श्रॉडिंजरचे गूढवादी दर्शन

(भाषांतर)

हायसेनबर्ग वगैरे मंडळी ‘मॅट्रिक्स मेकॅनिक्सची’ (चरीीळ चशलहरपळली) बांधणी करीत होती त्याच वेळी इर्विन श्रॉडिंजरने, (Erwin Schroedinger [1887-1961]), स्वतंत्ररीत्या, तरंग यांत्रिकी (Wave Mechanics) चा शोध लावला. लगेचच, ते मॅट्रिक्स मेकॅनिक्सच्या समतल असल्याचे सिद्ध झाले. शिवाय हे Wave Mechanics अनेक बाबतींत Matrix Mechanics पेक्षा सुलभ व सुंदर आहे असे दिसून आले. म्हणूनच श्रॉडिंजरचे Wave Mechanics लवकरच आधुनिक पुंजयांत्रिकीच्या (Quantum Mechanics) हृदयस्थानी विराजमान झाले व सर्वत्र त्याचा गणिती शस्त्र म्हणून वापर चालू झाला.

श्री. केन् विल्बर (Ken Wilber) यांनी संपादित केलेल्या Quantum Questions या संग्रहातील श्रॉडिंजरचे खालील लिखाण, (उतारा) (बहुधा) What is Life ह्या पुस्तकातील आहे. (Cambridge University Press – 1947) श्रॉडिंजरची अत्यंत काव्यमय शैली व त्याची तात्त्विक दृष्टी हे लिखाण दर्शविते. ही या प्रकारातील सर्वोत्तम निर्मिती असावी, असे श्री. विल्बर यांचे निरीक्षण आहे.

The mystic vision (गूढवादी दर्शन)
तत्त्वज्ञानातली खरी अडचण म्हणजे, ते वर्षानुवर्षे चालू असलेले, अनेक स्थानांतील विचारधारांची, निरीक्षणांची व विचारवंतांची अगणितता, हीच असते. जर सर्व हालचाली ‘एकाच’ जाणिवेत झाल्या असल्या तर, परिस्थिती एकदम सोपी झाली असती. तसे असते तर एक विशिष्ट ‘तल’, एक मान्य भूमिका, अस्तित्वात आली असती. ती कशीही तयार झाली असली, तरीही, तत्त्वज्ञानातल्या आजच्या अनेकानेक अडचणी, वरील एका तत्त्वाने व मान्य भूमिकेने, नक्कीच निर्माण केल्या नसत्या.

आपल्या बौद्धिक पातळीवर, एकजिनसी (Consistant) विचाराने, तर्कशुद्धतेने ही अडचण आपण सोडवू शकू असे मला वाटत नाही. पण, त्याचे उत्तर, शाब्दिकरीत्या देणे सहज शक्य आहे. ते असे. “आपल्या समोरील अनेकता, ही, केवळ माया आहे, ते सत्य नव्हे. वेदान्तातील तत्त्वज्ञानांत हा मूलभूत सिद्धान्तच आहे. त्यामध्ये, अनेक दृष्टान्तांनी या सत्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांतला एक अत्यंत आकर्षक दृष्टान्त म्हणजे, अनेक पैलू असणारा स्फटिक. हा स्फटिक अस्तित्वात असणाऱ्या एखाद्या वस्तूची अनेकानेक छोटी रूपे दाखवितो. पण, तो काही तितक्या वस्तू निर्माण करीत नाही. आपणा आजकालच्या बद्धिवाद्यांना, चित्रमय उपमा तत्त्वज्ञानाची दृष्टी प्रकट करणारी असू शकते असे वाटायची सवय उरलेली नाही. त्याऐवजी, आपण तर्कशास्त्रीय निष्कर्षाचा आग्रह धरीत असतो. मात्र, याच्या विरुद्ध, कदाचित तर्कानेही, एवढे तरी दाखविता येऊ शकेल की, अस्तित्वाच्या मूलभूत गाभ्याशी जाताना, आमचा तर्कशुद्ध विचार हा त्या अस्तित्वाचाच भाग असल्याने व म्हणून त्यांतच पूर्णपणे गुंतल्याने, हा विचार, असे गाभ्याशी पोचणे अशक्यच करण्याचा संभव आहे. असेच जर असेल, तर, आपण आपल्यालाच एक प्रश्न विचारावा लागेल. तो प्रश्न म्हणजे, दृष्टान्तातील वस्तुस्थितीचे चित्र, केवळ ते प्रत्यक्षाचे पूर्ण चित्र आहे की नाही या शिवाय, ते कठोर सिद्धतेतून सिद्ध होऊ शकते की नाही, या आपल्या शंकेपोटी, आपण अशा उपमेचा उपयोग करावयाचा की नाही ? अनेक बाबींचा विचार करताना, तर्कशुद्ध विचार आपल्याला एका टोकाशी आणून ठेवतो व नंतर मात्र भरकटत, वाऱ्यावर सोडून देतो. ह्याप्रकारच्या विचारांच्या पलीकडचे, पण आपण साधारणपणे, ह्या पद्धतीने पोचतो असे वाटते, ती विचारधारा फक्त कमी-कमी होत नाहीशी होता होता, आपण त्यांत, त्या परिसराच्या केंद्राशी पोचू अशा प्रकारची काही भरणी करणे आपल्याला शक्य होऊ शकेल! यातून उत्पन्न होणारे आपले विश्वाचे चित्र कदाचित मौल्यवान, सर्वसमावेशक असू शकेल. आपण जेथून सुरुवात केली ती त्या सर्वसाधारण विचारधारेतून केल्याने, त्याचे मूल्य काटेकोरपणा, वादातीतता व अपवाद-विहीनता या कसोट्यांवर करता कामा नये. शास्त्रही अशा प्रकारची विचारपद्धती व कार्यपद्धती वापरते अशी शेकडो उदाहरणे आहेत. दीर्घ कालापासून या पद्धतीला स्वीकारार्ह व मान्यताप्राप्त ठरविण्यात आले आहे.

मूलभूत वेदान्त-दृष्टी, आधुनिक विचारांतील काही असत्ये त्याच दृष्टीकडे आपल्याला कसे पोचवितात, ते आपण पुढे पाहणारच आहोत, त्यांतून ह्या दृष्टीस आधार मिळू शकेल. आपण प्रथमतः ‘अनुभवाचे’ नेमके चित्र काढू या; हे चित्र कदाचित् आपल्याला वेदान्त-दृष्टीकडे नेऊन पोचवेल. पुढे जे आपण पाहणार आहोत, ते असे की, सुरुवातीस वर्णन केलेला प्रसंग आपण जर चपखलपणे दुसऱ्या कुठल्याही संतुलित प्रसंगात बदलला, तर तो फक्त आठवण देण्यासाठी की, एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवावीच लागते, नुसती नाममात्र मान्यता उपयोगी नाही.

असे समजू या, की, तुम्ही उत्तुंग अशा एका डोंगर शिखरांतील एखाद्या वाटेवरच्या बाकावर बसलेले आहात. आसपास, गवतांनी झाकलेले डोंगराचे उतार आहेत, मधूनच डोंगरातील दगडांची टोके डोकी वर काढताहेत, विरुद्ध बाजूच्या उतारावर अनेक दगड इतस्ततः पसरलेले आहेत, त्यांत बुटकी झुडुपे उगवलेली आहेत. दरीच्या खड्या उतारावर झाडे माजली आहेत, ती, टोकाशी असणाऱ्या अजिबात झाडे नसणाऱ्या कुरणांपर्यंत पोचली आहेत. तुमच्या समोरच, दरीच्या तळापासून सुरू होणारे, हिमाने आच्छादिलेले प्रचंड टोक आहे. त्यातच, मुलायम हिमवर्षाच्छादित क्षेत्र आणि त्यातच तो दगडी डोंगर. याच क्षणी, मावळतीच्या सूर्याची लाल गुलाबी किरणे त्याला स्पर्श करीत आहेत, हे सर्व निरभ्र, फिकट, पारदर्शक निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कठोर कडा दाखवीत आहे. आपल्या नेहमीच्या दृष्टीने पाहिले तर, तुम्ही जे दृश्य पाहता आहात ते, थोडे किरकोळ फरक वगळता, तुम्ही अस्तित्वात येण्यापूर्वी हजारो वर्षांपासून असेच आहे. काही काळानंतर, आणि हा काळ काही फार दीर्घ नव्हे, तुम्ही असणार नाही, आणि हे जंगल, दगडधोंडे आणि आकाश मात्र काहीही फरक न होता, तुमच्या पश्चात् हजारो वर्षे असेच राहणार आहे.

काही क्षणांसाठी, तुमच्यापासून पूर्ण अलिप्त असणाऱ्या या महान् दृश्याचा आनंद घेण्यासाठी अचानक शून्यातून तुम्हाला साद कोणी घातली ? तुमच्या अस्तित्वाच्या सर्व अटी, जवळजवळ त्या पथ्थरांइतक्याच जुन्या आहेत. हजारो वर्षे माणसांनी प्रयत्न, कष्ट करून पुढची पिढी निर्माण केली आहे. स्त्रियांनी यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. कदाचित, शंभर वर्षांपूर्वी, कोणी दुसरा माणूस, त्याच स्थळी बसला असेल, तुम्ही हे दृश्य पाहन जसे आश्चर्यचकित झालात, सूर्याचे मावळतीचे हिमशिखरावरील किरण पाहन त्याच्या मनात तशाच आकांक्षा उठल्या असतील. तो माणूसही, पुरुषापासून स्त्रीच्या पोटीच जन्माला आला होता. त्यालाही दुःखे होती, आणि, तुम्हाला होतो तसा थोडाफार आनंदही. तो खरेच दुसरा कोणी होता? ते तुम्हीच, स्वतः तर नव्हता? तुम्ही ज्याला ‘स्व’ म्हणता ते आहे तरी काय ? अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की या वेळी, ते तुमच्याच स्वरूपात निर्माण व्हावे, फक्त तुमच्याच स्वरूपात, इतर कोणाच्याही नव्हे ? ‘इतर कोणी’ या शब्दप्रयोगाचा अगदी स्पष्ट समजण्याजोगा, स्वच्छ शास्त्रीय अर्थ काय असू शकतो? आताची तुमची माता इतर कोणा पुरुषासमवेत रत झाली असती आणि तिला पुत्र झाला असता आणि तुमच्या पित्यानेही असेच वर्तन केले असते, तरी तुम्ही अस्तित्वात आला असता काय ? असे तर नसावे, की तुम्ही त्यांच्यात, तुमच्या पित्याच्या पित्यात, हजारो वर्षांपूर्वी होतातच. हे असेच होते असे म्हटले तर, तुम्ही तुमचे बंधू का नाही आणि बंधू तुम्ही का नाही? आणि तुम्ही तुमचे एखादे दूरचे चुलत/मामे/मावस भाऊ का नाही? तुम्ही व इतर कोणी यांतील फरकाच्या शोधाचा हट्टीपणाचे तुमचे समर्थन कशाच्या आधारावर होऊ शकते? वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहता, जे काही आहे, ते तेच आणि एकच आहे.

या दृष्टिकोनातून पाहता व विचार करता, तुम्हाला, जणू वीज चमकावी तसे, अचानक दिसून येईल की, वेदान्ताची मूळ पीठिका किती प्रगल्भ आहे, उचित आहे. तुम्ही ज्याला तुमचे स्वतःचे ज्ञान म्हणता, स्वतःच्या भावना म्हणता, स्वतःची निवड म्हणता, ह्या सर्वांची इतरांच्या तश्याच क्षमतांची एकरूपता ही, फार दूरच्या काळी नव्हे अशा एखाद्या विशिष्ट क्षणी, शून्यातून निर्माण होणे अशक्यच आहे. नव्हे, हे ज्ञान, ह्या भावना आणि ह्या निवडी मूलतः शाश्वत व अपरिवर्तनीय आहेत, संख्येच्या भाषेत बोलायचे तर, हे सर्व एकच आहे. फक्त मनुष्यमात्रांतच नव्हे, तर सर्व संवेदनक्षम जीवातही. याचा अर्थ असा मात्र नव्हे की, तुम्ही, शाश्वत, अनंत जीवनाचा एक अंश, एक तुकडा आहात, किंवा त्याची एखादी बाजू, त्याचेच थोड्याफार फरकातले रूप असाही. स्पिनोझाच्या परमेश्वराच्या व विश्वाच्या एकरूपतेच्या दृष्टिकोणातील अर्थासारखा याचा अर्थ नाही. असे जर असेल, तर, आपल्याला अनुत्तरित करणारा, गोंधळविणारा प्रश्न आपल्यापुढे येणार. तो म्हणजे, तुम्ही आहात, तो भाग कोणता व त्याचे रूप काय ? वस्तुनिष्ठतेने पाहिल्यास तुमचे इतरांहून वेगळे असे अस्तित्व कशामुळे निर्माण होते ? नाही. पण, सामान्य विवेकाने पटणे, दृग्गोचर होणे अशक्य वाटले, तरी, तुम्ही आणि जेवढे म्हणून जागृत जीव आहेत, अस्तित्वे आहेत, ती एकच एक आहेत. म्हणून तुम्ही जगत असलेले तुमचे जीवन, ह्या पूर्ण अस्तित्वाचा एक अंश नसून, काही अर्थाने, संपूर्ण जीवनच आहात. फक्त हे संपूर्ण, एका दृष्टिक्षेपांत आकळावे अशी त्याची रचना नाही. ब्राह्मणांनी घोषविलेले, पवित्र व गूढ, अत्यंत स्वच्छ व स्पष्ट असे आपल्या परिचयाचे ते सूत्र म्हणजे हेच : “तत् त्वम् असि’, ‘तू तेच आहेस किंवा, परत एकदा, वेगळ्या भाषेत, “मी पूर्वेतही आहे, पश्चिमेतही, मी वर आहे व खालीही. मी, हे सर्व विश्वच आहे.”

अशा त-हेने, तुम्ही धरित्रीच्या सपाट भूमीवर स्वतःस पसरवून टाका, मनाशी, निश्चित विश्वास बाळगा, ती तुमच्याशी व तुम्ही तिच्याशी एकरूपच आहात. तुम्ही तिच्याइतकेच सखोल रुजलेले आहात, अढळ आहात. तसे कशाला, तिच्याहून हजार पट सखोल व अढळ. ती तुम्हाला उद्या जशी निश्चितपणे गिळंकृत करणार आहे, तितक्याच निश्चितपणे तुम्हाला नव्याने या विश्वात आणणार आहे, नव्या कष्टांनिशी आणि दुःखानिशी. हे निव्वळ केव्हा तरी नव्हे. याच क्षणी, आज रोज तुमचे सृजन ती करतेच आहे, एकदा नव्हे, हजारो, लाखो वेळा, जशी ती रोज तुम्हाला हजारो वेळा गिळत असते. कारण, शाश्वत, सदा सदा फक्त चालू क्षणच असतो, एक आणि तोच क्षण, वर्तमानकाळ ही एकच गोष्ट अशी आहे, ज्याला अंत नाही.

पद्मावती, २०, शिरगांवकर सोसायटी, टाकाळा, कोल्हापूर ४१६००८.
दूरभाष : ०२३१-२५२०१७१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.