पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे मन वळविण्यापूर्वी त्यांचे ‘मन’ आहे तरी काय? त्यांना पाहिजे आहे तरी काय ? हे समजून घ्यावे लागते. कुरुंदकरांनी या प्रश्नाची . मूलगामी चिकित्सा त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या प्रकरणात पुढीलप्रमाणे केलेली आहे:
भारतीय मुसलमानांची कायमची एक तक्रार असते की, त्यांना भारतीय घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही. आमचे सेक्युलर हिंदू राज्यकर्ते त्यांचा हा आरोप जोरजोराने नाकारतात. असे हे वादअनेक वर्षांपासून का चालू आहेत? याचे कारण हे की, ‘धर्माचे स्वातंत्र्य ही कल्पना भारतीय घटनेने ‘हिंदुपद्धतीने मान्य केलेली आहे, व त्याच हिंदुपद्धतीने हिंदू नेते हा विचार मांडीत असतात. या हिंदुपद्धतीनुसार प्रत्येक धर्मीयाला आपल्याला धर्मानुसार वागता येते; आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवता येते. मुसलमानांचा आक्षेप या ‘हिंदुपद्धतीवर आहे. घटना व नेते हिंदुपद्धतीने या गोष्टीचा विचार करतात हीच मुसलमानांनी तक्रार आहे. मुस्लिमांना त्यांच्या धर्मानुसार धर्मस्वातंत्र्य पाहिजे आहे व ते भारतीय घटनेने किंवा व्यवहारात त्यांना दिलेले नाही ही त्यांची खंत आहे. ही तक्रार वा खंत हिंदूंना समजत नाही, हा कुरुंदकरांचा मुद्दा आहे. यानंतर कुरुंदकर इस्लामप्रमाणे ‘धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय हे पुराव्यांनिशी दाखवून देतात.
यासंबंधात कुरुंदकर म्हणतात, “धर्मस्वातंत्र्य म्हणजे (इतरांना) मुसलमान करण्याचा हक्क (तबलीग); इतरांचे धर्म खोटे व भ्रष्ट असल्यामुळे त्यांच्या खंडनाचा हक्क; (इस्लाम) सत्यधर्माचे कुणी खंडन करू लागला तर त्याविरुद्ध लढण्याचा हक्क; इस्लाम हा विजेता व पसरणारा धर्म असल्यामुळे त्यात प्रदेशनिष्ठा बसत नाही हे सांगण्याचा हक्क, बिगर मुस्लिम राजवटीशी प्रामाणिक राहण्यात धर्मशास्त्राचा विरोध आहे, त्यामुळे अशा निष्ठेतून मोकळीक;…. धर्मस्वातंत्र्यात हे सारे येते. असे धर्मस्वातंत्र्य मुसलमानांना भारतात नाही म्हणून भारतात धर्मस्वातंत्र्य नाही असे मुसलमान मानतात”. (अन्वय, पृ. २०) अशा प्रकारे मुस्लिमांचे मन व मागण्या काय आहेत हे कुरुंदकर दाखवून देतात. या संदर्भात मुसलमानांचे मन वळविणे किंवा त्यांची मनःशांती करणे याचा अर्थ काय होतो हे वाचकांना सहज कळून येईल. सर्व हिंदूंनी मुसलमान होणे हाच मुस्लिमांचे मन वळविण्याचा परिणामकारक मार्ग आहे हाच याचा अर्थ आहे.
अर्थात श्री पळशीकरांनी शहामृगाची विशिष्ट स्थिती धारण केलेली असल्यामुळे त्यांना कुरुंदकरांचे किंवा अशाच प्रकारचे दलवाई, शहा व डॉ. आंबेडकर प्रभृतींनी केलेले विवेचन समजण्याची शक्यता नाही. एवढेच नाहीतर शहा, कुरुंदकर व दलवाई या तिघांची मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा कशी ‘घातक’ आहे यावर पळशीकरांनी लेखन करण्याचे ठरविले आहे. आजपर्यंत आम्ही असे मानीत आलो की, श्री पळशीकर हे वरील त्रिमूर्तीप्रमाणेच बुद्धिवादी, समाजवादी, पुरोगामी व राष्ट्रसेवादलाच्या विचाराचे आहेत, त्यामुळे त्यांचे हे लेखन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या तीन दिवाळी अंकांत (१९९३) यासंबंधीचे त्याचे तीन लेख येत आहेत (किंवा आता आले आहेत) असे त्यांनीच आम्हाला सांगितले आहे.
दि. ३० व ३१ ऑक्टोबर ९३ रोजी प्राज्ञपाठशाळा वाई यांच्या वतीने पुण्याला ‘हिंदुत्वाची विधायक मांडणी’ या विषयावर २०-२५ विचारवंतांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. निमंत्रक श्री. वसंत पळशीकर होते. अध्यक्षस्थानी दोन्हीही दिवस श्री. मे.पुं. रेगे होते. डॉ. स.रा. गाडगीळ, डॉ. स. ह. देशपांडे, प्रा. अशोक केळकर, देवदत्त दाभोळकर, राम बापट प्रभृति विचारवंत उपस्थित होते. आम्हालाही चर्चेचे निमंत्रण होते. या चर्चासत्रात श्री पळशीकरांनी असे विधान केले की, “कुरुंदकर व दलवाई यांचे मुस्लिम प्रश्नविषयक लेखन घातक व बेजबाबदार आहे.” यातील बेजबाबदार’ विशेषणावर बरीच गरमागरम चर्चा झाली. तेव्हा “वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची” स्थिती पळशीकरांनी आता बदलली असून शहा-कुरुंदकर-दलवाई या त्यांच्याशी एकेकाळी सहविचारी असणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना श्री पळशीकर ‘घातक’ व ‘बेजबाबदार ठरवू लागले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या वरील तीन लेखांनंतर त्यांचे खरे स्वरूप आपल्या लक्षात येऊ शकेल.
आपला
१२६ विवेकनगर, नांदेड-४३१ ६०२ शेषराव मोरे

संपादक, आजचा सुधारक यांस,
समाजातील मुलींची घटती संख्या : कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा एक लेख ऑगस्ट ९३ च्या आजच्या सुधारकात आलेला आहे. निरनिराळ्या जनगणनांतून दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया कमी पडतात ते स्पष्ट करणारे आकडे त्या लेखात दिलेले आहेत. त्यावरून दिसते की उत्तरोत्तर स्त्रियांचे प्रमाण एकूण लोकसंख्येत घटत आहे.
मला वाटते, हे आकडे एकांगी आहेत. त्यामुळे लेखकद्वयांची कारणमीमांसा चुकीची असणे संभवते. लोकसंख्येत दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत ही एक बाजू झाली. दुसरी बाजू पाहिली पाहिजे ती अशी की जननसंख्येत पुरुष आणि स्त्रिया ह्यांचे प्रमाण काय आहे. एका विज्ञानविषयक नियतकालिकात मी असे वाचल्याचे स्मरते की मानवांत आणि इतर सस्तन प्राण्यांतही स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक जन्मतात.
निसर्गाचे असे गृहीत कृत्य असावे की टोळीयुद्धे ही अपरिहार्य आहेत आणि त्यांत पुरुषांचा संहार अधिक होणार. त्याची भरपाई करून समतोल साधण्यासाठी पुरुषांची जननसंख्या अधिक असावी. पण आता टोळीयुद्धे थांबली आहेत. निसर्गाला आपले चुकलेले गणित सुधारण्यास थोडा अवधी लागतो.
दुसरे असे की पुरुषाची स्वाभाविक रोगप्रतिकारशक्ती स्त्रीच्या मानाने कमी असते. कोणत्याही साथीच्या रोगात स्त्रियांहून पुरुष अधिक मरतात असे दिसून येईल. पण आधुनिक वैद्यकामुळे जे पुरुष निसर्गतः जगण्यास अक्षम असतात ते जगू लागले आहेत.
ह्या दोन कारणांमुळे, म्हणजे युद्धे थांबल्यामुळे आणि वैद्यकात प्रगती झाल्यामुळे लोकसंख्येतील स्त्रीपुरुषांचे प्रमाण विषम झाले आहे. शि अनुसूचित जातींत आणि वनवासी समाजांत स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या संख्येतील अंतर इतर समाजांतील अंतरापेक्षा कमी आहे ह्याचे कारण आधुनिक वैद्यकाच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत हे असावे. त्यांच्यातील स्त्री पुरुषविषयक चालीरीतींचा ह्याच्याशी संबंध नसावा. रोगाला बळी पडण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जे निसर्गतः अधिक असते त्यात वैद्यकाने अडथळा आणण्याची संधी ह्या समाजात मिळत नाही, हे खरे कारण असावे.
गर्भजलपरीक्षा ही फार अलीकडची गोष्ट आहे. तिची माहितीही फार थोड्या लोकांना आहे. १९८१ च्या आणि त्या आधीच्या जनगणनेच्या आकड्यांवर त्याचा काहीच परिणाम झालेला असणार नाही. मुलींच्या संगोपनाविषयी अनास्था असते असे एक कारण सुचविण्यात आले आहे. ते खरे नसावे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत श्रमजीवी वर्गात मुलीच्या बापाला वरपित्याकडून हुंडा मिळत असे. मुली असणे हे भाग्याचे समजले जाई. मुलगी देण्याच्या अटीवर तरुण मुले भावी सासऱ्याच्या घरी दोनतीन वर्षे गडी म्हणून काम करीत. बहुजन समाजात मुलीच्या संगोपनाची उपेक्षा करावी अशी परिस्थितीच नव्हती.
म्हणून मला वाटते की समाजात आज स्त्रियांची संख्या पुरुषांच्याहून कमी आहे ह्याचे कारण स्त्रिया अधिक मरतात हे नसून निसर्गतःच अधिक जन्मणाऱ्या पुरुषांचे मृत्यू युद्धे थांबवून आणि आधुनिक वैद्यकाच्या साहाय्याने आपण कमी केले आहेत हे आहे. जी परिस्थिती आहे ती भयानक आहे; गुन्हेगारीला उत्तेजन देणारी आहे हे खरे. तिच्यावर उपाययोजना काय करावयाची ते मला माहीत नाही. तरीही कारणमीमांसेत चूक होऊ नये अशी इच्छा आहे.
आयडीयल सोसायटी, सागरमाळ, श्रीनिवास दीक्षित
कोल्हापूर- ४१६००८

संपादक, आजचा सुधारक, यांस,
श्री. द. श्री. मराठे ह्यांच्या जगाचा इतिहास ह्या पुस्तकातील मला आवडलेला एक उतारा सोबत पाठवीत आहेः
राजकीय पक्ष आपल्या कृत्यांचे आणि हेतंचे समर्थन करण्यासाठी विद्वान भाड्याने घेतात. या विद्वानांना तुम्ही अमक्या गोष्टींचे वा धोरणाचे समर्थन करा, म्हणजे आम्ही अमुक मोबदला तुम्हाला देऊ, असे कबूल करण्याचे कारण नसते. सरकारच्या हातामध्ये इतक्या जागा असतात, की त्यांच्या वासावर पुस्तकांतले किडे नेहमी घुटमळत असतात.
‘तेआपण होऊन सरकारचे काय धोरणअसेल, कोणत्या पक्षाला काय आवडेल, याचा विचार करून भाषणे करण्यास, लेख लिहिण्यास व पुस्तके लिहिण्यास पुढे सरसावत असतात. त्यांच्या नुसत्या पाठीवरून हात फिरविला तरी त्यांच्या शेपट्या जोराजोराने हालावयास लागतात, आणि त्यांना सांगावे त्या दिशेने ते भुंकू लागतात. बरे अगदी तोंडच चाटावयास आले आहेत असे वाटले तर नाकावर एक रपाटा ठेवून दिला, की कोठे तरी केकाटत जाऊन बसण्यावाचून त्यांना काही मार्ग राहत नाही.
“विद्वान रागावला तर काय करील ? रुसून एखाद्या कमिटीचा राजीनामा देईल, अगदीच फुरंगटून बसला तर वेळेला एखाद्या लहानशा वर्तमानपत्रात एखादा कुजका लेख लिहील. बडी वृत्तपत्रे सहसा राज्यकर्त्यांविरुद्ध काही छापणारच नाहीत. नाराज विद्वानाच्या लेखाचा समाचार घेण्यास दुसरा मत्सरग्रस्त आणि आशाळभूत विद्वान तयार असतोच.
“लोकशाहीमध्ये सैन्य, पोलिस किंवा मजुरांना पगारवाढ देऊन शासनाला स्वतःचे बाजूस ठेवणे सोपे असते. परंतु शासनाला सर्वसामान्य लोकांना जास्त पैसे देणे शक्यच नसते. उलट विविध करांद्वारे त्यांच्याकडून जादा पैसे काढणे जरुरीचे असते. अश्या वेळी सामान्यांना काही प्रलोभन किंवा धाक निर्माण करावा लागतो, ज्यायोगे सामान्यजन स्वार्थत्यागास तयार होतात. शत्रु म्हणजे राक्षस आहे. त्याचा जय झाला तर मानवजातीवर अत्याचार होतील. परधर्मीयांबद्दल अशाच गोष्टी पसरविल्या जातात की ज्यायोगे सामान्यजन त्यांची वैयक्तिक दुःखे विसरून एखाद्या नेत्याभोवती गोळा होतात. त्यांना असे वाटते की आपण देश, धर्म, नेता, मानवजातीसाठी आपल्या यातना विसरून लढावयास तयार झालो आहोत. त्यांचा अहंकार फुलविला जातो. जनतेला झिंग आणवून राज्यकर्ते स्वतःचे हित साधतात. ह्या कामी विद्वान फार उपयोगी असतात.
“झिंग उतरली की सामान्यजन आपल्याविरुद्ध खवळतील हे न कळण्याइतके मुत्सद्दी मूर्ख नसतात. ती आपत्ती टाळण्यासाठी खुल्या समाजाला नवीन आरोळ्या देऊन कैफ आणला जातो. हा खेळ संपूर्ण जगात चालू आहे.”
केशवराव जोशी
‘तत्त्वबोध हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ-४१०१०१

संपादक, आजचा सुधारक
यांना सादर नमस्कार.
नोव्हेंबर १९९३ च्या आजचा सुधारक’ मध्ये प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखात पृष्ठ – २४३ वर विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात हे विधान वाक्यांश या रीतीने दोन वेळा आलेले आहे. केवळ रूपावरून पाहता हे विधान संश्लेषकही आहे आणि विश्लेषकही आहे. विश्लेषक अशाकरता की उद्देश्यातील विज्ञान हे पद विधेयात पुनरुक्त आहे. त्याला संश्लेषकही म्हणता येईल. ते अशाकरता की उद्देश्याचा (विज्ञान हा) सर्व अर्थ सांगूनही विधेयात उद्गामी हे अधिकतर विशेषण आले आहे.
ही आपत्ती येते याचे कारण ‘सायन्स’ या शब्दाचे इंग्रजीत दोन अर्थ आहेत आणि मराठीत ते दोन वेगवेगळ्या शब्दांनी दाखविता येतात. इकडे लेखकांनी अवधान दिले नाही हे आहे. ‘सायन्स’ या शब्दाचा एक अर्थ ‘ज्ञानाची व्यवस्थित रचना (म्हणजे, शास्त्र)’ असा आहे. या अर्थाने गणित हे सायन्स आहे आणि रसायन हेही सायन्स आहे. पण गणित निगामी आणि अनुभवनिरपेक्ष आहे. (१ + १ = २ असे गणितात होते. पण पाण्याचा एक थेंब + पाण्याचा एक थेंब = पाण्याचे दोन थेंब असे अनुभवात घडत नाही.) याच्या उलट रसायन हे अनुभवनिष्ठ आणि उद्गामी आहे. सायन्स-सायन्समधील हा फरक दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये ‘इंडक्टिव्ह सायन्स’ हा शब्दप्रयोग आवश्यक आणि समर्थनीय आहे. पण शास्त्र आणि विज्ञान अशा दोन शब्दांनी मराठी संपन्न असल्याने ‘गणित हे शास्त्र होय पण विज्ञान नव्हे आणि ‘रसायन हे शास्त्र आहे आणि विज्ञानही आहे’ असे म्हणता येते. हा फरक केल्यावर ‘विज्ञानांना उदगामी विज्ञाने म्हणतात असे चमत्कारिक वाक्य निर्माण होणार नाही. आपण म्हणू शकतो की ‘सर्व विज्ञाने ही उद्गामी शास्त्रे होत किंवा म्हणू शकतो की ‘उद्गामी आणि म्हणून अनुभवनिष्ठ शास्त्र हे विज्ञान होय. विज्ञान हा ‘एम्पिरिकल सायन्स याला प्रतिशब्द आहे. विशिष्टांपासून मिळालेले ज्ञान ते विज्ञान होय, अनुभव हा विशिष्टांचाच असतो. उद्गामित्व हे विज्ञानाच्या व्याख्येचा भाग असेल तरी स्पष्टतेसाठी ‘विज्ञान उद्गामी असते हे म्हणणे खपेल. पण विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात हे खपू
नये.
श्रीनिवास दीक्षित
२१ आयडीयल सोसायटी, सागरमाळ, कोल्हापूर – ४१६००८

शब्दविवेक
मराठी आपली मातृभाषा असली तरी तिच्यातील अनेक शब्दांचा उपयोग आपण अनेकदा (काही शब्दांचा तर सर्वदा) चुकीचा करतो. पुढे अशा तीन शब्दांचे विवरण केले आहे.
(१) ओलीस
अलीकडे दहशतवाद इतका वाढला आहे की त्यामुळे ओलीस ठेवलेल्यांचे वृत्त आपल्याला जवळपास रोज वाचायला मिळते. पण या शब्दाचा योग्य उपयोग आज कोणालाच माहीत नाही असे दिसते.
मूळ शब्द आहे ‘ओल’. ‘ओलीस त्याचे चतुर्थ्यंत रूप आहे. दाते यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातील पुढील नोंद पाहाः
ओल-स्त्री. हमीदाखल ठेवलेली वस्तू (गुरे, माणसे इ.) तारण; शत्रूच्या तहाच्या अटी पाळाव्यात म्हणून त्याकडून खातरजमेसाठी मनुष्य, गुरे, द्रव्य इ. मागून घेऊन त्यास अटी पूर्ण होईपर्यंत अडकवून ठेवणे. ‘कोट किल्ले दिले ओलिला त्रिंबकजीसाठी – ऐपो ३८३.
(२) लेणी
डोंगर पोखरून त्यात सभामंडप, देवादिकांच्या मूर्ती इ. कोरून तयार केलेली गुहा. उदा. कायांचे लेणे.
हा अलंकार या अर्थाचा शब्द असून तो नपुंसकलिंगी नाम आहे. त्याचे अनेकवचन ‘लेणी. परंतु अलीकडे हा शब्द स्त्रीलिंगी एकवचनी म्हणून वापरला जातो, आणि त्याचे अनेकवचन लेण्या असे केलेले वारंवार आढळते. (उदा. अलीकडे श्री दया पवार यांच्या लोकसत्तेतील साप्ताहिक लेखात तो वापरला आहे.) केशवसुतांच्या प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयांत खोदा, निजनामे त्यांवरती नोंदा’ या ओळीतील ‘त्यांवरती’ या रूपावरून तरी ही चूक व्हायला नको होती.
(३) षट्क
क्रिकेटच्या खेळात एका चमूतील गोलंदाज विरुद्ध चमूतील फलंदाजांवर चेंडू फेकतो, त्यात एका वेळी एक गोलंदाज फक्त सहा चेंडू फेकू शकतो. सहा चेंडूंच्या गटाला ‘ओव्हर असे नाव असून त्याला मराठीत ‘षट्क हा उत्तम शब्द धावते समालोचन करणारे वापरतात. पण त्याचे व्याकरणशुद्धरूप माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून त्याच्या उच्चारात चूक होते. ते हा शब्द घटक (शतक सारखा) उच्चारतात. परंतु हा उच्चार चूक आहे. मूळ शब्द आहे ‘षट्’ त्याला समुदायवाचक ‘क’ प्रत्यय लावून ‘षट्क हा शब्द तयार केला आहे. अशा प्रकारचे अन्य शब्द म्हणजे ‘द्विक’, ‘त्रिक’, ‘चतुष्क’, ‘पंचक’ इ. त्याचा उच्चार करताना त्यातील ‘ट्’ हलंत आहे हे लक्षात ठेवून केला पाहिजे. त्याचे अनेकवचन ‘पट्कें, परंतु बोलताना तो एकारान्त शब्द दीर्घ आपण अकारांत उच्चारतो. तो पटकं असा लिहावा व वाचावाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.