येतील. परंतु ही फक्त संभावना/शक्यता (probability) आहे. वाचकांस पडलेले प्रश्नच पुढे वेताळाद्वारे विचारले जाऊन विक्रमादित्याद्वारे सोडवले जातीलच असे विक्रमवेताळच काय, त्यांचा रचनाकारही निश्चितार्थाने सांगू शकणार नाही.
पण ते असो, ह्या दरम्यान एक चुटकुला आठवला, तो सांगूनच टाकतो झालं!
तर, रविवारची सकाळ असते, आणि विक्रमादित्य घरी बसलेला असताना वेताळ त्याच्या घरी पोचतो.
वाह् राजन्, आज एकदम टाय आणि कोट घालून? काही विशेष?
अरे आज रविवार, त्यामुळे लोक भेटायला येऊ शकतात, असं आपलं माझं अनुमान. त्यामुळे presentable असायला हवं नाही का?
वाह् ग्रेट, पण हे काय, कोटाच्याखाली साधा घरी घालायचा कच्छा, असं का बरं रे?
त्याचं काय आहे, की आपली दोन्ही बाजूंनी तयारी असावी नाही का?
म्हणजे?
अरे माझं अनुमान बरोबरच येईल कशावरून?
म्हणजे लोक भेटायला येतीलच हे कशावरून? कदाचित कोणीच भेटायला येणारही नाही!
त्यामुळे, खरंच काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला रविवारचा दिवस तरी वाट बघावीच लागणार!
अगदी तशीच, जशी विक्रमवेताळ कथेचे पुढचे सगळे भाग प्रकाशित होऊन आपण प्रत्यक्षात वाचेपर्यंत!
तर वाचत राहा . . . , विक्रम आणि वेताळ @ sudharak.in
वेताळाने उपस्थित केलेले प्रश्न हे विवेकवादाच्या इतिहासातील आद्यप्रश्न होत.जेव्हा आपण विवेकवादाला ज्ञानमीमांसेचा एक वैचारिक पंथ मानतो,तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाचे काय सांगणे आहे?हे आपल्याला पाहावेच लागते.ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाची काय भूमिका आहे,हे जर विवेकवादीच स्पष्ट करण्यात’हो-नाही’ करणार असतील,तर अन्य कुणाकडून काय अपेक्षा करता येईल?ह्या प्रश्र्नांची उत्तरे विक्रमादित्याने दिली नाही,तरी जागोजागी भेटणारे अनेको वेताळ असे प्रश्र्न विवेकवाद्यांपुढे उपस्थित करतच असतात; तेव्हा या मुळप्रश्नांकडे विवेकवाद्याने ‘संपूर्ण दुर्लक्ष’ करण्याचा अर्थ काय होतो? परंतु,कधीतरी वेताळाच्या प्रश्नांना विवेकवादी भूमिकेतून उत्तरे मिळविण्याची संभवनीयता(Probability) आहे,हे ऐकून थोडा आशावाद निर्माण झाला आहे आणि जर,विवेकवादी चिंतनाच्या संस्थळीच ही उत्तरे मिळाली तर त्यांचे मूल्य ‘शिकवणीवर्गाएवढे’ नक्कीच होणार नाही! शेवटी,एवढ्या सुंदर उपक्रमासाठी
श्री.विक्रमवेताळकारांना मन:पूर्वक शुभेछ्या…
ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाचे काय सांगणे आहे?
ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाची काय भूमिका आहे?
ह्या प्रश्नांची उत्तरे, विवेकवादी चिंतनाच्या संस्थळी, ‘संग्रहा’त पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत.
तर वाचत राहा . . .
https://www.sudharak.in/1990/04/2433/
खूप खूप धन्यवाद, सर.