विवेकवाद – १०

स्वामी धर्मव्रत यांच्या पत्रास उत्तर

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारकच्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

ज्ञान म्हणजे काय?
स्वामी धर्मव्रतांचा पहिला प्रश्न असा आहे: ‘शाब्दिक किंवा बौद्धिक अनुमाने म्हणजे ज्ञान म्हणायचे काय? तुमची ज्ञानाची व्याख्या काय आहे?’ या प्रश्नात त्यांना असे अभिप्रेत आहे की शाब्दिक किंवा बौद्धिक अनुमाने ज्ञान देऊ शकत नाहीत. ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान असे त्यांचे मत दिसते.

आता मला असे म्हणायचे आहे की ज्ञान म्हणजे इंद्रियानुभव नव्हे, आनुमानिक ज्ञानही नव्हे, तर ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान असे म्हणणे म्हणजे ‘ज्ञान हा शब्द मुलखावेगळ्या आणि अतिशय संकुचित अर्थाने वापरणे झाले. पाश्चात्य तत्त्वज्ञ सोडा, केवळ भारतीय तत्त्वज्ञ घेतले तरी ‘ज्ञान’ हा शब्द प्रत्यक्ष (ऐंद्रिय) ज्ञान, आनुमानिक ज्ञान, आणि शाब्द ज्ञान अशा अनेकविध ज्ञानांचा वाचक म्हणून ते वापरतात. उदा. तर्कसंग्रह या न्यायवैशेषिक दर्शनाच्या प्रथम पुस्तकात ज्ञान हा शब्द बुद्धि (म्हणजे बोध) या शब्दाचा समानार्थक म्हणून वापरला असून बुद्धीची व्याख्या सर्वव्यवहारहेतुः गुणो बुद्धिः ज्ञानम् ‘ अशी केली आहे, आणि या ज्ञानाचे प्रमा आणि अप्रमा असे दोन प्रकार असतात हे सांगून प्रमा(म्हणजे यथार्थ ज्ञान) प्रत्यक्ष, अनुमिती, शाब्द आणि उपमिती अशी चार प्रकारची असते असे म्हटले आहे. आणि अशीच अवतरणे अन्य भारतीय दर्शनांच्या ग्रंथांतून सहज काढून देता येतील. तेव्हा ज्ञान हा शब्द इंद्रियानुभवातून आणि अनुमानातून मिळणाऱ्या अनुभवाला उद्देशून वापरणे हा केवळ आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञान्यांचाच प्रघात आहे हे म्हणणे खरे नव्हे. मला डोळ्यांनी घटाचे ज्ञान होते, तसेच अनुमानाने या क्षणी इंद्रियविषय नसणाऱ्या वस्तूचे ज्ञान होते असे आपण सर्रास म्हणतो, आणि ही भाषा भारतीय दर्शनकारांना मान्य आहे. ‘ज्ञान या शब्दाची माझी व्याख्या काय आहे ? असे स्वामी धर्मव्रत विचारतात. पण मी व्याख्या देऊ शकत नाही. अतिशय मूलभूत संकल्पनांची व्याख्या करता येत नाही; कारण एका संकल्पनेची व्याख्या तिच्याहून अधिक मूलभूत संकल्पनांच्या साह्यानेच द्यावी लागते, आणि सर्वांत मूलभूत संकल्पनांहून अधिक मूलभूत संकल्पना शक्य नाहीत. ज्ञानाची संकल्पना अशा मूलभूत संकल्पनांपैकी एक आहे. परंतु जरी मी ज्ञानाची व्याख्या देऊ न शकलो, तरी ज्ञानाची निःसंदिग्ध उदाहरणे देऊन ज्ञानाची कल्पना स्पष्ट करू शकतो. उदा. डोळ्यांनी आपल्याला रंगाचे ज्ञान होते, अनुमानाने आपल्याला या क्षणी इंद्रियविषय नसणाऱ्या वस्तूंचे ज्ञान मिळते, इ.

आत्म्याचे स्वरूप
स्वामी धर्मव्रतांचा दुसराआक्षेप मी आत्म्याचे जे वर्णन केले त्यावर आहे. मी म्हणालो की ज्याला प्रत्येक मनुष्य ‘मी ‘ म्हणतो, तो त्याचा आत्मा. आत्मा विश्वाचाच भाग आहे. विश्वात जसे ग्रह, तारे, पर्वत, नद्या आहेत तसेच सर्वांचे आत्मेही आहेत असेही मी म्हणालो. यात पुन्हा स्वामी धर्मव्रतांना घोटाळा दिसतो. आपल्या अनुभवाला येणारे सगळे आत्मे शरीरी आत्मेच असतात, अशरीरी आत्म्याचा आपल्याला कसलाही अनुभव नाही या माझ्या विधानाला त्यांनी आक्षेप घेतला आहे.

पण आपण थोडा शांतपणे विचार करू या. विश्व म्हणजे जे आहे अशा सर्व वस्तूंचा समूह किंवा व्यवस्था. आता माझा आत्मा आहे, आणि तसेच इतर कोट्यवधि आत्मेही आहेत, या सर्वांना अस्तित्व आहे, केवळ एवढ्याच अर्थाने आपले आत्मे विश्वाचा भाग आहेत असे मी म्हणालो. मी असेही म्हणालो की जसे तारे, ग्रह, पर्वत, इत्यादि विश्वात आहेत तसेच आत्मेही आहेत. यावर तसेच या शब्दावर जोर देऊन स्वामीजी म्हणतात की आत्म्याचे तसेच नाही. माझ्या आत्म्याचा मला जो अनुभव येतो तो अशरीरी आत्म्याचा अनुभव आहे, आणि म्हणून तो अनुभव इंद्रियनिरपेक्ष, इंद्रियातीत आहे.

आता निदान हे मान्य करायला हवे की आपल्याला अन्य (म्हणजे आपणाहून अन्य) आत्म्यांचा जोअनुभव आहे तो शरीरी आत्म्यांचा आहे. ज्यांना आपण मनुष्य म्हणतो, ज्यांना संवेदन, सुख-दुखे, ज्ञान इ. आहेत असे आपण मानतो, ती सर्व शरीरे आहेत. आपल्याला त्याचे जे ज्ञान होते ते आपल्या इंद्रियांद्वारा, डोळे, कान, नाक, त्वचा इत्यादींच्या साह्याने; त्याशिवाय नाही. पण मला येणारा माझा स्वतःचा अनुभव, तो तरी अशरीरी आत्म्याचा असतो की नाही ? ‘घटद्रष्टा घटात् भिन्नः’, घट पाहणारा घटाहून भिन्न असला पाहिजे की नाही?

आता आपल्याला जे कोणतेही ज्ञान होते त्याचा आकार त्रिपुटात्मक असतो हे उघड आहे. त्यात नेहमी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असे तीन घटक असतात. यांपैकी ज्ञेय विषय हा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यापैकी एका किंवा अनेक गुणांनी युक्त असतो. ज्ञान म्हणजे त्या विषयाची किंवा वस्तूची होणारी जाणीव. हीही प्रत्येक ज्ञानात असतेच. परंतु ज्ञान आणि ज्ञानविषय यांहून वेगळा असा ज्ञाता काय असतो? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर मिळेल ? आपण जर आपल्या अंतरंगात डोकावलो तर तिथे आपल्या हाताला काय लागते? तिथे आपल्याला एखादे संवेदन, एखादी प्रतिमा, सुख किंवा दुःख, एखादी भावना, इच्छा, विचार यांखेरीज काही आढळत नाही. आपल्याला ज्ञाता कोठेही सापडत नाही. आणि ते स्वाभाविक आहे, कारण आपले ज्ञेय आहे आपण स्वतःच, म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय किंवा ज्ञानविषय एकच आहेत. जो जाणणारा तोच जाणला जाणाराही. तेव्हा आपल्याला त्याचे ज्ञान अन्य विषयांचे होते तसे होणार नाही हे उघड आहे. जसा एखादा स्पर्श आपण विषय म्हणून जाणतो, तसा आपला आत्मा किंवा ज्ञाता विषय म्हणून कसा जाणता येईल? आपण फक्त एवढे जाणतो की ज्ञान ज्ञात्याशिवाय असू शकत नाही, ज्ञानाचा आकार त्रिपुटात्मक आहे, म्हणून आत्मा किंवा ज्ञाता असला पाहिजे असे म्हणायचे. त्यामुळे काही तत्त्वज्ञ असे म्हणतात की आपले विचार ( ज्ञान ) स्वतःच विचारक (thinkers) असतात.

पण येथे क्षणभर थांबून आपण आपल्या स्वतःविषयी बोलण्याकरिता जी भाषा वापरतो तिच्याकडे लक्ष देणेही उद्बोधक आहे. उदा. आपण ज्याला ‘मी’ म्हणतो तो खरोखर मानस आणि शारीर अशा विविध गुणांनी युक्त पदार्थ आहे हे आपल्या लक्षात येईल. समजा अबक नावाचा एक मनुष्य आहे. तो गोऱ्या वर्णाचा, साडेपाच फूट उंचीचा, सडपातळ बांध्याचा, साठ किलो वजनाचा असून या क्षणी तो सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचतो आहे, किंवा मित्रांशी गप्पा मारतो आहे, वाद करतो आहे, किंवा डोळे मिटून कसला तरी विचार करतो आहे. हे सर्व विविध गुण आपण एकाच पुरुषाच्या ठिकाणी आहेत असे म्हणतो. यांपैकी काही गुण, उदा. गोरा वर्ण, साडेपाच फूट उंची, इत्यादि, निर्जीव पदार्थांतही असू शकतात, परंतु काही, उदा. वर्तमानपत्र वाचणे, तत्त्वज्ञानाची चर्चा करणे, किंवा थट्टा विनोद करणे या क्रिया आहेत, आणि ज्याला मन आहे तोच त्या करू शकतो. इथे लक्षात ठेवावयाची गोष्ट म्हणजे शारीर आणि मानस ही दोन्ही प्रकारची विशषणे आपण एकाच पदार्थाला, अबक याला, लागू करतो आणि ते अगदी नैसर्गिकपणे, शब्दांची ओढताण न करता. जो सोफ्यात बसला आहे तोच वाचन करतो आहे. म्हणजे आपली आत्म्याची किंवा पुरुषाची (person) कल्पना शरीरी पुरुषाची आहे, अशरीरी पुरुषाची नाही.
पण निदान अबक हा जर चिंतन करीत असेल, तर तो कोणत्याही शारीर अवयवाने ते करीत नाही, म्हणजे तो अशरीरी आहे असे होत नाही काय? पण हेही म्हणणे कठीण आहे. कारण चिंतन करण्या करिता शरीर अन्य कर्मांत गुंतलेले नको. उदा. डोळे मिटून चिंतन करणारा मनुष्य डोळे उघडे ठेवून आणि अन्य इंद्रियांनी अन्य कामे करीत असताना चिंतन करू शकत नाही. त्याला निवांत बसावे लागते. म्हणजे चिंतन ही सुद्धा शारीर-मानस क्रिया आहे.

आत्मानुभवाचे स्वरूप
या ठिकाणी आत्मज्ञानाचा किंवा आत्मानुभवाचा थोडा आणखी उलगडा करायला हवा. आपल्याला आपली स्वतःची जी जाणीव असते तिचे स्वरूप काय आहे? ते ज्ञान डोळा, कान, स्पर्शोदय इत्यादि बाह्येंद्रियांनी होते की आपल्याला एखादे अंतरिंद्रिय किंवा अंतःकरणही आहे. या ठिकाणी एक मत असे आहे की आपल्या पाच बाह्येद्रियांच्या संवेदनांनी ज्याप्रमाणे बाह्य पदार्थांचे आणि आपल्या स्वतःच्या बहिरंगाचे ज्ञान होते, तसे आपल्या अंतरंगाचे ज्ञानही संवेदनांनीच होते. उदा. आपल्याला भूक लागली आहे, किंवा आपले डोके दुखते आहे, किंवा आपल्याला मळमळते आहे हीही संवेदनेच आहेत. त्यांचा internal sensations किंवा organic sensations (अंतर्वेदने) म्हणतात. काही तत्त्वज्ञ (उदा. कांट) म्हणतात, की आपल्याला बाह्येंद्रियांप्रमाणेच एक अंतरिंद्रियही (inner sense) आहे, आणि त्या इंद्रियाने आपल्याला आपल्या शरीरांतर्गत चाललेल्या घडामोडींची माहिती मिळते. प्रेम, भय, क्रोध, द्वेष, इत्यादि ज्या भावना आहेत त्याचाही अनुभव आपल्याला विविध अंतर्वेदनांनीच होतो. भावनावेगाने हृदयाचे ठोके जोरात पाडतात, श्वासोच्छ्वास जलद होतो, डोळे आरक्त होतात, किंवा चेहरा विवर्ण होतो इत्यादि बाह्य आणि आंतर क्षोभाचे वेदन म्हणजे भावना. आता आपण जिला आपली स्वतःची जाणीव म्हणतो ती कोणत्याही क्षणी आपल्याला जो बाह्य आणि आंतरवेदनात्मक, भावनात्मक, प्रवर्तनात्मक अनुभव येत असतो त्याची बनलेली असते. ही आपली स्व ची, आत्म्याची जाणीव. हिच्याखेरीज आत्म्याची अन्य जाणीव आपल्याला नाही. आता हा आत्मानुभव अशरीरी आहे असे म्हणता येईल काय?

स्वामी धर्मव्रतांचा सवाल आहे ‘दि. य. देशपांडे यांना आत्मा आहे काय? आणि हा अनुभव इंद्रियसापेक्ष आहे की इंद्रियनिरपेक्ष आहे?’ माझे उत्तर आहे, ‘आत्मा हा शब्द मी ‘अहं’ या अर्थाने वापरतो, कारण मला दुसरा कुठलाही अर्थ माहीत नाही. मला आत्मा आहे, म्हणजे मी आहे, मला माझा अनुभव आहे. हा माझा स्वतःविषयीचा अनुभव बाह्य आणि आंतर वेदने, भावना आणि प्रवृत्ती इत्यादिकांचा बनलेला आहे. तो शारीर आणि मानस दोन्ही आहे, कारण शुद्ध मानस असा अनुभव नाही. तो इंद्रियसापेक्षच आहे, इंद्रियनिरपेक्ष नाही. मला जर एकही इंद्रिय नसेल तर माझी संपूर्ण जाणीवच नष्ट होईल. मला जर इंद्रिये नसती तर मला संज्ञाच असणे अशक्य होते, कारण ज्ञानाचा आरंभ ऐंद्रिय ज्ञानापासूनच होतो; आणि जर माझी इंद्रिये मला सोडून गेली तर फार तर स्मृतिरूप ज्ञान थोडावेळ शिल्लक राहील, आणि मग तेही नष्ट होईल. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले शरीर आधी जिवंत राहिले पाहिजे. आणि ते आपली इंद्रिये जोपर्यंत शाबूत आहेत आणि काम करताहेत तोपर्यंतच शक्य आहे.

शरीरपातानंतर आत्मा राहतो म्हणतात. पण हे कसे शक्य आहे ते मला कळत नाही. मला हा शब्दप्रयोग निरर्थक वाटतो. अशरीरी आत्मा आजपर्यंत कोणी पाहिला आहे काय? त्याची खात्रीलायक माहिती आहे काय? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत.

विज्ञानाचे स्वरूप
विज्ञानाविषयी लिहिताना मी असे म्हणालो की ते इंद्रियानुभवावर आधारलेले असून त्याचा आधार उद्गमन नावाचीअनुमानक्रिया असते. अनुमानाचा दुसराही एक प्रकार आहे, निगमन. हे दोन्ही विषय विशाल असून त्यांच्याविषयी चारदोन वाक्यांत विवेचन करणे शक्य नाही; आणि तसेच त्यांचे संपूर्ण विवेचन एका लेखात करणे हेही शक्य नाही. परंतु त्यामुळे गैरसमज उद्भवतात, आणि सयुक्तिक दिसणारे परंतु अयुक्त असलेले प्रश्न विचारले जातात. म्हणून येथे काहीशा विस्ताराने ज्ञानप्रक्रियेचे स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाने फक्त त्याच्या उचित विषयाचे ज्ञान होते. म्हणजे डोळ्यांनी फक्त रूपाचे किंवा रंगीत विस्तारांचे, स्पशेंद्रियाने फक्त स्पर्शगुणांचे, कानांनी फक्त आवाजांचे, इ. ज्ञान आपल्याला होते. आपण म्हणतो की मी आंबा पाहतो; पण आपल्याला प्रत्यक्ष दिसतो फक्त हिरवा किंवा पिवळा आकार. आंब्याचा वास, त्याचा स्पर्श, त्याची चव यांचे ज्ञान अन्य इंद्रियांनी होते. हे सर्व अनुभव एकाच वेळी, किंवा एकानंतर लगेच दुसरा असे आल्यामुळे ते अनुबद्ध (associated) होतात, आणि मग त्यांच्यापैकी कोणत्याही एकाचा जरी आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला तरी त्याच्याशी अनुबद्ध अन्य सर्व अनुभव स्मरणोज्जीवित होतात. उदा. आपल्या दृष्टीस पडते आंब्याचे रूप, किंवा त्याचा वास आपल्या घ्राणेंद्रियाला येतो, आणि आपण म्हणतो की ‘इथे (किंवा हा)आंबा आहे’. हे स्थूल मानाने इंद्रियांनी आपल्याला होण्याऱ्या वस्तूंच्या ज्ञानाचे स्वरूप. या ज्ञानात एकाच वेळी एकच वस्तू (किंवा फार थोड्या वस्तू) असते, उदा. हा किंवा तो आंबा. म्हणून ऐंद्रिय ज्ञान हे एकेकट्या वस्तूचे असते, वस्तुप्रकाराने (उदा. आंबा या जातीचे) नसते.

वस्तुप्रकाराचे किंवा जातीचे ज्ञान म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीचे ज्ञान. उदा. मनुष्य या जातीविषयी किंवा आंबा या जातीविषयी. हे ज्ञान आपल्याला अनुमानाने होते, आणि हे अनुमान उद्गामी असते.

उद्गामी म्हणजे ज्याला ‘inductive’ म्हणतात त्या प्रकारचे. उद्गामी अनुमानाचा सामान्य आकार काही क ख आहेत, म्हणून सर्व क ख आहेत’ असा असतो. त्यात एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयीचा निष्कर्ष काढला जातो. उदा. आपण अनेक कुत्री आणि मांजरे पाहतो. त्या सर्वामध्ये (म्हणजे सर्व कुत्र्यांत आणि सर्व मांजरांत) आपल्याला काही गुण समान दिसतात, आणि त्यावरून आपण अनुमान करतो की सर्व कुत्री स्वामिनिष्ठ असतात, किंवा सर्व मांजरे लबाड असतात. आता या बाबतीत लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपण कितीही कुत्री आणि मांजरे तपासली तरी आपण सर्व कुत्री किंवा मांजरे तपासली असे म्हणता येणार नाही; म्हणजे आपल्या अनुमानाचा आधार काही विषयीचाच अनुभव असतो. परंतु आपल्याला निष्कर्ष मात्र सार्विक काढायचा असतो. म्हणून प्रत्येक उद्गामी अनुमान अवैध किंवा सदोष असते. त्याचा पुरावा कितीही व्यापक असला तरी त्यावरून काढलेला निष्कर्ष असत्य असू शकतो, हे मान्य करावे लागते. उदा. आपण पाहिलेले सर्व हंस पांढरे असतात, म्हणून त्यावरून ‘सर्व हंस पांढरे असतात असे उद्गमन लोकांनी केले. परंतु कालांतराने ऑस्ट्रेलियात काळे हंस आढळले आणि सर्व हंस पांढरे असतात हा निष्कर्ष खोटा ठरला.

यावर उपाय काय? दुर्दैवाने यावर रामबाण उपाय नाही. आपण आपल्या अवलोकनाच्या कक्षा वाढवू शकतो. विविध क्षेत्रांत आणि विविध काळी आपण तपास चालू ठेवतो. हेतू हा की जर कोठे अपवाद असेल तर तो आपल्या दृष्टोत्पत्तीस यावा. पण कितीही खबरदारी घेतली तरी आपले उद्गमन निश्चित सत्य आहे असे आपण कदापि म्हणू शकत नाही.

विज्ञान विश्वासार्ह ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते अशा प्रकारचे ज्ञान आहे. त्यात अतिशय खबरदारी घेतली जाते हे खरे. म्हणजे अपवाद असतील तर ते दृष्टोत्पत्तीस येतील असे सर्व उपाय वापरले जातात. पण असे जरी असले तरी विज्ञान शेवटी संभाव्यच (probable) राहते. ते अतिशय संभाव्य असते, त्याची संभाव्यता दिवसेंदिवस वाढत जाते, पण ते निश्चित कदापि होत नाही.

यावर अध्यात्मवादी म्हणतात की, ‘मग अशा केवळ संभाव्य ज्ञानावर विसंबून राहायला तुम्ही आम्हाला सांगता, हे चमत्कारिक नाही काय?’ याला उत्तर आहे, नाही, हे मुळीच चमत्कारिक नाही; कारण जरी विज्ञान केवळ संभाव्य असले तरी ते मानवाला प्राप्त असे सर्वोकृष्ट ज्ञान आहे. त्याहून अधिक निश्चित ज्ञान मिळविण्याचा मानवाजवळ उपाय नाही. अन्य सर्व ज्ञानोपाय असमाधानकारक आहेत. विशेषतः अध्यात्म.

येथे एक क्षणभर थांबून एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करणे अवश्य आहे. विज्ञान केवळ संभाव्य आहे असे वर म्हटले. परंतु ते म्हणणे केवळ तत्त्वतः बोलणे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्यक्ष व्यवहारात- म्हणजे वैज्ञानिक व्यवहारात – ज्ञानाची सतत तपासणी आणि शुद्धीकरण चालू असते. कालपर्यंत विश्वासार्ह असलेले विज्ञान आज विरुद्ध पुरावा उपलब्ध झाल्यामुळे चुकीचे ठरते आणि त्याची विज्ञानातून हकालपट्टी होते. कोणत्याही क्षणी त्या क्षणापर्यंत विज्ञानास कोणताही अपवाद सापडलेला नसतो. भविष्यात अपवाद सापडणे शक्य असते, पण तो सापडण्याची शक्यता सतत घटत जाणारी असते; आणि जरी ती कधीही नाहीशी होणार नसली तरी ती सतत अधिकाधिक उपेक्षणीय होत असते. येथून कोट्यवधि किलोमिटर दूर अंतरावर दर ताशी लक्षावधि किलोमिटर वेगाने भ्रमण करणारे उपग्रह मानव अंतरिक्षात पाठवू शकतो, एवढेच नव्हे, तर त्यांचे पृथ्वीवरून नियंत्रणही करू शकतो. यावरून विज्ञानप्रणीत सृष्टिज्ञान किती विश्वसनीय असले पाहिजे याची कल्पना करता येते.

म्हणून जरी विज्ञान अनुभवानुसारी आहे, इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष मानला जाते, आणि म्हणून ते सर्वथा विश्वासार्ह नाही असे जरी असले, तरी वस्तुतः दुसरा कोणताही ज्ञानोपाय आपल्याजवळ नाही, आणि उपलब्ध उपायांपैकी सर्वश्रेष्ठ उपाय विज्ञानच आहे..

निगामी अनुमान आणि निगामी व्यवस्था
निगामी व्यवस्थेविषयी स्वामी धर्मव्रतांनी जे लिहिले आहे ते अपुऱ्या माहितीच्या आधारे लिहिले आहे. निगामी अनुमान (deductive inference) आणि निगामी व्यवस्था (deductive system) यांत भेद आहे, आणि निगामी व्यवस्थेविषयी जे म्हटले जाते ते सर्व विज्ञानासंबंधी खरे आहे असे नाही. म्हणून या दोन विषयांसंबंधाने संक्षेपाने थोडे लिहितो.

निगमन किंवा निगामी अनुमान म्हणजे असे अनुमान की जे दिलेल्या साधकांवरून (साधक = पूर्वविधाने, premises) वैध (किंवा निर्दोष) निष्कर्ष काढते. वैध निगामी अनुमानांत साधके आणि निष्कर्ष यांचा संबंध असा असतो की जर साधके सत्य असतील तर निष्कर्ष असत्य असू शकत नाही; आणि तो असत्य असू शकत नाही याचे कारण तो असत्य आहे ही शक्यता व्याघात निर्माण करणारी असते. एका साध्या उदाहरणाने हे स्पष्ट होईल. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत, आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे, म्हणून सॉक्रेटीस मर्त्य आहे’, अनुमान वैध आहे, म्हणजे ते निर्दोष आहे; आणि ते तसे आहे याचा पुरावा असा आहे की त्याची साधके जर सत्य असतील, तर त्याचा निष्कर्षही सत्यच असावा लागेल, असत्य असू शकणार नाही. आणि त्याचा निष्कर्ष असत्य असू शकणार नाही याचे कारण असे आहे की तो असत्य आहे असे म्हणणे म्हणजे सर्व मनुष्य मर्त्य आहेत हे विधान खरे आणि खोटे दोन्ही आहे असे म्हणणे होईल, आणि हे सर्वथा अशक्य आहे.

मात्र निगामी अनुमानाची शुद्धता किंवा वैधता ही गोष्ट वेगळी आणि त्याचा निष्कर्ष सत्य असणे ही गोष्ट वेगळी. निगामी अनुमानाचा निष्कर्ष सत्य असण्याच्या दोन अटी आहेत. (१) अनुमान वैध हवे, आणि (२) त्याची साधके सत्य हवीत. अनुमान वैध आहे की नाही ह्याचा शोध घेणे हे तर्क शास्त्राच्या कक्षेत येते, पण साधके सत्य आहेत की नाही हे तर्क शास्त्र सांगू शकत नाही. ती साधके ज्या क्षेत्रातील असतील त्या क्षेत्राच्या तज्ज्ञांचे ते काम आहे. आणि तर्क शास्त्राला ते सांगायची गरजही नाही, कारण तर्क शास्त्राचा संबंध अनुमानाच्या वैधतेशी आहे. निष्कर्षाच्या सत्यतेशी नाही.

आता थोडे निगामी व्यवस्थेविषयी. निगमन हा एक अनुमानप्रकार आहे. निगामी व्यवस्था ही एखाद्या विषयांतील सर्व सत्य विधानांची एक बांधणी आहे. एखाद्या विषयातील सर्व सत्य किंवा स्वीकरणीय विधाने त्यांच्यापैकी काही मोजक्या, अतिशय थोड्या, विधानापासून निगामी तर्काने निष्पन्न होतात असे या व्यवस्थेत दाखविले जाते. या मोजक्या आधारविधानांना मूलविधाने किंवा प्रन्यास (postulates) म्हणतात आणि त्यावरून निष्पाद्य अन्य सर्व विधानांना प्रमेये (theorems) म्हणतात. अशा व्यवस्थेचे प्रसिध्द उदाहरण म्हणजे इ. स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक भूमितिज्ञाने केलेली रचना. तेव्हापासून सर्व शास्त्रांची मनीषा आपल्या क्षेत्रातील ज्ञानाचे व्यवस्थापन यूक्लिडच्या भूमितीसारखे करावे ही राहिली आहे.

निगामी अनुमानाचे वैशिष्ट्य वर सांगितल्याप्रमाणे हे आहे की ते अनुमान जर वैध असेल, आणि त्याची साधक विधाने जर सत्य असतील तर त्यावरून निष्पन्न होणारे निष्कर्ष असत्य असू शकत नाहीत. ते सर्व सत्यच असावे लागतात. याचा अर्थ निगामी अनुमान सत्यतासंरक्षक असते. म्हणजे साधकांची सत्यता निष्कर्षापर्यंत पोचविणे हे त्याचे काम आहे. उद्गामी अनुमानाची सर्व साधके सत्य असूनही ( उदा.आपण पाहिलेले सर्व हंस पांढरे आहेत हे सत्य असूनही) त्याचा निष्कर्ष (‘सर्व हंस पांढरे आहेत) असत्य असू शकतो, म्हणजे उद्गमन ही क्रिया सत्यतारक्षक नाही.

निगामी अनुमान सत्यतारक्षक असते या त्याच्या विशेषाचा उपयोग करून काही विषयांतील सत्य विधानाची निगामी व्यवस्था बांधण्याचा प्रयत्न त्या विषयांच्या तज्ज्ञांनी केला आहे. आपण जर काळजीपूर्वक काही थोडी सत्य विधाने निवडली आणि त्यांच्यांवरून निगामी निष्कर्ष, आणि त्या निष्कर्षावरून आणखी निष्कर्ष काढत गेलो, तर आपल्याला मिळणारी विधानेही सत्यच असतील, आणि मग मूळविधाने आणि त्यावरून निष्पादलेली प्रमेये यांची मिळून निगामी व्यवस्था तयार होईल. आपण आपल्या समग्र ज्ञानाची अशी व्यवस्था बांधू शकू अशी काही तत्त्वज्ञांची (उदा. देकार्त, स्पिनोज्ञा) कल्पना होती. परंतु यात अनेक अडचणी असून हा मार्ग व्यवहार्य नाही हे आता मान्य झाले आहे. सर्वच विषयांची निगामी व्यवस्था रचता येत नाही हे आता सिद्ध झाले आहे.

पण ज्या विषयांत निगामी व्यवस्था शक्य आहे, (उदा. गणित), तेथे मूलविधाने कशी मिळवतात? पूर्वीच्या काळी निगामी व्यवस्थेची मूलविधाने स्वयंसिद्ध असतात असे मानले जाई. स्वयंसिद्धतेची ही कल्पना काय आहे हे काळजीपूर्वक समजावून घेतले पाहिजे. निगामी व्यवस्थेतील प्रमेये सत्य कशावरून? कारण ती सत्य मूलविधानांवरून वैधपणे निष्पन्न होतात. पण मूलविधाने सत्य कशावरून? प्रमेयांची सिद्धि मूलविधानांच्या साह्याने देतात. पण मूलविधानांची सिद्धी कशाच्या साह्याने देणार ? मूलविधानेही सिद्ध केली पाहिजेत असा आग्रह जर कोणी धरला तर आपण त्यांना मूलविधाने मानीत नाही असा याचा अर्थ होईल. त्यालाही हरकत नाही. पण मूलविधानांहून अधिक मूलभूत ज्या विधानांवरून आपण त्यांचे निष्पादन करणार त्याची काय वाट ? ती सत्य असतील, तर त्यावरून निष्पन्न होणारी सर्व प्रमेये सत्य होतील. पण ती सत्य कशावरून? याला पूर्वीच्या काळी एक उत्तर होते. ती स्वयंसिद्ध आहेत, आणि त्यांना अन्य कशाच्या साह्याने सिद्धीची अपेक्षा नाही. परंतु स्वयंसिद्धतेची कल्पना बरीच संदिग्ध आहे. शिवाय जे एकाला स्वयंसिद्ध भासते ते दुसऱ्याला भासत नाही. म्हणून ही कल्पना टाळण्याची आधुनिकांची प्रवृत्ती असते. आधुनिक शास्त्रज्ञ मूलविधाने सत्य आहेत, ती स्वयंसिद्ध आहेत, असा दावा करीत नाहीत. मूलविधाने म्हणजे सिद्धीवाचून स्वीकारलेली विधाने एवढाच अर्थ ते मूलविधानांचा देतात, आणि त्यांचे प्रतिपादन एवढेच असते की निगामी व्यवस्थेची मूलविधाने जर सत्य असतील तर तिच्यातील प्रमेयेही सत्य असतील. निगामी व्यवस्थेतील सत्यत्व असे जरतारी, जर-तरच्या स्वरूपाचे असते.

प्रमाणे निगमनात निष्कर्ष अपरिहार्यपणे निष्पन्न होतो, पण त्यात सत्यता आहे असा दावा नसतो; अणि उद्गमनात निष्कर्ष सत्य असावा अशी धडपड असते, पण ते अनुमान अवैध असते. अशी मानवी ज्ञानाची दुरवस्था आहे. पण असे असले तरी या दोन प्रकारच्या तकांनी वैज्ञानिकांनी विज्ञानाची इमारत उभी केली आहे, आणि तिची अहोरात्र परीक्षा चालू असल्यामुळे ते ज्ञान मनुष्याला मिळू शकणारे सर्वोत्कृष्ट ज्ञान आहे. ते कोणत्याही क्षणी पूर्वीच्या सर्व ज्ञानांहून श्रेष्ठ ज्ञान असते. याच्या तुलनेत अध्यात्म ज्ञानाची प्रतिष्ठा काय आहे?

अध्यात्म
स्वामी धर्मव्रत म्हणतात की इंद्रियानुभव विश्वासार्ह नसल्यामुळे इंद्रियानुभव आणि त्यावर आधारलेले विज्ञान दोन्ही सत्यप्राप्तीच्या कामी व्यर्थ ठरतात. सत्यप्रप्तीचा मार्गअन्यत्र शोधला पाहिजे; आणि अन्यत्र म्हणजे आत्मज्ञानात.’मी आहे हेच ते द्वार आहे. ‘मी आहे ही अनुभवाची अखंड धाराआहे. ‘मी आहे’ हे ज्ञान अबाधित राहते. ‘मी कोण?’ हा अध्यात्माचा विषय आहे, अणि या ‘मी चे स्वरूप काय? हाच एकमात्र authentic प्रश्न आहे.

पण मी आहे हे ज्ञान निःसंशय आहे हे मान्य केले तरी ते ज्ञान किती तोकडे, किती तुटपुंजे, किती अल्पजीवी आहे ? ‘मी कोण आहे?” मी कुठून आलो?’ हे अध्यात्माचे प्रश्न आहेत एवढेच स्वामीजी सांगतात. त्यांची अध्यात्मात मिळणारी उत्तरे काय आहेत, हे स्वामीजी काहीच सांगत नाहीत. त्यांनी फक्त गौडपादाचार्य, ज्ञानेश्वर, मुकुंदराज आणि रजनीश यांची नावे घेतली आहेत. या मंडळींनी काय आत्मज्ञान सांगितले हे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. त्या ज्ञानाबद्दल ते सत्य आहे, नि:संशय आहे हे कशावरून हा प्रश्न उद्भवेल. तसेच मृत्यूनंतर मी आहे ही जाणीव असते याला प्रमाण काय आहे ? फार कशाला, झोपेत किंवा मूर्च्छा आली असता ही जाणीव असते काय ! शिवाय ते ज्ञान किंवा ती अनुभूती इतकी मूल्यवान मानायचे कारण काय ? मला तर ते पूर्ण रिक्त (empty) आणि शून्यवत् वाटते. मी कोण आहे ? या प्रश्नाला माझे उत्तर आहे – ‘मी दि. य. देशपांडे’. मी कोठून आलो ? ‘माता पित्यांच्या अंड आणि शुक्र यांच्या संयोगातून मी जन्मलो’ इतकी ही उत्तरे साधी व सरळ आहेत. अध्यात्मवाद्यांना पडणारे प्रश्न अनाकलनीय आहेत. आणि मला तर अशी शंका वाटते की ज्यांना हे प्रश्न पडतात त्यांनाही त्याचा अर्थ कळतो की नाही. खरे म्हणजे ते प्रश्न निरर्थक आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.