धर्माचे अधिष्ठान ‘विश्वास’ हे आहे अशी सर्वसाधारण समजूत असल्याचे आढळते. स्वतः कुठल्याही चिकित्सेच्या फंदात न पडता, धर्मग्रंथांचे आणि परंपरेने शिरोधार्य मानलेल्या ऋषिमुनींच्या वचनांचे प्रामाण्य जो निमूटपणे मान्य करतो तो धार्मिक मानला जातो. विवेक आणि अनुभव यांची कास धरून चालणारे विज्ञान आणि हे दोन निकष गैरलागू मानणारा धर्म यांच्या भूमिका अगदीच वेगळ्या आणि परस्परविरुद्ध आहेत असे मानले जाते. आप्तवचनावरील निरपवाद विश्वास हे रूढ अर्थाच्या धर्माचे अविभाज्य अंग आहे असे दिसते.
परंतु, धर्माच्या ह्या रूढ कल्पनेला आह्वान देऊन धर्माच्या क्षेत्रातदेखील विवेक आणि अनुभव यांची कास धरणारे बंडखोर सत्यशोधक काळाच्या ओघात होऊन गेले आहेत. पवित्र मानलेल्या धर्मग्रंथांमधील आणि ज्ञानी मानलेल्या महात्म्यांची वचने सत्य आहेतच किंवा सत्य नाहीतच अशी कुठलीही ठाम भूमिका न घेता त्यांचा स्वानुभवाने पडताळा घ्यायचा, आणि आपल्या अनुभवाच्या कसोटीवर घासून त्यांची सत्यासत्यता ठरवायची अशी वैज्ञानिक भूमिका घेणारे सत्यशोधक, अधूनमधून का होईना, पण होऊन गेले आहेत. या सत्यशोधकांनी, प्रसंगी, रूढ सिद्धान्तांना निराधार आणि निरुपयोगी ठरवून झुगारूनही दिले असून स्वबळांवर सत्याचा शोध घेतलेला आहे.
अशा विवेकनिष्ठ आणि अनुभवनिष्ठ सत्यशोधकांपैकी इतिहासप्रसिद्ध आणि युगप्रवर्तक सत्यशोधक म्हणजे भगवान गौतम बुद्ध. निराधार श्रद्धांच्या निसरड्या जमिनीवरून सतत घसरत असलेल्या धर्माला अनुभवनिष्ठतेचा भक्कम आधार देऊन त्यांनी वैज्ञानिक धर्माची इमारत उभी केली.
गौतमांनी परंपरेला दिलेले आह्वान हा नुसता विरोधासाठी विरोध होता किंवा आपल्या नव-मताची हल उठवून देऊन आपला क्रांतिकारकत्वाचा अहंकार त्यांना गोंजारायचा होता असे मानणे मात्र अक्षम्य असा अपराध होईल. दुसऱ्याने मांडलेले मत काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकून न घेताच, ते आपल्या पूर्वग्रहांशी विसंगत आहे एवढ्याच कारणासाठी धिक्कारणारे अहंमन्य लोक आपल्याला जागोजागी भेटत असतात. गौतम तसे नव्हते. दुसऱ्याचे मत आदरपूर्वक तपासायला घेऊन ते कसोटीवर उतरल्यास कृतज्ञतापूर्वक मान्य करून तसे न झाल्यास दिलगिरीने ते अमान्य करण्याचे सौजन्य हा गौतमांचा स्वभावाचा एक विशेष गुण होता. निराधार ‘मते’ त्यांनी जरूर नाकारली, पण ती मते बाळगणाऱ्या व्यक्तीं’चा धिक्कार त्यांनी कधीच केला नाही. आपल्या मतातील दोष दाखविणाऱ्या निंदकाबद्दल कृतज्ञता बाळगावी, कारण तो आपले मत तपासून त्याला अधिक निर्दोष करायची प्रेरणा देत असतो, असे बुद्धदेवांचे सांगणे असे. हेकेखोर आक्रस्ताळेपणा गौतमांच्या ठिकाणी अजिबात आढळत नाही. वैचारिक आणि भावनिक समतोल हा त्यांचा स्थायीभाव होता. परंपरागत वा परंपराविरोधी अशा कोणत्याही मताचा सर्वांगीण अभ्यास न करताच त्याला टाकाऊ ठरविणारे महाभाग काही कमी नसतात. पण गौतम तसे नव्हते. निष्कारण परंपराभंजन गौतमांनी केल्याचे एकही उदाहरण बुद्ध-चरित्रात आढळत नाही. बरे, असेही म्हणता येणार नाही की गौतमांना परंपरागत धर्मपरंपरांची आणि तत्कालीन विभिन्न दर्शन-संप्रदायांची मुळी माहितीच नव्हती. आपल्या एका प्रवचनात त्यांनी त्यावेळी प्रचलित असलेल्या साठ-सत्तर विभिन्न विचारधारांचे विवेचन करून त्यांची समीक्षा केलेली आहे. गौतमांना संस्कृत येत नव्हते आणि म्हणून त्यांना वैदिक धर्माच्या अंगोपांगांची माहिती नव्हती असा कयास करणाऱ्या महापंडितांच्या बुद्धीची कीव करायला पाहिजे. गौतमांनी आपल्या धम्माच्या प्रसारासाठी संस्कृतचा वापर केला नाही आणि तो करायला उद्युक्त झालेल्या आपल्या श्रावकांनाही तो करण्यापासून परावृत्त केले हे खरे; पण ते जनसामान्यांना जे सांगायचे ते त्यांच्या नेहमीच्या भाषेत सांगणे अधिक श्रेयस्कर म्हणून. प्रकाण्ड संस्कृत पंडित असून वैदिक आणि अवैदिक सर्व प्रकारच्या विचारधारांची माहिती असणारे ज्ञानेश्वर जसे जनसामान्यांबद्दलच्या कळवळ्यापोटी ‘माझा महाटाचि बोलु कवतिके । परि अमृतातें पैजा जिंके ।’ अशा आत्मविश्वासाने गीतेवरील भाष्य मराठीत लिहितात, तसेच भगवान् बुद्धांनीही केले आहे. तत्कालीन विचारधारा आणि साधना-पद्धतींची गौतमांना नुसती माहितीच होती असे नव्हे, तर त्यांपैकी काहींचे तर त्यांनी प्रत्यक्ष अनुष्ठान केले होते. सत्यशोधार्थ गृहत्याग केल्यानंतर इतस्ततः भटकत असता, ज्ञानी किंवा सिद्ध म्हणून नावाजलेल्या महात्म्यांना अत्यंत नम्रतेने भेटून त्यांची साधना-प्रणाली समजावून घेण्याचा आणि तिचे प्रत्यक्ष आचरण करून त्यांचे सिद्धान्त पडताळून पाहण्याचा प्रयत्न गौतमांनी केला. आलार कालाम आणि उद्रक रामपुत्र हे दोघे तत्कालीन विशेष विख्यात असे सत्पुरुष. गौतमांनी त्यांची शिकवण अंगीकारून तिची साधना केली. एवढेच नव्हे, तर त्या दोघांना अभिप्रेत असलेले आध्यात्मिक साध्यही गौतमांनी हस्तगत केले. तशी पावती त्या दोघा गुरूंनी मुक्तकंठाने दिलेली आहे. मानवी दुःखाचा निःशेष निरोध करण्याचा मार्ग शोधून त्यांना स्वतःला तर दुःखमुक्त व्हायचेच होते, पण मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवायचा होता. मग
गौतमांच्या अंतरंगी वसत असलेल्या सुप्त बुद्धांनी त्यांना सांगितले की असे, एका गुरूकडून दुसऱ्याकडे भटकत परावलंबी राहून हे ध्येय साध्य होणार नाही, तर त्यासाठी केवळ आत्मनिर्भर होऊन, सत्याच्या ग्रहणासाठी सिद्ध झाले पाहिजे कुठल्याही ज्ञात सिद्धान्तानुसार नव्हे, तर सारे ज्ञात सिद्धान्त बाजूला सारून. या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी, जाता जाता, नमूद कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे आलार कालाम आणि उद्रक रामपुत्र या दोन्ही महात्म्यांनी गौतमांची श्रेष्ठता मान्य केली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दोन महात्म्यांच्या उपदेशामुळे गौतमांना अभिप्रेत असलेली सम्यक् संबोधी जरी प्राप्त झाली नसली, तरी गौतमांच्या मनात त्या दोघांच्याबद्दल अखेरपर्यंत अपार आदर होता. गौतमांना बोधी प्राप्त होऊन ते “बद्ध’ बनल्यानंतर आपल्या ‘धम्मा’चे ग्रहण करण्यास समर्थ श्रावक जेव्हा गौतम शोधू लागले, तेव्हा त्यांच्या मनःचक्षूपुढे प्रथम उभे राहिले ते हे दोन भूतपूर्व गुरु ; पण दुर्दैवाने, तोपर्यंत त्या दोन्ही महात्म्यांचे देहावसान झालेले होते. ते दोघे हयात असते, तर ‘बुद्ध’ बनलेल्या आपल्या या शिष्योत्तमाचा ‘धम्म’ त्यांनी शिरोधार्य मानून ग्रहण केला असता; आणि ‘शिष्यादिच्छेत्पराजयम्’ ह्या वचनाचे एक मोठे विलक्षण उदाहरण इतिहासात नोंदले गेले असते.
परंपरेने प्राप्त झालेले, शास्त्रग्रंथात ग्रथित असलेले, किंवा कुणा थोर पुरुषाच्या तोंडून ऐकलेले, कोणतेही वचन ऐकताक्षणी ते घाईघाईने एकदम मान्यही करू नये किंवा अमान्यही करू नये, तर त्याला एक गृहीत प्रमेय समजून त्याच्या सत्यासत्यतेचा आपण स्वत: पडताळा पाहावा, आणि ते सत्य असल्याचा स्वतःला प्रत्यय आला, तरच ते स्वीकारावे, असे गौतमांनी वारंवार सांगितले आहे. अर्थात्, एखादे दुसऱ्याने सांगितलेले गृहीत प्रमेय सत्य असल्याचे आपल्या प्रत्ययाला जर आले, तर ते स्वीकारण्याचाही प्रश्न येणार नाही, कारण मग ते ‘गृहीत प्रमेय’ न राहता आपले स्वतःचे अनुभवजन्य ‘ज्ञान’ झालेले असेल. सारांश, स्वानुभव हा सत्यासत्यतेचा अंतिम निकष आहे, असे भगवान् बुद्धांचे प्रतिपादन आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यासत्यतेची ही कसोटी त्यांनी केवळ इतरांच्या मतांनाच लागू केली नाही, तर त्यांचे स्वतःचे सांगणेदेखील कठोरपणे तपासून त्याचा पडताळा आला तरच ग्राह्य समजावे, असे गौतमांनी पुनःपुनः सांगितले आहे. ही पराकोटीची वैज्ञानिक भूमिका आपल्या श्रावक-भिक्खूच्या मनावर बिंबविताना भगवान् बुद्ध म्हणतात : “जाणकार लोक तथाकथित सोन्याला छेदून, तापवून, निकषावर घासून त्याची जशी पारख करतात, तशी पारख करूनच, हे भिक्खूनो, माझे वचन ग्रहण करा, मी कुणी थोर पुरुष आहे म्हणून नव्हे.”
आप्तवचनाविषयीच्या पूज्यभावामुळे असो, किंवा स्वतःच्या अज्ञानामुळे असो, एकदा जर एखादा दृढ विश्वास उत्पन्न झाला, तर तो आपली दृष्टी झाकोळून टाकतो आणि सत्याचे दर्शन होऊ देत नाही. सर्वसाधारण समजूत अशी आहे की विश्वासाशिवाय सत्य-ज्ञान होऊच शकत नाही. गौतमांनी ह्या सार्वत्रिक समजुतीची निरुपयोगिताच केवळ सिद्ध केली नाही, तर विश्वास हा सत्यप्राप्तीच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे असे निःसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे. ही गोष्ट एका प्रत्ययकारी बोधकथेच्या आधारे भगवान् बुद्धांनी स्पष्ट केली आहे. ही बोधकथा अशी : एका गावात एक तरुण विधुर आपल्या एका लहान मुलाला घेऊन राहात असे. आई नसलेल्या या मुलावर त्याचे जिवापाड प्रेम होते. एकदा आपल्या ह्या लाडक्या मुलाला घरी ठेवून तो काही कामानिमित्त परगावी गेला. त्याच्या गैरहजेरीत डाकूच्या एका टोळीने सारे गाव लुटून त्याला आग लावून दिली. आणि त्या मुलाला त्यांनी पळवून नेले. तो विधुर जेव्हा गावी परतला, तेव्हा सगळे गाव जळून भस्मसात् झाल्याचे त्याने पाहिले, आणि आपल्या मुलाचे काय झाले असेल या चिंतेने त्याने आपल्या मुलाचा शोध सुरू केला. शोधता शोधता त्याला आढळले की त्याच्या जळून गेलेल्या घराजवळच जळून गेलेला एका लहान मुलाचा मृतदेह पडलेला आहे. हा आपल्या मुलाचाच मृतदेह असे समजून त्याची राख त्याने जड अंतःकरणाने एका गाठोड्यात बांधली, आणि ते गाठोडे छातीशी कवटाळत तो करुण क्रंदन करू लागला. ते राखेचे गाठोडे तो अहर्निश आपल्यापाशी ठेवी, आणि त्याला कवटाळीत-कुरवाळीत आपल्या लाडक्या मुलाच्या आठवणीने हंबरडा फोडी. त्या विधुराचा दृढ विश्वास होता की आपला मुलगा आगीत जळून भस्म झाला आणि ही त्याचीच रक्षा आहे. बरेच दिवस लोटल्यानंतर, डाळूनी पळवून नेलेल्या त्या मुलाने मोठ्या कौशल्याने त्यांच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेतली, आणि तडक तो आपल्या गावी आपल्या बापाकडे आला. या वेळेपर्यंत बापाने आपले घर पूर्ववत केले होते. मुलगा दारापाशी आला तेव्हा रात्र होऊन गेलेली होती, आणि नेहमीप्रमाणे बाप गाठोडे छातीशी धरून क्रंदन करीत होता. बाहेर मुलगा जोरजोराने दार ठोठावू लागला, आणि “मी तुमचा मुलगा; डाकूच्या तावडीतून सुटून परत आलो आहे’ असे परोपरीने सांगू लागला. पण आपला मुलगा गाठोड्यातील रक्षेच्या रूपाने आपल्यापाशी आहे असा त्या विधुराचा दृढ विश्वास होता. त्या विश्वासापायी त्याने दाराशी आलेल्या आपल्या मुलाला घरात घेण्यासाठी दार उघडायचे नाकारले, आणि शेजारचा कुणी वात्रट मुलगा आपली थट्टा करण्यासाठी दार ठोठावतो आहे असा समज त्याने करून घेतला. अखेर दाराबाहेर काकुळती करणाऱ्या त्या मुलाचा नाइलाज होऊन तो तिथून निघून गेला; आणि दाराशी आलेल्या आपल्या मुलाला बाप कायमचा मुकला.
ही गोष्ट सांगून पुढे गौतम म्हणतात की आपल्या पूर्वविश्वासांमुळे आपण आपल्या दाराशी येऊन दार ठोठावणाऱ्या सत्याला मुकत असतो.
आता, कुणावरही आणि कशावरही दृढ विश्वास न ठेवता, केवळ स्वबळावर सत्याचा शोध घ्यायचा म्हणजे फारच जिकिरीचे काम आहे. त्यासाठी पराकोटीची तळमळ आवश्यक असते; जीवनातील इतर साऱ्या गोष्टीमधून लक्ष काढून घेऊन, अवघे जीवन सत्यशोधार्थ समर्पित करायची तयारी आवश्यक असते. याच आसनावर माझे शरीर सुकून जावो, की प्रलय होवो, पण अनेक कल्पांत दुर्लभ अशी ती बोधी प्राप्त झाल्याशिवाय हे शरीर या आसनावरून चळणार नाही.’ असा गौतमांसारखा निर्धार आवश्यक असतो. आणि एवढी मोठी किंमत मोजायची आमची तयारी नसते. आपले नेहमीचे सुखासीन जीवन जगता जगता, सहजगत्या, झाला तर रात्याचा लाभही व्हावा; अशी आगची अपेक्षा असते. सत्यासाठी अवघे जीवन पणाला कोण लावील ? त्यापेक्षा आप्तवाक्यावर विश्वास ठेवून आश्वरत जीवन जगणे अधिक सोयीचे. अशीच बहुतेकांची वृत्ती असल्यामुळे, आप्तवचन हा त्यांना मोठाच आधार वाटतो, आणि त्या छत्रच्छायेत आपण सुरक्षित असल्याचा सुखद भ्रम उत्पन्न होतो. परिणामी, शब्दांचा अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत न पडता, ते त्या शब्दांचीच पूजा करू लागतात. त्यांना दैवी प्रामाण्य बहाल केले जाते. आणि मग वेगवेगळ्या महात्म्यांच्या ‘पवित्र’ शब्दांना कवटाळून बसलेल्या वेगवेगळ्या जनसमूहांमध्ये कलह उत्पन्न होतात. अशा प्रकारची अनर्थकारी शब्दपूजा हे धर्मविद्वेषाचे मूळ कारण आहे.
सर्वसाधारण धारणा अशी आहे की आधी नुसते शब्द ऐकायचे, मग त्या शब्दांचा, व्युत्पत्ती, व्याकरण, भाष्य इत्यादींच्या साहाय्याने अर्थ समजून घ्यायचा, आणि सरतेशेवटी (जमल्यास ?) त्या शब्दांचा गर्भित अभिप्राय जाणून घ्यायचा. भगवान् बुद्धांना ही प्रक्रिया मान्य नसल्याचे दिसते. शब्द ऐकत असता, तत्क्षणी, आशयाचा साक्षात्कार झाला पाहिजे, काही काळानंतर नव्हे. पण असा साक्षात्कार होण्यासाठी आत्यंतिक उत्कटतेची आणि आत्यंतिक अवधानाची आवश्यकता असते. ह्या दोन्ही गोष्टी ‘नसतात’, ही आहे बहुतेकांची खरी अडचण. म्हणून तर एखादा विख्यात वक्ता भाषण करीत असता, आपण त्याचा अभिप्राय तिथल्या तिथे समजून घेण्याऐवजी अभिप्रायाकडे कानाडोळा करून त्याच्या भाषणाच्या ‘नोट्स’ घेण्यात गुंतून जातो अशा आशेने की पुढे केव्हा तरी निवांतपणे त्यांचा अर्थ समजून घेता येईल. पण जे बोलताक्षणी समजले नाही, ते नंतर समजण्याची शक्यता फारच कमी.
शब्द हे केवळ संकेत असतात. त्यांना स्वतःचे असे काहीच मूल्य नसते, आणि शब्दकोशातला अर्थ समजणे म्हणजे वक्त्याचा अभिप्राय समजणे नव्हे. तेव्हा शब्दांमध्ये अडकून न राहता, वक्त्याने त्या त्या प्रसंगी कोणता अभिप्राय सूचित केला आहे त्याचा वेध घेणे महत्त्वाचे असते. भगवान् बुद्धांसारख्या महापुरुषांची वचने समजून घेत असताना तर हे पथ्य पाळणे खूपच जरूरीचे असते. कारण त्यांना जे काही सांगायचे आहे, ते नेहमीच्या लोकव्यवहाराच्या भाषेत व्यक्त करणे नुसते अवघडच नव्हे तर अशक्यप्राय असते. पण सर्वसाधारण मनुष्यांशी संवाद साधायचा असेल, तर तो सर्वसाधारण भाषेतच साधला पाहिजे; त्यासाठी लोकव्यवहारात रूढ असलेल्या शब्दांचाच उपयोग करावा लागेल; हे शब्द त्यांचा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी अपुरे आणि असमर्थ ठरतील; पण दुसरा उपाय नाही. रूढ शब्दांत व्यक्त होऊ न शकणारा अभिप्राय त्या शब्दांमधून व्यक्त करण्याचा असफल प्रयत्न भगवान् बुद्धांसारखे लोक केवळ करुणेने अगतिक होऊन करीत असतात. म्हणून त्यांना म्हणायचे काय आहे त्यावर झेप घेतली पाहिजे, आणि त्यासाठी सारा जीव एकवटून आणि डोक्यातील पूर्वग्रहाची सारी अडगळ बाजूला सारून रिक्त मनाने त्यांचे म्हणणे ‘ऐकले’ पाहिजे. एके ठिकाणी ते म्हणतात : “चंद्र दाखविण्यासाठी जेव्हा कुणी चंद्राकडे बोट दाखवितो, तेव्हा त्या बोटाकडेच पाहात न बसता तत्काल चंद्राकडे पाहिले पाहिजे.”
“भगवान् बुद्धांनी अमुक शब्द वापरला की तमुक ?” या विषयावर एकदा त्यांच्या काही श्रावकांमध्ये वाद झाला. जेव्हा हे प्रकरण खुद्द बुद्धदेवांकडे आले, तेव्हा भगवान् शांतपणे उद्गारले, “गेल्या पंचेचाळीस वर्षांत (म्हणजे बोधी प्राप्त झाल्या क्षणापासून) मी एकही ‘शब्द’ उच्चारला नाही”(!) अर्थात् बोधी प्राप्त झाल्यानंतर ते ‘शब्द’ बोलत नसून ‘अभिप्राय’ बोलत होते..
एकदा आप्तवचनाचे स्वगत मूल्य आणि प्रामाण्य नाकारले आणि शब्द-पूजेचा निषेध केला की गुरूचे साधकाच्या जीवनातील स्थानही डळमळले, हे ओघानेच येते. आपला एक हितचिंतक आणि आपल्या थोडे पुढे पाहू शकणारा एक मित्र म्हणून एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायला भगवान् बुद्धांची हरकत नाही. पण ज्याचा उपदेश, त्याची शहानिशा न करता, आंधळेपणाने शिरसावंद्य मानायचा, त्या गुरूला मात्र त्यांची हरकत आहे. त्याला सर्वभावे शरण जायचे आणि आपली स्वतःची जबाबदारी झटकून टाकून बांडगुळासारखे गुरूंवर विसंबून राहायचे हे गौतमांना मंजूर नाही. “तथागत लोक (म्हणजे बुद्धत्व प्राप्त केलेले लोक) केवळ सल्लागार असून तुमची तपश्चर्या तुम्हालाच करायची आहे.” असे भगवान् आवर्जून सांगतात. आपल्याला थोडीशी जरी मदत कुणी केली तरी त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी हे तर साधे सौजन्यच झाले. हे सौजन्य गौतमांच्या ठिकाणी पराकोटीचे होते. परंतु कृतज्ञता बाळगणे वेगळे आणि शरणागती पत्करून गुलाम होऊन राहणे वेगळे. शरणागती म्हणजे पराधीनता. आणि मुक्तीच्या लाभासाठी पराधीनतेचे बंधन लादून घेणे ही कल्पनाच हास्यास्पद आहे.
लौकिक क्षेत्रातच नव्हे, तर तथाकथित पारमार्थिक क्षेत्रातही भगवान् बुद्ध निरपवाद स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी भिक्खूवर कोणतेही नियम लादले नाहीत, आणि जे काही नियम त्या त्या वेळची परिस्थिती पाहून त्यांनी घालून दिले, ते केवळ सूचनावजा असून स्थल-काल-परिस्थितीप्रमाणे त्यात फेरफार करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार त्यांनी भिक्खुसंघाला दिलेला आहे. साधनेसाठी संघात राहावे की एकान्तात राहावे या संदर्भात गौतम म्हणतात की संघात राहून साधना करणे सोयीचे वाटत असेल, तर संघात राहावे, एकान्तवास सोयीचा वाटत असेल, तर एकान्तवास पत्करावा, आणि एकान्तवास करीत असता ‘संघच बरा’ असे वाटले, तर पुन्हा संघात परत यावे. तसेच, कुणाही इच्छुक व्यक्तीला भगवी वस्त्रे धारण करून भिक्खू होता यावे, आणि भिक्खूला गरज वाटल्यास त्या वस्त्रांचा त्याग करून परत प्रपंचात जाता यावे, आणि कुणा भिक्खूने असे प्रपंचात परत फिरल्यास ते लांच्छनास्पदही मानले जाऊ नये, अशी भगवान बुद्धांची व्यवस्था आहे.
या ठिकाणी असा एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की पराधीनतेचा निषेध करणाऱ्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या गौतमांनी आपल्या अनुयायांना त्रिशरणांचा उच्चार करण्यास सांगून “बुद्धांना शरण जायला” का सांगावे ? “इतरांना शरण जाऊ नका, फक्त मलाच शरण या असेच त्यांनी म्हटलेले आहे की नाही? “बुद्धं शरणं गच्छामि । धम्मं शरणं गच्छामि । संघं शरणं गच्छामि ।।” ह्या प्रत्यही उच्चारल्या जाणाऱ्या त्रिशरणांत त्यांची व्यक्तिस्वातंत्र्याची आणि स्वाधीनतेची शिकवण कुठल्या कुठे गारद होऊन गेलेली नाही का? काळजीपूर्वक आणि पूर्वग्रहमुक्त दृष्टीने जर भगवान् बुद्धांच्या शिकवणीचे परिशीलन केले, तर असे आढळेल की कुणीही आपल्याला शरण यावे असे त्यांनी कुणालाही कधीच सांगितलेले नाही. उलटपक्षी, त्यांच्या देहावसानापूर्वी त्यांच्या शिष्याने त्यांच्या देहत्यागानंतर शिष्यांनी आचरावयाचे काही नियम घालून देण्याची विनंती केली, तेव्हा गौतमांनी उत्तर दिले, “हा संघ माझ्यामुळे आहे, किंवा माझ्यासाठी आहे असे थोडेच आहे ? मग मी संघाला नियम घालून देणारा कोण ?’ “स्वतःच स्वतःचा दिवा व्हा’ हे तर भगवान् बुद्धांच्या शिकवणीचे सारच आहे. “बुद्धं शरणं गच्छामि । धम्मं शरणं गच्छामि । संघं शरणं गच्छामि ।।” या त्रिशरणांचा असा स्थूल अर्थ मुळी नाहीच.
असे दिसते की त्यांना अभिप्रेत असलेले ‘बुद्धत्व’ हे अबुद्धाने हळूहळू प्रयत्न करून साध्य करायचे फळ नव्हे. भूतकाळात ग्रहण केलेल्या एखाद्या साधना-पद्धतीचे वर्तमानकाळी आचरण करून भविष्यकाळात साध्य हस्तगत करणे ही धर्माचरणाची पारंपरिक कल्पना गौतमांना मान्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगी सुप्त रूपात ‘बुद्धत्व’ वसत असते, आणि या सुप्त बुद्धस्वरूपाला जागविण्याची रीत म्हणजे धर्म. आपल्या सुप्त बुध-स्वरूपावर अविद्येचे दाट आचरण असल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. परंतु जो कुणी सत्य-लाभाव्यतिरिक्त इतर साऱ्या आकांक्षाचा त्याग करील त्याच्या ठायी स्वभावतःच असलेले बुद्धत्व जागेल त्याला बोधी प्राप्त होईल. आणि हे घडण्यासाठी गौतम बुद्ध नावाच्या व्यक्तीला शरण जाण्याची गरज नाही, तर स्वतःच्या ठायी सप्तरूपाने आधीच वसत असलेल्या आपल्या आतील बद्धस्वरूपाला शरण जायचे आहे. “केवळ स्वतःला शरण जा, अन्य कुणाला नको’ अशी भगवान बुद्धांची निःसंदिग्ध शिकवण आहे. मात्र हा ‘स्वतः’ म्हणजे अविद्येतून जन्माला येणारा आपल्यातील ‘मी’ नव्हे, तर या ‘मी’ च्या पलीकडे असलेले आपले शुद्ध बुद्ध-स्वरूप होय. त्या ‘अंतरीच्या बुद्धाने’ दिलेली प्रेरणा म्हणजे ‘धर्म’ होय. आणि अशा उत्स्फूर्त प्रेरणेने आपले अंतरीचे बुद्धत्व जागविण्यासाठी उद्यम करीत असलेले सहचर म्हणजे ‘संघ’ होय. अशा अर्थाच्या ‘बुद्धा’ला, अशा अर्थाच्या ‘धर्मा’ला, अशा अर्थाच्या ‘संघा’ला शरण जाणे हा बौद्ध परंपरेत उच्चारल्या जाणाऱ्या त्रिशरणांचा खरा अर्थ आहे.
परंतु असे जर असेल, तर मग ऐतिहासिक गौतम बुद्धांच्या शिकवणीचे स्थान काय ? ह्या बाह्य बुद्धांच्या शिकवणीची गरज तरी काय? त्याला उत्तर असे की गौतमांच्या मते, अगदी परमार्थाने विचार करता, या बाहेरून ग्रहण करावयाच्या कोणत्याच गुरूच्या शिकवणीची गरज नाही. जर एखाद्याचे मन आधीपासूनच आणि आपोआपच पूर्ण शुद्ध आणि पूर्ण निरिच्छ असेल, त्याचा ‘मी’ जर लुप्त झालेला असेल, तर जे काही उरेल, ते केवळ ‘बुद्ध-स्वरूप’च असेल, आणि ते प्राप्त करण्यासाठी कुणाच्याही उपदेशाची त्याला गरज भासणार नाही. कारण ‘निर्वाण’ हे त्याचे प्राप्तव्य न राहता त्याची वर्तमान सद्यःस्थिती असेल. पण एवढा उन्नत न झालेल्या सर्वसामान्य मुमुक्षूला मात्र, बोधी ही ज्याची सद्यःस्थिती आहे अशा बाहेरील बुद्धाच्या उपदेशाचा उपयोग होऊ शकतो. अशा बुद्धाचा हात धरून चालल्यास आपल्या ठायी स्वभावतःच असलेले बुद्धत्व जागविणे सुकर होते. वैद्यकशास्त्र असे सांगते की शरीराला झालेली इजा दूर करण्याची शक्ती शरीरातच विद्यमान असते. आणि म्हणून, परमार्थतः, वैद्य आणि वैद्यकीय औषधोपचार यांची तशी गरज नाही. पण जर वैद्याचा सल्ला घेतला आणि औषधोपचार केले, तर जखम लवकर बरी होऊ शकते. म्हणून, व्यवहारतः, वैद्य आणि औषधोपचार यांचा नक्कीच उपयोग आहे. नेमका याच प्रकारचा उपयोग भगवान् गौतम बुद्धांसारख्या भव-रोग वैद्यांचा आहे.
मात्र, हे विसरता कामा नये की शरीरात आधीच विद्यमान असलेल्या व्याधिमुक्त होण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला ‘साहाय्य’ करणे एवढेच वैद्याचे आणि औषधोपचाराचे काम आहे. त्या वैद्याला देवत्व देऊन त्याची पूजा-प्रार्थना करण्याचा उपयोग नाही, किंवा त्याने लिहून दिलेली औषधोपचारांची चिठ्ठी सोवळ्यात गुंडाळून तिला फुले-माळा अर्पण करूनही काहीच साध्य होणार नाही. तेव्हा भगवान् बुद्धांची पूजा-प्रार्थना करणारा मनुष्य बुद्धांचा खरा अनुयायी नसून, “कुणावरही विसंबून राहू नका; माझ्यावरदेखील नाही; तुमचे स्वतःचे बुद्धत्व तुम्हीच जागविले पाहिजे’ हा गौतमांचा उपदेश प्रत्यक्ष आचरून पूर्णपणे स्वावलंबी होणारा मनुष्यच त्यांचा खरा अनुयायी होय. (उत्तरार्ध पुढील अंकी )